शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

शारीरिक संबंध :- मुक्त चिंतन



    शारीरिक संबंधांविषयी उघड चर्चा वा लेखन करायचं नाही असा एक आपल्यात दंडक आहे. वास्तविक ज्या समाजाने कामशास्त्रास जन्म दिला, ज्या समाजाची पूजन व्यवस्था लैंगिक संबंधांचीच प्रतीकात्मकता आहे त्या समाजाची हि दुटप्पी मानसिकता विस्मयजनकच म्हणावी !

    या कुचंबलेल्या मानसिकतेचा परिणाम समाजाच्या शाब्दिक पारिभाषिकतेवरही झाल्याचे दिसून येते. शरीरसानाब्न्ध हा लांबलचक शब्द सहसा उच्चारला जात नाही. लैंगिक संबंध देखील तसाच. त्यातल्यात्यात देशी short फॉर्म म्हणजे संभोग ! अर्थात, हा सभ्य सामाजिक शब्द. पण त्याचाही उच्चार सभ्य लोकांकडून होत नाही. यंग जनरेशनच्या दृष्टीने उपरोक्त शब्द म्हणजे आउटडेटेड संकल्पना, अडगळ. त्यांनी सेक्स शब्दाचा आधार घेतलाय. बाकी ह, झ, ल वगैरे पासून सुरु होणारे, सहजगत्या उच्चारले जाणारे --- विशेषतः शिव्यांमध्ये --- शब्द ग्राम्य मानले जातात.

    प्राचीन काळी अनिर्बंध लैंगिक संबंध होते. ज्यावर नियंत्रण ठेवत क्रमाक्रमाने त्या संबंधांना विवाहसंस्थेत गोवत संभोगाचा संकोच करण्यासाठी मातृत्व - पितृत्व या उदात्त, पवित्र वगैरे संकल्पनांची निर्मिती करण्यात आली. जी पूर्णतः अनैसर्गिक आहे.

    भारतीय समाजमनावर हिंदुत्वाचा बुरखा घेतलेल्या वैदिक धर्मियांचा मोठा पगडा आहे. ज्या धर्मात संभोगास अतिशय नगण्य, तुच्छ स्थान देण्यात आले आहे. ज्याचा उल्लेख तिरस्कारपूर्वक केला जातो. कदाचित यामुळेच शरीरसंबंधांविषयी उघड चर्चा न करण्याचा दंडक निर्माण झाला असावा. परंतु इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे हे वैदिक धर्मीय आरंभी संभोगाच्या बाबतीत अनिर्बंध, स्वैर संबंधांचेच पुरस्कर्ते होते.

    संभोगाविषयी भारतीयांच्या मनी एक जबरदस्त आकर्षण आहे व ते स्वाभाविकही आहे. धार्मिक प्रवचन, सत्संग सारख्या भिकारचोट कार्यक्रमांतून भगवी, पांढरी वस्त्रं घातलेली / न घातलेली वळू मंडळी मानवी संभोगाची नेहमी पशुत्वाशी तुलना करत या बाबतीत पशु देखील प्रजननार्थ जवळ येत असल्याचे सांगत मनुष्याने केवळ मातृ - पितृत्व प्राप्तीकरता संभोग करावा असे वारंवार सूचित करत असतात. जे यांच्या तडाख्यात येत नाहीत त्यांची पुस्तकांतून शिकार केली जाते. सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने अशा मेसेजचा सकाळ - संध्याकाळ अक्षरशः वर्षाव केला जतो.
    
    वास्तविक निसर्गाने संभोगाचा अधिकार हा प्रत्येक प्राण्यास दिलेला आहे व इच्छेनुरूप त्यास तो योग्य मार्गाने प्राप्त होणे आवश्यक आहे.

    मनुष्य वगळता इतर प्राण्यांची भाषा अगम्य असल्याने त्यांचे यासंदर्भातील विचार समजणे शक्य नाही. परंतु मनुष्यांपुरता विचार केला तर सभ्यतेच्या, प्रगतीच्या नावाखाली आपण मनुष्यजीवनातून संभोगाचेच उच्चाटन करत चाललो आहोत.

    प्रथमतः संभोगासाठी वयाची विशिष्ट अट लागू केली जाते. त्या वयात पोहोचताच तुम्हांला संभोगाचा अधिकार प्राप्त होतो पण करता येत नाही. कारण त्याकरता समाजानेच लग्नाची अट घातली आहे. या अटीच्या पूर्ततेसाठी अर्थार्जन आवश्यक आहे. अर्थात, त्यासाठी धावपळ हि आलीच. खेरीज लग्नासंबंधी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, अपेक्षा असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी आणखी काही काळ थांबणे भाग पडते. त्यानंतर लग्न कधी होईल तेव्हा होईल. लगेच समाजाने एकप्रकारे लादलेल्या मातृ - पितृत्वाच्या प्राप्तीसाठी धडपड. त्यानंतर अपत्याचे संगोपन, शिक्षण आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आर्थिक तरतूद करणे. यातून मनुष्याला स्वतंत्र खासगी जीवनासाठी वेळ मिळतोच कुठे, आणि त्याला जीवनातील अत्युच्च संभोगानंदाची प्राप्ती होते तरी केव्हा ?

    याचा परिणाम म्हणजे समाजानेच ठरवलेल्या लैंगिक संबंध विषयक गुन्ह्यांत वाढ. वस्तुतः व्यक्तीचा संभोग अधिकार एका हाताने हिरावून घेत वर तिने चोरून प्राप्त केलेल्या शरीरसुखास्तव तिला अपराधी मानणे हि एकप्रकारे मनुष्यत्वाचीच क्रूर थट्टा आहे व ती आजच नव्हे तर शेकडो वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. परंतु प्राचीन काळी अशी स्थिती होती का ?  

    महाभारतावरील वैदिक धर्मियांनी केलेले संस्कार दूर करत निखळ हिंदू दृष्टीने पाहिले तर तत्कालीन समाज हा लैंगिक बाबतीत स्वातंत्र्यप्रिय दिसतो. तिथे व्यक्तीचा संभोगाधिकार हा समाजानेच मान्य केलेला आहे. त्यामुळेच कुंती, द्रौपदी, हिडींबा, सत्यवती सारखी उदाहरणे तिथे आढळतात. रामायण पाहिले तर शूर्पणखाही याच समाजव्यवस्थेतील असल्याचे दिसून येते. रावण वधानंतरचे रामायण प्रक्षिप्त मानले जाते परंतु रामाने सीतेच्या त्यागाची भाषा उच्चारत तिला लक्ष्मणाकडे जायला सांगण्यातून काय ध्वनित होते ? 
    बरं, या पुरातन गोष्टी झाल्या. खजुराहो सारखी अमर शिल्पं आपल्याला काय सांगतात ? किंवा सध्या प्रचलित असलेल्या पूजा पद्धती तरी काय सांगतात ? कामाख्या देवीच्या मंदिरात प्रसादादाखल मिळणारा लाल कपड्याचा तुकडा कशाचे प्रतीक आहे ?
    स्त्रीच्या मासिक पाळीकडे विटाळ, अपवित्र दृष्टीने बघणारा समाज देवीच्या विटाळाचे प्रतीक म्हणून मिळणारा कापडी तुकडा प्रसाद म्हणून मिरवतो हा निश्चितच विरोधाभास आहे.
 
    मंदिरांमध्ये देवी - देवतांची लग्नं लावली जातात. लग्नानंतर त्यांच्याही रात्री सजवल्या जातात. म्हणजेच संभोगाचे प्राचीन काळी असलेले स्थान अवनत होत कोणत्या स्थितीपर्यंत आलेलं आहे व पुढे कुठवर जाणार आहे याची कल्पना करणे तितकेसे अवघड नाही.

1 टिप्पणी:

  1. चांगला लेख आहे.कोनार्क चे सूर्य मंदिर जर निरखुन पाहिले तर तेथे देखिल आयुष्या शी निगडित प्रत्येक गोष्ट वयोमानानुसार कोरलेली आहे.त्यात तथाकथित अश्लिलता कोठेही दिसुन येत नाही.माझ्या मते
    पुढे चालुन पर-धर्मियांच्या आक्रमणामुळे शारिरिक संबंधांवर भाष्य करण्यावर बंधने आली असावित.

    उत्तर द्याहटवा