रविवार, १० सप्टेंबर, २०१७

वैदिक हा स्वतंत्र धर्म !


 
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी समाजमन चांगलेच ढवळून निघाले असून त्यानिमित्ताने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हिंदू - वैदिक स्वतंत्र धर्म वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राज्य पातळीवर याबाबतची प्रथमतः अस्पष्टशी जाणीव जरी डॉ. खोले - यादव प्रकरणाने झाली असली तरी व्यापक दृष्टीने पाहता देश पातळीवर हि जाणीव जागृत असून वैदिक धर्मियांनीच आपणांस धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून घोषित करावे अशी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे व त्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडून केंद्र सरकारने अहवाल मागवल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
स्वतंत्र वैदिक धर्म मान्यतेची हि प्राथमिक पायरी असल्याने यास्थळी अशी मागणी फेटाळून लावण्याचे कार्य आयोगाने इमानइतबारे पार पाडले आहे. परंतु हि मागणी फेटाळून लावताना आयोगाने दिलेली कारणं मात्र अतिशय हास्यास्पद आहेत.
आयोगाच्या मते वैदिक ब्राह्मण हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. परंतु हि गोष्ट वैदिकांनाच मुळी मान्य नाही याचे काय ? दुसरे असे कि, परंपरा व संस्कृती रक्षणार्थ आपण कटीबद्ध असल्याचे वैदिकांचे म्हणणे आहे. परंतु यामुळे त्यांच्या धार्मिक अल्पसंख्यांक मागणीस बळ प्राप्त होत नाही असा अजब तर्क आयोगाने मांडला असून याकरता युनेस्कोने वेद व वैदिक संस्कृती रक्षणार्थ केलेल्या विनंतीचा आधार घेण्याचा आयोगाने निरर्थक प्रयत्न केला आहे. उलट वैदिक हा स्वतंत्र धर्म असल्याची वैदिकांची मागणी हि युनेस्कोच्या विनंतीस पूरक व सुसंगत असल्याचेच यातून ध्वनित होते.
खेरीज वैदिकांची मागणी फेटाळून लावताना आयोगाने असे मत व्यक्त केले आहे कि, विश्व ब्राह्मण संघटना तसेच पूर्वेत्तर बहुभाषिक ब्राह्मण महासभेच्या मागणीनुसार वैदिकांना अल्पसंख्यांकत्वाचा दर्जा देण्याचे जर मान्य केले तर भविष्यात राजपूत, वैश्य इ. हिंदू जाती देखील अशा व्यवस्थेची मागणी करतील जेणेकरून हिंदू समुदायाचे अनेक तुकड्यांत विभाजन होईल.
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने हे मत सांगताना वैदिक हे हिंदू धर्मियच होत, हे गृहीत धरून प्रथम चूक केली आहे. त्यानंतर राजपूत, वैश्य आदींचा यांनी उल्लेख करत हिंदू समाजाचे अनेक तुकड्यांत विभाजन होण्याची भीती व्यक्त केली आहे.
मुळात वैदिक धर्म हा स्वतंत्र आहे. त्याची स्वतःची दोन हजार वर्षांहून अधिक अशी जुनी परंपरा आहे. यांचे स्वतंत्र धर्मग्रंथ, स्मृतिशस्त्रे, उपासना पद्धती असून याकरता लागणारा उपाध्याय वर्ग तसेच या सर्वांचे नियमन करणारी धर्मगुरू संस्थाही त्यांच्यात अस्तित्वात आहे. या धर्मगुरु संस्थेने मान्यता दिल्याखेरीज तसेच समस्त वैदिक कर्मकांडाचा अवलंब केल्याशिवाय कोणाला ' आपण वैदिक धर्मीय आहोत ' असे म्हणण्याचा अधिकार पोहोचतो का ? याचा विचार होणे अपेक्षित आहे. जो आयोगाने केलेला नाही.
त्यामुळे भविष्यात राजपूत, वैश्य किंवा राज्य पातळीवर धनगर, मराठा इ. जाती वैदिक मान्यतेची मागणी करतील वा त्या वर्गात आपला समावेश व्हावा अशी मागणी करतील हि भीतीच निरर्थक आहे. व त्यातूनही असे घडले तर हा वैदिक धर्मीय व त्या धर्माचे सदस्यत्व घेऊ इच्छिणारे यांचा प्रश्न आहे. तिथे आयोगाचे काय काम ?
आयोगाने हिंदू समाजाच्या विभाजनाची भीती व्यक्त करावी हे मोठं आश्चर्य मानलं पाहिजे. वर्षानुवर्षे होणारी धर्मांतरे काय आयोगास आजवर दिसून आली नाहीत ? या धर्मांतरांमुळे हिंदू समाजाचे विभाजन, नुकसान झाले नाही असे आयोगाला वाटते का ? कि आयोगाला मुळात वैदिक - हिंदू भेदच समजलेला नाही ? वा त्यांची समजावून घेण्याची मुळी इछाच नाही.
* खाली दिलेल्या संकेतस्थळांवर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालाची इंग्रजी व हिंदी भाषेतील वार्षिक रिपोर्टची पीडीफ फाईल उपलब्ध आहे.

http://ncm.nic.in/pdf/Annual%20Report/Annual%20Report%202016-17(%20English).pdf

http://ncm.nic.in/pdf/Annual%20Report/Annual%20Report%202016-17(%20Hindi).pdf

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

२२ प्रतिज्ञांची चिकित्सा






डॉ. आंबेडकर यांनी दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मदीक्षे प्रसंगी दिलेल्या २२ प्रतिज्ञा

१) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) गौरी - गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७) बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही.
८) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११) भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३) सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
१४) चोरी करणार नाही.
१५) खोटे बोलणार नाही.
१६) व्यभिचार करणार नाही.
१७) दारु पिणार नाही.
१८) ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदूधर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
२२) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.

     प्रस्तुत स्थळी आपण डॉ. आंबेडकरांनी धर्मांतरावेळी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञांची चर्चा करणार आहोत. चर्चेकरता या २२ प्रतीज्ञांच्या दोन प्रतिमा मी वापरात घेतल्या असून पैकी एक दीक्षाभूमी नागपूर येथील आहे व दुसरी सर्वसाधारणरित्या इंटरनेटवरील. पैकी दीक्षाभूमी येथील स्तंभावरील प्रतिज्ञांची प्रतिमा अधिकृत मानून तिच्या आधारेच उपरोक्त प्रतिज्ञांचे विवेचन करत आहे.



    प्रतिज्ञा क्र. १ ते ६ या संपूर्णतः नकारार्थी असून त्या हिंदू धर्म त्यागण्याच्या पार्श्वभूमीवर असल्याचे दिसून येते.
    यानंतर प्र. क्र. ८ व १९ याही हिंदू धर्माशी संबंधित असून पैकी प्र. क्र. ८ ब्राह्मण पुरोहित विरोधी असून प्र. क्र. १९ मध्ये हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकृतीचा उच्चार केलेला आहे.
    प्र. क्र. ५ हा बौद्ध व हिंदू धर्मातील फरक स्पष्ट करणारा भाग असून प्र. क्र. ९ ते १८ व २० ते २२ हा बौद्धधर्मी स्वीकृती व वर्तनाशी संबंधित आहे.

    या सर्व प्रतिज्ञांचे वरवर जरी चिंतन केले तरी यातून लक्षात येणाऱ्या दोन प्रमुख बाबी म्हणजे या प्रतिज्ञा जशा बौद्ध धर्म स्वीकृतीच्या आहेत तशाच या धर्मांतर्गत निर्मित नवीन पंथ स्वीकृतीच्याही आहेत. यामुळेच या २२ प्रतिज्ञांद्वारे बौद्ध धर्म स्वीकृतांचा समावेश नवयान या पंथात होतो. ज्याचा व्यवहारात निर्देश नवबौद्ध असा केला जातो.

    या पार्श्वभूमीवर उपरोक्त २२ प्रतिज्ञांपैकी प्रथम ३ आपण विचारात घेऊ.
१) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) गौरी - गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    
    डॉक्टरांनी सरसकट हिंदू देवी - देवता हा सरळ पर्याय न स्वीकारता क्रमाने ब्रम्हा - विष्णू - महेश तसेच राम, कृष्ण, गौरी - गणपती व मग हिंदू धर्मातील इतर देवदेवता अशी क्रमवारी घेतली आहे.
    ज्या व्यक्तीला आपला पुरातन धर्म --- येथे प्रतिज्ञा स्वरूपामुळे हिंदू हेच अपेक्षित आहे --- त्यागायचा आहे त्याच्या मनाची तयारी, प्रतिज्ञा स्वीकृतीपर्यंत व्हावी हा यामागील हेतू असू शकतो. परंतु यास्थळी उद्भवणारा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मियांनी बौद्ध धर्मांतर्गत नवयान पंथात प्रवेश घेण्याचे ठरवल्यास त्यांना या प्रतिज्ञा लागू होतात का ? नसल्यास नवयान पंथासह बौद्धधर्म स्वीकृतीनंतर आपल्या पुरातन धर्मातील देवी - देवतांचे भजन - पूजन करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो का ? वा अमान्य केला जातो का ? तसेच याच प्रतिज्ञांच्या आधारे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मीय उपास्य देवतेची आराधना त्याज्य मानली जाऊ शकते का ? कि त्यास या आज्ञांद्वारे अनुमती प्राप्त होते ?
    दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पंथाच्या द्वेषातून वा उपासना पद्धतीतील फरकावरून, मतभिन्नतेवरून स्वतंत्र पंथनिर्मिती समजता येते. परंतु ज्या धर्माचा आपण त्याग करणार आहोत त्याचा द्वेष करून नवधर्म स्वीकृतीचा हा मार्ग कितपत योग्य आहे ?
धर्मपरिवर्तन हे मत परिवर्तनातून होते. मग मतपरिवर्तनासाठी ज्ञान, जिज्ञासा सोडून द्वेषाचा आधार कशासाठी ?

    प्र. क्र. ४ व ५ अवतार संकल्पनेविषयी आहे.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.

    इथे हिंदू अवतार संकल्पना गृहीत धरली आहे परंतु खुद्द बौद्ध धर्मातील जातक कथा पुर्वजन्माधारे बुद्ध अवताराचे समर्थन करतात त्याचे काय ?   

    प्र. क्र. ६ ते ८
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७) बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही.
८) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.

    हे पुन्हा धर्मांतरीत व्यक्तीने मूळ धर्मातील परंपरा आचरणात आणू नयेत याकरता घातलेले एकप्रकारे निर्बन्ध आहेत.

    प्र. क्र. ११, १२ यातील संज्ञांची स्पष्टता प्र. क्र. १३ ते १८ मध्ये करण्यात आली आहे.
११) भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३) सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
१४) चोरी करणार नाही.
१५) खोटे बोलणार नाही.
१६) व्यभिचार करणार नाही.
१७) दारु पिणार नाही.
१८) ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.

    प्र. क्र. १९ - २२ हा भाग जुना धर्म त्यागून नवधर्म स्वीकृतीचा आहे.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदूधर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
२२) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.

    प्र. क्र. ९, १०, २२ हा भाग विचारात घेण्यासारखा आहे.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
२२) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.

     यामध्ये सर्व मनुष्य समान मानत समता स्थापण्याचा उल्लेख आहे. पण येथे कोणती समता अपेक्षित आहे ? तसेच समता स्थापण्याचे कोणते मार्ग, पर्याय येथे सांगितले आहेत ?
    याचे उत्तर प्र. क्र. २२ मध्ये मिळते. जेथे मत, मन परिवर्तन ग्राह्य धरण्यात आले आहे. याकरता धर्मांतर हि बाब आवश्यक मानली असून याद्वारे हि अट फक्त बौद्ध धर्म व नवयान पंथ स्वीकृतांनाच लागू होत असल्याचे दिसून येत.
    प्र. क्र. २२ मध्ये बुद्धाच्या शिकवणीनुसार वागण्याचा उच्चार आहे. आता इथे परत प्रश्न उद्भवतो कि, बुद्धाची शिकवण म्हणजे काय ? बावीस प्रतिज्ञांपैकी आरंभीच्या प्रतिज्ञा बुद्धाच्या शिकवणुकीत वा विचारांत अथवा वचनांत उल्लेखल्या आहेत का ? जर नाही, तर मग हा बौद्ध धर्मांतर्गत नवपंथ निर्मितीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.

    इथे आपण भूमिकांचाही विचार केला पाहिजे. घटनासमितीचे सदस्यत्व लाभलेली व या प्रतिज्ञांचा उच्चार - प्रचार करणारी व्यक्ती एकच आहे. परंतु दोन्ही ठिकाणी या व्यक्तीची भूमिका वेगवेगळी आहे. घटनाकाराच्या भूमिकेत आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता इ. तत्वांचा स्वीकार, पुरस्कार केला आहे. परंतु बौद्ध धर्म स्वीकृती व त्या धर्मांतर्गत नवपंथ निर्मिती वेळी त्यांनी घटनासमितीतील भूमिका सोडत पारंपारिक पंथ निर्मात्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. हा बदल हेतुतः झाला वा असे होणे अपरिहार्य होते, यावर चर्चा करणे अशक्य नाही परंतु ते प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत बसत नाही.
तत्कालीन बौद्ध धर्मांतर्गत प्रचलित हीनयान व महायान या पारंपारिक पंथांहून वेगळा पंथ स्थापन करण्याचा मानस, डॉक्टरांचा धर्मांतरापूर्वीच निश्चित झाला असावा असे त्यांच्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथावरून प्रतीत होते. अन्यथा विपुल प्रमाणात बौद्ध संहिता, साहित्य उपलब्ध असताना त्यांना या धार्मिक ग्रंथ लेखनाची आवश्यकता का भासावी ? याच अनुषंगाने उपस्थित होणारा दुसरा प्रश्न म्हणजे बौद्धधर्मांतर्गत नवपंथनिर्मितीची गरज आंबेडकरांना का वाटावी ? 
     
    सामान्यतः एका धर्मांतर्गत जेव्हा अनेक पंथ - उपपंथ निर्माण होतात तेव्हा त्यांचा जन्म दुसऱ्या पंथाच्या विरोधात, चुरशीने झाल्याचे दिसून येते. परंतु इथे थोडा फरक आहे. बाबसाहेब बौद्ध धर्मातील प्रचलित दोन पंथांचा येथे विचारच करत नाहीत व त्यांच्या टीकात्मक प्रतिज्ञांचा रोख सरळसरळ हिंदू धर्मावर आहे. हि गोष्ट त्या काळाशी कितीही सुसंगत असली तरी घटना इतिहासबद्ध झाल्याने याचे ग्रांथिक, वैचारिक परिणाम काय होतीच याचाही विचार होणे अपेक्षित होते.

    यानंतरचा भाग आहे शब्दप्रामाण्यवादाचा. या बावीस प्रतिज्ञांनुसार हिंदू धर्माशी निगडीत असे कोणतेही कृत्य करण्यास काही नवबौद्ध मंडळीं विरोध दर्शवतात. परंतु त्याचप्रमाणे प्र. क्र. १४ ते १७ च्या पालनासंबंधी ते तितके आग्रही असतात का ? इथे व्यक्तिगत अपवाद असू शकतात परंतु प्रश्न सार्वजनिक / प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे.
    शब्दप्रामाण्यवादातून कट्टरता जन्म घेते हा इतिहास असून याचे भरपूर दाखले गतकालीन घटनांतून प्राप्त होतात. परंतु त्यासोबत याचेही भान बाळगणे आवश्यक आहे व ते म्हणजे सहजीवनातून सर्वच बाबींची देवाण - घेवाण होत असते. त्यास विरोध करण्याने सामाजिक समरसता --- जी समतेसाठी अत्यावश्यक आहे --- कधीच अस्तित्वात येणार नाही.
    धर्म - पंथ संस्थापक, परिवर्तकांचे विचार हे कालसापेक्ष असतात. कालातीत नाही. त्यामुळे कालसुसंगत त्याचा अर्थ घेत त्यात गरजेनुसार बदल करण्यातच व्यापक समाजहित सामावेलेलं आहे.      
         

बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

प्रासंगिक (४)





    दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं. पण धर्मातूनच दहशतवाद निर्माण होतो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. वस्तुतः धर्म म्हणजे काय ? हे लक्षात न घेताच अशा प्रकारची कॅच लाइन तयार करून तिचा प्रचार केला जातो व जास्त विचार करण्याची सवय नसलेली मंडळी अशा कॅची लाइन्सवर डोळे मिटून विश्वास ठेवतात.

    धर्म हि वास्तविक समाज नियमन करणारी संस्था आहे. या संस्थेला बळ पुरवण्यासाठी अध्यात्म, पारलौकिक जग तसेच समाजाच्या दृष्टीने पूज्य, पवित्र असलेल्या प्रतीकांची जोड देण्यात आली. जेणेकरून धर्म या संस्थेला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला.

    आपल्याकडे धर्म हा शब्द कित्येकदा नियम याच अर्थाने वापरला जातो, त्यामुळे तो व्यापक मानला जातो. जसे पुत्रधर्म, राजधर्म, पत्नीधर्म इ. परंतु धर्म शब्द इतक्या व्यापकतेने वापरूनही आपण धर्म हि संकल्पना, संस्था तितकी व्यापक, निरपेक्ष मानतो का ?

    व्यवहारात पाहिले असता याचे उत्तर नकारार्थीच मिळते व धर्म हि संकल्पना आपणही इतरांप्रमाणेच संकुचित अर्थाने वापरत असल्याचे सिद्ध होते.

    यावरून धर्म हि संस्था व्यापक नसल्याचे किंवा त्यास व्यवहारात मर्यादा असल्याचे स्पष्ट होते का ?

    थियरीनुसार उत्तर द्यायचे झाले तर धर्म हि संकल्पना व्यापक, निरपेक्ष पद्धतीने वापरता येणे सहजशक्य आहे. फक्त तिची पारलौकिक, पूज्य - पवित्र घटकांशी घातलेली सांगड वेगळी केली तर. व प्रॅक्टिकली असे करणे अशक्य असल्याने हि थियरी इथेच कोलमडून पडते.

    असे का व्हावे ?

    धर्माचं व्यापक बनलेलं स्वरूप लक्षात घेता व्यक्ती तसेच समाजाचं कोणतंही अंग यापासून विभक्त पडू नये याची रचनाकारांनी खबरदारी घेतल्याचे दिसून येते. यामुळे धर्मविहीन समाज हि कविकल्पनाच ठरते.

    काहींच्या मते, साम्यवादी देशांत धर्म हि संज्ञा नाही किंवा त्या देशात धर्मविहीन हि संकल्पना शक्य आहे. पण माझा त्यावर असा आक्षेप आहे कि, साम्यवादी तत्वज्ञानावर श्रद्धा व पालन हि देखील एका धार्मिक संस्था व समाजाचीच लक्षणे नाहीत का ?

    धर्म दहशतवादाला थारा का देतो ?

    कोणत्याही मानवनिर्मित संस्थेप्रमाणे धर्म हि देखील एक संस्था असल्याने त्यावर अंमल गाजवणारे ज्या मनोविकारांचे असतात तद्वत ती कार्यरत असते. सामान्यतः एक समजूत असते कि, धर्मसंस्था प्रमुखांना ऐहिक सुखाचा, सत्तेचा मोह नसतो. परंतु हे अर्धसत्य आहे. आपली धर्मसंस्थेवरील पकड घट्ट करण्यासाठी तसेच जनमानसात धर्मसंस्थेचे महत्त्व अबाधित राहावे याकरता त्यांना राजसत्तेची आवश्यकता असतेच. कुठे ती ते थेट हाती घेतात तर कुठे अप्रत्यक्षपणे !
यामुळेच प्रतिस्पर्ध्यांना दडपण्यासाठी --- यामध्ये धार्मिक संस्था ताब्यात घेण्याकरता विरोधात असलेले प्रतिस्पर्धी तसेच धर्मसंस्थेविरुद्ध बोलणारे, या सर्वांचाच समावेश होतो -- दहशतीचा वापर केला जातो. अशा दहशतीच्या मार्गापासून शांततेचा संदेश देणाऱ्या जैन - बौद्धादी धर्माच्या अनुयायांनाही परावृत्त होता आले नाही हा इतिहास आहे.

    धर्मग्रंथांतील आज्ञा - वचनांची चिकित्सा का नाकारली जाते ?
    धर्मग्रंथांतील आज्ञा - वचनांना प्रत्यक्ष व्यवहारात, आचरणात आणण्याचा आग्रह योग्य आहे का ?

    कोणत्याही लेखातील विधान कधीही सार्वकालिक वा त्रिकालाबाधित नसते हा सर्वमान्य सिद्धांत फक्त धर्मग्रंथांबाबत अपवाद ठरतो. प्रथमतः अशा ग्रंथांतील वचनांची चिकित्साच नाकारली जाते. कारण चिकित्सा होताच विधानं कालबाह्य ठरण्याचा धोका असतो व विधानं कालबाह्य ठरली तर अशा ग्रंथांविषयी समाज मनात निर्माण केलेली पवित्र, पूज्य, अलौकीक अशी भावना नष्ट होण्याची शक्यता असते व हि भावना नष्ट झाली तर धर्माच्या अस्तित्वावरच घाला घातला जातो.

    सामान्यतः शासन निर्मित कायदा समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन बनवलेला असतो. कोणत्याही मानवनिर्मित रचनेप्रमाणे हा संपूर्णतः निर्दोष नसतो व त्यातील त्रुटींवर चर्चा होऊन त्यास आव्हानही दिले जाते. कारण हा मनुष्यनिर्मित आहे. परंतु हेच विधान धर्मग्रंथांबाबत चालत नाही. कारण एकतर ते परमेश्वराने, परमेश्वराच्या दूताने अथवा साधारण मनुष्यांतील अलौकिक शक्ती प्राप्त इसमाने ते रचल्याची भावना असते. व अशा ग्रंथांत मुळी त्रुटीच असू शकत नाही हि भावना यामुळे प्रबळ होऊन चिकित्सा नाकारली जाते आणि अशा निर्दोष ग्रंथांतील वचनांना अंमलात आणल्याने व्यक्ती - समाजाचे नुकसान ते काय होणार ? असा सवाल उपस्थित केला जातो.  

    अर्थात हा प्रश्न वरवर जरी बिनतोड वाटत असला तरी प्रत्यक्षात तो तसा नसतो परंतु, जशी तुम्ही न्यायालयीन वा शासननिर्मित कायद्यांची चिकित्सा करता तशीच आम्हांलाही तुमच्या धर्मग्रंथांची चिकित्सा करायची आहे असे म्हणण्याचे धाडस फार कमीजण करतात. यामागे कारणं काहीही असली तरी व्यक्तीच्या मनावरील धर्म श्रद्धा, ईश्वरी संकल्पना यांचा नाही म्हटलं तरी थोडाफार प्रभाव हा असतोच. या संदर्भात इस्लाम धर्मियांच्या कुराणाचे उदाहरण उद्बोधक आहे. याची वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याच्या भानगडीत मुस्लीम विद्वान पडत नाहीत व जवळपास सात - आठशे वर्षांचा निकट सहवास होऊनही हिंदू विद्वानांना याची बुद्धीनिष्ठ चिकित्सा करता आली नाही.

    धर्मसंस्था अविनाशी आहे का ?

    याचे उत्तर १००% होकारार्थी देणे अशक्य आहे. कारण एक व्यक्ती स्वयंप्रेरणेने नियमाचं पालन करू शकते. परंतु समाज स्वतःहून नियमांचं पालन करण्यास केव्हाही नाखूष असतो. त्यामुळे त्यांस धाक दाखवून नियम पालन करवून घेणे भाग पडते व यामुळेच सामाजिक शांतता, सुरक्षितता कायम राहते. आधी हि गरज टोळी वा कुटुंब संस्थेने भागवली. पुढे तिचे विकसित रूप धर्म आणि शासनसंस्था बनले.

    वस्तुतः या संस्था अमूर्त तसेच अमर्त्य आहेत. तसेच यांच्या संज्ञा, स्वरूपात कितीही फरक असला तरी त्यांची कार्यपद्धती समानच आहे. व्यापक समाज हित लक्षात घेता अशी एखादी सर्वोच्च नियंत्रक संस्था अस्तित्वात असणे आवश्यक आहे परंतु त्याच व्यापक समाज हितास्तव अशी संस्था पूर्णतः समाज नियंत्रणमुक्त असणेही घातक आहे. सद्य स्थितीत आपण धर्म व शासन संस्थेचे घातक रूप अनुभवत आहोत. याचा पुढ्चा टप्पा काय असेल हे सध्या तरी माझ्यासाठी अज्ञात आहे.    

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

प्रासंगिक (३)

श्रेणी, जाती व वर्णसंस्था या तीन संकल्पनांचा हेतुतः व अज्ञानपूर्वक घोळ करत हिंदू धर्माच्या जातिव्यवस्थेकडे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु यातील श्रेणी व जाती संस्था परस्परांशी निगडीत असून श्रेणीसंस्थेच्या विघटनानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे व्यवसायानुसार जातीसमूहांत विभागणी.
आधीच्या काळी विविध व्यवसायांचे संघ होते. एकाच व्यवसायात कौशल्य प्राप्त करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होती. इथे व्यवसाय संघाचे सदस्यत्व केवळ गुणकर्मावर आधारित होते. परंतु श्रेणीसंस्थांच्या विघटनानंतर यात बदल होत गेला. विघटनावेळी श्रेण्यांची विभागणी व्यवसाय व मुख्य व्यवसायास पूरक अशा उपव्यवसायांनुसार जाती - उपजातींत होत गेली. त्यामुळे पूर्वी ज्या व्यवसायात कोणालाही सहभाग घेण्याचं स्वातंत्र्य होते ते जाऊन इथे आनुवंशिक तत्वावर तो व्यवसाय त्या कुटुंबापुरता -- समुहापुरता मर्यादित झाला. त्याचेच पुढे कालानुरूप विकसित रूप म्हणजे आजची आपली जातीसंस्था. तसेच श्रेणीसंस्थेत सर्वधर्मियांना प्रवेश असल्यामुळे जे अहिंदू होते, ते श्रेणीसंस्थेच्या विघटनानंतर आपापल्या मूळ धर्माचे, वर्णाचे राहिले. बदल फक्त हिंदू समाजरचनेत घडून आला.
परंतु बऱ्याचदा हिंदू धर्मीय व्यक्ती या जातीसंस्थेसोबत वैदिक धर्मीय वर्णसंस्थेची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात व वैदिकही यांस मान्यता देतात, असे का ?
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि, वर्णव्यवस्था हि वैदिक धर्म - समाजजीवनाचा घटक होती. हिंदू धर्म - समाजाचा नव्हे. तसेच वैदिकांची वर्णव्यवस्था हि वैदिक धर्मीय या देशात येण्यापूर्वी वा त्यानंतर अल्पावधीतच संपुष्टात येऊन समस्त वैदिक समाज हा एकवर्णी झाला. वैदिकांच्या या समाजव्यवस्थेचे भ्रष्ट स्वरूप त्यांच्या मनुस्मृतितही आढळून येते. परंतु इथे प्रश्न असा आहे कि, हिंदूंची जातीसंस्था व वैदिकांची वर्णव्यवस्था यांची सांगड कशा प्रकारे व का घालण्यात आली असावी ?
हिंदूंची श्रेणीसंस्था आणि वैदिकांची वर्णव्यवस्था यातील महत्त्वाचं साम्य म्हणजे दोन्हींचे सदस्यत्व जन्माधिष्ठ नसून गुणकर्म तत्वावर आधारित होते. परंतु यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जगभरातील प्रत्येक धर्म - समाजात अशा प्रकारची गुणकर्मावर आधारीत असलेली वर्गव्यवस्था अस्तित्वात होतीच. त्यामुळे केवळ या साम्यावरून हिंदू - वैदिक एकधर्मीय होत असा तर्क वा अनुमान काढण्यात काही अर्थ नसला तरी अशा साम्यांचाच आधार घेत अशी रचना करण्यात आली हे उघड आहे, ऐतिहासिक सत्य आहे. परंतु इथे पुन्हा असा प्रश्न उपस्थित होतो कि, अशा बनवेगिरीची गरज का भासावी ?
वैदिक धर्माचा जन्म भारताबाहेरचा असून इथे हा धर्म वैदिकांच्या धर्मप्रसारामुळे जरी पसरला असला तरी देशातील एक मोठा जनसमुदाय प्रत्यक्षरीत्या या धर्माच्या प्रभावाखाली कधीच आला नाही. या देशात ज्याप्रमाणे जैन - बौद्धादी तत्वांची लाट आली तशी वैदिकांची येऊ शकली नाही. परंतु येथील सत्ताधाऱ्यांनी अनेकदा सर्व धर्मांप्रती उदारता दाखवत त्यांना आश्रय दिला. तसेच प्रत्येक राजवटीत, प्रत्येक राजाने कोणत्या ना कोणत्या धर्माचा विशेष पुरस्कारही केला. परिणामी अशी राजवट त्या त्या धर्माचा उत्कर्ष, उज्ज्वल काळ म्हणून ओळखली जाते. जसे सम्राट अशोकमुळे मौर्यघराणे व बौद्ध धर्म. याचप्रकारे गुप्त राजवटीत वैदिकांचा प्रकार घडून आला.
प्राचीन भारताच्या इतिहासापासून ते अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत इथे अनेक पराक्रमी हिंदू राजे झाले. कित्येक साम्राज्यं स्थापन झाली, अस्त पावली. मग एकट्या गुप्त सम्राटांच्या कारकिर्दीत असं काय विशेष घडलं कि, त्या काळास सुवर्णयुगाचे नाव प्राप्त झाले ? गुप्त साम्राज्याआधी इथे मौर्य, सातवाहनांची प्रदीर्घ काळ राजवट होती. गुप्त सम्राटांना समकालीन वा नंतर चालुक्य, परमार, राष्ट्रकुट, विजयनगर इ. सत्ता उदयास येऊन अस्त पावल्या. यांचा समावेश सुवर्णयुगात का होत नाही ? तसेच गुप्त काळात जर हिंदू समाजाचा खरोखरच विकास झाला होता तर त्यानंतर या समाजाची अवनती का व्हावी ? मुस्लिम आक्रमण हे याचं उत्तर होऊ शकत नाही. कारण गुप्त राजवटीच्या काळात इस्लामचा मुळी जन्मच झालेला नव्हता व मुस्लीम आक्रमण हिंदुस्थानच्या काळजाप्रत पोहोचण्यास बारावं शतक उजडावं लागलं. याचा अर्थ साहजिकच असा होतो कि, हिंदू समाजाची अवनती त्यापूर्वीच झालेली होती. मग गुप्तकाळ हा उत्कर्षाचा मानावा कि अपकर्षाचा ?
पुराण ग्रंथ हे हिंदू धर्माचे व इतिहासाचे एक साधन मानले जाते. या पुराणा ग्रंथांचे लेखन - पुनर्लेखन गुप्तकाळात मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सर्वमान्य आहे व या हिंदू पुराणांवर वैदिक आवरणं चढवल्याचेही आता स्पष्ट होऊ लागलं आहे. परंतु इथं पुन्हा प्रश्न उपस्थित होतो कि, अशा बनावटगिरीची वैदिकांना गरज का पडावी ?
वैदिकांना त्यांचा धर्म, धर्मग्रंथ अलग असल्याचे माहिती होते. तरीही त्यांनी दोन धर्माचं एकीकरण करत आपलं वर्चस्व अबाधित राखण्याचा प्रयत्न का केला असावा ?
वैदिक धर्माचा इथे मिशनरी पद्धतीने प्रसार झाला. परंतु कोणत्याही धर्मांतरित समाजात ज्या समस्या निर्माण होतात तशा या वैदिक धर्मात प्रवेशलेल्यांच्या बाबतीतही झाल्या. याच धर्मांतरीत वैदिकांनी पुराणांच्या लेखन - पुनर्लेखन कामात श्रेणी ते जाती हा क्रम वर्ण - जाती असा करून दोन धर्मांचा व आपल्या पूर्वेतिहासाचा धागा जुळवण्याचा मर्यादित यशस्वी प्रयत्न केला. मर्यादित यासाठी कि, हे दोन धर्म कधीच एकजीव होऊ शकले नाहीत व यशस्वी याकरता कि, हिंदूंनी जातीसंस्थेचा उगम वर्णसंस्थेतून झाला यावर आपली श्रद्धा ठेवली. विशेष महत्त्वाचे म्हणजे वैदिकांनी ज्याप्रमाणे वर्णव्यवस्थेची सुस्पष्ट व्याख्या करून ठेवली तशी जातीसंस्थेची कधीच केलेली नाही.
इथे हि बाब आपण लक्षात घेणे अत्यावश्यक आहे व ती म्हणजे आपण ज्या काळाचा विचार करत आहोत, त्या काळात लिखित सामग्री अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून बव्हंशी पूर्वेतिहास हा ऐकीव स्वरूपाचा / मौखिक परंपरेने जपलेला होता व या स्थितीत ब्रिटीश राजवट येथे स्थिर होईपर्यंत फारसा फरक पडला नाही. तसेच या काळात ग्रंथांचे जे काही लेखन होई त्यामध्ये एका ग्रंथाच्या त्याच गावातील वा आसपासच्या गावातील हस्तलिखित प्रतींत तफावत होत असे. उदा :- शिवकालीन बखरी.
अशा तफावातींमुळे आपल्या पुराण ग्रंथांत कधीच एकवाक्यता दिसून येत नाही. परंतु हा धर्मांतरीत वैदिकांविषयीचा मुद्दा झाला. मूळ तसेच कट्टर वैदिक धर्मियांनी या बाबी कशा खपवून घेतल्या ? हा प्रश्न उरतोच.
वैदिक धर्मात प्रवेशलेल्या हिंदूंनी आपल्या सर्वच पुरातन चाली - रिती, परंपरा, संस्कार त्यागले नाहीत. तेव्हा अशा पधर्मांतरीतांमुळे आपल्या धर्माचे मूळ स्वरुप लोपून ते विकृत वा भ्रष्ट होऊ नये म्हणून मूळच्या वैदिकांनी आपल्या स्मृतिग्रंथांत अशा धर्मांतरीतांना चाप लावण्यासाठी अनेक बंधने लाग्डली. वैदिक स्मृतितील श्लोकांत जो विरोधाभास, घालघुसड आढळून येते, त्यामागे हे देखील एक कारण आहे.
वैदिक धर्मियांना आपला धर्म हिंदू धर्माहून स्वतन्त्र असल्याचे व हा धर्म हिंदुस्थान बाहेरचा असल्याचे चांगलेच माहित होते व आहे. तरी त्यांनी आपल्या धर्मबांधवांनी वैदिक धर्माची हिंदू धर्मासोबत सांगड घालण्याचा जो प्रयत्न चालवला होता, तो न थांबवता उलट त्यास हातभारच लावला. कारण धर्मसत्ता हि कधीही राजसत्तेविना उभी राहू शकत नाही व वैदिक धर्माचे स्वरूप तसेच प्रसार व्याप्ती पाहता तिला अशी राजसत्ता प्राप्त होणे वा गुप्त काळाप्रमाणे कायमस्वरूपी राजाश्रय मिळणेही शक्य नव्हते. तेव्हा जे चाललं आहे ते भल्यासाठीच म्हणत त्यांनीही या बनवाबनवीत सहभाग घेतला.
वैदिकांची हिंदू धर्मातील घुसखोरी इतक्यावरच थांबली नाही तर त्यांनी हिंदू धर्मावर वैदिकत्वाचं कलम करत हरेक बाबतीत श्रेष्ठ स्थान वैदिक धर्म, ग्रंथांना मिळवून देण्याचा यत्न केला. वैदिक देवतांचे प्रस्थ माजवण्याचा प्रयत्न केला. याकरता येथील प्रचलित, प्रस्थापित दैवतांना आहे त्या स्थानावरून खाली खेचण्याचे वा त्यांचे मूळ स्वरूप लोपून त्यांस वैदीकत्वाचं आवरण चढवण्याचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ, वैदिक रुद्र व हिंदू शिव यांची त्यांनी सांगड घातली. हिंदू धर्मातील शैव परंपरेला मोडीत काढण्यासाठी वैष्णव परंपरा निर्माण करून वर हिंदूंची तांत्रिक पूजा बदनाम करून टाकली. कित्येक शैव स्थळे वैष्णव म्हणून ताब्यात घेतली. उदा :- पंढरपूर, तिरुपती इ.
वैदिकांचा श्रेष्ठत्वाचा सोस इतका वाढला कि, प्रत्येक थोर, पराक्रमी हिंदू राजामागे त्यांनी या ना त्या मार्गाने खरीखोटी वैदिक पात्रं मार्गदर्शक रूपाने घुसवली. उदा :- मौर्य संस्थापक चंद्रगुप्ताचे कुलशील माहिती नसते पण चाणक्याची गोत्रासहित माहिती उपलब्ध असते. तीच बाब शिवाजीच्या इतिहासाची.
वैदिकांच्या या धार्मिक - राजकीय इतिहास क्षेत्रातील घुसखोरीने येथील हिंदू समाजमन आपल्याच पूर्वेतिहासात गोंधळून जाऊन आपल्या मुळांचा शोध वैदिक धर्मसाहित्याच्या आधारे घेऊ लागले, घेत आहे.
कोणी म्हणेल कि, हिंदू - वैदिक हे इतिहासात वेगळे असतील परंतु सध्या तरी एकजीव, एकत्र आहेत ना ? तर, तसं अजिबात नाही. उदा :- सावरकर सारख्यांनाही सहा सोनेरी पाने लिहिताना हिंदुत्वाचा जप करत मधेच आपलं वैदिक महात्म्य घुसवण्याचा मोह आवरला नाही. बरं, हि गेल्या शतकातील बाब मानावी तर चालू शतकात, देशाच्या केंद्र सत्तेत बसलेला राजकीय पक्ष हिंदुत्वाचा गजर करत मधेच वैदिक राग का आळवत असतो ?
यावरून वैदिकांच्या भाषेतच बोलायचं झालं तर, ज्याप्रमाणे मुसलमान जसं आपलं मुस्लीमत्व विसरू शकत नाही तद्वत वैदिकही आपलं वैदिकत्व क्षणभरही नजरेआड करू शकत नाहीत.

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

प्रासंगिक (२)




    भारतीय विवाहसंस्था हि दोन प्रकारच्या श्रमविभागणी तत्वावर आधारित आहे. प्रथम निसर्गतः स्त्री - पुरुष या भेदावर. ज्यानुसार प्रजननाचे कार्य स्त्रीकडे व त्या विशिष्ट काळापुरते संरक्षण, संगोपनाचे पुरुषाकडे व दुसरी मनुष्यनिर्मित -- ज्यामध्ये स्त्री वर प्रजननाखेरीज घरातील सर्व कामे सोपवून घराबाहेरील, अर्थात घरखर्च चालवण्याकरीता व इतरही अनेक कामांची जबाबदारी पुरुषांकडे सोपवण्यात आली. परंतु हि श्रमविभागणी तितकीशी काटेकोरही नाही. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न व गरीब या दोन्ही गटांत जमीन - अस्मानचे अंतर आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटातील स्त्री घराबाहेर पडू शकत नाही. कारण त्याची गरजच भासत नाही. परंतु आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरील स्त्रीला घराबाहेर पडणे अपरिहार्य असून एकाच वेळी तिला घरखर्चाला हातभार लावणे व घरातील काम पाहणे, या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

    यास्थळी विवाहित स्त्रियांच्या आर्थिक स्थितीतील फरक जरी नजरेआड केला तरी घरकाम हा दोहोंतील कॉमन मुद्दा शिल्लक राहतोच.

    तसं पाहिलं तर स्त्रियांच्या दृष्टीने विवाह ही म्हणजे एकप्रकारची रिप्लेसमेंटच असावी. उदा :- मुलाची आई, जसजसे तिचे वय होईल तसतशी मुलाच्या लग्नासाठी अधीर होते. का ? तर, घरात कामाला हातभार लावण्यासाठी सून यावी म्हणून ! असो.

    विवाहसंस्थेचा मूळ हेतू अनिर्बंध लैंगिक संबंधांना प्रतिबंध व प्रजनन असल्याचे जरी मान्य केले तरी एवढाच मर्यादित असावा असे वाटत नाही. उदा. :- राष्ट्र वा राज्य संकल्पनेचा जन्म कुटुंबातूनच होतो.

    भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास किती जुना आहे या चर्चेत शिरायचं काही कारण नाही. यास्थळी प्रश्न इतकाच आहे कि, काळानुसार भारतीय विवाहसंस्था प्रगत झाली आहे का ? लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे का ?

    व्यक्ती तितक्या प्रवृत्ती लक्षात घेता उपरोक्त प्रश्नांपैकी एकाचेही उत्तर पूर्णतः नकारार्थी वा होकारार्थी देणे शक्य नाही, हे उघड आहे. परंतु एक सर्वसामान्य विधान करायचं झाल्यास विवाहसंस्था हि काळानुरूप बदलत चालली आहे. माझं हे विधान कदाचित काहीजणांना धक्कादायक वाटेल. परंतु बेगडी उच्च आदर्शवत तत्वांच्या चष्म्यातून न पाहता उघड्या डोळ्यांनी समाजाकडे पाहिल्यास माझ्या विधानाची प्रचीती यावी.

    भारतीय विवाहसंस्थेत काळानुरूप बदल होत आले आहेत. अनिर्बंध संबंधांपासून बहु पती - पत्नीत्व ते एकपति - पत्नी व्रत व त्यापुढे आजन्म साथ ते पटतंय तोवर एकत्र राहणे. अर्थात हे सर्व प्रकार टप्प्याटप्प्याने विकसित झाले नसून थोड्याबहुत फरकाने पुरातन काळापासून प्रचलित आहेत. परंतु भारतीय समाजमन खोट्या आदर्शवादी कल्पनांनी मोहित होणारे असल्याने एकपती - पत्नी, आजन्म साथ वगैरे संकल्पनांचा त्यावर प्रचंड पगडा आहे.

    बरं, याही तत्वांची चिकित्सा करता येते. एकपत्नी - पती वा आजन्म साथीचे तत्व ठीक. परंतु हे अंमलात केव्हा येतं ? जेव्हा उभयतांत प्रेमभाव असेल तर. इथे मुळात विवाहाआधी मुला - मुलीचे परस्परांशी मानसिक - भावनिक प्रेमसंबंध प्रस्थापित करणेच मान्य नाही. म्हणजे विवाहानंतर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले तर पुढच्या गोष्टी ! अन्यथा भारंभार घडणारे विवाहबाह्य संबंध आहेतच.
पति - पत्नीचे मन परस्परांना अनुरूप नसल्यास विवाह बंधनातून सुटका व्हावी या हेतूने घटस्फोटाची पूर्वी त्यातल्या त्यात सुलभ पद्धती होती. परंतु समाज जसजसा सुसंकृत, सुशिक्षित झाला तसतशी हि पद्धती अत्याधिक किचकट बनली.

    यास्थळी भारतीय न्यायसंस्थेचा देखील ही पद्धती किचकट व उपद्रवी बनवण्यामागे मोलाचा वाटा आहे. इथे नातेसंबंध तोडण्याकरता वाटाघाट केली जाते. परस्परांच्या सहवासाची किंमत ठरवून नुकसानभरपाई वा मोबदला म्हणून ती अदा केली जाते. वास्तविक यामागचा हेतू कितीही उदात्त असला तरी भारतीय समाजमन हे कायद्याचा वापर पीडितांच्या रक्षणासाठी नव्हे तर स्वस्वार्थ साधण्यासाठी इतरांना पिडण्याकरता करण्यास सरावलेले असल्याने अशा कायद्यांचा दुरुपयोग होणे स्वाभाविक आहे. व अशी खंडीभर प्रकरणं घडूनही यासंदर्भात कसलीही प्रतिबंधित उपाययोजना करण्यात आमची न्यायसंस्था असमर्थ ठरल्याचे नमूद करावे लागते.

    एक साधी गोष्ट. विवाहसंस्थेशी संबंधित सर्व प्रकरणे -- हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, पोटगी, मुलांचा ताबा वगैरे, एकाच न्यायालयाकडे -- कौटुंबिक न्यायालयाकडे सोपवून त्यासंबंधी शिक्षा, न्याय देण्याचे अधिकार त्याकडे देऊन अशी प्रकरणे झटपट निकाली कशी निघतील याकडे लक्ष पुरवण्याचे सोडून कौटुंबिक न्यायालयाकडे घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा इ. बाबी सोपवून इतर बाबींचे दुसऱ्या न्यायसंस्थांच्या अधिकार क्षेत्रात विकेंद्रीकारण केलेले आहे. भारतीय विद्वत्तेचा याहून मोठा अजब नमुना इतरत्र शोधून सापडणार नाही. असो.

    विवाहसंस्थेचा मुख्य हेतू म्हणजे प्रजनन. हि बाब आता ऐच्छिक बनली आहे. तशी ती पूर्वीही होती. फक्त स्वरूप निराळे होते. आत्ताच्या काळात अपत्य जन्माला घालणे, न घालणे हा ज्याच्या - त्याच्या मर्जीचा प्रश्न असला तरी सर्वसामान्यतः असे दिसून येते कि, हि तितकीशी ऐच्छिक बाबही नाही. अर्थात, ऐच्छिकता हि पुन्हा व्यक्तीच्या आर्थिक स्थिती सापेक्ष असल्याचे दिसून येते. या स्थितीत लगोलग बदल होणे अशक्य असले तरी बदलते आर्थिक व सामाजिक संदर्भ लक्षात घेता अपत्य जन्मास घालणे ही पूर्णतः ऐच्छिक बाब मानून पती - पत्नीने प्रथमतः आपल्या सहजीवनाकडे अधिकाधिक लक्ष पुरवावे असे माझे मत आहे.