रविवार, २४ जानेवारी, २०१६





    आजची सकाळ काही निराळीच उगवली. खरंतर विशेष असं काही नाही पण २६ जानेवारीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी चालली होती. शहरी भागात, विभक्त कुटुंब पद्धतीत हे असलेच इव्हेंट सण - समारंभासारखे वाटतात. अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा लहान मुलांचा उत्साह अवर्णनीय तर असतोच. पण त्याहून विशेष त्यांच्या आयांचा !

    प्रत्येकीला आपल्या चालू वयापेक्षा कमी अन् आकर्षक दिसण्याची जाम हौस. याकरता करण्यात आलेली वर्षभराची फिटनेसची यातायात, ब्युटी पार्लर व टिप्सचा वापर, यांचा दृश्य व एकत्रित परिणाम याच दिवशी सर्वांच्या नजरेस आणायचा असतो. ' ती ' देखील यास अपवाद नव्हती.

    खांद्याबरोबर कापलेले केस, निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तिचा गोरा वर्ण खुलून दिसत होता असं म्हणता येत नाही. पण चारचौघीत ती नक्कीच त्याचं लक्ष वेधून घेत होती. दोन मुलांची आई असूनही कपड्यांवरून तरी पोट सुटलेलं वाटत नव्हतं. 
    
    मैत्रिणींच्या घोळक्यात बसली असली तरी तिचीही नजर भिरभिरत होती. अधूनमधून इकडे - तिकडे बागडणाऱ्या मुलाच्या नावाने हाक मारून ती त्याचं लक्ष वेधून घेत होती. तो पण लांबून तिच्याकडे चोरून कटाक्ष टाकत होता. नेहमीपेक्षा आज त्याला ती वेगळीच भासत होती. खरंतर रोज ती त्याला नवीच वाटायची. जणू काही तिला तो प्रथमच पहात होता.

    वाऱ्याच्या झुळकीने तिच्या गालांवर रुळणाऱ्या केसांकडे पाहून त्याला हेवा वाटत होता. बोलताना मध्येच केस नीट करण्याच्या बहाण्याने तिने हात वर केल्यावर होणारी हालचाल मन वेधून घेत होती. मध्येच बोलताना होणारा ओठांचा चंबू ....

    बराच काळ दोघांचाही खेळ रंगला. त्याची वाढती अधीरता एव्हाना तिच्या ध्यानी आली होती. तिचीही काही वेगळी स्थिती नसल्याने काहीतरी बहाण्याने मैत्रिणींच्या गराड्यातून ती बाहेर पडली व बिल्डींगच्या प्रवेशद्वारातून आत शिरली. हा इशारा समजून तोही चार दोन मिनिटांनी मागून गेला. प्रवेशद्वारापर्यंत उगाचच रेंगाळत चालणारी पावलं आत शिरताच झपाझप उचलली जाऊ लागली. एरवी चार मजले चढून जाताना त्याच्या जीवावर यायचं पण आज अधीरता इतकी कि, जवळपास पळतच चार मजले तो चढून गेला.

    अपेक्षेप्रमाणे रूमचा दरवाजा उघडाच होता. पटकन आत शिरत त्याने दार बंद केले. काहीशा घिसाडघाईने पायातल्या चपला काढत तो बेडरूममध्ये गेला.

    आत ती बेडवर बसलेलीच होती. त्याची वाट बघत. तो आत येताच तिनं नजरेनंच आव्हान दिलं व तो श्वापदाप्रमाणे तुटून पडला ......

 
    .... तासा - दोन तासांनी दोघांचीही तात्पुरती शांती झाली. परस्परांच्या शरीराची उब दोघांनाही सोडवत नव्हती पण घड्याळाचे काटेही फिरायचे थांबत नव्हते. प्रथम ती उठली. तिच्यापाठोपाठ त्यालाही उठायचं होतं पण अंग जडवलेलं. त्यामुळे तो पडून राहिला. काही वेळानं ती पुन्हा बेडरूममध्ये आली. त्याच्याजवळ प्लेट देऊन म्हणाली, " अहो, एवढा लसून सोलून देता का ! मुलं येतील आता. डाळ - भात लावते ! "