सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

मनुस्मृति दहन स्मृतिदिनानिमित्त चार शब्द ...




    डिसेंबर अखेर जवळ आला कि तथाकथित संस्कृतीरक्षकांचे नाताळविरोधी व आंबेडकर अनुयायांचे मनुस्मृति दहन संबंधी मेसेज हातात हात घालून सोशल मिडीयावर फिरताना दिसतात. बेगडी संस्कृतीरक्षकांच्या संबंधी या स्थळी लिहिण्याचा हेतू नाही परंतु मनुस्मृति संबंधी चार शब्द लिहिणे आवश्यक वाटते.

    डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतिचे अभ्यासपूर्वक वाचन करून तिचे दहन केले. त्याप्रसंगी मनुस्मृति हा हिंदू धर्मियांचा स्मृतिग्रंथ असल्याची त्यांची इतरांप्रमाणेच धारणा होती. परंतु अलीकडच्या अभ्यासावरून व खुद्द वैदिक साहित्य तसेच डॉ. आंबेडकरांच्याच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म तसेच शुद्र कोण होते ? या ग्रंथांवरून सिद्ध होते कि, मनुस्मृति हा हिंदुंचा ग्रंथ नसून वैदिक धर्मियांचा स्मृतिग्रंथ आहे.

    यातील वर्णविभागणी व शूद्रासंबंधीचे नियम हे हिंदूंना कधीच लागू नव्हते. तसेच वैदिक धर्मियांनी हे नियम हिंदुंवर कधी लादले देखील नाहीत. कारण असे करण्यासाठी त्या त्या धर्माची राजसत्ता येथे प्रस्थापित होणे आवश्यक असते व वैदिकांची एक पेशवाई अपवाद केल्यास येथे कोणतीच राजसत्ता स्थापित झालेली नाही. व पेशवाईतही होळकरासारखे सरदार स्वतंत्र संस्थाने स्थापून राज्यकर्त्याप्रमाणे राहत होते.
    जर मनुस्मृति हि हिंदूंची असती तर होळकराला सरदारकी प्राप्त झाली असती का ? किंवा तत्पूर्वीचे प्राचीन, मध्ययुगीन दाखले पाहिले तर सातवाहन, नंद कोण होते ? नंदाची अखेर करणारा चंद्रगुप्त मौर्य कोण होता ?

    वैदिक ग्रंथात आढळणारा ब्राह्मण शब्द व ऐतिहासिक साधनांत आढळणारे ब्राह्मण दान, देणगी, अग्रहार सारखे उल्लेख, यावरून आम्ही येथे वैदिक धर्मीयांची राजसत्ता प्रस्थापित असल्याचा समज करून घेतो व असा समज करून देण्यात वैदिक इतिहासकारांनी आपल्यावतीने यत्किंचितही हलगर्जीपणा केलेला नाही. जिथे जिथे त्यांना दानपत्रात किंवा इतरत्र ब्राह्मण शब्द आढळला तिथे तिथे त्यांनी त्या राजवटीला वैदिक राजसत्तेचे लेबल चिटकवले.

    शिवाजीच्या बिरुदावलीत गोब्राह्मण प्रतिपालक चिटकवण्यामागे त्यांचा मुख्य हेतू हाच होता. जो प्रामुख्याने ब्रिगेडने कधी नाही ते शहाणपणा दाखवत उधळून लावला. परंतु वैदिक क्षत्रियत्वाच्या गारुडातून मात्र ते सुटू शकले नाहीत व गोब्राह्मणप्रतिपालक हटवून क्षत्रियत्वाचे जोखड त्यांनी आपल्या गळ्यात स्वखुशीने अडकवून घेण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय. ज्याला खुद्द वैदिकांचाच प्रखर विरोध आहे.

    मनुस्मृति वर्णव्यवस्थेचे समर्थन करते म्हणून तिचे दहन आवश्यक आहे तर प्राचीन काळापासून ते आजतागायत या स्मृतीनुसार देशात समाजरचना अस्तित्वात होती हे निर्विवादपणे सिद्ध करणारा एकतरी पुरावा उपलब्ध आहे का ?

    मनुस्मृतीत शुद्रविरोधी वचनं आहेत म्हणून तिचे दहन करावे तर प्रथम हे शुद्र कोण आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे. या स्मृतिच्या अभ्यासावरून वैदिकांनी शूद्रांचे दोन वर्ग कल्पिल्याचे स्पष्ट होते. प्रथमतः जे वैदिक नाही त्यांना ते शुद्र म्हणत. त्यानंतर वैदिक धर्मात प्रवेशलेले तसेच वैदिकांच्या सेवेत असलेले ते शुद्र अशी त्यांनी शुद्रत्वाची व्याख्या बनवली. आणि स्मृतिग्रंथातील शुद्र संबंधी कटू वचने या दुसऱ्या वर्गातील शूद्रांना उद्देशून आहेत.
    मग जर स्मृतिवचनं वैदिक शूद्रांकरता आहेत तर गैर वैदिकांनी रडायची गरज तरी काय ? तसं बघायला गेलं तर कुराणातही गैर इस्लामी तथा काफिर विरोधी वचनं आहेत. मग त्याची होळी कोण करतं का ?

    डॉ. आंबेडकरांची धर्मांतर घोषणा व त्यानंतर तसेच तत्पूर्वीही झालेले जात्युछेदनाचे हास्यास्पद प्रयोग हा देखील विचारात घेण्यासारखा विषय आहे.

    अशा प्रयोगात सहभोजन, जानवं देणे वगैरे प्रकार होत. यांपैकी जानवं देण्याच्या निमिताने काही वैदिकांनी धर्मान्तराची छुपी मोहीही चालवली होती ज्यामध्ये हिंदुत्वाचा बुरखा घेतलेले सावरकरांसाखे कट्टे वैदिक धर्मीयही सहभागी होते. परंतु खुद्द स्वधार्मियांनीच त्यांना याबाबतीत साथ न दिल्याने, त्यांच्या धर्मान्तरास मान्यता न दिल्याने हिंदूंनी अस्पृश्य मानलेल्यांना वैदिक धर्मात घेण्याचा त्यांचा डाव फसला.

    डॉ. आंबेडकर देखील उपनयन, वेदांचे शिक्षण इ. वैदिक संस्कारांचे महत्व मानत होते. कारण त्या काळात वैदिक हे हिंदू धर्मातीलच एक घटक किंबहुना हिंदूच होत अशी भावना प्रबळ होती व तसा समजही करून देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात उपनयन करवून घेणे किंवा वेद शिकणे म्हणजे सुंता करवून कुराण पठण करण्यासारखे आहे, हि वस्तुस्थिती आंबेडकरांच्या लक्षात त्याकाळी येऊ शकली नाही तरी सद्यकालीन त्यांच्या अनुयायांना व हिंदूंना न यावी  हि मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

    कोण कुठल्या अफगाण प्रांतात जन्मलेला वैदिक धर्म. ज्याची मुळे पारशी धर्मात आढळतात व त्या धर्मियांनी मांडलेल्या उच्छेदामुळेच वैदिकांना देशांतराचा निर्णय घ्यावा लागला. आपली जन्मभूमी, भाषा यांना ते कायमचे अंतरले. परंतु आपला धर्म, संस्कार, श्रद्धा वगैरेंना जपण्याचा त्यांनी येथे आटोकाट प्रयत्न केला. आपलं अल्पसंख्यकत्व कमजोरी ठरू नये म्हणून केवळ भाषिक साधर्म्याधारे ब्राह्मण शब्दाचा आधार घेत हिंदू धर्मात शिरकाव केला. येथील साहित्य, संकृतीचे वैदिकीकरण करून त्यांनी कागदोपत्री स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व आजही करताहेत.
 
    डोळस वृत्तीने, स्वतंत्र बुद्धीने त्यांचे हे डाव ओळखून हाणून पाडणे आपले कर्तव्य आहे. सुदैवाने त्यांच्यातील काहींनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस जागून केंद्र सरकारकडे धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांस पाठबळ देऊन यांना सन्मानाने हिंदू धर्मातून बाहेर काढणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्याखेरीज हिंदू धर्मीयांची व हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही ! 

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

शारीरिक संबंध :- मुक्त चिंतन



    शारीरिक संबंधांविषयी उघड चर्चा वा लेखन करायचं नाही असा एक आपल्यात दंडक आहे. वास्तविक ज्या समाजाने कामशास्त्रास जन्म दिला, ज्या समाजाची पूजन व्यवस्था लैंगिक संबंधांचीच प्रतीकात्मकता आहे त्या समाजाची हि दुटप्पी मानसिकता विस्मयजनकच म्हणावी !

    या कुचंबलेल्या मानसिकतेचा परिणाम समाजाच्या शाब्दिक पारिभाषिकतेवरही झाल्याचे दिसून येते. शरीरसानाब्न्ध हा लांबलचक शब्द सहसा उच्चारला जात नाही. लैंगिक संबंध देखील तसाच. त्यातल्यात्यात देशी short फॉर्म म्हणजे संभोग ! अर्थात, हा सभ्य सामाजिक शब्द. पण त्याचाही उच्चार सभ्य लोकांकडून होत नाही. यंग जनरेशनच्या दृष्टीने उपरोक्त शब्द म्हणजे आउटडेटेड संकल्पना, अडगळ. त्यांनी सेक्स शब्दाचा आधार घेतलाय. बाकी ह, झ, ल वगैरे पासून सुरु होणारे, सहजगत्या उच्चारले जाणारे --- विशेषतः शिव्यांमध्ये --- शब्द ग्राम्य मानले जातात.

    प्राचीन काळी अनिर्बंध लैंगिक संबंध होते. ज्यावर नियंत्रण ठेवत क्रमाक्रमाने त्या संबंधांना विवाहसंस्थेत गोवत संभोगाचा संकोच करण्यासाठी मातृत्व - पितृत्व या उदात्त, पवित्र वगैरे संकल्पनांची निर्मिती करण्यात आली. जी पूर्णतः अनैसर्गिक आहे.

    भारतीय समाजमनावर हिंदुत्वाचा बुरखा घेतलेल्या वैदिक धर्मियांचा मोठा पगडा आहे. ज्या धर्मात संभोगास अतिशय नगण्य, तुच्छ स्थान देण्यात आले आहे. ज्याचा उल्लेख तिरस्कारपूर्वक केला जातो. कदाचित यामुळेच शरीरसंबंधांविषयी उघड चर्चा न करण्याचा दंडक निर्माण झाला असावा. परंतु इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे हे वैदिक धर्मीय आरंभी संभोगाच्या बाबतीत अनिर्बंध, स्वैर संबंधांचेच पुरस्कर्ते होते.

    संभोगाविषयी भारतीयांच्या मनी एक जबरदस्त आकर्षण आहे व ते स्वाभाविकही आहे. धार्मिक प्रवचन, सत्संग सारख्या भिकारचोट कार्यक्रमांतून भगवी, पांढरी वस्त्रं घातलेली / न घातलेली वळू मंडळी मानवी संभोगाची नेहमी पशुत्वाशी तुलना करत या बाबतीत पशु देखील प्रजननार्थ जवळ येत असल्याचे सांगत मनुष्याने केवळ मातृ - पितृत्व प्राप्तीकरता संभोग करावा असे वारंवार सूचित करत असतात. जे यांच्या तडाख्यात येत नाहीत त्यांची पुस्तकांतून शिकार केली जाते. सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने अशा मेसेजचा सकाळ - संध्याकाळ अक्षरशः वर्षाव केला जतो.
    
    वास्तविक निसर्गाने संभोगाचा अधिकार हा प्रत्येक प्राण्यास दिलेला आहे व इच्छेनुरूप त्यास तो योग्य मार्गाने प्राप्त होणे आवश्यक आहे.

    मनुष्य वगळता इतर प्राण्यांची भाषा अगम्य असल्याने त्यांचे यासंदर्भातील विचार समजणे शक्य नाही. परंतु मनुष्यांपुरता विचार केला तर सभ्यतेच्या, प्रगतीच्या नावाखाली आपण मनुष्यजीवनातून संभोगाचेच उच्चाटन करत चाललो आहोत.

    प्रथमतः संभोगासाठी वयाची विशिष्ट अट लागू केली जाते. त्या वयात पोहोचताच तुम्हांला संभोगाचा अधिकार प्राप्त होतो पण करता येत नाही. कारण त्याकरता समाजानेच लग्नाची अट घातली आहे. या अटीच्या पूर्ततेसाठी अर्थार्जन आवश्यक आहे. अर्थात, त्यासाठी धावपळ हि आलीच. खेरीज लग्नासंबंधी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, अपेक्षा असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी आणखी काही काळ थांबणे भाग पडते. त्यानंतर लग्न कधी होईल तेव्हा होईल. लगेच समाजाने एकप्रकारे लादलेल्या मातृ - पितृत्वाच्या प्राप्तीसाठी धडपड. त्यानंतर अपत्याचे संगोपन, शिक्षण आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आर्थिक तरतूद करणे. यातून मनुष्याला स्वतंत्र खासगी जीवनासाठी वेळ मिळतोच कुठे, आणि त्याला जीवनातील अत्युच्च संभोगानंदाची प्राप्ती होते तरी केव्हा ?

    याचा परिणाम म्हणजे समाजानेच ठरवलेल्या लैंगिक संबंध विषयक गुन्ह्यांत वाढ. वस्तुतः व्यक्तीचा संभोग अधिकार एका हाताने हिरावून घेत वर तिने चोरून प्राप्त केलेल्या शरीरसुखास्तव तिला अपराधी मानणे हि एकप्रकारे मनुष्यत्वाचीच क्रूर थट्टा आहे व ती आजच नव्हे तर शेकडो वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. परंतु प्राचीन काळी अशी स्थिती होती का ?  

    महाभारतावरील वैदिक धर्मियांनी केलेले संस्कार दूर करत निखळ हिंदू दृष्टीने पाहिले तर तत्कालीन समाज हा लैंगिक बाबतीत स्वातंत्र्यप्रिय दिसतो. तिथे व्यक्तीचा संभोगाधिकार हा समाजानेच मान्य केलेला आहे. त्यामुळेच कुंती, द्रौपदी, हिडींबा, सत्यवती सारखी उदाहरणे तिथे आढळतात. रामायण पाहिले तर शूर्पणखाही याच समाजव्यवस्थेतील असल्याचे दिसून येते. रावण वधानंतरचे रामायण प्रक्षिप्त मानले जाते परंतु रामाने सीतेच्या त्यागाची भाषा उच्चारत तिला लक्ष्मणाकडे जायला सांगण्यातून काय ध्वनित होते ? 
    बरं, या पुरातन गोष्टी झाल्या. खजुराहो सारखी अमर शिल्पं आपल्याला काय सांगतात ? किंवा सध्या प्रचलित असलेल्या पूजा पद्धती तरी काय सांगतात ? कामाख्या देवीच्या मंदिरात प्रसादादाखल मिळणारा लाल कपड्याचा तुकडा कशाचे प्रतीक आहे ?
    स्त्रीच्या मासिक पाळीकडे विटाळ, अपवित्र दृष्टीने बघणारा समाज देवीच्या विटाळाचे प्रतीक म्हणून मिळणारा कापडी तुकडा प्रसाद म्हणून मिरवतो हा निश्चितच विरोधाभास आहे.
 
    मंदिरांमध्ये देवी - देवतांची लग्नं लावली जातात. लग्नानंतर त्यांच्याही रात्री सजवल्या जातात. म्हणजेच संभोगाचे प्राचीन काळी असलेले स्थान अवनत होत कोणत्या स्थितीपर्यंत आलेलं आहे व पुढे कुठवर जाणार आहे याची कल्पना करणे तितकेसे अवघड नाही.

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

संवाद





    सर्वत्र अस्वस्थता, अशांतता धुमसतेय. सगळीकडे एकप्रकारची खदखद दाटून राहिलीय. वातावरण तसं बनलंय कि लोकं ? सगळीकडे बुभूक्षितांचे तांडे फिरताहेत. स्वतःच अस्तित्व जपण्याच्या प्रयत्नात  प्रत्येकजण अधिकाधिक हिंस्त्र होत चाललाय. इथं धोका प्रत्येकाला आहे. पण कोणाला कोणापासून ?
    प्रत्येकावर शिक्क्याची छाप आहे. वेगवेगळ्या छापांचे शिक्के मिरवणारी माणसं. दुसऱ्या गटाचा शिक्केधारी दिसला कि तुटून पडायला तयार. पण हे सारं कशासाठी ?
    सुखकर जीवनासाठी समाजाने निर्माण केलेल्या संस्था आज समाजाचेच नियमन, नियंत्रण करताहेत.
    साधी बाब. प्रशासनासाठी उमेदवार निवडून देण्याची. पण त्यासाठी कोण यातायात ? आधी सामाजिक मुद्दे. नंतर मंदिरवाले आले. परत फिरून अर्थकारण दिसले. नंतर मग ट्रेंड बदलत गेला. विकास विकास म्हणत आम्ही बलात्कार, खून या मुद्द्यांना प्रचाराचे साधन मानले. निवडणुका जवळ आल्या कि, पद्धतशीरपणे वखवखलेली खरी - खोटी बोकडं बायका धरून त्यांच्यावर चढायला मोकळी होऊ लागलीत. मग यातून आख्ख्या समाजाची होरपळ. पण पाच वर्षांच्या सत्तेची निश्चिती ! पुढचा मुद्दा काय असेल ?
    अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा अद्यापही भागवता येत नाहीत. पुढच्या गोष्टींची तर बातच नाही. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात आभाळ पाठीवर पडलेला ससा आहे. हा धास्तावलेला ससा....
    दररोज किड्यामुंग्यागत जन्माला येणारी व मरणारी माणसं. प्राणीसृष्टीतील सर्वात विकसित जमात. जी इतर जमातींसह आपल्यातच उरबसणीला केव्हाही तयार. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींसाठी मरा - मारायलाही हीच व मेलेल्यांसाठी मोठमोठ्याने गळे काढायलाही हीच ! कदाचित याच गोष्टीमुळे हि सर्वात विकसित जमात बनली असावी.
     पण मग यांच्यात आणि मनोरुग्णांत फरक तो काय ? कि, इथेही संख्याबळ ? ते अल्पमतात म्हणून हॉस्पिटलात व हे बहुमतात म्हणून .....

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

वैदिक हा स्वतंत्र धर्म !


 
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी समाजमन चांगलेच ढवळून निघाले असून त्यानिमित्ताने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हिंदू - वैदिक स्वतंत्र धर्म वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राज्य पातळीवर याबाबतची प्रथमतः अस्पष्टशी जाणीव जरी डॉ. खोले - यादव प्रकरणाने झाली असली तरी व्यापक दृष्टीने पाहता देश पातळीवर हि जाणीव जागृत असून वैदिक धर्मियांनीच आपणांस धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून घोषित करावे अशी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे व त्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडून केंद्र सरकारने अहवाल मागवल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
स्वतंत्र वैदिक धर्म मान्यतेची हि प्राथमिक पायरी असल्याने यास्थळी अशी मागणी फेटाळून लावण्याचे कार्य आयोगाने इमानइतबारे पार पाडले आहे. परंतु हि मागणी फेटाळून लावताना आयोगाने दिलेली कारणं मात्र अतिशय हास्यास्पद आहेत.
आयोगाच्या मते वैदिक ब्राह्मण हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. परंतु हि गोष्ट वैदिकांनाच मुळी मान्य नाही याचे काय ? दुसरे असे कि, परंपरा व संस्कृती रक्षणार्थ आपण कटीबद्ध असल्याचे वैदिकांचे म्हणणे आहे. परंतु यामुळे त्यांच्या धार्मिक अल्पसंख्यांक मागणीस बळ प्राप्त होत नाही असा अजब तर्क आयोगाने मांडला असून याकरता युनेस्कोने वेद व वैदिक संस्कृती रक्षणार्थ केलेल्या विनंतीचा आधार घेण्याचा आयोगाने निरर्थक प्रयत्न केला आहे. उलट वैदिक हा स्वतंत्र धर्म असल्याची वैदिकांची मागणी हि युनेस्कोच्या विनंतीस पूरक व सुसंगत असल्याचेच यातून ध्वनित होते.
खेरीज वैदिकांची मागणी फेटाळून लावताना आयोगाने असे मत व्यक्त केले आहे कि, विश्व ब्राह्मण संघटना तसेच पूर्वेत्तर बहुभाषिक ब्राह्मण महासभेच्या मागणीनुसार वैदिकांना अल्पसंख्यांकत्वाचा दर्जा देण्याचे जर मान्य केले तर भविष्यात राजपूत, वैश्य इ. हिंदू जाती देखील अशा व्यवस्थेची मागणी करतील जेणेकरून हिंदू समुदायाचे अनेक तुकड्यांत विभाजन होईल.
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने हे मत सांगताना वैदिक हे हिंदू धर्मियच होत, हे गृहीत धरून प्रथम चूक केली आहे. त्यानंतर राजपूत, वैश्य आदींचा यांनी उल्लेख करत हिंदू समाजाचे अनेक तुकड्यांत विभाजन होण्याची भीती व्यक्त केली आहे.
मुळात वैदिक धर्म हा स्वतंत्र आहे. त्याची स्वतःची दोन हजार वर्षांहून अधिक अशी जुनी परंपरा आहे. यांचे स्वतंत्र धर्मग्रंथ, स्मृतिशस्त्रे, उपासना पद्धती असून याकरता लागणारा उपाध्याय वर्ग तसेच या सर्वांचे नियमन करणारी धर्मगुरू संस्थाही त्यांच्यात अस्तित्वात आहे. या धर्मगुरु संस्थेने मान्यता दिल्याखेरीज तसेच समस्त वैदिक कर्मकांडाचा अवलंब केल्याशिवाय कोणाला ' आपण वैदिक धर्मीय आहोत ' असे म्हणण्याचा अधिकार पोहोचतो का ? याचा विचार होणे अपेक्षित आहे. जो आयोगाने केलेला नाही.
त्यामुळे भविष्यात राजपूत, वैश्य किंवा राज्य पातळीवर धनगर, मराठा इ. जाती वैदिक मान्यतेची मागणी करतील वा त्या वर्गात आपला समावेश व्हावा अशी मागणी करतील हि भीतीच निरर्थक आहे. व त्यातूनही असे घडले तर हा वैदिक धर्मीय व त्या धर्माचे सदस्यत्व घेऊ इच्छिणारे यांचा प्रश्न आहे. तिथे आयोगाचे काय काम ?
आयोगाने हिंदू समाजाच्या विभाजनाची भीती व्यक्त करावी हे मोठं आश्चर्य मानलं पाहिजे. वर्षानुवर्षे होणारी धर्मांतरे काय आयोगास आजवर दिसून आली नाहीत ? या धर्मांतरांमुळे हिंदू समाजाचे विभाजन, नुकसान झाले नाही असे आयोगाला वाटते का ? कि आयोगाला मुळात वैदिक - हिंदू भेदच समजलेला नाही ? वा त्यांची समजावून घेण्याची मुळी इछाच नाही.
* खाली दिलेल्या संकेतस्थळांवर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालाची इंग्रजी व हिंदी भाषेतील वार्षिक रिपोर्टची पीडीफ फाईल उपलब्ध आहे.

http://ncm.nic.in/pdf/Annual%20Report/Annual%20Report%202016-17(%20English).pdf

http://ncm.nic.in/pdf/Annual%20Report/Annual%20Report%202016-17(%20Hindi).pdf

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

२२ प्रतिज्ञांची चिकित्सा






डॉ. आंबेडकर यांनी दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मदीक्षे प्रसंगी दिलेल्या २२ प्रतिज्ञा

१) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) गौरी - गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७) बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही.
८) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११) भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३) सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
१४) चोरी करणार नाही.
१५) खोटे बोलणार नाही.
१६) व्यभिचार करणार नाही.
१७) दारु पिणार नाही.
१८) ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदूधर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
२२) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.

     प्रस्तुत स्थळी आपण डॉ. आंबेडकरांनी धर्मांतरावेळी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञांची चर्चा करणार आहोत. चर्चेकरता या २२ प्रतीज्ञांच्या दोन प्रतिमा मी वापरात घेतल्या असून पैकी एक दीक्षाभूमी नागपूर येथील आहे व दुसरी सर्वसाधारणरित्या इंटरनेटवरील. पैकी दीक्षाभूमी येथील स्तंभावरील प्रतिज्ञांची प्रतिमा अधिकृत मानून तिच्या आधारेच उपरोक्त प्रतिज्ञांचे विवेचन करत आहे.



    प्रतिज्ञा क्र. १ ते ६ या संपूर्णतः नकारार्थी असून त्या हिंदू धर्म त्यागण्याच्या पार्श्वभूमीवर असल्याचे दिसून येते.
    यानंतर प्र. क्र. ८ व १९ याही हिंदू धर्माशी संबंधित असून पैकी प्र. क्र. ८ ब्राह्मण पुरोहित विरोधी असून प्र. क्र. १९ मध्ये हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकृतीचा उच्चार केलेला आहे.
    प्र. क्र. ५ हा बौद्ध व हिंदू धर्मातील फरक स्पष्ट करणारा भाग असून प्र. क्र. ९ ते १८ व २० ते २२ हा बौद्धधर्मी स्वीकृती व वर्तनाशी संबंधित आहे.

    या सर्व प्रतिज्ञांचे वरवर जरी चिंतन केले तरी यातून लक्षात येणाऱ्या दोन प्रमुख बाबी म्हणजे या प्रतिज्ञा जशा बौद्ध धर्म स्वीकृतीच्या आहेत तशाच या धर्मांतर्गत निर्मित नवीन पंथ स्वीकृतीच्याही आहेत. यामुळेच या २२ प्रतिज्ञांद्वारे बौद्ध धर्म स्वीकृतांचा समावेश नवयान या पंथात होतो. ज्याचा व्यवहारात निर्देश नवबौद्ध असा केला जातो.

    या पार्श्वभूमीवर उपरोक्त २२ प्रतिज्ञांपैकी प्रथम ३ आपण विचारात घेऊ.
१) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) गौरी - गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    
    डॉक्टरांनी सरसकट हिंदू देवी - देवता हा सरळ पर्याय न स्वीकारता क्रमाने ब्रम्हा - विष्णू - महेश तसेच राम, कृष्ण, गौरी - गणपती व मग हिंदू धर्मातील इतर देवदेवता अशी क्रमवारी घेतली आहे.
    ज्या व्यक्तीला आपला पुरातन धर्म --- येथे प्रतिज्ञा स्वरूपामुळे हिंदू हेच अपेक्षित आहे --- त्यागायचा आहे त्याच्या मनाची तयारी, प्रतिज्ञा स्वीकृतीपर्यंत व्हावी हा यामागील हेतू असू शकतो. परंतु यास्थळी उद्भवणारा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मियांनी बौद्ध धर्मांतर्गत नवयान पंथात प्रवेश घेण्याचे ठरवल्यास त्यांना या प्रतिज्ञा लागू होतात का ? नसल्यास नवयान पंथासह बौद्धधर्म स्वीकृतीनंतर आपल्या पुरातन धर्मातील देवी - देवतांचे भजन - पूजन करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो का ? वा अमान्य केला जातो का ? तसेच याच प्रतिज्ञांच्या आधारे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मीय उपास्य देवतेची आराधना त्याज्य मानली जाऊ शकते का ? कि त्यास या आज्ञांद्वारे अनुमती प्राप्त होते ?
    दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पंथाच्या द्वेषातून वा उपासना पद्धतीतील फरकावरून, मतभिन्नतेवरून स्वतंत्र पंथनिर्मिती समजता येते. परंतु ज्या धर्माचा आपण त्याग करणार आहोत त्याचा द्वेष करून नवधर्म स्वीकृतीचा हा मार्ग कितपत योग्य आहे ?
धर्मपरिवर्तन हे मत परिवर्तनातून होते. मग मतपरिवर्तनासाठी ज्ञान, जिज्ञासा सोडून द्वेषाचा आधार कशासाठी ?

    प्र. क्र. ४ व ५ अवतार संकल्पनेविषयी आहे.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.

    इथे हिंदू अवतार संकल्पना गृहीत धरली आहे परंतु खुद्द बौद्ध धर्मातील जातक कथा पुर्वजन्माधारे बुद्ध अवताराचे समर्थन करतात त्याचे काय ?   

    प्र. क्र. ६ ते ८
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७) बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही.
८) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.

    हे पुन्हा धर्मांतरीत व्यक्तीने मूळ धर्मातील परंपरा आचरणात आणू नयेत याकरता घातलेले एकप्रकारे निर्बन्ध आहेत.

    प्र. क्र. ११, १२ यातील संज्ञांची स्पष्टता प्र. क्र. १३ ते १८ मध्ये करण्यात आली आहे.
११) भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३) सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
१४) चोरी करणार नाही.
१५) खोटे बोलणार नाही.
१६) व्यभिचार करणार नाही.
१७) दारु पिणार नाही.
१८) ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.

    प्र. क्र. १९ - २२ हा भाग जुना धर्म त्यागून नवधर्म स्वीकृतीचा आहे.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदूधर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
२२) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.

    प्र. क्र. ९, १०, २२ हा भाग विचारात घेण्यासारखा आहे.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
२२) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.

     यामध्ये सर्व मनुष्य समान मानत समता स्थापण्याचा उल्लेख आहे. पण येथे कोणती समता अपेक्षित आहे ? तसेच समता स्थापण्याचे कोणते मार्ग, पर्याय येथे सांगितले आहेत ?
    याचे उत्तर प्र. क्र. २२ मध्ये मिळते. जेथे मत, मन परिवर्तन ग्राह्य धरण्यात आले आहे. याकरता धर्मांतर हि बाब आवश्यक मानली असून याद्वारे हि अट फक्त बौद्ध धर्म व नवयान पंथ स्वीकृतांनाच लागू होत असल्याचे दिसून येत.
    प्र. क्र. २२ मध्ये बुद्धाच्या शिकवणीनुसार वागण्याचा उच्चार आहे. आता इथे परत प्रश्न उद्भवतो कि, बुद्धाची शिकवण म्हणजे काय ? बावीस प्रतिज्ञांपैकी आरंभीच्या प्रतिज्ञा बुद्धाच्या शिकवणुकीत वा विचारांत अथवा वचनांत उल्लेखल्या आहेत का ? जर नाही, तर मग हा बौद्ध धर्मांतर्गत नवपंथ निर्मितीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.

    इथे आपण भूमिकांचाही विचार केला पाहिजे. घटनासमितीचे सदस्यत्व लाभलेली व या प्रतिज्ञांचा उच्चार - प्रचार करणारी व्यक्ती एकच आहे. परंतु दोन्ही ठिकाणी या व्यक्तीची भूमिका वेगवेगळी आहे. घटनाकाराच्या भूमिकेत आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता इ. तत्वांचा स्वीकार, पुरस्कार केला आहे. परंतु बौद्ध धर्म स्वीकृती व त्या धर्मांतर्गत नवपंथ निर्मिती वेळी त्यांनी घटनासमितीतील भूमिका सोडत पारंपारिक पंथ निर्मात्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. हा बदल हेतुतः झाला वा असे होणे अपरिहार्य होते, यावर चर्चा करणे अशक्य नाही परंतु ते प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत बसत नाही.
तत्कालीन बौद्ध धर्मांतर्गत प्रचलित हीनयान व महायान या पारंपारिक पंथांहून वेगळा पंथ स्थापन करण्याचा मानस, डॉक्टरांचा धर्मांतरापूर्वीच निश्चित झाला असावा असे त्यांच्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथावरून प्रतीत होते. अन्यथा विपुल प्रमाणात बौद्ध संहिता, साहित्य उपलब्ध असताना त्यांना या धार्मिक ग्रंथ लेखनाची आवश्यकता का भासावी ? याच अनुषंगाने उपस्थित होणारा दुसरा प्रश्न म्हणजे बौद्धधर्मांतर्गत नवपंथनिर्मितीची गरज आंबेडकरांना का वाटावी ? 
     
    सामान्यतः एका धर्मांतर्गत जेव्हा अनेक पंथ - उपपंथ निर्माण होतात तेव्हा त्यांचा जन्म दुसऱ्या पंथाच्या विरोधात, चुरशीने झाल्याचे दिसून येते. परंतु इथे थोडा फरक आहे. बाबसाहेब बौद्ध धर्मातील प्रचलित दोन पंथांचा येथे विचारच करत नाहीत व त्यांच्या टीकात्मक प्रतिज्ञांचा रोख सरळसरळ हिंदू धर्मावर आहे. हि गोष्ट त्या काळाशी कितीही सुसंगत असली तरी घटना इतिहासबद्ध झाल्याने याचे ग्रांथिक, वैचारिक परिणाम काय होतीच याचाही विचार होणे अपेक्षित होते.

    यानंतरचा भाग आहे शब्दप्रामाण्यवादाचा. या बावीस प्रतिज्ञांनुसार हिंदू धर्माशी निगडीत असे कोणतेही कृत्य करण्यास काही नवबौद्ध मंडळीं विरोध दर्शवतात. परंतु त्याचप्रमाणे प्र. क्र. १४ ते १७ च्या पालनासंबंधी ते तितके आग्रही असतात का ? इथे व्यक्तिगत अपवाद असू शकतात परंतु प्रश्न सार्वजनिक / प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे.
    शब्दप्रामाण्यवादातून कट्टरता जन्म घेते हा इतिहास असून याचे भरपूर दाखले गतकालीन घटनांतून प्राप्त होतात. परंतु त्यासोबत याचेही भान बाळगणे आवश्यक आहे व ते म्हणजे सहजीवनातून सर्वच बाबींची देवाण - घेवाण होत असते. त्यास विरोध करण्याने सामाजिक समरसता --- जी समतेसाठी अत्यावश्यक आहे --- कधीच अस्तित्वात येणार नाही.
    धर्म - पंथ संस्थापक, परिवर्तकांचे विचार हे कालसापेक्ष असतात. कालातीत नाही. त्यामुळे कालसुसंगत त्याचा अर्थ घेत त्यात गरजेनुसार बदल करण्यातच व्यापक समाजहित सामावेलेलं आहे.