मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

मोहम्मद अझीज.... खुदा हाफिज !


                                                                     


    हल्लीच्या पिढीला हे माहिती नसतं ते माहिती नसतं असं म्हणण्याचा एक ट्रेंड आहे. पण हि गोष्ट खरी आहे कि, काही काही गोष्टी हल्लीच्या पिढीला खरोखरच माहिती नाहीत. त्यापैकी एक म्हणजे मोहम्मद अझीझ !
     थोड्या वेळेपूर्वीच मोहम्मद उर्फ मुन्ना अझीजच्या निधनाची बातमी ऐकली आणि काही क्षण मन सुन्न झाले. क्षणभरात त्याची कितीतरी गाणी मनात तरळून गेली अन त्याचवेळी आम्हाला सर्व काही मिळालं पण फेस व्हॅल्यू काढील मिळाली नाही.. लोकं आवाजाने आम्हाला ओळखतात पण चेहऱ्याने नाही.. हि त्याने एका इंटरव्युव्हमध्ये बोलून दाखवलेली खंतही आठवली. ज्यावेळी तो कॅमेऱ्यासमोर बोलला होता तेव्हाही ऐकताना वाईट वाटत होतं आणि आता तर..
    रफीच्या निधनानंतर त्याच्या स्टाईलमध्ये गाणाऱ्यांना शोधण्याची इंडस्ट्रीने एक मोहीम आखली त्या मोहिमेत शब्बीर कुमार, मुन्ना अझीज सारखे गायक वर आले. तसे पाहिले तर मुन्ना अझीज बंगाली इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतच होता. शिवाय इथे रफी असतानाच त्याच्या आवाजाच्या बऱ्यापैकी जवळ जाणारा अन्वरही पाय रोवून होता. तुलनेनं पाहता अझीज कुठेच नव्हता. आवाजाच्या बाबतीत पाहिलं तर त्याचा आवाज बऱ्यापैकी जड. त्यामुळे रफीच्या पश्चात अन्वरच इंडस्ट्रीवर राज्य करणार हे उघड होतं. पण तकदीर नावाची चीजच और असते.
    अन्वरला यश पचवता आले नाही. शब्बीर कुमारला चान्स मिळूनही त्याचे मनमोहन देसाईसारख्या डायरेक्टर सोबत खटके उडून ' मर्द ' च्या टायटल सॉन्गसाठी अन्नू मलिकने मुन्ना अझीजला आमंत्रित केलं.. .. बाकी मग इतिहासच आहे.
    स. १९८५ च्या मर्द पासून . १९९५  च्या करण अर्जुन पर्यंत अझीजने एक दशक गाजवलं. तसं पाहिलं तर . १९९० च्या ' आशिकी ' मधून जन्मला आलेल्या कुमार सानू या बंगालच्याच वादळाने इंडस्ट्रीतील आधीचे सगळे प्रस्थापित गायक उधळून लावले होते. केवळ स्वतंत्र धाटणीचा आवाज म्हणून उदित नारायण त्या वादळात आणि नंतरही टिकून राहिला. तुलनेनं मुन्ना अझीज, शब्बीर कुमार, अमितकुमार वगैरे मंडळी इंडस्ट्रीतुन बाहेर पडायच्या मार्गावर होती / बाहेर पडली होती.
    यादृष्टीने पाहिले तर अवघी पाच वर्षांची सांगीतिक कारकीर्द मुन्ना अझीजची म्हणता येईल. पण या अल्पावधीत देखील बऱ्यापैकी श्रवणीय गाणी तो गाऊन गेला. अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञीक, साधना सरगम सारख्या तेव्हाच्या नव्या दमाच्या तर लता मंगेशकर, आशा भोसले सारख्या दिग्गज पार्श्वगायिकांसोबतची त्याची बरीच गाणी गाजलेली आहेत.   त्याच्या काळातील जवळपास सर्वच पहिल्या फळीतील अभिनेत्यांसाठी त्याने पार्श्वगायन केले. त्याचप्रमाणे एक काळ गाजवून सोडलेल्या राजेश खन्ना, दिलीपकुमार, शम्मी कपूर सारख्या अभिनेत्यांकरताही त्याने प्लेबॅक दिला.
    विशेषकरून दिलीपकुमारसाठी कर्मा, इज्जतदार, सौदागर आणि किला या (बहुतेक) चार सिनेमांसाठी पार्श्वगायन केले. पैकी, कर्मा आणि सौदागर मधील गाणी बऱ्यापैकी गाजली आजही ती परिचित आहेत. फक्त त्यातले प्लेबॅक सिंगर नावाने किंवा चेहऱ्याने कोणाला माहिती नाहीत. ( उदा :- मनहर उदास ) असो.
    राम लखनचे टायटल सॉन्ग असो कि त्याच चित्रपटातील माय नेम इज लखन, त्रिदेव आणि विश्वात्मामधील सनी देओलच्या वाट्याला आलेली गाणी, चालबाज मधील कविता सोबतच्या तेरा बिमार मेरा दिल या गाण्यातील मुन्ना आणि कविताची जुगलबंदी मस्त आहे. तशीच ती गोविंदा - नीलमच्या ' चलो चले दूर कही ' मध्ये पण दिसून येते. अनुराधा पौडवाल सोबतचे ' 'तेरी मेरी प्यार भरी बातों में ' देखील सुश्राव्य आहे. खुदा गवाह माधील अमिताभच्या वाट्याला आलेल्या गाण्यांपैकी ' तु मुझे कुबुल ' पुन्हा एकदा गाजू लागलं आहे. लक्ष्मीकांत - प्यारेलालचा तो ऑर्केस्ट्रा, वाद्यांची अचूक निवड हे सारं जरी यामागे असलं तरी गायक - गायिकांची पुण्याईही नाकारता येत नाही. तीच बाब ' मय से मीना से ना साकी से ' गाण्याची. एक मध्यमवयीन इसम या गाण्यावर गोविंदासारखा नाचला आणि रातोरात या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल होऊन आठवणींच्या समृद्ध अडगळीत पडलेलं हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं. तसं पाहिलं तर मुन्ना अझीजच्या गाण्यांविषयी लिहिण्या - बोलण्यासारखं बरंच काही असलं तरी त्या सर्वच गाण्यांचा इथे परामर्श घेता येत नाही, हे खेदाने कबूल करावं लागत आहे. असो.
    एक पार्श्वगायक म्हणून मोहम्मद अझीजचं इंडस्ट्रीतील योगदान काय ? हा प्रश्न तसा सर्वांच्याच मनात आहे. ज्यांना रफीच्या आवाजावर प्रेम आहे त्यांना रफीची नक्कल करणारे नेहमीच प्रिय वाटत आले आहेत. ज्यांची रफीवर श्रद्धा आहे ते रफीच्या पलीकडे कोणाला गायक म्हणून मानायला तयार नाहीत. ज्यांना रफीच्या आवाजाचे वावडे होते त्यांना शब्बीर काय अन मुन्ना काय, नेहमीच बेसुरे वाटत आलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरोखर प्रश्न पडावा कि मुन्ना अझीजचे या इंडस्ट्रीमधील नेमकं योगदान तरी काय आहे ?
    ज्या काळात मोहम्मद अझीज प्लेबॅक सिंगर म्हणून नावारूपास आला त्यावेळी इंडस्ट्रीवर किशोरकुमारचं साम्राज्य होतं. त्याच्या सावलीत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास खुद्द अमितकुमारला संघर्ष करावा लागत होता. अन्वरने रफीची जागा घेऊन सोडली होती तर तिथे पोहोचण्याचा शब्बीरचा प्रयत्न चालला होता. इंडस्ट्रीचं एक गणित आहे. जिथे आर्थिक लाभ दिसतो तिथे गुणवत्तेला कात्री लावली जाते. शब्बीरच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन त्याला झेपतील अशी गाणी बनवण्यात येत होती.... अशा वेळी शब्बीरला रिप्लेस करण्याची मनमोहन देसाईने धमक दाखवत मोहम्मद अझीजला मुख्य प्रवाहात आणले. त्यानंतर म्युझिकचा ट्रेंड बदलला. शास्त्रीय संगीताचे ज्ञान असल्याने, क्लासिकल टच असलेली गाणी गाण्यास मुन्ना अझीजला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे थोडीफार सुरीली गाणी त्या काळात जन्माला येऊ शकली. अर्थात, हे केवळ एकट्या मुन्ना अझीजमुळे झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु हिंदी गाण्यांच्या सुवर्णयुगाचा जो काही अवशेष बाकी राहिला होता....त्याचा थोडाफार अंश टिकून राहण्यामागे ज्या मंडळींचे योगदान कारणीभूत ठरले त्यापैकी एक मोहम्मद अझीज होता, हे विसरता येत नाही.


https://www.youtube.com/watch?v=91K8Qn3_1V0

https://www.youtube.com/watch?v=ZCGRqbKl38U

https://www.youtube.com/watch?v=t0-_VhLeHv0