सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

आमचेही खाद्यजीवन !





    तसं बघायला गेलं तर खाण्याचा व माझा अगदी छत्तीसचा नसला तरी त्रेसष्टचाही आकडा नाही. परंतु माझे सध्याचे विस्तारित आकारमान पाहता मी भलताच खादाड असल्याचा लोकांचा व माझाही एक गैरसमज आहे. पुलंच्या खाद्यजीवनाइतके वा कोणत्याही भटक्या प्रवाशाइतके माझे प्रवासी जीवन समृद्ध नसल्याने त्याला बरीच मर्यादाही आहे. परंतु या मर्यादेतही विविधता ही आहेच !

    खाण्याच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे एखादा पदार्थ अन्न म्हणून तुमच्यासमोर आला तर त्याविषयी मनात असणारी भावना व औषधरूपाने आल्यावर त्याबद्दल वाटणारी भावना यात जमीन – अस्मानचा फरक असतो.

    उदाहरणार्थ, माझ्यावरील उपचारांचा भाग म्हणून पारवा, बकऱ्याच्या पायाचे सूप, घोरपड इ. प्रकार घरात आणून बनवण्यात आले खरे. पण मला ते कधीच चविष्ट वाटले नाहीत. परंतु तेच बकऱ्याच्या पायाचे सूप व पाय औषध म्हणून समोर न येता जेवणाचा एक भाग बनून आले तेव्हा मात्र चव समजून आली. बाकी पारवा तर आपण नंतर कधी ट्राय केला नाही व घोरपड दातांची सत्व परीक्षा बघत असल्याने तिलाही दुरूनच नमस्कार !

    मांसाहारातला दुसरा प्राणी म्हणजे कोंबडी किंवा चालू भाषेत चिकन ! गावठी अन् ब्रॉयलरच्या चवीत काय फरक असतो ते मला आजतागायत समजले नाही. परंतु चिकनचा मसाला, रस्सा वा बिर्याणीपेक्षा ती भाजून खाण्यात वेगळीच मजा आहे. गेली दीड – दोन वर्षे गावाकडे गेल्यावर आम्ही हाच उद्योग करतो. 
यानिमित्ताने आंबा, चिकू, नारळ, पारिजातक, अशोक इ. झाडांच्या जळणाचाही वापर केलाय. परंतु कडीपत्त्याच्या सरपणावर भाजलेल्या कोंबडीची दुसऱ्या कशालाही सर येणार नाही. इतकी अप्रतिम चव येते कि, माणूस जन्मात कधी परत भाजलेलीच काय पण शिजलेलीही कोंबडी खाणार नाही ! बाकी, अंडी व अंड्यापासून बनवलेले विविध पदार्थ म्हणजे निव्वळ पोट भरण्याचे साधन. त्यात चवीनं, आवडीनं खावं असं काही नाही.

    दशावतार घडल्याचे पुराणं सांगत असली तरी त्या कथांवर माझा बिलकुल भरवसा नाही परंतु त्यातील मत्स्य व वराह हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय ! खाऱ्या पाण्यातील मासा अधिक चांगला कि गोड्या पाण्यातला हा वादाचा विषय होऊ शकतो. त्याचप्रमाणे खारवलेल्या माशांमध्ये अधिक लोकप्रिय कोण यावरही मतभेद होऊ शकतात. परंतु, मांसाहार करतो पण मासे खात नाही असं म्हणणारा मात्र या भूतलावर कोणी नसेल. मात्र माशांचे कालवण म्हणून जो प्रकार आहे तो मला बिलकुल आवडत नाही. हि जमात तळून / भाजून खाणंच अधिक चांगलं असं माझं प्रामाणिक मत आहे.

    माशांपेक्षाही अधिक चवदार असा प्रकार म्हणजे डुकराचे मटण ! अर्थात ते कोणत्या प्रकारचे आहे यावर बरंच काही अवलंबून आहे. रानडुकराच्या मटणाला जगात तोड नाही असं मी अभिमानाने सांगू इच्छितो. परंतु, अलीकडे पाळीव कोंबड्यांप्रमाणे पाळीव डुकरांचे जे मटण शहरांमध्ये मिळते ते मात्र तितकेसे चविष्ट नसते. डुकराच्या मटणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला असलेली भरपूर चरबी, ज्यामुळे मटणात अतिरिक्त तेलाचा फारसा वापर होत नाही. परंतु याचे पातेलंभर कालवण करण्यात काही मजा नाही. आणि जास्त तिखटही. अधिक रस्सा व अतिरिक्त तिखटाने डुक्कर शिजताना परत एकदा मरतं हा माझा खाद्यानुभव आहे !

    यावरून एक आठवण झाली गावच्या यात्रा – जत्रांची.  गावच्या यात्रेला वा जत्रेला कोंबडं – बकरं कापणं हि आपली खास मराठी परंपरा ! यावेळी घरात कधीही स्वयंपाकाच्या कामात हातभार न लावणारे पुरुष ज्या पद्धतीने मटण – चिकन बनवतात त्याला खरोखर तोड नाही. अतिशय कमी मसाल्यांत बनवल्या जाणाऱ्या त्या मटण – चिकनचे गूढ आजतागायत मला उकलेलं नाही. अगदी मुख्य आचाऱ्याच्या शेजारी बसून देखील !

    परंतु आचारी नावाचा प्राणी जेव्हा शाकाहार बनवतो त्यावेळी समोर वाढून आलेलं ताट कसंबसं संपवायचं, यापलीकडे आपल्या मनात दुसरी कोणतीही भावना नसते. प्रसंग कोणताही असू द्या. तेच वांगं, तोच बटाटा, तीच उसळ, तोच भात आणि तीच सरळसोट जिलेबी !

    यातलं वांगं व बटाट्याचा ओळखू येण्यापलीकडे संगम झालेला असतो. उसळीमध्ये उसळीशिवाय काही नसतं. इतकंच काय ती कशाची केलीय याचाही पत्ता अनेकदा लागत नसतो. भात बिचारा मसाल्याच्या पोकळ वजनाखाली मलूल होऊन पडलेला असतो. राहता राहिली जिलेबी ! सबंध जेवणात खाण्यालायक असा एकमेव पण जास्त खाता न येणारा पदार्थ !! जिलेबीची जाडी तिच्या चवीवरती बराच परिणाम करते. काही जिलेब्या चकल्यांनाही चकवणाऱ्या असतात तर काही पुऱ्यांच्याही तोंडात मारण्याइतपत फुगलेल्या असतात. खरी जिलेबी मध्यम प्रमाणातील. एका तुकड्यात तोंड खवळणारी व दोन कड्यांच्यावर खाऊ न देणारी !

    जिलेबी इतकाच मराठी मनाला भुरळ पाडणारा दुसरा पदार्थ म्हणजे कांदा भजी. हल्ली परप्रांतीयांनी या भज्यांचे भजिया – पकोडे करून पार वाट्टूळं करून टाकलं असलं तरी घराघरांत मात्र हा प्रकार आजही जिवंत आहे. फक्त हॉटेलांतून चवीने यांच्याशी काडीमोड घेतलाय. ठाण्यात चांगले भजी कुठे मिळतात माहिती नाही पण राम मारुती रोडवर साईबाबा मंदिराजवळ ‘ श्रद्धा ‘ नावाचं एक छोटसं उपहारगृह आहे. तिथे मिळणाऱ्या मुग भज्यांसारखे भजी इतरत्र कुठेच काय आख्ख्या दुनियेत मिळत नाहीत असं मी गर्वाने म्हणून शकतो. आता कित्येकजण मुगभजी बनवून विकतात खरे पण उपरोक्त उपहारगृहात या भज्यांची जी भट्टी बसलीय तशी काही इतरांना जमलेली नाही. हीच बाब वडापावची ! 

    हा प्रकार मी बऱ्याच ठिकाणी खाल्लाय पण सतरा – अठरा वर्षांपूर्वी आमच्या शाळेजवळ मिळणाऱ्या वडापाव सेंटरमधील वड्यापावासारखा वडा आजतागायत मी खाल्ला नाही. आता इथे लुईसवाडीत मॅक बनवतो तो देखील चांगलाच आहे. पण ती सर नाही. अर्थात, राजमाता वगैरे ठाण्यातील तथाकथित प्रसिद्ध सेंटर आपली मुळची चव कधीच हरवून बसल्याने त्यांचा विचार करण्याची गरज नाही.       

    पण बटाटा वड्यांपेक्षाही माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे दहीवडा ! पूर्वी गावदेवी मैदानाजवळच्या एका हॉटेलात आठवड्यातून एकदा का होईना माझी फेरी व्हायची, ती याकरताच. आता तिथं ते हॉटेल आहे कि माहिती नाही. पण तिथे मिळणारे दहीवडे व इतरत्र मिळणाऱ्या दहीवडयांत जमीन – अस्मानचे अंतर होते. आता मात्र दहीवड्यांची पार कळाच गेलीय. एकतर यांना मुळात दहीवड्यातला वडा बनवता येत नाही. त्यात वर आणखी चाट मसाला. यामुळे दह्याची वाट लागते. त्यात भर म्हणून डाळिंबाचे दाणेच टाक, बारीक शेवची पेरणी कर इ. बकवास प्रकारांनी दहीवड्याचं त्यांनी भलतंच काहीतरी बनवून ठेवलंय ! गेल्या वर्षी तर दही वड्याकरता वडलांना मी तीन चार तास ठाण्यात फिरवलं होतं. पण मला हवा तसा प्लेन दहीवडा काही कुठंच मिळाला नाही.

    हि झाली टाईमपास खाण्याच्या पदार्थांची यादी. आता आपण जरा जेवणाचं बघू. मांसाहारप्रिय मंडळींच्या दृष्टीने शाकाहार म्हणजे नुस्ता झाडपाला ! पण तसे नाही. ताकाची कढी – भात किंवा ताकाची कढी अन् भजी विथ चपाती / भाकरी कधी खाऊन पाहिलीयं ? बाजरीची भाकरी व वांग्याचं भरीत जेव्हा गरमागरम असते तेव्हा तमाम नॉनव्हेज डिश एक तरफ और वांगे का भरीत एक तरफ !

    चण्याची डाळ भरडून केलेलं पिठलं देखील काही कमी नाही. परंतु ते जरूरीपेक्षा पातळ कधीच करू नये. अन्यथा चवीत बदल होतो. निव्वळ कांद्याची पात खाऊन कंटाळा आल्यास चवीत बदल म्हणून पिठल्यात थोडी पात टाकून बघा. कांद्याच्या पातीवरून आठवलं. मिरचीच्या खर्ड्यापेक्षा ( पक्षी : ठेचा ) लसणाच्या पातीचा खर्डा अधिक टेस्टी असं माझं प्रांजळ मत आहे. ( मत असण्याशी मतलब. बाकी, प्रांजळ म्हणजे काय ते मलाबी म्हायती न्हाय ! ) खर्ड्यासारखा आणखी एक प्रकार म्हणजे कोशिंबिरीचा !

    मूळ कोशिंबीर दही, कांदा – मीठ यांचीच. बाकी मग तुम्ही त्यात काहीही टाका. पण कांद्याविना कोशिंबिरीची कल्पना करवत नाही. कांद्यावरून आठवलं. मटक्या, डाळी, उसळी खायचा वैताग आल्यास एक अख्खा कांदा व चपाती / भाकरी खाऊन बघावी. चवीत तर बदल आहेच पण खाण्यात एक वेगळीच मजा. अर्थात, कांदा फोडलेला असावा पण धुतलेला नसावा. धुतल्यावर त्यातील तिखटपणा जाऊन निव्वळ साल शिल्लक राहते. याच कांद्याला मीठ व चटणी लावूनही तुम्ही खाऊ शकता.

    भात एक असा प्रकार आहे जो कोणत्याही पदार्थाबरोबर खाता येऊ शकतो. याच भातात हरभरे, मटकी वा मोड टाकून शिजवल्यास व्हेज बिर्याणीचा प्रकारही जमून येतो. किंवा नुसत्या हिरव्या वा काळ्या पावटयांचाही भात चांगला लागतो. पण मटार अर्थात वाटाणा भात हा प्रकार अतिशय बेचव असल्याचं माझं मत आहे. किंबहुना वाटाणा हा पदार्थच मुळी माझ्या नावडीचा आहे. ना याची उसळ चांगली लागते ना कालवण ना भात ! तरीही याचं कोडकौतुक ! वाटाण्याचा न् माझा इतका छत्तीसचा आकडा आहे कि, याच्यामुळे मी समोस्यावर बंदी घातलीय.

    फळभाज्यांचा विषय आहे आणि तुरी वा चवळीचा उल्लेख नसेल तर मग त्या लेखनाला अर्थ काय ? तूर वा चवळीच्या कच्च्या, हिरव्यागार शेंगा नुसत्या खाण्यात जी मजा आहे भुईमुगाच्या शेंगा खाण्यात बिलकुल नाही. आणि भेंडी म्हणाल तर देशी, काटेरी भेंडीचे शेंगदाण्याचे कूट टाकून केलेलं कालवण व भात. फक्त कूट आणि तिखटाचं गणित जुळायला हवं. नाहीतर मग त्याच्याइतका बेचव पदार्थ दुसरा कुठला होणार नाही. बाकी घेवडा, शेवगा, पडवळ, दोडका, दुधी या फक्त पोट भरण्यासाठी खायच्या फळभाज्या असल्याची माझी प्रामाणिक समजूत आहे.

    पालेभाजी म्हणाल तर अंबाडी, मेथी, पालक, माठ, तांदळी इ. आहेतच. पण भाज्यांवर फारसे प्रयोग करा येत नाहीत. प्रयोगावरून आठवलं रात्रीची भाकरी दुसऱ्या दिवशी तव्यात टाकून तिचा चिवडा करून खाल्लाय का कधी ? कांदा, तेल, तिखट – मीठ. यातला कांदा जरी वजा केला तरी चालेल. पण तेल मात्र हवंच. आणि हो भाकरी पण घरचीच पाहिजे. पोळी – भाजी केंद्रातला कागद आणून असं काही कराल तर तोंडाची उरली सुरली चव घालवून बसाल. आदल्या दिवशीच्या मटणाच्या शिल्लक कालवणात शिळ्या भाकरीचे तुकडे शिजवून खाऊन बघा. पण फक्त मटणाच्याच. चिकन वा माशाच्या नाही.

    व्हेज मधलं नॉनव्हेज म्हणजे सुरण ! सुरणाचे कप तळून खाणं कधीही चांगलं पण त्याची भाजी तितकीशी चांगली लागत नाही. तसाही हा प्रकार इकडे कोकण साईडलाच बघायला मिळतो. सातारा – सांगली भागात सुरण बघायला तरी मिळतं का याची मला शंकाच आहे. शिवाय पोळी – भाजी केंद्रे वगळल्यास हॉटेलांमध्ये देखील हि भाजी क्वचित आढळून येते.

    हॉटेलवरून आठवलं. गुजराती वा काठीयावाडी हॉटेलांमधील जेवण मला कधीच आवडलं नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांचा क्रमांक अव्वल असेल पण चवीच्या बाबतीत खालून पहिले ! इथे ठाण्यात मल्हार सिनेमाच्या समोरचं आधीचं संजीवनी ( आता संजीवना ) कधी काळी चांगलं होतं. नंतर मात्र त्याचं मुळचा दर्जा खालावला. त्याउलट मल्हार  शेजारची दुर्गा मधील अजूनही आपला नावलौकिक टिकवून आहे. अर्थात, टेस्टच्या बाबतीत ‘ गेले ते दिन गेले ! ‘ मल्हारच्या जरा पुढे असलेलं वेलकम नाष्ट्यासाठी ठीक होतं. तिथलं जेवण मात्र मला कधीच आवडलं नाही. स्टेशन जवळच अलोकचा बोलबाला आहे पण तिथे फक्त नावलौकिकचं आहे !
मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल्स म्हणजे पाट्या टाकण्याची कामं ! अव्वाच्या सव्वा किंमतीने खाण्यासारखे दिसणारे पदार्थ तिथं विकले जातात. एक्स्प्रेस हायवे सोडून पुढे आल्यावर नीरा नदीच्या पलीकडे बहुतेक ‘ सागर ‘ नावाचं हॉटेल जेवणाच्या बाबतीत चांगलं होतं. ज्यावेळी तो फक्त ढाबा होता, तेव्हापासून त्याच्या जेवणाचा दर्जा चांगला होता. पण पुढे तोही आपलं मूळ स्वरूप हरवून बसला. तिथून पुढे मग सातारा रोडवर सारा आनंदी आनंद !

    साताऱ्याजवळ ‘ शिवानी ‘ चा दबदबा आहे खरा पण मेनू कार्डावरील पदार्थ ताटात येतील याची शाश्वती नसते. आणि आलाच तर चवीनं खाण्यालायक काहीही नसतं. बाकी हॉटेल्समध्ये तसंही चवीनं काय खाल्लं जातं म्हणा ! कोल्हापूर हायवेवर निव्वळ चिकन तंदुरीसाठी ‘ वारणा ‘ हॉटेल पूर्वी चांगलं होतं. आता तिथे व्हेज चांगलं मिळतं. त्या तुलनेने ‘ संगम ‘ मला भिकारचं वाटलं.
कराड एसटी स्टँडच्या समोरच्या गल्लीत एक छोटेखानी हॉटेल आहे. आहे म्हणजे आधी होतं. आत्ताच माहिती नाही. परंतु त्या ठिकाणी चांगलं शाकाहारी जेवण मिळत होतं. एकदा कराड सोडून तुम्ही विटा रोडने पुढे निघाला कि मग सगळा आनंदी आनंद !

    हल्ली चिकन आणि चायनीज खाद्य संस्कृती या भागात चांगलीच रुजल्याचे हॉटेलगणिक आपल्या लक्षात येते. पण एकदा भेट दिल्यावर परत त्या ठिकाणी जायची आपण कल्पनाच करू शकत नाही. या ठिकाणी मला विट्याच्या पुढे खानापूर जवळ असलेल्या एका ढाब्याची आठवण नमूद करावीशी वाटते. सात – आठ वर्षांमागे खरसुंडीला गेल्यावर दुपारी जेवणासाठी त्या ढाब्यावर थांबलो होतो. देवदर्शन ( घरच्यांचं ) झाल्यामुळे नॉनव्हेज मागवण्यास काही हरकत नव्हती. पण हॉटेलमधल्या नॉनव्हेजपेक्षा घरातील बरं अशी माझी विचारसरणी असल्याने सुरवातीला मी नकार दिला. तरीही वडलांनी बळजबरीने मटण फ्रायची ऑर्डर दिलीच. नाईलाजाने केवळ टेस्ट पाहण्यासाठी पहिला पीस तोंडात टाकल्यावर मग मात्र जे तोंड खवळलं ते दोन चार प्लेट रिचवूनच शांत झालं ! त्यानंतर पुढल्या वर्षी जेव्हा खरसुंडीला गेलो तेव्हा त्याच ढाब्यावर जेवण्याचा बेत आखला होता पण वर्षभरात होत्याचं नव्हतं होऊन ढाब्याची जागा मोकळी पडली होती.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा