दिवस
…. रविवारचा.
वेळ ….
दुपारची.
स्थळ ….
अस्मादिकांचे
बेडरूम कम वाचनाची खोली.
खोलीचे
वर्णन :- गादीवरील
बेडशीट विस्कटलेली.
सकाळचा
पेपर चावून ( कि
चघळून ? जे
काय असेल ते ) चोथा
झाला आहे. चार
- दोन
इतिहासाची ( एक
प्रकारे कच्च्या भांडवलाची
) पुस्तके
बाजूला पडली आहेत. अस्मादिक
हाती वही - पेन
घेऊन प्रतिभा साधनेस बसले
आहेत. लॅपटॉपवरील
प्रीती झिंटाचे फोटो तन्मयतेने
पाहत प्रतिभेची साधना करण्याचा
प्रयत्न केला जातोय पण स्फूर्ती
काही केल्या येत नाही.
अखेर वैतागून
खिडकीच्या बाहेर आकाशाकडे
शून्यात नजर लावून (
म्हणजे
नेमके कुठे ? कोणास
ठाऊक पण शब्दप्रयोग भारी आहे.
) पाहण्याचा
प्रयत्न होतो आणि शेवटी
स्फूर्तीदेवता प्रसन्न होऊन
लेखक महाशयांच्या हातातील
लेखणीतून कागदावर शब्दरूपी
मोत्यांची ( उपमेला
मोती वापरणे हा आपला एक काल्पनिक
श्रीमंतीचा प्रकार ! )
उधळण करते.
आजकाल
लेखन करून पोटं भरण्याचा
जमानाच उरला नाही. गेल्या
जमान्यातील ते पुलं म्हणून
कोण होते, त्यांची
विनोदी प्रकारची पुस्तके जाम
खपून ते ' कोट्याधीश
' झाल्याची
बातमी समजल्यावर आपण ठरवलं
कि, आपण
लेखकंच बनायचं. आता
लेखक बनण्यासाठी काही कोर्सेस,
क्लासेस
सुरु झाले आहेत, पण
हि सोय आम्हांला तेव्हा उपलब्ध
नव्हती. मग
उचलेगिरीचा सर्वमान्य फंडा
आपण स्वीकारला. ' अस्मादिक,
आम्ही
' अशी
भारी शब्दयोजना स्वतःसाठी
वापरायला सुरुवात केली.
मधीमधी
कंसात वाक्यं टाकायची
कोट्याधीशांची पद्धतही अलगदपणे
उचलली. पन
साला लेखन काही जमेनाच !
दरम्यान
' टवाळा
आवडे विनोद ' हे
एका प्रसिद्ध संताचे वचन
डोळ्याखालून गेल्याने आपन
टवाळकी सोडायचे ठरवले अन पाच
- पन्नास
खरडलेल्या वह्यांची पाने
फाडून त्यांची विल्हेवाट
लावून आपण गंभीर अशा साहित्याकडे
वळलो. ( अर्थात
स्वतः केलेलं लेखन फाडावं
लागणारा या महाराष्ट्रातील
पहिला लेखक मीच आहे. पण
' संत
सूर्यामुळे ' आमचे
नाव लक्षात कोण घेतो ? )
गंभीर
आणि जड अशा लेखनासाठी तशाच
जडविद्वानांची पुस्तके वाचणे
भाग होते. तेव्हा
अशा लेखकांच्या ग्रंथांचा
( गंभीर
विषयावरील लेखन ' ग्रंथ
' असतो
आणि हलकं - फुलकं
हे ' पुस्तक
' ) जोमाने
अभ्यास केला. त्यातून
' पानिपत
असे घडले ' हा
अवाढव्य ग्रंथ जन्माला आला
खरा ( ' … अन
प्रकाशक खड्ड्यात गेला.'
माझ्या
सत्यवचनी जरा गप्प बैस.
) पण नुसती
लेखक म्हणून मान्यता मिळाली,
' विद्वान
लेखक ' म्हणून
नाही. ( जाऊ
द्या. आपलंच
दुःख किती उगळावं ! ) तेव्हा
आता कथा - कादंबरी
लेखनास आरंभ करण्याचा विचार
केला. अर्थात,
त्याचाही
आपण परत जोमाने अभ्यास सुरु
केला. ( म्हणजे
उचलेगिरी ! ) महाराष्ट्रातील
परिचित व अपरिचित अशा पाच -
पन्नास
कथा - कादंबरीकारांच्या
साहित्याचा अभ्यास करून आणि
' बटाट्याच्या
चाळीतील श्री.
पोंबुर्पेकरांच्या
' प्रतिमेस
वंदन करून कथा लेखनास आरंभ
केला अन …. माशी
शिंकली !
कथेतील
पात्रांची नावं काय ठेवायची
हा मोठाच प्रश्न पडला.
नायिका
फडके, जोशी
प्रभूती घराण्यातील दाखवली
व तिचे पवार, शिंदे,
पाटील,
काळे इ.
पैकी एका
घराण्यातील नायकाशी प्रेमसंबंध
दाखवले तर ब्राम्हणी संघटना
' आमच्या
मुली काय फक्त प्रेमंच करत
हिंडतात कि काय ? '
म्हणून
गळा धरतील अशी भीती. बरं,
नायिका
पवार, पाटील,
कदम कुळातील
दाखवली अन तिचा नायक कांबळे,
पानतावणे,
भोईर,
कोळी अशा
घराण्यातील दाखवला तर कमरेला
नसलेल्या तलवारी परजत मराठा
संघटना ' आमच्या
घरंदाज मुलींची बदनामी करतोस
काय ? ' म्हणून
मान कापायच्या ! जिथे
नायक - नायिका
ठरवण्यासाठी एवढा विचार करावा
लागतो तिथे खलनायकांचे काय
करायचे ?
कथानक
ग्रामीण असेल तर व्हिलन पाटील
असायला हवा, पण
आता मराठा संघटनांची भीती !
बरे,
इनामदार
किंवा सावकार घालावा तर आता
ब्राम्हणी संघटना मुद्द्यांपेक्षा
गुद्द्यांवर अधिक भरवसा ठेवू
लागल्या आहेत. दलित
समाजातील पात्र खलनायक बनवावे
तर ' हजारो
वर्षे आमच्यावर चाललेला अन्याय
अजूनही सुरु असल्याची '
घोषणा करत
त्यांच्या पाच - पन्नास
संघटना तुटून पडायच्या.
अरे मग,
आता
आम्ही नायक - नायिका
- खलनायक
बनवायचे तरी कोणाला ?
( सही !
काय मस्त
डायलॉग जमला आहे यार !!
हा कोणीतरी
रस्त्यावर उभं राहून मोठ्यानं
ओरडून बोलायला पाहिजे.
) मुसलमानाला
गुंड बनवावे तर हिंदू -
मुस्लिम
सलोखा बिघडतो. म्हणजे
तीही वाट बंद. ख्रिस्त्यांना
व्हिलन करण्यासाठी घाटावरून
गोव्यात जावे लागेल, ते
आपल्याला परवडणार नाही.
जी बोंब
ग्रामीण पार्श्वभूमीची तीच
थोड्याफार फरकानं शहरी भागाची
! जिकडे
पहावं तिकडे आता जातींच्या
संघटना बनत चालल्या आहेत.
तेव्हा
आता प. पू.
महेश
कोठारेंचे स्मरण करून नायक
- नायिका
- खलनायकांची
नावं ठेवण्याचा विचार आहे.
उदा
:- नायक
- रम्या
उर्फ रमेश. किती
शिकला माहिती नाही. नोकरी
- धंद्याचा
पत्ता नाही. केसांचा
कोंबडा किंवा भांग पाडून तो
सदानकदा पोरींच्या मागे फिरत
असतो. नायिका
- ज्योती,
मंदा,
नंदा (
यांपैकी
एक किंवा असलेच काहीतरी एक
नाव. पण
नायिकेला टोपण नाव नसतं बरं
का ! ) कॉलेजात
जाते. कितवीला
ते माहिती नाही. हातात
एकचं वही अन पेन. सोबत
चार दोन मैत्रिणी. ( यांच्या
व नायिकेच्या चढ - उतारांसहीत
पोषाखसंपन्न देहांचे वर्णन
फडके, काकोडकर,
सोनवणी
यांच्या कादंबऱ्यांमधून उधार
घेण्यात येईलंच ! ) खलनायक
- धोंडू
खेकडे उर्फ धोंड्या खेकडा.
याला खेकडे
खाण्याचा भारी शौक. हा
सारखा खेकडे खात असतो व उरलेल्या
वेळात व्हिलनगिरी करतो.
पण नेमके
काय करतो माहिती नाही.
तरीही
पेपरांत याचे कुख्यात गुंड
म्हणून नाव येते व माणसांत
याची दहशत असते. याशिवाय
दुय्यम खलनायक म्हणून नाना
लोणीवाले हे राजकीय पात्र
आहेंच. हे
खेकड्याला व आपल्या वरिष्ठांना
सदानकदा लोणी लावत असतात.
तर अशा या
भयानक दुकलीचा आपल्या नायक
- नायिकेसोबत
कसा सामना होतो आणि ते त्यातून
कसे निभावून सहीसलामत सुटतात
याचे वर्णन ' लोणीदार
खेकडा ' या
आपल्या आगामी कादंबरीत वाचकांना
वाचावयास मिळेल.
अर्थात,
जिज्ञासू
वाचकांची जिज्ञासा थंड
करण्यासाठी या कथानकाची
थोडक्यात रूपरेषा येथे देतो
:- रम्या
वासुगिरी करत मंदाच्या प्रेमात
पडतो. मंदा
कॉलेजात शिकत समाजसेवा करत
असते. शास्त्रीय
नृत्याचे कार्यक्रम करून ती
जमलेला पैसा कॅन्सर,
एड्स,
कावीळ (
ज्या रोगाचे
जास्त बळी पडतील तो रोग टाकण्यात
येईल. ) औषधोपचारासाठी
देते. स्वतः
किरकोळ अंगयष्टीची असूनही
ती नेमाने रक्तदान करत असते.
या सर्वांतून
वेळ मिळाला कि, ती
रम्यावर प्रेम करते.
इकडे
खेकड्याची माणसे पोलिस चकमकीत
जखमी होतात. त्यातील
काहींना रक्ताची नितांत गरज
असते. तेव्हा
ब्लड बँकेत जाऊन रक्त आणण्यापेक्षा
रस्त्याने जाणाऱ्या चार -
पाच तरुणींना
उचलून नेतात. यात
एक आपली नायिका असते.
पुढे खेकडा
त्यांचे रक्त काढून आपल्या
माणसांचे प्राण वाचवतो पण
त्या तरुणींचे काय होते ?
खेकडा
त्यांना सोडतो कि आणखी काय
करतो ? आपला
नायक, नायिकेचा
शोध कसा लावतो इ. प्रश्नांची
उत्तरे मात्र वाचकांना '
लोणीदार
खेकड्या ' तंच
मिळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा