गुरुवार, १९ मार्च, २०१५

प्रेम, विवाह आणि व्यभिचार !





    विषयाचं नावं पाहून कदाचित अनेकांना धक्का बसला नसेल. कारण, विषयांत वर्णिल्या तिन्ही संकल्पना आता भ्रष्टाचार, महागाई प्रमाणेच सर्वांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. 

    सर्वप्रथम आपण प्रेम या संकल्पनेचा विचार करू. मनुष्याच्या जन्मानंतरच्या काही अवधीनंतरच त्याची ‘ प्रेम ‘ या शब्दाशी तोंडओळख होण्यास सुरुवात होते. प्रथम हे कुटुंबातील व्यक्तींपुरते मर्यादित असते. त्यानंतर कुटुंबा बाहेरील व्यक्ती असा प्रवास सुरु होतो व पुढे चालूच राहतो. प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत दोन विजातीय व्यक्ती --- स्त्री – पुरुष नात्यातील प्रेम संबंधांचा आपण विचार करू. सामान्यतः लहान वयात ( १० – ११ ते १४ – १५ अंदाजे ) मुलाला वा मुलीला विजातीय, समवयस्क व्यक्तीविषयी काहीतरी वाटते. हे काहीतरी वाटणं नेमकं काय असावं ? या वयोगटातील या भावनांना त्याच वयातील घटक ‘ प्रेम ‘ म्हणतात तर प्रौढ व्यक्ती त्यांस ‘ आकर्षण ‘ म्हणतात. सत्य नेमकं काय ? स्वानुभवाची गोष्ट सांगायची म्हटलं तर एकाच वेळी, एकाच वयोगटातील दोन मुलींच्या विषयी माझ्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या. एकीबद्दल ‘ प्रेम ‘ वा आपलेपणाची भावना तर दुसरीविषयी निव्वळ आकर्षण ! पण हे उदाहरण व्यक्तीसापेक्ष मानायचे कि सर्वसाधारण प्रातिनिधिक स्वरूपाचे हा प्रश्न उरतोच.  

    प्रेमाची जेव्हा निव्वळ आकर्षण म्हणून संभावना केली जाते तेव्हा आणखी एका मुद्द्याचा येथे विचार अपेक्षित आहे व तो म्हणजे समवयस्क व्यक्तीविषयी वाटणारी भावना – आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबद्दलाही वाटणे. इथेही स्वानुभव हा निकष वापरला आहे. परंतु आधीच्या उदाहरणाप्रमाणे हे प्रातिनिधिक म्हणणे धारिष्ट्याचे होईल.

    व्यक्तीची वाढ होत जाते तसतशी त्याची भावनांविषयक जाणीव अधिक प्रगल्भ होत जाते. प्रेम, आकर्षण इ. संकल्पनांविषयी प्रत्येकाची एक स्वतंत्र व्याख्या असते. मत असतं. वयाची विशी गाठेपर्यंत वा पार केल्यावर त्याच्या विचारांत, ज्ञानात आधीच्या तुलनेने भर पडलेली असल्याने तुलनेने एक परिपक्वता आलेली असते. विजातीय व्यक्तीविषयी निसर्गतः वाटणारे आकर्षण तुलनेने अधिक वाढलेलं असते. त्याचप्रमाणे एखाद्या विषयी वाटणारी आत्मीयताही तितकीच उत्कट बनलेली असते. या टप्प्यावर कित्येकांचे प्रेमभंग होतात. कित्येकजण चोरटे ( समाज अमान्य असे ) सुख घेऊन आपली जिज्ञासा, आकर्षण व भावनांची तृप्ती करून घेतात. परंतु या दोन्ही प्रकारांत खऱ्या प्रेमाचा त्यांना लाभ होतोच असे नाही.

    पृथ्वीवर मनुष्य जीवनास आरंभ झाल्यावर समूह वा टोळी संस्कृती अस्तित्वात आली. त्यानंतर केव्हातरी विवाहसंस्थेचा उगम झाला पण मनुष्याचा ज्ञात इतिहास पाहता विवाहसंस्था हि अलीकडच्या काळात उदयास आलेली संकल्पना आहे असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. प्राणी मुख्यतः वंश सातत्य वा प्रजोत्पादनासाठी एकत्र येतात असं एक सरधोपटपणे विधान केलं जातं. या विधानाच्या पुष्टीकरता कसलाही पुरावा दिला जात नाही परंतु याच नियमास अनुसरून मनुष्यानेही वर्तावे पण काही एक ठराविक मर्यादांच्या – नियमांच्या चौकटीत, असा तर विवाहसंस्थेच्या निर्मितीमागील उद्देश नसावा ?

    मनुष्य टोळ्यांनी राहू लागल्यावर त्याचे इतर मानवी समूहांशी संघर्ष ज्या प्रमुख कारणांवरून झाले त्यांपैकी एक म्हणजे स्त्री ! ( अर्थात, आजवरचा इतिहास पुरुषी संस्कृतीचा असल्याने असेच लिहिण्याची व म्हणण्याची एक अलिखित परंतु अनुल्लंघनीय परंपरा आहे. ) स्त्री वरील मालकी हक्कासाठी दोन टोळ्या वा एकाच टोळीत संघर्ष होत असल्याची सर्वसाधारण समजूत आहे. व्यक्तीशः हे मत मला बिलकुल मान्य नाही. टोळीच्या मालमत्तेमध्ये स्त्रीचाही अंतर्भाव करणे हि एक सर्वसाधारण समजूत आहे. तिला ठोस पुराव्यांचा कसलाही आधार नाही. अर्थात, माझे हे विधान धाडसाचे असले तरी या ठिकाणी एकाच टोळीतील स्त्रियांना उद्देशून केलेलं आहे याची नोंद घ्यावी.

    निव्वळ वंश सातत्य वा प्रजोत्पादनासाठी प्राणी एकत्र येतात असे म्हणणे व तोच नियम टोळी जीवनातील स्त्री – पुरुषांना लावणे हा कोणता शहाणपणा आहे माहिती नाही परंतु, केवळ याच कृत्याकरता स्त्री – पुरुष परस्परांकडे बघत असावेत हे संभवत नाही. हेच विधान अधिक स्पष्ट करायचे वा वेगळ्या शब्दांत करायचे म्हटले तर, जी विजातीय व्यक्ती आपलीशी वाटेल वा तिच्याशी एकांत करण्याची इच्छा व्यक्तीच्या मनात येत असेल त्याचवेळी संबंध घडले जात होते. या संबंधांमुळे कदाचित व्यक्ती – व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण झाल्यामुळेच नातेसंबंध आणि त्यानंतर विवाहसंस्थांची हळूहळू निर्मिती करण्यात आली असावी. याचाच अर्थ असा कि, आकर्षण आणि प्रेम यांत फरक न करता आल्याने म्हणा अथवा त्यांस समाजाची – समूहाची कायदेशीर मान्यता देण्याकरताच विवाह नामक संस्थेची उभारणी करण्यात आली.

    विवाह संस्थेच्या निर्मितीनंतर तिचा पाया भरभक्कम करण्याकरता विविध नियमांची हेतुपूर्वक निर्मिती करण्यात येऊन हे नियम मोडणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देण्याची तरतूदही करण्यात आली. अर्थात, यांतील शिक्षेचा भाग जरी बाजूला केलं तरी विवाहसंस्था हि एक प्रकारे व्यक्तीला --- विशेषतः स्त्रियांना गुलाम बनवणारी – कुटुंबाची मालमत्ता बनवणारी संस्था बनली. टोळी जीवनात दोन टोळ्यांमध्ये स्त्रियांवरील मालकी हक्कावरून भांडणे – युद्ध झाल्याचे समजता येते. परंतु एकाच टोळीत तिला मालमत्ता म्हणून समजण्यात येत नसावे. परंतु, सामाजिक संस्थांच्या --- विवाहसंस्थेच्या निर्मितीनंतर स्त्रियांकडे कुटुंबाची मालमत्ता – अर्थात मर्यादित टोळीची मालमत्ता म्हणून पाहण्यात येऊ लागले हे उघड आहे. हि मालमत्ता हस्तांतरित न व्हावी याकरता अनेक कठोर बंधनांची निर्मिती करण्यात आली. त्याच्या परिणामांची चर्चा करण्याचे हे स्थळ नसल्याने तूर्तास हा मुद्दा येथेच संपवतो.

    विवाहसंस्थेची निर्मिती करून प्रेम, आकर्षण या संकल्पनांना तसेच वंशवृद्धी करता आवश्यक त्या कृत्यासाठी एका कायदेशीर संस्थेची – नियमाची – विधीची उभारणी करण्यात आली. परंतु, विवाहसंस्था हि प्रेम वा आकर्षणाचे अंतिम रूप आहे का ?

    समाजातील सद्यस्थिती पाहता व इतिहासाचा धांडोळा घेत असता एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे विवाहानंतरही पती वा पत्नीच्या मनात आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीविषयी एक भावना वा आकर्षण निर्माण होते. हि भावना – आकर्षण अनेकदा एकांतापर्यंत पोहोचत असले तरी सर्वच भावना – आकर्षणांची परिणती संबंधांत होत नाही. परंतु, ज्या व्यक्ती जेव्हा भावना वा आकर्षणापोटी असे संबंध करतात तेव्हा त्यांस व्यभिचार समजले जाते !

    व्यभिचार हि तशी अलीकडच्या – विवाहसंस्थेनंतरच्या काळातील संकल्पना. हि संकल्पना विविध भावनांवर आधारित आहे. त्यांपैकी मुख्य म्हणजे, आपल्या जोडीदाराने आपल्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीविषयी मनात प्रेम वा आकर्षणयुक्त भाव बाळगणे हि होय ! विवाहसंस्था ज्या काळात अस्तित्वात नव्हती तेव्हा एकाच टोळीत जेव्हा दोन व्यक्तींमध्ये स्त्री वा पुरुषावरून भांडणे उत्पन्न होत त्यामागील मुख्य कारण हे एक होते. याचाच अर्थ असा कि, ज्या अनेक समस्यांपैकी एक अशा समस्येवर उतारा म्हणून विवाहसंस्थेची निर्मिती करण्यात आली त्या समस्येचे आजतागायत निर्मुलन वा उच्चाटन झाले नाही ! विवाहित व्यक्तींच्या अशा कृत्याला जरी समाजाने अनैतिक, व्यभिचार इ. विशेषणांनी निषिद्ध वा बेकायदेशीर ठरवले असले, मानले असले तरी असे संबंध - विवाहबाह्य – हे प्रेम वा आकर्षणातून घडत असल्याचे अमान्य करणे मूर्खपणाचे ठरेल !