मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

संजय म्हणाला … ( भाग - १ )

  
           गेल्या दोन रात्री झोप नसल्याने डोळे तारवाटले आहेत. बाजूला बोकिलांच्या मिलिंदची ' शाळा ' पडली आहे. वाचायला आधी मजा वाटली पण ज्याने भाऊ पाध्यांची ' वासूनाका ' वाचली आहे त्याला ' शाळा '  काय आवडणार ? तसंही शाळेचं लेखन दोघांनी केलं आहे असं वाचताना सारखं वाटतंय. संवाद लिहिणारा मिलिंद वेगळा -- जो खरोखर ८ वी, ९ वी चे प्रतिनिधित्व करतोय तर प्रसंगांची वर्णने लिहिणारे बोकील वेगळे ! सुरवातीला मौज वाटली खरी, पण पुढेपुढे काही मजा येईनाशी झाली. बहुतेक जड अभ्यासाचा आणि इतिहासातील सवयीचा गड़े मुर्दे उखडण्याच्या सवयीचा हा परिणाम असावा. टाईमपास म्हणून फेसबुक ओपन केलं तर तिथंही शांतता ! जिवंतपणा काहीच नाही. तेच तेच फालतू वाद आणि चर्चा. बाकी, मी लिहितो त्यात तरी वेगळं काय असतं म्हणा ! शाळा - कॉलेज सुटल्यानंतर इतकं कंटाळवाणं कधी वाटलं नव्हतं. सकाळपासून काहीतरी लिहावं असं वाटतंय पण काय लिहायचं ? इतिहासावर काथ्याकुट करायचा मूड नाही. हलकं - फुलकं लिहिणं काय असतं ते आपल्याला माहिती नाही. बरं, दुसऱ्यांनी लिहिलेलं वाचावं तर, ' हा कोण आपल्यापेक्षा मोठा शहाणा आहे ' हा विचार लगेच मनात येतो.  हे झालं हयात लेखकांविषयी. हयात नसणाऱ्यांसाठी आपल्या मनात मात्र आदराची भावना आहे खरी, पण बव्हंशी अत्रे - देशपांडे आणि मिरासदार यांचे साहित्य गेली  १० - १५ वर्षे वाचून पचवत आहे त्यामुळे तसंही विनोदी असे वाचायचे काही बाकी राहिलंय असे वाटत नाही. 

                  भुताटकीच्या कथा वाचायच्या तर नारायण धारपांशिवाय पर्याय नाही आणि त्याही मी अधाशासारख्या बव्हंशी वाचून काढल्या आहेत. दुसरे आपले रत्नाकर मतकरी, त्यांचेही काही कथासंग्रह वाचलेत पण त्यांच्या कथांचा जो एक ठरलेला साचा आहे तो लक्षात आल्याने त्यांच्या कथा वाचण्यात काही मजा वाटत नाही. राहता राहिल्या थरार कादंबऱ्या, तर त्यासाठी बाबा कदम आहेतच, पण त्यांचीही एक ठराविक शैली ! दुसरे आपले संजय सोनवणी साहेब आहेत खरे, पण त्यांच्या कादंबऱ्या सुरु कधी होतात आणि कधी संपतात तेच समजत नाही. या माणसाला विलक्षण घाई ! बरं, साहेबांनी व्यावसायिक लेखनाला आरंभ केला तो वृत्तपत्रकार म्हणून. त्यामुळे जे काही लिहायचं ते नेमक्या आणि मोजक्या शब्दांत. त्यामुळं होतं काय, जी कथा चारशे पानांत रंगवून सांगता येईल ती डोक्यावरून पाणी म्हणजे ( हा त्यांचा आवडता शब्द की वाक्यप्रयोग, काय असेल ते ! ) दीड - दोनशे पानांत संपवून गडी मोकळा !

            बाकी, प्रणयकथा ( रोमान्स वगैरे फालतू शब्द वापरायचा नाय ! ) वाचण्यासाठी चंद्रकांत काकोडकर दोन पिढ्यांना पुरून उरलेत. त्यांच्या आधी ना. सी. फडके होते म्हणतात. तेव्हा आंबटशौकीन वृत्तीने त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या.  त्या वाचल्यावर सत्यनारायणाची कथा वाचल्याप्रमाणे वाटले. कसलं प्रेम आणि कसला प्रणय ! बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, अशी बोलाची पण मोलाची म्हण फडक्यांच्या बाबतीत चपखल बसते. 

                            म. गांधी, आचार्य अत्रे, शंकरराव खरात इ. थोर पुरुषांची आत्मचरित्रे तर आंबेडकर, सावरकर, स्वामी विवेकानंद, हिटलर पासून ते थेट शहाजी - शिवाजी - संभाजी, बापू गोखले, नेपोलियन बोनापार्ट पर्यंतच्या ऐतिहासिक पुरुषांची चरित्रे वाचून झाली. एवढी पुस्तकांची पाने खाऊन आणि चरित्रे - आत्मचरित्रे वाचून झाल्यावर देखील ना मला स्वतःमध्ये थोर महापुरुषांचे गुण असल्याचा साक्षात्कार झाला ना मला त्यांच्याकडून काही शिकता आले. व्यर्थ गेले जीवन ……. त्यांचे,  माझे नव्हे ! 

                वर ज्यांची नावं दिली ती झाली शहरी संस्कृतीची पुस्तकं. आता थोडं ग्रामीण …. सॉरी, गावरान भाषेतील कथा - कादंबऱ्यांचा पन उल्लेख झाला पायजे. त्या आंगानं बघायचं म्हंजी आपल्या शंकर पाटलांना तोड न्हाय. त्येंची बरीच पुस्तकं वाचली पन ' धिंड ' आणि ' ताजमहालात सरपंच ' अरारा … ! बोलायचं काम न्हाय !! यकदम जबराट. तुम्हांला म्हनून सांगतो, त्येंची ' ताजमहालात सरपंच ' वाचली आनि कवाच्या काळातील आशा पारेख लय दिखनी दिसाया लागली. त्याशिवाय त्येंची ' टारफुला ' म्हंजी टाप … ! इत्की भारी आन फाष्ट कादंबरी आपन दुसरी नाय वाचली. शंकर पाटलांच्या जोडीला आणखी एक पाटील गडी तयार आहेच, व तो म्हणजे विश्वास पाटील ! या पाटलांची ' झाडाझडती ' एक जबरदस्त कादंबरी. त्याबद्दल काहीही बोलायचं आपल्याला शक्य नाही. त्यांच्या सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या एका बाजूला आणि ' झाडाझडती ' दुसऱ्या बाजूला असे माझे स्पष्ट मत आहे. आनंद यादवांची ' झोंबी ' तर शालेय जीवनापासून खुणावत होती. लायब्ररी लावल्यावर प्रथम तिचा फडशा पाडला. त्यानंतर त्यांची इतरही पुस्तकं वाचली पण झोंबीची मजा त्यात नाही ! तसं पाहिलं तर माझ्या जन्मगावचे --- म्हणजे आजोळचे दोन लेखक जगप्रसिद्ध आहेत. त्यांपैकी एक म्हणजे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार आणि दुसरे ग्रामीण कथाकार व दलित साहित्यिक वामन होवाळ ! गाववाला असूनही पवारांनी लिहिलेली एक ओळ देखील अजून मी वाचली नाही तर होवाळांचे दोन - तीन कथासंग्रह वाचून झाले आहेत. पवारांचा संभाजी आणि संताजी वाचायची जाम इच्छा होती पण ते काही मला वाचायला मिळालेचं नाही. होवाळांचे कथासंग्रह मिळाले, पण कथांमधील काळ माझ्या जन्माआधीचा असल्याने त्या कथांमधील ग्रामीण परिस्थिती आणि  स्थिती यांत जमीन - अस्मानचा फरक असल्याचे लक्षात आले. त्यानंतरही दलित साहित्य वाचले. नाही असे नाही. परंतु ; एकाच वळणाच्या आणि धाटणीच्या कथा व वास्तवातील वेगळी परिस्थिती यांचा मेळ न बसल्याने त्यातला आपला इंटरेस्ट उडाला. 
           
                  हा सर्व साहित्यप्रकार वाचताना आध्यात्म कसे बरे बाजूला राहील ? तेथेही चारी वेद, भागवत पुराण पासून थेट मनुस्मृती ! भरीस भर म्हणून कुराण व बायबल. त्यानेही पोट भरलं नाही म्हणून शरियत आणि हदीस. त्याशिवाय बुद्ध व त्याचा धम्म आहेचं ! आता एवढं सर्व खाऊन झाल्यावर अजीर्ण ते व्हायचंच. मग त्यावर उतारा म्हणून तत्वज्ञानाचा मार्ग स्वीकारला. 

             तिकडे दोन वस्ताद भेटले. एक व. पु. काळे व दुसरे संजय सोनवणी. वपुंचे ' वपुर्झा ' वाचा. इतका भारी आधुनिक काळातील तत्ववेत्ता दुसरा कोणी नसेल. पुस्तकातील कोणतंही पान केव्हाही उघडून वाचू शकता. अशी सोय दुसऱ्या कोणत्याही लेखकाच्या पुस्तकात नसावी. दुसरे तत्वज्ञ म्हणजे संजय सोनवणी. यांचे ' ब्रम्ह्सुत्र रहस्य ' वाचल्यावर अर्धी भगवद्गीता वाचल्यासारखे वाटते आणि आपण सोडून बाकी सर्व जग मिथ्या असल्याचा साक्षात्कार होतो. अगदी शब्दसुद्धा ! बाकी काही का असेना, एका बाबतीत माझे आणि सोनवणींचे विचार जुळतात व ते म्हणजे आपण सोडून सर्व जग भ्रम आहे, मिथ्या आहे. त्यामुळेचं मी जे काही लिहितो, ते मिथ्या असल्याने लोकांचा काहीही समज होवो, तो भ्रमचं आहे असे मी मानतो. तर सोनवणींच्या लेखांवर जेव्हा टीका होते तेव्हा हा सर्व भ्रम आहे, माया आहे, मिथ्या आहे असे समजून ते आपले कार्य पुढे चालू ठेवतात. आता लोकं म्हणतील, हे गुरु - शिष्य मोठे चालू आहेत, तर म्हणू द्या. कारण ते मिथ्या आहे !                                                                                                


२ टिप्पण्या: