शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

पोर्न बंदी व राधे माँ निमित्ताने !





    काही दिवसांपूर्वी सरकारने निवडक पोर्नसाईट्सवर बंदी घातल्याने तसेच आध्यात्मिक गुरु राधे माँ काही विवादांत अडकल्याने या दोन्ही गोष्टी चर्चेच्या झोतात आल्या. नेहमीप्रमाणे समर्थक – विरोधक व तटस्थांनी या विषयी आपापली मतं नोंदवली. कालांतराने सरकारने पोर्न साईट्सवरील बंदी मागे घेतली तर राधे माँ चा विसर पडेल अशी प्रकरणे पुढे आल्याने या दोन्ही घटनांवरील चर्चा बंद झाली. परंतु यानिमित्ताने पोर्नोग्राफी व आध्यात्मिक बाजार यांची गरज आहे वा नाही याविषयीची चर्चा मात्र फारशी झाली नाही. प्रस्तुत लेखांत यथाशक्ती या प्रकरणी चर्चा करण्याचे योजले आहे.


    जगात प्राणीजीवनास आरंभ झाल्यापासून त्यांच्या सेक्स लाईफला आरंभ झाला आहे, हे तर सर्वमान्य आहे. त्याचप्रमणे मनुष्य हा देखील इतरांप्रमाणेच एक प्राणी असल्याने त्याच्याही जीवनात सेक्स / लैंगिक संबंधांना तितकेच महत्त्व आहे. काळाबरोबर प्रगती करत माणसं लिहायला – वाचायला तसेच आपल्या भावना व्यक्त करण्यास शिकली. अर्थात इतर प्राणीही शिकले असतील पण त्यांची भाषाच आपणास अवगत नसल्याने याविषयी आपण काय बोलणार ?


    सेक्स वा लैंगिक संबंधांचे मुख्य प्रयोजन प्रजनन जरी असले तरी कालानुरूप इतर गरजांप्रमाणेच माणसाने यातही कलात्मकता आणली. उदाहरणार्थ, अन्न हि माणसाची प्राथमिक गरज असली व प्रथम मनुष्य मिळेल ते खात असला तरी कालांतराने त्यांस हवं तसं आणि एकच पदार्थ विविध प्रकारांनी बनवून तो खाऊ लागला. अर्थात, यामुळे मुख्य प्रयोजन जरी दुर्लक्षित झाले नाही तरी त्यात त्यात वैविध्य व कलात्मकता येऊन त्याचे खाद्यजीवन समृद्ध झाले.

संभोग वा सेक्सचेही जवळपास तेच झालं. प्रथम प्रजननाकरता जवळ येणारी दोन शरीरं नंतर प्रेम वगैरे भावनांनी जवळ येऊ लागली. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या क्रियेत त्यांनी नवनवीन रचनांचा अंतर्भाव करत त्यांतील मुळच्या आकर्षणास व्यक्त होण्याचे कित्येक मार्ग दाखवून दिले.


    हि कला सर्वांना प्राप्त व्हावी या हेतून मग शिल्पं वगैरे बनवण्यात आली. क्रियावर्णनाचे चित्र – ग्रंथलेखन करण्यात आले. परंतु या सोबत या संबंधांकडे मनोरंजन म्हणून बघण्याचा दृष्टीकोनही विकसित होत गेला. प्राचीन / मध्ययुगीन सत्ताधीश वा धनसंपन्न व्यक्ती आपल्या दृष्टीसुखाकरता सेवक – सेविकांचे असे संबंध खासगीत आपल्या नजरेसमोर घडवून आणत. कित्येकदा या मनोरंजनात त्या त्या मालक व्यक्तीच्या विवाहित स्त्रियाही प्रेक्षक म्हणून सहभाग घेत. एकप्रकारे सेक्स एज्युकेशन तसेच संभोगासाठी उत्तेजित होण्याकरता असे कार्यक्रम घडवून आणले जात असं मानल्यास वावगं ठरू नये.


    बऱ्याच प्रमाणात मुक्त असलेलं भारतीय कामजीवन उपेक्षा /अंधाराकडे नेमकं कधी झुकलं असावं याची स्पष्टता होत नसली तरी ब्रिटीश अमदानीतील बराचसा काळ व त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची काही वर्षे --- एवढ्या अवधीत आम्हां भारतीयांचे ‘ काम ‘ विषयक मन नको तितकं कलुषित होऊन त्याविषयी नैसर्गिक असे पण एकप्रकारचे विकृत आकर्षण मात्र शिल्लक राहिले.


    पूर्वी कोणत्या गोष्टीस अग्रक्रम द्यावा याचा निर्णय घेण्यास व्यक्ती समर्थ होती. परंतु मधल्या काळात धर्म, रीती, परंपरांचे जीवनावर इतके प्राबल्य निर्माण झाले कि, त्यामुळे नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार वाढत जाणे, कार्य करत राहणे व जगाचा निरोप घेणे इतकेच आमच्या हाती राहिले. यापासून आमचे खासगी असे कामजीवनही अलिप्त न राहिल्याने पूर्वीच्या परंपरांचा साफ विसर पडून जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात परकियांच्या कृपेने ब्ल्यू फिल्म वा पोर्नमुव्ही आमच्या पाहण्यात आल्या तेव्हा तथाकथित सुसंस्कारी मनाला, वृत्तीला हादरे बसू लागले.


    यामुळे पोर्न मुव्हीज विषयी एकप्रकारची नकारात्मक परंतु आकर्षण उत्पन्न करणारी भावना जन्मास येऊन आमच्या कामकल्पना अधिकाधिक विकृत मात्र बनत गेल्या. अर्थात, यासोबत स्त्री – पुरुषांविषयीची असमतोल भावना तसेच इतर अनेक गोष्टीही कारणीभूत आहेत याची नोंद करणे अयोग्य होणार नाही.

परदेशी पोर्न मुव्हीज तसेच देशी फिल्म मधला आरंभापासून ते आजपर्यंतचा एकमेव ठळक दोष म्हणजे त्यातील जवळपास सर्वच संभोग अनैसर्गिक, कृत्रिम असतात ! स्खलनाशिवाय सेक्स पूर्ण होत नाही व स्खलन हे योग्य ठिकाणीच झाले पाहिजे, असे असताना पोर्न मुव्हीजमध्ये स्खलनक्रिया वेगळ्याच प्रकारे चित्रित केली जाते. अर्थात, यामागील कारणपरंपरा स्पष्ट व उघड असल्याने याविषयी अधिक लिहिणे योग्य होणार नाही. परंतु हा दोष ( जो क्षम्य आहे ) वजा केल्यास पोर्नमुव्ही पाहणे, बनवणे वा त्यांत सहभाग घेणे यामध्ये मला तरी काही गैर वाटत नाही. कारण, या गोष्टींची जशी समाजाला गरज आहे त्याचप्रमाणे समाजातील कित्येकांना उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाची गरज असून हे एक त्याचे साधन बनले आहे.


    परदेशांत पोर्न इंडस्ट्री बऱ्यापैकी स्थिरावली असून त्यांतील कलाकारांना हॉलीवूड तारे – तारकांप्रमाणेच ग्लॅमर लाभले आहे. इतकेच नव्हे तर आजमितीला जगविख्यात असलेल्या कित्येक हॉलीवूड कलाकारांनी उमेदवारीच्या काळात पोर्न मुव्हीज मध्ये काम केले आहे. त्यामानाने आपल्याकडे केरणजित कौर व्होरा उर्फ सनी लियोन हे बहुधा एकमेव उदाहरण आहे. केरणजित उर्फ सनी सध्या बॉलीवूडची अभिनेत्री असली तरी तिने कित्येक पोर्न मुव्ही मध्ये काम केलं आहे. पोर्न इंडस्ट्रीतील कलाकारांप्रमाणेच तिचंही वैवाहिक आयुष्य असून त्या आयुष्याला तिची पडद्यावरची इमेज बाधक ठरत नाही व ठरूही नये.


    सोशल मिडीयावर कित्येकदा सनीच्या फोटोंवर शेरेबाजी केलेली आढळून येते. अर्थात, यातली बव्हंशी हि मनोविकृतचं असते किंवा पराकोटीच्या लैंगिक आकर्षणातून निर्माण झालेली. या ठिकाणी मला आपल्या मनोवृत्तीचे मोठे अजब वाटते. कसलाही हेतू मनी न बाळगता केवळ लैंगिक आकर्षणापोटी गुप्तपणे स्वैर संबंध ठेवणारे आपण व विशिष्ट हेतूंनी प्रेरित होम काम करणारे सनी लियोनसारखे पोर्न कलाकार यांतील नेमकं कोण चांगलं अन् कोण वाईट हे ठरवायचा प्रश्न येतो तेव्हा पोर्न कलाकारांना वाईट ठरवत आपण स्वतःला क्लीन चीट देतो. यासारखी ढोंगी, भिकार, निर्लज्ज वर्तणूक दुसरी कोणती असेल ?

    
    जगात प्राणी जीवनास आरंभ झाल्यापासून त्यांच्या श्रद्धा जीवनास देखील आरंभ झाला. दुर्दैवाने आपल्याला सजातीय --- अर्थात माणसांचीच भाषा येत असल्याने आपण फक्त माणसांच्याच श्रद्धेचा येथे विचार करू शकतो. भटका माणूस जसजसा स्थिर होत गेला तसतसा त्याच्या श्रद्धाही विकसित होत गेल्या. विस्तृत बनत गेल्या.  गूढ, अनाकलनीय घटना – शक्तींविषयीचे मानवी आकर्षण आजही कायम आहे. काहींची विज्ञानाच्या आधारे त्याने माहिती करून घेतली असली तरी अजून अज्ञात अशा बऱ्याच गोष्टी असल्याने व त्या स्पष्ट करण्यास प्रचलित विज्ञान कमी पडत असल्याने व्यक्ती आध्यात्माकडे वळते हा माझा स्वानुभव आहे. आध्यात्म हि माणसाची इतर गरजांसारखी गरज असल्याने हि गरज भागवणारा एक वर्ग उदयास येणे आवश्यक असून तसा तो उदयासही आला आहे. इतर व्यवसायांप्रमाणेच आध्यात्म हा देखील एक व्यवसाय बनल्याने व त्यांस धर्माचे अधिष्ठान लाभल्याने यांतील स्पर्धा इतर व्यवसायांप्रमाणेच जीवघेणी व तीव्र बनली. प्रत्येक आध्यात्म गुरुला आपापले महत्त्व टिकवण्यासाठी – वाढवण्यासाठी इतरांपेक्षा काही वेगळे, चमत्कारी असे वर्तन करण्याची आवश्यकता वाटते. यातूनच मग कृपाप्रसाद म्हणून सोन्याच्या वस्तू देणे वगैरेंची नाटकं केली जातात. यासोबत आधात्म, प्रवचन, दीक्षेकरता येणाऱ्या लोकांना आपलं अत्याधिक आकर्षण वाटावं यासाठीही कित्येक लीला घडवून आणल्या जातात. राधे माँ उर्फ सुखविंदर कौरही अशा लीलानाट्यापासून अलिप्त नाही. बव्हंशी आध्यात्मिक गुरूंप्रमाणेच सुखविंदर देखील विवाहित असून तिचे वैवाहिक आयुष्य बऱ्यापैकी चाललं आहे. त्याखेरीज तिच्या मनाची समजूत, इतरांची श्रद्धा व व्यवसायाचा भाग यांमुळे तिला ‘ राधे माँ ‘ चा ग्लॅमरस अवतार बनवावा लागला.


    स्त्री भक्तांना आकृष्ट करण्यासाठी पुरुष गुरु कित्येक हातखंडे वापरतात. तोच पर्याय सुखविंदरने ‘ राधे माँ ‘ बनताना अवलंबला. त्यातून मग आलिंगन वा उचलून घेणे अथवा मॉडर्न लूकचे कपडे वापरून स्वतःकडे आकृष्ट, लक्ष वेधून घेणे इ. प्रकार निर्माण झाले. यांमुळे आध्यात्मिक बाजारपेठेत तिचा जम बसला असेल, आर्थिकदृष्ट्या तिला फायदाही झाला असेल पण त्यापासून समाजाला काही मिळाले का ? याचे उत्तर स्पष्टपणे नकारार्थी वा होकारार्थी देणे शक्य नाही. कारण, अशा गुरूंची आपल्या समाजालाच मुळातून गरज असल्याने याविषयी अधिक काय बोलणार ?


    अलीकडे सोशल मिडीयावर राधे माँच्या फोटोंवर टवाळखोर शेरेबाजी --- जी अनेकदा पातळी ओलांडून जाते अशी --- सुरु असते. त्यामागील मनोवृत्ती नेमकी काय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळात स्त्री – पुरुषांत असलेल्या नैसर्गिक आकर्षणास बाह्य नीती – बंधनांनी अधिकाधिक जखडत जाऊन त्यांस पुरते त्याज्य न ठरवता काहीसे अपरिहार्य परंतु तिरस्करणीय असे स्वरूप देण्यात आपण यशस्वी झालोय. परिणामी, आपली नैसर्गिक वृत्ती अशा वेळी उफाळून येते. या संबंधीचे कित्येक प्रसंग ‘ राधे माँ ‘ प्रमाणे आध्यात्म बाजार मांडून बसलेल्या दरबारांत मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत.
 
    सारांश, राधे माँ जी काही लीलानाट्य करत असेल ते इतरांच्या नसले तरी एका विशिष्ट समाजाच्या गरजेकरता आहे व तिचा चरितार्थ जर त्या वर्गामार्फत चालत असेल तर त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरजच काय ? जोवर राधे माँ अथवा इतर आध्यात्मिक गुरु व्यापक सामाजिक हितास, सार्वजनिक सुरक्षेस बाधा येईल असे कृत्य करत नाहीत तोवर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. या विरोधात त्यांनी कार्य केल्यास शासनयंत्रणा, कायदा व जनता त्यांना शासन करण्यास समर्थ आहेत. पण त्याजोडीला अशा गोष्टी निर्माण कशा व का होतात आणि त्यांची व्याप्ती इतकी का पसरते याचाही अधिक तपशिलवार व शांतपणे विचार करणे गरजेचे आहे.