शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

आम्ही तर ( फेक ) आचार्य !


    दिवस चमत्कारांचे आहेत. दिवस नमस्कारांचे आहेत. आपल्या समोर नम्रपणे हात जोडून चरणस्पर्शासाठी वाकलेला मनुष्य आपणांस जमिनीशी कधी समांतर करेल याचा अंदाज देखील यायचा नाही. अशा या जगावेगळ्या ( मुलाखा वेगळ्या म्हणणार होतो पण परत ' मराठी माणूस संकुचीत वृत्तीचा ' असल्याची ओरड व्हायची ! ) जगात माझ्याबरोबरही चमत्कार होईल असे वाटले नव्हते. पण झाला. साधा सुधा नाही तो पण भयंकर मोठा असा चमत्कार घडला.

    मला माझ्या गतजन्मातील स्मृती तुटक स्वरूपात आठवू लागल्या. त्या स्मृतीची माला गुंफल्यावर एके दिवशी रात्री मला दृष्टांत झाला. एक दिव्य ज्योत माझ्या नेत्रांसमोर तरळली व त्या ज्योतीतून काही शब्द उमटले. त्या शब्दांचा अर्थ लागेपर्यंत तो ज्योत अंतर्धान पावली आणि आम्ही खाडकन जागे झालो. आम्हांस कळून चुकले कि, आम्ही अवतारी पुरुष आहोत. आजवर ज्या काही प्रचंड घडामोडी घडून आल्या त्यामागे आमचीच ' कलागत वृत्ती ' कार्यरत होती. अर्थात, खुद्द प्रभुनेच मला सांगितले कि, " वत्सा तू निमित्तमात्र आहेस. कर्ता करविता मीच आहे ! " तेव्हा हातून घडून गेलेल्या कृत्यांचा आम्हांस अजिबात खेद वाटत नाही. अहो स्वकृत्यांचा खेद - खंत वाटेल तो अवतारी पुरुष कसला !


    त्या दिवसापासून ( ' नेमक्या कोणत्या ' हे विचारू नये. आम्हांस सर्व दिवस - काळ समान ! ) आम्हांस, आमच्या हातून घडलेल्या महत् कृत्यांच्या आठवणी आठवण्याचा जणू छंदच जडला. परंतु, आमच्या स्मृतीशृंखलेत एक फार मोठी त्रुटी अशी आहे कि, गतकाल आम्हांस अगदी अल्प क्षण आठवतो. मागचा - पुढचा संदर्भ नसलेल्या स्थितीत. परंतु, जो काही आठवतो तो अगदी लख्खपणे नजरे समोर तरळतो. किती उदाहरणे म्हणून तुम्हांस मी सांगू ?


    गोकुळातील कृष्णाला बासरी उत्कृष्ट वाजवता येते असे तुम्ही मानता. पण त्याला बासरी आणि ऊसातील फरक कोणी समजावून सांगितला माहिती आहे का तुम्हांला ? उत्तरी राम व दक्षिणी मारुतीमधल्या दुभाष्याची भूमिका कोणी बजावली हे कोणास ठाऊक आहे का ?
राम - रावण यांच्या अहिंसक युद्धांत रावणाच्या पोटाला गुदगुल्या करण्याची मसलत रामाला कोणी सुचवली ? आता हि गोष्ट वेगळी कि, हिंसाप्रिय मंडळींनी रावणाची बेंबीच उध्वस्त करण्याची कथा लिहिली. बाकी, स्त्रियांच्या नाभीकमलांशी खेळायचे सोडून पुरुषांच्या बेंबींशी खेळणारे महाभाग कोण होते कोणास ठाऊक ? जाऊ द्या. आम्हांस आत्मप्रौढीची वा प्रसिद्धीची अजिबात गरज नाही. पर्वा नाही. नाहीतर आज तुम्ही ज्या घटना अलौकिक मानता, त्या घडण्यामागील आमच्या हस्ताचा क्षेप तुम्हांस स्पष्ट दिसला असता.


    ज्याला तुम्ही आज राजा शिवाजी म्हणता, त्या शिवाजीला आगऱ्याहून निसटून जाण्याची युक्ती आम्हीच सांगितली. इतकेच नव्हे तर दक्षिणेतील तुरीच्या शेंगा शिवाजीच्या वतीने आम्हीच औरंगजेबाच्या हाती दिल्या व कच्च्या शेंगा न सोलता खाताना, " अशा शेंगा मी जन्मात कधी खाल्ल्या नव्हत्या " असे तो म्हटल्याचेही आम्हांस स्मरते. पण कोणा उपटसुंभ इतिहासकाराने तुरीच्या शेंगा खाण्याची गोष्टच अतिरंजित केली. मूर्ख लेकाचा ........ माफ करा. या जन्मीचे संस्कार सुटत नाहीत. मूढ बालक कुठला ! 
 
    शिवाजीच्या परिवाराशी आमचा बऱ्यापैकी स्नेहसंबंध होता. संभाजी संस्कृत आमच्या समोरच शिकला. एकदा त्याने औरंगजेबाला संस्कृत भाषेत एक सुंदर असे खंडकाव्य लिहून पाठवले. मूढ औरंगला संस्कृत सारख्या देववाणीचे ज्ञान कुठे ? तो खंडकाव्य घेऊन दक्षिणेत आला व त्या खंड काव्याचे खंडित अर्थ लावत इथेच निजधामास गेला.


    आमचा प्रिय औरंग देहत्याग करून परलोकवासी झाल्याने आम्ही उद्विग्न होऊन देशांतरास गेलो. तिथून थेट अवतीर्ण झालो ते पानपतावर. काय भयानक कुंड पेटलं होतं ते ! इकडे अब्दाली इस्लामचे दिव्यतेज आणखी प्रखर करण्याकरता अन्न - पाणी त्यागून उपास करत होता. दिवसातून पाच काय पन्नास वेळा तो व त्याचे अनुयायी नमाज पढत होते तर तिकडे सदाशिवराव पेटलेल्या हवनकुंडात समिधांवर समिधा टाकत होता. कोणत्याही परिस्थितीत हिंदू धर्माचे प्रज्वलित झालेले दिव्यतेज त्यांस लुप्त होऊन द्यायचे नव्हते. इकडे माथी जमिनीला टेकत होती तिकडे काटक्या यज्ञात पडत होत्या. अखेर, भुईला लागलेली मस्तके जिंकली. कारण समिधाच संपल्याने सदाशिवाने स्वतःचा देह एक समिधा कल्पून अग्निकुंडात झोकून दिला व आपसुक अब्दाली जिंकला ! 


    तुमच्या जोतीबा फुलेने शाळा उघडली. म्हटलं, चला एका नव्या युगाची नांदी झाली. पण कोणतीही गोष्ट सहजासहजी घडून आली तर तिचे महत्त्व पटत नाही. म्हणून जोतिबाच्या शाळेवर बहिष्कार टाकण्यासाठी समाजास आम्हीच प्रवृत्त केले. सरळ चार चौघांत जाऊन आम्ही प्रश्न टाकायचो कि, " अहो, बायका जर लिहू - वाचू लागल्या तर त्या नोकऱ्या करतील. आणि त्या नोकऱ्या करू लागल्या तर पुरुषांनी काय त्यांची लुगडी धुवायची ? " बस्स !कोणत्या पुरुषाला हा अवमान सहन होईल ? लगेच त्यांनी हाती लागेल ते म्हणजे --- दगड - धोंडे, माती, चिखल व काहीच मिळेना म्हणून गायी - म्हशींना मा - मारून त्यांना शेण टाकायला लावून ते उचलून फुले दांपत्यावर फेकले. उगीच नाही जोतीबा ' महात्मा ' झाला ?
 
    इतकेच काय, गंगाधररावांना त्यांच्या मुलाचे नाव ' केशव ' जरी असले तरी ' बाळ ' नावानेच पुकारण्यास कोणी सांगितले ? फार काय, तुमच्या त्या ' लोकमान्याला ', म्हणजे आमच्या बाळला आम्ही बोलता बोलता बोललो कि, " अरे बाळ, या इंग्रज सरकारचे डोकं काही थाऱ्यावर नाही बघ. दिवस भरलेत यांचे जणू ! " बाळ भलताच विद्वान. त्याने आमच्या संपूर्ण वाक्याचा अर्धा भाग घेऊन आपल्या वर्तमानपत्रात सरळ छापून कि हो टाकला ! तेव्हाच आम्ही ओळखले कि, प्रसार माध्यमं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होण्याचा काळ लवकरच येणार आहे. त्याचीच प्रचीती सध्या तुम्ही घेत आहात !


    पुण्यात आम्हांस फार काळ राहणं आवडलं नाही. आमही परत स्थानांतर केलं व एका तेजस्वी युवकाच्या गृहात प्रकटलो. तो तरुण इंग्रजांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात करावयाच्या क्रांतीच्या उपाय योजनांची आखणी करत होता. परंतु त्याचे मराठी लेखन अतिशय अशुद्ध. तो ' इ / ई ' असे न लिहिता ' अि / आी ' असे लिहायचा. आम्ही त्यांस बजावले, " अरे, विनायका असे अशुद्ध लिहू नको." पण तो ऐकेल तर शपथ ! अखेर इंग्रजांनाच त्याच्या क्रांतीकार्या ऐवजी भ्रष्ट भाषिक लेखनाची दखल घ्यावी लागली व जोवर त्याची लेखनपद्धती सुधरत नाही तोवर त्याला अंदमानात एकांतवासाची शिक्षा सुनावली. विनायक पण मोठा हट्टी. अंदमानात त्याने एकांतवास पत्करला पण आपली लेखनपद्धती काही बदलली नाही. 

 
    त्या तरुणाचा सहवासात आम्ही अगदीच कंटाळलो. जेव्हा बघावं तेव्हा त्याला कशाचा तरी ध्यास असायचा. कसला ते माहिती नाही. पण तो सदोदीत आपल्याच कल्पनासृष्टीत रममाण असायचा. त्याला तसाच स्वप्नांच्या जगतात सोडून आम्ही दुसरीकडे प्रस्थान ठेवले.


    एका ठिकाणी आम्ही अवतीर्ण झालो. नुकताच परदेशातून आलेला एक इसम चिंताक्रांत अवस्थेत बसला होता. त्याची ओळख करायला गेलो तर तो परिचित निघाला. किंबहुना त्याचे नाव देखील आम्हीच ठेवले होते. मोहनदास ! त्याला चिंतेचे कारण विचारले असता, त्याला देशाचे राजकीय नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा असल्याचे समजले. आम्ही डोळे मिटले. मग उघडले. आणि त्यांस सांगितले, " वत्सा, तू सर्व प्रथम वस्त्रांचा त्याग कर. जैन मुनींप्रमाणे जन्मजात अवस्थेत न राहता फक्त लज्जा रक्षणार्थ वस्त्रं परिधान कर. आणि ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ' या उक्तीच्या विरोधात वाग. किंबहुना कोणत्याच शब्दावर कायम राहू नको कि सापडू नको. " आमच्या त्या उपदेशाचे अमृत मिळताच मोहनदासचे चार डोळे ( दोन चर्येवरचे व दोन चष्म्याचे ) लकाकले. पुढे तो अल्पावधीत ' बापू ' झाला. 

 
    मधल्या काळात आम्ही असेच भ्रमंती करत असताना आमच्या भीमाची भेट झाली. महाभारतातल्या भीमाप्रमाणेच हाही विशाल देहाचा स्वामी ! पण देहाप्रमाणे बुद्धीही विशाल. कुंती त्या बाबतीत कमनशिबी निघाली ! आम्ही भीमास म्हटलं, " काय रे बाबा, काय चाललंय तुझं ? " तेव्हा नवीन ग्रंथलेखनाच्या विचारात असल्याचे त्याने सांगितले. पण लेखनास विषय मिळत नव्हता. तेव्हा आम्ही म्हटलं कि, " भीमा तू वर्णव्यवस्थेच्या विरोधात आहेस तर शूद्र - अतिशूद्रांवर ग्रंथ लेखन कर. " आमचे बोल ऐकताच भीमाचे नेत्र अत्यानंदाने चमकून उठले. 


    तेथून आम्ही थेट केशवरावांकडे गेलो. तिथे पहिले तर ते आपल्या लेखन कार्यात मग्न. त्यांचा एक मुलगा काहीतरी तंतुवाद्य वाजवत होता तर दुसरा कागदावर रंगरंगोटी करत होता. आम्ही त्या चित्रकाराकडे गेलो व विचारले, " बाळ, तुझं नाव काय ? " तो आमच्याकडे रोखून बघत उद्गारला, " माझं नाव ? बाळ ! " तेव्हाच आम्ही ओळखलं ' बोले तैसा चाले ..' या उक्तीतला हा पुरुष आहे. आणि नाव ' बाळ ' असल्याने याच्या पावलांची व बडबडीची दखल तशीच घेतली जाणार ! 

 
    मुंबईचा कंटाळा आल्याने देशावर आम्ही प्रस्थान ठेवले. एका गावाच्या धर्मशाळेत आम्ही मुकाम ठोकला व त्या गावची तालीम पाहण्याचा विचार आमच्या मनात आला. आम्ही तडक तालमीच्या दिशेने गेलो. तिथे पाहतो तर आबालवृद्ध पुरुष मंडळी अंगाला तेल - माती लावून एकमेकांना घट्ट आलिंगनं देत त्यातून सुटण्याची धडपड करत होते तर, एक पोरगं अंगावरील कपडे न काढता हातात तेल घेऊन जिभेला लावत होतं. आम्ही त्यांस त्याचे कारण विचारले असता उत्तर आले नाही पण, त्याच्या बाजूला असलेला मुलगा म्हणाला, " आवं म्हाराज, त्यो तसाच हाय. हि मान्सं आंगाला त्येल लावत्यात - त्यो जीबंला. पन फरक म्हंजी आंगाला त्येल लाव्ल्येली एक येळ सापडत्यात पण जीबंला त्येल लावल्येला ह्यो पठ्ठ्या काय सापडत न्हाय ! " आम्हांस त्या मुलाच्या शब्दांची प्रचीती लवकरच आली. जिभेला मनसोक्त तैलस्नान घालून ते पोरगं आखाड्यात उतरलं आणि पाचच मिनिटांत पाच - पन्नास जणांना उताणं पाडून घरी पण निगुन गेलं. जाताना तोंडातल्या तोंडात " शरदांच चांदणं ..." असं काहीतरी पुटपुटत गेलं.


    तर अशा ह्या आमच्या अवतारी जीवनातील काही स्मृती. तूर्तास इतक्याच स्मरतात. बाकी, आठवताच जगासमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. काय आहे, दामोदरदासला मुलाचे नाव विवेकानंदाच्या मूळ नावावर नाव ठेवण्यास सांगितल्यापासून आमच्यातील सिद्धी हळूहळू लुप्त होऊ लागल्याने चरितार्थासाठी आपल्या पुर्वानुभावांचे व कर्मांचे लेखन प्रसिद्ध करून चार मोहरा गाठीशी बांधण्याचा विचार आहे. दिवस अन् काळ किती भर्रकन उलटतो. नाही !    

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र


    सन्मानानीय पंतप्रधान महोदय,

     तुम्हांला कधी पत्र पाठवेन असं माझ्या ध्यानी मनी काय स्वप्नातही आलं नव्हतं. पण आज हे प्रत्यक्षात घडत आहे. यावरून तुम्ही सत्तेत आल्यापासून आजवर कधीच न घडलेल्या घटना / चमत्कार घडण्याचा जो धडाका सुरु झाला आहे, तो आपला केवळ प्रसिद्धीचा फार्स आहे असं आजवर मी जे समजत होतो त्या समजाला चांगलाच छेद ( कि तडा ? जे असेल ते ! ) गेला आहे. ( वाक्य खूप लांबलचक झालं ना ? हि खरी भारदास्त आणि ५० - ६० वर्षांपूर्वीची विद्वानांची मराठी आहे. फक्त अनुस्वारांची कमी ! )


    प्रस्तुत पत्र मी मराठीत लिहितोय आणि तुम्हांला ( माझ्या माहिती प्रमाणे ) गुजराथी, हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त भाषा येत नाहीत. पण हरकत नाही. तुमचे सोशल मिडीयावरील नेत्र या मराठी पत्राचा तुम्हांला हव्या त्या भाषेत तर्जुमा करून देतील. असो, पत्रास कारण म्हटलं तर आहे आणि नाहीही ! तुमची पंतप्रधानपदी निवड  झाल्याबद्दल जवळपास सर्वांनी तुमचे अभिनंदन केले पण मी नाही ! अर्थात, त्याने फरक काय पडतो म्हणा ? पण यावरून मी तुमचा भक्त, कार्यकर्ता तर सोडा साधा मित्रही नाही, याची तुम्हांला कल्पना यावी. 


    तुम्ही या देशाचे पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगली, बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारी अधिकारी - मंत्र्यांचा संगनमतीय भ्रष्टाचार इ.चे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनेल्स मधील प्रमाण तरी कमी झालं आहे. यावरून ' अच्छे दिन ' येऊ लागल्याचा मला अनुभव येत आहे.


    सध्या देशात व देशाच्या सीमेवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. परंतु , मला तुमचे लक्ष एका वेगळ्या मुद्द्याकडे वळवायचे आहे व तो म्हणजे भारताला कार्यक्षम पंतप्रधानांची जशी दीर्घ परंपरा लाभली आहे त्याचप्रमाणे ' शो ऑफ ' करणाऱ्यांचीही आहे. अगदी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचाही त्याला अपवाद नाही !

    तुम्ही त्यांस अपवाद ठराल असे उगाच वाटून राहिले होते पण नाही. तुम्हीही त्याच वाटेचे वाटसरु निघालात ! परंतु , एकवेळ तुम्ही परवडले पण तुमचे अनुयायी नकोत अशी आता वेळ आली आहे. उदाहरणार्थ :- भारतातील मूर्ख, अडाणी, गांवढळ ( सुशिक्षित - अशिक्षित दोघेही ) लोकांना आजवर १०० वर्षांहून अधिक कित्येक समाजसेवकांनी, राजकीय नेत्यांनी स्वच्छतेचे धडे दिले. पण या मुर्खांनी त्यावर अस्वच्छतेचे बोळे फिरवले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातील प्रत्येक सभेच्या अखेरीस लोकांना तुम्ही कळकळीने विनंती करायचा कि, ' सभास्थानावर कचरा फेकू नका. कचरा दिसला तर स्वतः साफ करा ! ' पण हे अडाणी लेकाचे थोडी ऐकणार ? त्यांनी दामदुपटीने कचरा करून टाकला.

    तुम्ही स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. परंतु, तुमच्या इतके घाणीमध्ये स्वतः उतरून स्वच्छता करण्याचं धाडस तुमच्या अनुयायांत कुठे हो ? त्यांनी स्वच्छ ठिकाणी झाडांच्या पाला - पाचोळ्याचा कचरा पसरवून अंगरक्षकांच्या गराड्यात तो झाडूने दूर करायचा नाटकीपणा आरंभला तो अजूनही चालूच आहे ! यामुळे जगात हसं कोणाचं झालं आणि होतंय हे न समजण्याइतके तुम्ही अडाणी नाही !   


    भ्रष्टाचाऱ्यांनी गोळा केलेल्या काळ्या पैशाला पाय फुटून तो परदेशात गेला. त्याला पकडून या देशात परत आणण्याचा विडा तुम्ही उचलला. पण तो काळा पैसा ज्या देशात ठेवला गेला असं आजवर सर्वजण समजत होते तो त्या देशातून कधीच गायब करण्यात आलेला हे आता सर्वांनाच कळून चुकलेलं आहे. फक्त उघड कोणी बोलत नाही इतकेचं !

    तुम्ही पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगे तर आता पूर्णपणे थंडावले आहेत. लोकं उगीचच बडोदा, दिल्ली विषयी अफवा उठवतात. त्यांची सवयच आहे ती ! असो, देशातील धार्मिक दंगे थंडावले पण आज महाराष्ट्रात काय चित्र दिसत आहे ? महाराष्ट्रच काय संपूर्ण देशातील मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांवरील अत्याचारात कुठे कमतरता आली आहे का ? त्यात खंड पडला आहे का ? बिलकुल नाही. तुमच्या समर्थ हातांत  देशाची शासन व्यवस्था असताना हे असे का व्हावे ?

    तुमच्या पक्षाचा जन्मदाता रा. स्व. संघ हा हिंदुत्वाच्या निव्वळ पोकळ गप्पा मारतो. म्हणे, ख्रिस्ती लोकं आदिवासींचं धर्मांतर करतात. अरे, जी गोष्ट ते हजार मैलांवरून येऊन सहजपणे करतात ती तुम्हांला इथल्या इथे करता येऊ नये ? पण हि गोष्ट त्यांना सांगणार कोण ? जिथे आदिवासींच्या व धर्मांतराच्या बाबतीत संघाची हि उदासीनता तिथे ते मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांविषयी काय करणार हे दिसत आहेच !  कधी तरी वेडाचे झटके आल्याप्रमाणे संस्कृतीरक्षणासाठी ते आजकालच्या मुला - मुलींवर दादागिरी करतात. करणारच म्हणा ते ! कारण, ज्या गोष्टी त्यांना उघड करता येत नाही त्या करण्याचा इतरांनी तरी आनंद का घ्यावा अशी स्वार्थी भावनाही त्यांच्या मनी असते.

     काँग्रेसपेक्षा भाजपा बरी, अशा भावनेने समाजातील सर्व जाती घटकांनी तुम्हांला निवडून दिले आहे. तेव्हा सर्व जाती घटकांचा विचार करून तुम्ही शासकीय निर्णय घ्याल अशी आशा आहे. परंतु , अशीही वेळ आणण्याची कृपा करू नये कि, मराठीत नव्या म्हणीची भर पडावी - ' काँग्रेसपेक्षा मोदी भयंकर ! '

    असो, पत्र खूप दीर्घ व कंटाळवाणे झाले. तुम्हांला वाचण्यासाठी तेवढा वेळाही मिळायला हवा. आम्ही काय ? रिकामटेकडे ! शाळा - कॉलेजांत थोडं फार विचार करायला व लिहायला शिकलो म्हणून पांढऱ्यावर काळं करत बसलो. इतकेचं ! कळावे.

                                       
                                                               आपला प्रकट विरोधक,           
                                                                संजय क्षिरसागर     

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

माणुसकी हरवत चाललेली माणसं… !


    काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात जवखेडे खालसा येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्याचा प्रकार घडला. घटना घडून गेली. विछिन्न देहांवरील अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मरणारे लोक स्वभावाने चांगले होते, गावात त्यांचे कोणाशी भांडण नव्हते असे सर्टीफिकेट पोलिसांनी देऊनही टाकले. नंतर अचानक मृत व्यक्तींपैकी एकाचे गावातील स्त्री सोबत प्रेमसंबंध असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यामुळे या प्रकरणाला निराळेच वळण लागले. पोलिसांची प्रस्तुत प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटावी अशीच आहे. कोणाच्या तरी दबावाखाली उलट - सुलट विधानं करून पोलिस खाते या प्रकरणाविषयी समाजाची दिशाभूल तर करत आहेच पण सोबतीला संशयाचे वातावरण निर्माण करून तणावाला चालनाही देत आहे.

     पोलिसांनी या बाबतीत ढिलाई दाखवू नये याकरिता सामाजिक संघटना व लोकांचे उत्स्फ़ुर्त मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांना नक्षलवाद्यांनी पुरस्कृत केल्याच्या पुड्या सोडण्यात येत आहेत. याच न्यायाने पाहिल्यास गोध्रा, बडोदा, मुंबई येथील दंगेही नक्षलवाद्यांनीच केले होते असे म्हणायचे का ? माझ्या मते, लोकसत्ता व तत्सम वृत्तपत्रांच्या ' विशेष प्रतिनिधींनी ' या प्रश्नांची समाधानकारक अशी ' खरी ' उत्तरं देऊन आमचे अज्ञान दूर करावे.

     या जगात, देशात, राज्यात माणसं मारली जाणं यात फारसं धक्कादायक असं काही राहिलं नाही. दररोज कितीतरी जणांचे खून पाडले जातात. कितीतरी अपघातात मरण पावतात तर कित्येकजण आजारपण, आत्महत्या इ. कारणांनी आपले प्राण गमावतात. मग जवखेडे येथील तीन माणसांचं मारलं जाण्यात नाविन्य ते काय ? किंवा या तिघांचीच हत्या जणू काही या राज्यात / देशात घडणारी पहिलीच हत्या आहे असा देखावा का निर्माण केला जातोय ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या ठिकाणी आपण थोडं विषयानंतर करू.

     दिल्लीमध्ये बस बलात्कार प्रकरण होण्यापूर्वी या देशात / दिल्लीत बलात्कार घडत नव्हते का ? दिल्लीचे प्रकरण घडून गेल्यावर देखील तिथे बलात्कार घडायचे बंद झाले का ? मुंबईचे शक्ती मिल प्रकरण घडून गेल्यावर देखील शहरांतील बलात्कारांचे प्रमाण घटले आहे का ? यांची उत्तरे नकारार्थी आहेत. मग दिल्लीच्या प्रकरणाला हवा देण्याचे कार्य कोणी केले ? तो जनतेचा स्वाभाविक उद्रेक होता असे गुळमुळीत उत्तर देण्याचा प्रयत्न होईल पण ते सर्वांशी खरे नाही.

     लोकांनी मोर्चे काढण्यापर्यंत तो जनतेचा भावनिक उद्रेक होता, इथपर्यंतचा भाग खरा आहे. त्याला मेणबत्ती मोर्चा वगैरे संघटित निदर्शनांचे हेतुपूर्वक रूप देऊन व मिडीयाला हाताशी धरून त्याची व्यापकता वाढवण्यात आली. प्रिंट व टेलिव्हिजनचा वापर करून लोकांच्या मनी त्या गुन्ह्यातील आरोपींविषयी व त्या आरोपींचा तपास करण्यात ढिलाई दाखवणाऱ्या पोलिसांच्या विषयी तसेच पोलिस खात्याच्या ढिलाईला वाव देणाऱ्या काँग्रेस सरकारविरोधी चीड निर्माण करण्यात आली. यातून साध्य काय झाले ते जगजाहीर आहे. पण यात मूळ प्रश्न सुटलेला नाही हे मात्र उघड सत्य आहे व ते सत्य नजरेआड करण्याइतपत माध्यमं हुशार आहेत.

    दिल्लीतील बलत्कार प्रकरण व जवखेडे प्रकरणाची जर तुलना केली तर असे लक्षात येते कि, मिडीयाची या दोन्ही घटनांतील भूमिका परस्परविरोधी आहे. दिल्ली प्रकरणातील मोर्चे हे जनतेचे पुरस्कृत होते पण जवखेडेचे नक्षलवादी पुरस्कृत. त्याआधी खैरलांजीचेही तसेच होते. याचा अर्थ असा कि, आम्ही जे सांगू, दाखवू, छापू तेच तुम्ही ऐकायचे, बघायचे व वाचायचे आणि मान्यही करायचे. बरे, हि एकट्या मीडियाची अक्कल नाही. ते पिंजऱ्यातले पोपट. त्यांना जो खाऊ देईल त्याच्या इशाऱ्यावर पोपटपंची करणार व आपण लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याच्या बाता मारणार !

    मिडीया जाऊ द्या, सोशल नेटवर्किंग साईट्सवरील सक्रीय विचारवंत - तरुणाईची यावरील प्रतिक्रिया काय आहेत ? जवखेडाचे मृत लोक तथाकथित ' दलित ' समाजाचे असल्याने फक्त ' दलितांनाच ' त्याविषयी सहानुभूती, चीड आहे. बाकीचे काय ? फार थोड्यांनी या घटनेविषयी निषेधाचा आवाज उठवला आहे. ज्यांनी आपले आत्मे विकले नाहीत, ज्यांच्यातील मनुष्यतव लोपलं नाही फक्त त्यांनीच ! बाकीचे मात्र बोटचेपी भूमिका घेऊन तटस्थ राहिले आहेत. हि घटना का घडली ? कशी घडली ? त्यामागील कारणं काय होती ? इ. प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा ते आपला निषेधरुपी वांझ संताप व्यक्त करतील. धन्य आहे अशा विचारवंतांची, तरुणांची !

    मारली गेली ती माणसं होती. मारणारीही माणसं होती. निषेध व्यक्त करणारीही माणसंच आहेत व निमूटपणे पाहणारीही माणसंच आहेत. हे सर्व पाहता खरोखर आपण सुधारत आहोत कि मागास बनत चाललो आहोत असा प्रश्न पडू लागला आहे. खून करण्यामागील कारणं काहीही असोत पण एखाद्याचा त्याच्या इच्छेविरुद्ध जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मृतदेहांचे तुकडे करण्यात आले आहेत. अशा घटना दररोज घडतात हे मान्य करून देखील मी असे म्हणतो कि, जेव्हा अशा घटना आपल्या वाचनात येतात वा अवलोकनात येतात तेव्हा त्याविषयी फार काही नाही --- साधा निषेधाचा शब्द आपण नोंदवू नये ? देवी - देवतांचे व इतर फोटो Like करण्यासाठी जे हात तत्परतेने पुढे सरसावतात तेच हात अशा वेळी मागे का राहतात ?

    भ्रष्ट सरकार, प्रशासन व्यवस्था यांच्याविषयी तुमच्या मनात संताप, चीड आहेच ना ? या संतापाला, चिडीला वाट देण्याचे कार्य तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवरून करता. का ? तर या साईट्स शेवटी सरकारी खात्याच्या दृष्टीखालून जाऊन त्यांना जनतेच्या मनोभावना कळतात ते तुम्हांला माहिती आहे म्हणून ! मग जवखेडे करिता जेव्हा सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केला जात आहे त्याकडे संशयाने का पाहिलं जात आहे ? उलट अशा प्रयत्नांना मनमोकळेपणाने ' One Click ' सहकार्य केल्यास सामाजिक सलोखा कायम राहण्यास मदतच होईल. परंतु हे आपल्याकडून घडून येणार आहे का ? नाही. कारण शेवटी ' आपण ' व ' ते ' हे भूमिका सहजासहजी बदलली जाणार नाही. या भूमिकेतील ' आपण ' कायम असून ' ते ' मात्र प्रसंगानुसार बदलतात. कधी मुसलमान. कधी ब्राम्हण. कधी दलित. कधी धनगर. कधी आदीवासी. तर कधी फासे पारधी !

     या भूतलावर माणसाचा जन्म / निर्मिती का झाली ? कधी झाली ? कशी झाली याचा शोध घेण्यात येत आहे. याची समाधानकारक उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील. पण माझ्या मते, या पृथ्वीवर माणसाइतका दुर्बल प्राणी दुसरा कोणी नाही. तो आता इतका दुबळा झाला आहे कि, आपल्या आदिम पूर्वजांप्रमाणे देखील जगू शकत नाही. अशा स्थितीत आपले जीवन अधिकाधिक सुखकारक व सुरक्षित व्हावे तसेच आपल्यातील दुर्बल ( शारिरिक अर्थाने ! ) घटकांचे देखील जीवन सुखमय व सुरक्षित व्हावे याकरता त्याने प्रयत्नशील राहाणे अपेक्षित आहे. पण वास्तव नेमकं उलट आहे. आपल्यातीलच रक्ता - मांसाच्या लोकांना काल्पनिक भेदांवर परकं मानून परस्परांचे अस्तित्व धोक्यात आणण्यचाच माणसाचा प्रयत्न सुरु आहे !

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

बलात्कारी मानसिकतेचा एक शोध :- मुक्त व स्वैर विचार मंथन


    दिल्लीतील कुप्रसिद्ध बस बलात्कार प्रकरण घडल्यानंतर भारतीय जनता, मिडीया व थोड्या प्रमाणात सरकार खडबडून जागे झाले. बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी खास कायद्यांची निर्मितीही करण्यात आली व येत आहे. परंतु एवढे सर्व होऊनही बलात्काराच्या घटनांत काही घट होताना दिसून येत नाही. उलट त्यात वाढच होत चालली आहे. उजेडात येणाऱ्या घटनांचे प्रमाण गुप्त प्रकरणांच्या तुलनेने तसे नगण्यच आहे. त्यामुळे हे प्रकरण कितपत भयावह आहे याची वाचकांना कल्पना येईलच. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची नेमकी मानसिकता काय असते ? तो बलात्कारास प्रवृत्त का होतो ? बलात्काराची कृती केल्यानंतर वा करताना त्याचे मन विकृतीकडे ओढ का घेते ? या व अशा कित्येक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा हा एक अल्प प्रयत्न.  

    निसर्गाने मनुष्यांत स्त्री - पुरुष हे दोनच पण मुख्य भेद पाडले आहेत. यांच्यात जसे भेद आहेत तसेच यांना परस्परांविषयी कमालीचे आकर्षण देखील आहे. मानसिक व शारिरिक ! प्रचलित अर्थाने हिंदू शास्त्रे पाहिली तर जवळच्या नात्यातील स्त्रियांच्या सहवासातही फार काळ एकांत न  करण्याची सूचना आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मनुष्य टोळी जीवनातून स्थिर जीवनाकडे वळला तसतशी मातृसत्ताक पद्धती पितृसत्ताक तर बनलीच पण सोबतीला स्त्री - पुरुषांचे लैंगिक व्यवहार देखील नियंत्रण करण्यात आले. यापूर्वी नात्यांचा विचार न करता --- कारण ' नातं ' हि संकल्पनाच अस्तित्वात नव्हती --- संबंध ठेवले जात. परंतु ' कुटुंब संस्था ' विकसित होऊ लागल्यावर ' नातं ' हि संकल्पना जन्माला येऊन विकसित होऊ लागली. त्यामुळे हे अनिर्बंध लैंगिक संबंध नियंत्रित करण्यात आले खरे, परंतु पूर्णतः बंद होऊ शकले नाहीत. तेव्हा धर्मशास्त्रांच्या आधारे यांना निषिद्ध म्हणून घोषित करण्यात आले. कुटुंब संस्थेत ' विवाह ' संकल्पनेचा शिरकाव होऊन तिला अनन्यसाधारण महत्त्व आल्याने व अनिर्बंध लैंगिक संबंधाने होणारे कलह नियंत्रित करण्यासाठीही विवाहपूर्व व विवाहबाह्य तसेच बळजोरीने संबंध प्रस्थापित करणे नीतिबाह्य मानले जाऊ लागले. शास्त्राकार व समाजनियमन करणाऱ्यांच्या दृष्टीने ते आदर्श समाज विकसित करत होते. मात्र, जगात सदासर्वकाळी सर्वच व्यक्ती विवाह करून शारिरीक सुख प्राप्त करू शकत नव्हते, नाहीत. अशा लोकांच्यासाठी एका खास वर्गाची निर्मिती करण्यात आली. ज्याला सध्या ' वेश्या ' हे नाव देण्यात आले आहे. यामुळे समाजातील विवाहाद्वारे शारिरीक सुख उपभोगण्यास असमर्थ अशा पुरुषवर्गाची सोय झाली परंतु, स्त्री वर्गासाठी अशी काही तरतूद करता आली नाही.  

    पुरुष वर्गाने आपल्या सोयीने स्वतःला उपयुक्त अशा नियमांची, संस्थांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे स्वतःला बंधनकारक अशा कायद्यांची देखील निर्मिती केली. परंतु , असे असूनही --- म्हणजे कामवासना शमविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्यासाठी स्त्रीवर्गावर बळजबरी करण्याची त्याची वृत्ती काही बदलली नाही. बलात्कार हे आधीही होत होते, आताही होतात पण पुढे घडू नयेत अशी मनोमन इच्छा आहे !  

    पुरुषाची कामवासना प्रबळ व अनावर झाली कि दिसेल त्या स्त्रीला वासनाशमनार्थ यंत्र समजून जवळ ओढण्याची त्याची ' आदिम - पुरुषी - रानटी ' वृत्ती उफाळून येते. यावेळी नात्याचा, परिस्थितीचा, वयाचा कशाचाही विचार केला जात नाही. असे का व्हावे ? 

    पुराणांचा दाखला घेतला तर देवाधिदेव देखील बलात्काराचा मोह टाळू शकले नाहीत. मध्ययुगीन काळातील इतिहास देखील काही फारसा वेगळा नाही. यानंतर आधुनिक भारताचा इतिहास सुरु होतो. अव्वल ब्रिटीश राजवटीत बलात्काराच्या घटना घडतच होत्या. या घटनांचे समाजमनातील पडसाद / प्रतिबिंब नंतर कथा - कादंबऱ्यांमध्ये उमटू लागले. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रीवर्गाकडे सामाजिक, आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील कामांध पुरुष आशाळभूत नजरेने पाहू लागले. दरम्यान औद्योगिकीकरणाने समाजाला एक वेगळीच दिशा / गती मिळाली. त्यामुळे आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक देखील शहरांकडे धाव घेऊन या दृष्टचक्रातून आपली सुटका करून घेऊ लागले. परंतु, या दृष्टचक्रापासून संपूर्ण मुक्तता मिळणे शक्य नव्हते व नाही. कारण,  बलात्कार हि व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. विशिष्ट मानसिकता आहे. जी सर्वसाधारणतः सुप्त असते पण संधी मिळताच प्रकट होते.

    औद्योगिकीकरणाने समाज बदलला. प्रवृत्त्या बदलल्या नाहीत. त्यांनी फक्त कात टाकली. शहरांकडे धाव घेणाच्या वृत्तीने ' संयुक्त / एकत्र कुटुंबसंस्था ' एकप्रकारे मोडीत तर निघालीच पण ' छोटे कुटुंब ' हि संकल्पनाही पूर्णतः विकसित झाली नाही. शहरांत किंवा रोजगार असलेल्या ठिकाणी घर विकत अथवा भाड्याने घेऊन संसार थाटणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळी विवाहित स्त्री - पुरुषांचे वर्षातून ठराविक काळ एकत्र येणे, दुरावणे हे प्रकार घडून येतात. या गोष्टींचा वा कारणांचा बलात्कार वृत्तीशी संबंध जोडता येईल का ? किंवा हे कारण या कृत्यामागे असावे का ?

    गावात विवाहबाह्य संबंध ठेवणे तसे सोपेही आहे व अतिशय अवघड देखील. मात्र शहरात तसे होत असावे का ? आत्ताच्या काळात हि गोष्ट राजरोसपणे होते, पण आधीच्या --- ५० वर्षांपूर्वीच्या काळात ते शक्य होते का ?

    ग्रामीण - शहरी माणसांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टींमध्ये साहित्य, सिनेमा, खेळ इ. प्रकारांचा समावेश होतो. वयात येणाऱ्या व एकलेपणा अनुभवणाऱ्या वर्गासाठी प्रेमकथा लिहिणारा वर्ग या काळात उदयास आला. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हिंदी सिनेमाचे योगदान किती हा वादाचा मुद्दा असला तरी काळानुरूप बदलणाऱ्या भारतीय मानसिकतेचे प्रतिबिंब त्यात दिसून येते हे नाकारता येत नाही. सिनेसंस्कृती बाळबोध होती तेव्हा श्लील - अश्लील प्रकार त्यात होते वा नव्हते माहिती नाही. परंतु जसजशी ती विकसित होत गेली तसतशी हिंदी सिनेमातील स्त्री पात्राची भूमिका बदलत गेली. यशस्वी - अयशस्वी बलात्काराचा एक सीन हा आता सिनेमाचा अविभाज्य भाग बनूलागला. हि परंपरा स. २००० पर्यंत कायम राहून आता जवळपास नामशेष झाली. आत्ताच्या सिनेमात तर डायरेक्ट हिरो - हिरॉईनचा रोमान्स दाखवून बलात्काराला पूर्ण फाटा दिला आहे. म्हणजेच सेक्सचे स्वरूप बदलून ते पेश करण्यात येत आहे. असे का ? आधीचा सिनेमा ग्रामीण - शहरी भारताचे प्रतिनिधित्व करत होता. आत्ताचा फक्त शहरी भागाचे नेतृत्व करतो. काय आहे सध्याच्या शहरी भागाचे स्वरूप ?

    एकेकाळी विवाहपूर्व शारिरीक संबंध निषिद्ध मानणारा शहरी समाज आता बदलू लागला आहे. नव्या पिढीला जुन्या संस्था, नियमांची फारशी पर्वा नाही. आवश्यकताही वाटत नाही. इथे कोणाची वाट चुकली वा मार्ग फसला हे महत्त्वाचे नाही तर, प्रवृत्तीत बदल होत आहे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरी तरुणाईचे प्रतिबिंब सध्याच्या सिनेमात दिसून येते इतकेच. पण असे असले तरी शहरात बलात्कार हे घडतातच. ते का ?

    सामान्यतः वृत्तपत्रे, बातम्या यांमधून ज्या काही बलात्काराच्या घटना उजेडात येतात त्यांचे दोन मुख्य भागपडतात . (१) नात्या अंतर्गत (२) नात्याच्या बाहेर. मात्र या दोन मुख्य भागांचे जे पोटभाग आहेत, त्यांत कमालीचे साम्य आहे व ते म्हणजे पीडित व्यक्तीचे अल्पवय असणे अथवा एका व्यक्तीवर अनेकांनी मिळून अत्याचार करणे.


    (१)    प्रथम आपण नात्याअंतर्गत घटकाचा विचार करू. जवळच्या नात्यातील संबंध सर्वत्र निषिद्ध मानले जात असले तरी ते अजिबात घडत नाहीत असे नाही. सहमतीने घडणाऱ्या संबंधांचा येथे विचार करणे योग्य नाही. मात्र बळजोरीने जे घडवून आणले जातात त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञांचे मत लक्ष घेत बालपणापासून एकत्र वाढलेल्या दोन विजातीय लिंगी व्यक्तींमध्ये शारिरीक आकर्षण फारसे नसते. पण नियमाला जसे अपवाद असता तसे इथेही आहेत. त्याशिवाय माणसाचा एक स्वभाव आहे व तो म्हणजे जी कृती करू नये असे त्यास बजावलेले असते ती कृती करण्याकडे त्याच्या अंतर्मनाचा ओढा असतो. याला ' बालसुलभ ' प्रवृत्ती देखील म्हणता येईल. त्यामुळेच अशा संबंधांचा विचार करण्याकडे व ते विचार कृतीत आणण्याकडे त्याचा कल झुकत असावा. सध्याचे सर्वत्र सहज उपलब्ध असलेले ई - साहित्य पाहिले तर इनसेस्ट रिलेशनवर आधारित कथांचे त्यात प्राबल्य दिसून येते त्यामुळेच ! आता या कथांची निर्मिती अशा विचारांना चालना देते कि, असे विचार अशा कथांना जन्म देतात हा भाग वेगळा. परंतु, जे तथ्य आहे, सत्य आहे ते स्वीकारले पाहिजे. 

    नैसर्गिक आकर्षण व निषिद्ध कर्म करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती यांमुळे नात्याअंतर्गत संबंधांच्या - बलात्काराच्या घटना घडून येतात. याचा उपभाग म्हणजे कमी वय असणे. सामान्यतः सहमतीपूर्वक संबंध हे समवयस्कांमध्ये तसेच चार दोन वर्षांचा फरक असलेल्यांमध्ये ठेवले जातात. मात्र, बलात्काराच्या घटनेत वयामध्ये कमालीची असमानता आढळते. पीडित व्यक्ती अत्याचारी व्यक्तीच्या बरोबरची, मोठी वा लहान असू शकते. समवयस्क वा वयाने मोठ्या व्यक्तीवरील अत्याचाराची मानसिकता थोडी समजू शकते परंतु अल्पवयीन --- ज्यात वय वर्ष दोन तीन पासून पुढे सुरु व वृद्ध --- वय वर्ष पन्नासच्या पुढील --- व्यक्तीवरील अत्याचार करणाऱ्याची मानसिकता नेमकी काय असावी ? वेगळेपणाचे ' थ्रील ' अनुभवणे हेच मुख्य कारण कि, प्रबळ वासना ? कि आणखी काही ? विवाह करून किंवा विवाहबाह्य संबंध ठेवण्यापेक्षा हा पर्याय काहींना कदाचित जास्त व्यवहारी देखील वाटत असावा. ज्यामध्ये कसलाही खर्च नाही कि जबाबदारी नाही. एकदा अत्याचार झाला कि, पीडित व्यक्ती लज्जेस्तव तो गुप्त ठेवते आणि मग पुढची सोय होऊन जाते. नात्याअंतर्गत ज्या बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या त्यामध्ये पहिला अत्याचार होऊन कित्येक महिने वा वर्षे  गेली होती हे लक्षात घेणे गरजेचे आहे.  

    नात्याअंतर्गत बलात्काराचा दुसरा उपविभाग म्हणजे एकावर अनेकांनी अत्याचार करणे. वास्तविक याच्या उजेडात येणाऱ्या घटना अतिशय नगण्य आहेत. मात्र तरीही हा प्रकार घडतो हे उघड आहे. यातील बव्हंशी घटना या मुख्य प्रकाराशी संबंधित आहेत. प्रथम यात पीडित व अत्याचार करणारी व्यक्ती अशा दोघांचा सहभाग असतो व तिसरी व्यक्ती घटनेची माहिती कळताच त्यात सहभागी होते. परंतु, सर्वांनी म्हणजे एकाहून अनेकांनी एकाचवेळी नात्याअंतर्गत व्यक्तीवर अत्याचार केल्याची घटना माझ्या वाचनात आल्याचे स्मरत नाही.  

    (२)     नात्याबाहेरच्या व्यक्तीवरील अत्याचाराच्या घटना घडतात त्यात देखील पीडीताचे वय अत्याचारी व्यक्ती इतके, कमी -- अत्यल्प व जास्त -- वृद्ध अशा स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. विवाहाआधी शारिरीक सुख उपभोगण्यासाठी वासना शमनार्थ शय्यासोबतीसाठी पुरेसे पैसे नसल्याने, विवाहबाह्य संबंध ठेवण्याची इच्छा असून संधी न मिळाल्याने तसेच वासना शमनेचे सर्व मार्ग खुंटल्यावर व्यक्ती या थरास जात असावी का ? 

     ' खाली दिमाग सैतान का घर ' असे म्हटले जाते. या म्हणीचा शब्दशः अर्थ न घेता भावार्थ जर घेतला तर माणसाची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला इष्ट - अनिष्ट वळण लागल्यास अशी कृत्ये घडत असावीत का ? १० वर्षांखालील व्यक्तीकडे बघून वासना अनावर होतेच कशी हा भावनिक प्रश्न असला तरी १० वर्षांखालील व्यक्ती आपल्यावर घडलेल्या अत्याचाराचा बभ्रा करणार तरी कशी ? तिला भीती दाखवल्यास आपले काम सहज होऊ शकते हे व्यावहारिक कारण असू शकेल का ? आपल्या समवयस्क व्यक्तीवर बळजोरी केल्यावर ती बोंब ठोकेल वा तक्रार करेल. तेव्हा या कृत्यावर पडदा पाडण्यासाठी खुनाचा मार्ग अवलंबावा लागतो. म्हणजे आणखी एक गुन्हा आला. त्याऐवजी अल्पवयीन व अजाण बालक - बालिका यासाठी आदर्श ' लक्ष्य ' आहे. तीच मीमांसा वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत देखील करता येईल. 

    बलात्काराच्या घटनेत एका व्यक्तीवर अनेकांनी मिळून अत्याचार करण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढले आहे. विशेष दखल घेण्याची बाब म्हणजे यात पीडित व्यक्ती फारच कमी प्रमाणात अल्पवयीन सदरात मोडणारे असून बव्हंशी घटनांत पीडित व्यक्ती व अत्याचारी व्यक्तींच्या वयात फारसा फरक नसल्याचे आढळून येते. तसेच सामुहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा अत्याचारी घटकांत अल्पवयीन व्यक्ती सहभागी असल्याचे दिसून येते. असे का ? समवयस्क व्यक्तीवर एकट्याने अत्याचार करणे आता अशक्य होऊ लागले आहे का ? कि समूहाचे मानसशास्त्र या ठिकाणी लागू पडते ? एकाचवेळी एकाच विजातीय लिंगी व्यक्तीविषयी एकाहून अधिक जणांना शारिरीक आकर्षण वाटू शकते का ? कि आपल्या सहकाऱ्यास त्याचे इच्छित लक्ष्य प्राप्त करून देण्यास्तव आरंभी सहभाग घेतला जातो व आपल्या सहकाऱ्याचे कामकृत्य पाहून इतरांची वासना प्रज्वलित होते ? सामूहिक अत्याचारात अल्पवयीन सहभाग का घेतात ? विजातीय लिंगी व्यक्तीविषयक नैसर्गिक आकर्षणाने कि समूहाच्या सोबतीने, अनुकरणवृत्तीने ? 

    सामूहिक अत्याचारात सहभागी असलेल्या अल्पवयीन व्यक्तीकडून पीडित व्यक्तीवर अत्याचाराहून अधिक भयंकर शारिरीक दुखापत करण्याचे प्रकरणही विशेष दखल घेण्याजोगे आहे. दिल्ली मधील कुप्रसिद्ध घटनेत बसमधील लोखंडी रॉड नाजूक भागातून शरीरात घुसवण्याचा प्रकार झाला. हि घटना तशी अलीकडची. पण जवळपास अशाच ' थीम ' वर आधारित बलात्काराची दृश्ये गैर भारतीय भाषांतील सिनेमात येऊन गेल्याचे किती जणांना माहिती आहे ? अशा प्रकारच्या दृश्यांचे लेखन करणाऱ्या व्यक्ती विकृत मानाव्यात कि अल्पवयीन, अज्ञ ? लहान मुल ज्याप्रमाणे रागाच्या भरात खेळण्यांची मोडतोड करते. तसेच अनेक विवाहबाह्य प्रकरणांत संबंध उजेडात आल्यावर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जेव्हा संबंध ठेवणारी व्यक्ती आपल्या प्रियपात्राच्या सहाय्याने / मूक संमतीने आपल्या पती / पत्नीचा खून करते तेव्हा तिरस्कार, घृणा, राग या व अशा कित्येक भावनांच्या आहारी जाऊन लैंगिक अवयवांचा विध्वंस देखील  करते. यामागील नेमकी मानसिकता काय असावी ? अशी व्यक्ती फक्त त्याच प्रसंगापुरती विकृत का बनावी ? 

     अल्पवयीन वा अजाण व्यक्ती हि शारिरीक हिंसाचारात अधिक निर्दयी असते. कारण, आपण जे कृत्य करत आहोत, त्याच्या परिणामांची त्यास कल्पना, पर्वा अजिबात नसते. परंतु अशीच कृत्ये जेव्हा परिपक्व वयातील सुजाण व्यक्ती करतात तेव्हा काय समजायचे ? 

    पीडित व्यक्तीने तोकडे कपडे परिधान केल्याने अत्याचारी व्यक्तीची वासना चाळवली जाते असे म्हटले जाते. हा खरोखर बिनबुडाचाच नव्हे तर बिनडोकपणाचा युक्तिवाद आहे. तोकडे कपडे घालणाऱ्या व्यक्तींपेक्षा अंगभर वस्त्रे परिधान करून देखील अत्याचारास बळी पडलेल्या पीडीतांची संख्या जास्त असल्याची वस्तुस्थिती लक्षात न घेत केलेलं हे विधान आहे.

    स्त्री - पुरुषांतील नैसर्गिक आकर्षण हे सर्वसंमत असेच आहे. मात्र कामभावनांचा निचरा ' दमन ' प्रक्रियेने न होता समाजमान्यमार्गांनी, नियमांनी व्हायला हवा. हेच सध्याच्या बलात्कार प्रश्नाचे एक उत्तर बनू शकते.



शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

मी कोण ?


    लेखाचे शीर्षक वाचून कोणाला देशपांड्यांचा ' असा मी ' आठवेल किंवा अत्र्यांचा ' मी कसा झालो ? ' आणि त्यावरून माझाही अशाच पद्धतीने लेखन करण्याचा मनोदय असल्याचा अंदाज बांधला जाईल. परंतु तसे नाही. प्रस्तुत ठिकाणी मला -- मी कोणत्या धर्माचा, जातीचा आहे याचा शोध घ्यायचा आहे. वास्तविक हे कार्य मी पुढील पिढीतील संशोधकांवर सोडू द्यायला हवे होते खरे, पण माझ्यावर संशोधन किंवा चार ओळींचे ( शोकात्मक वा निंदात्मक ) लेखन करण्याइतपत मी मोठा ( छोटा ) होईन असे मला तरी अजिबात वाटत नाही. तेव्हा आपल्या जिवंतपणीच हे कार्य स्वहस्ते उरकून घेण्याचा माझा विचार आहे.  


    रुढार्थाने पाहिल्यास माझा जन्म हिंदू धर्मातील ' महार ' जातीत झाला. दाखल्यावर त्याची नोंद हिंदू - महार ते पुढे हिंदू - बौद्ध आणि नंतर नवबौद्ध अशी उत्क्रांती सिद्धांतान्वये बदलत गेली. अर्थात हा बदल व गोंधळ केवळ कागदावर घडला असे नसून मानसिक व बौद्धिक पातळीवर देखील घडून आला, घडत आहे व कदाचित पुढेही घडत राहील. बहुसंख्यांकांच्या सोबतीने अल्पसंख्यांक राहिल्यास एकमेकांच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. अंगांवर परिणाम हा होतोच. थोडक्यात त्यांची देवाण - घेवाण होते. उदा :- भारतात हिंदू हे बहुसंख्य व त्या तुलनेने मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन हे अनुक्रमे अल्पसंख्यक आहेत. यांपैकी हिंदू धर्मीय अपवाद केल्यास उर्वरित धर्मियांवर हिंदूंच्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा इ. चा फार मोठा प्रभाव पडला आहे तर या धर्मियांच्याही काही मुल्यांचा हिंदुंवर बऱ्याच प्रमाणात प्रभाव आहे. याबाबतीत अगदी तपशीलवार विभागणी करायची झाल्यास हिंदू, जैन, बौद्ध व शीख हे हिंदुस्थानात जन्मलेले ( तत्कालीन संज्ञेनुसार ) असून ख्रिस्ती व इस्लाम हे आयात केलेले / लादलेले धर्म आहेत. ( या ठिकाणी आयात / लादलेले या शब्दांचा शब्दशः अर्थ घेऊ नये. ) त्यामुळे हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांच्यातील संस्कृती, धर्म, श्रद्धा, संस्कार इ. याच मातीतील असल्याने फार थोड्या प्रमाणातील भेद अपवाद केल्यास हे तसे हिंदूच आहेत. मात्र मुसलमान व ख्रिश्चन हे आनुवंशिकरित्या हिंदू असले तरी धार्मिकदृष्ट्या गैरहिंदू आहेत.  


    आता या गैरहिंदूंवर हिंदूंच्या चालीरीतींनी, संस्कृतीने, श्रद्धेने कसा परिणाम केला ते आपण थोडक्यात पाहू. या ठिकाणी आपण इस्लामचे उदाहरण घेऊ. पैगंबर प्रणित इस्लामधर्मियांचे वर्तन व सध्याच्या भारतीय मुसलमानांचे वर्तन पाहिल्यास त्यात जमीन - अस्मानचे अंतर असल्याचे दिसून येते. याबाबतीत एकच उदाहरण देतो. इस्लामच्या जन्मभूमीत मृत व्यक्तीच्या कबरीवर दर्गे उभारून त्यांची उपासना केली जात नाही तर आपल्याकडे निव्वळ दर्ग्यांवर न थांबता महालांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. त्याशिवाय हिंदूंची दुखवट्याची, दिवस पाळण्याची पद्धतही उचलण्यात आली. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर भारतीय मुसलमानांतही हिंदूंप्रमाणे जातींची निर्मिती होऊन त्यांची उतरंड निर्माण झाली. या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते कि, अल्पसंख्यांक कितीही धर्मनिष्ठ असले तरी बहुसंख्याकांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाहीत. कित्येकांना हि चर्चा विषयांतर वाटत असेल तर कित्येकांना लेखाचा विषय काय व हा लिहितोय काय असा प्रश्न पडला असेल. परंतु मी अजून भरकटलो नाही एवढे येथे नमूद करून मूळ मुद्द्याकडे येतो.

    इस्लामधर्मियांचे उदाहरण तुलनेसाठी घेऊन मला इतकेच सुचवायचे होते कि, जिथे मुसलमान हिंदू धर्माच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकले नाहीत तिथे माझी काय कथा ? कोणी भेटले कि त्याला मी " नमस्कार " असे अभिवादन करतो. याचा आमच्या नवबौद्ध मंडळींना राग येतो. त्यांच्या मते मी " जयभीम " म्हणायला पाहिजे. पण बालपणापासून माझ्या आयुष्याची २० - २५ वर्षे " नमस्कारात " गेल्यावर " भीमाचा जय " कसा म्हणणार ?  बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी धर्मांतर करण्याची बुद्धी आमच्या आजोबांना झाली होती कि नव्हती माहिती नाही. परंतु घरातील परंपरा पाहता ती झाली नसावी असे माझे अनुमान आहे. त्यामुळे विवाहविधी अपवाद केल्यास सर्व काही हिंदू पद्धतीने साजरे होते. मूर्तीपूजेवर, देवाधर्मावर आपली श्रद्धा नसल्याने या बाबतीत माझी मते नवबौद्धांशी ५०% जुळतात. पण ५०% नाही. कारण, ज्यावर आपली श्रद्धा नाही, विश्वास नाही त्यावर टीका का करायची ? श्रद्धा कोणावर ठेवायची व कोणावर नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी नाहक जबरदस्ती का म्हणून ?

    गेल्या वर्षी एकदा एका गावी माझे जाणे झाले. पूर्वाश्रमीच्या महारवाड्यात ( उच्चारी ' म्हारवडा ' ) देखील एक फेरी झाली. तिथल्या एका घरात मला कमालीचे विसंगतीपूर्ण दृश्य दिसून आले. घराच्या प्रवेशद्वारी चौकटीवर घोड्याची नाल ठोकण्यात आली होती तर घरामध्ये प्रवेश करताच समोरच्या भिंतीवर बाबासाहेबांचा भलामोठा फोटो लावलेला होता. आता आणखी एक गोष्ट येथे नमूद करतो कि, सदर घर हे अशिक्षित ( सरकारी व्याख्येनुसार साक्षर -- कारण नाव लिहिता - वाचता येते.) व्यक्तीचे होते. पण हि स्थिती सुशिक्षितांची नाही असे थोडी ! माझ्या परिचयाचे एक दलित साहित्यिक आहेत. मुळात मला एक गोष्ट समजत नाही, ' दलित ' हा शब्द अभिमानाने का मिरवला जातो ? दलित समाज, दलित साहित्य - साहित्यिक इ. जसा हरिजन हा शब्द तिरस्करणीय आहे तसाच दलित हा देखील आहे असे माझे ठाम मत आहे. तर मी काय सांगत होतो कि, माझ्या परिचयाचे एक अतिकट्टर असे नवबौद्ध साहित्यिक -- जे चारचौघांत नवबौद्ध धम्माचा पुरस्कार तर हिंदू धर्माची नालस्ती करत असतात. प्रस्तुत महाशय जहाल आंबेडकरवादी आहेत. त्यामुळे हिंदूंची मूर्तीपूजा त्यांना अजिबात खपत नाही पण दरवर्षी नेमाने कुळाचार म्हणून कुलदेवतेच्या दर्शनाला गुपचूप जात असतात. हा विरोधाभास कशाचे प्रतिक आहे ?

    व्यक्तिगत उदाहरण द्यायचे झाले तर माझा विवाह बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी उपाध्यायाने प्रथम मला अगम्य अशा भाषेत मंत्रांचे उच्चारण करून नंतर त्यांचे मराठी भाषांतर करून सांगितले व मला त्यांचा उच्चार करावयास लावला. वास्तविक लग्नाच्या वेळी उपाध्याय अथवा मंत्रोच्चारणाकडे लक्ष द्यायला कोण लेकाचा शुद्धीवर असतो ? पण अशा बेसावध क्षणीही मला हि विसंगती जाणवली. जी भाषा नवबौद्धांना अपरिचित आहे त्या भाषेत विवाहविधीचे उच्चार का ? हे कोडे आजही मला उलगडले नाही. पण त्याचवेळी हे देखील लक्षात येते कि, हिंदू विवाह पद्धतीतील मंत्रोच्चारणाचा अर्थ विवाह करणाऱ्या हिंदूंना तरी कुठे माहिती असतो ? वर्षाचे बाराही महिने हिंदूंच्या सणांनी - व्रतांनी व्यापलेले आहेत. त्यातील किती सण साजरे करण्याचे नवबौद्ध टाळतात ? हिंदूंची वटसावित्री नवबौद्ध करतात कि नाही ? दिवाळी देखील त्याज्य नाही कि राखी पौर्णिमाही ! मग गणेशोत्सवात घरात गणपती बसल्यास त्यावर नवबौद्धांचा आक्षेप का ?

    गेल्यावर्षी सहज दादरच्या चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. तिथे आतमध्ये गेलो. तेथील दृश्य आजही माझ्या नजरेसमोर तरळत आहे. मी त्या इमारतीत प्रवेश केला. गोलाकार भिंतीतील प्रवेशद्वारातून आत गेलो व उभा राहिलो. समोर बाबासाहेबांचा अर्धपुतळा असून त्यांच्या पाठीशी बुद्धाची मूर्ती होती. बाबासाहेब आपल्या चार डोळ्यांतून माझ्याकडे बघत होते तर मी दोन डोळ्यांतून त्यांना पहात होतो आणि बुद्ध आपल्या नेहमीच्या व जगप्रसिद्ध मंदस्मितहास्यमुद्रेने आमच्या दोघांकडे बघत होता. एखाद्या मंदिरात जसे भारावलेले वातावरण असते जवळपास तसेच तेथेही होते. त्या ठिकाणी एक गोष्ट माझ्या सहज लक्षात आली व ती म्हणजे या ठिकाणी अगरबत्ती ऐवजी मेणबत्तीचा वापर होतो आणि चर्चमध्ये देखील मेणबत्त्या वापरल्या जातात ! अगरबत्तीचा त्याग व मेणबत्तीचा स्वीकार हे कोडं काही मला उलगडलं नाही. चैत्यभूमीजवळच स्मशानभूमीअसून तिथे मृतदेहांना अग्नीच्या हवाली केले जाते. त्यात नवबौद्धांप्रमाणेच महारांचाही समावेश आहे ! मृतदेहावरील अंतिम संस्कारांच्या विधीत हिंदू व बौद्ध धर्मात काय फरक आहे ? माझ्या घरात मला माहिती असल्यापासून माझे दोन आजोबा व एक आजी असे तिघेजण ' बॅक टू पॅव्हेलियन ' गेले खरे पण एकालाही सरणावर जळताना पाहणे माझ्या वाट्याला आले नाही. त्यामुळे अखेरच्या विधीची मला तरी कल्पना नाही. पण अंतिम संस्कारानंतर कार्य / दिवस, श्राद्ध इ. परंपरांचे पालन केल्याचे मात्र मला माहिती आहे. अर्थात, आता या परंपरांचे पालन न करण्याकडे नवबौद्धांचा कल असल्याचेही दिसून येऊ लागले आणि हि खरेच आनंदाची व कौतुकाची बाब आहे. कारण हिंदू परंपरेच्या प्रभावापासून सुटका करून घेणे तितकेसे सोपे नाही. मात्र त्यांनी हे कार्य प्रबोधनाने, वैचारिक जागृतीने करावे अशी माझी अपेक्षा आहे. जबरदस्तीने नव्हे !

    व्यसनांचा जगभरातील सर्वच धर्मांनी जवळपास निषेध केलेला आहे. मात्र निषिद्ध मानलेले मद्यपान हे इतर धर्मियांप्रमाणेच नवबौद्धांनी देखील आपलेसे केले आहे. ज्याचा बाबासाहेबांनी देखील निषेध केला होता. बुद्धाच्या विचारसारणीशी अनुयायांची फारकत समजू शकते पण बाब्साहेबांच्या आवाहनावर इतकी विरुद्ध प्रतिक्रिया का म्हणून ? मनुष्याने स्थिर जीवनास आरंभ केल्यापासून किंवा मनुष्य जीवनास आरंभ झाल्यापासून ताण - तणाव हे त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. ( आणखी एक हिंदू विधी ! ) या ताण - तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने जे उपाय शोधले त्यातील एक जालीम उपाय म्हणजे मद्यप्राशन ! यांमुळे टेन्शनपासून माणसाची सुटका कशी होते काय माहित पण याचे सेवन करण्यास सर्वधर्मीय मांडली आपापले मतभेद विसरून आतुरतेने पुढे सरसावतात. दारूच्या ग्लासात सर्व जाती - धर्मातील भेद मिटले जातात. माणसांची एकी कुठे होते ? तर कोणत्या पवित्र स्थळी नाही तर दारूच्या अड्ड्यावर ! हा पराभव कोणाचा ? धर्मसंस्थापकांचा, महापुरुषांचा कि संस्कृतीचा ??

रविवार, १५ जून, २०१४

संजय म्हणाला …! ( भाग - ४ )


      
                     दिवस …. रविवारचा. वेळ …. दुपारची. स्थळ …. अस्मादिकांचे बेडरूम कम वाचनाची खोली.
      खोलीचे वर्णन :- गादीवरील बेडशीट विस्कटलेली. सकाळचा पेपर चावून ( कि चघळून ? जे काय असेल ते ) चोथा झाला आहे. चार - दोन इतिहासाची ( एक प्रकारे कच्च्या भांडवलाची ) पुस्तके बाजूला पडली आहेत. अस्मादिक हाती वही - पेन घेऊन प्रतिभा साधनेस बसले आहेत. लॅपटॉपवरील प्रीती झिंटाचे फोटो तन्मयतेने पाहत प्रतिभेची साधना करण्याचा प्रयत्न केला जातोय पण स्फूर्ती काही केल्या येत नाही. अखेर वैतागून खिडकीच्या बाहेर आकाशाकडे शून्यात नजर लावून ( म्हणजे नेमके कुठे ? कोणास ठाऊक पण शब्दप्रयोग भारी आहे. ) पाहण्याचा प्रयत्न होतो आणि शेवटी स्फूर्तीदेवता प्रसन्न होऊन लेखक महाशयांच्या हातातील लेखणीतून कागदावर शब्दरूपी मोत्यांची ( उपमेला मोती वापरणे हा आपला एक काल्पनिक श्रीमंतीचा प्रकार ! ) उधळण करते.

              आजकाल लेखन करून पोटं भरण्याचा जमानाच उरला नाही. गेल्या जमान्यातील ते पुलं म्हणून कोण होते, त्यांची विनोदी प्रकारची पुस्तके जाम खपून ते ' कोट्याधीश ' झाल्याची बातमी समजल्यावर आपण ठरवलं कि, आपण लेखकंच बनायचं. आता लेखक बनण्यासाठी काही कोर्सेस, क्लासेस सुरु झाले आहेत, पण हि सोय आम्हांला तेव्हा उपलब्ध नव्हती. मग उचलेगिरीचा सर्वमान्य फंडा आपण स्वीकारला. ' अस्मादिक, आम्ही ' अशी भारी शब्दयोजना स्वतःसाठी वापरायला सुरुवात केली. मधीमधी कंसात वाक्यं टाकायची कोट्याधीशांची पद्धतही अलगदपणे उचलली. पन साला लेखन काही जमेनाच ! दरम्यान ' टवाळा आवडे विनोद ' हे एका प्रसिद्ध संताचे वचन डोळ्याखालून गेल्याने आपन टवाळकी सोडायचे ठरवले अन पाच - पन्नास खरडलेल्या वह्यांची पाने फाडून त्यांची विल्हेवाट लावून आपण गंभीर अशा साहित्याकडे वळलो. ( अर्थात स्वतः केलेलं लेखन फाडावं लागणारा या महाराष्ट्रातील पहिला लेखक मीच आहे. पण ' संत सूर्यामुळे ' आमचे नाव लक्षात कोण घेतो ? )
                             गंभीर आणि जड अशा लेखनासाठी तशाच जडविद्वानांची पुस्तके वाचणे भाग होते. तेव्हा अशा लेखकांच्या ग्रंथांचा ( गंभीर विषयावरील लेखन ' ग्रंथ ' असतो आणि हलकं - फुलकं हे ' पुस्तक ' ) जोमाने अभ्यास केला. त्यातून ' पानिपत असे घडले ' हा अवाढव्य ग्रंथ जन्माला आला खरा ( ' … अन प्रकाशक खड्ड्यात गेला.' माझ्या सत्यवचनी जरा गप्प बैस. ) पण नुसती लेखक म्हणून मान्यता मिळाली, ' विद्वान लेखक ' म्हणून नाही. ( जाऊ द्या. आपलंच दुःख किती उगळावं ! ) तेव्हा आता कथा - कादंबरी लेखनास आरंभ करण्याचा विचार केला. अर्थात, त्याचाही आपण परत जोमाने अभ्यास सुरु केला. ( म्हणजे उचलेगिरी ! ) महाराष्ट्रातील परिचित व अपरिचित अशा पाच - पन्नास कथा - कादंबरीकारांच्या साहित्याचा अभ्यास करून आणि ' बटाट्याच्या चाळीतील श्री. पोंबुर्पेकरांच्या ' प्रतिमेस वंदन करून कथा लेखनास आरंभ केला अन …. माशी शिंकली !
                 कथेतील पात्रांची नावं काय ठेवायची हा मोठाच प्रश्न पडला. नायिका फडके, जोशी प्रभूती घराण्यातील दाखवली व तिचे पवार, शिंदे, पाटील, काळे इ. पैकी एका घराण्यातील नायकाशी प्रेमसंबंध दाखवले तर ब्राम्हणी संघटना ' आमच्या मुली काय फक्त प्रेमंच करत हिंडतात कि काय ? ' म्हणून गळा धरतील अशी भीती. बरं, नायिका पवार, पाटील, कदम कुळातील दाखवली अन तिचा नायक कांबळे, पानतावणे, भोईर, कोळी अशा घराण्यातील दाखवला तर कमरेला नसलेल्या तलवारी परजत मराठा संघटना ' आमच्या घरंदाज मुलींची बदनामी करतोस काय ? ' म्हणून मान कापायच्या ! जिथे नायक - नायिका ठरवण्यासाठी एवढा विचार करावा लागतो तिथे खलनायकांचे काय करायचे
           कथानक ग्रामीण असेल तर व्हिलन पाटील असायला हवा, पण आता मराठा संघटनांची भीती ! बरे, इनामदार किंवा सावकार घालावा तर आता ब्राम्हणी संघटना मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर अधिक भरवसा ठेवू लागल्या आहेत. दलित समाजातील पात्र खलनायक बनवावे तर ' हजारो वर्षे आमच्यावर चाललेला अन्याय अजूनही सुरु असल्याची ' घोषणा करत त्यांच्या पाच - पन्नास संघटना तुटून पडायच्या. अरे मग, आता आम्ही नायक - नायिका - खलनायक बनवायचे तरी कोणाला ? ( सही ! काय मस्त डायलॉग जमला आहे यार !! हा कोणीतरी रस्त्यावर उभं राहून मोठ्यानं ओरडून बोलायला पाहिजे. ) मुसलमानाला गुंड बनवावे तर हिंदू - मुस्लिम सलोखा बिघडतो. म्हणजे तीही वाट बंद. ख्रिस्त्यांना व्हिलन करण्यासाठी घाटावरून गोव्यात जावे लागेल, ते आपल्याला परवडणार नाही. जी बोंब ग्रामीण पार्श्वभूमीची तीच थोड्याफार फरकानं शहरी भागाची ! जिकडे पहावं तिकडे आता जातींच्या संघटना बनत चालल्या आहेत. तेव्हा आता प. पू. महेश कोठारेंचे स्मरण करून नायक - नायिका - खलनायकांची नावं ठेवण्याचा विचार आहे.
             उदा :- नायक - रम्या उर्फ रमेश. किती शिकला माहिती नाही. नोकरी - धंद्याचा पत्ता नाही. केसांचा कोंबडा किंवा भांग पाडून तो सदानकदा पोरींच्या मागे फिरत असतो. नायिका - ज्योती, मंदा, नंदा ( यांपैकी एक किंवा असलेच काहीतरी एक नाव. पण नायिकेला टोपण नाव नसतं बरं का ! ) कॉलेजात जाते. कितवीला ते माहिती नाही. हातात एकचं वही अन पेन. सोबत चार दोन मैत्रिणी. ( यांच्या व नायिकेच्या चढ - उतारांसहीत पोषाखसंपन्न देहांचे वर्णन फडके, काकोडकर, सोनवणी यांच्या कादंबऱ्यांमधून उधार घेण्यात येईलंच ! ) खलनायक - धोंडू खेकडे उर्फ धोंड्या खेकडा. याला खेकडे खाण्याचा भारी शौक. हा सारखा खेकडे खात असतो व उरलेल्या वेळात व्हिलनगिरी करतो. पण नेमके काय करतो माहिती नाही. तरीही पेपरांत याचे कुख्यात गुंड म्हणून नाव येते व माणसांत याची दहशत असते. याशिवाय दुय्यम खलनायक म्हणून नाना लोणीवाले हे राजकीय पात्र आहेंच. हे खेकड्याला व आपल्या वरिष्ठांना सदानकदा लोणी लावत असतात. तर अशा या भयानक दुकलीचा आपल्या नायक - नायिकेसोबत कसा सामना होतो आणि ते त्यातून कसे निभावून सहीसलामत सुटतात याचे वर्णन ' लोणीदार खेकडा ' या आपल्या आगामी कादंबरीत वाचकांना वाचावयास मिळेल.
                 अर्थात, जिज्ञासू वाचकांची जिज्ञासा थंड करण्यासाठी या कथानकाची थोडक्यात रूपरेषा येथे देतो :- रम्या वासुगिरी करत मंदाच्या प्रेमात पडतो. मंदा कॉलेजात शिकत समाजसेवा करत असते. शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम करून ती जमलेला पैसा कॅन्सर, एड्स, कावीळ ( ज्या रोगाचे जास्त बळी पडतील तो रोग टाकण्यात येईल. ) औषधोपचारासाठी देते. स्वतः किरकोळ अंगयष्टीची असूनही ती नेमाने रक्तदान करत असते. या सर्वांतून वेळ मिळाला कि, ती रम्यावर प्रेम करते. इकडे खेकड्याची माणसे पोलिस चकमकीत जखमी होतात. त्यातील काहींना रक्ताची नितांत गरज असते. तेव्हा ब्लड बँकेत जाऊन रक्त आणण्यापेक्षा रस्त्याने जाणाऱ्या चार - पाच तरुणींना उचलून नेतात. यात एक आपली नायिका असते. पुढे खेकडा त्यांचे रक्त काढून आपल्या माणसांचे प्राण वाचवतो पण त्या तरुणींचे काय होते ? खेकडा त्यांना सोडतो कि आणखी काय करतो ? आपला नायक, नायिकेचा शोध कसा लावतो इ. प्रश्नांची उत्तरे मात्र वाचकांना ' लोणीदार खेकड्या ' तंच मिळतील.

गुरुवार, ५ जून, २०१४

चार ऐतिहासिक कादंबरीकार

 
           मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबऱ्यांना नाही म्हटले तरी फार मोठी आणि जुनी परंपरा लाभली आहे.  तत्कालीन काळातील घटनांवर, व्यक्तींवर रचण्यात आलेल्या बखरी या ' कादंबरी ' प्रकारातंच मोडणाऱ्या आहेत. परंतु, रूढ अर्थाने आपण ज्याला ' ऐतिहासिक कादंबरी ' म्हणतो त्याची ओळख हरिभाऊ आपट्यांनी मराठी वाचकांना करून दिली. त्यानंतर या साहित्य प्रकारात सातत्याने भरच पडत आली आहे. त्यापैकी काही निवडक लेखकांच्या मोजक्या कलाकृतींचा या लेखात आढावा घेण्याचा हेतू आहे.
  
           ना. सं. इनामदार ! मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबरीकारांत सर्वात अग्रणी व यशस्वी कादंबरीकार म्हणून इनामदारांना ओळखले जाते. त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय थोडेसे वेगळे तसेच ऐतिहासिक घटनांचे केलेले विश्लेषणही चाकोरीबाहेरचे. एखाद्या इतिहास संशोधकालाही थक्क करून सोडतील असे ऐतिहासिक घटनांविषयीचे त्यांचे तर्क निश्चित कौतुकास्पद आहेत ! इनामदारांनी लिहिलेल्या झेप, झुंज, राऊ, मंत्रावेगळा, राजेश्री, शिकस्त व शहेनशहा या सातही ऐतिहासिक कादंबऱ्या कमी - अधिक प्रमाणात गाजल्या. या सातांपैकी राजेश्री व शहेनशहा यांचा अपवाद केला असता उर्वरित पाच कादंबऱ्या या पेशवेकाळावर आधारित आहेत. त्यातही राऊ आणि शिकस्त अपवाद केल्यास उर्वरीत तीन कादंबऱ्यांमध्ये तत्कालीन राजकारणाचाच प्रामुख्याने आढावा घेण्यात आला आहे. पैकी आपण प्रथम राजेश्री व शहेनशहा या दोन कादंबऱ्या विचारात घेऊ

            राजेश्रीचा मुख्य विषय आहे राज्यभिषेकानंतर छ. शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा ! यांत जसे कुटुंबातील रुसवे -फुगवे आहेत, त्याचप्रमाणे राजमंडळातील सदस्यांतील व्यक्तिगत राग - लोभ आहेत. यातून काही गोष्टी प्रामुख्याने सिद्ध होतात. प्रथम म्हणजे इतर कादंबऱ्यांमध्ये जशी छत्रपतीनिष्ठ मंडळींची वर्णने आपणांस वाचावयास मिळतात तशी ती इथे फारशी मिळत नाहीत. प्रथम आपला स्वार्थ मग राज्याचे हित, अशा व्यवहारी विचाराने वागणारी माणसे यांत आपणांस भेटतात. विजापूर, गोवळकोंडा, मुंबई, दिल्ली, जंजिरा येथील दरबारांवर आपली छाप बसविणारी ' शिवाजी ' नामक व्यक्ती कौटुंबिक आघाडीवर मात्र साफ अपयशी झाल्याचे यांत दिसून येते. अर्थात, या कादंबरीत शिवपुत्र संभाजीवर रचण्यात आलेल्या अनेक कपोलकल्पित कथांचा लेखकाने आधार घेतल्याने शिवाजीचे अपयश नजरेत भरून दिसणे स्वाभाविक आहे. इनामदारांचा शिवाजी राजकारणात कोणाला हार जात नाही, पण घरच्या आघाडीवर मात्र त्याचे काही चालत नाही. तसं पाहिलं तर हि परिस्थिती ऐतिहासिक नसून इनामदारांनी ज्या काळात या कादंबरीचे लेखन केले त्या काळातील समाजाची आहे व त्यात अजूनही फारसा फरक पडला नाही. अर्थात, हि गोष्ट खुद्द इनामदारांनीच आपल्या कादंबरीच्या प्रास्ताविकात कबूल केल्याने त्याविषयी अधिक काही न लिहिलेलं बरं !
 
              इनामदारांची दुसरी शिवकालीन कादंबरी म्हणजे ' शहेनशहा ' ! शिवाजीराजांची ज्यावेळी स्वराज्यस्थापनेची धडपड सुरु होती त्यावेळी शहजादा औरंगजेब दख्खनच्या सुभेदारीवर येतो, इथपासून या कादंबरीस आरंभ होतो. तसे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात राजकारणाला दुय्यम स्थान आहे. प्रसंगानुसार ऐतिहासिक घटना व त्यावरील भाष्य यात येते, पण प्रमुख विषय आहे औरंगजेबाचे व्यक्तिगत जीवन ! सामान्यतः औरंगजेब म्हटला कि पाषाणहृदयी, कुटील - कारस्थानी, पाताळयंत्री, धार्मिक वेडाचारात रमलेला दुराग्रही बादशाहा अशी त्याची रूपे आपल्या नजरेसमोर येतात. परंतु, इनामदारांनी आपल्या लेखनात औरंगजेबाची विलासी प्रतिमा उभारली आहे. शहजादा व नंतर बादशाहा बनलेला औरंगजेब प्रेमातही पडू शकतो याची प्रथम जाणीव हि कादंबरी वाचताना होते. शहेनशहा आणि राजेश्रीमध्ये एका घटनेविषयी मात्र इनामदारांनी आपले मत ठामपणे मांडले आहे व ती घटना म्हणजे शिवाजीराजांनी शाहिस्तेखानावर लाल महाल मुक्कामी टाकलेला छापा ! या छाप्याचे नेतृत्व शिवाजीराजांनी केले होते असे सर्वचं इतिहासकार मानतात, परंतु इनामदारांना हे पटत नाही. या छाप्याच्यावेळी शिवाजीराजे लाल महालात नव्हतेच, हेच त्यांचे ठाम मत असून प्रसंगानुसार त्यांनी ते व्यक्तही केलेलं आहे.
 
                 शहेनशहा कादंबरीत आणि इनामदारांच्याच ' राऊ ' या दुसऱ्या कादंबरीमध्ये आणखी एक साम्य आहे व ते म्हणजे इतिहास नायकांचे विलासी जीवन ! शहेनशहा मधील औरंगजेब जसा जनानखान्यात मश्गुल आहे त्याचप्रमाणे राऊ मधील पहिला बाजीराव हा मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. ' राऊ ' कादंबरीचा मुख्य विषय म्हणजे बाजीराव - मस्तानी यांची प्रेमकथा ! या कादंबरीत राजकारणाला अगदीच नगण्य स्थान दिलेलं आहे. मुख्य पात्रांचे प्रेमप्रसंग व त्यांचे संबंध तोडण्यासाठी बाजीरावाच्या घरच्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे ' राऊ ' कादंबरी ! इनामदारांनी राऊचे लेखन केले त्यावेळी असलेली थो. बाजीरावाची जनमानसातील प्रतिमा आणि आत्ताची इमेज फारशी वेगळी नाही. . शिवाजी महाराजांच्या नंतरचा पराक्रमी वीर, मुत्सद्दी अशी जबरदस्त पुण्याई गाठीशी असलेल्या व्यक्तीच्या खासगी जीवनातील प्रेमकथेला प्राधान्य देऊन त्याच्या पराक्रमांना जवळपास दुर्लक्षित करणे म्हणजे खायची गोष्ट नाय ! परंतु, इनामदारांनी हे कठीण कर्म तर पार पाडलेच ; पण त्यासोबत बाजीरावाला मस्तानीपासून तोडण्यासाठी चिमाजीआपा व राधाबाईने बाजीरावपुत्र बाळाजी उर्फ नानाचा कसा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला याचेही सूचक वर्णन इनामदारांनी करून तत्कालीन समाजमनाची नैतिक पातळी कोणत्या स्तरावर होती याचीही अस्पष्ट झलक दाखवली आहे.
 
                पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर जसा हिंदुस्थानच्या राजकारणाचा रंग बदलला, तद्वतंच पेशवेकुटुंबातील वैयक्तिक आशा - आकांक्षांचाही रंग बदलू लागला. हेच कथासूत्र मनाशी धरून इनामदारांनी ' शिकस्त ' चे लेखन केले. कादंबरीची नायिका आहे सदशिवारावाची पत्नी पार्वतीबाई ! कादंबरीच्या पहिल्या भागात -- म्हणजे पानिपत घडून येईपर्यंत पार्वतीबाईंचे पात्र तसे दुय्यम ठेवले आहे, पण नंतर हळूहळू मात्र तेच प्रमुख पात्र बनत जाते. मात्र असे असले तरी पार्वतीबाईला मुख्य नायिका बनवून कादंबरी लिहिणे हे तितकेसे सोपे काम नाही. तत्कालीन राजकारणात या बाईला कसलेही स्थान नव्हते व राजकारणाची तिला म्हणावी तशी जाणही नसल्याचे दिसून येते. पानिपतनंतर ते स्वतःच्या निधनापर्यंत ती आपल्या परागंदा झालेल्या पतीच्या विवंचनेत जगत राहिली. तिला आपल्या राजकीय स्थानाची, हक्कांची व अधिकारांची फारशी जाणीव नसली तरी तिच्या अवतीभोवती असणाऱ्यांना मात्र होती. प्रसंगानुरूप त्यांनी तिचा कसा उपयोग करून घेतला याचे चित्रण इनामदारांनी शिकस्त मध्ये केलेलं आहे. शिकस्तचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे उत्तर पेशवाईतील एकमेव महान, राजनिष्ठ असा मुत्सद्दी -- नाना फडणवीस हा कसा संधिसाधू व अधिकारलालसा असलेला राजकारणी पुरुष होता याचे दिग्दर्शन इनामदारांनी या कादंबरीच्या माध्यमातून केले आहे. नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर सत्तेची सूत्रे हळूहळू नानाच्या ताब्यात जाऊ लागली. हि घटना अपरिहार्य अशीच होती. परंतु आजवर या घटनेविषयी लेखन करताना नाना फडणीसने केवळ पेशवे घराण्यावरील व पेशवाईवरील निष्ठेपायी सर्व केले असे जे सांगितले जायचे त्यास या कादंबरीत तडा बसल्याचे दिसून येते. सत्ताप्राप्तीच्या बाबतीत नाना हा इतरांपेक्षा फारसा वेगळा नसल्याचे इनामदारांनी दाखवून दिले आहे .
 
                सवाई माधवराव पेशव्याच्या निधनानंतर पुणे दरबारी वारसा हक्कांचा मोठा गोंधळ उडाला. या कट - कारस्थानांत तत्कालीन अनेक नामवंत व कर्तबगार मुत्सद्दी वीरांचा निकाल लागला. मात्र या सर्वांत जास्त नुकसान झाले ते म्हणजे होळकरांचे ! शिंदे - होळकरांचा उभा दावा, पेशवा मरण पावलेला, सत्तेची सूत्रे हळूहळू नानाच्या हातून सुटू लागलेली अशा या काळात नानाने आपले बस्तान बसवण्यासाठी होळकरांचा आधार घेतला. नानाच्या या चालीला तोंड देण्यासाठी शिंद्यांनी होळकरांचा एक वारस हाताशी धरला. या शह - प्रतिशहात होळकर घराण्यातील एक कर्तबगार व पराक्रमी तरूण मारला गेला. पाठोपाठ होळकरी दौलत शिंद्यांच्या घशात जाऊ लागली. पेशवाईवर आलेला दुसरा बाजीराव राजकारणात सर्वथा अनभिज्ञ, जबरदस्ताचे पाय धरणारा. तो इंग्रजांकडे झुकू लागला. समस्त पेशवाई आता जाते कि मग जाते अशी भ्रांत पडलेली असताना होळकर घराण्यातील यशवंतराव नामक ' हिरा ' चमकू लागतो . त्याच्या तलवारीच्या जादूने भल्याभल्यांचे मिटलेले डोळे खडाखड उघडू लागले. मात्र शिंद्यांच्या आहारी गेलेल्या व इंग्रजांकडे झुकता कल असलेल्या बाजीरावाने यशवंतरावाच्या भावाला -- विठोजीला पकडून हत्तीच्या पायी देण्याचे कार्य केले आणि संतापलेल्या यशवंतरावाने शिंद्यांच्या लष्करी सामर्थ्याचा साफ चुराडा केला. होळकराच्या धास्तीने बाजीराव इंग्रजांच्या कुशीत शिरला व स्वातंत्र्य गमावून बसला. आपल्या धन्याला इंग्रजांच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न यशवंतरावाने केले पण बाजीरावाला काही त्याचा भरवसा आला नाही. तेव्हा सरतेशेवटी यशवंतरावाने उत्तरेत आपला स्वतंत्र पंथ पाहिला मात्र तरीही पेशवाईपेक्षा स्वराज्याप्रती असलेली त्याची निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. त्याचे प्रत्यंतर ' झुंज ' वाचताना पदोपदी येत राहते.
 
                    झुंजप्रमाणेच ' झेप ' मध्ये देखील एकांड्या पेशवाईनिष्ठ शिलेदाराची कथा आहे. या कथेचा काळ आहे यशवंतरावाच्या नंतरचा आणि नायक आहे त्रिंबकजी डेंगळे ! ' झेप ' ही इनामदारांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनातील सर्वात पहिली कांदबरी. या कांदबरीचा नायक कोणी नावाजलेला मराठा सरदार नाही की पेशवा नाही. आहे तो फक्त एक सामान्य हुजऱ्या ! जो अंगच्या कर्तबगारीने दुसऱ्या बाजीरावाचा काही काळ का होईना कारभारी बनला. गायकवाड दरबारातील गंगाधर शास्त्र्याच्या खुनात इंग्रज वकील एलफिन्स्टनने गोवले आणि आपल्या मार्गातील एक काटा अलगदपणे बाजूला काढला. गंगाधरशास्त्र्याचा खुन कोणी केला हे तसे जगजाहिर आहे, पण आपल्याकडे एक पद्धत आहे एखाद्यावर खुणी म्हणून शिक्का बसला कि त्याची बाजू ऐकून घेणे हे महापाप व त्याचा पक्ष जगासमोर मांडणे हे तर महापातक ! त्रिंबकजीचे असेच झाले. त्यामुळे त्रिंबकजीविषय लिहिण्यास कोणी धजावत तर नव्हतेच आणि त्याने काहीतरी मोठी अशी भरीव कामगिरी वा लढाई न मारल्याने इतिहासातील एक उपेक्षित व दुर्लक्षणीय पात्र अशीच त्याची तोपर्यंत ओळख होती. इंग्रजांनी त्याच्या विषयी जो काही निंदाव्यंजक मजकूर लिहिला तो जसाच्या तसा खरा मानून आपल्या लोकांनी उचलून धरला. त्रिंबकजीचा धनी दुसरा बाजीराव हा एक अत्यंत नालायक राज्यकर्ता म्हणून जगप्रसिद्ध असल्याने त्याचा एकनिष्ठ सेवक त्याच्याहून अधिक वाईट, दृष्ट प्रवृत्तीचा वाटणे स्वाभाविक आहे. झेपच्या निमित्ताने इनामदारांनी त्रिंबकजीचे चरित्र जगासमोर मांडले. कादंबरीच्या रूपाने का होईना पण त्याचे त्याकाळातील राजकीय महत्व लोकांच्या मनी ठसवण्याचा प्रयत्न केला. ' झेप ' मध्ये त्रिंबकजीच्या कौटुंबिक जीवनाचे फारसे वर्णन नाही . त्याचप्रमाणे त्याच्या धन्याच्या -- दुसऱ्या बाजीरावाचे हि या कादंबरीतील अस्तित्व तसे नगण्यच आहे. मात्र तत्कालीन राजकारणाची बारीक - सारीक माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याची इनामदारांनी शक्य तितकी खबरदारी घेतली आहे .
 
                           त्रिंबकजी डेंगळे, यशवंत होळकर यांच्या पाठोपाठ इनामदारांनी दुसऱ्या बाजीरावस केंद्रस्थानी ठेवून ' मंत्रावेगळाचे ' लेखन केले. पहिला बाजीराव व दुसरा बाजीराव परस्पर विरुद्ध अशी दोन व्यक्तीमत्व ! नावातील साम्य सोडले तर याच्या कर्तबगारीत जमीन अस्मानचा फरक !! थोरल्या बाजारावाचे गुणगान करताना पेनातील शाई संपेल पण शब्दांचा झरा आटणार नाही. हाच नियम दुसऱ्या बाजीरावास लागू होतो. पण शिव्या देण्याच्या बाबतीत ! अशा या पेशव्यावर आधारित इनामदारांनी कादंबरी लिहली. या कादंबरीत दुसरा बाजीराव हा किती खोल राजकारणी मनुष्य होता हे वाचकांच्या मनावर ठसवण्याचा इनामदारांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. दु. बाजीराव सामान्यतः त्याच्या रंगेल व विलासी जीवनासाठी ओळखला जातो पण या कादंबरीत त्याचा विलास वा रंगेलता दिसून येत नाही. इंग्रजांच्या सोबत शह - काटशहाचे राजकारण खेळणारा एक राजकीय पुरुष यातून उठून दिसतो.
 
                   इनामदारांनी सात ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या खऱ्या पण या कादंबऱ्यांचे लेखन करताना त्यांनी परंपरागत वाटचालीला फाटा देत अनवट वाटेने चालण्याचे ठरवलेले दिसते. राजेश्री मधील शिवाजी हा छ. शिवाजी कमी व एक कुटुंबवत्सल मनुष्य असल्याचे जाणवते. शहेनशहामधील औरंगजेब हा जनानखान्यात रमणारा तसेच धार्मिक कट्टरपणाखाली ढोंगबाजी करणारा असल्याचे दिसून येते. राऊमध्ये शास्त्रांनी निषिद्ध मानलेले अगम्यगमन करण्यास नानासाहेबला त्याच्या चुलत्याने आणि आजीने कसे भाग पाडले याचे निर्भीडपणे वर्णन आहे. झेप, झुंज, मंत्रावेगळा नायक तर बोलून चालून बहिष्कृतच आहेत. शिकस्तची नायिका पार्वतीबाई हि कितीही दुबळी असली तरी ज्या सदाशिवरावाची ती पत्नी आहे -- त्या सदाशिवरावाचे व त्याच्या तोतयांचे राजकारण त्यांनी समर्थपणे रेखाटले आहे. सामान्यतः ऐतिहासिक कादंबरीकार लेखनात दंतकथा, मिथकांचा रंजकतेसाठी वापर करतात. इनामदारांचे लेखन यास बऱ्यापैकी अपवाद आहे. त्यांच्या कादंबरीमध्ये दंतकथा असतातंच पण त्यासोबत त्यांनी संशोधित केलेली माहिती देखील कथानकाच्या ओघात ते वाचकांना सांगून मोकळे होतात. मंत्रावेगळामध्ये पात्रांच्या तोंडी जे लांबलचक संवाद आहेत, त्यातून इनामदारांनी आपले संशोधनच वाचकांच्या समोर मांडले आहे. एकप्रकारे परंपरागत ऐतिहासिक कादंबरी लेखनास फाटा देऊन बंडखोर वृत्तीने लेखन करणारा कादंबरीकार म्हणून इनामदारांकडे पाहता येईल.
 
               आज महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराजांच्या खालोखाल त्यांच्या मुलाचा - संभाजीचा गौरव केला जातो. परंतु एक काळ असा होता कि, याच संभाजीला व्यसनी, दुर्वर्तनी म्हणून महाराष्ट्राने उपेक्षेच्या अंधार कोठडीत कैद केले होते. पेशवाईतील रघुनाथराव आणि शिवशाहीतील संभाजी यांच्यात जणू काही फरकच उरला नव्हता. दोघांचेही बाप पराक्रमी, कर्तबगार व कर्तुत्वान ! दोघांची मुलेही पराक्रमी पण भोळसट, लंपट, व्यसनी. सत्तेसाठी काहीही करू धजवणारी ! रघुनाथाच्या गाठी जशी अटकेची पुण्याई होती. तशीच संभाजीने अंतसमयी दाखवलेली धीरोत्तर वृत्ती जनमानसात ताजी होती व केवळ या एकाच कृत्याने तो लोकांच्या आदरास थोडा का होईना पात्र झाला होता . अशा या संभाजीला कांदबरीचा नायक बनवून त्याचे खरे चरित्र लोकांसमोर माडण्याचा यशस्वी प्रयत्न शिवाजी सांवत यांनी केला. त्यांच्या संभाजीवर आधारित ' छावा ' कादंबरीची मोहिनी आजही कायम आहे. तोपर्यंत कथा - कांदबरी, नाटकांमधून संभाजी हा रंगेल, रगेल, मग्रूर, धाडसी, विलासी असाच रंगवला जायचा. छावाचे सर्वात मोठे यश असे कि, या कांदबरी मध्ये छ. शिवाजी महाराजांचे पात्र ज्या पद्धतीने रंगवण्यात आले आहे तसे आजवर कोणी रेखाटू शकले नाही. सावंतांनी शिवाजी राजांचे पात्र जरी दुय्यम धरले असले तरी ते इतके प्रभावी बनले आहे कि, कथानायक संभाजी हा केवळ सावली बनून राहतो आणि कांदबरीचे नाव खऱ्या अर्थाने सार्थ होते. सावंतांनी शिवाजीराजांचे व्यक्तिमत्व रंगवण्याचा, खुलवण्याचा कुठेही यत्न केला नाही. त्यामुळेच कि काय कादंबरी वाचताना शिवाजीराजांचे पात्र मनावर ठसा उमटवून जाते. त्याउलट औरंगजेबाच्या बाबतीत सावंतांनी वेगळा पर्याय अवलंबला आहे. संभाजीच्या चरित्रात औरंगजेबास खरेतर अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु महत्त्वाचे राजकीय प्रसंग वगळता सावंतांनी औरंगजेबाला या कादंबरीत तसे नगण्यच स्थान दिले आहे. याचे कारण उघड आहे. लोकांना शिवाजी - औरंगजेब माहिती होते पण अज्ञात असा संभाजी माहिती नसल्याने सावंतांना हा मार्ग स्वीकारावा लागला. छावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीचा पाया दंतकथा नसून संशोधनपर साहित्य हे आहे ! केवळ लोकानुरंजनासाठी लेखन न करता स्वतःला समजलेला संभाजी त्यांना लोकांपुढे आणायचा होता आणि त्या कार्यात ते कल्पनातीत यशस्वी झाले.
 
                ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत यांच्यापेक्षा रणजित देसाईंच्या कादंबरी लेखनाचा पिंड वेगळा ! ऐतिहासिक कादंबरीकडे ते निव्वळ ' कादंबरी ' म्हणून बंघत असल्याने त्यांना दंतकथांचे वावडे नाही. ऐतिहासिक संदर्भ साधने काही का सांगेनात, पण लोकांच्या मनी रुजलेल्या प्रतिमांना धक्का लावण्याचा ते अजिबात प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे त्यांची कादंबरी रंगते, कथानकातील रंजकता वाढते पण त्यातील इतिहास मरतो. ' श्रीमान योगी ' हि छ . शिवाजी महाराजांवरील त्याची कादंबरी प्रख्यात आहे. कादंबरीचे प्रमुक पात्र छ . शिवाजी महाराज असले तरी संपूर्ण कादंबरी वाचली असता त्यातील छत्रपती मनावर कुठेच ठसत नाही. ऐतिहासिक प्रसंग जर वजा केले तर सामाजिक कादंबरी म्हणून देखील खपून जाऊ शकते. कित्येकांना माझे हे विधान धक्कादायक वाटेल पण ' श्रीमान योगी ' तील कोणताही प्रसंग घ्या. त्यातील इतिहास जर वजा केला तर त्यात कौटुंबिक आणि सामाजिक कथानकाखेरीज आहेच काय ?छत्रपतींचे राजकारण त्यात दिसून येत नाही. छत्रपतींच्या विरोधकांचे चित्रणही जवळपास तसेच आहे. तरीही लोकांनी या कादंबरीस उचलून धरले. यामागे जशी देसाईंची प्रतिभा आहे त्याचप्रमाणे लोकांच्या मनावर असलेल्या दंतकथांची मोहिनीही कारणीभूत आहे. त्यामुळेच कि काय, कादंबरीतील शिवाजी राजांच्या खुनात त्यांच्या पत्नीचा -- सोयराबाईंचा हात असल्याचे देसाईंनी लिहून देखील त्यास आक्षेप घेण्याची कोणास बुद्धी झाली नाही.
 
                 रणजित देसाई ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून उदयास आले ते ' स्वामी ' मुळे ! स्वामी हि त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी. या कादंबरीची मुख्य पात्रं आहेत थोरला माधवराव पेशवा व त्याची पत्नी रमाबाई ! स्वामीमध्ये देसाईंनी जी लेखनाची पद्धत स्वीकारली तीच त्यांनी ' श्रीमान योगी ' त ही कायम ठेवल्याने स्वामीविषयी अधिक काय लिहावे ? थो. माधवरावाच्या कारकिर्दीत हिंदुस्थानच्या राजकारणाचा कसकसा रंग बदलत गेला, घरच्या तसेच बाहेरच्या शत्रूंचा बंदोबस्त करून माधवाने राज्य कसे सांभाळले याचे चित्रण ' स्वामी ' मध्ये येत नाही. राजकीय प्रसंग येतात ते फक्त कथानक पुढे सरकवण्यासाठी. बाकी सर्व कौटुंबिक मसाला. दंतकथा, आख्यायिकांचा मुक्तहस्ते वापर. त्यामुळे होते काय कि त्यातील राजकीय प्रसंग, माधवाचे पेशवेपद वजा केले तर रमा - माधवाची प्रेमकथा असेच या कादंबरीचे स्वरूप राहते. परंतु, असे असले तरी हि कादंबरी लोकांनी उचलून धरली. याचे कारण स्पष्ट आहे. इतिहास वाचण्यात, समजावून घेण्यात कोणाला इंटरेस्ट आहे ? चालू काळातील प्रेमकथेपेक्षा गतकाळातील प्रेमकथा जर सोप्या भाषेत मांडली जात असेल तर ती कोणाला नको आहे ? त्यातंच आपल्या लोकांना शोकांतिकेचे विलक्षण कौतुक. परंतु त्याविषयी या ठिकाणी अधिक काही लिहिणे योग्य होणार नाही.
 
                          रणजित देसाईंची परंपरा समर्थपणे पुढे चालवण्याचे कार्य ' पानिपत ' कार विश्वास पाटलांनी केले. त्यांच्या ' पानिपत ' कादंबरीचा जादूमय पगडा आजही मराठी मनावर कायम आहे. निव्वळ ' पानिपतची तिसरी लढाई ' या घटनेला केंद्रस्थानी ठेवून पाटलांनी पानिपत लिहिली. यातील दत्ताजी शिंदे, सदाशिवराव, अब्दाली, मल्हारराव इ. पात्रे पानिपत मोहिमेतील प्रमुख नायक असूनही कथानकात त्यांना दुय्यमत्व आले आहे. त्याउलट नजीबखानाची व्यक्तिरेखा पाटलांनी उत्तम रेखाटली आहे. समग्र कादंबरी वाचून झाल्यावर एक नजीबखान तेवढा मनावर ठसा उमटवून जातो. देसाईंच्या प्रमाणेच विश्वास पाटलांनी जनमानसातील ऐतिहासिक पुरूषांच्या ' इमेज ' ला धक्का देण्याचे टाळले आहे. अपवाद फक्त सदाशिवरावभाऊ या पात्राचा ! भाऊच्या मुर्खपणाच्या धोरणांमुळे / निर्णयांमुळे मराठी सैन्याचे पानिपत घडले हा जो समज प्रचलित होता, तो खोडून काढण्यात पाटील यशस्वी झाले. त्याचप्रमाणे मल्हारराव प्रभूती सरदारांनी लढाईतून पलायन केल्याने मराठी लष्कराचा विनाश ओढवला हा गैरसमज दृढ करण्यातही ते कल्पनातीत यशस्वी ठरले. पानिपत मोहिमितील राजकीय धागेदोऱ्यांची उकल करण्याचा पाटलांनी बिलकुल यत्न केला नाही. त्यांनी या कादंबरी लेखनासाठी विविध भाषांतील शेकडो संदर्भ साधने अभ्यासली असली तरी त्यांचा मुख्य भर शेजवलकर लिखित ' पानिपत १७६१ ' या ग्रंथावर असल्याचे दिसून येते. यामुळेच कि काय पाटलांनी पानिपतचे राजकारण उलगडून सांगण्याचे टाळले. आधी म्हटल्याप्रमाणे पानिपतची तिसरी लढाई हाच कथानकाचा केंद्रबिंदू असल्याने सर्व घटना, पात्रं हळूहळू त्या केंद्रबिंदूकडे जात असताना दिसतात. कादंबरीतील प्रमुख व्यक्तीरेखा डझनभर जरी असल्या तरी त्यांत वेगळेपणा हा फार कमी आढळतो. उदा :- दत्ताजी शिंदेचे ' टिपिकल मराठा स्टाईलचे ' उच्चार आणि सदाशिवरावाचे ' बामणी बोल ' वजा केले तर दोन्ही पात्रे एकच असल्याचे जाणवतं. दत्ताजी जसा नजीबकडून फसला तसा सदाशिवराव परिस्थितीमुळे अडचणीत सापडला एवढे मात्र वाचकांच्या मनी ठसवण्यात पाटील यशस्वी होतात.

                  पानिपत नंतर विश्वास पाटलांनी शिवपुत्र संभाजीवर कादंबरी लिहिली. पानिपत मध्ये केलेल्या चुका ' संभाजी ' मध्ये टाळण्यात पाटील यशस्वी झाले खरे पण या कादंबरीतही कित्येक प्रसंग असे आहे कि जे ओढून - ताणून बसवल्यासारखे वाटतात. उदा . रायगडावर छ. शिवाजी महाराजांचा घात करण्याचा जो डाव होता तो युवराज संभाजीने उधळून लावणे, वाईच्या लढाईच्या हंबीरराव मोहित्याचा मृत्यू , मुकर्रबखानाचा छापा पडण्यापुर्वीचा संभाजी - येसूबाईचा संगमेश्वरीचा संवाद इत्यादी. पानिपत लिहिताना संशोधकाची वृत्ती बाजूला ठेवली. तर संभाजीचे लेखन करताना त्यांनी संशोधक वृत्ती अंगीकारली. याचा एक फायदा असा झाला कि, संभाजीविषयी आजवर अज्ञात असलेल्या कित्येक गोष्टींवर नव्याने प्रकाश पडला. मात्र संशोधकाची वृत्ती बाळगत असताना दंतकथा, आख्यायिकांचा वापर करण्याचा मोह काही पाटलांना आवरता आला नाही. उदा :- संगमेश्वरी संभाजीचा मुक्काम फारच अल्प काल झाल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. रायगडास मोगलांचा वेढा पडल्याने संभाजी व कवी कलश तातडीने खेळण्याहून संगमेश्वरमार्गे रायगडला निघाले होते. या प्रवासात येसूबाई व शाहू संभाजी सोबत नव्हते तर ते रायगडी होते आणि त्यांच्या बचावासाठी संभाजी रायगडला चालला होता. हा प्रसंग मुळचाच इतका नाट्यमय आहे कि यात अधिक कल्पनाविलास न करता केवळ समर्थ शब्दांनी ते रंगवण्याचे कार्य करायचे होते. परंतु पाटलांनी केले उलटेच ! संगमेश्वर मुक्कामी येसूबाई संभाजीसोबत होती आणि तिची रायगडी रवानगी झाल्यावर संभाजीवर शत्रूचा छापा पडला. एखाद्या मसाला चित्रपटात शोभेल असाच हा प्रसंग ! यामुळे मुळच्या सत्य घटनेतला जो आत्मा होता तोच हिरावून घेतल्यासारखा झाला. ' संभाजी ' चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील कोणतेही पात्र मनात घर करून राहात नाही. अपवाद यातील स्थळ वर्णनांचा ! त्याशिवाय तत्कालीन राजकारण उलगडून न सांगता संभाजीने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांचा पाटलांनी यात आढावा घेतला आहे. नाहीतरी संभाजीने पार पाडलेल्या अशा किती लष्करी स्वाऱ्यांची वाचकांना माहिती होती ?
 
              या लेखात आपण ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि विश्वास पाटील या चार प्रमुख ऐतिहासिक कादंबरीकारांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रस्तुत लेखात या चौघांची आपापसांत तुलना करण्याचा जसा हेतू नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या गुण - दोषांचेही वर्णन करण्याचा उद्देश नाही. या साहित्यिकांच्या कलाकृतींचे एक इतिहास अभ्यासक म्हणून झालेले आकलन वाचकांच्या समोर मांडण्याचा मनोदय आहे. उपरोक्त चतुष्टयापैकी इनामदार, देसाई व पाटील या त्रिमुर्तीच्या लेखनात एक समान धागा आढळून येतो. सूर्योदय व सूर्यास्त हा जसा सृष्टीचा नियम आहे, त्याचप्रमाणे कादंबरीलाही आरंभ अन शेवट असतो. पण हा शेवट शोकांतिक करण्याकडे, वाचकांच्या मनाला चुटपूट लावण्याकडे या त्रिमूर्तीचा कल असल्याचे दिसून येते. इनामदारांच्या सातही कादंबऱ्यांचा शेवट बघा. कादंबरी मध्यावर आली कि, त्यांच्या पात्रांची भाषा जास्तीत जास्त निरवानिरवीची होत जाते. देसाई व पाटलांच्या लेखनातही तेच आढळते. हे असे का व्हावे ?
 
                     ऐतिहासिक घटनांची / चरित्रांची मांडणी हवी तशी करता येत असली तरी तिचे स्वरूप, परिणाम यांत बदल करता येत नाही. उदा :- शिवाजी राजांनी प्रतापगडी अफझलखानास ठार केल्याची घटना सर्वश्रुत आहे. आता कथा - कादंबरीकार हि घटना शक्य तितक्या नाट्यमय शब्दांत मांडू शकतात, रंगवू शकतात. पण खानाची व राजांची भेट होऊन उभयतांमध्ये सौरस्य घडून खान आपल्या छावणीत परतला असे ते लिहूच शकत नाहीत. हाच नियम इनामदार, देसाई व पाटील यांच्या कादंबऱ्यांना लागू पडतो. त्रिंबकजी, यशवंतराव, दुसरा बाजीराव हे शेवटी अपयशी ठरलेले राजकीय पुरुष असल्याचे इनामदारांना माहिती आहे. थोरला माधवराव क्षयाने बेजार आहे, हे देसाईंना ठाऊक आहे. ता. १४ मार्च १७६० रोजी पानिपतला रवाना झालेला सदोबा दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानपतावर मारणार असल्याची कल्पना पाटलांना आहे. घटनेची आगाऊ माहिती असल्याचा मानसशास्त्रीय परिणाम नकळतपणे लेखकाच्या मनावर होत असावा. त्यामुळेचं कि काय, कथानकाचा जसजसा शेवट येत जातो तसतशी शोकांतिक शेवटाची वेळ जवळ आल्याची चाहूल वाचकाला लागत जाते. उदा :- पानिपत कादंबरीनुसार युद्धाचा निकाल विश्वासरावाच्या मृत्युनंतर लागला. परंतु प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग चालू होण्या आधीची पाच - पंचवीस पाने, ' पानिपतावर मराठी फौजा हरल्या ' असेच सुचित करणाऱ्या मजकुरांनी भरलेली आहेत. रणजित देसाईंच्या ' स्वामी ' ची देखील हिच तऱ्हा ! माधवराव पेशवा क्षयाने आजारी आहे. तो मृत्युपंथास लागला आहे मान्य. पण कादंबरीचा अंत जसजसा जवळ येत जातो तसतशी वाचकाला त्याची आगाऊ कल्पना येऊ लागते आणि देसाईंनी पेशव्याचे मरण कसं रंगवलं आहे एवढेच जाणून घेण्याची जिज्ञासा बाकी राहते. यामानाने शिवाजी सावंतांनी ' छावा ' मध्ये पाळलेला संयम प्रशंसनीय आहे.
 
                संभाजी औरंगजेबाच्या कैदेत असून त्याच्यावर राक्षसी अत्याचार केले जात आहेत. नेत्र - जिव्हाहीन संभाजी स्वतःच स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजीचा शेवट नक्की आहे पण ' छावा ' लिहिताना सावंतांनी घेतलेली महत्त्वाची खबरदारी म्हणजे त्यांनी संभाजीचा मृत्यू फारसा नाट्यमय केला नाही. कल्पनेची फारशी उधळण त्यात केली नाही. उलट छत्रपती संभाजी हा धीरोदत्त आणि निर्विकार वृत्तीने मरणाला कसा सामोरा गेला याचे त्यांनी चित्रण केले आहे महत्त्वाचे म्हणजे हा प्रसंग वाचणारा वाचक देखील जवळपास त्याच वृत्तीने त्याचे वाचन करतो. इतकेचं नव्हे तर ' छावा ' कादंबरी जसजशी अखेरीकडे जाते तसतशी त्या कादंबरीचा / कथानकाचा शेवट काय आहे याची कल्पना असूनही वाचकांच्या मनाची त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी होत नाही. उदा :- संगमेश्वरी संभाजीचा मुक्काम असून मुकर्रबखानाचा त्याच्यावर छापा पडून तो कैद होतो, हा घटनाक्रम सर्वांना माहिती आहे. परंतु ' छावा ' मध्ये या प्रसंगाचे लेखन सावंतांनी असे केले आहे की, लेखक संभाजी प्रमाणेच पुढे काय घडणार आहे याविषयी अनभिज्ञ आहे. याचा परिणाम वाचकाच्या मनावर झाल्याखेरीज राहत नाही. त्यामुळेच या घटनेचा अंत काय आहे, हे माहिती असले तरीही हा प्रसंग वाचताना जेव्हा संभाजीला अटक होते त्यावेळी नाही म्हटले तरी वाचकाच्या मनाला, अपेक्षेला धक्का हा बसतोच ! माझ्या मते, हेच शिवाजी सावंतांच्या कादंबरीचे खरे यश आहे. तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक कादंबऱ्या वाचा वाचा. त्यांचा शेवट जवळ आल्यावर मनावर एक निराशेचे मळभ येते, पण छावा वाचताना मात्र असे काहीही जाणवत नाही. केवळ यामुळेच शिवाजी सावंतांची हि कादंबरी इतर ऐतिहासिक कादंबऱ्यांपेक्षा अधिक सरस बनली आहे.