वेडा ?



    " ए वेड्या, बंद कर तुझं खेळणं ! "
  ती जवळ जवळ माझ्यावर खेकसलीच. मी रागाने तिच्याकडे बघतच राहिलो. तशी ती आणखी चिडून म्हणाली, " गाढवा मी तुला काय सांगितलं ? आणि वर डोळे वटारून काय बघतोयस ? "


    आता मात्र माझी सटकलीच. वेडा काय, गाढव काय. काय समजते काय हि स्वतःला ? मी रागाने उठलो आणि तिला मारायला सुरवात केली. ती पण हात - पाय झाडत - आपटत, ओरडत किंचाळत होती पण शेवटी मीच जिंकलो ! असं कधी होत नाही. रोज तीच मला मारून झोपवायची. पहिले - पहिले मी ओरडायचो. रडायचो. पण आता सवय झाली होती. तिने मारल्याशिवाय मला झोपच येत नव्हती.

    आमचं हे रोजचंच झालं होतं. कधी कधी ती एखादा फटका दात - ओठ खाऊन लावायची तेव्हा कळवळून मीही तिला उलट टोला हाणायचो. पण त्यामुळे आणखी चेव येऊन ती जोरजोराने मला बडवायची. मग मला शांत झोप यायची. अगदी थंडगार ! पण आज उलटं का झालं असावं ? माझ्या ऐवजी तीच कशी झोपली ? काही कळतचं नाही बुवा !

    जाऊ द्या. झोपलीय तर आपण आपलं खेळत बसावं. पण काय खेळायचं ? प्रश्न तर मोठा बिकट होता. मघाशी बुटाला पांढरी, थंडगार क्रीम लावत होतो तर ती म्हणाली, " दात घासायची क्रीम तुझ्या बापाने बुटाला लावली होती का ? " तिचा प्रश्न मला तर समजला नाही पण," मग तो काय लावतो ? " असं मी उलटून विचारल्यावर उत्तरादाखल तिनं मला एक - दोन चापटी मात्र लावून दिल्या होत्या.

    मला या बाईचं काहीच समजत नाही. तसं तर आई - बाप म्हणून समोर येणाऱ्यांचही समजत नाही. ते आणि हि मला वेडा का म्हणतात ? मी काही वेडा आहे का ? उलट वेडे तर हेच आहेत. आता हेच बघा ना, आपले दात किती मोठे असतात ? मग त्याला ब्रशही मोठा नको का ? मी एक मोठासा ब्रश घेऊन दात घासू लागलो तर " कंगव्याने कोणी दात घासले होते का ? " म्हणत बापाने मला थोबडले होते.

    तर अशी हि वेडी माणसं माझ्यासारख्यालाच वेडा म्हणत होती. पण अजून हि उठली कशी नाही ? इतका वेळ कोणी झोपून राहातं का ? हिला समजत कसं नाही, मला कंटाळा आलाय ते. आता एकटा खेळू तरी काय ?

    त्यापेक्षा आपला रोजचा खेळ खेळलो तर …. ? माझ्या मनात कल्पना आली अन मी तिच्याजवळ गेलो. तिला हलवून उठवू लागलो . " ए … उठ ना ! उठ की गं ! चल ना आपण तो खेळ खेळू. " पण ती अजिबातच काही उठेना कि हलेना. बहुतेक गप झोपली वाटतं. रोज खेळल्यावर झोपते तशी. कि माझी गंमत करतेय ती ? मला काही म्हणजे काहीच कळेना. तेव्हा मी तिला ऐकू जाईल असे मुद्दाम मोठ्याने म्हणालो, " तू उठणार नसलीस तर राहू दे. पण मी मात्र खेळायला सुरवात करतोय. परत माझ्यावर ओरडायचं नाही. " असे म्हणत मी तिच्यापासून उठलो आणि तिच्या पायांजवळ येऊन बसलो.

    धाड्कन दरवाजा उघडल्याचा आवाज आला. पाठोपाठ काही पावलांचे आवाज. चार दोन किंकाळ्या आणि जोडून  " अरे देवा ! काय हे ? ", " गाढवा काय करतोयस हे ? ", " तिथं का बसलायंस ? उठ तिथून … " अशा शब्दांपाठोपाठ पाठीवर धपाटे, बुक्क्या आणि लाथांचा वर्षाव. मला तर काहीच समजत नव्हतं. मी आपला नेहमीच्या खेळात मग्न होतो आणि अचानक हि धाड आली होती. मी मोठमोठ्याने ओरडत होतो. त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो कि, " आम्ही रोजचा खेळ खेळतोय. ती फक्त झोपलीय. तिला उठवा. विचारा …. " पण माझं कोणी ऐकूनच घेत नव्हतं. मला मारून एका बाजूला चार जणांनी धरून बसवलं. थोड्या वेळाने खाकी कपड्यातले काही रिक्षावाले आले आणि त्यांनी तिला एका पांढऱ्या फळीवर झोपवून नेलं. बाप त्यांच्याशी काही बोलत होता. मध्येच रागानं माझ्याकडं बघत होता. तर आई रडत होती. पण का ? झोपलेल्या माणसासाठी कोणी रडतं का ? आई खुळीच होती. मी तिला समजवायला जाणार होतो पण बाजूला बसलेल्यांनी इतके घट्ट पकडले होते कि …. जाऊ द्या ! काही वेळाने त्या रिक्षावाल्यांनी मला धरून बाहेर नेले. ते रिक्षावाले मला बाहेर नेत असताना आई मध्येच मोठ्याने रडत येऊ लागली पण बापाने तिला अडवले. यावेळी बापाने कधी नाही ते बरोबर केले. मी उगीच त्याला वेडा समजत होतो. बाहेर फिरायला जाणाऱ्या माणसाला रडत अडवणं आईला शोभतं का ? खरंच ती वेडी होती.

    बाहेर रस्त्यावर आल्यावर त्या खाकी कपड्यातील माणसांनी मला जीपमध्ये बसवले. कमाल आहे ! रिक्षावाले आता जीप पण चालवू लागले होते. जीपमध्ये मागच्या बाजूला बसल्यावर, ' मला दरवाजा जवळ बसू द्या ' असं मी त्यांना सांगितलं पण त्यांनी मला बसून दिलं नाही. बहुतेक गाडीत माणसं जास्त असल्यामुळे त्यांनी माझं ऐकलं नसावं.

    थोडा वेळ इकडून तिकडून फिरून आल्यावर आम्ही एका घराजवळ आलो. त्या माणसांनी मला गाडीतून उतरवून त्या घरात नेलं. तिथं सगळेच रिक्षावाले खाकी कपड्यात बसले होते तर काही जण सळ्यांच्या जाळीमागे होते. बहुतेक या रिक्षा ड्रायव्हर लोकांचं घर असावं. पण जाळीतील माणसं कोण ? यांचे पाहुणे कि पैसे कि काय म्हणतात ते न दिलेलं लोक ? मला प्रश्न पडला. मी एक - दोघांना विचारला देखील. पण ते फक्त हसले. आता यात हसण्यासारखं काय होतं त्यात, ते त्यांनाच माहित.

    त्यांनी मला एका बाकड्यावर बसवलं आणि ते आपापसांत माझ्याकडे बघत काहीतरी बोलत होते. मी पण त्यांच्याकडे खुळ्यासारखा बघत होतो. गंमत म्हणजे या ड्रायव्हर लोकांच्या डोक्यावर रंगीबेरिंगी टोप्या होत्या. खाकी, लाल, निळी का काळी असे कितीतरी रंग होते. पण रिक्षा चालवताना हे टोप्या का घालत नाहीत ? या घरात आल्यापासून मला तर सारखे प्रश्नचं पडत होते. पण विचारायचे कोणाला ? इथं विचारलं तर वेड्यासारखे हसतात. खुळे कुठले ! काही वेळ असाच गेल्यावर दोघं तिघं माझ्याकडे आले आणि त्यांनी मला गाडीत बसवलं. ' म्हटलं चला, न सांगता यांनी मला फिरायला आणलं आणि आता घरीही घेऊन चाललेत. लोकं चांगली आहेत. तिलाही सांगितलं पाहिजे. ' तिची आठवण येताच मला थोडं कसंसच झालं. कारण, बाप - आईपेक्षा तिच्या सोबत मी जास्त रहायचो. हे दोघं काय मला दिवसातून एक दोनदा अन तेही थोडाच वेळ दिसत. भेटत. क्वचित बाप बोलत. पण फार काही आमचा संबंध नसायचा. इतर सर्व काळ तीच माझ्या बरोबर असायची.

    मी माझ्याच विचारात दंग असताना गाडी थांबली. मला वाटलं घरचं आलं पण बघतो तो काय ….  अबब … !  केवढी हि माणसं ? इतक्या माणसांना बघून मी थोडा घाबरलोच आणि आत सरकून बसू लागलो पण, त्या ड्रायव्हरांनी मला ओढतच गाडीतून खाली उतरवलं. तिथं सगळे ड्रायव्हर आणि पांढरं - काळं घातलेली माणसंच होती. हि काळ्या - पांढऱ्या रंगाची कपडे घातलेली माणसं कोण ? मी विचार करत होतो आणि ते ड्रायव्हर लोक मला आत ओढत नेत होते.  थोड्या वेळाने आम्ही एका घरात गेलो. तिथं काही जणं काळी - पांढरं कापडं घालून बसली होती तर एक दोन ड्रायव्हर उभे होते. लांब एका टेबलावर एकजण काळा ड्रेस घालून बसला होता. एक पांढऱ्या कपड्यातील माणूस त्याच्या बाजूला उभा होता. बाकी, बरीच जणं खुर्च्यांवर, बाकड्यांवर बसली होती. मला घेऊन, माझ्या बरोबरचे ड्रायव्हर एका कोपऱ्यात उभे राहिले. मी बसलेल्या माणसांना बघण्यात दंग होतो. इतक्यात माझ्या हाताला धरून एकजण पुढे निघाला. मी पण त्याच्या मागोमाग गेलो व त्याने सांगितलं तिथं गप्प उभा राहिलो.

    मी उभा होतो तिथंच जवळपास एक जण काळ्या पांढऱ्या कपड्यात उभा राहून वर बसलेल्या माणसाला काहीतरी सांगत होता. मला त्यातलं काहीच समजत  नव्हतं पण अधून - मधून तो वर बसलेल्या माणूस माझ्याकडे उगाचच रोखून बघतोय असं वाटायचं. बराच वेळ तो माणूस माझ्याकडे हातवारे करून बडबड करत होता. त्याचं बोलणं झाल्यावर आणखी एकजण उभा राहिला आणि माझ्याजवळ आला व माझा हात त्याने  हातात घट्ट धरून बाजूला पाहिले. मी पण तिकडं बघितलं तर बाप तिथे गर्दीत बसला होता. बहुतेक तो पण फिरायला आला असावा. मी त्याला हाक मारायचा प्रयत्न केला पण बाजूच्या ड्रायव्हरने मला गप्प उभा राहायला सांगितल्याने मी गप झालो. इकडे त्या माणसाने माझा सोडला आणि वर बसलेल्या माणसाकडे बघत बोलायला सुरवात केली. तो काय बोलतोय हे मी ऐकत होतो खरं पण मला त्यातलं काही म्हणजे काहीच समजत नव्हतं. कोणत्या भाषेत बोलत होता कुणास ठाऊक ?

    थोड्या वेळाने ती ड्रायव्हर लोकं मला परत गाडीत बसवून घेऊन जाऊ लागली. मी त्यांना बापाला पण बरोबर घ्या म्हणत होतो पण त्यांनी ऐकले नाही. बहुतेक गाडीत जागा कमी असल्यानं त्यांनी बापाला सोबत घेतलं नसावं. ' जाऊ दे. येईल तो घरी. नाहीतरी रोज तो एकटाच बाहेर येतोच कि ! ' असं म्हणत मी गप बसलो. गाडी सुरु झाल्यावर मला वाटलं हि लोकं मला सरळ घरी नेतील. पण कसंच काय ? हे मला घरी सोडायला तयारच नव्हते. सारखे फिरवतच होते. इकडून तिकडे अन तिकडून इकडे. इतका वेळ तर मी कधीच फिरलो नव्हतो. शेवटी ती लोकं मला एका मोठ्या घरात घेऊन गेली. तिथं सगळीजणं पांढऱ्या कपड्यांत होती. त्या लोकांजवळ मला सोडून ड्रायव्हर लोकं निघून गेली. मला थोडं वेगळंच वाटलं. या लोकांनी आता मला दुसऱ्या घरी का आणलं असावं ? मला काहीच समजेना. मी त्यांच्या तोंडाकडे बघतच बसलो.

    बराच वेळ एका ठिकाणी बसून राहिल्यावर दोन पांढऱ्या कपड्यांतील माणसं आली अन ती मला एका खोलीत घेऊन गेली. त्या ठिकाणी मला खाटेवर झोपवून ते काहीतरी करत होते. म्हणजे डॉक्टर सारखं चेक करत होते पण डॉक्टर नव्हते. डॉक्टर ! आमच्या घरी जे डॉक्टर यायचे ते किती मस्त ड्रेस घालून यायचे. नेहमी मला खायला चॉकलेट कि काय ते द्यायचे. बरी आठवण झाली. तिला नाही तर बापाला आज चॉकलेट आणायला सांगायचं. पण सांगणार कसं ? बाप किंवा ती इथं नव्हती. त्यांना बोलवून घ्यायचं कि परत आपल्या घरी जायचं ? पण घरी का जायचं इतक्या लवकर ? एकदा गेलं कि मला परत बाहेर पाठवणार नाहीत. त्यापेक्षा राहू इथेच काही वेळ असे म्हणत मी गप पडून राहिलो.

    किती वेळ तसाच पडून होतो माहिती नाही पण मध्येच कोणी तरी आत आलं. त्याच्या हातात एक ताट असून त्यात खाण्यासाठी काहीतरी होतं. ते खाऊन झाल्यावर तो ताट घेऊन गेला आणि जाताना त्याने दरवाजा लावून घेतला. अरेच्चा ! इथे तर पांढरा जाड दरवाजा आहे आणि वर त्याला छोट्या सळ्यांची खिडकी पण. मी कसं अजून हे पाहिलं नव्हतं ? माझं मलाच विचित्र वाटलं. दिवसभर मी एकटाच तिथं पडून होतो. मध्येच दारावर थाप मारून मी हाक द्यायचो कि, मला खेळायचं आहे. पण कोणी लक्ष देत नव्हतं. शेवटी कंटाळून मी खाटेवर पडून राहिलो.

     हे परत रोजचं होऊ लागलं. घरातल्या सारखं. एकाच खोलीत बसून राहायचं. पण तिथं निदान खेळायला तरी होतं. इथं तेही नाही. नुसता वैताग. भिंतीकडं नाहीतर खिडकीतून बाहेर बघत बसायचं. पण बाहेर आहे तरी काय ? नुसती झाडं आणि काऊ चिऊ ? त्यांना बघून थोडी माझं टाईमपास होणार होतं ? कधी कधी डॉक्टर सारखं तपासणारे लोक येत. त्यांना मी खेळणी आणि तिला पाठवून द्यायला सांगायचो. ' तिला कशासाठी ? ' म्हणून ते विचारत तेव्हा ते आमचं सिक्रेट आहे असं सांगून मी गप बसायचो. कधी कधी नुसता बाप तर कधी आई पण यायची. पण घरातल्यासारखीच आमची भेट व्हायची. फक्त मध्ये जाळीचा पडदा असायचा. बाप क्वचित बोलायचा. आई रडता रडता बोलायची. मला नेहमी एक प्रश्न पडायचा. हे दोघं येतात मग ती का येत नाही ? मी आईला आणि बापाला विचारलेही. पण ते काहीच बोलले नाहीत. विचित्रच आहे सगळं !

    सगळंच विचित्र होतं. हि माणसं मला खेळायला देत नव्हती कि घरी जाऊ देत नव्हती. मी त्यांना म्हणालो पण एकदा कि, माझी खेळणी आणि तिला इथे आणा. मग मी घरी जायचा हट्ट धरणार नाही. पण ती माझं काही ऐकतच नव्हती. मला या लोकांनी डांबून ठेवलंय कि काय अशी मला आता शंका येऊ लागली. अगदी वेड्यासारखी माझी स्थिती केली होती. ना खेळणी, ना ती, ना मारामारी ! मारामारी ? बरी आठवण झाली. इथं आल्यापासून मी या लोकांना किती वेळा सांगितलं कि, आपण मारामारी खेळू. त्याशिवाय मला झोप येत नाही तर हि लोकं मला सुई टोचवायचे. त्यानंतर कशी झोप यायची ते कळायचं नाही. कदाचित ते सुईने मला मारत असावेत. पण त्यात ती मजा नव्हती. त्या मारामारीत चार खायला अन दोन द्यायला किती बरं वाटायचं. नाही तर हे … !

    हळूहळू माझ्या सर्व जुन्या सवयी या लोकांनी मोडून - तोडून टाकल्या आहेत. सर्व काही. पण त्यांना माहिती नाही कि, मला त्या सर्वांचा किती त्रास होतोय ते ! आता इथे मला जाम कंटाळा येऊ लागलाय. यापेक्षा घर बरे. घर ! किती वेळ झाला मी घरी गेलोच नाही. कधी एकदा घरी जाऊन माझी खेळणी  जवळ घेतोय असं मला झालंय. कधी कधी मी दरवाजा उघडावा म्हणून धडका मारतो. लाथा हाणतो. पण दरवाजा उघडतच नाही. अलीकडं तर मला वेगळंच काहीतरी वाटू लागलंय. कधी कधी मला ती दिसते. आठवते. आमचा तो खेळ आठवतो आणि मग मला काहीतरी होतं. काय होतं ते कळत नाही. पण मला अगदीच असह्य होतं. सर्व काही नकोनकोसं वाटू लागतं. मी ओरडतो. ' तिला बोलवा. तिला पाठवा.' पण माझं कोणी ऐकतच नाही.

    का हि लोकं ऐकत नाहीत ? बहीरी झाली कि काय ? मी बेचैन झालोय. कारण अलीकडे मला सारखं कसंसचं होतंय. काय होतंय माहिती नाही पण मला आता ते सहन होत नाही. आज काय तो याचा शेवट केलाच पाहिजे. मी उठलो आणि दरवाजा जवळ जाऊन ओरडू लागलो. " मला बाहेर काढा. मला घरी जायचंय …. " पण माझा आवाज कोणी ऐकत नव्हतं. कोणाचाही आवाज तिथं येत नव्हता. सगळेजण घर सोडून गेले कि काय ? मी घाबरलो होतो कि चिडलो होतो ? काय माहित पण मी दाराला आता धडका मारू लागलो. पहिल्यांदा हात. नंतर खांदा. मग पाय मारून झाले. शेवटी डोक्याने दार तोडू लागलो. डोक्याने धडका मारता मारता कधीतरी मी खाली पडलो.

    जेव्हा मी उठून उभा राहिलो तर बाजूलाच मी पडलो होतो. शेजारी लाल, चिकट पाणी पडलं होतं. अगदी तिला मारून झोपवली होती तेव्हा सारखंच ! मी स्वतःलाच झोपलेलं पाहून हसलो. मलाच हात लावून उठवायला गेलो पण माझा हात आरपार गेला. आयला हि कसली गंमत ! मी स्वतःलाच विचारत तिथून उठलो आणि दाराला हात लावला तर काय … दारातूनही माझा हात आरपार बाहेर गेला. मी आनंदून गेलो. मोठ्याने एक आरोळी हाणणार होतो पण म्हटलं इथं कोणी ऐकलं तर मला परत पकडतील म्हणून न ओरडता मी त्या दारातून शिरून बाहेर पडलो. बराच वेळ चालत गेल्यावर मला पांढऱ्या कपड्यांतील माणसांचा घोळका दिसला. त्यांच्यापासून लपत मी त्या घरातून बाहेर आलो. बाहेर मी एकटाच आलो तरी एकटा नव्हतो. तिथं तर माणसांची गर्दीच होती. इतकी माणसं ? अरे बापरे ! बापरे ? बरी आठवण झाली. आपल्याला घरी जायचं आहे असं मनाशी म्हणत मी घरी निघालो. पण मला माझं घर काही कुठे दिसेना. माझं घर आहे तरी कुठं असं मनाशी विचार करत मी रस्त्यावरून जाऊ लागलो.

    माणसांच्या, गाड्यांच्या आरपार जात होतो पण मला कोणाचा धक्का लागत नव्हता कि माझा कोणाला. ' हे असं का ? ' म्हणून मी विचार करत होतो पण उत्तर काही सापडेना. एका माणसानं विचार तरी किती करायचा ? शेवटी थकून मी आजूबाजूने जाणाऱ्या माणसांना माझ्या घरचा पत्ता विचारू लागलो. पण कोणी ऐकूनच घेईना. प्रत्येकजण आपल्याच घाईत ! साला हि माणसं पण काय वेडी झालीत कि काय ? मला आणखी एक प्रश्न पडला. यांना कसली घाई झालीय ? बहुतेक हे पण आपापल्या घरी जात आहेत. शेवटी मला एका का होईना पण प्रश्नाचे उत्तर मिळाले खरे पण माझं घर काही सापडलं नाही. तुम्ही तरी सांगू शकाल का माझं घर कुठं आहे ते ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा