शनिवार, ४ मे, २०१९

फिल्मी दहीवडा (१)





    इंटीमेंट सीन्स हा आपल्या फिल्मी दुनियेचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही कितीही नाकं मुरडली तरी याच्याशिवाय तुमचा सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही. मूकपट कि बोलपट हे माहिती नाही पण भारतीय सिनेमात पहिलं ऑन स्क्रीन चुंबन दृश्य देविकाराणीने दिल्याचं मानलं जात असलं तरी तिच्याही पूर्वी सीता देवी, ललिता पवार यांनी किसींग सीन दिल्याची माहिती मिळते.

    इंटीमेंट चित्रीकरणातही आपल्याकडे तसा भेदभाव असतो. म्हणजे हिरो हिरोईनच्या प्रणयात दोन फुलं एकमेकांवर आदळतात. जर त्यांची सुहागरात असेल तर घुंघट उठा के मुखडा दिखाकर बत्ती बुझ जाती थी... किंवा मग जास्तच धाडसी म्हणजे हाथों में हाथ असलेल्या स्थितीत बेड भोवतालच्या फुलांच्या माळांपैकी एक चार दोन तोडताना दाखवल्या कि समजायचं झालं याचं !
    त्याउलट व्हिलन आणि व्हॅम्प यांच्या प्रणयात शक्य तितका धसमुसळेपणा, खेचाखेची, गुडघ्यापर्यंत उघडे पाय.. हेलन, बिंदू, अरुणा इराणी ते शेवटी कुनिका लाल पर्यंत येऊन या प्रथेचा अंत झाला. आजकाल हिंदी सिनेमात पूर्वीसारखे रसिक व्हिलनच उरले नाहीत तर व्हॅम्प तरी कुठून येणार म्हणा !
    प्रणय प्रसंग वा कल्पना भारतीयांना नव्या नाहीत. जगाला कामसुत्राचे धडे एका भारतीयानेच दिले असे आम्ही अभिमानाने सांगत असलो तरी स्वतः मात्र संभोगाचे ज्ञान सध्या परदेशी बी पॉझिटिव्ह बघून, अतिशयोक्तीही झक मारेल अशा संभोगकथा वाचून घेत असतो. यावरून आमच्या उच्च अभिरुची संपन्नतेची कल्पना यावी.
    फिल्मी दुनियेतील मंडळीही या आमच्या समाजाचाच घटक असल्याने त्यांचीही मानसिकता फारशी वेगळी नाही. त्यामुळेच हिंदी सिनेमात जे जे आजवर इंटीमेंट सीन्स येऊन गेलेत त्यातील मोजके वगळता इतर सर्व वर्स्ट कॅटेगरीत मोडणारेच आहेत.          

    उदाहरणार्थ रेखा, स्मिता पाटील, नीना गुप्ता या इंटिमेट सीन्सच्या बाबतीत बेस्ट एक्ट्रेस होत्या असं माझं मत आहे आणि यांच्या वाट्याला तशी दृश्यंही आली. पैकी प्रथम आपण स्मिता पाटीलचे सीन्स विचारात घेऊ.
     

    जयाप्रदा, राजेश खन्ना आणि स्मिता पाटील यांचा ' दिल ए नादान ' नावाचा एक सिनेमा होता. पिक्चर आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे स्टोरी माहिती असण्याचा प्रश्नच नाही. फक्त एवढं माहित्येय कि, जयाप्रदा राजेश खन्नाची हिरोईन असते. ( क्या नॉलेज है ! व्वाह !! ) तर सीन असा आहे कि, कुठल्या तरी कारणांनी राजेश खन्ना जयाप्रदाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. तेही रात्री. आणि नेमकं त्याच वेळी जयाप्रदा घरात नसते. मग हिरो सभ्य माणसाप्रमाणे निघून जायच्या गोष्टी करतो तर अतिसभ्य संस्कारी स्त्री प्रमाणे स्मिता त्याला थांबवते... कुठे घडतं हे असं ?.. एवढ्यात पाऊस वगैरे चालू होतो आणि बाहेर मुसळधार पावसात नाचकाम आणि रोमान्सची कसरत करत एक युगुल गाणं म्हणत असतं... आणि राजेश खन्नाला स्मिताच्या जागी जयाप्रदा दिसू लागते. ( इथं खरं तर डोक्यावर हात मारून घ्यायला पाहिजे पण.... समोर जया आणि स्मिता लागोपाठ दिसत असतील तर.. कोण एवढा विचार करतो ! ) गाण्यासोबत याचं जे काय व्हायचं ते होऊन जातं. या घटनेला आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण... इंटीमेंट सीनमध्ये रोमँटिक म्हणून राजेश खन्नाच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ना.. ते पाहून स्वाभाविक मनातून प्रतिक्रिया उमटते.. बाबारे ! तू काही करतोयस कि तुला काही होतंय ?  
    सेम आराधनातील रूप तेरा मस्ताना प्रमाणे. समोर शर्मिला सारखी अर्धवस्त्रांकित ललना समोर असूनही राजेश खन्नाने चेहऱ्यावर सॅड + रोमान्स सम भाव दर्शवत गाण्याची वाट लावून टाकली होती.  पण... आराधना हा फिल्मी भाषेत बीता कल था.. तिथे राजेश खन्ना यंग होता तर इथे त्याच्या डोक्यावरचे केस विरळ होऊ लागलेले. समोर ऐन ज्वानीतली स्मिता पाटील आणि याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे सो कॉल्ड रोमँटिक भाव.. जे पाहिल्यावर मोठ्याने विचारावसं वाटतं.. बाबा  रे ! तू रोमान्स करतोय कि तुला काही होतंय..  मी तर म्हणतो याच्यापेक्षा बॉलीवूडचा आद्य इम्रान हाश्मी धर्मेंद्र बरा. इस बंदे को कोई फर्क नही पडता सामने कौन है.. बस अपना एन्जॉयमेंट चले.... असो.
              

    स्मिता सोबत याहून वर्स्ट इंटीमेंट सीन देणारा दुसरा हिरो म्हणजे ओम पुरी. हा आर्ट फिल्मचा इम्रान हाश्मी. पिक्चरचं नाव आक्रोश. टिपिकल आर्ट फिल्म परंपरेतला. सीनमधील कपडे आणि डायलॉग्ज वरून दोघेही दारिद्र्यरेषेखालील वाटतात. ( मी पिक्चर पाहिला नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. ) सुरवातीला भांडण, शिवीगाळ, मारहाण व नंतर प्रणय, हा फॉर्म्युला डायरेक्टरने वापरलाय. कदाचित बिचाऱ्याची, गरिबांच्या प्रणयाविषयी हीच कल्पना असावी. मोजून दीड दोन मिनिटं ओम पुरी व स्मिता पाटील इंटीमेंट, प्रणय म्हणून जे काही करतात.. ते पाहिल्यावर साला सेक्स या शब्दाशीच आपली नफरत होऊन जाते. एवढ्यासाठीच का केला होता हा सारा अट्टाहास असं काहीसं मनात येऊन जातं.

   
सेम स्टोरी रेखाची. उत्सव मधील रेखाचे प्रणय प्रसंग किती कुशलतेने चित्रित केलेत. या संपूर्ण चित्रपटात रेखा जितकी सुंदर दिसलीय तितकी दुसऱ्या कोणत्याच नाही. तर अशा एव्हरग्रीन रेखाला घेऊन आस्था मध्ये अनुक्रमे नवीन निश्चल व ओम पुरी सोबत दोन प्रणयदृश्यं चित्रित करण्यात आली.
    
    पहिल्या प्रसंगात नवीन निश्चल एका आर्थिकदृष्ट्या गरजू, विवाहित स्त्रीचे काही तास विकत घेऊन तिला कामकलेचे धडे देतो व नंतर ती गरजू स्त्री आपल्या प्राध्यापकसम नवऱ्यास ते धडे देते. अशी बऱ्यापैकी देवाणघेवाण असलेले दोन इंटीमेंट.
    
पहिल्याच्या बॅकग्राउंडला कुठलं तरी एक अध्यात्मिक भजन टाकून त्याची वासलात लावलेली असते. उरलेली कसर रेखाला अतिशय वाईट पद्धतीने चित्रित करून भरून काढली जाते. आपलं आणि रेखाचं दुदैव इतक्यावर थांबत नाही. ओम पुरी सोबत रेखाला परत तेच रिपीट करावे लागते. हे बघत असताना आपण फक्त WTF एवढचं म्हणत असतो.
    ओम पुरीचं एक बरंय. स्मिता, देबाश्री, रेखा ते मल्लिका शेरावत ! म्हणूनच मी याला आर्ट फिल्मचा इम्रान हाश्मी म्हणतो. एक मल्लिका सोडली व देबश्री अर्धी धरली तर अडीच नट्यांसोबत पठ्ठ्याला स्क्रीन एन्जॉय करता आली.
             
  
 देबाश्री रॉय वरून आठवलं. तिचा आणि कंवलजीत सिंगचा एक सिनेमा होता. नाव आठवत नाही.. पण कंवलजीत आठवतोय... तोच जो सत्ते पे सत्ता मधील अमिताभच्या सहा भावांपैकी एक आणि अमिताभ बच्चनपेक्षा ऊंच. अमिताभहुन अधिक ऊंच कोणी असू शकत नाही या माझ्या बालपणीच्या कल्पनेला सुरुंग लावणारा दुष्ट राक्षस.... तर या कंवलजीतने देबाश्री सोबत अर्ध्या एक मिनिटाचा इंटीमेंट दिला आहे. तो पाहिल्यावर.. आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळल्या जाऊन जोराने आपल्याच कपाळावर आदळतात.
    
असाच एक आपल्याच हातांनी आपलं थोबाड बडवून घेण्यास भाग पाडणारा सीन सुचित्रा पिल्लई आणि  अनुप सोनीने -- तोच तो, जो सोनीवरच्या क्राईम पेट्रोलमध्ये येतो -- दिला आहे. हे असले सीन्स पाहिल्यावर.. हि लोकं अशी का वागतात.. का करतात ? वगैरे बालसुलभ प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत.

    इंटीमेंट सीन्स उत्सव प्रमाणे -- नीना गुप्ताचा अपवाद करता -- कलात्मकरित्या रंगवला जाऊ शकतो किंवा आपल्या जुन्या प्रतीकात्मक पद्धतीनेही. याचे एक उदाहरण म्हणजे वीराना तील तो फेमस सीन. जो देशातील पंचविशीपार तरुणांच्या मनात घर करून राहिला आहे. पण निव्वळ कलात्मकतेचाच निकष लावायचा झाल्यास द ग्रेट शोमन राज कपूर शिवाय पर्याय नाही. त्याचं पांढऱ्या ओलेत्या साडीतील आरस्पानी सौंदर्याचं वेड सोडलं तर सत्यम शिवम सुंदरम चं टायटल song त्याने ज्या प्रकारे चित्रित केलंय त्याला तोड नाही. म्हटलं तर ते भक्तीगीत आहे. म्हटलं तर प्रणयगीत !
       तसं पाहिलं तर इंटीमेंट सीन्स देणे काही खायचे काम नाही. समोरच्या एक्ट्रेसला कुठेही असुरक्षित वाटणार नाही, अवघड वाटणार नाही याची दक्षता बाळगूनच असे सीन्स द्यावे लागतात. हां.. आता क्वचित नटांकडून मर्यादा उल्लंघनही झालंय किंवा गैरफायदा घेण्याचे प्रकारही घडलेत. पण त्याची चर्चा परत कधीतरी... तूर्तास इतकेच !