अधांतरी

                                                 
प्रस्तुत चित्र इंटरनेटवरून घेतलेलं आहे.

    अखेर मनाशी निर्धार करत मी निर्णय घेतलाच ! आणखी काही काळ थांबून वाट पाहणं, नकारार्थी उत्तर मिळाल्यास विसरून जाणं हे काही माझ्या तत्वात बसण्यासारखं नव्हतं. एखादी गोष्ट आवडली तर तिच्या तिच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करण्याचा माझा स्वभाव होता. आणि यावेळी माझी अपेक्षा फार मोठी नव्हती. मला फक्त तिचा सहवास हवा होता.   …. सहवास !

    …. ती राजीखुशीने माझ्याजवळ यावी आणि कायमस्वरूपी नव्हे तर काही काळासाठी तिने स्वतःला माझ्या हवाली करावं. मला तिनं सर्वस्व अर्पण करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. भावना होती. तिला पाहताचक्षणी तिच्या सौंदर्याने, देहाने मला मोहित केले होते. त्याच क्षणी तिच्या प्राप्तीचा मनाशी निर्धार करून मी माझे प्रयत्न सुरु केले. भारी पगाराची नोकरी आणि एकटा जीव सदाशिव जगण्याची शैली असल्याने आर्थिक बाबतीत माझा हात सढळ असला तरी त्याबाबतीत ती पण काही कमी नव्हती. तिच्या नवऱ्याचा छोटेखानी का असेना पण स्वतंत्र व्यवसाय होता. त्यामुळे पैशांच्या बळावर आपला डाव सिद्धीस जाणार नसल्याची मला प्रथमपासूनच जाणीव होती.

    एका विवाहित स्त्रीचा मैत्रीपूर्ण सहवास मिळवण्याचा यशस्वी मार्ग कोणता ? वास्तविक, याबाबतीत मी अगदीच नवखा नव्हतो. पण का कोणास ठाऊक, यावेळी माझे सर्व उपाय, ट्रिक्स तिच्यावर लागू पडत नव्हत्या. वरवर आमची तोंडओळख होती. कधी दृष्टादृष्ट झाली तर ख्यालीखुशालीची औपचारिक बोलणी व्हायची पण त्यावर समाधान मानणाऱ्यांतील मी नव्हतो. उलट अशी भेट आणि बोलाचाल होताना माझी नजर तिच्या देहावरील चढ - उतारांवर रेंगाळायची. माणसाचे डोळे मनातील भाव सांगून जातात असं म्हटलं जातं. मानलं जातं. कदाचित खरंही असावं. त्यामुळेच कि काय ती मला अलीकडे टाळू लागली होती. पूर्वी नजरानजर झाली कि पाहणारी आणि क्वचित बोलणारी ती, आता मी दिसताच खाली मान घालून बाजूने जायची. माझा हा उपमर्द मला सहन होत नव्हता. तिच्या देहाची आसक्ती आणि तिचे मला टाळून जाणं यामुळे माझा अहंकार भलताच दुखावला. तिच्या या दृष्टकृत्याचे तिला भरपूर प्रायश्चित्त देण्याचं माझ्या मनात येत होतं पण या कामात आपल्याला जोर - जबरदस्तीपेक्षा राजीखुशी जास्त महत्त्वाची वाटत होती. त्यामुळेच मी स्वतःला आवरून धरत होतो.

    उलटणारा प्रत्येक दिवस माझी बेचैनी, आसक्ती वाढवत होता. आता अधिक काळ मी स्वतःला रोखू शकत नव्हतो आणि तिच्या मनात माझ्याविषयी तर अजिबात भावना नव्हत्या. तेव्हा निर्वाणीचा पर्याय म्हणून मी अद्भुत, अलौकिक, दिव्य अशा शक्तीला साद घालण्याचा निर्णय घेतला. त्याकरता प्रचलित मार्गांची माहिती देणाऱ्या पुस्तकांची खरेदी करून त्यातील लिखित उपायांची अंमलबजावणी करू लागलो. अनुभवाने सांगतो कि, अशा पुस्तकांत सांगितलेल्या दहा उपायांपैकी एक किंवा दोनच काय ते खरेखुरे असतात. बाकीचे नुसते असेच !

    एका पुस्तकात सांगितल्या प्रमाणे ' विशिष्ट दिवशी, विशिष्ट पदार्थ मिसळून ' सिद्ध केलेला विडा तिला खायला घालण्याचा मी प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणावं  लागेल त्याला. कारण, तिला एकटीला विडा खायला देणं शक्य होणार नाही म्हणून तिच्या नवऱ्याकरता मी एक बनवला आणि ते दोन विडे मी त्यांना दिले खरे पण, विडा घेताना अदलाबदल होऊन ' सिद्ध विडा '  त्याने खाल्ला. त्या दिवसापासून आजपर्यंत त्याला टाळता - टाळता माझ्या नाकी नऊ आले. मेला, जेव्हा तेव्हा मला ' खाऊ कि गिळू ' अशा नजरेनं बघत असतो. शरम कशी वाटत नाही त्याला कुणास ठाऊक ?

    तर असे अनेक ' अंगलट ' येणारे उपाय आजमावल्यावर मला माझी इच्छित मनोकामना पूर्ण करून देणारा मार्ग मिळाला. त्याकरता कराव्या लागणाऱ्या सर्व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करत होतो. दर पौर्णिमेला स्मशानात जाऊन, विवस्त्र होऊन, थंड पाणी अंगावर घेऊन मी साधना करत होतो. अशा निश्चित एक पौर्णिमांची साधना पूर्ण झाल्यावर अखेरच्या विधीचा दिवस उजडला. दिवस कसला, खरं तर रात्रचं उगवली. त्या दिवशी मी जाम आनंदात होतो. खुश होतो. आज रात्रीचा विधी संपन्न झाला कि, लवकरच ती मला वश होणार होती. तिचा सौंदर्यपूर्ण देह मला उपभोगायला मिळणार होता. निवळ कल्पनेनेच माझं विमान आकशात उडू लागलं होतं.

    त्या दिवशी आयुष्यात कधी नाही ती रात्र पडण्याची मी अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो. दिवसभर काहीही न खाता - पिता रात्र होऊन सर्वत्र सामसूम होताच मी घर सोडले. अखेच्या विधीकरता लागणारे सर्व सामान आणि सिद्ध यंत्र घेऊन मी स्मशानात हजर झालो. गेल्या कित्येक दिवसांच्या सहवासाने आता मला घरापेक्षा स्मशान जास्त बरं वाटत होतं. तो काळोख, त्या चिता, तो धूर, तो पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा गोंगाट सारं काही मला आवडू लागलं होतं. आपलसं वाटू लागलं होतं. खरं तर मलाच माझ्या मनाच्या आवडीचे नवल वाटत होते. पण तिकडं दुर्लक्ष करत मी अखेरच्या विधीकरता तयारी करू लागलो. निर्वस्त्र होऊन थंडगार पाणी अंगावर घेऊन मी त्या सिद्ध यंत्राच्या पूजेकरता बसलो. कितीतरी वेळ भान विसरून माझी पूजा चालू होती. पण खरोखर माझं भान हरपलं होतं का ? का कुणास ठाऊक, माझं मन  त्या परिसरात रेंगाळत होतं. खरे तर पुस्तकात दिल्याप्रमाणे त्या सिद्ध यंत्राच्या पूजेवर माझं मन एकाग्र असणं अत्यावश्यक होतं. पण प्रत्यक्षात तसं होत नव्हतं. मनाच्या खेळाकडे दुर्लक्ष करीत मी यंत्रवत पूजा करू लागलो.

    अखेर माझ्या उग्र साधनेला यश मिळण्याची चिन्हं दिसू लागली. जमिनीवर ठेवलेलं ते यंत्र पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रकाशू लागले होते. जमिनीपासून अधांतरी वर येउन फिरू लागले होते. तो इशारा होता. सूचना होती. दिव्य शक्तीच्या अवतीर्ण होण्याची. मी उठून उभा राहिलो. पुस्तकात सांगितल्यानुसार माझ्या हालचाली होऊ लागल्या. पाहता पाहता त्या यंत्राचा स्वतःभोवती गरागर फिरण्याचा वेग वाढून काही वेळातच जोरजोराने फिरत हवेतच विरघळून गेलं आणि तत्क्षणी ….

    …. डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात एक आकृती समोर उभी राहिली. काही वेळाने त्या दिव्य तेजाला नजर सरावली तशी त्या प्रकाशात एक स्त्री उभी असल्याची जाणीव झाली. अतिशय भयंकर अशी सुंदर स्त्री ! तिचं ते सौंदर्य मनाला अक्षरशः धडकी भरवत होतं. परंतु, पुस्तकात सूचना दिल्याप्रमाणे ती शक्ती अवतीर्ण होताच त्या शक्तीची प्रथम इच्छा पूर्ण करणे मला भाग होते. त्याशिवाय माझी मनोकामना पुरी केली जाणार नव्हती. मनात नसतानाही मी त्या स्त्रीकडे पाहत होतो. त्या स्त्रीमध्ये नक्कीच काहीतरी अलौकिक शक्ती होती. कारण, तिच्या त्या भयंकर सौंदर्याने माझ्या इच्छेविरुद्ध माझे शरीर तिला अनुकूल प्रतिसाद देऊ लागले होते. मला हे अनपेक्षित होते पण ….

    …. तिच्या प्राप्तीकरता समोर प्रकट झालेल्या भयंकर सौंदर्यवतीची इच्छा पूर्ण करणे मला भागचं होते. तिने हाताने इशारा करून मला आपल्या पाठोपाठ येण्याची खूण केली. त्यानुसार मी तिच्या मागोमाग जाऊ लागलो. तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत चालताना मनात कसलीही कामुक भावना नसतानाही शरीर मात्र समागमासाठी अत्यातुर झालं होतं. पण खरोखर माझं मन भावनाहीन होतं का ? निश्चित नाही तिच्याविषयी मला विलक्षण तिटकारा वाटत होता. पण मनातील भाव प्रकट करता येत नव्हता. शेवटी स्वतःशीच विचार केला कि, काही क्षणांच्या हिच्या सहवासाने ' तिची ' प्राप्ती होणार असेल तर हा काही क्षणांचा बळी काही अगदीच वाईट नाही !

     कितीतरी वेळ मी तिच्या पाठोपाठ वाट तुडवत होतो. अखेर एका ठिकाणी ती थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं. तिच्या ' भयंकर लावण्यापेक्षा काहीतरी सुसह्य सौंदर्य नजरेस पडावं ' असं कितीही मनोमन वाटत असलं तरी प्रत्यक्षात थोडी तसं घडणार होतं ? ती मागे वळून माझ्या निकट आली. मनात नसूनही मी तिला बघत होतो. तिचा नकोसा वाटणारा स्पर्श अनुभवत होतो. सहन करत होतो. तिच्या मनाप्रमाणे ती माझ्या देहाशी खेळत होती. मन नाही पण शरीर तिला साथ देत होतं. असेच काही क्षण निघून गेले आणि ….

    …. अखेरचा तो क्षण आला. इतरवेळी परमोच्च सुखाचा मानला जाणारा तो क्षण यावेळी मात्र मला विलक्षण मुक्ततेचा भासत होता. जणू कित्येक युगांच्या प्रतीक्षेचा आता अंत होणार होता. माझ्याही नकळत माझे डोळे मिटू लागले होते. मनामध्ये सुटकेच्या भावना तरळू लागल्या. मिटल्या डोळ्यांसमोर ' ती ' दिसू लागली. माझ्या शरीराभोवती होणारे स्पर्श तिचेच असल्याचे मी समजू लागलो. स्थळ - काळ - वेळाचे भान मी संपूर्ण विसरलो आणि ….

    …. तळपायापासून ते डोईच्या केसांपर्यंत जाणवणारी एक तीव्र संवेदना देहात जागृत होऊन पाठोपाठ शरीरात ठिकठिकाणी असह्य वेदनांचे कल्लोळ उठू लागले होते. आश्चर्ययुक्त भयाने मी डोळे फाडून समोर पाहिलं तर ती ' भयंकर सौंदर्यवती ' माझ्या जवळच काय पण आसपासही नव्हती. तिच्या देहाभोवती तळपणारा तो तेजोमय प्रकाशही कुठे दिसत नव्हता. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य आणि संपूर्ण शरीरात वेदनांचं राज्य !

    हळूहळू वेदनांची तीव्रता वाढून मी जागीच मटकन बसलो. काय होत आहे आणि काय करायला पाहिजे याचा विचार करेपर्यंत माझं डोकं जमिनीला टेकलं होतं तर अंग धरणीवर कोसळलं होतं. सर्व शरीर त्या विलक्षण वेदनांनी कंप पावत संथपणे थंडगार पडू लागलं होतं. अंगाला भयंकर गारठा झोंबत होता. परंतु सर्व समजत असूनही मला माझ्या देहाची बिलकुल हालचाल करता येत नव्हती. काही वेळातच सर्व संवेदना नष्ट झाल्या. आसपासचा काळोख नजरेला दिसत होता. चित्रविचित्र आवाज कानी पडत होते. परंतु, मनात असूनही कोणाला मदतीकरता हाक मारू शकत नव्हतो. मला माझा देह स्वच्छपणे दिसत होता पण उठून बसण्याइतकी तर लांबच पण साधी हातपाय हलवण्याची क्रियाही माझ्याच्याने होत नव्हती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा