शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

फुल्ली फालतू ! ( भाग - ३ )



फिल्मी रोमान्स !

    आपल्याकडे जो फिल्मी रोमान्स दाखवला जातो त्यातला बटबटीत, किळसवाणा प्रकार सोडला तर निखळ रोमँटिक सीन असलेले पाच चित्रपट सांगा, असे म्हटल्यास तुम्ही सांगू शकाल का ?

    पहले जमाने में फुटभर पट्टीसे अंतर मोजके, सुरक्षित अंतर रखके, पेड कि डाल पकडके रोमान्स होता था असं कोणीतरी पिकल्या केसांसहित मिटल्या डोळ्यांनी सांगेलही पण हे खरं नाही. गुजरे जमाने की मशहूर अभिनेत्री देविकाराणी व कुठल्या तरी रॉयचं चुंबनदृश्य कलरलेस जमान्यात येऊन गेल्याचं सांगितलं तर विश्वास बसेल ? मला वाटतं सेन्सॉर बोर्ड त्यानंतरच कामाला लागलं. त्यामुळं भली मोठी झाडं व तुटकी वा उमललेल्या दोन फुलांचं मार्केट वाढलं.

 

    फिल्मी रोमान्स वरून आठवलं. हातात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरण्यापूर्वी मेहमूदची एक मुलाखत टीव्हीवर लागली होती. त्यात मेहमूद अपने टिपिकल अंदाज में ' आराधना ' मधील ' रूप तेरा मस्ताना ' ची पडद्यामागील स्टोरी सांगत होता. त्या गाण्याच्या म्युझिकमध्ये, शब्दांमध्ये, गायकाच्या आवाजात, इव्हन सिच्युएशनमध्ये रोमान्स, सेक्स पुरेपूर भरला असूनही राजेश खन्ना काहीच करू शकला नाही व कॅमेरा नुसताच शर्मिला- राजेश भोवती गोलगोल फिरू लागला. मला प्रश्न पडला, राजेशनं काय करायला पाहिजे होतं ?

    आता त्याच्या अभिनयाच्या मुळच्याच मर्यादा. त्यात समोर अर्धवस्त्रांकित असली तरी शर्मिला टागोर. जिला कोणत्याही अँगलनं हॉट न् सेक्सी म्हणता येत नव्हतं. ( हिला काश्मीर कि कली कोणी बनवलं रे ? ) अशा स्थितीत राजेश खन्ना होता म्हणून थोडा तरी रोमान्स, मेहमूदच्या भाषेत सेक्स तिथ अवतीर्ण झाला. मी असतो तर एक टक्काही काही झालं नसतं. शर्मिला टागोर आपल्या आख्ख्या फिल्मी करियरमध्ये एकदाच चांगली दिसली. ती पण ' अब के सजन सावन में ' गाण्यात. त्यातही लताच्या आवाजाची साथ होती म्हणून !

 

    फिल्मी रोमान्स वरून आठवलं. तुम्ही कधी फिल्मी रोमान्सचं शुटींग पाहिलंय का ? युट्युबवर बी, सी ते वायझेड मुव्हीजच्या रोमँटिक सीन्सचे शूट उपलब्ध आहेत. जरूर बघा. प्रत्येक सेकंदाला हीरोला निदान चार शिव्या घातल्याखेरीज रोमँटिक सीन शूट होत नाही असा बव्हंशी डायरेक्टरचा समज असतो. नटीचा हात हातात घेताच " अबे चुतीये " पासून स्टार्ट होत किसिंग सीन " मादरचोद, भेन्चोद " वर येऊन संपणार.

    पाठीमागून शिव्या न् बाहुपाशांत त्यातल्यात्यात बऱ्यापैकी अॅक्ट्रेस. साला, कोणता हिरो रोमँटिक फील चेहऱ्यावर आणेल ? ते भोजपुरी वगैरे तर कसायाच्या हातात गेलेल्या बकऱ्यागत चेहरे करतात. दुसरं एक्स्प्रेशनचं येत नाही त्यांच्या चेहऱ्यावर. आणि आम्ही मात्र शूट झाल्यावर यांच्या सोबतची भरगच्च, सेक्सी नटी पाहिल्यावर लँगूर के मुंह में अंगूर म्हणत फ़िल्मी कलियाँ खिलवत बसतो !

 

    रोमान्स शूट से याद आया. साउथ इंडियन सिनेमातला रोमान्स जगाच्या पाठीवर कुठेही पहायला मिळणार नाही. तिथं हिरॉइनला गॅस, तवा, फ्रीज तसेच फळं चुरगळून खाण्याचं सामान वगैरे म्हणून काहीही दाखवतात. एका पिक्चरमंदी प्रभुदेवा नग्माच्या पोटावर ऑम्लेट बनवतो. नग्माचं पोट आणि गॅस वा तवा यातला फरक न समजणारा कोण तो येडझवा होता, काय म्हायती ! हिंदुस्थानी मध्ये ' टेलिफोन धून में हँसने वाली ' म्हणत कमल हसन मनीषाच्या कमरेवर तबला वाजवण्याची अॅक्टिंग करतो. मनीषा व तबला. कधी कधी मोठ्या माणसांना फरकच कळत नाही. दुसरं काय ! पण सफारीतला संजय दत्त जुहीच्या पोटावर आईस्क्रीम ठेवून खातो असं दाखवलंय. आता जुहीचं पोट म्हणजे काय आईस्क्रीम प्लेट वाटली कि आईस्क्रीम जास्त जमलं होतं म्हणून ते वितळवण्यासाठी जुहीच्या पोटावर ठेवण्यात आलं ते डायरेक्टरच जाणे !

    

    हिरॉइनच्या पोटाचा, विशेषतः नाभीचा कसा वापर केला जाईल याचा निदान फिल्मी दुनियेत भरवसा नाही. उदाहरणार्थ परत एकदा कमल हसन. ' एक दुजे के लिए ' मध्ये रती अग्नीहोत्रीचं पोट त्याला भोवरा फिरवण्यासाठी योग्य वाटलं. बरं हा काही एकमेव महाभाग आहे किंवा ती दुदैवी आहे अशातला भाग नाही. सेम सीन विजयाशांती सोबत एका कन्नड ( तेलुगु, तमिळ, मल्याळम सगळं आपल्या लेखी कन्नडचं ) फिल्म मध्ये शूट झालाय.   

    बाकी, हिरॉइनच्या नाभीमध्ये पाणी, मध, दुध, तेल, द्राक्षं, चेरी जे काय मिळेल ते कोंबून भरण्यापलीकडं दाक्षिणात्यांची मजल गेली नाही. गरीब बिचारे ! तिकडं जेम्स बॉंडने तर आपल्या नटीच्या नाभीत हिरे भरले. तेही प्रत्येक हिरा पाण्याच्या थेंबाएवढा. हिरॉइन Halle Berry. जर ते हिरे खरे असले तर एखाद दुसरा तिला निश्चितच मिळाला असेल असं मला उगाचंच वाटून राहिलंय. त्यामानानं हिंदीत अपवादात्मक सीन वगळल्यास असलं काही शूट झालं नाही. तसंही बरोबर आहे म्हणा. माधुरी दीक्षित सारख्यांसोबत हिरे भरायचे सीन करायचे म्हटल्यावर निर्माता कंगाल होईल.  ... ईईई .. बकवास जोक. खैर, फिल्मी प्रेक्षकांचं --- म्हणजे इतरांचं माहिती नाही पण आपल्याला --- म्हणजे पर्सनली आपल्याला खोलगट नाभी असलेल्या नट्या आवडतात. का नट्यांची खोलगट नाभी आवडते ? जे असेल ते पण मुद्दा समजल्याशी मतबल. तर अस्मादिकांनी लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या पत्नीला असा प्रश्न विचारून चार शिव्या खाऊन एक कान अंमल बधीर करून घेतल्याची एक दुखरी, बहिरी जुनी आठवण येथे नमूद करत लेख समाप्त करतो.

फुल्ली फालतू ! ( भाग - २ )



    खूप वर्षांमागे म्हणजे आजसे पंधरा बीस वर्ष पैले धरमिंदर और जयाप्रदा का एक शिनेमा आया था. जिसका मराठी पेपर में परीक्षण आया उसका टायटल ' म्हातारा वाघ अन् म्हातारी वाघीण ' ऐसा कुच था.


    याच आसपासच्या काळात धरम और हेमाजीकी लव्ह इष्टोरी पर मराठी पेपर या मासिक में आर्टिकल आया जिसमें यंग धरम के सामने आशा, शर्मिला, मुमताज कशा म्हाताऱ्या दिसू लागल्या होत्या व धरमचे मर्दानी सौंदर्य ( हे काय असतं ते त्या पत्रकाराच्या जीवाला ठाऊक ) खुलवण्यासाठी तरुण नटीची गरज होती अशी मांडणी करत हेमामालिनीची सिनेमातली व धरमच्या जीवनातली एन्ट्री सांगत ती कथा त्यांच्या लग्नापर्यंत नेऊन समाप्त केली होती.


    आता धर्मेंद्रचं वय किंवा त्याची जन्मतारीख जर बघितली तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या नट्या ( आधीच्या काळातल्या ) कोणत्या अँगलने म्हाताऱ्या वाटत होत्या, हे त्या समीक्षकालाच माहिती. गंमतीचा भाग म्हणजे धरमजीकी हिरॉइन बनी तनुजा पुढे सिनियर सिटीजन तथा चरित्र भूमिकांत गेली तरी धरम बीस - पच्चीस या तीस साल का ही रहकर कभी जयाप्रदा तो कभी अमृता सिंग या अनिता राज के साथ उछलकूद करता रहा. ( आता धर्मेंद्रच्या नाचाला माकडचाळे तर म्हणू शकत नाही. कारण त्यात एक नैसर्गिक ओरिजिनॅलिटी आहे व दुसरं असं कि माकडचाळे फक्त आणि फक्त राजिंदरनाथचं करू शकतो, हे माझं ठाम मत आहे. )


    तसं बघायला गेलं तर हिरो कधीच म्हातारा होत नाही. निदान आपल्याकडे तरी. फिल्म ' नरम गरम ' मध्ये परमपूज्य ओमप्रकशजींनी हो गोष्ट पुरुष संकल्पनेला हिरा व अंगठीची जोड देत चांगलीच एक्स्प्लेन केलीय. आता त्यात स्वरूप संपत पेक्षा अमोल पालेकर वयस्कर दिसतो हि गोष्ट वेगळी तर सांगायचा मुद्दा असा कि, आपल्याकडे हिरो कधीच म्हातारा होत नाही. म्हणूनच जम्पिंग जॅक जितेंद्र राजश्री टू माधुरी दीक्षित पर्यंतच्या पिढीचा नायक बनू शकला. मिथुनदाने तर ज्ञात पेक्षा अज्ञात, उदयोन्मुख व विस्मृतीत ( बहुधा एक दोन सिनेमांतच ) गेलेल्या नट्यांसोबत आपली अखेरची व प्रदीर्घ फ्लॉप इनिंग खेळली. ( बहुधा मिथुन व देव आनंदमध्ये याबाबतीत छुपी कॉम्पिटिशन सुरु असावी. देव गेला न् मिथुनही रिटायर झाला. फिल्म इंडस्ट्रीत येऊ इच्छिणाऱ्या मुलींचा मोठाच आधार गेला ! ) नीलम ते हंसिका मोटवानी असा गोविंदाचाही प्रवास झाला. धरमपाजी तर आता आलिया भटचाही हिरो म्हणून काम करायला तयार असेल व फिल्मी हितसंबंध म्हणून आलियाही या गोष्टीस रोमँटिक वगैरे कल्पना म्हणत आपली सहमती दर्शविल. पण आत्ताचे प्रेक्षक व चित्रपट निर्माते सुजाण झालेत. किंवा असंही म्हणता येईल कि, हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांच्या दुदैवाचे दशावतार संपलेत. नाहीतर आजी जयाप्रदाच्या सुनेचा --- इथे माधुरी ते ऐश्वर्या कोणीही चालेल --- मुलगा धरम तथा वीरू, वीरसिंग वगैरे. धर्मेंद्रला नंतरच्या काळात हीच नावं मिळायची. मला एक समजत नाही. ८० नंतरचे धर्मेंद्रचे फिल्मी आईबाप आपल्या मुलाचे नाव वीरूच का ठेवायचे ? दुसरं काही ठेवता येत नव्हतं कि सिनेमात पाच मिनिटांपेक्षा जास्त वावर नसल्याने जगाचा त्यांना अनुभव मिळत नसावा ? सोचने वाली बात है.


    तर माधुरी वा ऐश्वर्या सम आईचा ऐन ज्वानीत आलेला वीरसिंग / वीरू आपली छुईमुई सोलह सालकी गर्लफ्रेंड .. सॉरी प्रेमिका आलिया भटसे मिळणे बाग में जा रहा है. ( भारतीय कायदा अठराचं अठ्ठावीस करेल पण हिंदी सिनेमा सोलह सालातच अडून राहील. बहुधा सोळा नंतर मुळी थोराड होत असाव्यात असा त्यांचा समज असावा. ) धरमची लहान / मोठी बहिण म्हणून कदाचित सोनाक्षी फिरताना दिसेल व त्याच्या सासऱ्याचा रोल ... आयला हाच तर खरा प्रश्न आहे. धरमच्या सासऱ्याचा रोल कोण करेल ? संजय दत्त ..... नाही. खान मंडळी तर अजून विशीत आहेत. अर्शद वारसी इतक्यात आत्महत्या करणार नाही. बहुतेक हि जबाबदारी बोम्मनवर सोपवण्यात येईल. तर धरमपाजी हिरोचं काम करेल तर स्टारकास्ट अशी असेल. पण आपल्या सुदैवानं असं काही होणार नाही. असो.


    धरमच्या मानानं शोलेतला जय तथा सदी का महानायक मात्र दुदैवी ठरला. बिचाऱ्याला मनीषा, रविना, सौंदर्या, शिल्पा शेट्टी ते जिया खानच्या पुढे मजल मारता आली नाही. लोकांनीच त्याला ' अब बस ' म्हणत रोखले. नंतर आपली अर्धवट कुरतडलेली दाढी घेऊन गेम शो ते नवरत्न तेल विकण्याच्या जाहिराती करत तो चरित्र भूमिकांकडे वळला. तसंही ते बरं झालं. नाहीतर ' लाल बादशाह ' मधील निरूप रॉय - अमिताभ बच्चन हि माँ - बेटे की जोडी पाहून डोळे मिटायची माझी तीव्रेच्छा झाली होती.


    आपल्याकडे हिरो म्हातारा होत नाही कि लोकं होऊ देत नाहीत ? किचकट सवाल !


    रजनीकांत अजूनही थांबायला तयार नाही. लिंगामध्ये सोनाक्षी व अनुष्का तर आता कबालीत राधिका. हुज नेक्स्ट ? हा मनुष्य एकाच फिल्म मध्ये बाप बनेल तसाच मुलगाही. पण हिरो व वही होगा और हिरॉइन .... ...

     रजनीचं भाग्य कमल हसन, चिरंजीवी सारख्यांना लाभलं नाही. ज्या इकडं चालल्या नाहीत त्या तिकडं त्येंच्यासंगट काम करत होत्या. स्टार्ट टू मनीषा कोईराला, एंड टू सोनाली बेंद्रे, नम्रता शिरोडकर वगैरे वगैरे. नाही म्हणायला कमल को रानी मिली ' हे राम में ' और रानी को उसने जिस तरह पेश किया वो देखकर मेरे भी मुंह से निकल गया, हे राम !

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

फुल्ली फालतू ! ( भाग १ )




    मध्यंतरी अतिवाचनाने डोळे दुखू लागल्याने वाचन व लेखन दोन्ही बंद केलं. अशावेळी डोळ्यांना पूर्णपणे विश्रांती देणे हाच एकमेव उपाय असला तरी सामन्यतः आपण काय करतो कि, डोळ्यांना विश्रांती म्हणून वाचन वगैरे बंद करून टीव्ही बघत बसतो. मी देखील हेच केले. फक्त टीव्हीच्या ऐवजी लॅपटॉप मधील मालिका, पिक्चर बघण्यात मधला आठवडा घालवला. यानिमित्ताने ' अदालत ' चे काही नवे जुने भाग पाहून झाले. रोनित रॉयने वकिलाची भूमिका चांगलीच निभावलीय. पण आपलं लक्ष बव्हंशी त्याच्या सहाय्यकाची भूमिका करणाऱ्या प्रेरणाकडे होतं. ( खोटं का बोला ? ) सुरवातीला सावळी असणारी प्रेरणा नंतर उजळ होत मध्येच का काळवंडते, ते मात्र मला समजलं नाही. असो. तो आपला प्रांत नाही.

    सुट्टी आहेच तर चारदोन हिंदी, इंग्लिश पिक्चर बघण्याचाही प्रयत्न केला. पैकी, हिंदी सिनेमा बघायची तर आपली सहसा हिंमत होत नाही. अलीकडच्या काळात कित्येक गाजलेले, बहुचर्चित हिंदी पिक्चर मी अजूनही पाहिले नाहीत. नाही म्हणायला तेव्हा ' सुलतान ' चा पंधरा वीस मिंन्टाचा भाग पाहिला अन् त्याच्यापेक्षा ' Rocky balboa ' सिरीजचा ६ वा भाग सरस असल्याची खात्री पटली. ( नाहीतरी सबंध सिनेमाभर उचलेगिरीच तर केलीय. ) आपल्याकडे फालतू पिक्चरही शंभर सव्वाशे कोटींचा गल्ला कसा काय जमा करू शकतो ? आपली लोकं इतकी फालतू आहेत का लोकांकडे फालतू टैम आहे ? असेलही. मी नाही का, टाईमपास म्हणून कधी तरी बीपी बघत. पण हे आपल्यातच ठेवा. जाहीर चर्चा नको.

   

 तर हिंदी सिनेमा बघायचा नाही म्हणून मी हिंदीत डब केलेले दाक्षिणात्य पिक्चर पाहून घेतले. त्यात जुनियर एनटीआरचा Temper, बादशाह ; तसेच रवितेजाचा Power, Mirapakai ; मांचू विष्णूचा Denikaina Ready पाहून झाले.

 

    तसं पाहिलं तर या सिनेमांची स्टोरी जवळपास एकसारखीच. एक विचित्र सिच्युएशन निर्माण करायची. ठराविक कॉमेडीयनची गँग ( स्पेशली Brahmanandam ) तिथे आणायची. हीरोला जमेल तितका विनोदी सीन करण्याची मुभा ( कि सक्ती ? ) द्यायची. स्टोरी संपायला आली असं वाटलं कि, मध्येच हाणामारी ( जी पूर्ण पिक्चरमध्ये अर्ध्या तासाहून अधिक असतेच ) आणि कुठेतरी पिक्चरला हिरॉइन असल्याची आठवण करून देण्यासाठी चार दोन गाणी. दक्षिणात्य सिनेमांत नट्या फक्त गाणी आणि चारदोन सीन्स ( चांगल्या अर्थानं हां ) पुरत्याच असतात. त्यांच्यापेक्षा विनोदी कलाकारांना तसेच व्हिलनला अधिक रोल मिळतो, असं माझं निरीक्षण आहे.

 

    निरीक्षणावरून आठवलं, नट्यांचं सादरीकरण तथा प्रेझेन्टेशन करण्याची हातोटी, जी दाक्षिणात्यांना साधलीय ती हिंदी वा मराठी दिग्दर्शकांना तितकीशी साधली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. उदाहरणार्थ, हिरॉईन म्हणून तमन्ना भाटीयाने हिंदी चित्रपटातून सुरवात केली. युट्युबवर तिचा पहिला पिक्चर आहे. पिक्चर बघा व तमन्नाला ओळखा अशीही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, असं एकदोन सीन बघून माझं मत बनलंय.

 

    तर नटी म्हणून तमन्ना हिंदीत आली पण पिक्चर आणि त्यातील कलाकार, गाणी वगैरे बहुतेक सर्वच आपटलं. याच वर्षी साउथ इंडियन इंडस्ट्रीत तिची एन्ट्री झाली. तिकडचा तिचा पहिला पिक्चर ' Sree ' आणि हिंदीतला ' चांदसा रोशन चेहरा ' दोन्ही पिक्चर्स युट्युबवर आहेत. तुलना करण्यासाठी बघू शकता. हिंदीत तमन्ना शोधावी लागते तर तिथं ... आता त्यावेळी तिचे वय जरी कमी असले ( अवघे १५ ? आय कान्ट बिलीव्ह वगैरे ) तरी सादरीकरण नावाचा काही भाग असतो कि नाही ? तमन्नाच काय, काजल अगरवालचंही काही वेगळं नाही.

 

    तिचा पहिला हिंदी पिक्चर ' क्यों हो गया ना ' यात ती ऐश्वर्याच्या बाजूला कुठं तरी दिसून येते. त्यानंतर ती आली तेलुगु सिनेमात. आपल्या भाषेत साउथ इंडियन मुव्हीजमध्ये. तिकडे मॅडम प्रसिद्ध झाल्यावर इकडे परत ' सिंघम ' च्या निमित्ताने आल्या खऱ्या, पण या चित्रपटांत तिच्यापेक्षा सोनाली कुलकर्णी मला जास्त आकर्षक वाटली. ( तुम्ही सेक्सी म्हणू शकता ) तसं बघितलं तर काजल अगरवाल काय तितकीशी ' अप्सरा ' वगैरेच्या कॅटेगरीतील हिरॉइन नाही. पण दुय्यम व्यक्तिरेखा तिच्यापेक्षा जास्त आकर्षक दिसावी याला काय म्हणायचं ?

 

    तेच जुनियर एनटीआरच्या ' Brindaavanam ' मध्ये Samantha ( हे नाव नागरीत कसं लिहायचं ? ) आणि काजल दोघी आहेत. त्यात Samantha पेक्षा काजल चांगली दिसते. Samantha त्यामानानं तशी सुमार. तशी ती कोणत्याच सिनेमात खास दिसत नाही हा भाग वेगळा. पण हिंदीपेक्षा साउथ इंडियन सिनेमात काजल अगरवाल चांगली दिसू शकते हा मुद्दा महत्त्वाचा. इथं Samantha च्या बाबतीत समानता का नाही, असे फालतू प्रश्न विचारून आपण किती फालतू आहोत वा आपल्याकडे किती फालतू वेळ आहे याची शोबाजी करू नये.

 

    हंसिका मोटवानी तर हिंदी सिनेमातच लहानाची मोठी झाली. हिरॉइन म्हणून बहुधा तिची गोविंदा सोबत कारकीर्द सुरु झाली. ( चूकभूल द्यावी घ्यावीचा आसरा घेऊन ल्हीतोय ) सिनेमाचं नाव आठवत नाही. पण या जोडीसोबत उपेन पटेल, मनोज वाजपेयी, आफताब शिवदासानी, सेलिना जेटली इ. ' ताटातील लोणचे ' ( कि पडेल ? ) मंडळी होती. हंसिका मोटवानी किती आक्रस्ताळी अॅक्टींग करू शकते यापलीकडे या सिनेमात लक्षात राहण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. अगदी किम शर्मा देखील ! नाही म्हणायला प्रेम चोप्राची विनोदी वाटणारी भूमिका तेवढी आठवते. बाकीचं जाऊ द्या. 

 

    तर सांगायचा मुद्दा काय, हंसिका किती वाईट दिसू शकते व त्याहीपेक्षा जास्त वाईट अभिनय करू शकते, हे या सिनेमामुळं लक्षात येतं. पण तीच हंसिका Power मध्ये येते तेव्हा बोलतीच बंद होते. तामिळ ' सिंघम २ ' मध्ये अनुष्का शेट्टी असूनही हंसिका लक्षात राहते तर Denikaina Ready त हंसिका स्क्रीनवर आल्यावर तिच्याशिवाय डोक्यात आणि मनात दुसरं काही येऊच शकत नाही, हा माझा अनुभव आहे.

 

    हि झाली हिंदी, सॉरी डब हिंदी सिनेमांची कथा. आता थोडं इंग्रजी सिनेमांविषयी.  Thirteen Ghosts, Fun with Dick and Jane, Vertige इ. बघून झाले. पैकी Thirteen Ghosts का बघितला हा प्रश्न असला तरी Shannon Elizabeth हे काही त्याचं उत्तर होऊ शकत नाही. बहुतेक माझ्याकडे वेळच जास्त फालतू होता. तीच कथा Vertige ची. दोन्ही सिनेमांत स्टोरीची अनुपस्थिती व भडक हिंसाचार --- ज्यात माणसांचं व्यवस्थित होणारं कटिंग बिटिंग include आहे --- सोडलं तर दुसरं काहीच साम्य नाही. फक्त Vertige च्या दोन्ही नट्या लैच देखण्या आहेत. एकाच सिनेमात दोन्ही नट्या सुंदर, आकर्षक असल्याची गोष्ट तशी दुर्मिळचं. केवळ Fanny Valette आणि Maud Wyler या दोघी असल्यामुळे Vertige चे सारे अत्याचार सहन करूनही मी अजून शुद्धीवर आहे. पण Fun with Dick and Jane ची कथा निराळी.

 

    खरंतर Téa Leoni समोर असेल तर स्टोरी, अॅक्टींग वगैरे बाबींवर लक्ष जाऊ नये असं लिहिणार होतो पण जास्त पण थापा मारायच्या नसतात या अंतरात्म्याच्या आवाजास जागून तसं लिहित नाही. Jim Carrey च्या अभिनयाबाबत आपण काय बोलणार ? सदी का महानायक भी उसका खुद बडा फैन हय. तसा तो कोणाचा नाही, हा भाग वेगळा. तर या सिनेमाची निर्मिती त्याची असून कॉर्पोरेट सेक्टर चीज क्या है, हे त्यानं या निमित्तानं चांगलंच दाखवून दिलंय. अर्थात, त्याने सिनेमा बनवला तेव्हा तिथली स्थिती कदाचित तशी असेल. अजुनी आपल्याकडे तशी वेळ आली नाही पण काळाची पावलं त्याच दिशेनं पडताहेत हे मात्र निश्चित. ( आठवा, सत्यम राजू प्रकरण )        

 

     आपलं तथाकथित अर्थशास्त्र तसेच एकूण आर्थिक जीवन किती तकलादू, बेगडी आहे हे यातून दिसून येतं. खरं तर या विषयवार एक अतिशय धीरगंभीर, गहन असा लेखही होऊ शकतो परंतु सध्या अपुन को टैम नहीं है. ( खरं तर तेवढी अक्कल नाही. पण आपली लाज उघडी का पाडायची ! ) असो.

 

    Milla Jovovich ची Resident Evil हि एक अतिशय फालतू, बकवास फिल्म सिरीज आहे. पैल्या पिक्चरपासून ते शेवटपर्यंत ते झाँबी टैप लोकस हिंडताना दिसतात व त्यामध्ये हि चाळशीची रणरागिणी असते. ( तसं तिच्याकडे बघून वयाचा अंदाज करता येत नाही, पण अपुन भी बडी कुत्ती चीज है ) सबंध सिनेमात मारकाट, चावाचावी (झाँबींची. दुसरा अर्थ काढू नका ) सोडल्यास काही नाही. पण तरीपण हि सिरीज बघितली. कारण एकच. Michelle Rodriguez !

 
     S.W.A.T. हा तिचा, मी पाहिलेला पैला पिक्चर. तेव्हापासून ती माझी आवडती अभिनेत्री. इतकी कि, केवळ तिच्याकरता मी AvatarResident Evil ची आख्खी सिरीज सहन केली. आता ती अॅक्टींग किती करते हा भाग वेगळा असला तरी S.W.A.T., Resident EvilThe Fast and the Furious मध्ये जो तिचा अॅक्शन तथा आपल्या लँग्वेजमध्ये रावडी लुक आहे, तो मला जाम आवडला. सॉफ्ट रोमँटीक भूमिका ती करू शकते का, माहिती नाही पण डॅशिंग रोलमध्येच सध्या तरी ती आपल्याला चांगली वाटते. आवडते. तर अशी हि आपली फिल्मी दुनियेची अल्पशी मुशाफिरी. आता डोळ्यांचा त्रास कमी झाल्याने पुन्हा वाचन अन् लेखन. तोपर्यंत फिल्म अॅण्ड सिरियल्स बाय बाय ! 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

राष्ट्रपतींना अनावृत्त पत्र




प्रति,
सन्माननीय राष्ट्रपती महोदय यांस,

    श्री. राष्ट्रपती महोदय, हे खुलं न् विस्तृत पत्र मी मुद्दामहून लिहित आहे. मला माहिती नाही, हे पत्र तुमच्या वाचनात येईल का ते किंवा तुमच्या आसपास वावरणाऱ्या राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळातील व्यक्तींच्या वाचनात येईल का ते, पण हे मी लिहित आहे. जाणूनबुजून व सहेतुक.

    सर्वप्रथम मी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या तब्ब्येती विषयी विचारणा करत आहे कि, सर्व काही ठीक आहे ना ? सध्याच्या रोगट व विद्वेषी वातावरणाचा तुमच्यावर काही विपरीत परिणाम तर झाला नाही ना ? अपेक्षा तर हीच आहे कि, आपण व आपले कुटुंबीय खुशाल असाल. असो. तर औपचारिकता पूर्ण करत अनौपचारिक पण महत्त्वाच्या विषयास आरंभ करतो.

    काल - परवा महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींनी एकमताने ( याला काहींचा सन्माननीय अपवाद करता ) वेतनवाढीचा प्रस्ताव विधानसभेत सादर करत त्यास मंजुरीही मिळवून घेतली. ते लक्षात घेऊन तसेच सातवा वेतन आयोग अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर संसदेतील नियुक्त लोकप्रतिनिधीही आपल्या वेतनवाढीकरता  आग्रही असल्याचे समजते. या स्थळी त्यांची मागणी योग्य वा अयोग्य या वादात मला शिरायचं नाही. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे कि, हे लोकनियुक्त प्रतिनिधी नेमके कुणाला जबाबदार आहेत ? वेतनवाढीची मागणी ते कोणाकडे करत आहेत व अंतिम पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यांचे सरकारातील नेमकं स्थान काय ?

    माझे प्रश्न योग्य आहेत वा नेमके आहेत याची मला जाणीव नाही परंतु ते दुर्लक्षणीय मात्र नक्कीच नाहीत. आम्ही निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी जर आमचेच नोकर आहेत --- जसा आमचा आजवरचा करून दिलेला समज आहे --- तर मग त्यांनी हि मागणी आमच्याकडे करायला हवी. ज्याप्रमाणे आपण सरकारात जाऊन वा विधान तसेच संसदेत जाऊन जनतेचं प्रतिनिधित्व करण्यास लायक / नालायक असल्याची परीक्षा जसे हे खुल्या मतदानाद्वारे देतात त्याचप्रमाणे वेतनवाढीकरता त्यांनी जनमतचाचणीचा कौल का घेऊ नये ?

    राष्ट्रपती महोदय, किती विरोधाभासी न् विनोदपूर्ण पण तितकंच वेदनादायी चित्र आहे पहा. लौकिकात लोकप्रतिनिधी आमचे नोकर. त्यांना निवडून आम्हीच देणार. आम्हीच निवडलेल्या एका व्यक्तीला --- जो त्यांच्यातीलच एक असतो --- सभापती बनवून त्याच्यापुढे पगारवाढीचा प्रस्ताव ठवला जातो. ती व्यक्ती ठरावाला मतदानासाठी सभागृहात ठेवते व मागणी करणारेच त्यांस अनुमोदन देत पास करून घेतात. इथे मालकाच्या मर्जी - नामर्जीचा अजिबात विचार केला जात नाही. हे म्हणजे कंपनीच्या मालकाला / संचालकाला न विचारता अधिकारी / कामगार वर्गाने आपसांत पगारवाढीचा निर्णय घेऊन तो परस्पर मंजूरही करायचा. निदान कंपनीत मालक / संचालकाची सही वा तोंडदेखल परवानगी तरी लागत असेल. इथे त्याचीही आवश्यकता नाही. हि लोकशाही आहे का ? असल्यास जनतेची वा जनतेकरता आहे का ? हा प्रश्न स्वाभाविकच पडून राहतो.

    काही वरिष्ठ नेत्यांच्या मते, सध्याच्या महागाई युगात खासदार - आमदारांचे वेतन अपुरे आहे. असेलही. पण मग त्यांनी आपण व्यावसायिक राजकारणी असल्याचे मान्य करत कोणत्याही व्यवसायाला ज्या गोष्टी अनिवार्य आहेत त्यांची पूर्तता करण्यास काय हरकत आहे ?

    लोकसेवेचे, जनसेवेचे ढोंग करण्याची गरज काय आहे ? तुम्हांला पगार हवा, भत्ता हवा, सोयी - सुविधा - सवलती हव्या आहेत, पाच वर्षांची टर्म भरताच निवृत्ती वेतन हवंय तर मग तुम्ही कसले लोक / जनसेवक ? हि तर व्यावसायिक क्षेत्रातील व्यवस्था झाली. या दृष्टीने तुम्ही व्यावसायिक ठरता. मग व्यावसायिकतेला जसे करांचे ग्रहण असते तसे तुम्हांला का नसावे ? व्यावसायिकतेला जसे दर्जा तसेच कार्यक्षमतेचे बंधन असते तसे तुम्हांला का नसावे ?

    सन्माननीय महोदय, प्रश्न माझे अगदी रास्त आहेत. आम्हांला इतरांच्या मिळकतीने वेदना होतात किंवा दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, असेही तुम्ही म्हणाल. आणि मी हे नाकारत नाही. नाही आम्हांला बघवत दुसऱ्याचं सुख, ऐश्वर्य. विशेषतः त्यांचं --- जे आमचे नोकर म्हणत आमच्या नाकावर टिच्चून ऐश करतात. हॉटेलिंग, सिनेमा तत्सम चैनीच्या वस्तू तसेच प्रवास, दूरध्वनी, औषधं, अन्नधान्य, कपडे, घरं वगैरे गरजेच्या वस्तू ज्या किंमतीत आमच्या तथाकथित नोकरांना व आम्हांला मिळतात, त्यात तफावत का ?

    आज आमच्या महाराष्ट्रातला वारकरी पायपीट करत पंढरपूर गाठतो पण त्याला रांगेतील क्रमांकानुसार देवाचं दर्शन मिळतं. त्याउलट आमचा तथाकथित नोकर --- मग भलेही तो मुख्यमंत्री का असेना --- आपल्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून वायुवेगाने तिथे जाऊन सर्वप्रथम दर्शन, अग्रपूजा वगैरेचा मान मिळवतो याला काय म्हणायचं ? हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. कारण, या राज्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठ्ठलाच्या अग्रपूजेचा घाणेरडा, अनिष्ट प्रकार प्रचलित आहे.

    धर्मनिरपेक्ष वा तत्सम बिरुदावली मिरवणाऱ्या या देशात अशाही गोष्टी चालाव्यात --- त्याही सरकारपुरस्कृत हे खरोखर लांछनास्पद आहे. त्या हिशोबाने जर उद्या एखाद्या अहिंदू धर्मीय मुख्यमंत्र्याने त्याच्या धर्माच्या देवतेच्या पूजेच्या कार्यक्रमास जर असे महत्त्व प्राप्त करून दिले तर चालेल का ? हा प्रश्न वरवर गैरलागू असला तरी रास्त आहे. कारण, आमच्या कथित नोकरांनी प्रामुख्याने याच मुद्द्याचे राजकारण करत सत्तेचे खेळ चालवले आहेत.

    राष्ट्रपती महोदय, देशाची स्थिती फारशी चिंताजनक नसली तरी तितकीशी चांगलीही नाही. वाढते गुन्हे, उपासमार, दुष्काळ, बेकारी, रोगराई वगैरे गोष्टींचा त्रास पूर्वीही होत होता व आजही होत आहे. फरक इतकाच कि, पूर्वी संपर्कसाधनांचा कमालीचा तुटवडा असल्याने व लोकशाहीचा चौथा स्तंभ बाल्यावस्थेत असल्याने या गोष्टी तितक्याश्या उजेडात येत नव्हत्या. आज त्या येत आहेत इतकेच. पण ज्या गोष्टी उजेडात, चर्चेत येतात त्यांचे प्रमाण खरोखरच तितके आहे का ?

    राष्ट्रपती महोदय, भ्रष्टाचार पूर्वीही होत होते व आजही होतात. विशेषतः राजकीय वर्तुळात तर याचं प्रमाण विलाक्ष्ण आहे. या आरोपावरून कित्येकांची कारकीर्द संपुष्टात आली तर कित्येक चौकशीसाठी तुरुंगात - बाहेर आहेत. परंतु या सर्वांकडून आजवर किती मालमत्तेची, संपत्तीची जप्ती / रिकव्हरी करण्यात आली ? कि यातही लंपडाव केला आहे ? आरोप करणाऱ्या व ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी परस्पर संगनमत करून तर हे खेळ केले नाहीत ना ? कारण भ्रष्टाचारी नेत्यांचे चौकशीचे फार्स होऊन, मालमत्तेच्या जप्तीची नाटके होतात. परंतु त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता, संपत्तीचे काय होते, याचा थांगपत्ता लागत नाही. हजारो, लाखोंचे ( आता तर कोटीच्या कोटी उड्डाणे ) घोटाळे करणारे नेते अज तुरुंगात तसेच चौकशीकरता कायद्याच्या रक्षकांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मालमत्ताही जप्त होताहेत. परंतु त्यांच्या जप्त संपत्तीमुळे देशाच्या आर्थिक चित्रात वा महागाईत काही फरक पडल्याचे मात्र जाणवत नाही. नियमबाह्य पद्धतीने सामान्य लोकांचा गोळा केलेला पैसा जप्त होऊन परत लोकांकडे जायला हवा. परंतु तसे घडताना दिसत नाही. असं का ? अर्थसंकल्पावर याचा परिणाम का दिसून येत नाही ? अर्थसंकल्प मांडताना कागदावर आकड्यांचा काहीतरी आकर्षक खेळ केला जातो पण प्रत्यक्षात तर ती नजरबंदीच असते असे खेदाने नमूद करावे लागते.

    भ्रष्टाचाराखेरीज इतर गुन्हेगारी बाबतही याहून वेगळं चित्र नाही. सर्वात प्रथम इथं गुन्ह्यांची दखलच घेतली जात नाही. घेतली गेली तर त्यावर ' अर्थ ' हा घटक परिणाम करतो. पोलीस प्रशासन ते संबंधित न्यायव्यवस्था कोणीही यापासून अलिप्त नाही. जिथे ' अर्थ संबंध ' घटक परिणाम करत नाहीत अशा केसेसची संख्या अगदीच नगण्य असते.

    आरोगू क्षेत्राचीही तीच बोंब. शिक्षणातही काही फारसे वेगळे नाही व आमचं अन्नधान्य खातं ! तिथं तर सगळा आनंदीआनंद. देशात वर्षानुवर्षे अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होऊनही आपण आजही उपासमार रोखू शकलो नाही. भूकबळी पूर्वीही होते व आजही आहेत. फक्त त्यांच्या बातम्या होत नाहीत. कदाचित देशाची नसलेली लाज झाकण्याचा हा प्रयत्न असावा. याखेरीज यांस दुसरं काय म्हणता येईल ?

    राष्ट्रपती महोदय, आपण ' कल्याणकारी राज्याची ' संकल्पना स्वीकारलीय व राबवतोय. पण इथं कल्याण नेमकं कुणाचं होतं ? अन्नधान्य उत्पादक आज धडधडीतपणे आत्महत्येचे पर्याय अवलंबत आहेत. पुरेशा रोजगाराअभावी तरुण नैराश्यग्रस्त होत व्यसनाधीनता, गुन्हेगारीकडे वळताहेत. कुटुंबाला दोन वेळचा पोषक आहार, वस्त्र, निवारा देण्याची ऐपत वा क्षमता आज कितीजणांकडे बाकी आहे ?

    अन्न्सुरक्षा विधेयक आले न् गेले. त्या धर्तीवर अर्थसुरक्षा तसेच अशीही आणखी कित्येक विधेयकं येतील. आणि ती येणारचं. कारण, अर्थसुरक्षिततेची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल, तो काळ आता फार लांब राहिलेला नाही. परंतु या विधेयाकांमुळे खरोखर चित्र बदलणार आहे का ?

    महोदय, व्यवस्था भ्रष्ट आहे मान्य. आमचे काही बिनडोक संघीय पूर्वी या व्यवस्थेला ब्रिटीशस्थापित म्हणत ती राबवणाऱ्या काँग्रेस व तत्सम पक्षांना शिव्याशाप घालत होते व आज त्याच व्यवस्थेत शिरून ती राबवत आहेत. याची आठवण होते. परंतु प्रस्तुत स्थळी प्रश्न असा आहे कि, जर व्यवस्था / यंत्रणा सडकी आहे, जीर्ण आहे तर मग ती आजवर बदलली का नाही ?

    यंत्रणेत / व्यवस्थेत सुधारणा वेळोवेळी करण्याचे प्रयत्न झाले. नाही अशातला भाग नाही. काही यंत्रणेनेच निकामी केले तर काही आम्हीच नाकारले. इथे मी ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजालाही दोषी मानतो. कारण ऐतखाऊ, खुशालचंद धन्याला नोकर गुंडाळणार नाही तर दुसरं काय होणार ? हो आम्ही ऐतखाऊ आहोत. खुशालचंद, फुकटे आहोत. आमची हीच वृत्ती आमच्या नोकरांत --- तथाकथित सरकारातील प्रतिनिधींत आहे. का नसावी ? अखेर ते आमच्यातीलच एक आहेत. आम्ही स्वतःलाच आजवर ओळखू शकलो नाहीत हाच आमचा मोठा दुर्गुण आहे. दोष आहे. दगडाला शेंदूर फासत त्याला देव बनवण्याची आमची खोड जुनीच. आपुलकीचे चार खोटे शब्द सुनावणाऱ्याला आम्ही प्रेषित मानतो. नायक समजतो. ज्याला जगायचं साधन नाही अशा माणसाला मोठं करतो व तो आमच्याच डोक्यावर नाचत बसतो. केवळ राजकीयच नव्हे तर समाजातील, शासनातील प्रत्येक क्षेत्रात आम्ही असे दगडाचे देव बसवलेत ज्यांची आमच्या खेटराजवळ उभं राहण्याची लायकी नाही त्यांना आम्ही शेंदुर फासलाय.

    आम्हांला अधिकार कळतात, हक्कही समजतात. पण कर्तव्याची जाणीव नसते. तसं पाहिलं तर अधिकार, हक्क तरी कुठे उमगतात ?

    सरकारकडून आम्ही समानता, स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवतो पण आमच्या कुटुंबात आम्ही हि मुल्यं सर्व सदस्यांना मिळू देतो का ? बिलकुल नाही. विविध कारणांखाली आम्ही उदयेच्छु नवविचार प्रवर्तकांना केव्हाच ठार केलंय व करतोय. खरंतर आम्ही जिवंत आहोत असं म्हणणंही चुकीचं आहे. केवळ खातो - पितो व बोंबलतो म्हणून आम्ही जिवंत आहोत. वास्तविक आम्ही केव्हाच मेलोय. तसंही आम्ही जिवंत कधी होतो ?

    राष्ट्रपती महोदय, मी मध्ययुगीन भारताच्या राजकीय इतिहासाचा अभ्यासक आहे व खेदाने नमूद करतो कि मध्ययुगातही इथला समाज आजच्याइतकाच मृतवत होता. फरक इतकाच आहे कि, तेव्हा मुडदा ताजा होता. त्यामुळं थोडी धुगधुगी, चैतन्य --- जे मृत्यूनंतर काही काळ कलेवरात असतं --- बाकी होतं. आता मढ्याला घाण सुटलीय.
  
    आज भुरट्या चोरांकडे जनता मसीहा म्हणून पाहते. इथे दिवसागणिक नायक, हिरो बदलले जाताहेत, शोधले जाताहेत. हि निश्चित सडलेल्या प्रेताच्या फुटण्याची लक्षणं आहेत. यातून बाहेर पडणार ती दुर्गंधी, घाणच असणार आहे. जर प्रलयानंतर पुन्हा नवनिर्मिती होत असेल तर महोदय इथंही अशाच प्रलयाची चिन्हं दिसत आहेत. हा प्रलय रक्तरंजित होईल वा वैचारिक किंवा इतर कोणत्याही अथवा सर्वच मार्गांनी एकत्रित. पण होईल हे निश्चित. आज देशभरात उमटणारे लहान - मोठे पडसाद याचंच प्रतीक आहे.
लोकांचं व पर्यायाने देशाचं सुदैव इतकंच कि, या उद्रेकाला आवाज करण्याचं स्वातंत्र्य आहे. तसेच माध्यमही. इथे लोकशाही नाकारणारा पक्ष सत्तेत येऊनही त्याला झक मारत लोकशाही राबवावी लागते, हे जसं त्याचं अपयश आहे तसंच लोकशाहीचं यशही.

    परंतु हे फार काळ टिकेल असं वाटतं का ? खरंतर मलाही तोच प्रश्न पडलाय. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मीही आहे व असे अनेक असतील. याचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल पण ते चांगल्या मार्गाने, पद्धतीने मिळावे हीच अपेक्षा आहे. अर्थात या विधानात जोर नाही. कारण भवितव्यच अधांतरी आहे. असो. आपला फार वेळ घेतला. मुख्य विषयाचं विवेचन यातून झालं नाही झालं माहिती नाही. परंतु समाजातील एक घटक म्हणून जे मला योग्य वाटलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. असो. इथेच समाप्त करतो.