शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

फिल्मी मुशाफिरी ( भाग - ३ )


राजकुमार.. हा फिल्म इंडस्ट्रीचा खरोखर राजकुमार होता. मूळ नाव कुलभूषण पंडित. प्रथम नोकरी पोलिस खात्यात. तिथून स्वारी अभिनयाकडे वळली म्हणण्यापेक्षा फिल्म इंडस्ट्रीत प्रवेशली म्हणणंच सयुक्तिक ठरेल. कारण अभिनयाच्या प्रचलित मापदंडात तो कधीच कुठे बसला नाही. ना तो दादामुनी अशोककुमार प्रमाणे घरातील एक बुजुर्ग सदस्य वाटला, ना दिलीपकुमार प्रमाणे ट्रॅजेडी किंग ना धर्मेंद्र प्रमाणे ही मॅन बनला. जितेंद्र प्रमाणे उड्या मारत नाचणे त्याला कधी जमलेच नाही. देव आनंद प्रमाणे हिरोईनच्या अवतीभवती फुलपाखरासारखा तो बागडला नाही की अमिताभच्या अँग्री यंग मॅन इतका तो भडक झाला नाही. 

एवढं सगळं असूनही बॉलिवूडचा तो एक प्रतिथयश नट होता. त्याच्या नखऱ्यांचे खरे खोटे किस्से आजही चवीने चघळले जातात. तेही त्याने या दुनियेचा निरोप घेऊन जवळपास दोन अडीच दशके उलटल्यानंतर. यावरून लोकमनावरील त्याच्या गारुडाची कल्पना यावी. 


राजकुमारने आपल्या सुरवातीच्या काळात केलेला अभिनय मला नेहमीच थोडासा लाऊड वाटला. पण वक्त मधल्या राजू / राजाच्या रोलपासून त्याची स्वतःची एक स्वतंत्र अभिनयशैली जन्मास आली. 

खर्जातील आवाज आणि भाषेवरील कमांड. यांमुळे वेळ घेत एकेक शब्द मोजूनमापुन बोलण्याची त्याची अदा.. ती देखील अतिशय संयतपणे.. प्रेक्षकांना मोहून गेली.

कल्पना करा.. वक्त मधला " यह बच्चों के खेलने की चीज नहीं.." हा मदन पुरीला ( बलबीर ) उद्देशून म्हटलेला डायलॉग दिलीपकुमार किंवा अमिताभने म्हटला असता तर त्यातील उपहास, गर्भित धमकी आणि बेदरकारपणा ते दाखवू शकले असते का ? तीच कथा रहमानला ( चिनॉय सेठ ) उद्देशून बोललेल्या " जिनके अपने घर शीशे के हो.." या अजरामर संवादाची !


परंपरेनुसार राजकुमारलाही काही काळ नट्यांसोबत पडद्यावर रोमान्स करत गाणी म्हणावी लागली. पण त्यातील अपवाद वगळता त्याच्या पर्सनॅलिटीला फारशी सूट झाली नाहीत. बहुधा मन्ना डे खेरीज इतर कोणत्याच गायकाचा आवाज त्याच्या चेहऱ्याला फिट्ट बसला नाही, हेच त्यामागील कारण असावं. अपवाद हीर रांझा मधील यह दुनिया यह महफील गाण्याचा. पठ्ठ्यानं बहुधा फर्स्ट टाइम रफीच्या आवाजाला न्याय दिलाय ! 

राजकुमारचा फिल्मी डान्स देखील त्याच्या अभिनयासारखाच होता. त्यात कुठेही धर्मेंद्रसारखा अवघडलेपणा नाही की  देवआनंद चंचलता नाही. मनात आलं.. थोडं थिरकलं की झाला नाच. पण त्यातही एक ग्रेस आणि अदब होती. जी त्याच्या पर्सनॅलिटीला मॅच व्हायची. उदाहरणार्थ,हिंदुस्थान की कसम मधील ' हर तरफ अब यही अफसाने है..' एक दोन ठिकाणीच जानीने पदन्यास केलाय.. पण तोदेखील उत्स्फूर्त वाटावा असा. त्यात कृत्रिमता अजिबात नाही. 


राजकुमारच्या अभिनयाबद्दल बोलताना मला त्याचा एक सीन आठवतोय. पिक्चर तोच आपला..वक्त. क्लायमॅक्सला राजू ( राजकुमार ) लाला केदारनाथला ( बलराज साहनी ) त्याच्या मुलांची ओळख करून देत असतो. त्या सीनमध्ये राजकुमारने अक्षरशः जीव ओतून ऍक्टींग केलीय असं मला नेहमीच वाटत आलंय. पण त्याचं बॅडलक म्हणजे त्याच्यासमोर बलराज साहनी सारखा तगडा अभिनेता होता. ज्याच्या हरवलेल्या मुलांच्या भेटीसाठी व्याकुळ लाला केदारनाथ समोर जानीचा राजू साफ झाकोळून गेला. 


एका टप्प्यावर आपण हिरोच्या भूमिकेत बसत नाही लक्षात येताच तो कॅरेक्टर रोलकडे वळला. पण खंगलेला बाप, आजा हे रोल त्याने क्वचितच केले असतील. मोस्टली तो खानदानी रईस किंवा सरकारी अधिकाऱ्याच्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला. मग तो पुलिस पब्लिक मधला सीबीआय ऑफिसर जगमोहन आझाद असो की सूर्या मधील डिस्ट्रिक्ट कलेक्टर राजपाल चौहान !

तिरंगा मधील ब्रिगेडियर सुर्यदेव सिंह आणि सौदागरच्या राजेश्वर सिंग उर्फ राजुची मोहिनी अद्यापि कायम आहे.


राजकुमारने या दुनियेचा निरोप देखील आपल्या स्टाईलने घेतला. महाभारतातील भीष्माचे कल्पित इच्छामरण त्याला नव्हते पण आपण जाताना व गेल्यावर काय करावे हे ठरवण्याचे त्याच्या हाती निश्चित होते व त्याने तसेच केले. त्याचे निधन, अंतिम संस्कार घडून गेल्यावर कळलं की इंडस्ट्रीचा राजकुमार गेला ! 


राजकुमार हयात असताना व तो गेल्यावर त्याच्या फिल्मी उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला. काहींना मुकेश खन्ना त्याचा पडद्यावरील वारसदार वाटू लागला पण.. ती अदा, घमेंड, मग्रुरी, रग, बेफिकिरी आणि अदब.. मुकेश खन्नाच काय पण इतर कोणत्याही अभिनेत्यात परत दिसली नाही. कारण परमेश्वराने स्वतःच्या मर्जीने जगणारा व एक्झिटचे डिटेल्स ठरवणारा एकच अवलिया जन्माला घातला होता.. व तो म्हणजे राजकुमार ! 


जाता जाता… मराठी प्रेक्षकांत राजकुमारला पुन्हा एकदा भूतकाळातून वर्तमानात आणायचं कार्य झी मराठी वाहिनीवरील ' फु बाई फु ' च्या एका पर्वात अभिनेते सुनील तावडेंनी केलं. त्यांनी रंगवलेला राजकुमार व सागर कारंडेचा रजनीकांत. तुफान परफॉर्मन्स होता. त्याबद्दल या उभयतांचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत !

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

फिल्मी मुशाफिरी ( भाग - २ )

सिनेतारकांना जसं सौंदर्याचं वरदान आहे तद्वत वाढत्या वयाचा शाप देखील आहे. साधारणतः तिशीच्या आसपास येताच किंवा तिशीपार होताच अभिनेत्रींच्या निवृत्तीचे सर्वांनाच वेध लागतात. पण त्याचवेळी पडद्यावरील हिरोच्या वाढत्या वयाचा, मंदावलेल्या हालचालींचा सर्वांनाच सोयीस्कर विसर पडत असतो.

नटीच्या चेहऱ्यावरील वाढतं वय डोळ्यांना खुपतं. पण नटाच्या वाढत्या वयाकडे दुर्लक्ष करून त्याच्यातील परिपक्व अभिनयाकडे पद्धतशीरपणे लक्ष वळवलं जातं. एखादीच विजयाशांती, श्रीदेवी किंवा साऊथची ऍक्शन क्वीन मलश्री आपला रुबाब टिकवून राहते. बाकीच्यांची ड्रीमगर्ल, धक धक गर्ल म्हणून बोळवण केली जाते.

कधीकाळी इंडस्ट्रीत स्त्री प्रधान चित्रपट बनत होते. पण पुढे नायिकांचं स्थान चार दो आँसू बहाके, नाच - बागडके चल दिए… मराठीमध्ये तर याहून भयाण परिस्थिती. 

ग्रामीण परंपरा दाखवणारा एक प्रवाह तर दुसरा शहरी सुधारकांचा. नंतर लाट आली तमाशापटांची. ती ओसरेपर्यंत माहेरच्या साडीने आसवांचे पूर वाहवले. सोशिक सून, कजाग सासू, ठसकेबाज नणंद, लंपट दीर आणि अंगानं वाढलेला डोक्यानं गेलेला नवरा. दोन अडीच तासांच्या रडारडीत खेळ खल्लास. नाही म्हणायला दादा कोंडके व नंतर अशोक - लक्ष्याचा विनोदी चित्रपटांचा सुखद आधार असला तरी पुढे पुढे त्यांचंही अति झालं न् हसू येईनासं झालं. या सगळ्या गदारोळात चित्रपटाला लागणारी एक चांगली सशक्त कथा व त्यातील नायिकेचं स्थान, हे मात्र दुर्लक्षित राहिलं...

बरं, आपल्याला काही फिल्म इंडस्ट्रीच्या हिस्ट्रीशी देणं घेणं नाही. आपण आपलं नट्यांपुरतंच बोलू.

फिल्मी नट्यांइतकं सोशिक जगात इतर कोणी असणार नाही.. असूच शकणार नाही. परदेशातील हाडं फोडणाऱ्या थंडीत अर्धवस्त्रांकीत अवस्थेत गाण्याचं शूटिंग करताना चेहऱ्यावर प्रणयातुर, लज्जित भाव दर्शवणे काय खायचं काम आहे ! 

त्यात दाक्षिणात्य सिनेमा असेल तर मग… हिरो गळ्यापासून पायापर्यंत पॅक असणार. नटीनं मात्र ट्रॅडिशनल हाफ साडी किंवा शॉर्ट स्कर्ट घालायचे. त्याच्या पायात बूट असले तरी तिच्या पायातील पैंजण दाखवण्यासाठी तिला बर्फात अनवाणी चालवणार किंवा चप्पल / सँडल देणार.

त्यामानाने मराठी तारका भाग्यवान असं जर तुम्ही म्हणणार असाल तर त्या भ्रमात राहू नका. जरी आपलं बजेट नट्यांना बर्फात नाचवण्याचं नसलं तरी गवतात, कुसळांत लोळवण्याचं जरूर असतं. आता बर्फ बरा की कुसळं… खैर, जाने भी दो. 

मागे एकदा टीव्हीवर जॅकी श्रॉफ उर्फ जग्गु दादाची मुलाखत बघत होतो. बोलता बोलता भिडू बोलला की, हिरो का कोणत्या तरी मुव्हीतील गाण्याच्या शूटिंग वेळी मीनाक्षी शेषाद्री तापाने आजारी होती. पण त्याही अवस्थेत ते रोमँटिक गाणं तिनं शूट केलं. इथं आपल्याला ताप आल्यावर अंगावर थंड पाण्याचे चार दोन थेंब पडले तरी काटा मारतो आणि इकडे…!

पण हे वरवरचं झालं. इंडस्ट्रीतील तारकांची दुसरी बाजू याहून भयानक असेल का? म्हणजे महिन्यातील ते काही दिवस, शूटिंगसाठी त्या वेळी ब्रेक घेऊ शकतात का ? वयानुरूप त्यांना लग्नाची, संसाराची इच्छा झाल्यास त्यांच्यासमोरच का लग्न की करियर ? हा प्रश्न उभा राहावा.

लग्नानंतर नट्यांना रोमँटिक सीन देता येत नाही, त्यांना संसारामुळे कामाकडे लक्ष देता येत नाही असं म्हटलं जातं. पण मग मौसमी चॅटर्जी, करीना कपूरचं काय ? त्यांना तर रोमँटिक सीन देताना काही प्रॉब्लेम आल्याचे दिसत नाही. हां.. आता रोमॅंटिक सीनची परिभाषा म्हणजे स्मूच, हाफ न्यूड ही असेल तर मग विषयच खुंटला ! 

कारण आपली पुरुषप्रधान संस्कृती. विवाहितनट असे सीन देऊ शकतो पण नटी नाही. नटाच्या वैवाहिक जीवनावर फारसा परिणाम होत नाही पण नटीच्या होतो वगैरे वगैरे. असो.

हे जरा जास्तच सिरीयस झालं. चेंज द टॉपिक.. बॉलिवूड इंडस्ट्रीत काही मजेदार योगायोग असेही घडतात. बेताबमध्ये सनी देओल सोबत पदार्पण करणाऱ्या अमृता सिंगने स्वप्नात देखील विचार केला नसेल की, याच सनीच्या बापाबरोबर तिला हिरॉईनचं काम करावं लागेल. असाच योगायोग रीना रॉय, जयाप्रदा, श्रीदेवी, माधुरी सोबतही घडला आहे. पण कोणत्या नटाच्या बाबतीत असा योगायोग घडलाय का ? की त्याने रियल लाईफ आई - मुलगी सोबत रील लाईफमध्ये प्रियकराचा रोल केलाय. उत्तर मिळाल्यास जरूर कळवा. तोवर अलविदा.. टेक केयर !!

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

फिल्मी मुशाफिरी ( भाग - १ )

लार्जर दॅन लाईफ अशा फिल्मी / रुपेरी पडद्याचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. बालपण ते मृत्यू -- हरएक जीवनाचा टप्पा या रूपेरी पडद्याने व्यापला आहे. मनोरंजनापासून रोजीरोटीचे साधन असे याचे रूप आहे. कधीकधी विचार करतो की, हा रुपेरी पडदा जर आपल्या आयुष्यातून वजा झाला तर…! कल्पनाच करवत नाही.


खूप वर्षांमागे मी जॉनी वॉकरची मुलाखत बघितली होती. त्यात त्याने एक सुंदर दृष्टांत दिला होता. त्याचा सारांश असा की, परमेश्वर सर्वशक्तिमान असला तरी स्वप्नं बघण्याची शक्ती / देणगी फक्त माणसालाच मिळाली आहे. 


सिनेमाचंही असंच आहे. इथे पडद्यावर कधी वास्तवतेहून भयाण तर कल्पिताहून सुंदर चित्र उभारलं जातं. त्यात आपण आपल्या मगदुराप्रमाणे स्वतःला हरवून जातो. पडद्यावरील प्रसंगांचे आपल्या अंतरंगात प्रतिसाद उमटत असतात. कधी पडद्यावरचा फॅमिली ड्रामा पाहताना आपला परिवार आठवतो तर रोमान्स करताना जोडीदार. ( पण पडद्यावर हिरोकडून बुकलून घेणाऱ्या व्हीलनमध्ये क्वचितच कोणाला रियल लाईफमधील खलनायक दिसत असेल. )

कुठे दर्दभरे गीत वाजू लागले की आपल्या मनातील अव्यक्त भावनांचा प्रवाह बांध फोडून वाहू लागतो. किंबहुना दर्द ए दिल हलकं करण्याचं उत्तम साधन म्हणूनही फिल्मी संगीताकडे बघता येतं. 

फिल्मी कॉमेडीही अशीच. एकीकडे जॉनी वॉकर, किशोरकुमार, देवेन वर्मा तर दुसरीकडे जगदीप, मेहमूद, राजेंन्द्रनाथ हे नग म्हणजे दोन ध्रुव.

एका बाजूच्या विनोदाला सभ्यता, अव्यंग ( शारीरिक अर्थाने ) यांचे स्वतःहून आखलेले बंधन आहे तर दुसऱ्याला कसलेच निर्बंध नाहीत. रसिक दोन्ही एन्जॉय करतात तर भक्त - समीक्षक कुंथत बसतात. 


कॉमेडीचा विषय निघाला आहे तर ऍक्टिंगमध्ये सर्वात जास्त सिरीयस, टफ विनोदी भूमिका मानली जाते. याबाबतीत अनुक्रमे कादर खान, गोविंदा हे खरोखरी किंग आहेत. या दुकलीने जितक्या गांभीर्याने फिल्मी कॉमेडीला अतिशय सहजसुंदररित्या रुपेरी पडद्यावर सादर केलंय, तितकं क्वचितच कोणी केलं असेल. 


कॉमेडी प्रमाणेच अभिनयाचा खरा कस लागतो निगेटिव्ह, खलनायकी भूमिकेमध्ये. आपल्याकडे फिल्मी व्हिलनचे रोल्स स्टार्ट टू एन्ड एकांगी पद्धतीने लिहिले जातात. मनुष्य म्हटल्यावर राग, लोभ, दुःख, द्वेषादी स्वभावगुण आले. पण आपल्याकडे व्हिलनला राग, लोभ या दोनच छटा साकारण्यास मिळतात. क्वचित पडद्यावरील जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख दर्शवण्याची संधी मिळते. पण ती एकूण भूमिकेच्या मानाने अगदीच नगण्य असते. 

यादृष्टीने पाहिलं तर ' शोला और शबनम ' मधील गुलशन ग्रोव्हरचा एक सीन मला आठवतो.

आख्ख्या सिनेमात गुल्लूने ' काली ' जबरदस्त रंगवला असला तरी जेव्हा त्याचा भाऊ ' बाली ' ( मोहनीश बहल ) जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणला जातो तेव्हा, काली मधल्या प्रेमळ वडील भावाच्या मनाची तगमग त्याने ज्या तऱ्हेने पेश केलीय त्याला तोड नाही. केवळ त्या सीन पुरते आपण कालीचे तोपर्यंत दृष्टीस पडलेले सर्व क्रौर्य विसरून जातो.

थोड्याफार फरकाने ' घातक ' मध्ये डॅनीचा कात्या पण.. सनीने त्याच्या भावांना मारल्यावर शोकमग्न होतो. 

' ओह डार्लिंग यह इंडिया ' मधला डॉन अमरीश पुरी, स्वतःच पेटवलेल्या दंग्यात आपला सणकी मुलगा ( जावेद जाफरी ) मरेल म्हणून बापाच्या काळजीने त्याला शोधताना दिसतो. सारांश, खलनायकी व्यक्तिरेखेचे इतर कंगोरे दर्शवण्यास देखील अंगी तितकेच उत्तम कलागुण लागतात.

 ( क्रमशः )

       

 


बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

प्रासंगिक ( ९ )

सध्या देशात जे काही चालू आहे, त्यामागे धार्मिक वर्चस्ववाद आहे. तुम्हांला कदाचित धक्का बसेल की आत्ताच्या काळात आणि धार्मिक वर्चस्वतावाद ! मग नक्कीच तो मुसलमानांचा असणार !! पण नाही. 

मुस्लिमांचा वर्चस्वतावाद स. १९४७ ला फळणीसोबतच संपुष्टात आला. जरी त्यांच्यातील काही माथेफिरूंच्या मनात या वर्चस्वतावादाच्या कल्पना घोळत असल्या तरी ती दिवास्वप्नं आहेत. कधीही साकार न होणारी.

ख्रिश्चनांमध्ये असा उपद्व्याप करण्याइतका जीव नाही. जैन, बौद्ध, पारसी, शीख इ. आपापल्या टापूत समाधानी आहेत. तसे वर्चस्वतावादापासून हेही अलिप्त नसले तरी मुळातच शक्ती क्षीण असल्याने यांच्या स्वप्नांना कवडीइतकी किंमत नाही. मग हा धार्मिक वर्चस्वतावाद आहे तरी कोणाचा ?


स. १९४७ पर्यंत या देशावर हिंदू राज्य करणार की मुसलमान ? या तंट्याकडे दोन गट काठावर बसून बघत होते. एक इंग्रज, जे राज्यकर्ते असल्याने हिंदूंच्या तुलनेने मुस्लिमांची तळी उचलून धरणारे व दुसरे वैदिक ! 

या धर्मियांची संख्या अत्यल्प. परन्तु हिंदू धर्मसाहित्यात यांनी अशी काही घुसखोरी करून  ठेवलीय की अद्यापि हिंदूंना हे आपल्यातीलच एक वाटतात. यामुळेच यांच्या हिंदुत्ववादी आवाहनास -- जे प्रत्यक्षतः वैदिकवादी असते -- मूर्ख हिंदू सहजी बळी पडतात. 


स. १९४७ पूर्वीही ते राजकीय पटलावर होते. त्यावेळी काँगेस त्यांच्या ताब्यात होती. पुढे गांधीयुगात तिचे वैदिक स्वरूप मावळून त्यास हिंदू चेहरा येऊ लागला. गांधीला लाख तुम्ही शिव्या घाला, पण त्याच्या राजनीतीमुळे -- मग भले ती हेकेखोर, विचित्र का असेना -- या देशाला निधर्मी राज्यघटना लाभली. पुढे गांधी हत्येनंतर काँग्रेसही रूप बदलत गेली. तिचे अवनत स्वरूप आज आपल्या समोर आहेच.


दुसऱ्या महायुद्धात सावरकरांनी भारतीय तरुणांना सैन्यात जाण्याचा संदेश दिल्याचे सांगितले जाते. ज्याचे उद्दिष्ट सावरकर समर्थक सावरकरी संदर्भाने स्पष्ट करत असतात. सावरकरांचा हा मंत्र वेगळ्या अर्थाने त्यांच्या वैदिक धर्मबांधव संघटनेने -- अर्थात संघाने अंमलात आणला. जेणेकरून संघीय विचारांचे तरुण प्रशासकीय सेवेपासून ते गल्ली बोळातील संघ विरोधी पक्ष - संघटनांमध्ये जाऊन बसले. त्याचे विकसित रूप आपल्यासमोर आज असे आहे की, देशात वैदिक संघाच्या प्रभावाखाली नसलेल्या पक्ष - संघटना अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिल्या आहेत.


आज देशातील बहुतेक प्रमुख सूत्रं वैदिक संघाच्या हाती एकवटली आहेत. लोकशाहीचे खांब यांनी जवळपास पोखरून टाकले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की आपल्या मनसुब्यात ते यशस्वी झाले आहेत.


राजकीय पटलावर जोराने बाऊन्स बॅक करण्याची हिंदूंना अद्यापी संधी आहे. या कामी आपले विचार, भूमिका, तत्व त्यांनी पुन्हा एकदा घासून पुसून स्वच्छ करून पाहिले पाहिजेत. तुमच्यावर लादली जाणारी विचारसरणी, नेतृत्व तुम्ही लाथाडलं पाहिजे. तुमच्या प्रतिनिधीवर त्याच्या पक्षाचे वा प्रमुखाचे नव्हे तर तुमचे वजन, दडपण असले पाहिजे. 


मुठभरांची हुकूमशाही म्हणजे लोकशाही, हे सध्याचे चित्र तुम्हांला बदलायचं असेल तर थोडाफार त्याग करण्याची ; संयम, धैर्य राखण्याची शिस्त तुम्ही बाळगली पाहिजे. दुसऱ्याने लादलेल्या भावनिक मुद्यांकडे तुम्ही वास्तव नजरेने पाहिले पाहिजे. लक्षात घ्या, वैदिकांचे आजचे यश ही जवळपास चार दोन पिढ्यांच्या संघर्ष त्यागाची कहाणी आहे. मूठभर वैदिक जर हे कर्म करू शकतात तर बहुसंख्यांक हिंदू का नाहीत ? की आयुष्यभर पिढ्यान् पिढ्या गुलाम म्हणून जगण्यासाठी व ऊर बडवून घेण्याकरताच आपण हिंदू बनलोत याचा विचार व्हावा !