Short Story - 1


    बऱ्यापैकी रात्र उलटून गेली होती. काही वेळापूर्वी भडकलेली चिता आता निवू लागली होती. जळणारी लाकडं, त्यावरील माणसाचं मांस, चरबी न् तेल व शेनी. सगळ्यांचा एक गंध निर्माण झाला होता. उग्राट. कोणाही जिवंत माणसाला शिसारी आणंल असा. पण हाच गंध हवाहवासा वाटतो. कोल्ह्याकुत्र्यांना. कोंबड्या भाजल्याव माणसाची भूक जशी चाळवते तशीच त्यांची गत झालेली. त्यांच्या लेखी माणसं काय न् कोंबड्या काय. दोन्ही एकच. जळक्या कुत्र्याला एकवेळ कोल्हं तोंड लावेल पण कुत्रं नाही. माणसाचंही तसेच. त्यामुळं आजच्या मेजवानीला नाक फेंदारत न् लाळा टपकवतच कोल्ही - कुत्री गोळा होऊ लागलेली.
    
    पोटच्या पोराला जाळावर ठेवून आई - बाप निघून गेलेलं. त्यांच्यासोबत पाठीवर पाठ मारून आलेली भनी भांवडंही. त्यांना सावरायच्या निमित्तानं नातलगांनीही काढता पाय घेतला होता. घडलं ते चांगलं झालं असं सगळ्यांनाच वाटत असलं तरी तसं उघड कोण म्हणून दाखवणार. उभं आयुष्य जाग्याव बसून काढलेल्या माणसाला अखेर मृत्यूद्वारेच सुटका मिळणार. पण हे त्याच्या आयबाला कोण सांगणार ? हळहळ व्यक्त करत, धीर देत सगळ्यांनी त्येच्या आयबाला, भावा भनीला तिथंन नेलं. जन्माला आल्यापास्नं सदान् कदा माणसात वावरणारा आता खऱ्या अर्थानं एकटाच जळत होता. तसा तो एकटाच होता !

    सगळ्यात असूनही एकाकी. कधी कोणी त्याला आपलं वाटलं नाही असं नाही. पण बोलला नाही. बोलण्यासारखी परिस्थितीच नव्हती. आतल्याआत जळत त्येनं दिवस काढले न् …… शेवट कसा झाला, काय झाला कुणालाच कळलं नाही. मरणाबद्दल संशय होता. पण चौकशी कोण करणार ? जिवंतपणाचं त्याचं हाल बघूनच सगळ्याजणांनी आपापल्या शंका गुंडाळून टाकल्या न् त्याला बांधायला सुरवात केली. न जाणो पुन्हा उठून बसायचा व त्येचं तेच रडगाणं सुरु व्हायचं !

    सगळी आवराआवर करता न्हाय म्हनलं तरी संध्याकाळ झालीच न् आगीन देताना रात भरून आली. रातीच्या काळोखाला ढगांची गर्दी. मधेच इज चमकायची. ' मढं जळोस्तर तरी तुंबून ऱ्हायला पायजे. ' नाही म्हटलं तरी कित्येकांच्या मनात चिंता उमटलीच. पण तसं काही झालं नाही. मढं जाळून निखाऱ्याचं कोळसं झालं तरी आभाळ गळालं नाही. गळण्यासारखं आभाळाकडं तरी काय हुतं, जसं त्येच्याकडं जगण्यासाठी काय हुतं ?


    " तुझा जन्म व्यर्थ गेला रं भडव्या, तुझा जन्म .... " विझत चाललेल्या चितेकडं बघत तो पुटपुटला.
राख अजून झाली नव्हती. त्येनं निखाऱ्यात हात घालून काय घावतंय का बघायला प्रयत्न केला. उभ्या आयुष्यात त्यानं इतकं चटके खाल्ले होते कि या निखाऱ्यांचं, धगीचं त्याला काहीच वाटलं नाही. हाताला काहीतरी लागलं तसं त्याचं डोळं आनंदानं लकाकलं. त्येनं गडबडीनं ते निखाऱ्यातलं बाहेर काढलं. बऱ्यापैकी जळालं होतं. भाजलं होतं. पण त्याला ते हवं होतं. काढलेलं ते तो जवळ घेणार तोच त्येला कोल्ह्या कुत्र्यांची चाहूल लागली. त्यानं त्या दिशेकडं बघितलं. त्येला बघूनच बिचारी जाग्याव गपगार झाली. लाळ टपकत्या तोंडांनी व थिजल्या डोळ्यांनी ती त्येच्याकडं बघत हुती. त्येंच्याकडं बघत विजयी मुद्रेनं त्येनं ते जवळ घेत तोंडाजवळ आणलं. बऱ्यापैकी जळालेलं. भाजून निघालेलं ते बघून क्षणभर तोही थबकला. पण अगदीच क्षणभर. आणि लगेचच त्यानं ते तोंडात टाकलं. गरमागरम. मिटक्या मारत तो खाऊ लागला. जणू त्यानं कधी खाल्लेलंच नव्हतं. चवीधवीच्या पलीकडं तो गेला होता. भुकेची फक्त जाणीव होती. त्या भूकेपोटी त्याला काही सुचत नव्हतं अन् भूक भागवण्याचा तोच एक उपाय होता. त्याशिवाय पर्यायच नव्हता. तसं केलं नाही तर त्याला समाजात मान मिळणार नव्हता. स्थान मिळणार नव्हतं. जिवंतपणी नाही ते नाही. निदान मेल्यावर तरी मिळावं यासाठी ...... !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा