सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

हिंदू एकत्रीकरण





    जागतिक दहशतवादाचे बदलतं स्वरूप लक्षात घेता देशातील तमाम हिंदूंनी एकत्र यावं, एकत्रित व्हावं अशी जर खरोखर इच्छा असेल तर हे एकत्रीकरण जातीभेद नष्ट झाल्याखेरीज होणार नाही, हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 

    या स्थळी, कुठं आहे जातीभेद, इथून पुढे व्यवसायावर आधारित जाती बनतील अशी भोंगळ विधानं करण्याची तुम्हांला इच्छा होईल पण ती मनातच मारून टाका. कारण, तुम्ही ज्या स्वप्नीय जगात राहता त्यापेक्षा वास्तव जग खूप निराळं आहे. इथं जातीय अत्याचार होतात न होतात हा वादाचा मुद्दा मानला तरी अशा अत्याचारांची दखल घेताना प्रथम जात पाहिली जाते, याविषयी दुमत व्हायचं कारण नाही.

    कारणं काहीही असली तरी आपली सामाजिक मानसिकता हि जातीय असल्याचं वास्तव नाकारण्यात काहीही अर्थ नाही. जोवर हि मानसिकता नष्ट होत नाही तोवर हिंदू समाज एकत्रित येणं बिलकुल शक्य नाही. समाजाच्या नेत्यांना, धुरीणांना, विचारवंतांना या सत्याची कितपत जाणीव आहे, माहिती नाही. परंतु त्यांचे वर्तन पाहता याविषयी ते उदासीनच असल्याचे अधिक प्रकर्षाने दिसून येते. ख्रिस्ती धर्मांतराचा वा मुस्लीम दहशतवादाचा भरकटलेला प्रासंगिक मुद्दा पुढे करून समस्त हिंदूंना एकत्र आणण्याचं स्वप्न पाहणं हे वाळूचं घर बांधण्यासारखं आहे. याची प्रचीती आपण सर्वांनी वर्षानुवर्षे घेतलीय. पण आपण सर्वजण इतके बधीर झालोय कि वास्तवाची आपणांस बिलकुलही जाणीव होत नाही.

    हिंदू समाज अगदी मृतप्राय अवस्थेच्या नव्हे तर सरणावर जळून राख झालेल्या देहासारखा निर्विकार, थंड बनलाय. स. १९४७ च्या स्वातंत्र्याची आजकाल कोणाला आठवण होत नाही जितकी फाळणीची होते. ती फाळणी होण्यापूर्वी एकानं धर्मांतराची घोषणा केली होती. मुस्लीम लीगचा नंगानाच डोळ्यांसमोर दिसत असतानाही आमच्या नेत्यांनी काय केलं ? धर्मांतर करणाऱ्याला या धर्माकडून विशेष काही नाही तर बरोबरीचा दर्जा हवा होता. तो देखील आम्ही देऊ शकलो नाही. उलट समाजाच्या पचनी पडतील अशा सुधारणांचा पुरस्कार व उदोउदो करत राहिलो. पर्यायाने स. १९४७ फाळणीचा लढा मुस्लीम लीगच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या पाकिस्तान प्रेमी मुसलमानांशी विस्कळीत हिंदूंना निरर्थक, एकाकी प्रतिकार करून आपल्याच घरात आपली कत्तल उडवून घेण्याची नामुष्की ओढवली.

    फाळणीच्या जखमा त्यावेळी अगदी ताज्या असतानाही त्यानंतरचे दशकभरातले धर्मांतर आम्ही निमुटपणे पाहिलं. त्यानंतर मग फक्त एकच प्रतिक्रिया आम्ही व्यक्त करू लागलो. “ तुम्हांला हा धर्म वाईट वाटत असेल तर निघून जा. “

    ‘ चलेजाव ‘ चा महामंत्र एकानं पारतंत्र्यातील जनतेला दिला तोच आम्ही स्वधार्मियांना वर्षानुवर्षे --- अगदी आज, या क्षणीही देत आहोत आणि वर हिंदू एकीकरणाच्या पोकळ बाता मारत आहोत.

    एखाद्या किल्ल्यावर शत्रूचा हल्ला झाल्यावर सर्व सामर्थ्यानिशी शत्रूच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यापेक्षा किल्ल्यातील निष्ठावंत शिबंदीपैकी काही भागाला किल्ल्यातून बाहेर हाकलण्यासारखाच हा आत्मघाती प्रकार आहे.  

    सामाजिक सुधारणा वा समाजाची मानसिकता हि एका रात्रीत साध्य होणारी गोष्ट नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु, या सुधारणेची अंमलबजावणी करताना रोगाचे मूळ कायम ठेवून वरवर औषधोपचार करण्यासारखा जो काही प्रकार गेली कित्येक वर्षं चाललाय तो मला बिलकुल मान्य नाही.

    हे सर्व मी का लिहितोय ? खरं तर मलाही माहिती नाही. मी स्वतः कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही. कारण, या फालतू व कल्पित गोष्टीवर माझा काडीमात्र काय पण केसभरही भरवसा नाही. परंतु, मूळ जन्म, वाढ याच धर्माच्या संस्कारात झाल्याने कुठेतरी निश्चित आत्मीयता आहे. यात वावगं ते काय व कबूल करण्यातही कसली लाज !

    त्यामुळेच या धर्मातील लोकांनी भेदरहित ( जाती या अर्थाने ) जीवन जगावे अशी मनोमन इच्छा आहे. त्यामुळेच हा लेखनप्रपंच. अर्थात, एका फुटकळ लेखाने काहीच साध्य होणार नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे परंतु वारंवार याच विषयावर लिहिण्याची माझी आता बिलकुलही इच्छा नाही. कारण झोपलेल्या --- अगदीच काय तर मेलेल्यालाही जिवंत करता येईल पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं कसं करणार ?       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा