शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

आम्ही तर ( फेक ) आचार्य !


    दिवस चमत्कारांचे आहेत. दिवस नमस्कारांचे आहेत. आपल्या समोर नम्रपणे हात जोडून चरणस्पर्शासाठी वाकलेला मनुष्य आपणांस जमिनीशी कधी समांतर करेल याचा अंदाज देखील यायचा नाही. अशा या जगावेगळ्या ( मुलाखा वेगळ्या म्हणणार होतो पण परत ' मराठी माणूस संकुचीत वृत्तीचा ' असल्याची ओरड व्हायची ! ) जगात माझ्याबरोबरही चमत्कार होईल असे वाटले नव्हते. पण झाला. साधा सुधा नाही तो पण भयंकर मोठा असा चमत्कार घडला.

    मला माझ्या गतजन्मातील स्मृती तुटक स्वरूपात आठवू लागल्या. त्या स्मृतीची माला गुंफल्यावर एके दिवशी रात्री मला दृष्टांत झाला. एक दिव्य ज्योत माझ्या नेत्रांसमोर तरळली व त्या ज्योतीतून काही शब्द उमटले. त्या शब्दांचा अर्थ लागेपर्यंत तो ज्योत अंतर्धान पावली आणि आम्ही खाडकन जागे झालो. आम्हांस कळून चुकले कि, आम्ही अवतारी पुरुष आहोत. आजवर ज्या काही प्रचंड घडामोडी घडून आल्या त्यामागे आमचीच ' कलागत वृत्ती ' कार्यरत होती. अर्थात, खुद्द प्रभुनेच मला सांगितले कि, " वत्सा तू निमित्तमात्र आहेस. कर्ता करविता मीच आहे ! " तेव्हा हातून घडून गेलेल्या कृत्यांचा आम्हांस अजिबात खेद वाटत नाही. अहो स्वकृत्यांचा खेद - खंत वाटेल तो अवतारी पुरुष कसला !


    त्या दिवसापासून ( ' नेमक्या कोणत्या ' हे विचारू नये. आम्हांस सर्व दिवस - काळ समान ! ) आम्हांस, आमच्या हातून घडलेल्या महत् कृत्यांच्या आठवणी आठवण्याचा जणू छंदच जडला. परंतु, आमच्या स्मृतीशृंखलेत एक फार मोठी त्रुटी अशी आहे कि, गतकाल आम्हांस अगदी अल्प क्षण आठवतो. मागचा - पुढचा संदर्भ नसलेल्या स्थितीत. परंतु, जो काही आठवतो तो अगदी लख्खपणे नजरे समोर तरळतो. किती उदाहरणे म्हणून तुम्हांस मी सांगू ?


    गोकुळातील कृष्णाला बासरी उत्कृष्ट वाजवता येते असे तुम्ही मानता. पण त्याला बासरी आणि ऊसातील फरक कोणी समजावून सांगितला माहिती आहे का तुम्हांला ? उत्तरी राम व दक्षिणी मारुतीमधल्या दुभाष्याची भूमिका कोणी बजावली हे कोणास ठाऊक आहे का ?
राम - रावण यांच्या अहिंसक युद्धांत रावणाच्या पोटाला गुदगुल्या करण्याची मसलत रामाला कोणी सुचवली ? आता हि गोष्ट वेगळी कि, हिंसाप्रिय मंडळींनी रावणाची बेंबीच उध्वस्त करण्याची कथा लिहिली. बाकी, स्त्रियांच्या नाभीकमलांशी खेळायचे सोडून पुरुषांच्या बेंबींशी खेळणारे महाभाग कोण होते कोणास ठाऊक ? जाऊ द्या. आम्हांस आत्मप्रौढीची वा प्रसिद्धीची अजिबात गरज नाही. पर्वा नाही. नाहीतर आज तुम्ही ज्या घटना अलौकिक मानता, त्या घडण्यामागील आमच्या हस्ताचा क्षेप तुम्हांस स्पष्ट दिसला असता.


    ज्याला तुम्ही आज राजा शिवाजी म्हणता, त्या शिवाजीला आगऱ्याहून निसटून जाण्याची युक्ती आम्हीच सांगितली. इतकेच नव्हे तर दक्षिणेतील तुरीच्या शेंगा शिवाजीच्या वतीने आम्हीच औरंगजेबाच्या हाती दिल्या व कच्च्या शेंगा न सोलता खाताना, " अशा शेंगा मी जन्मात कधी खाल्ल्या नव्हत्या " असे तो म्हटल्याचेही आम्हांस स्मरते. पण कोणा उपटसुंभ इतिहासकाराने तुरीच्या शेंगा खाण्याची गोष्टच अतिरंजित केली. मूर्ख लेकाचा ........ माफ करा. या जन्मीचे संस्कार सुटत नाहीत. मूढ बालक कुठला ! 
 
    शिवाजीच्या परिवाराशी आमचा बऱ्यापैकी स्नेहसंबंध होता. संभाजी संस्कृत आमच्या समोरच शिकला. एकदा त्याने औरंगजेबाला संस्कृत भाषेत एक सुंदर असे खंडकाव्य लिहून पाठवले. मूढ औरंगला संस्कृत सारख्या देववाणीचे ज्ञान कुठे ? तो खंडकाव्य घेऊन दक्षिणेत आला व त्या खंड काव्याचे खंडित अर्थ लावत इथेच निजधामास गेला.


    आमचा प्रिय औरंग देहत्याग करून परलोकवासी झाल्याने आम्ही उद्विग्न होऊन देशांतरास गेलो. तिथून थेट अवतीर्ण झालो ते पानपतावर. काय भयानक कुंड पेटलं होतं ते ! इकडे अब्दाली इस्लामचे दिव्यतेज आणखी प्रखर करण्याकरता अन्न - पाणी त्यागून उपास करत होता. दिवसातून पाच काय पन्नास वेळा तो व त्याचे अनुयायी नमाज पढत होते तर तिकडे सदाशिवराव पेटलेल्या हवनकुंडात समिधांवर समिधा टाकत होता. कोणत्याही परिस्थितीत हिंदू धर्माचे प्रज्वलित झालेले दिव्यतेज त्यांस लुप्त होऊन द्यायचे नव्हते. इकडे माथी जमिनीला टेकत होती तिकडे काटक्या यज्ञात पडत होत्या. अखेर, भुईला लागलेली मस्तके जिंकली. कारण समिधाच संपल्याने सदाशिवाने स्वतःचा देह एक समिधा कल्पून अग्निकुंडात झोकून दिला व आपसुक अब्दाली जिंकला ! 


    तुमच्या जोतीबा फुलेने शाळा उघडली. म्हटलं, चला एका नव्या युगाची नांदी झाली. पण कोणतीही गोष्ट सहजासहजी घडून आली तर तिचे महत्त्व पटत नाही. म्हणून जोतिबाच्या शाळेवर बहिष्कार टाकण्यासाठी समाजास आम्हीच प्रवृत्त केले. सरळ चार चौघांत जाऊन आम्ही प्रश्न टाकायचो कि, " अहो, बायका जर लिहू - वाचू लागल्या तर त्या नोकऱ्या करतील. आणि त्या नोकऱ्या करू लागल्या तर पुरुषांनी काय त्यांची लुगडी धुवायची ? " बस्स !कोणत्या पुरुषाला हा अवमान सहन होईल ? लगेच त्यांनी हाती लागेल ते म्हणजे --- दगड - धोंडे, माती, चिखल व काहीच मिळेना म्हणून गायी - म्हशींना मा - मारून त्यांना शेण टाकायला लावून ते उचलून फुले दांपत्यावर फेकले. उगीच नाही जोतीबा ' महात्मा ' झाला ?
 
    इतकेच काय, गंगाधररावांना त्यांच्या मुलाचे नाव ' केशव ' जरी असले तरी ' बाळ ' नावानेच पुकारण्यास कोणी सांगितले ? फार काय, तुमच्या त्या ' लोकमान्याला ', म्हणजे आमच्या बाळला आम्ही बोलता बोलता बोललो कि, " अरे बाळ, या इंग्रज सरकारचे डोकं काही थाऱ्यावर नाही बघ. दिवस भरलेत यांचे जणू ! " बाळ भलताच विद्वान. त्याने आमच्या संपूर्ण वाक्याचा अर्धा भाग घेऊन आपल्या वर्तमानपत्रात सरळ छापून कि हो टाकला ! तेव्हाच आम्ही ओळखले कि, प्रसार माध्यमं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होण्याचा काळ लवकरच येणार आहे. त्याचीच प्रचीती सध्या तुम्ही घेत आहात !


    पुण्यात आम्हांस फार काळ राहणं आवडलं नाही. आमही परत स्थानांतर केलं व एका तेजस्वी युवकाच्या गृहात प्रकटलो. तो तरुण इंग्रजांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात करावयाच्या क्रांतीच्या उपाय योजनांची आखणी करत होता. परंतु त्याचे मराठी लेखन अतिशय अशुद्ध. तो ' इ / ई ' असे न लिहिता ' अि / आी ' असे लिहायचा. आम्ही त्यांस बजावले, " अरे, विनायका असे अशुद्ध लिहू नको." पण तो ऐकेल तर शपथ ! अखेर इंग्रजांनाच त्याच्या क्रांतीकार्या ऐवजी भ्रष्ट भाषिक लेखनाची दखल घ्यावी लागली व जोवर त्याची लेखनपद्धती सुधरत नाही तोवर त्याला अंदमानात एकांतवासाची शिक्षा सुनावली. विनायक पण मोठा हट्टी. अंदमानात त्याने एकांतवास पत्करला पण आपली लेखनपद्धती काही बदलली नाही. 

 
    त्या तरुणाचा सहवासात आम्ही अगदीच कंटाळलो. जेव्हा बघावं तेव्हा त्याला कशाचा तरी ध्यास असायचा. कसला ते माहिती नाही. पण तो सदोदीत आपल्याच कल्पनासृष्टीत रममाण असायचा. त्याला तसाच स्वप्नांच्या जगतात सोडून आम्ही दुसरीकडे प्रस्थान ठेवले.


    एका ठिकाणी आम्ही अवतीर्ण झालो. नुकताच परदेशातून आलेला एक इसम चिंताक्रांत अवस्थेत बसला होता. त्याची ओळख करायला गेलो तर तो परिचित निघाला. किंबहुना त्याचे नाव देखील आम्हीच ठेवले होते. मोहनदास ! त्याला चिंतेचे कारण विचारले असता, त्याला देशाचे राजकीय नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा असल्याचे समजले. आम्ही डोळे मिटले. मग उघडले. आणि त्यांस सांगितले, " वत्सा, तू सर्व प्रथम वस्त्रांचा त्याग कर. जैन मुनींप्रमाणे जन्मजात अवस्थेत न राहता फक्त लज्जा रक्षणार्थ वस्त्रं परिधान कर. आणि ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ' या उक्तीच्या विरोधात वाग. किंबहुना कोणत्याच शब्दावर कायम राहू नको कि सापडू नको. " आमच्या त्या उपदेशाचे अमृत मिळताच मोहनदासचे चार डोळे ( दोन चर्येवरचे व दोन चष्म्याचे ) लकाकले. पुढे तो अल्पावधीत ' बापू ' झाला. 

 
    मधल्या काळात आम्ही असेच भ्रमंती करत असताना आमच्या भीमाची भेट झाली. महाभारतातल्या भीमाप्रमाणेच हाही विशाल देहाचा स्वामी ! पण देहाप्रमाणे बुद्धीही विशाल. कुंती त्या बाबतीत कमनशिबी निघाली ! आम्ही भीमास म्हटलं, " काय रे बाबा, काय चाललंय तुझं ? " तेव्हा नवीन ग्रंथलेखनाच्या विचारात असल्याचे त्याने सांगितले. पण लेखनास विषय मिळत नव्हता. तेव्हा आम्ही म्हटलं कि, " भीमा तू वर्णव्यवस्थेच्या विरोधात आहेस तर शूद्र - अतिशूद्रांवर ग्रंथ लेखन कर. " आमचे बोल ऐकताच भीमाचे नेत्र अत्यानंदाने चमकून उठले. 


    तेथून आम्ही थेट केशवरावांकडे गेलो. तिथे पहिले तर ते आपल्या लेखन कार्यात मग्न. त्यांचा एक मुलगा काहीतरी तंतुवाद्य वाजवत होता तर दुसरा कागदावर रंगरंगोटी करत होता. आम्ही त्या चित्रकाराकडे गेलो व विचारले, " बाळ, तुझं नाव काय ? " तो आमच्याकडे रोखून बघत उद्गारला, " माझं नाव ? बाळ ! " तेव्हाच आम्ही ओळखलं ' बोले तैसा चाले ..' या उक्तीतला हा पुरुष आहे. आणि नाव ' बाळ ' असल्याने याच्या पावलांची व बडबडीची दखल तशीच घेतली जाणार ! 

 
    मुंबईचा कंटाळा आल्याने देशावर आम्ही प्रस्थान ठेवले. एका गावाच्या धर्मशाळेत आम्ही मुकाम ठोकला व त्या गावची तालीम पाहण्याचा विचार आमच्या मनात आला. आम्ही तडक तालमीच्या दिशेने गेलो. तिथे पाहतो तर आबालवृद्ध पुरुष मंडळी अंगाला तेल - माती लावून एकमेकांना घट्ट आलिंगनं देत त्यातून सुटण्याची धडपड करत होते तर, एक पोरगं अंगावरील कपडे न काढता हातात तेल घेऊन जिभेला लावत होतं. आम्ही त्यांस त्याचे कारण विचारले असता उत्तर आले नाही पण, त्याच्या बाजूला असलेला मुलगा म्हणाला, " आवं म्हाराज, त्यो तसाच हाय. हि मान्सं आंगाला त्येल लावत्यात - त्यो जीबंला. पन फरक म्हंजी आंगाला त्येल लाव्ल्येली एक येळ सापडत्यात पण जीबंला त्येल लावल्येला ह्यो पठ्ठ्या काय सापडत न्हाय ! " आम्हांस त्या मुलाच्या शब्दांची प्रचीती लवकरच आली. जिभेला मनसोक्त तैलस्नान घालून ते पोरगं आखाड्यात उतरलं आणि पाचच मिनिटांत पाच - पन्नास जणांना उताणं पाडून घरी पण निगुन गेलं. जाताना तोंडातल्या तोंडात " शरदांच चांदणं ..." असं काहीतरी पुटपुटत गेलं.


    तर अशा ह्या आमच्या अवतारी जीवनातील काही स्मृती. तूर्तास इतक्याच स्मरतात. बाकी, आठवताच जगासमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. काय आहे, दामोदरदासला मुलाचे नाव विवेकानंदाच्या मूळ नावावर नाव ठेवण्यास सांगितल्यापासून आमच्यातील सिद्धी हळूहळू लुप्त होऊ लागल्याने चरितार्थासाठी आपल्या पुर्वानुभावांचे व कर्मांचे लेखन प्रसिद्ध करून चार मोहरा गाठीशी बांधण्याचा विचार आहे. दिवस अन् काळ किती भर्रकन उलटतो. नाही !    

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र


    सन्मानानीय पंतप्रधान महोदय,

     तुम्हांला कधी पत्र पाठवेन असं माझ्या ध्यानी मनी काय स्वप्नातही आलं नव्हतं. पण आज हे प्रत्यक्षात घडत आहे. यावरून तुम्ही सत्तेत आल्यापासून आजवर कधीच न घडलेल्या घटना / चमत्कार घडण्याचा जो धडाका सुरु झाला आहे, तो आपला केवळ प्रसिद्धीचा फार्स आहे असं आजवर मी जे समजत होतो त्या समजाला चांगलाच छेद ( कि तडा ? जे असेल ते ! ) गेला आहे. ( वाक्य खूप लांबलचक झालं ना ? हि खरी भारदास्त आणि ५० - ६० वर्षांपूर्वीची विद्वानांची मराठी आहे. फक्त अनुस्वारांची कमी ! )


    प्रस्तुत पत्र मी मराठीत लिहितोय आणि तुम्हांला ( माझ्या माहिती प्रमाणे ) गुजराथी, हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त भाषा येत नाहीत. पण हरकत नाही. तुमचे सोशल मिडीयावरील नेत्र या मराठी पत्राचा तुम्हांला हव्या त्या भाषेत तर्जुमा करून देतील. असो, पत्रास कारण म्हटलं तर आहे आणि नाहीही ! तुमची पंतप्रधानपदी निवड  झाल्याबद्दल जवळपास सर्वांनी तुमचे अभिनंदन केले पण मी नाही ! अर्थात, त्याने फरक काय पडतो म्हणा ? पण यावरून मी तुमचा भक्त, कार्यकर्ता तर सोडा साधा मित्रही नाही, याची तुम्हांला कल्पना यावी. 


    तुम्ही या देशाचे पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगली, बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारी अधिकारी - मंत्र्यांचा संगनमतीय भ्रष्टाचार इ.चे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनेल्स मधील प्रमाण तरी कमी झालं आहे. यावरून ' अच्छे दिन ' येऊ लागल्याचा मला अनुभव येत आहे.


    सध्या देशात व देशाच्या सीमेवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. परंतु , मला तुमचे लक्ष एका वेगळ्या मुद्द्याकडे वळवायचे आहे व तो म्हणजे भारताला कार्यक्षम पंतप्रधानांची जशी दीर्घ परंपरा लाभली आहे त्याचप्रमाणे ' शो ऑफ ' करणाऱ्यांचीही आहे. अगदी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचाही त्याला अपवाद नाही !

    तुम्ही त्यांस अपवाद ठराल असे उगाच वाटून राहिले होते पण नाही. तुम्हीही त्याच वाटेचे वाटसरु निघालात ! परंतु , एकवेळ तुम्ही परवडले पण तुमचे अनुयायी नकोत अशी आता वेळ आली आहे. उदाहरणार्थ :- भारतातील मूर्ख, अडाणी, गांवढळ ( सुशिक्षित - अशिक्षित दोघेही ) लोकांना आजवर १०० वर्षांहून अधिक कित्येक समाजसेवकांनी, राजकीय नेत्यांनी स्वच्छतेचे धडे दिले. पण या मुर्खांनी त्यावर अस्वच्छतेचे बोळे फिरवले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातील प्रत्येक सभेच्या अखेरीस लोकांना तुम्ही कळकळीने विनंती करायचा कि, ' सभास्थानावर कचरा फेकू नका. कचरा दिसला तर स्वतः साफ करा ! ' पण हे अडाणी लेकाचे थोडी ऐकणार ? त्यांनी दामदुपटीने कचरा करून टाकला.

    तुम्ही स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. परंतु, तुमच्या इतके घाणीमध्ये स्वतः उतरून स्वच्छता करण्याचं धाडस तुमच्या अनुयायांत कुठे हो ? त्यांनी स्वच्छ ठिकाणी झाडांच्या पाला - पाचोळ्याचा कचरा पसरवून अंगरक्षकांच्या गराड्यात तो झाडूने दूर करायचा नाटकीपणा आरंभला तो अजूनही चालूच आहे ! यामुळे जगात हसं कोणाचं झालं आणि होतंय हे न समजण्याइतके तुम्ही अडाणी नाही !   


    भ्रष्टाचाऱ्यांनी गोळा केलेल्या काळ्या पैशाला पाय फुटून तो परदेशात गेला. त्याला पकडून या देशात परत आणण्याचा विडा तुम्ही उचलला. पण तो काळा पैसा ज्या देशात ठेवला गेला असं आजवर सर्वजण समजत होते तो त्या देशातून कधीच गायब करण्यात आलेला हे आता सर्वांनाच कळून चुकलेलं आहे. फक्त उघड कोणी बोलत नाही इतकेचं !

    तुम्ही पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगे तर आता पूर्णपणे थंडावले आहेत. लोकं उगीचच बडोदा, दिल्ली विषयी अफवा उठवतात. त्यांची सवयच आहे ती ! असो, देशातील धार्मिक दंगे थंडावले पण आज महाराष्ट्रात काय चित्र दिसत आहे ? महाराष्ट्रच काय संपूर्ण देशातील मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांवरील अत्याचारात कुठे कमतरता आली आहे का ? त्यात खंड पडला आहे का ? बिलकुल नाही. तुमच्या समर्थ हातांत  देशाची शासन व्यवस्था असताना हे असे का व्हावे ?

    तुमच्या पक्षाचा जन्मदाता रा. स्व. संघ हा हिंदुत्वाच्या निव्वळ पोकळ गप्पा मारतो. म्हणे, ख्रिस्ती लोकं आदिवासींचं धर्मांतर करतात. अरे, जी गोष्ट ते हजार मैलांवरून येऊन सहजपणे करतात ती तुम्हांला इथल्या इथे करता येऊ नये ? पण हि गोष्ट त्यांना सांगणार कोण ? जिथे आदिवासींच्या व धर्मांतराच्या बाबतीत संघाची हि उदासीनता तिथे ते मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांविषयी काय करणार हे दिसत आहेच !  कधी तरी वेडाचे झटके आल्याप्रमाणे संस्कृतीरक्षणासाठी ते आजकालच्या मुला - मुलींवर दादागिरी करतात. करणारच म्हणा ते ! कारण, ज्या गोष्टी त्यांना उघड करता येत नाही त्या करण्याचा इतरांनी तरी आनंद का घ्यावा अशी स्वार्थी भावनाही त्यांच्या मनी असते.

     काँग्रेसपेक्षा भाजपा बरी, अशा भावनेने समाजातील सर्व जाती घटकांनी तुम्हांला निवडून दिले आहे. तेव्हा सर्व जाती घटकांचा विचार करून तुम्ही शासकीय निर्णय घ्याल अशी आशा आहे. परंतु , अशीही वेळ आणण्याची कृपा करू नये कि, मराठीत नव्या म्हणीची भर पडावी - ' काँग्रेसपेक्षा मोदी भयंकर ! '

    असो, पत्र खूप दीर्घ व कंटाळवाणे झाले. तुम्हांला वाचण्यासाठी तेवढा वेळाही मिळायला हवा. आम्ही काय ? रिकामटेकडे ! शाळा - कॉलेजांत थोडं फार विचार करायला व लिहायला शिकलो म्हणून पांढऱ्यावर काळं करत बसलो. इतकेचं ! कळावे.

                                       
                                                               आपला प्रकट विरोधक,           
                                                                संजय क्षिरसागर     

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

माणुसकी हरवत चाललेली माणसं… !


    काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात जवखेडे खालसा येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्याचा प्रकार घडला. घटना घडून गेली. विछिन्न देहांवरील अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मरणारे लोक स्वभावाने चांगले होते, गावात त्यांचे कोणाशी भांडण नव्हते असे सर्टीफिकेट पोलिसांनी देऊनही टाकले. नंतर अचानक मृत व्यक्तींपैकी एकाचे गावातील स्त्री सोबत प्रेमसंबंध असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यामुळे या प्रकरणाला निराळेच वळण लागले. पोलिसांची प्रस्तुत प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटावी अशीच आहे. कोणाच्या तरी दबावाखाली उलट - सुलट विधानं करून पोलिस खाते या प्रकरणाविषयी समाजाची दिशाभूल तर करत आहेच पण सोबतीला संशयाचे वातावरण निर्माण करून तणावाला चालनाही देत आहे.

     पोलिसांनी या बाबतीत ढिलाई दाखवू नये याकरिता सामाजिक संघटना व लोकांचे उत्स्फ़ुर्त मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांना नक्षलवाद्यांनी पुरस्कृत केल्याच्या पुड्या सोडण्यात येत आहेत. याच न्यायाने पाहिल्यास गोध्रा, बडोदा, मुंबई येथील दंगेही नक्षलवाद्यांनीच केले होते असे म्हणायचे का ? माझ्या मते, लोकसत्ता व तत्सम वृत्तपत्रांच्या ' विशेष प्रतिनिधींनी ' या प्रश्नांची समाधानकारक अशी ' खरी ' उत्तरं देऊन आमचे अज्ञान दूर करावे.

     या जगात, देशात, राज्यात माणसं मारली जाणं यात फारसं धक्कादायक असं काही राहिलं नाही. दररोज कितीतरी जणांचे खून पाडले जातात. कितीतरी अपघातात मरण पावतात तर कित्येकजण आजारपण, आत्महत्या इ. कारणांनी आपले प्राण गमावतात. मग जवखेडे येथील तीन माणसांचं मारलं जाण्यात नाविन्य ते काय ? किंवा या तिघांचीच हत्या जणू काही या राज्यात / देशात घडणारी पहिलीच हत्या आहे असा देखावा का निर्माण केला जातोय ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या ठिकाणी आपण थोडं विषयानंतर करू.

     दिल्लीमध्ये बस बलात्कार प्रकरण होण्यापूर्वी या देशात / दिल्लीत बलात्कार घडत नव्हते का ? दिल्लीचे प्रकरण घडून गेल्यावर देखील तिथे बलात्कार घडायचे बंद झाले का ? मुंबईचे शक्ती मिल प्रकरण घडून गेल्यावर देखील शहरांतील बलात्कारांचे प्रमाण घटले आहे का ? यांची उत्तरे नकारार्थी आहेत. मग दिल्लीच्या प्रकरणाला हवा देण्याचे कार्य कोणी केले ? तो जनतेचा स्वाभाविक उद्रेक होता असे गुळमुळीत उत्तर देण्याचा प्रयत्न होईल पण ते सर्वांशी खरे नाही.

     लोकांनी मोर्चे काढण्यापर्यंत तो जनतेचा भावनिक उद्रेक होता, इथपर्यंतचा भाग खरा आहे. त्याला मेणबत्ती मोर्चा वगैरे संघटित निदर्शनांचे हेतुपूर्वक रूप देऊन व मिडीयाला हाताशी धरून त्याची व्यापकता वाढवण्यात आली. प्रिंट व टेलिव्हिजनचा वापर करून लोकांच्या मनी त्या गुन्ह्यातील आरोपींविषयी व त्या आरोपींचा तपास करण्यात ढिलाई दाखवणाऱ्या पोलिसांच्या विषयी तसेच पोलिस खात्याच्या ढिलाईला वाव देणाऱ्या काँग्रेस सरकारविरोधी चीड निर्माण करण्यात आली. यातून साध्य काय झाले ते जगजाहीर आहे. पण यात मूळ प्रश्न सुटलेला नाही हे मात्र उघड सत्य आहे व ते सत्य नजरेआड करण्याइतपत माध्यमं हुशार आहेत.

    दिल्लीतील बलत्कार प्रकरण व जवखेडे प्रकरणाची जर तुलना केली तर असे लक्षात येते कि, मिडीयाची या दोन्ही घटनांतील भूमिका परस्परविरोधी आहे. दिल्ली प्रकरणातील मोर्चे हे जनतेचे पुरस्कृत होते पण जवखेडेचे नक्षलवादी पुरस्कृत. त्याआधी खैरलांजीचेही तसेच होते. याचा अर्थ असा कि, आम्ही जे सांगू, दाखवू, छापू तेच तुम्ही ऐकायचे, बघायचे व वाचायचे आणि मान्यही करायचे. बरे, हि एकट्या मीडियाची अक्कल नाही. ते पिंजऱ्यातले पोपट. त्यांना जो खाऊ देईल त्याच्या इशाऱ्यावर पोपटपंची करणार व आपण लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याच्या बाता मारणार !

    मिडीया जाऊ द्या, सोशल नेटवर्किंग साईट्सवरील सक्रीय विचारवंत - तरुणाईची यावरील प्रतिक्रिया काय आहेत ? जवखेडाचे मृत लोक तथाकथित ' दलित ' समाजाचे असल्याने फक्त ' दलितांनाच ' त्याविषयी सहानुभूती, चीड आहे. बाकीचे काय ? फार थोड्यांनी या घटनेविषयी निषेधाचा आवाज उठवला आहे. ज्यांनी आपले आत्मे विकले नाहीत, ज्यांच्यातील मनुष्यतव लोपलं नाही फक्त त्यांनीच ! बाकीचे मात्र बोटचेपी भूमिका घेऊन तटस्थ राहिले आहेत. हि घटना का घडली ? कशी घडली ? त्यामागील कारणं काय होती ? इ. प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा ते आपला निषेधरुपी वांझ संताप व्यक्त करतील. धन्य आहे अशा विचारवंतांची, तरुणांची !

    मारली गेली ती माणसं होती. मारणारीही माणसं होती. निषेध व्यक्त करणारीही माणसंच आहेत व निमूटपणे पाहणारीही माणसंच आहेत. हे सर्व पाहता खरोखर आपण सुधारत आहोत कि मागास बनत चाललो आहोत असा प्रश्न पडू लागला आहे. खून करण्यामागील कारणं काहीही असोत पण एखाद्याचा त्याच्या इच्छेविरुद्ध जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मृतदेहांचे तुकडे करण्यात आले आहेत. अशा घटना दररोज घडतात हे मान्य करून देखील मी असे म्हणतो कि, जेव्हा अशा घटना आपल्या वाचनात येतात वा अवलोकनात येतात तेव्हा त्याविषयी फार काही नाही --- साधा निषेधाचा शब्द आपण नोंदवू नये ? देवी - देवतांचे व इतर फोटो Like करण्यासाठी जे हात तत्परतेने पुढे सरसावतात तेच हात अशा वेळी मागे का राहतात ?

    भ्रष्ट सरकार, प्रशासन व्यवस्था यांच्याविषयी तुमच्या मनात संताप, चीड आहेच ना ? या संतापाला, चिडीला वाट देण्याचे कार्य तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवरून करता. का ? तर या साईट्स शेवटी सरकारी खात्याच्या दृष्टीखालून जाऊन त्यांना जनतेच्या मनोभावना कळतात ते तुम्हांला माहिती आहे म्हणून ! मग जवखेडे करिता जेव्हा सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केला जात आहे त्याकडे संशयाने का पाहिलं जात आहे ? उलट अशा प्रयत्नांना मनमोकळेपणाने ' One Click ' सहकार्य केल्यास सामाजिक सलोखा कायम राहण्यास मदतच होईल. परंतु हे आपल्याकडून घडून येणार आहे का ? नाही. कारण शेवटी ' आपण ' व ' ते ' हे भूमिका सहजासहजी बदलली जाणार नाही. या भूमिकेतील ' आपण ' कायम असून ' ते ' मात्र प्रसंगानुसार बदलतात. कधी मुसलमान. कधी ब्राम्हण. कधी दलित. कधी धनगर. कधी आदीवासी. तर कधी फासे पारधी !

     या भूतलावर माणसाचा जन्म / निर्मिती का झाली ? कधी झाली ? कशी झाली याचा शोध घेण्यात येत आहे. याची समाधानकारक उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील. पण माझ्या मते, या पृथ्वीवर माणसाइतका दुर्बल प्राणी दुसरा कोणी नाही. तो आता इतका दुबळा झाला आहे कि, आपल्या आदिम पूर्वजांप्रमाणे देखील जगू शकत नाही. अशा स्थितीत आपले जीवन अधिकाधिक सुखकारक व सुरक्षित व्हावे तसेच आपल्यातील दुर्बल ( शारिरिक अर्थाने ! ) घटकांचे देखील जीवन सुखमय व सुरक्षित व्हावे याकरता त्याने प्रयत्नशील राहाणे अपेक्षित आहे. पण वास्तव नेमकं उलट आहे. आपल्यातीलच रक्ता - मांसाच्या लोकांना काल्पनिक भेदांवर परकं मानून परस्परांचे अस्तित्व धोक्यात आणण्यचाच माणसाचा प्रयत्न सुरु आहे !