बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

आगामी आत्मचरित्राची पूर्वतयारी !

                 नाही नाही म्हणता अखेर साहित्यिक म्हणून आमच्या कपाळी टिळा एकदाचा लागला. ( साहित्य प्रकाराला आमच्या नावाचा कलंक लागला हि बात निराळी !) आता जर लेखक बनलो आहेच तर येत्या १५ - २० वर्षांनी प्रकाशित होणाऱ्या आत्मचरित्राची आत्ताच जुळणी करावी म्हणतोय !
                  
                तसे पाहता वय वर्षे ३० हे काही आत्मचरित्र लेखकाचे वय नव्हे ! पण आत्मचरित्राच्या पूर्वतयारीसाठी कुठे वयाचे बंधन असते म्हणा ! ३० वर्षांपूर्वी अस्मादिकांचा जन्म झाला. दैवी प्रतिभा लाभलेली असून देखील आमच्या जन्माच्या वेळी आकाशातून पुष्पवृष्टी करण्याची देवतांना आठवण राहिली नाही. ( अस्से काय ? मला एकदा वर येऊ द्या, मग बघतो एकेकाला !) त्याखेरीज शुभ - अशुभ असे काही संकेतही त्यावेळी कोणाच्या नजरेस पडले नाहीत. ( अरेरे ! कमीत कमी एखाद्या कावळ्याने तरी आपला गळा साफ करायला हवा होता.) जन्मानंतरचे पुढचे दिवस, महिने वर्षे सर्वसामन्यांप्रमाणेच पार पडले. ( मग आत्मचरित्रात बालपण कशाला द्यायचे होते ? त्यापेक्षा बालपणाचा काळचं त्यातून वजा करायला हवा !) नंतर यथावकाश शालेय जीवनात प्रवेश झाला. शालेय जीवनात देखील चरित्रनायकाच्या आयुष्यात काही फारसा फरक पडला नाही. वर्ग बदलले, तुकड्या बदलल्या आणि शिक्षकदेखील ! परंतु, ‘माझ्याइतका ‘ ढ ‘ विद्यार्थी पाहिला नसल्याची अध्यापकवर्गाची तक्रार मात्र कायम राहिली. त्यात अक्षर - अवाक्षराचाही फरक पडला नाही. नाही म्हणायला, एका नवीन गोष्टीचा मात्र शोध लागला व तो म्हणजे अस्मादिक तैमुरलंगाचे वंशज निघाले ! 

                माध्यमिक शिक्षणाच्या काळात इंग्रजी - गणित नामक शत्रूंनी माझे नसलेले [ टाईप करताना आधी ‘ नासलेले ‘ टाईप झाले होते. साला, आतल्या गोटातील ( डोक्यातील ) गोष्टी बाहेर पडतात तरी कशा ?] डोके अधिकचं फिरवून टाकले होते. त्यातल्या त्यात आधार विज्ञान, मराठी, हिंदी, इतिहास इ. विद्यांचा होता. मराठी हि आपली आवडती भाषा ! सदा सर्वकाळ ती वापरण्याचा मोह विद्यार्थ्यांना जितका होतो तितका खुद्द ‘ मनसे ‘ प्रमुखांस देखील होत नसेल ! तर अशी हि प्राणप्रिय ( जिव्हाप्रिय ) मराठी भाषा जेव्हा विषय बनून येते तेव्हा तिच्या हालांस पारावर राहत नाही. ( प्रिय वाचक, अर्थ मलाही समजला नाही. पण रचना भारदास्त आहे कि नाही ?) त्यामुळे या विषयांत ३५ च्या आत आणि ४० च्या वर मी कधी गेल्याचे मला आठवत नाही. हिंदी विषयांत गुण मिळवण्यात आमची प्रगती जरी असली तरी आमचे तेव्हाचे आणि आताचे हिंदी ऐकले तर उत्तर भारतीयांना चक्कर किंवा भोवळ न आल्यास आम्ही नाव बदलू ! ( अर्थात, दुसऱ्याचे ! स्वतःचे नाव कधीही बदलायचे नसते. यातून मला राजकारणांत देखील बऱ्यापैकी रस असल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलचं !)  राहता राहिले विज्ञान आणि समाजशास्त्र, तर मत पुछो भाई ! समाजशास्त्रात आपण नेहमीच आघाडी मारली. ( आमचा जन्मचं मुळी इतिहासासाठी झाला आहे, हे आम्हांस फार उशीरा कळले.) पण माझी खरी रुची विज्ञानात होती. त्यातील ते रसायनांचे गुणधर्म, संयुगे, अणु - रेणू प्रकरणे जर वजा केली तर उर्वरीत सायन्समध्ये मला जास्त रस होता. परंतु जसजसे १० वीच्या जवळ गेलो तसतसे या विषयात कमी पडत गेलो. ( हि गोष्ट वेगळी आहे की, विज्ञानापेक्षा विज्ञान शिकवणाऱ्या बाईंकडे आमचे अधिक लक्ष असायचे. राज कपूरचा ‘ मेरा नाम जोकर ‘ मी पण पाहिला आहे म्हटलं ! फरक इतकाच आहे की, आमच्या विज्ञान शिक्षिका सिमी गरेवाल सारख्या बदसुरत नव्हत्या. अर्थात, हि १४ - १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता त्या आणि सिमी रूपाने बहिणी बहिणी शोभत असतील !) 

                     कोणत्याही चरित्रनायकाप्रमाणे आयुष्यात प्रेमप्रकरण देखील झालेचं पाहिजे. त्याचाही आरंभ याच काळात झाला. ( व शेवट देखील !) ‘ पहिले प्रेम कधी विसरलं जात नाही ’ या वचनावर माझी देखील श्रद्धा आहे. अर्थात, आपली प्रेयसी जरी बदलली तरी श्रद्धा मात्र बदलत नाही. ( अंदरकी बात ! मी कोणावर प्रेम केले हे फक्त मलाचं माहित. व्यक्त करण्याची वेळ कधी आलीच नाही !) 

                                 बोर्डाच्या कृपेने काठावर का होईना १० वी पास झालो आणि कॉलेज जीवनास आरंभ झाला. पहिल्या प्रथम १० वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाने मी पण विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि हे आपले काम नाही हे लक्षात येताच १० - १५ दिवसांत गाशा गुंडाळून कला शाखेत तळ ठोकला. मात्र, कॉलेज जीवनाचा आनंद आपल्याला काही फारसा लुटता आला नाही. पुढे यथावकाश टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे इतिहास विषय घेऊन बी. ए. झालो खरा पण त्यावेळीही अर्थशास्त्र विषय घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. इतिहासापासून लांब जाण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा तिकडेचं येत होतो. ( लेखनाची शैली देशपांड्याकडून अत्र्यांकडे चालली आहे. याची नोंद घेतली पाहिजे. आपली शैली आपण कोणापासून उचलली हे वाचकांच्या लक्षात न येण्याची खबरदारी घ्यायला हवी !) 

                       बी. ए. ची पदवी मिळवली खरी. दरम्यानच्या काळात आपणही गायक बनू शकतो या अंधविश्वासावर गायनाचे क्लास लावले. दोन मास्तर बदलले पण मी काही सुरात आलो नाही. गायनाचे मास्तरचं बरोबर नव्हते दुसरे काय ? ( मी गाणं शिकणार हे आधीच समजल्यामुळे कि काय रफीने आपले कान आणि डोळे कायमचे बंद करून घेतले.) बाकी माझ्या आवाजाचे कौतुक मी काय करायला हवे ? आजही मी जेव्हा रियाजाला बसतो तेव्हा पशु - पक्षी आनंदाने मला साथ देतात. ( प्रत्यक्षात कावळे व कुत्री मोठमोठ्याने ओरडून, आम्ही तुझ्यापेक्षा अधिक सुरात आहोत हे सांगतात हि बात निराळी आहे. ) अशाच माझ्या उचापत्या स्वभावामुळे माझे प्रमोशन देखील झाले आणि तैमुरलंगाचे वंशज ज्याप्रमाणे तख्ते ताउस वर विराजमान झाले त्याचप्रमाणे आम्ही देखील फिरत्या आसनावर ( ज्यास दोन लहान व दोन मोठे चक्र आहेत अशा ) येऊन स्थिरावलो. शेतीचा शोध लागल्यावर ज्याप्रमाणे भटका मनुष्य स्थिरावला, तद्वत मी देखील या फिरत्या आसनाने स्थिरावलो आणि यातून ‘ पेशवेकालीन इतिहास ‘ नामक इतिहास घडवणाऱ्या ब्लॉगची निर्मिती झाली. एक ब्लॉग लेखक म्हणून लोकांची मला मान्यता मिळाली तर इतिहास लेखक म्हणून श्री. संजय सोनवणी यांनी माझी मराठी वाचक वर्गास ओळख करून दिली. 

                     अशा प्रकारे लेखक म्हणून तर कारकीर्दीस आरंभ झाला. आता लेखकराव बनण्याच्या तयारीस लागलो आहे. स्वतःचे लेख अपवाद केल्यास इतरांचे लेख हे निकृष्ट दर्जाचे असतात असे मी स्वतःचे ठाम मत बनवले आहे. स्वतःचे लेखन जितक्या आवडीने मी वाचतो तितके इतरांचे अजिबात वाचत नाही. अहो वाचायचे तर सोडा, तिकडे बघत देखील नाही. दुसऱ्याचे कौतुक करताना हल्ली मलाही माझी जीभ जड भासू लागते आणि उन्हाळ्यात हमखास आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे शब्दसंपदा लुप्त होते. चरित्रनायकाचे आणि त्यातूनही लेखकाचे चरित्र हे नेहमी वादळी असायला हवे यावर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यासाठी स्वतःचे आयुष्य मुद्दाम वादळी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचकरिता श्री. संजय सोनवणी उर्फ वादळी व्यक्तिमत्व उर्फ भाऊ यांच्याकडे कोचिंग क्लास लावला आहे. काही वर्षांत प्रगती दिसून येईल अशी आशा आहे. 

                        चरित्रनायक व लेखक यांचे आयुष्य नेहमी उपेक्षित असले पाहिजे. लेखकाच्या लेखनाची उपेक्षा जेवढी वाचकसृष्टीत होत नाही तेवढी त्याच्या घरात होते हा सर्वचं लेखक मंडळींचा व माझाही स्वानुभव आहे. माझे पुस्तक तर सोडा पण ब्लॉगवरचा एखादा लेख देखील माझ्या घरच्यांनी आजवर वाचला नाही. माझी बौद्धिक संपदा पाहून माझ्या पत्नीला नेहमी प्रश्न पडतो कि याला लेखक कोणी केला ? आजवर मोजून ५० वेळा तरी तिने मला हा प्रश्न विचारला आहे. आणि याचे उत्तर मलाही अजून खरोखर सापडलेलं नाही. आत्मचरित्र लिहिणाऱ्याने शक्यतो आपल्या वैवाहिक जीवनाचा फारसा उल्लेख करू नये असा एक अलिखित दंडक आहे. अर्थात, रूढीपालनाच्या बाबतीत मी कट्टर भारतीय असल्याने हा संकेत पायदळी तुडवण्याचे पाप मी माझ्या हातून घडू देणार नाही. 

                  ५० - ६० वर्षांपूर्वी आत्मचरित्र लिहिणाऱ्या लोकांचे एक बरे होते. स्वदेशभक्ती आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान यावर आधारीत एक - दोन प्रकरणे त्यांच्या चरित्रात असायची. आमच्या पिढीची ती सोय गेली. ( या कारणासाठी स्वातंत्र्यलढ्यातील तमाम नेत्यांचा -- त्यात हिंसक अहिंसक दोन्ही आले --- जाहीर सभेत तीव्र निषेध करण्याचा माझा मानस आहे. ) त्यामुळे आता कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा हा माझ्यासमोर एक प्रश्न पडला आहे. 

                चरित्रनायकाच्या आयुष्यात हाणामारीचा प्रसंग -- त्याने इतरांना मारण्याचा राहू द्या पण मार खाण्याचा तरी --- असला पाहिजे. पण त्याही आघाडीवर आम्ही अपयशी आहोत. समोरच्याला मारायचे राहिले पण मार खाण्याची देखील वेळ अजून माझ्यावर आली नाही. ( नाही म्हणायला, भाऊ मला उलटे टांगायची धमकी देत आहेत खरे, पण प्रत्यक्षात ते कधी होणार काय माहित !) मनात एक विचार येतो कि , इतिहासकार असल्यामुळे ज्याप्रमाणे छ. शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणी कसायाच्या हातून गाय वाचवली तसले एखादे प्रकरण आपल्या आत्मचरित्रात घुसडून द्यावे.  आत्मचरित्रात असला खोटारडेपणा नाही म्हटला तरी आवश्यक आहे. त्याशिवाय आत्मचरित गाजणार कसे ? आणि गाजले नाही तर खपणार कसे ? याबाबतीत आपण देशी - परदेशी आत्मचरित्रकारांना आणि विशेषतः मंगेशकर कुटुंबियांना मानतो बुवा !  ( महाराजांनी खरोखर गाय कसायाच्या हातून वाचवल्याचे ज्याने प्रत्यक्ष पाहून लिहून ठेवले आहे त्याचे नाव कोणी सांगेल का ?) प्रत्यक्ष वर्णन लेखनास जोर येण्यासाठी मी मुद्दाम एका खाटकाच्या दुकानाला भेट दिली. पण तिथे गाईच्या ऐवजी कोंबडी आणि बकऱ्याचे आत्मे आपल्या देहाचे जीर्ण वस्त्र फेकत असल्याचे दिसून आले. तेव्हा काहीसा निराश होऊनच मी त्या स्थळाहून मागे फिरलो.

              सारांश, वय वर्ष ३० च्या हिशेबाने बऱ्यापैकी आत्मचरित्राची सामग्री जमली आहे. इतिहास संशोधनातील गंमती जमती नावाचे एक प्रकरण लिहिण्याचा माझा मनोदय आहे. त्यात माझ्याखेरीज इतर सर्व इतिहासकार कसे मूर्ख आहेत हे मी साधार सिद्ध करणार आहे. याबाबतीत मी राजवाडे, शेजवलकर प्रभूतींचा कट्टर अनुयायी आहे. बाकी, अजून बऱ्याच लहान - मोठ्या गोष्टी आहेत पण त्या यथावकाश माझ्या आत्मचरित्रातचं वाचकांना वाचावयास मिळतील. बाकी, माझे आत्मचरित्र मी लिहिले तर ते छापणार कोण हा एक प्रश्नचं आहे म्हणा ! ( माझे ‘ पानिपत असे घडले ‘ प्रसिद्ध झाल्यावर प्रकाशकाचे वजन आणि मनोधैर्य दोन्ही एकदम  खचल्याची दाट जनवार्ता आहे.)  त्याहीपेक्षा ते वाचणार कोण हा संशोधनाचा विषय आहे. पण त्याची काळजी आपण का करावी ? लोकं एका मुंगीचे महाभारत नाहीत का वाचत ? मग मी तर माणूस आहे ! ( बाकी, ‘ एका मुंगीचे महाभारत ’ पण वाचनीय आहे असे म्हणतात !)  

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

मोहम्मद रफीचे वारसदार !

                                      

            मोहम्मद रफी ! बस नाम हि काफी है, असे म्हणायचे दिवस आता हळूहळू इतिहासजमा होऊ लागले आहेत. सिनेफिल्मसंगीताच्या या अवाढव्य विश्वात अनेक संगीतसूर्य उदयास आले, आपल्या तेजाने झळकले आणि अस्ताला देखील गेले. यांपैकी रफीच्या वाट्याला उदय आणि तळपणे इतकेचं आले. नाही म्हणायला किशोरयुगाने त्याच्या भाग्याचा रवी मावळतीला झुकतोय अशी शंका येऊ लागली होती, परंतु हे मळभ लवकरच दूर होऊन रफी परत आपल्या अनभिषिक्त सम्राटपदाकडे वाटचाल करू लागला होता. परंतु, मृत्यूने त्याची हि धडपड बंद पाडली. रफीचा एक चाहता म्हणून त्याचे अकाली निधन थोडेसे मनाला चटका किंवा हळहळ वगैरे ते काय म्हणतात ते लावून जाते खरे पण रफीची हि ' एक्झिट ' एकप्रकारे योग्य वेळी झाली असेच म्हणावे लागते. कारण रफीच्या अखेरच्या काळातील जर बव्हंशी गाणी -- त्याने वा इतरांनी गायलेली ऐकली असता या गाण्यांचा / संगीताचा एकूणचं दर्जा खालावत ( हे विधान कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत नेहमीच चपखल बसत असल्यामुळे सर्वत्र वाचण्यास मिळते . त्यामुळे दर्जा हा खालावण्यासाठीच असतो अशी आता माझी ठाम समजूत झाली आहे ! ) चालल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ - ' कुली ' सिनेमातील शब्बीर कुमारने म्हटलेली गाणी खरे तर रफी गाणार होता, पण त्याच्या निधनाने ती संधी शब्बीरला मिळाली. कल्पना करा, ज्या गंधर्वाने ' यह जिंदगी के मेले ' किंवा ' यह दुनिया यह महफिल ' गायले, त्याच गळ्यातून ' सारी दुनिया का बोज ' किंवा ' मुझे पीने का शौक नहीं ' ऐकताना कसे वाटले असते ? पुढील काळातील भीषण रचनांमधील जरी नसली तरी भीषण शब्दांत गुंफलेली गाणी गाण्यास रफी जगला नाही हे मी त्याचे एकप्रकारे सुदैवचं मानतो.
               रफीच्या जाण्याने सिनेसंगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली वगैरे गोष्टी / कथा घडून आल्या. ती पोकळी भरून काढणे शक्य नाही हे सर्वांना माहिती होते. परंतु तरीही ' प्रति रफीचा ' शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्या प्रयत्नांना अन्वर, शब्बीर कुमार व मोहम्मद अझीजच्या रूपाने अल्पसे यश प्राप्त झाले.

            या तिघांपैकी अन्वरची गोष्ट थोडी निराळी होती. अन्वरच्या आवाजावर रफीचा प्रभाव किती आहे हे सांगणे थोडे कठीण आहे. कारण, त्याच्या नैसर्गिक आवाजाची ठेवणच जवळपास रफीच्या समान आहे.
  परंतु, रफीच्या आवाजात जो जोर आहे आहे तो अन्वरच्या आवाजात अजिबात नाही. तरीही अन्वरचे वैशिष्ट्य म्हणजे रफी हयात असताना देखील त्यास पार्श्वगायकाचे काम मिळत होते ! हि एकप्रकारे त्याच्या कलागुणांची पोचपावतीच मानली पाहिजे. ' मेरे गरीब नवाज ' मध्ये अन्वरने एक गीत गायले. विशेष म्हणजे त्याच सिनेमात रफीने देखील एक गाणं गायलं होतं आणि हि दोन्ही गाणी पडद्यावर एकामागोमाग झळकली. प्रथम अन्वरचे गीत आणि नंतर रफीचे ! सिनेमाच्या दिग्दर्शकाला मानले पाहिजे. कुर्बानी मध्ये देखील रफी आणि अन्वर यांनी प्रत्येकी एक - एक गीत गायले आहे. त्याखेरीज ' नसीब ' सिनेमात सुद्धा अन्वरने एक गीत म्हटले होते. अन्वरची या तीन सिनेमातील गाणी जर लक्षपूर्वक ऐकली तर त्याच्या आवाजाची रफीच्या आवाजाशी जवळीक वजा केल्यास त्याच्या आवाजावर रफीची छाप असल्याचे बिलकुल दिसून येत नाही. गायनाची अन्वरची स्वतंत्र शैली आहे. एकदम शांत स्वरात तो आपला गात असतो. रेंजच्या मर्यादा इतरांप्रमाणे त्यालाही आहेत पण त्याचा आवाज एकदम असा अंगावर येत नाही. तिन्ही सप्तकात तो त्यातल्या त्यात आरामत फिरत असतो. अन्वरच्या गायकीत काही गुण असले तर काही दोष देखील आहेत. फिल्मी पार्श्वगायनात एकल गीत गाणे वेगळे आणि बरोबरीच्या गायकासोबत द्वंद्व गीत गाणे वेगळे. ' कुर्बानी ' मध्ये किशोरच्या सोबत द्वंद्व गीतात अन्वरने कितीही प्रयत्न केला असला तरी त्याच्या मर्यादा एकदम उघड्या पडल्या. हाच प्रकार ' विधाता ' मधील सुरेश वाडकर सोबत गाताना देखील घडून आला. किशोर निदान अन्वरला सिनियर तरी होता, पण सुरेश वाडकर अन्वरचा समकालीन असून देखील अन्वरला ' हाथों की चंद लकीरों का ' या गीतात आपला प्रभाव बिलकुल पाडता आला नाही. माझ्या मते, पार्श्वगायकाची खरी कसोटी द्वंद्व गीतात लागते. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासोबत अन्वरने कित्येक गाणी गायली असली तरी ती गाणी ऐकून झाल्यावर लक्षात फक्त ' मंगेशकर भगिनी ' राहतात, अन्वर नाही ! 

                     अन्वरच्या उलट म्हणजे शब्बीर कुमार ! बेसुरा वगैरे कित्येक विशेषणांनी त्यास अद्यापही हिणवले जाते. शब्बीरच्या आवाजात देखील अनेक उणीवा आहेत. मात्र, या उणीवा लक्षात  घेऊन जर
  योग्य प्रकारे संगीत रचना केली तर ' जिहाले मस्कीन ' सारखे दर्जेदार गाणं -- ते देखील लता मंगेशकरच्या सोबत आपल्या शैलीत गाण्याचं तो धाडस दाखवू शकतो. शब्बीरचा आवाज रफीच्या आवाजापासून हजारो - लाखो मैल / योजने ( अंतर आणि मापन कोणतेही / कितीही लावा ) दूर आहे. त्याच्या आवाजात रफी कुठेही डोकावत नाही. तसे बघायला गेले तर अन्वर, शब्बीर आणि अझीज या सर्वांच्या आवाजात रफी दूरदूरपर्यंत दिसून येत नाही. मात्र, लोकांनी स्वतःहून त्यांना रफीचे वारसदर बनवून टाकले. वास्तविक या तिघांची गायनशैली रफीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. नकलाकार म्हणून नव्हे तर कलाकार म्हणून त्यांच्या गायकीकडे पाहिले तर त्यांच्या उणीवाच त्याने गुण बनून समोर येतात. शब्बीरने शास्त्रशुद्ध असे संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी पार्श्वगायनासाठी आवश्यक त्या सर्व गुणांपैकी काही गुण निश्चित त्याच्यात आहेत. नाहीतर त्याला किंवा इतरांना तत्कालीन संगीतकारांनी संधीच कशाला दिली असती ? अन्नू मलिक एक बदनाम आहे ठीक आहे, पण आर. डी. बर्मन किंवा लक्ष्मीकांत - प्यारेलाल अथवा कल्याणजी - आनंदजी यांच्या बाबत तुम्ही काय म्हणाल ? रफी या सर्वांकडे गायला होता. तेव्हा या संगीतकारांना सुरीला - बेसुरीला हे कळत नसेल असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल ! बप्पी लाहिरी, लता मंगेशकर, आशा भोसले, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर इ. समकालीन गायकांच्या सोबत शब्बीरने म्हटलेली गाणी ऐकली असताना त्याच्या आवाजातील उणिवां सोबत त्याच्या आवाजाची काही खासियत देखील लक्षात येते. शब्द उच्चारताना तो कित्येकदा शब्दांवर अनावश्यक जोर देतो,  तरीही त्याच्या त्या लकबीमुळे आणि गाण्याचे ऱ्हिदम व टेंपो यावर काही प्रमाणात त्याची हुकुमत असल्यामुळे समोर सुरेश वाडकर असो कि लता मंगेशकर -- शब्बीर एकदम कधी झाकोळला गेला नाही. उदाहरणार्थ - ' बेताब ' मधील लता सोबतची गाणी. तसेच ' कुली ' मधील शैलेन्द्र आणि सुरेश वाडकर सोबत गायलेली गाणी. 
 
              अन्वर व शब्बीरपेक्षा मोहम्मद अझीजच्या गायकीची तऱ्हाच निराळी आहे. अझीजचा आवाज हा काहीसा जड / भारी आहे. तसेच खर्जातील त्याचा आवाज मध्य व तारसप्तकापेक्षा  वेगळा असल्याचे लगेच लक्षात येते. हे दोन त्याच्या आवाजातील मानले तर दोष आहेत आणि मानले तर नाहीत ! या बाबीकडे दुर्लक्ष केले असता मोहम्मद अझीजकडे देखील बऱ्यापैकी गुणवत्ता असल्याचे दिसून येते. 
  किशोर कुमार, सुरेश वाडकर, उदित नारायण, मंगेशकर भगिनी, कविता कृष्णमुर्ती इ. सोबत गाताना अझीज कुठे कमी पडल्याचे दिसून येत नाही. मध्य सप्तकातून तार सप्तकात जाताना त्याचा आवाज अनेकदा जोरात उसळी मारतो व ते कानांना कधीकधी खटकते, नाही असे नाही आणि अशा वेळी गाणे कोणत्याही ' मूड ' मधील असो ते रडवे वाटते हे निश्चित ! उदाहरणार्थ, ' नगीना ' मधील त्याचे ' आज कल याद कुछ ' हे गाणे ऐकून बघा. अन्वर आणि शब्बीरच्या तुलनेने अझीजच्या गायकीला शास्त्रीय संगीताचा थोडाफार आधार असल्याचे त्याच्या गायनातून साफ जाणवते.  राम लखन, कर्मा, बीस साल बाद, नगीना, शहेनशहा, खुदा गवाह,  आवारगी इ. सिनेमातील त्याने गायलेली गाणी त्या काळात बऱ्यापैकी गाजली. 

                  अन्वर, शब्बीर आणि अझीज यांचे एक वैशिष्ट्य म्हणा कि वेगळेपण -- हे त्रिकुट ज्या क्रमाने हिंदी सिनेसंगीतात अवतीर्ण झाले त्याच क्रमाने बाहेर देखील पडले. आज या तिघांची गाणी तर दुरचं पण या त्रिकुटाची नावे देखील लोकांच्या स्मरणात फारशी नाहीत. सर्व काळाचा महिमा !  दुसरे काय ? जी तऱ्हा रफीच्या तथाकथित वारसदारांची तीच किशोरच्याही ! कुमार सानू, अभिजित, बाबुल इ. मंडळींना आज जवळपास अज्ञातवासच पत्करावा लागला आहे. तसे बघितले तर या किशोर मंडळींचा आणि किशोरच्या आवाजाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. बरं, हि झाली तशी बाहेरची मंडळी. अमित कुमारचे काय ? अमित कुमार आणि किशोर कुमार यांच्या आवाजात जरा तरी साम्य आहे का ? पण लोकांनी नाहक त्यांच्यात तुलना करण्यात स्वतःचा वेळ वाया घालवला. संगीतकारांनी देखील किशोर प्रमाणेच अमितला गायला भाग पाडून त्याची स्वतःची जी काही शैली होती ती पार बिघडवून टाकली.
         
             गाणं हे रक्तात असते असे म्हटले जाते मग किशोर, रफी, महेंद्र कपूर, आशा भोसले यांची मुले या क्षेत्रात पुढे का आली नाहीत ? प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक उस्ताद अमीरखान यांचा मुलगा हैदर अमीर उर्फ शहाबाज खान हा गायचं सोडून अभिनयाकडे का वळला ? या प्रश्नांची उत्तरे शोधावीत इतके महत्त्वाचे हे प्रश्न नाहीत. परंतु, आपण एखाद्या विषयी अवास्तव अपेक्षा ठेवून त्या त्याच्याकडून पुऱ्या झाल्या नाहीत तर त्यास शिव्या घालायचे हा कोणता न्याय ? रफीच्या तुलनेने त्याचे हे तथाकथित वारसदार कसे कनिष्ठ दर्जाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी रफीचा आवाज त्याच्या काळातील सर्व नट मंडळींना ‘ फिट्ट ‘ बसायचा असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात काय आहे ? प्राणला रफीचा आवाज कधीच फिट्ट बसला नाही. मेहमूद आणि रफी यांची गाणी जरी बरीच गाजली असली तरी कित्येकदा संधी मिळेल तेव्हा मेहमूद आपल्यासाठी मन्ना डे ने गाणं गावं यासाठी प्रयत्नशील असायचा हे विसरून कसे चालेल ? संजीव कुमारला रफीने अनेकदा आवाज दिला पण तो अनेकदा त्यास शोभून दिसला नाही. या बाबतीत किशोरप्रेमींनी देखील फार हुरळून जायची गरज नाही. कित्येक नट मंडळीना त्याचाही आवाज शोभून दिसायचा नाही हे उघड गुपित आहे. प्राणचे उदाहरण तर रफी – किशोरसाठी कॉमन आहे. त्याला फक्त मन्ना डे चाच आवाज शोभून दिसतो. त्याशिवाय कित्येकदा शशी कपूर आणि जितेंद्रला किशोरचा आवाज विसंगत वाटला आहे हे विसरून चालत नाही. सारांश, केवळ प्रत्येक नटाला शोभणारा आवाज हि कोणत्याच गायकाची खासियत वा स्पेशालिटी नाही. पण तरीही आम्ही असेच धरून चालतो कि, रफी – किशोर हे सर्व नायकांचे आवाज होते. मग मुकेश, हेमंत कुमार, मन्ना डे, तलत मेहमूद, महेंद्र कपूर इ. गायक कोणाचे आवाज होते ?
            
          ३१ जुलै असो कि २४ डिसेंबर, वर्तमानपत्रात आजही रफीच्या नावाने कार्यक्रम करणाऱ्या अनेक गायकांच्या जाहिराती वर्तमानपत्रात झळकत असतात. या कार्यक्रमांना लोकांचाही तसाच प्रेसाद मिळत असल्याने या कार्यक्रमांचे प्रस्थ वाढले आहे. खरे तर यामुळे कोणाची वा कसलीही हानी होत नाही. एखाद्याला गाण्याचे वेड आहे म्हणून त्याला पूर्णवेळ संगीत शिकण्यापलीकडे काही न करू देण्याचा जमाना परीकथेतील राजकुमाराप्रमाणे कधीच लुप्त झाला आहे. त्यामुळे अनुकरण करणारे वा बेसिक सुरांचे ज्ञान घेऊन गाणारे गायक आता हल्ली जास्त प्रमाणात तयार होऊ लागले आहेत. पैकी, अनुकरण करणाऱ्या गायकांमुळे गतकाळातील गायक लोकांच्या स्मृतीत राहिले आहेत हे विसरून चालणार नाही !
       
          एखाद्या नामवंत गायकाचे अनुकरण करणे हि काही वाईट अशी गोष्ट नाही. सुरवातीला कित्येकांचा अनुकरणाकडे कल असतो आणि फिल्म संगीत ऐकण्यासाठी सहज उपलब्ध असल्याने कुठेही बसून गाणी ऐकत त्यानुसार गाण्याचा प्रयत्न करणे हे जवळपास शून्य खर्चात जमून येते. नाहीतर क्लासिकल गायन शिकायला प्रथम तीन ते पाच हजार रुपये खर्चून हार्मोनियम घेण्यापासून आरंभ करावा लागतो आणि हि खर्चिक बाब कित्येकांच्या आवाक्याबाहेरची असते. त्यामुळे ते सहजसाध्य अशा मार्गाकडे वळतात. पुढे गाण्याची थोडी फार समज येताच ते क्लासिकलकडे वळतात किंवा गाणे गायचं सोडून देतात. अशा अनुकरण करणाऱ्या मंडळींमुळे संगीताची हानी होते वगैरे फालतू बडबड अनेकजण करतात. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी व ती म्हणजे –-- इच्छेला वा स्फूर्तीला तुम्ही नियमांच्या  चौकटीत बांधू शकत नाही. एखाद्याला नाउमेद करायचे असेल तर तुझा आवाज चिरका, बसका, अनुनासिक आहे इ. इ. बोलून याला बेहिंमत केले जाते. वास्तविक आवाज आणि गाता गळा सर्वांनाच असतो. पण हे सत्य लपवून ठेवायचे आणि समोरच्याचे मानसिक खच्चीकरण करायचे आणि मग तो अनुकरणाच्या मार्गाने निघाला कि त्याला हिणवायचे, हा दुटप्पीपणा काय कामाचा ?