हिंदू एकीकरणातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे हिंदूंची जातिसंस्था. हा अडथळा दूर करण्याचे प्रयत्न आपापल्या परीने अनेकांनी केले. त्यांपैकी एक म्हणजे – स. १९३६ मध्ये लाहोर येथे श्री. संतराम बी. ए. यांनी आयोजित केलेले जातपात तोडक मंडळाचे वार्षिक अधिवेशन. ज्याचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषवणार होते. याकरता डॉ. आंबेडकरांनी अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण तयार केले. परंतु पुढे या भाषणातील कित्येक मुद्द्यांमुळे जातपात तोडक मंडळाशी संबंधित असलेले आर्य समाज व हिंदू महासभेचे सदस्य नाराज झाल्याने हे अधिवेशन रद्द करण्यात आले. यासंबंधीचा पत्रव्यवहार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित हिंदूंची जातीप्रथा व ती मोडण्याचा मार्ग :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रकाशक :- रमेश रघुवंशी’ मध्ये दिलेला आहे.
आंबेडकरांचा जातीसंस्थेचा अभ्यास संतरामजींना माहिती होता व यामुळेच आंबेडकरांनी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवावे आणि हिंदू संघटणार्थ आपले मौलिक विचार मांडावेत अशी संतरामजींची प्रामाणिक इच्छा होती. त्यानुसार बाबासाहेबांनी हिंदू एकीकरणासाठी हिंदू धर्म पुनर्रचनेची आवश्यकता व तिचे संभाव्य स्वरूप कसे असावे याची मांडणी केली, ती खालीलप्रमाणे :-
(१) विद्यमान हिंदू धर्म हा तत्वांऐवजी नियमांचा संग्रह बनला आहे.
(२) या नियमांना सार्वकालिकतेचे संरक्षक कवच दिल्याने त्यात बदल करण्याची अजिबात तरतूद नाही. तेव्हा असा धर्म नष्ट केला पाहिजे.
(३) सुधारित हिंदू धर्मात, सर्व हिंदूंना मान्य होईल असा एकच धर्मग्रंथ असला पाहिजे.
(४) सर्वमान्य धर्मग्रंथाखेरीज इतर धर्मग्रंथ प्रमाण मानण्यास व त्याचा प्रचार, उपदेश करण्यास कायद्याद्वारे बंदी असावी.
(५) पुरोहिताचे काम करण्याची मोकळीक सर्वांना असावी. त्याकरता शासनाने परीक्षा नेमून, ती पास करणाऱ्यालच तशी सनद द्यावी. गैरसनदी पौरोहित्य करणाऱ्यास दंड देण्यात यावा.
(६) पुरोहित सरकारी नोकर असावा. पुरोहितांची संख्या सरकारने निश्चित करावी. त्याची नीतिमत्ता, श्रध्दा, पूजास्थान इ. बाबत संशय आल्यास त्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी.
(७) कायद्यासमोर पुरोहिताचा दर्जा इतर नागरिकांप्रमाणेच असावा.
(८) धर्माला नवीन तत्वांचा पायाभूत आधार आवश्यक असून स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांवर धर्माची पुनर्रचना व्हावी.
बाबासाहेबांच्या मांडणीतील हा धोका आर्य समाज, हिंदू महासभा इ. नाममात्र हिंदू संघटणार्थ परंतु प्रत्यक्षतः हिंदूंवर आपले सर्वांगीण वर्चस्व अबाधित राखण्यासाठी झटणाऱ्या वैदिक धर्मियांनी ओळखून लाहोर अधिवेशन उधळण्याची धमकी दिली. तेव्हा श्री. संतराम बी. ए. यांनी हे अधिवेशन रद्द करून टाकले.
पुढे राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन प्रमुख तत्वांचा समावेश करण्यात आला. मूलभूत हक्कांची निश्चिती करण्यात आली. कोणत्याही समुदायास विशेष दर्जा वा अधिकार देण्यात आले नाहीत. महत्वाचे म्हणजे निधर्मीयता स्वीकारण्यात आली. वैदिक धर्मीय राज्यघटना का मानत नाहीत, याचे मुख्य कारण हे आहे.
डॉ. आंबेडकरांनी सुचवल्याप्रमाणे हिंदू धर्म पुनर्रचनेचा विचार होण्याचा संभव स. १९३६ मध्ये जितका होता, तितका तो नंतर राहिला नाही. झपाट्याने बदलत जाणारी राजकीय स्थिती, फाळणी, स्वातंत्र्य, डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर इ. कारणांनी हा विषय तिथेच थांबला. परंतु आज मागे वळून पाहताना असे कबूल केल्याखेरीज राहवत नाही की, हिंदू धर्म पुनर्रचनेचा व जातिसंस्था निर्मूलनाचा डॉ. आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग अव्हेरून हिंदूंनी मोठी चूक केली. त्याचे परिणाम म्हणजे आज ते सर्वार्थाने वैदिक धर्मियांच्या वर्चस्वाखाली आले आहेत. आपल्या अज्ञानाची अशी किंमत चुकवावी लागेल, हे हिंदूंच्या स्वप्नीही आले नसेल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा