रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

व्हॅलेंटाईन डे आणि संस्कृतीरक्षण


    काल म्हणे रोझ डे होता. नेहमीप्रमाणे यावर्षीही आम्ही समवयस्क तरुणींकडून गुलाबपुष्पाची अपेक्षा बाळगत प्रतीक्षा केली पण एकीच्याही हृदयाला पाझर न फुटल्याने मन वाज्राहुनी कठीण करत आम्ही संस्कृती रक्षणाची ध्वजा खांद्यावर घेण्याचे योजले आहे. त्यांस स्मरून संस्कृती रक्षणाच्या मार्गदर्शनपर सभेत मांडावयाच्या चार तुच्छ विचारांचा प्रस्तावित आराखडा आम्ही इथे समविचारी मंडळींच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करीत आहोत.

    आज आठ फेब्रुवारी २०१६. मित्रहो रात्र वैऱ्याची, धोक्याची आणखी कशाकशाची आहे. कारण हा लेख मी रात्री लिहितोय. तर अवघ्या चार दिवसांवर ' व्हॅलेंटाईन डे ' नावाच्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या पापमय राक्षसाचे आपल्या थोर, उदात्त संस्कृतीवर आक्रमण होणार आहे. हे आक्रमण परतवून लावण्यासाठी तुम्ही आपापल्या व दुसऱ्यांच्या घरांतील बायका - पोरींवर नजर ठेवा. प्रसंगी बुरख्यातील तरुणी हिंदू वा मुसलमान याची तपासणी करा. तुमची श्रीमुखं रंगली चालतील पण एखादी तरुणी व्हॅलेंटाईनला लाल ( लाजेनं हां ) झाली नाही पाहिजे. अरे समजतात काय हे स्वतःला ?

     इथं प्रभू रामचंद्रानं धनुष्याला बाण का दोरी लावून सीतेला जिंकलं. हि पोरं धनुष्य - बाणाऐवजी गुलाबाची फुलं घेऊन फिरतात. तिही दुकानातून विकत घेतलेली ! अरे रामाचा आदर्श ठेवून, ज्या मुलीवर प्रेम करता तिच्याच घरातल्या कुंडीतल्या झाडाचं फुल तोडून प्रपोज मारा कि ! तिचा बाप चिडला तर त्याला जनकाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला आम्ही सांगूच की.

     आणि प्रेम तरी काय असतं ? उगा आपलं शारीरिक आकर्षण. आम्ही व आमच्या थोर, प्राचीन, महान पूर्वजांनीही लग्नं केली, संसार केले, एक तिथं दहा बायका करून यज्ञाद्वारे पोरं जन्माला घातली. पण प्रेमासारखा घाणेरडा, ओंगाळवाणा प्रकार कधी केला नाही. आम्हीही केला नसता. पण हल्ली यज्ञाने पोरं होणं बंद झाल्याने हे अनिष्ट, घृणास्पद कृत्य आम्हांला करावं लागतं तरीही ...... केल्या केल्या लगेच आम्ही दूर होत पवित्र अन् शुद्धही होतो.

    आणि हि कालची पोरं उत्तान सिनिमे पाहून प्रेमं बिमं करताहेत ! अरे, प्रेम करावं तर या देशावर, मातीवर, संस्कृतीवर, धर्मावर !! पण हे सारं भव्य, उदात्त, समृद्ध वैभव सोडून यांच्या नजरा पोरींवर !!! अरे तुम्हीच नजरा अशा स्वैर सोडू लागला तर आम्ही तरी कुणाकडं आशेनं बघायचं ?

    आमचा तो कृष्ण. अहाहा ! काय त्याची ती निष्काम रासलीला !! वर्णनास शब्द अपुरे पडतात. सोळा सहस्त्र स्त्रियांशी त्याने विवाह केले पण तितकीच वा त्याहून दुप्पट संतती त्यानं जन्मास घातली नाही. अरे कशी घालणार ? त्याचा कामही निष्काम होता. निर्विकार, निर्लेप मनाचा. त्याचा स्त्रियांशी समागमही तसाच होता. आध्यात्मिक पातळीवरचा. अन् तुम्ही ? आज पोरगी पटली कि लगेच खांद्यावर हात. उद्या कमरेवर अन् परवा तोंड गोड करून आणखी काही झालंच पाहिजे. शिव शिव शिव ! 
    
    अरेरे, कुठून हे अमंगळ विचार मनात आले. आता गोठ्यात बांधलेल्या वृषभ - गोमातेचे दोन वेळेस मुत्र पिऊन रहावे लागेल. आजचा दिवस दुधाला बंदी ! आता वृष्गोमुत्र प्यायचंच आहे तर पुढचंही बोलतोच. नाहीतरी एका खुनाची शिक्षा फाशी व दोन खुनांची पण फाशीच !

     तर तीन - चार दिवसंत सकाम प्रेम भोगून झाल्यावर चौथ्या दिवशी दुसरी पोरगी पटवायला लगेच तयार ? अरे इतका उतावीळ तर आमचा इंद्रही नव्हता. तुम्हांला सांगतो, या इंद्रानं अबलांवर एकांतात फक्त अनुग्रह केले . पण या नास्तिकांनी त्या निष्काम कर्मयोग्याच्या अनुग्रहांना वासनेचं पुराण मानले. तसेच लोकांसमोर मांडले. हे सर्व आता कुठेतरी थांबलं पाहिजे. बंद झालं पाहिजे.

    प्रत्येक पुरुषाने आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्राचीन वेशभूषेत आलं पाहिजे. मुलींनीही आपली आधुनिक वस्त्रं काढून प्राचीन पद्धतीचे पोषाख परिधान केले पाहिजेत.

     काल परवाची गोष्ट. एक पाठमोरी, मानेपर्यंत केस कापलेली, जीन्स - टी शर्ट घातलेली मुलगी चाललेली. वारंवार मारुतीस्त्रोत मनात म्हणूनही आमची नजर तिच्या कमरेखालील भागावर जातच होती. शेवटी घेतलं मारुतीरायाचं नाव व पाहिलं तिच्याकडे एकटक. तर मध्येच चालता चलता थांबून ती मागे वळली. पाहतो तर काय, ज्याला तरुणी समजत होतो तो तरुण निघाला ! अरे, बाई - माणसाच्या चालीतला फक देखील अस्पष्ट व्हावा इतकं तुम्ही बिघडलात ?

    जर अशीच तुमची अवनती होत राहिली तर थोर अवतारी पुरुषांनी पावन झालेली हि पुण्यभूमी हिजड्यांची भूमी म्हणून ओळखली जाईल. इथं हिजड्यांचा उल्लेख का म्हणून त्यांनी रागावू नये. तसेही हिजडे आम्हांला प्रिय ! अहो प्रत्यक्ष अर्जुनाने नाही का किन्नराचं रूप धारण केलं !! इतकंच काय, आमच्या धर्म - संस्कृतीत देवी - देवतांसह यक्ष - किन्नरही पूजनीय आहेत, हे विसरता कामा नये !

    तर मित्रांनो, अधिक बोलून मी तुमचा वेळ घेत नाही. रात्र थोडी सोंगं फार अशी परिस्थिती आहे. १४ फेब्रुवारीला गुलाबांच्या फुलांसोबत राख्या विक्ण्याचीही तुम्ही दुकानदारांना विनंती करा. त्यांचं मनपरिवर्तन न झाल्यास त्यांच्या शेजारी तुम्ही राखी विक्री केंद्र काढा. वर्षातून एकदाच रक्षा बंधन व्हावं असं काही नियम नाही. मुलानं मुलीला किंवा मुलीनं मुलाला गुलाबाचं फुल दिलं कि तिथल्या तिथं त्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम उरकून घेण्यास भाग पाडा.

     प्रत्येकाने दुसऱ्यांच्या पोरी - बाळींना आपल्या आया - बहिणीच मानलं, पाहिजे अशी शिकवण देणारी आमची थोर, प्राचीन परंपरा ! अरे, त्या लक्ष्मणाने राजवाड्यात तर सोडा पण वनवासात देखील कधी सीतेचे पाय वगळता काही पाहिलं नाही, त्या लक्ष्मणाचा आदर्श आपण इतक्या लवकर विसरावा ? नाही. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. एकवेळ या देशात रामाचा आदर्श कोणी घेवो न घेवो पण लक्ष्मणाचा आदर्श आम्ही रुजवल्याखेरीज राहणार नाही.

     मित्रहो, याची सुरवात आपण आजपासून आपल्या घरातूनच केली पाहिजे. परस्त्रीचं काय पण स्वस्त्रीच्याही नजरेस नजर न देता तिच्या पावलांवरच दृष्टी ठेवायची. आपल्या स्त्रियांनीही आपल्या अनुकरण करत नजर नेहमी जमिनीकडे ठेवावी. अरे, नजरानजरच झाली नाही तर वासना कशी चाळवेल व प्रेम तरी कसं होईल व संस्कृतीबरोबर समाजाचा अधःपात तरी कसा होईल ?

    पांडवांच्या काळी असं नव्हतं. त्यामुळं द्रौपदीला शिक्षा झाली. शिवाय तिच्या तोंड वर करून बोलण्या - हसल्यानं वस्त्रहरण उद्भवले. असं काही होऊ द्यायचं नसेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या नजरा स्त्रीच्या चरणांवरच रोखल्या पाहिजेत. स्वस्त्री - परस्त्रीतलं अंतर अंतःप्रेरणेने जाणलं पाहिजे. ते जेव्हा जाणवेल तेव्हाच तुमचं तुमच्या स्त्रीवर खरं प्रेम असल्याचं कळेल ! अरे, आमच्या विवाहाला इतकी वर्षे झाली पण आम्ही देखील कधी पत्नीचं मुखावलोकन केलं नाही कि तिनं आमचं !! तरीही आमचं कुठं अडलं का ? आमचंच काय पण आमच्या पूर्वजांचंही अडलं नाही. तेव्हा आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आजपासून तुम्ही या कार्याला लागावे असं मी बोलून लेखणी खाली ठेवतो !