आकांत या मनाचा ….


    संध्याकाळची वेळ. घरात सामानाची बांधाबांध करण्याची एकच गडबड उडाली आहे. प्रवासाला सकाळी लवकर निघायचं ठरूनही ठरूनही सर्व काही आवराआवर करायला दुपारही पुरली नाही. प्रत्येकजण आपल्याच धांदलीत. अगदी तीन वर्षांपूर्वी प्रमाणेच. तेव्हाही अशीच लगीनघाई. पण तो काळ आणि आजचा दिवस …. उणेपुरे दोन - तीन उन्हाळे उलटून गेले.

    सर्व तयारी होताच घराला कुलूप लावून बाहेर पडलो. समोर तीच गाडी. सहज आजूबाजूला नजर फ़िरवली. संध्याकाळ होत आली असली तरी उन्हाच्या तडाख्याने प्रत्येकजण आपापल्याच घरात बसलेला. रस्ता आणि परिसर निर्मनुष्य नाही दाखवायला एखाद दुसरी व्यक्ती फिरत होती हाच तेवढा फरक म्हणायचा. फार वेळ न दडवता गाडीचा दरवाजा उघडून आत बसलो. बाकीचे गाडीत सामान भरत होते. सहज नजर शेजारच्या सीटवर गेली. पुन्हा तीच आठवण. त्या दिवशीही संध्याकाळी ती सीट रिकामीच होती पण काही क्षणांनी ती रिकामी राहिली नाही. ती तिथे येऊन बसली होती. हे असेच घडणार अशी अशी त्यावेळी कल्पना होती. आशा होती. पण आज ….

    गाडीत सामान भरल्यावर सर्वजण बसले. मघाशी रिकामा असलेल्या सीटवर मी विराजमान झालो नसताना थोडी अस्वस्था होती पण …. गाडी चालू झाल्याने क्षणात मनावरील विचारांचे अन आठवणींचे मळभ दूर झाले. हा पडदा हवाहवासा वाटणारा पण मनाला विलक्षण कुरतडणारा.

    काही वेळाने शहरातून बाहेर पडून कार मोकळ्या रस्त्याने धावू लागली. सोबत आठवणींचे चक्रही. असाच मावळतीकडे झुकलेला सुर्य. तसाच त्याचा तांबूस प्रकाश. सांजसमयाची लाली आणि त्या प्रकशात त्यावेळी उठून दिसणारा तो चेहरा …. !

    जणू काही कालच घडल्यासारखा तो प्रसंग आठवणीत होता असं म्हटलंही असतं पण प्रत्यक्षात माझ्यासमोर तो प्रसंग घडत होता. दोन घटना. अंतर दोन ते तीन वर्षांचे. वेळ तीच. वाहनही तेच. दोन्हींचा साक्षीदार म्हणा वा प्रत्यक्षदर्शी किंवा घटनेतील एक पात्र -- मीच. माणसाचं मन मोठ विचित्र असतं कि त्याची कल्पनाशक्ती अद्भुत असते वा त्याची स्मरणशक्ती खरोखरच इतकी तीव्र असते ?

    स्वतःच्याच विचारांत दंग असताना, अधून - मधून गाडीच्या काचेतून बाहेरची धावती झाडं व पळती वाहनं पाहताना मध्येच वर्तमानातही येत होतो. पण काही क्षणचं ! थोड्या वेळाने चहापानाकरता कार थांबवण्यात आली. परत तेच !

    तेच हॉटेल. तीच वेळ. तशीच गिर्हाईकांची वर्दळ. मन हळवं असतं कि त्याला भावनिक होणं प्रिय आवडतं माहिती नाही. महत्प्रयासानं आठवणींचा पडदा दूर केला खरा पण तो दूर व्हावा अशी माझीच ( कि मनाची ? ) इच्छा नसल्याने पुन्हा एकदा आठवणींचा सिनेमा मनाच्या पडद्यावर दृष्यमान झाला.

    गतायुष्यातील घटनांना बघत एकदाचा मुक्कामाच्या जागी येऊन पोहोचलो. त्या दिवशीही …. नव्हे त्या रात्रीही असाच आलो होतो. सोबत ती पण होती. जीवनाची, आयुष्याची जोडीदार - भागीदार म्हणून. पण आज …. ! मन उदास होतं कि खिन्न माहिती नाही. थोडा वेळ बाहेर रेंगाळल्यावर घरात आलो. दिवसचं मोठा विलक्षण गुजरल्याने जेवणाची तशी इच्छाच नव्हती पण कधी - कधी ( कि नेहमीच ? ) माणसाला मुखवटे घालून वावरावे लागते.

    जेवणा - खाण्याचे सोपस्कार उरकल्यावर सरळ बेडरूम मध्ये जाऊन पलंगावर स्वतःला झोकून दिलं. प्रवासानं शरीर थकलं असलं तरी मन मात्र दमलं नव्हतं. डोळ्यांवर झापड येत असली तरी त्या पाठोपाठ येणाऱ्या तिच्या आठवणी झोपेपासून परावृत्त करत होत्या. लग्नाचा सोहळा व त्यानंतरचे सुखासमाधानांत ( ? ) गेलेले काही क्षण …. हो क्षणचं ! कारण दिवस म्हणण्याइतपत तिनं कधी मनापासून प्रेम वा सहकार्य दाखवलंच नाही. लग्न झाल्या दिवसापासून कोणत्याही लहान - सहान कारणावरून अन कित्येकदा कारणाशिवायही कुरबुर करण्याची तिची सवय. तिचा स्वभाव, विचार, परिस्थिती समजावून घेण्यासाठी चाललेली माझी धडपड. कुठेतरी या धडपडीला मर्यादा पडून होणारी माझी चिडचीड व मग दोघांची भांडणे. जणू हा नित्याचा क्रम बनला. जसे काही लग्नाला आठ - पंधरा वर्षे उलटून गेली आहेत.

    या वादांची, कुरबुरींची अखेर जी व्हायची ती झालीच. दोन्ही बाजू परस्परांवर समजावून न घेतल्याचे दोषारोप करत राहिल्या खऱ्या पण, खरोखर चूक कोणाची होती ? माझी कि तिची ? कि परिस्थितीची ? विचार करून करून डोक्याचा पार भुगा होतो पण समाधानकारक उत्तर काही मिळत नाही.

    वेळी - अवेळी मन आक्रंदून उठतं आणि म्हणतं, " थोडं समजुतीनं घेतलं असतं तर …. "

    सूर्य उगवतो. मावळतो. चंद्र - तारका प्रकाशमय होतात अन रात्री उजळतात. दिवस बदलतात. ऋतुचक्र फिरत राहातं पण, मनातील वादळ घोंगावतच राहातं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा