देववाणीची जन्मकथा





    कोणे एके काळी या भूतलावर मानवसदृश्य प्राण्यांची वस्ती होती. असे प्राणी जे वानरसदृश्य दिसत असले तरी वानर नव्हते. समस्त भूतलावर यांच्या टोळ्या पसरल्या असून जंगली श्वापदांप्रमाणे राहून ते आपला निर्वाह करीत होते. ते समयी अवकाशात संचार करीत असलेल्या अंतराळ प्रवाशांची नजर या भूतलावर पडली. नेहमी नाविन्याच्या शोधात व नव्या प्रदेशांत वस्ती करण्याच्या कार्यात उत्सुक असलेल्या अंतराळ प्रवाशांनी या लोकी आपले प्रस्थान ठेवले.

    आरंभी जेव्हा ते येथे अवतीर्ण झाले ते समयी मानवसदृश्य प्राणी भीतीने त्यांजवर चालून गेला. तेव्हा अंतराळ प्रवासी स्वसंरक्षणार्थ अवकाशात गुप्त झाले. परंतु पुढे कालांतराने उभयपक्षी भीड चेपल्याने ते परस्परांशी मित्रत्वाने राहू लागले. अवकाशातून वाटेल तेव्हा प्रकट होणाऱ्या व गुप्त होणाऱ्या अंतराळ प्रवाशांना मानवसदृश्य प्राण्यांनी अदृश्य ईश्वरी शक्तीचे दूत समजून त्यांना देवदुतांचा दर्जा दिला. आपल्याकडील जे सर्वोत्तम ते त्यांना नजर करण्याची प्रथा त्यांनी पाडली. अंतराळ प्रवासीही आपल्या मित्रांच्या आदरातिथ्याचा निःसंकोच व सस्नेह स्वीकार करू लागले. 

    पुढे अंतराळ प्रवाशांची येथेच कायम वस्ती करण्याची इच्छा होऊन व येथील मानवसदृश्य प्राण्यांशी संबंध जडून, भूतलावरील मानवी जीवनास खऱ्या अर्थाने आरंभ झाला. अंतराळ प्रवासी व येथील मानवसदृश्य प्राण्याच्या मिलनातून खरा मानव जन्मास आला. आपल्या वंशजाला देण्याकरता मानवसदृश्य प्राण्यांकडे काहीच वारसा नव्हता. मात्र अंतराळ प्रवाशांनी आपल्या भूलोकीतील वंशजांना आपले सर्व ज्ञान देऊ केले. आगदी शास्त्रशुद्ध भाषेसहीत !

    अंतराळ प्रवासी व मानवसदृश्य प्राण्याच्या संबंधातून जन्मलेला मानव, आपल्या भूलोकीच्या पूर्वजांप्रमाणेच अंतराळ प्रवाशांना देवदूत समजत असल्याने त्याने, त्यांच्या भाषेला ‘ देववाणी ‘ म्हणून संबोधले. या देववाणीच्या अध्ययनातून मानवाने पुढील जीवनात यशाची अधिकाधिक शिखरं गाठली. हिमालयाच्या उत्तुंगतेलाही लाजवेल असे शोध लावले. परंतु अंतराळ प्रवाशांकडून मिळालेल्या या दैवी देणगीत एक जन्मजात दोष होता. तो म्हणजे देववाणीचे जनक हे अंतराळ प्रवासी असल्याने त्यांतील प्रत्येक शब्दाचा, अक्षराचा मूळ अर्थ त्यांनाच माहिती होता. त्याउलट त्यांच्या भूलोकीच्या वंशजांना या भाषेचे फक्त शब्दज्ञानचं होते.

    परिणामी, शब्दज्ञानावर अधिकाधिक भर दिल्याने अर्थप्राप्ती दुर्लक्षित राहून कालांतराने देववाणीच्या प्रत्येक अक्षराच्या अर्थावरून अनर्थ घडून येऊ लागले. त्यामुळे अंतराळातून मिळालेला हा अमुल्य ज्ञानाचा वारसा उपलब्ध असूनही अनुपयुक्त ठरला व येथील मानव अज्ञानाच्या खोल गर्तेत लोटला .... तो आजतागायतपर्यंत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा