रविवार, २३ जुलै, २०२३

कथा - २

                                   ( १ )

' शी बाई ! किती वेळ झाला आपण भेंडी चिरतोय पण एक भेंडी कापून झाली असेल तर शपथ ! ' सीमा स्वतःशीच म्हणाली व क्षणात तिला आठवण झाली. 

' दुपारी बघितलेल्या पिक्चरमध्ये ती बाई कशी धारदार मोठ्या सुऱ्याने नवऱ्याच्या प्रेताचे तुकडे करत होती.. अगदी तसलाच आपल्याकडे असायला हवा होता. यांना किती वेळा सांगितलं तरी लक्षचं देत नाहीत. किती दिवस ही धार गेलेली लहानशी सुरी आपण वापरायची ? त्यापेक्षा असं करूया का ? आज आपणच बाहेर जाऊन हवी तशी सुरी घेऊन येऊ. आणि मग नव्या सुरीने चिरलेल्या भाज्यांची मस्त मेजवानी यांना देऊ. '

 विचार मनात येताच  सीमा उठली. आरशासमोर जाऊन उभी राहिली. ' छे ! हा आपला असा अवतार. सगळं अंग घामानं आंबलेलं चिंबलेलं. प्रथम अंघोळ केली पाहिजे न् मग चांगली साडी नेसून जाऊ. ' असे स्वतःशीच म्हणत ती बाथरुमात गेली. 

दिवस उन्हाळ्याचे असल्याने अगदीच गार नसलं तरी त्यातल्यात्यात थंड पाण्याच्या चांगल्या दोन बादल्या तिने अंगावर ओतून घेतल्या तेव्हा कुठं बरं वाटलं. 
कपाट उघडून तिने एक चांगली साडी काढून नेसली. केस नीट केले. हलकीशी पावडर तोंडाला लावली व पर्समध्ये पैसे टाकून ती घरातून बाहेर पडली.

सीमा राहत होती त्या बिल्डिंगपासून अवघ्या पाच मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर मार्केट होतं. तिथल्या एका भांड्याच्या दुकानात जाऊन तिने वेगवेगळ्या साईजच्या तीन धारदार सुऱ्या पसंत केल्या व थोडी घासाघीस करून विकत घेतल्या. 

सुऱ्या विकत घेतल्यावर थोडं बाजारात इकडं तिकडं फिरून, फास्ट फूडचा आस्वाद घेऊन संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास सीमा घरी परतली. 
जिन्यात मिसेस परबनी तिला थोडा वेळ अडवली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत हळूच ' आजकाल सीमाचा पती दारू पिऊन जास्तच दंगा करतो ' याविषयी टोमणाही मारून घेतला. प्रत्युत्तरादाखल एक स्मितहास्य करून सीमा तिथून निघाली.

घरी परतल्यावर सीमाने कपडे बदलले. घड्याळात पाहिलं तर आठ वाजले होते. ' आता हे कधीही येतील न् येताच अजून जेवण कसं झालं नाही म्हणून ओरडतील. सीमा बाई.. आज तुमची काही खैर नाही. ' असं स्वतःशी पुटपुटत ती स्वयंपाकाला लागली.

                                    ( २ )

सकाळी आठ नऊच्या सुमारास दोन अँब्युलन्स, एक पोलिस जीप सायरन वाजवतच बिल्डिंगच्या कंपाउंडमध्ये शिरल्या. इमारतीच्या प्रवेशद्वारी बघ्यांची ही मोठी गर्दी जमलेली. त्यातून वाट काढत दोन स्ट्रेचर घेऊन चार सहा जण वर गेले. पाठोपाठ पोलिस पार्टीही गेली. साधारण तासा दोन तासानं एक स्ट्रेचर खाली आलं. ते पूर्णतः झाकलेलं होतं. अँब्युलन्समध्ये टाकून ते पुढं पाठवण्यात आलं. जो तो, त्या अँब्युलन्सकडे बघून आपापले तर्क कुतर्क लढवत होता. एकमेकांच्या कानांत कुजबुजत होता. थोड्या वेळाने आणखी एक स्ट्रेचर खाली आणण्यात आलं. त्यावर झोपलेल्या सीमाला पाहून प्रत्येकाच्या मनात दया, कणव, करुणा, हळहळ याच भावना उमटल्या. सीमाला घेऊन अँब्युलन्स निघून गेली. 
त्यानंतर मग गर्दीला कसलंही स्वारस्य उरलं नाही. प्रत्येकजण आपापल्या घराकडे परतू लागला. ' हो ! पोलिसांनी साक्षी - जबानीसाठी पकडलं तर काय घ्या !! '
शेजाऱ्यांचे रीतसर जबाब घेऊन, सर्व सोपस्कार उरकून पोलिसही आल्यामार्गे निघून गेले.

                                  ( ३ )

स्टेशन डायरीत आजच्या तारखेला नोंद करण्यात आली.
व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून, पत्नीकडून पतीची निर्घृण हत्या. शरीराचे तुकडे केले. घरातून दुर्गंधी येत असल्याची शेजाऱ्यांनी तक्रार केल्याने प्रकरण उघडकीस. पत्नीचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडल्याने तिची मनोरुग्णालयात रवानगी. अधिक तपास सुरू आहे.

                                                              ( समाप्त )