खंडीत स्वप्नं !




    तोच नेहमीचा गजबजाट. तीच नेहमीची लोकांची वर्दळ. तोच नित्याचा दिनक्रम. तारीख, वार, वेळ काहीही असो. क्रम कधी बदलत नाही. बदलायचाही नाही. वास्तविक बदल होण्याकरता किंवा दिवस बदलण्याची जाणीव करून देणारा असा कोणता नवीन क्षण वाट्याला येतो ? सारं काही तेच तर आहे. त्यात भर आणखी पडलीय विस्मृतीची. पण विस्मृतीची कि गोंधळाची ? निश्चित काही सांगता येत नाही. तसा मी पेशानं इतिहासकार. माझं नाव …. … काय बरं माझं नाव ? कधी कधी असंही होतं. नावांची इतकी गर्दी उसळते कि, त्यातलं आपलं कुठलं दुसऱ्याचं कुठलं तेच समजत नाही. प्रसंगांचही तेच म्हणा.


    पुरंदर किल्ला लांबून पाहताना मिर्झा राजाने घातलेल्या वेढ्याची आठवण होऊन डोंगराभोवती त्याची छावणी दिसू लागली. संध्याकाळची वेळ. तंबूत बसलेला मिर्झा राजा. वर डोंगरावर जीव मुठीत घेऊन बसलेले शिवाजीचे सैनिक आणि त्यांच्या दिशेने रोखलेल्या मोगलांच्या तोफा. पण हे काय ? मध्येच मिर्झाच्या शेजारी शिवाजी बसलेला का दिसतोय ? तेही हसत खेळत ! दोघेही थट्टा - मस्करीने परस्परांना टाळ्याही देत आहेत, मांडीवर थापही मारत आहेत. चाललंय तरी काय ?


    भुर्रकन काळ उलगडतच जातोय. डोळ्यांदेखत, माझ्यासमोर घडणारा प्रसंग क्षणार्धात बदलून मी कुठल्या तरी मांडवाखाली खुर्चीवर बसलेला दिसतोय. खुर्ची तर नेहमीची. परिचयाची. सावलीपेक्षाही जास्त साथ देणारी. पण मांडव कशाचा अन् कशासाठी ? क्षणात ओळखीचे - अनोळखीचे चेहरे आसपास दिसू लागतात. दिसणाऱ्या वाजंत्र्यांचे सुर कानावर आदळू लागतात. शेजारच्याच खुर्चीवर साडी नेसलेली तरुणी बसलीय. सुंदर आहे खरी, पण आहे तरी कोण ? आणि मला खेटून का बसलीय ? थोड्या वेळाने उलगडा होतो. ज्या पद्धतीने आजुबाजूचे वावरत आहेत. बोलत आहेत. त्यावरून ती तरुणी माझी बायकोच आहे. पण हि आपली बायको कशी ? हिला तर प्रथमच पाहतोय मी. यापूर्वी हा चेहरा पाहिल्याचं मला काहीच कसं आठवत नाही ? स्मरणशक्तीवर ताण देण्याच्या प्रयत्नात असता नकळत तिचा स्पर्श झाला. सारं लक्ष स्मरणाकडून मना - देहात सळसळणाऱ्या वासनेच्या अग्निकडे केंद्रित झालं. बायकोच आहे तर एक चुंबन --- मग ते सर्वांदेखत का होईना --- घ्यायला काय हरकत आहे ? मी मोठ्या निर्धाराने पुढे सरसावतोय, पण हे काय ……


     ……. ती खट्याळपणे हसत कुठे गायब झाली. अन् हा मांडव, आप्तगण कुठे विरले ? कानावर पडणारे सुर तर कधीच बंद झाल्येत. रात्रीच्या अंधारात रातकिड्यांच्या सान्निध्यात मी काळ्याभोर आकाशाखाली एकटाच, अन् तोही उघड्या अंगानं का बसलोय ?

माझं मलाच काही समजेना. मी आहे तरी कुठं ? माझ्या आसपास वावरणारे हे आहेत तरी कोण ? आप्तगण म्हणवतात खरे. असतीलही कदाचित. पण हे सर्व काळ माझ्या सोबत, आसपास का राहत नाहीत ? मध्येच कुठे निघून जातात ? मी माझ्याच विचारांत दंग. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेण्याच्या प्रयत्नात. यांत थकून झोप कधी लागली समजलंच नाही.


    पायाला काहीतरी चावल्यानं जाग आली. बघितलं तर लाल मुंग्या होत्या. त्यांना झटकून आसपास पाहिलं तर अनोळखी घरात मी एकटाच होतो. आसपास कुणीच नाही. खोलीही परिचयाची नाही. पण कधीतरी इथं आल्याची जाणीव मात्र होत होती. ओळख असूनही अनोळखी असल्यागत. अंथरुणावरून उठत मी व्हील चेअरवर आलो. सगळ्या रूमभर फिरलो. माझ्याखेरीज दुसऱ्या माणसाचं तिथं अस्तित्वच नव्हतं. मी विलक्षण गोंधळात पडून गेलो. नेमका आहे तरी कुठे मी ? गेले कुठे सर्वजण ? आख्खा दिवस या तंद्रीतच गेला. रात्र पडते समयी दरवाजा उघडला. दरवाजातून ती आली. आठवणीनुसार पत्नी !


    आल्या आल्या भांड्यांची तपासणी होऊन दुपारचं जेवण तसंच शिल्लक राहिल्याने त्यावरून भांडायला आरंभ. प्रथम तर मी संभ्रमातच पडलो. हि येते कधी जाते कधी  ? सारी आदळाआपट झाल्यावर काही काळ शांतता. अबोला. पुन्हा मिलनाच्या ओढीनं एकत्र येणं. काही काळाची निद्रा अनुभवताच उगवणाऱ्या दिवसाबरोबर नव्या भांडणाची सुरवात. कारण अज्ञात. फक्त जोरजोरात बडबड सुरु. मी पुन्हा विचारात. ' हे चाललंय तरी कायहि बायको म्हणवते. जवळ येते. प्रेमही करते अन् जीव तोडून भांडतेही. तेही कारण नसताना. ' मध्येच धाड्कन दरवाजा आपटल्याचा आवाज कानी आला. मी वेगाने तिकडे गेलो, तोवर ती जिन्याच्या पायऱ्या झरझर उतरून गेलीही होती. संभ्रमित स्थितीत, हताशपणे मी पुन्हा मागे फिरलो.


    बेडवर बसत बाजूलाच पडलेला ' टारफुला ' वाचायला घेतली. बेडवर फिरणाऱ्या मुंग्या पुन्हापुन्हा दंश करत आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होत्या. त्यांना चिरडत मी कादंबरीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मोबाइल वाजला. फोन तिचाच. दुपारचं जेवण वेळेत घेण्याची सूचना करत लगेच कट् केला. भूक तर नव्हती पण परत आठवण राहत नाही म्हणून जेवण वाढून घेतलं. जवळपास बर्फागत थंड पडलं होतं. माणसं भुकेपोटी जेवतात. इथं मी भीतीपोटी जेवत होतो. चव लागो लागो. अन्न संपले पाहिजे. नाहीतर कालच्या सारखा पुन्हा …. नुसत्या आठवणीनेच शहारा आला.



    मांडीवर ठेवलेल्या टारफुल्याची ओळन्ओळ लक्षपूर्वक वाचत अन्न अक्षरशः गिळत होतो. आबा कुलकर्ण्याच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या बायकोला जितका धक्का बसला नाही तितका मला बसला मी कादंबरी मिटवली. जेवणही संपलं होतं. ताटं धुवून ठेवल्यावर पुन्हा एकदा आबा कुलकर्ण्याच्या मृत्यूचा प्रसंग वाचला. पुढं मात्र वाचायचा धीर होईना. कुठेतरी खचल्यागत वाटत होतं. भरपेट खाल्ल्यानं झोपही बरीच आलेली. तेव्हा झोपेच्या निमित्ताने मनातल्या भीतीवर मात करत डोळे मिटले.


    अंगाला लागलेल्या लाल, काळ्या मुंग्या. अणु - रेणू इतके शरीराचे लचके तोडताहेत. मी हे निमूटपणे पाहतोय. माझ्यासमोर लागलेल्या मुंग्या. त्या बिचाऱ्याचा चेहराही दिसत नाही इतकी त्यांची दाटी. ' हळहळ व्यक्त करण्याखेरीज काय आपल्या हाती ' असं म्हणतो म्हणतो तोच त्याचा चेहरा दृश्यमान झाला … …. पाहताच अंगातून जीव गेल्यागत वाटलं. डोळ्यांसमोर अंधारी, काजवं सारं काही आलं. माझ्या पुढ्यात मीच पडलो होतो. अंगाभोवती मुंग्या लपेटून !


    त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती. कमालीचा शांत होता तो. पण मला मात्र वेदनांचा कल्लोळ सहन होईनासा झाला. मी मोठमोठ्यानं ओरडू लागलो.


    कोणीतरी घट्ट पकडून मला हलवत होतं. हाका मारत होतं. आवाजाच्या दिशेने पाहतो तर मी माझ्याच घरात. माझ्या परिवारात. आप्तगण म्हणवल्या जाणाऱ्यांच्या घोळक्यात. अंगाला घाम फुटलेला. आजूबाजूला पाहिलं तर मुंग्याच काय पण टारफुल्याचाही मागमूस नसलेला !          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा