रविवार, २४ जानेवारी, २०१६





    आजची सकाळ काही निराळीच उगवली. खरंतर विशेष असं काही नाही पण २६ जानेवारीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी चालली होती. शहरी भागात, विभक्त कुटुंब पद्धतीत हे असलेच इव्हेंट सण - समारंभासारखे वाटतात. अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा लहान मुलांचा उत्साह अवर्णनीय तर असतोच. पण त्याहून विशेष त्यांच्या आयांचा !

    प्रत्येकीला आपल्या चालू वयापेक्षा कमी अन् आकर्षक दिसण्याची जाम हौस. याकरता करण्यात आलेली वर्षभराची फिटनेसची यातायात, ब्युटी पार्लर व टिप्सचा वापर, यांचा दृश्य व एकत्रित परिणाम याच दिवशी सर्वांच्या नजरेस आणायचा असतो. ' ती ' देखील यास अपवाद नव्हती.

    खांद्याबरोबर कापलेले केस, निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तिचा गोरा वर्ण खुलून दिसत होता असं म्हणता येत नाही. पण चारचौघीत ती नक्कीच त्याचं लक्ष वेधून घेत होती. दोन मुलांची आई असूनही कपड्यांवरून तरी पोट सुटलेलं वाटत नव्हतं. 
    
    मैत्रिणींच्या घोळक्यात बसली असली तरी तिचीही नजर भिरभिरत होती. अधूनमधून इकडे - तिकडे बागडणाऱ्या मुलाच्या नावाने हाक मारून ती त्याचं लक्ष वेधून घेत होती. तो पण लांबून तिच्याकडे चोरून कटाक्ष टाकत होता. नेहमीपेक्षा आज त्याला ती वेगळीच भासत होती. खरंतर रोज ती त्याला नवीच वाटायची. जणू काही तिला तो प्रथमच पहात होता.

    वाऱ्याच्या झुळकीने तिच्या गालांवर रुळणाऱ्या केसांकडे पाहून त्याला हेवा वाटत होता. बोलताना मध्येच केस नीट करण्याच्या बहाण्याने तिने हात वर केल्यावर होणारी हालचाल मन वेधून घेत होती. मध्येच बोलताना होणारा ओठांचा चंबू ....

    बराच काळ दोघांचाही खेळ रंगला. त्याची वाढती अधीरता एव्हाना तिच्या ध्यानी आली होती. तिचीही काही वेगळी स्थिती नसल्याने काहीतरी बहाण्याने मैत्रिणींच्या गराड्यातून ती बाहेर पडली व बिल्डींगच्या प्रवेशद्वारातून आत शिरली. हा इशारा समजून तोही चार दोन मिनिटांनी मागून गेला. प्रवेशद्वारापर्यंत उगाचच रेंगाळत चालणारी पावलं आत शिरताच झपाझप उचलली जाऊ लागली. एरवी चार मजले चढून जाताना त्याच्या जीवावर यायचं पण आज अधीरता इतकी कि, जवळपास पळतच चार मजले तो चढून गेला.

    अपेक्षेप्रमाणे रूमचा दरवाजा उघडाच होता. पटकन आत शिरत त्याने दार बंद केले. काहीशा घिसाडघाईने पायातल्या चपला काढत तो बेडरूममध्ये गेला.

    आत ती बेडवर बसलेलीच होती. त्याची वाट बघत. तो आत येताच तिनं नजरेनंच आव्हान दिलं व तो श्वापदाप्रमाणे तुटून पडला ......

 
    .... तासा - दोन तासांनी दोघांचीही तात्पुरती शांती झाली. परस्परांच्या शरीराची उब दोघांनाही सोडवत नव्हती पण घड्याळाचे काटेही फिरायचे थांबत नव्हते. प्रथम ती उठली. तिच्यापाठोपाठ त्यालाही उठायचं होतं पण अंग जडवलेलं. त्यामुळे तो पडून राहिला. काही वेळानं ती पुन्हा बेडरूममध्ये आली. त्याच्याजवळ प्लेट देऊन म्हणाली, " अहो, एवढा लसून सोलून देता का ! मुलं येतील आता. डाळ - भात लावते ! " 

मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

मी असा का आहे ? किंवा मी कसा आहे ?




    आरंभीच मी नमूद करतो कि, Spinal muscular atrophy ( Type - 3 ) या दैवी देणगीचा मला लाभ झाला आहे. अर्थात, हि गोष्ट अलीकडे दशकभरापूर्वी उजेडात आली. तोवर विविध शक्यता आजमावत वैद्यकीय, आयुर्वेदिक क्षेत्रातील तज्ञांनी काय काय उपाय केले याची एक कंटाळवाणी प्रदीर्घ कहाणीच होईल.

    या दैवी देणगीची मला जाणवण्याइतपत ठळक लक्षणे १ ली त असताना कि तत्पूर्वी लक्षात आली, ते नीटसं आठवत नाही. पण ज्यावेळी याची जाणीव झाली --- आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत --- तेव्हापासून एक मानसिक द्वंद्व सुरु झाले. मनात उसळणाऱ्या इच्छा, भावना ( बालसुलभ बरं का ! ) पूर्ण करण्यास शरीराची असमर्थता. त्यातून येणारी निराशा. एकलकोंडी वृत्ती. मन मारण्याची कला / सवय हळूहळू माझ्यात रुजत गेले. याच काळात पुस्तकांनी माझ्या विश्वात प्रवेश केला. आरंभ झाला चांदोबा, ठकठक ते चंपक. यानंतर सिंहासन बत्तीशी व इसापनीती अपरिहार्य. वास्ताविकेतेपेक्षा हि कल्पनारम्य, जादूमय नगरी मला जास्त रिझवू लागली. बाकी म्हणायला वास्तव जीवनात शाळेत मित्रपरिवार खूप भेटला. पण कुठेतरी हा फरक जाणवल्याखेरीज राहत नाहीच. असो.

    जसजसं वय वाढत चाललं तसं औषधोपचार व आजाराची ( विकार, रोग का बी म्हना ! ) वाढ होत चालली. शाळेला अधिकाधिक दांड्या पडणं, अभ्यासात मागं पडणं, याच काळात वयात येणं आणि विजातीय लिंगी व्यक्तीविषयक भावनांचा, आकर्षणाचा मनात जन्म होणं. सर्व काही विचित्र. आपल्याकडे समुपदेशन नावाचा प्रकार आत्ता कुठे आलाय. त्यावेळी तितकासा नव्हता. तसा आत्ताही तो प्रगल्भ आहे अशातला भाग नाही, पण अजिबातच नसण्यापेक्षा जे आहे ते वाईट नाही.

    या साऱ्या मानसिक स्थित्यंतरातून जात असताना मूळचे अंगभूत गुण कदाचित लोपले असतील. ( जर असले तर हां ! ) पण दुर्गुण वाढीस लागले. माझा अहंकार, हट्टीपणा, रागीट स्वभाव, माणूसघाणेपणा सारं काही.  दोष द्यायला कोणालाही देऊ शकतो पण जेव्हा सर्व बाजूंनी स्थितीचा विचार करतो तेव्हा कोणालाच दोषी मानायची इच्छा होत नाही. असो.

    ९ वी त नापास झाल्यावर बाहेरून १० वी ला बसलो. पास होण्याची गॅरेंटी कोणालाच नव्हती, पण मला होती. पास झालो. अगदी सेकंड क्लास मिळाला. जो कित्येक वर्षं मला हुलकावण्या देत होता. पण परीक्षेतील मार्कांवर बुद्धिमत्ता अवलंबून नसते, हे मला अजून समजायचं होतं. नंतर रीतसर अकरावी आर्ट्सला अॅडमिशन. पुन्हा तब्ब्येतीची कुरकुर म्हणून कॉलेज सोडलं. पुण्याच्या टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बाहेरून प्रवेश घेत बीए केलं. मधल्या काळात वाचन चालूचं होतं. बाल श्रेणीतून डायरेक्ट उडी मारली ती प्रौढांसाठीच्या साहित्यात. जे उघड वाचता येत नाही. जोडीला बाबा कदम, काकोडकर प्रभूती त्यातल्या त्यात सभ्य लेखकही होते. शिवाय इतिहासाकडेही माझा कल जास्तच वाढत गेला.

    टिळक विद्यापीठातून बीए करताना स्वअभ्यासाची सवय लागली. त्यातूनच धड्याची टिपणं काढणं. त्यावर मत मांडणं. धड्यातील उतारा पटला नसल्यास तो का आवडला नाही याचे विवेचन करण्याची सवय झाली. माझ्यातील इतिहास विश्लेषकाचा हा जन्मकाळ होता.

    बीए नंतर एमए व नंतर पीएचडी असा टप्पा मी मनाशी निश्चित केलेला. दरम्यानच्या काळात इतिहास क्षेत्राशी संबंधित आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी करावे अशी इच्छा मनात प्रबळ झाली. यासाठी काहीजणांचे मार्गदर्शनही घेण्याचा प्रयत्न केला पण माझं अपुरं शिक्षण आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना या क्षेत्राकडे न फिरकण्याचाच सल्ला दिला. यांमुळे मी काही काळ गप्प बसलो.

    मधल्या काळात ऐतिहासिक कादंबऱ्यांऐवजी संदर्भ ग्रंथांचा संग्रह व अभ्यास केल्याने माझा कसलातरी आत्मविश्वास वाढत गेला व लिहिलं तर पानिपतवरच लिहायचं असंही मनोमन ठरवलं होतं. पानिपतवर मी एक नाही तर चांगल्या दोन - तीन लघु कादंबऱ्या लिहिल्या. ( ज्या कदाचित आजही माझ्याकडील रद्दीत पडून असतील. ) लिहून वाचल्यावर त्यातील कृत्रिमता ; विश्वास पाटील, ना. वि. बापट इ. च्या लेखनाची अनुकरण वृत्ती दिसून आली. मग पानिपत सोडून दिवाळी अंकाकरता ऐतिहासिक कथा लेखनाचा प्रयत्न केला. विषय निवडला बुराडी घाट. पण तोही अनसक्सेसफुल. कथा लेखनाचं तंत्रचं जमेना. लव्हस्टोरीजही लिहून पहिल्या. शेवटी हा आपला प्रांतच नाही समजून पानिपत मोहिमेच्या कारणांचा शोध घेणारी विश्लेषणात्मक लेखमालिका बनवली. तीही ठरवून नाही. अशीच बनत गेली. पानिपतच्या कारणांचा आढावा घेणारी लेखमालिका जसजशी प्रसिद्ध होऊ लागली तसतसा वाचकांचा मिळणारा अनुकूल प्रतिसाद पाहून माझी हिंमत आणखीनच वाढली. स्वतःच्या बुद्धीमत्तेबद्दल असलेला न्यूनगंडही कमी होत गेला. यातूनच पुढे ' पानिपत असे घडले ' ची निर्मिती झाली.

    काळ तसा खूप आहे. आठवत असल्यापासून निदान २५ - २७ वर्षांचा तरी. यात तपशीलवार लिहिण्यासारखं म्हटलं तर बरंच आहे आणि म्हटलं तर नाही. रडकथा लिहिण्याची मला सवय नाही. कारण, व्यक्तिगत जीवनात परिस्थितीला शरण जाणे मला कधीच पटले नाही. जमले नाही. त्यामुळे स्वभावात लढाऊपणा जरी आला असला तरी त्याला कुठेतरी अहंकार, गर्वाचीही छटा आहे. याची जाणीव आहे मला. पण त्यावर माझा इलाज नाही. कारण, मला कोणी घडवलं नाही. परिस्थितीनुसार मी घडत गेलो. बनत गेलो.

    माझ्या विशिष्ट परिस्थितीमुळे मी एकलकोंडा बनलो. याचे तोटे असले तरी फायदेही झाले. मी कधीच कोणाच्या प्रभावाखाली आलो नाही. त्यामुळं कोणत्याही बाबतीत पूर्वग्रह मनी बाळगणं मला जमलंच नाही. माझा कोणी आदर्श नाही. त्यामुळे वैचारिक गुलामीचाही प्रकार नाही. माझं तत्वज्ञान --- भले ते चुकीचं का असेना पण माझ्या अनुभवातून सिद्ध झालंय. याचा मला अभिमान आहे. तुम्ही पाहिजे तर घमेंड म्हणा !

    स्वअभ्यास वृत्तीमुळे बुद्धीला चालना मिळून मनाला व बुद्धीला पटेल तेच खरं हि वृत्ती जास्त वाढीस लागली. याविरोधात मी कधी घरच्यांचं ऐकलं नाही तिथं इतरांची काय कथा !

    माझ्यातील दोषांची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या विचित्र स्वभावाने माझं फारसं कोणाशी जास्त काळ पटलेलंही नाही. कारण, एका मर्यादेपर्यंत मी झुकू शकत नाही व ते थोडे वर येऊ शकत नाहीत. अर्थात, हि माझी मीमांसा आहे. विचारसरणी आहे. कोणाला मान्य असो नसो, अपनेको क्या ?

    तो भाई लोग, यह अपुनकी शॉर्टकट जीवनी तथा लाइफ स्टोरी। कोई बोर हो गया हो तो माफ़ करनेका। वैसे अपुन कभी अपने बारे में इतना लिखता नहीं, और आगे लिखूंगा भी नहीं। ( शायद हां ! ) तो किसीको बुरा लगा तो अपने पास रखो और अच्छा लगा तो भी अपने पासही रखो. क्योंकि, मला कोणाचं प्रेरणा वा स्फूर्तीस्थान बनायचं नाही व ती माझी योग्यताही नाही.

    कारण … आख्ख्या जगावरून ओवाळून टाकलेला वाह्यात कार्टा आहे, याची मला पुरेपूर जाणीव आहे !          

    तेव्हा, हे वाचा अन् विसरून जा. जिस तरह अपुन अपना भूतकाळ भूल गया, उसी तरह !!!