गुरुवार, ५ जून, २०१४

चार ऐतिहासिक कादंबरीकार

 
           मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबऱ्यांना नाही म्हटले तरी फार मोठी आणि जुनी परंपरा लाभली आहे.  तत्कालीन काळातील घटनांवर, व्यक्तींवर रचण्यात आलेल्या बखरी या ' कादंबरी ' प्रकारातंच मोडणाऱ्या आहेत. परंतु, रूढ अर्थाने आपण ज्याला ' ऐतिहासिक कादंबरी ' म्हणतो त्याची ओळख हरिभाऊ आपट्यांनी मराठी वाचकांना करून दिली. त्यानंतर या साहित्य प्रकारात सातत्याने भरच पडत आली आहे. त्यापैकी काही निवडक लेखकांच्या मोजक्या कलाकृतींचा या लेखात आढावा घेण्याचा हेतू आहे.
  
           ना. सं. इनामदार ! मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबरीकारांत सर्वात अग्रणी व यशस्वी कादंबरीकार म्हणून इनामदारांना ओळखले जाते. त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय थोडेसे वेगळे तसेच ऐतिहासिक घटनांचे केलेले विश्लेषणही चाकोरीबाहेरचे. एखाद्या इतिहास संशोधकालाही थक्क करून सोडतील असे ऐतिहासिक घटनांविषयीचे त्यांचे तर्क निश्चित कौतुकास्पद आहेत ! इनामदारांनी लिहिलेल्या झेप, झुंज, राऊ, मंत्रावेगळा, राजेश्री, शिकस्त व शहेनशहा या सातही ऐतिहासिक कादंबऱ्या कमी - अधिक प्रमाणात गाजल्या. या सातांपैकी राजेश्री व शहेनशहा यांचा अपवाद केला असता उर्वरित पाच कादंबऱ्या या पेशवेकाळावर आधारित आहेत. त्यातही राऊ आणि शिकस्त अपवाद केल्यास उर्वरीत तीन कादंबऱ्यांमध्ये तत्कालीन राजकारणाचाच प्रामुख्याने आढावा घेण्यात आला आहे. पैकी आपण प्रथम राजेश्री व शहेनशहा या दोन कादंबऱ्या विचारात घेऊ

            राजेश्रीचा मुख्य विषय आहे राज्यभिषेकानंतर छ. शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा ! यांत जसे कुटुंबातील रुसवे -फुगवे आहेत, त्याचप्रमाणे राजमंडळातील सदस्यांतील व्यक्तिगत राग - लोभ आहेत. यातून काही गोष्टी प्रामुख्याने सिद्ध होतात. प्रथम म्हणजे इतर कादंबऱ्यांमध्ये जशी छत्रपतीनिष्ठ मंडळींची वर्णने आपणांस वाचावयास मिळतात तशी ती इथे फारशी मिळत नाहीत. प्रथम आपला स्वार्थ मग राज्याचे हित, अशा व्यवहारी विचाराने वागणारी माणसे यांत आपणांस भेटतात. विजापूर, गोवळकोंडा, मुंबई, दिल्ली, जंजिरा येथील दरबारांवर आपली छाप बसविणारी ' शिवाजी ' नामक व्यक्ती कौटुंबिक आघाडीवर मात्र साफ अपयशी झाल्याचे यांत दिसून येते. अर्थात, या कादंबरीत शिवपुत्र संभाजीवर रचण्यात आलेल्या अनेक कपोलकल्पित कथांचा लेखकाने आधार घेतल्याने शिवाजीचे अपयश नजरेत भरून दिसणे स्वाभाविक आहे. इनामदारांचा शिवाजी राजकारणात कोणाला हार जात नाही, पण घरच्या आघाडीवर मात्र त्याचे काही चालत नाही. तसं पाहिलं तर हि परिस्थिती ऐतिहासिक नसून इनामदारांनी ज्या काळात या कादंबरीचे लेखन केले त्या काळातील समाजाची आहे व त्यात अजूनही फारसा फरक पडला नाही. अर्थात, हि गोष्ट खुद्द इनामदारांनीच आपल्या कादंबरीच्या प्रास्ताविकात कबूल केल्याने त्याविषयी अधिक काही न लिहिलेलं बरं !
 
              इनामदारांची दुसरी शिवकालीन कादंबरी म्हणजे ' शहेनशहा ' ! शिवाजीराजांची ज्यावेळी स्वराज्यस्थापनेची धडपड सुरु होती त्यावेळी शहजादा औरंगजेब दख्खनच्या सुभेदारीवर येतो, इथपासून या कादंबरीस आरंभ होतो. तसे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात राजकारणाला दुय्यम स्थान आहे. प्रसंगानुसार ऐतिहासिक घटना व त्यावरील भाष्य यात येते, पण प्रमुख विषय आहे औरंगजेबाचे व्यक्तिगत जीवन ! सामान्यतः औरंगजेब म्हटला कि पाषाणहृदयी, कुटील - कारस्थानी, पाताळयंत्री, धार्मिक वेडाचारात रमलेला दुराग्रही बादशाहा अशी त्याची रूपे आपल्या नजरेसमोर येतात. परंतु, इनामदारांनी आपल्या लेखनात औरंगजेबाची विलासी प्रतिमा उभारली आहे. शहजादा व नंतर बादशाहा बनलेला औरंगजेब प्रेमातही पडू शकतो याची प्रथम जाणीव हि कादंबरी वाचताना होते. शहेनशहा आणि राजेश्रीमध्ये एका घटनेविषयी मात्र इनामदारांनी आपले मत ठामपणे मांडले आहे व ती घटना म्हणजे शिवाजीराजांनी शाहिस्तेखानावर लाल महाल मुक्कामी टाकलेला छापा ! या छाप्याचे नेतृत्व शिवाजीराजांनी केले होते असे सर्वचं इतिहासकार मानतात, परंतु इनामदारांना हे पटत नाही. या छाप्याच्यावेळी शिवाजीराजे लाल महालात नव्हतेच, हेच त्यांचे ठाम मत असून प्रसंगानुसार त्यांनी ते व्यक्तही केलेलं आहे.
 
                 शहेनशहा कादंबरीत आणि इनामदारांच्याच ' राऊ ' या दुसऱ्या कादंबरीमध्ये आणखी एक साम्य आहे व ते म्हणजे इतिहास नायकांचे विलासी जीवन ! शहेनशहा मधील औरंगजेब जसा जनानखान्यात मश्गुल आहे त्याचप्रमाणे राऊ मधील पहिला बाजीराव हा मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. ' राऊ ' कादंबरीचा मुख्य विषय म्हणजे बाजीराव - मस्तानी यांची प्रेमकथा ! या कादंबरीत राजकारणाला अगदीच नगण्य स्थान दिलेलं आहे. मुख्य पात्रांचे प्रेमप्रसंग व त्यांचे संबंध तोडण्यासाठी बाजीरावाच्या घरच्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे ' राऊ ' कादंबरी ! इनामदारांनी राऊचे लेखन केले त्यावेळी असलेली थो. बाजीरावाची जनमानसातील प्रतिमा आणि आत्ताची इमेज फारशी वेगळी नाही. . शिवाजी महाराजांच्या नंतरचा पराक्रमी वीर, मुत्सद्दी अशी जबरदस्त पुण्याई गाठीशी असलेल्या व्यक्तीच्या खासगी जीवनातील प्रेमकथेला प्राधान्य देऊन त्याच्या पराक्रमांना जवळपास दुर्लक्षित करणे म्हणजे खायची गोष्ट नाय ! परंतु, इनामदारांनी हे कठीण कर्म तर पार पाडलेच ; पण त्यासोबत बाजीरावाला मस्तानीपासून तोडण्यासाठी चिमाजीआपा व राधाबाईने बाजीरावपुत्र बाळाजी उर्फ नानाचा कसा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला याचेही सूचक वर्णन इनामदारांनी करून तत्कालीन समाजमनाची नैतिक पातळी कोणत्या स्तरावर होती याचीही अस्पष्ट झलक दाखवली आहे.
 
                पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर जसा हिंदुस्थानच्या राजकारणाचा रंग बदलला, तद्वतंच पेशवेकुटुंबातील वैयक्तिक आशा - आकांक्षांचाही रंग बदलू लागला. हेच कथासूत्र मनाशी धरून इनामदारांनी ' शिकस्त ' चे लेखन केले. कादंबरीची नायिका आहे सदशिवारावाची पत्नी पार्वतीबाई ! कादंबरीच्या पहिल्या भागात -- म्हणजे पानिपत घडून येईपर्यंत पार्वतीबाईंचे पात्र तसे दुय्यम ठेवले आहे, पण नंतर हळूहळू मात्र तेच प्रमुख पात्र बनत जाते. मात्र असे असले तरी पार्वतीबाईला मुख्य नायिका बनवून कादंबरी लिहिणे हे तितकेसे सोपे काम नाही. तत्कालीन राजकारणात या बाईला कसलेही स्थान नव्हते व राजकारणाची तिला म्हणावी तशी जाणही नसल्याचे दिसून येते. पानिपतनंतर ते स्वतःच्या निधनापर्यंत ती आपल्या परागंदा झालेल्या पतीच्या विवंचनेत जगत राहिली. तिला आपल्या राजकीय स्थानाची, हक्कांची व अधिकारांची फारशी जाणीव नसली तरी तिच्या अवतीभोवती असणाऱ्यांना मात्र होती. प्रसंगानुरूप त्यांनी तिचा कसा उपयोग करून घेतला याचे चित्रण इनामदारांनी शिकस्त मध्ये केलेलं आहे. शिकस्तचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे उत्तर पेशवाईतील एकमेव महान, राजनिष्ठ असा मुत्सद्दी -- नाना फडणवीस हा कसा संधिसाधू व अधिकारलालसा असलेला राजकारणी पुरुष होता याचे दिग्दर्शन इनामदारांनी या कादंबरीच्या माध्यमातून केले आहे. नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर सत्तेची सूत्रे हळूहळू नानाच्या ताब्यात जाऊ लागली. हि घटना अपरिहार्य अशीच होती. परंतु आजवर या घटनेविषयी लेखन करताना नाना फडणीसने केवळ पेशवे घराण्यावरील व पेशवाईवरील निष्ठेपायी सर्व केले असे जे सांगितले जायचे त्यास या कादंबरीत तडा बसल्याचे दिसून येते. सत्ताप्राप्तीच्या बाबतीत नाना हा इतरांपेक्षा फारसा वेगळा नसल्याचे इनामदारांनी दाखवून दिले आहे .
 
                सवाई माधवराव पेशव्याच्या निधनानंतर पुणे दरबारी वारसा हक्कांचा मोठा गोंधळ उडाला. या कट - कारस्थानांत तत्कालीन अनेक नामवंत व कर्तबगार मुत्सद्दी वीरांचा निकाल लागला. मात्र या सर्वांत जास्त नुकसान झाले ते म्हणजे होळकरांचे ! शिंदे - होळकरांचा उभा दावा, पेशवा मरण पावलेला, सत्तेची सूत्रे हळूहळू नानाच्या हातून सुटू लागलेली अशा या काळात नानाने आपले बस्तान बसवण्यासाठी होळकरांचा आधार घेतला. नानाच्या या चालीला तोंड देण्यासाठी शिंद्यांनी होळकरांचा एक वारस हाताशी धरला. या शह - प्रतिशहात होळकर घराण्यातील एक कर्तबगार व पराक्रमी तरूण मारला गेला. पाठोपाठ होळकरी दौलत शिंद्यांच्या घशात जाऊ लागली. पेशवाईवर आलेला दुसरा बाजीराव राजकारणात सर्वथा अनभिज्ञ, जबरदस्ताचे पाय धरणारा. तो इंग्रजांकडे झुकू लागला. समस्त पेशवाई आता जाते कि मग जाते अशी भ्रांत पडलेली असताना होळकर घराण्यातील यशवंतराव नामक ' हिरा ' चमकू लागतो . त्याच्या तलवारीच्या जादूने भल्याभल्यांचे मिटलेले डोळे खडाखड उघडू लागले. मात्र शिंद्यांच्या आहारी गेलेल्या व इंग्रजांकडे झुकता कल असलेल्या बाजीरावाने यशवंतरावाच्या भावाला -- विठोजीला पकडून हत्तीच्या पायी देण्याचे कार्य केले आणि संतापलेल्या यशवंतरावाने शिंद्यांच्या लष्करी सामर्थ्याचा साफ चुराडा केला. होळकराच्या धास्तीने बाजीराव इंग्रजांच्या कुशीत शिरला व स्वातंत्र्य गमावून बसला. आपल्या धन्याला इंग्रजांच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न यशवंतरावाने केले पण बाजीरावाला काही त्याचा भरवसा आला नाही. तेव्हा सरतेशेवटी यशवंतरावाने उत्तरेत आपला स्वतंत्र पंथ पाहिला मात्र तरीही पेशवाईपेक्षा स्वराज्याप्रती असलेली त्याची निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. त्याचे प्रत्यंतर ' झुंज ' वाचताना पदोपदी येत राहते.
 
                    झुंजप्रमाणेच ' झेप ' मध्ये देखील एकांड्या पेशवाईनिष्ठ शिलेदाराची कथा आहे. या कथेचा काळ आहे यशवंतरावाच्या नंतरचा आणि नायक आहे त्रिंबकजी डेंगळे ! ' झेप ' ही इनामदारांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनातील सर्वात पहिली कांदबरी. या कांदबरीचा नायक कोणी नावाजलेला मराठा सरदार नाही की पेशवा नाही. आहे तो फक्त एक सामान्य हुजऱ्या ! जो अंगच्या कर्तबगारीने दुसऱ्या बाजीरावाचा काही काळ का होईना कारभारी बनला. गायकवाड दरबारातील गंगाधर शास्त्र्याच्या खुनात इंग्रज वकील एलफिन्स्टनने गोवले आणि आपल्या मार्गातील एक काटा अलगदपणे बाजूला काढला. गंगाधरशास्त्र्याचा खुन कोणी केला हे तसे जगजाहिर आहे, पण आपल्याकडे एक पद्धत आहे एखाद्यावर खुणी म्हणून शिक्का बसला कि त्याची बाजू ऐकून घेणे हे महापाप व त्याचा पक्ष जगासमोर मांडणे हे तर महापातक ! त्रिंबकजीचे असेच झाले. त्यामुळे त्रिंबकजीविषय लिहिण्यास कोणी धजावत तर नव्हतेच आणि त्याने काहीतरी मोठी अशी भरीव कामगिरी वा लढाई न मारल्याने इतिहासातील एक उपेक्षित व दुर्लक्षणीय पात्र अशीच त्याची तोपर्यंत ओळख होती. इंग्रजांनी त्याच्या विषयी जो काही निंदाव्यंजक मजकूर लिहिला तो जसाच्या तसा खरा मानून आपल्या लोकांनी उचलून धरला. त्रिंबकजीचा धनी दुसरा बाजीराव हा एक अत्यंत नालायक राज्यकर्ता म्हणून जगप्रसिद्ध असल्याने त्याचा एकनिष्ठ सेवक त्याच्याहून अधिक वाईट, दृष्ट प्रवृत्तीचा वाटणे स्वाभाविक आहे. झेपच्या निमित्ताने इनामदारांनी त्रिंबकजीचे चरित्र जगासमोर मांडले. कादंबरीच्या रूपाने का होईना पण त्याचे त्याकाळातील राजकीय महत्व लोकांच्या मनी ठसवण्याचा प्रयत्न केला. ' झेप ' मध्ये त्रिंबकजीच्या कौटुंबिक जीवनाचे फारसे वर्णन नाही . त्याचप्रमाणे त्याच्या धन्याच्या -- दुसऱ्या बाजीरावाचे हि या कादंबरीतील अस्तित्व तसे नगण्यच आहे. मात्र तत्कालीन राजकारणाची बारीक - सारीक माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याची इनामदारांनी शक्य तितकी खबरदारी घेतली आहे .
 
                           त्रिंबकजी डेंगळे, यशवंत होळकर यांच्या पाठोपाठ इनामदारांनी दुसऱ्या बाजीरावस केंद्रस्थानी ठेवून ' मंत्रावेगळाचे ' लेखन केले. पहिला बाजीराव व दुसरा बाजीराव परस्पर विरुद्ध अशी दोन व्यक्तीमत्व ! नावातील साम्य सोडले तर याच्या कर्तबगारीत जमीन अस्मानचा फरक !! थोरल्या बाजारावाचे गुणगान करताना पेनातील शाई संपेल पण शब्दांचा झरा आटणार नाही. हाच नियम दुसऱ्या बाजीरावास लागू होतो. पण शिव्या देण्याच्या बाबतीत ! अशा या पेशव्यावर आधारित इनामदारांनी कादंबरी लिहली. या कादंबरीत दुसरा बाजीराव हा किती खोल राजकारणी मनुष्य होता हे वाचकांच्या मनावर ठसवण्याचा इनामदारांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. दु. बाजीराव सामान्यतः त्याच्या रंगेल व विलासी जीवनासाठी ओळखला जातो पण या कादंबरीत त्याचा विलास वा रंगेलता दिसून येत नाही. इंग्रजांच्या सोबत शह - काटशहाचे राजकारण खेळणारा एक राजकीय पुरुष यातून उठून दिसतो.
 
                   इनामदारांनी सात ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या खऱ्या पण या कादंबऱ्यांचे लेखन करताना त्यांनी परंपरागत वाटचालीला फाटा देत अनवट वाटेने चालण्याचे ठरवलेले दिसते. राजेश्री मधील शिवाजी हा छ. शिवाजी कमी व एक कुटुंबवत्सल मनुष्य असल्याचे जाणवते. शहेनशहामधील औरंगजेब हा जनानखान्यात रमणारा तसेच धार्मिक कट्टरपणाखाली ढोंगबाजी करणारा असल्याचे दिसून येते. राऊमध्ये शास्त्रांनी निषिद्ध मानलेले अगम्यगमन करण्यास नानासाहेबला त्याच्या चुलत्याने आणि आजीने कसे भाग पाडले याचे निर्भीडपणे वर्णन आहे. झेप, झुंज, मंत्रावेगळा नायक तर बोलून चालून बहिष्कृतच आहेत. शिकस्तची नायिका पार्वतीबाई हि कितीही दुबळी असली तरी ज्या सदाशिवरावाची ती पत्नी आहे -- त्या सदाशिवरावाचे व त्याच्या तोतयांचे राजकारण त्यांनी समर्थपणे रेखाटले आहे. सामान्यतः ऐतिहासिक कादंबरीकार लेखनात दंतकथा, मिथकांचा रंजकतेसाठी वापर करतात. इनामदारांचे लेखन यास बऱ्यापैकी अपवाद आहे. त्यांच्या कादंबरीमध्ये दंतकथा असतातंच पण त्यासोबत त्यांनी संशोधित केलेली माहिती देखील कथानकाच्या ओघात ते वाचकांना सांगून मोकळे होतात. मंत्रावेगळामध्ये पात्रांच्या तोंडी जे लांबलचक संवाद आहेत, त्यातून इनामदारांनी आपले संशोधनच वाचकांच्या समोर मांडले आहे. एकप्रकारे परंपरागत ऐतिहासिक कादंबरी लेखनास फाटा देऊन बंडखोर वृत्तीने लेखन करणारा कादंबरीकार म्हणून इनामदारांकडे पाहता येईल.
 
               आज महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराजांच्या खालोखाल त्यांच्या मुलाचा - संभाजीचा गौरव केला जातो. परंतु एक काळ असा होता कि, याच संभाजीला व्यसनी, दुर्वर्तनी म्हणून महाराष्ट्राने उपेक्षेच्या अंधार कोठडीत कैद केले होते. पेशवाईतील रघुनाथराव आणि शिवशाहीतील संभाजी यांच्यात जणू काही फरकच उरला नव्हता. दोघांचेही बाप पराक्रमी, कर्तबगार व कर्तुत्वान ! दोघांची मुलेही पराक्रमी पण भोळसट, लंपट, व्यसनी. सत्तेसाठी काहीही करू धजवणारी ! रघुनाथाच्या गाठी जशी अटकेची पुण्याई होती. तशीच संभाजीने अंतसमयी दाखवलेली धीरोत्तर वृत्ती जनमानसात ताजी होती व केवळ या एकाच कृत्याने तो लोकांच्या आदरास थोडा का होईना पात्र झाला होता . अशा या संभाजीला कांदबरीचा नायक बनवून त्याचे खरे चरित्र लोकांसमोर माडण्याचा यशस्वी प्रयत्न शिवाजी सांवत यांनी केला. त्यांच्या संभाजीवर आधारित ' छावा ' कादंबरीची मोहिनी आजही कायम आहे. तोपर्यंत कथा - कांदबरी, नाटकांमधून संभाजी हा रंगेल, रगेल, मग्रूर, धाडसी, विलासी असाच रंगवला जायचा. छावाचे सर्वात मोठे यश असे कि, या कांदबरी मध्ये छ. शिवाजी महाराजांचे पात्र ज्या पद्धतीने रंगवण्यात आले आहे तसे आजवर कोणी रेखाटू शकले नाही. सावंतांनी शिवाजी राजांचे पात्र जरी दुय्यम धरले असले तरी ते इतके प्रभावी बनले आहे कि, कथानायक संभाजी हा केवळ सावली बनून राहतो आणि कांदबरीचे नाव खऱ्या अर्थाने सार्थ होते. सावंतांनी शिवाजीराजांचे व्यक्तिमत्व रंगवण्याचा, खुलवण्याचा कुठेही यत्न केला नाही. त्यामुळेच कि काय कादंबरी वाचताना शिवाजीराजांचे पात्र मनावर ठसा उमटवून जाते. त्याउलट औरंगजेबाच्या बाबतीत सावंतांनी वेगळा पर्याय अवलंबला आहे. संभाजीच्या चरित्रात औरंगजेबास खरेतर अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु महत्त्वाचे राजकीय प्रसंग वगळता सावंतांनी औरंगजेबाला या कादंबरीत तसे नगण्यच स्थान दिले आहे. याचे कारण उघड आहे. लोकांना शिवाजी - औरंगजेब माहिती होते पण अज्ञात असा संभाजी माहिती नसल्याने सावंतांना हा मार्ग स्वीकारावा लागला. छावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीचा पाया दंतकथा नसून संशोधनपर साहित्य हे आहे ! केवळ लोकानुरंजनासाठी लेखन न करता स्वतःला समजलेला संभाजी त्यांना लोकांपुढे आणायचा होता आणि त्या कार्यात ते कल्पनातीत यशस्वी झाले.
 
                ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत यांच्यापेक्षा रणजित देसाईंच्या कादंबरी लेखनाचा पिंड वेगळा ! ऐतिहासिक कादंबरीकडे ते निव्वळ ' कादंबरी ' म्हणून बंघत असल्याने त्यांना दंतकथांचे वावडे नाही. ऐतिहासिक संदर्भ साधने काही का सांगेनात, पण लोकांच्या मनी रुजलेल्या प्रतिमांना धक्का लावण्याचा ते अजिबात प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे त्यांची कादंबरी रंगते, कथानकातील रंजकता वाढते पण त्यातील इतिहास मरतो. ' श्रीमान योगी ' हि छ . शिवाजी महाराजांवरील त्याची कादंबरी प्रख्यात आहे. कादंबरीचे प्रमुक पात्र छ . शिवाजी महाराज असले तरी संपूर्ण कादंबरी वाचली असता त्यातील छत्रपती मनावर कुठेच ठसत नाही. ऐतिहासिक प्रसंग जर वजा केले तर सामाजिक कादंबरी म्हणून देखील खपून जाऊ शकते. कित्येकांना माझे हे विधान धक्कादायक वाटेल पण ' श्रीमान योगी ' तील कोणताही प्रसंग घ्या. त्यातील इतिहास जर वजा केला तर त्यात कौटुंबिक आणि सामाजिक कथानकाखेरीज आहेच काय ?छत्रपतींचे राजकारण त्यात दिसून येत नाही. छत्रपतींच्या विरोधकांचे चित्रणही जवळपास तसेच आहे. तरीही लोकांनी या कादंबरीस उचलून धरले. यामागे जशी देसाईंची प्रतिभा आहे त्याचप्रमाणे लोकांच्या मनावर असलेल्या दंतकथांची मोहिनीही कारणीभूत आहे. त्यामुळेच कि काय, कादंबरीतील शिवाजी राजांच्या खुनात त्यांच्या पत्नीचा -- सोयराबाईंचा हात असल्याचे देसाईंनी लिहून देखील त्यास आक्षेप घेण्याची कोणास बुद्धी झाली नाही.
 
                 रणजित देसाई ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून उदयास आले ते ' स्वामी ' मुळे ! स्वामी हि त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी. या कादंबरीची मुख्य पात्रं आहेत थोरला माधवराव पेशवा व त्याची पत्नी रमाबाई ! स्वामीमध्ये देसाईंनी जी लेखनाची पद्धत स्वीकारली तीच त्यांनी ' श्रीमान योगी ' त ही कायम ठेवल्याने स्वामीविषयी अधिक काय लिहावे ? थो. माधवरावाच्या कारकिर्दीत हिंदुस्थानच्या राजकारणाचा कसकसा रंग बदलत गेला, घरच्या तसेच बाहेरच्या शत्रूंचा बंदोबस्त करून माधवाने राज्य कसे सांभाळले याचे चित्रण ' स्वामी ' मध्ये येत नाही. राजकीय प्रसंग येतात ते फक्त कथानक पुढे सरकवण्यासाठी. बाकी सर्व कौटुंबिक मसाला. दंतकथा, आख्यायिकांचा मुक्तहस्ते वापर. त्यामुळे होते काय कि त्यातील राजकीय प्रसंग, माधवाचे पेशवेपद वजा केले तर रमा - माधवाची प्रेमकथा असेच या कादंबरीचे स्वरूप राहते. परंतु, असे असले तरी हि कादंबरी लोकांनी उचलून धरली. याचे कारण स्पष्ट आहे. इतिहास वाचण्यात, समजावून घेण्यात कोणाला इंटरेस्ट आहे ? चालू काळातील प्रेमकथेपेक्षा गतकाळातील प्रेमकथा जर सोप्या भाषेत मांडली जात असेल तर ती कोणाला नको आहे ? त्यातंच आपल्या लोकांना शोकांतिकेचे विलक्षण कौतुक. परंतु त्याविषयी या ठिकाणी अधिक काही लिहिणे योग्य होणार नाही.
 
                          रणजित देसाईंची परंपरा समर्थपणे पुढे चालवण्याचे कार्य ' पानिपत ' कार विश्वास पाटलांनी केले. त्यांच्या ' पानिपत ' कादंबरीचा जादूमय पगडा आजही मराठी मनावर कायम आहे. निव्वळ ' पानिपतची तिसरी लढाई ' या घटनेला केंद्रस्थानी ठेवून पाटलांनी पानिपत लिहिली. यातील दत्ताजी शिंदे, सदाशिवराव, अब्दाली, मल्हारराव इ. पात्रे पानिपत मोहिमेतील प्रमुख नायक असूनही कथानकात त्यांना दुय्यमत्व आले आहे. त्याउलट नजीबखानाची व्यक्तिरेखा पाटलांनी उत्तम रेखाटली आहे. समग्र कादंबरी वाचून झाल्यावर एक नजीबखान तेवढा मनावर ठसा उमटवून जातो. देसाईंच्या प्रमाणेच विश्वास पाटलांनी जनमानसातील ऐतिहासिक पुरूषांच्या ' इमेज ' ला धक्का देण्याचे टाळले आहे. अपवाद फक्त सदाशिवरावभाऊ या पात्राचा ! भाऊच्या मुर्खपणाच्या धोरणांमुळे / निर्णयांमुळे मराठी सैन्याचे पानिपत घडले हा जो समज प्रचलित होता, तो खोडून काढण्यात पाटील यशस्वी झाले. त्याचप्रमाणे मल्हारराव प्रभूती सरदारांनी लढाईतून पलायन केल्याने मराठी लष्कराचा विनाश ओढवला हा गैरसमज दृढ करण्यातही ते कल्पनातीत यशस्वी ठरले. पानिपत मोहिमितील राजकीय धागेदोऱ्यांची उकल करण्याचा पाटलांनी बिलकुल यत्न केला नाही. त्यांनी या कादंबरी लेखनासाठी विविध भाषांतील शेकडो संदर्भ साधने अभ्यासली असली तरी त्यांचा मुख्य भर शेजवलकर लिखित ' पानिपत १७६१ ' या ग्रंथावर असल्याचे दिसून येते. यामुळेच कि काय पाटलांनी पानिपतचे राजकारण उलगडून सांगण्याचे टाळले. आधी म्हटल्याप्रमाणे पानिपतची तिसरी लढाई हाच कथानकाचा केंद्रबिंदू असल्याने सर्व घटना, पात्रं हळूहळू त्या केंद्रबिंदूकडे जात असताना दिसतात. कादंबरीतील प्रमुख व्यक्तीरेखा डझनभर जरी असल्या तरी त्यांत वेगळेपणा हा फार कमी आढळतो. उदा :- दत्ताजी शिंदेचे ' टिपिकल मराठा स्टाईलचे ' उच्चार आणि सदाशिवरावाचे ' बामणी बोल ' वजा केले तर दोन्ही पात्रे एकच असल्याचे जाणवतं. दत्ताजी जसा नजीबकडून फसला तसा सदाशिवराव परिस्थितीमुळे अडचणीत सापडला एवढे मात्र वाचकांच्या मनी ठसवण्यात पाटील यशस्वी होतात.

                  पानिपत नंतर विश्वास पाटलांनी शिवपुत्र संभाजीवर कादंबरी लिहिली. पानिपत मध्ये केलेल्या चुका ' संभाजी ' मध्ये टाळण्यात पाटील यशस्वी झाले खरे पण या कादंबरीतही कित्येक प्रसंग असे आहे कि जे ओढून - ताणून बसवल्यासारखे वाटतात. उदा . रायगडावर छ. शिवाजी महाराजांचा घात करण्याचा जो डाव होता तो युवराज संभाजीने उधळून लावणे, वाईच्या लढाईच्या हंबीरराव मोहित्याचा मृत्यू , मुकर्रबखानाचा छापा पडण्यापुर्वीचा संभाजी - येसूबाईचा संगमेश्वरीचा संवाद इत्यादी. पानिपत लिहिताना संशोधकाची वृत्ती बाजूला ठेवली. तर संभाजीचे लेखन करताना त्यांनी संशोधक वृत्ती अंगीकारली. याचा एक फायदा असा झाला कि, संभाजीविषयी आजवर अज्ञात असलेल्या कित्येक गोष्टींवर नव्याने प्रकाश पडला. मात्र संशोधकाची वृत्ती बाळगत असताना दंतकथा, आख्यायिकांचा वापर करण्याचा मोह काही पाटलांना आवरता आला नाही. उदा :- संगमेश्वरी संभाजीचा मुक्काम फारच अल्प काल झाल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. रायगडास मोगलांचा वेढा पडल्याने संभाजी व कवी कलश तातडीने खेळण्याहून संगमेश्वरमार्गे रायगडला निघाले होते. या प्रवासात येसूबाई व शाहू संभाजी सोबत नव्हते तर ते रायगडी होते आणि त्यांच्या बचावासाठी संभाजी रायगडला चालला होता. हा प्रसंग मुळचाच इतका नाट्यमय आहे कि यात अधिक कल्पनाविलास न करता केवळ समर्थ शब्दांनी ते रंगवण्याचे कार्य करायचे होते. परंतु पाटलांनी केले उलटेच ! संगमेश्वर मुक्कामी येसूबाई संभाजीसोबत होती आणि तिची रायगडी रवानगी झाल्यावर संभाजीवर शत्रूचा छापा पडला. एखाद्या मसाला चित्रपटात शोभेल असाच हा प्रसंग ! यामुळे मुळच्या सत्य घटनेतला जो आत्मा होता तोच हिरावून घेतल्यासारखा झाला. ' संभाजी ' चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील कोणतेही पात्र मनात घर करून राहात नाही. अपवाद यातील स्थळ वर्णनांचा ! त्याशिवाय तत्कालीन राजकारण उलगडून न सांगता संभाजीने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांचा पाटलांनी यात आढावा घेतला आहे. नाहीतरी संभाजीने पार पाडलेल्या अशा किती लष्करी स्वाऱ्यांची वाचकांना माहिती होती ?
 
              या लेखात आपण ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि विश्वास पाटील या चार प्रमुख ऐतिहासिक कादंबरीकारांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रस्तुत लेखात या चौघांची आपापसांत तुलना करण्याचा जसा हेतू नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या गुण - दोषांचेही वर्णन करण्याचा उद्देश नाही. या साहित्यिकांच्या कलाकृतींचे एक इतिहास अभ्यासक म्हणून झालेले आकलन वाचकांच्या समोर मांडण्याचा मनोदय आहे. उपरोक्त चतुष्टयापैकी इनामदार, देसाई व पाटील या त्रिमुर्तीच्या लेखनात एक समान धागा आढळून येतो. सूर्योदय व सूर्यास्त हा जसा सृष्टीचा नियम आहे, त्याचप्रमाणे कादंबरीलाही आरंभ अन शेवट असतो. पण हा शेवट शोकांतिक करण्याकडे, वाचकांच्या मनाला चुटपूट लावण्याकडे या त्रिमूर्तीचा कल असल्याचे दिसून येते. इनामदारांच्या सातही कादंबऱ्यांचा शेवट बघा. कादंबरी मध्यावर आली कि, त्यांच्या पात्रांची भाषा जास्तीत जास्त निरवानिरवीची होत जाते. देसाई व पाटलांच्या लेखनातही तेच आढळते. हे असे का व्हावे ?
 
                     ऐतिहासिक घटनांची / चरित्रांची मांडणी हवी तशी करता येत असली तरी तिचे स्वरूप, परिणाम यांत बदल करता येत नाही. उदा :- शिवाजी राजांनी प्रतापगडी अफझलखानास ठार केल्याची घटना सर्वश्रुत आहे. आता कथा - कादंबरीकार हि घटना शक्य तितक्या नाट्यमय शब्दांत मांडू शकतात, रंगवू शकतात. पण खानाची व राजांची भेट होऊन उभयतांमध्ये सौरस्य घडून खान आपल्या छावणीत परतला असे ते लिहूच शकत नाहीत. हाच नियम इनामदार, देसाई व पाटील यांच्या कादंबऱ्यांना लागू पडतो. त्रिंबकजी, यशवंतराव, दुसरा बाजीराव हे शेवटी अपयशी ठरलेले राजकीय पुरुष असल्याचे इनामदारांना माहिती आहे. थोरला माधवराव क्षयाने बेजार आहे, हे देसाईंना ठाऊक आहे. ता. १४ मार्च १७६० रोजी पानिपतला रवाना झालेला सदोबा दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानपतावर मारणार असल्याची कल्पना पाटलांना आहे. घटनेची आगाऊ माहिती असल्याचा मानसशास्त्रीय परिणाम नकळतपणे लेखकाच्या मनावर होत असावा. त्यामुळेचं कि काय, कथानकाचा जसजसा शेवट येत जातो तसतशी शोकांतिक शेवटाची वेळ जवळ आल्याची चाहूल वाचकाला लागत जाते. उदा :- पानिपत कादंबरीनुसार युद्धाचा निकाल विश्वासरावाच्या मृत्युनंतर लागला. परंतु प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग चालू होण्या आधीची पाच - पंचवीस पाने, ' पानिपतावर मराठी फौजा हरल्या ' असेच सुचित करणाऱ्या मजकुरांनी भरलेली आहेत. रणजित देसाईंच्या ' स्वामी ' ची देखील हिच तऱ्हा ! माधवराव पेशवा क्षयाने आजारी आहे. तो मृत्युपंथास लागला आहे मान्य. पण कादंबरीचा अंत जसजसा जवळ येत जातो तसतशी वाचकाला त्याची आगाऊ कल्पना येऊ लागते आणि देसाईंनी पेशव्याचे मरण कसं रंगवलं आहे एवढेच जाणून घेण्याची जिज्ञासा बाकी राहते. यामानाने शिवाजी सावंतांनी ' छावा ' मध्ये पाळलेला संयम प्रशंसनीय आहे.
 
                संभाजी औरंगजेबाच्या कैदेत असून त्याच्यावर राक्षसी अत्याचार केले जात आहेत. नेत्र - जिव्हाहीन संभाजी स्वतःच स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजीचा शेवट नक्की आहे पण ' छावा ' लिहिताना सावंतांनी घेतलेली महत्त्वाची खबरदारी म्हणजे त्यांनी संभाजीचा मृत्यू फारसा नाट्यमय केला नाही. कल्पनेची फारशी उधळण त्यात केली नाही. उलट छत्रपती संभाजी हा धीरोदत्त आणि निर्विकार वृत्तीने मरणाला कसा सामोरा गेला याचे त्यांनी चित्रण केले आहे महत्त्वाचे म्हणजे हा प्रसंग वाचणारा वाचक देखील जवळपास त्याच वृत्तीने त्याचे वाचन करतो. इतकेचं नव्हे तर ' छावा ' कादंबरी जसजशी अखेरीकडे जाते तसतशी त्या कादंबरीचा / कथानकाचा शेवट काय आहे याची कल्पना असूनही वाचकांच्या मनाची त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी होत नाही. उदा :- संगमेश्वरी संभाजीचा मुक्काम असून मुकर्रबखानाचा त्याच्यावर छापा पडून तो कैद होतो, हा घटनाक्रम सर्वांना माहिती आहे. परंतु ' छावा ' मध्ये या प्रसंगाचे लेखन सावंतांनी असे केले आहे की, लेखक संभाजी प्रमाणेच पुढे काय घडणार आहे याविषयी अनभिज्ञ आहे. याचा परिणाम वाचकाच्या मनावर झाल्याखेरीज राहत नाही. त्यामुळेच या घटनेचा अंत काय आहे, हे माहिती असले तरीही हा प्रसंग वाचताना जेव्हा संभाजीला अटक होते त्यावेळी नाही म्हटले तरी वाचकाच्या मनाला, अपेक्षेला धक्का हा बसतोच ! माझ्या मते, हेच शिवाजी सावंतांच्या कादंबरीचे खरे यश आहे. तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक कादंबऱ्या वाचा वाचा. त्यांचा शेवट जवळ आल्यावर मनावर एक निराशेचे मळभ येते, पण छावा वाचताना मात्र असे काहीही जाणवत नाही. केवळ यामुळेच शिवाजी सावंतांची हि कादंबरी इतर ऐतिहासिक कादंबऱ्यांपेक्षा अधिक सरस बनली आहे.

   

२ टिप्पण्या:

  1. चार ऐतिहासिक कादंबरीकारांवर लिहिलेला हा लेख अभ्यासपूर्ण आस्वादक समीक्षेसारखा आहे. तो वाचून पुन्हा संभाजीमहाराज वाचावेसे वाटले. विशेषकरून छावा.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद RAJENDRA MANERIKAR सर !

    उत्तर द्याहटवा