बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

अखंड हिंदुस्थान व स्वतंत्र भारताचे खरे शत्रू !




    स्वातंत्र्यापूर्वी व नंतर या देशाला नेहमीच परकीयांपेक्षा अंतर्गत छुप्या शत्रूंचा धोका राहिलाय. मग ते मुस्लीम असो, ख्रिश्चन असो वा वैदिक ! 

    मुस्लीम – ख्रिस्त्यांची धर्म – श्रद्धेय भूमी भारताबाहेर असल्याने त्यांच्या निष्ठा नेहमीच इथल्या तथाकथित हिंदुत्ववादी, अर्थात वैदिकांनी समस्त भारतीयांसमोर संशयास्पद म्हणूनच प्रमोट केलीय. परंतु वैदिकांच्या निष्ठेचे काय ? ज्यांना स्वतःचे मूळ अद्याप शोधता आले नाही व पावसाळी छत्र्यांप्रमाणे त्यांच्या इथल्या अस्तित्व – आगमनाचे सिद्धांत वेळोवेळी उदयास आले, मोडीत निघाले. हे नेमकं कशाचं प्रतिक आहे ? जैन, बौद्ध वा शिखांना का आपल्या मुळाचा शोध घ्यायची गरज पडत नाही ? बहुसंख्य हिंदुनांही आपण मुळचे कोण आहोत, कोठून आलो याचा शो घ्यावा वाटत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपण मुळचे इथलेच --- भूमिपुत्र असल्याचे त्यांना पक्के माहित्येय. तुलनेने वैदिकांची तऱ्हाच न्यारी. निराळी !

    या देशाशी ते कधीच समरस झाल्याचे दिसून येत नाही. अर्थात, नियमाला अपवाद असतात त्याप्रमाणे काही सन्माननीय आहेत, परंतु बहुसंख्याकांचे काय ? स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात यांचा सहभाग होता काय ? द्विराष्ट्राचा, फाळणीचा धोका दिसत असताना आज अखंड हिंदुस्थानच्या घोषणा करणारा वैदिक संघ कोणत्या बिळात लपून बसला होता ? काठ्यांना भाल्याची पाती जोडून त्यांना रणात उतरण्यास कोणी आडकाठी केली होती ?

    रझाकारांची जशी स्वयंसेवक पथकं उभारून फुटीरतावादी मुस्लीम नंगानाच घालत होते, तो आवरण्यास यांना कोणी मज्जाव केला होता ? द्विराष्ट्राच्या --- अर्थात भारताच्या फाळणीत निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन वैदिक संघाने त्यांस एकप्रकारे संमतीच दिली व आपल्या हातून घडलेलं पाप झाकण्याकरता म्हाताऱ्या गांधीला टारगेट करून त्याला उडवण्यात धन्यता मानली. याला म्हणतात देशभक्ती ! 

    म्हणे गांधी देशाचं वाटोळं करत होता. मग तुम्ही काय करत होता ? गांधी देशाला विनाशाच्या खाईत लोटतोय हे तुम्ही लोकांना सांगू शकला नाहीत ? का पटवून देऊ शकला नाहीत ? उलट त्या निःशस्त्र, ढोंगी म्हाताऱ्याची आजही यांना इतकी दहशत, धास्ती आहे कि प्रसंगी त्याच्या छायाचित्रांमध्ये गडबड करून मरणोत्तरही गांधीची विटंबना चालवलीय व हे पाप झाकायला वर त्याला प्रातःस्मरणीयही ठरवलंय !

    अर्थात तेही बरोबरच आहे म्हणा ! निदान प्रातःस्मरणी गांधीची आठवण काढताना त्यानिमित्ताने त्यांना इतरही बरंच काही पाहून घेण्याचा मोका साधता येतो. करणार काय ? शेवटी संकृती रक्षक ना ! खुलेआम अशा गोष्टी पाहू शकत नाहीत व न पाहता राहवतही नाही. असो.

    फाळणीचा तमाशा मनसोक्त पाहून, गांधीला गोळ्या घालून यांचे समाधान झाले ? बिलकुल नाही. मध्ययुगीन काळातील सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय स्थित्यंतरात अजाणते – जाणतेपणी हिंदू धर्माची व वैदिकांची एकत्र गाठ बांधली गेल्याने हे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणवू लागले होते. धर्म काय, समाज काय व त्याचे नियमन काय हे शास्त्रार्थ पाहून सांगण्याचा अधिकार यांच्याकडे होता. गांधीच्या मरणानंतर आंबेडकराचा धर्मांतर मुद्दा समोर आला.

    काय होती रे त्या आंबेडकराची मागणी ? त्याला अन् त्याच्या बांधवाना हिंदू धर्मात इतरांप्रमाणे सन्मानानेच वागवावे असेच तो म्हणत होता ना ? मग तुम्ही काय केले ?

    अखंड हिंदुस्थानच्या बाता हाणणाऱ्यांना ‘ हिंदू तितुका मेळवावा, हिंदू धर्म रक्षावा ‘ हे कधी ब्रीदवाक्य मुळीच वाटले नाही. उलट ‘ हिंदू तितका घालवावा, हिंदू धर्म विध्वंसावा ‘ हेच यांचे मुख्य उद्दिष्ट होतं व आहे.

    आंबेडकराच्या धर्मांतराचे परिणाम जाणूनही हे वैदिक झोपेचे सोंग घेऊन राहिले व त्यांच्या तालावर नाचणारे बहुसंख्य हिंदूही कान, डोळे बंद करून व आपला बधीर मेंदू अधिक बधीर करून थंड पडून राहिले. आंबेडकर व त्याचा समाज हिंदू धर्मातून बाहेर पडणे हे पर्यायाने हिंदू धर्म व समाजाचेच नुकसान असल्याचे हिंदूंच्या ध्यानी कधीच आले नाही व आजही येत नाही. त्याउलट वैदिकांच्या आत्मघाती सूत्रावर विसंबून ‘ मग कशाला हिंदू धर्मात राहता, देशात राहता ‘ म्हणून आपल्याच बांधवांना लाथाडून त्याना परधर्मात पाठवण्यात ते मश्गुल आहेत.

    आज या लबाड वैदिकांनी गाईंचे स्तोम माजवत तिला ‘ माता, आई ‘ असा भावनात्मक दर्जा देऊन हिंदूंची दिशाभूल चालवलीय. अरे हिंदूंना तर प्रत्येक प्राणी पूज्य आहे. त्याला साप, बैल दिसताच शंकर आठवतो. उंदीर पाहताच गणपती. घोड्यावर आरूढ झालेले तर आमच्यात खंडीभर देव आहेत. पण म्हणून काही आम्ही साप, उंदरं मारणं बंद केलंय ?

    आमच्या लेखी जे महत्त्व सापाला, उंदराला तेच गाईला ! गाई दुध देते तर म्हैस काय निस्तं शेण देते ? आख्ख्या गावाची घाण खाणाऱ्या गाईचे मलमूत्र खाऊ – पिऊन तुम्हांला पवित्र वाटत असेल. पण पवित्र वाटायला, व्हायला आम्ही काय अपवित्र आहोत ?
सोवळ्या – ओवाळ्याच्या निमित्ताने स्वतःच्या आई – बापापासून, मुला – लेकरांपासून अस्पर्श राहणारे तुम्ही अस्पृश्य. तुम्हांलाच अशा शुद्धीकरणाची गरज अधिक आहे.

    आमचा शेतकरी शेतीयोग्य जनावरे कशी सांभाळतो व अगदीच अपरिहार्य झाल्यावर --- तेही अत्यंत गळ्याशी आल्यावर --- तो जनावरं खाटकाला देतो. अशा आमच्या हिंदू शेतकऱ्यांना तुम्ही काय रे गोवंशाचे व पालनाचे महत्त्व सांगणार ?

    आणि महामूर्ख हिंदूंनीही आता लक्षात घ्यावे कि, काही काळापूर्वी दारात मारून पडलेली जनावरं ओढून न्यायला --- मग ती कशासाठी का असेनात --- तुम्हीच म्हारा – मांगाच्या हाता – पाया पडत होता ना ? त्यावेळी आई, माता का तुम्हांला आठवत नव्हती ? खांद्यावर डोकं नावाचा अवयव आहे, त्यातील मेंदूमधील बुद्धी नामक अदृश्य वस्तूला चालना दिल्यास सारे भ्रम फिटतील. फक्त त्यांस थोडी बौद्धिक कसरत करावी लागेल. उठसुठ ब्राम्हणांनी आम्हांला अज्ञानात ठेवल्याचा कांगावा करून तुम्हांला स्वतःची कातडी वाचवता येणार नाही.

    कातडीवरुन आठवले. देशातील एवढी अवाढव्य लोकसंख्या आपल्या नेहमीच्या व्यवहारात ज्या चामड्याच्या वस्तू वापरते, ते चामडे नेमकं कशाचं असतं ? कोठून येतं ? त्यांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या कुणाच्या आहेत ?

    आहेत या प्रश्नांची उत्तरे ? कशी असणार म्हणा ! उत्तरे माहिती असायला प्रश्न तर आधी पडायला पाहिजेत ना ? आम्हांला प्रश्न पडतच नाहीत. म्हणून तर आम्ही सदा सुखी असतो. अक्कल नावाचा भाग नाही. त्यामुळे कोणीही बोलघेवडा आमच्या डोक्यावर चढून बसतो. मग आमचा आवडता कार्यक्रम सुरु होतो. उर बडवून घ्यायचा.

    मग हि उरबडवेगिरी सुरु होते. शेकडो, हजारो वर्षांची करूण कहाणी सांगितली जाते. कथा जितकी जुनी, तितका मोठा आक्रोश !

    स्वखुशीनं दारिद्र्यात, अज्ञानात, गुलामीत पिचत राहायचं. स्वतःवरील अन्यायाच्या कथेत रममाण व्हायचं व उद्धारकर्त्याच्या जन्माची वाट बघायची. तो जन्मला कि त्याला जिणं नकोसं करायचं व मेला कि, पुतळे बांधून ‘ आमचा कैवारी कि हो गेला ‘ म्हणत गळा काढायचा. या पलीकडे आम्ही केलंय तरी काय ? पूर्वीही तेच केलं, आजही तेच करतोय व पुढेही तेच करणार !
 
    कारण, दुसरं तिसरं कोणी नाही तर आम्हीच आमच्या स्वातंत्र्याचे खरे शत्रू आहोत !!  

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

जातिधर्म संस्था, धर्मसंस्था :- एक चिंतन




    जगातील इतर देशांना नुसताच भूगोल आहे पण आपल्या देशाला इतिहास आहे, असा एक गर्वयुक्त, अभिमानपूर्वक समज आपल्यात प्रचलित आहे. ( काहीजण हेच विधान राज्याच्या बाबतीतही वापरतात. असो. ) ऐतिहासिकदृष्ट्या यात कितपत तथ्य आहे हा वादाचा भाग जरी असला तरी आपल्या देशाला असलेली इतिहासाची थोर, प्राचीन परंपरा नाकारता येत नाही. परंतु आपल्या देशाला असलेली इतिहासाची परंपरा जरी प्राचीन असली तरी ती थोर, महान, समृद्ध या गटांत बसणारी आहे का ?

    या प्रश्नाचे उत्तर पुराव्यांच्या आधारे शोधायला गेल्यास पूर्णतः होकारार्थी मिळणे अशक्य आहे. कारण या देशाच्या इतिहासात इतरत्र आढळणारा / न आढळणारा जो एक भला मोठा विचित्र सांस्कृतिक – धर्म गोंधळ झालाय, त्यामुळे इतिहास तर विकृत, विचित्र बनलाच परंतु भावी पिढ्यांवर त्याचा अतिशय दूरगामी परिणाम होऊन या देशाचे भवितव्यही काळवंडून टाकलेलं आहे.

    देश वा राष्ट्र या अलीकडच्या काळातील सर्वमान्य संकल्पना. या संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी राज्य संकल्पना होती तर त्याहीपूर्वी टोळ्यांचे प्रदेश होते. या टोळ्यांचे जसे स्वतंत्र प्रदेश तशीच त्यांची स्वतंत्र संस्कृतीही होती. या संस्कृत्यांचा प्रसार / प्रचार टोळ्यांतील विजय / पराभवासोबत होत होता. या सांस्कृतिक प्रसार – प्रचाराने टोळ्यांचे जीवन अधिक सुखमय वा समृद्ध झाले अथवा नाही, हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. त्यामुळे त्याची अधिक चर्चा न करता टोळ्यांचे जे नियम वा धर्म होते त्याविषयी आपण चर्चा करू.

    टोळी जीवनातील अनिर्बंध, स्वैर वर्तन, जीवन नियंत्रित / नियमित करण्यासाठी नियमांची निर्मिती करण्यात आली. या नियमांना कालांतराने ‘ धर्म ‘ हि संज्ञा देण्यात आली. पण या देशातही हा क्रम पाळला गेला का ?

    या देशातील बहुसंख्याकांचा धर्म हिंदू असल्याचे मानण्यात येते व हा हिंदू धर्म अतिशय सहिष्णू असल्याचाही समज आहे. परंतु त्यासोबत हा हिंदू धर्म परकीयांशी ( परधर्मीय या अर्थाने ) सहिष्णुतेने तर स्वधर्मियांशी निष्ठुरतेने --- काहींनी याला बैलाचीही उपमा दिली आहे --- वागतो. यामागील कारण काय असावे ? हिंदू धर्मातील एक मोठा वर्ग अस्पृश्य म्हणून का गणण्यात आला ? अस्पृश्य हे हिंदूच कि इतरधर्मीय ? कि त्यांना मुळात धर्मच नाही ? जर धर्म नाही वा ते विधर्मी तर हिंदूंच्या जातीव्यवस्थेत त्यांना महत्त्वाचे स्थान का ? या व अशा कित्येक प्रश्नांचा आपापल्या परीने उलगडा करण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे व केला जातोय. हि प्रक्रिया कदाचित आणखी काही वर्षे अव्याहतपणे चालूही राहील. कारण, हिंदू धर्मांतर्गत असलेल्या या गोंधळाने हिंदू धर्माचे --- पर्यायाने देशाचे भूतकाळात अपरिमित नुकसान केलेले असून हाच वर्तनक्रम आजही सुरु असल्याचे खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे.

    हिंदू धर्माची जातीसंस्था हि एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट समजली जाते. अनेक सामाजिकशास्त्रज्ञांनी तिला व्याखेत बंदिस्त करण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच अनेकांनी तिची गुणवैशिष्ट्ये नमूद करत तिचे फायदे – तोटेही सप्रमाण मांडले आहेत. काहींनी जातीसंस्था देशाला कशी उपयुक्त आहे, हे सांगत तिच्या समर्थनार्थ, संवर्धनार्थ प्रयत्न केले तर काहींनी तिला देशाला विनाशाच्या खाईत लोटणारी संस्था समजून तिच्या विध्वंसाकरता कार्य केले. परंतु या सर्व कार्यामध्ये धर्म व जात या दोन परस्परांहून पूर्णतः अलग असलेल्या, एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या संस्थांचा संबंध गृहीत धरण्यात आला. जातीला धर्मानेच मान्यता दिल्याचे गृहीत धरण्यात आले व त्याच्या समर्थनार्थ काही ग्रंथांतील पुरावेही दिले गेले. परंतु, यातील सर्वांत मोठा दोष असा कि, हिंदू धर्मातील जातीसंस्था सिद्ध करण्यासाठी अहिंदू धर्मातील ग्रंथांचे दाखले जोडण्यात आले. परिणामी गोंधळ न उलगडता तो अधिकच वाढला.

    जातीसंस्थेची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये जात हि जन्माधिष्ठित असून यामध्ये व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नसले तर त्या त्या जातीला नेमून दिलेला व्यवसाय असल्याने आर्थिक सुरक्षा कवचही आहे. या मुद्द्यावर हिंदू धर्माची जातीसंस्थेशी व इतर धर्मांशी तुलना केली असता असे दिसून येते कि, हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा कोणताही शास्त्रोक्त विधी नाही. ( शास्त्रोक्त हा शब्द धार्मिक ग्रंथाने मान्यता दिलेला विधी या अर्थाने वापरल्याची नोंद घ्यावी. )  त्याचप्रमाणे जन्मतः हिंदू धर्माची प्राप्ती होते असे धर्मग्रंथाचे वचनही नाही. व्यक्ती जन्मते तेव्हा प्रथम ती त्या जातीचीच असल्याचे मानले जाते. तुलनेने इतर धर्मीयांची परंपरा वेगळी आहे. प्रत्येक धर्मात जन्मलेल्या व्यक्तीला जन्मतः धर्म मिळत नाही. तर त्यांना तो स्वीकारावा लागतो व त्याचे धर्मग्रंथांनी नेमून दिलेले विधीही आहेत. अर्थात, धर्माची कृत्रिमता स्पष्ट करण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे असून धर्म हि अनैसर्गिक गोष्ट असल्याचेही यातून सिद्ध होते. असो.

    हिंदू धर्म, त्यांची जाती व विधर्मीय परंपरा लक्षात घेता हिंदू धर्म व जातीसंस्था यांच्यात कसलाही परस्पर संबंध नसल्याचेच अधिक ठळकपणे लक्षात येते. किंबहुना हेच विधान असेही मांडता येईल कि, हिंदू नावाचा कोणताच धर्म अस्तित्वात नसून या धर्मांतर्गत ज्या विविध जाती आहेत --- त्या जाती नसून त्यांचा प्रत्येकी एक स्वतंत्र धर्म आहे.

    अर्थात रूढ जैन, बौद्ध, इस्लाम वा ख्रिस्ती धर्माप्रमाणे या जाती वा धर्म घटकांचे वैशिष्ट्यपूर्ण असे स्वतंत्र अस्तित्व नाही अथवा त्यांचे नियमन करणारे ग्रंथही नाहीत. परंतु त्यांची रचना हि टोळीजीवन + टोळी संस्कृती + टोळी धर्म अशा प्रकारची आहे.
प्रत्येक जातीची स्वतंत्र जीवन शैली आहे. जीवन संस्कृती आहे. या दोन्हींचा संगम होऊन वा त्यांचे एकत्रीकरण होऊन त्या त्या जातीचे धर्म बनले आहेत.

    एकाच गावात विविध जातींचे लोक समुहाने राहतात/ भारतात हे चित्र मध्ययुगीन काळापासून ते आजतागायतपर्यंत कायम आहे. या जातींचे कारणपरत्वे आपसांतील संघर्ष – तंटे अटळ आहेत. अपरिहार्य आहेत. दोन भिन्न सांस्कृतिक, संस्कृती असलेल्या लोकांत असे घडणे स्वाभाविक आहे परंतु या प्रासंगिक तंट्यास वर्गीय वा धार्मिक कलहाचे अधिष्ठान लाभले ते विविध धर्मांच्या या तथाकथित हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या जातींना आपापल्या प्रभावाखाली ओढण्याच्या स्पर्धेने. यामध्ये जैन, बौद्ध, वैदिक, शीख, ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्मियांनी परस्परांच्या चुरशीने सहभाग घेतला. परंतु अंती हि लढाई वैदिकांनी जिंकली.

    जैन व बौद्ध तुलनेने कमजोर पडले. अर्थात त्यांच्या धर्माचे मूळ रहस्यच विरक्ती, अनासक्ती असल्याने व एकप्रकारे तो संन्यस्त लोकांचा धर्म असल्याने आरंभीची लाट ओसरण्यास थोडा वेळ जाणे स्वाभाविक होते. या दरम्यान इतर धर्मियांनी आपापल्या धर्मांशी निष्ठेने राहत, प्रसंगी लाटेवर स्वार असलेल्या धर्मातील काही गोष्टींचे अनुकरण करीत आपापला निभाव केला.

    जैन व बौद्धांची लाट ओसरल्यावर लोकंही परत आपापल्या मूळच्या चालीरीती, संस्कृतीत रममाण झाली. परंतु मधल्या काळात --- जो उत्क्रांती वा धर्म – संस्कृती परिवर्तनाचा काळ होता त्यांनी --- लोकांच्या मूळ चालीरीती – परंपरांना थोडाफार धक्का दिला. त्यांत परिवर्तन घडवले वा मुळचे संस्कार भ्रष्ट, विकृत बनले. हेच विधान असेही मांडता येईल कि, जैन – बौद्ध धर्म स्वीकारताना लोकांनी ते मूळ जसेच्या तसे न अंगीकारता त्यांना पचेल अशा पद्धतीने --- अर्थात त्यांच्या जातीच्या परंपरांशी जुळवून घेत त्या – त्या धर्माचा स्वीकार केला. अर्थात धर्मप्रसार हाच प्रमुख उद्देश असल्याने त्या त्या धर्मप्रचारकांनीही या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. अर्थात, जगभरातला धर्मप्रसाराचा इतिहास पाहिला असता त्यात हेच दिसून येते कि, मूळ धर्म जिथे स्थापन झाला तिथेच तो आरंभी शुद्ध राहून नंतर विकृत रूपातच त्याचा प्रसार झाला.

    कालांतराने जैन – बौद्ध संप्रदाय मागे पडताच वैदिकांनी जोर धरला. मधल्या काळात आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या वावटळीत निभावणूक करण्यासाठी त्यांनीही कित्येक व्यावहारिक तडजोडी केल्या. ज्यामुळे वैदिक धर्म हा मूळ स्वरूपात न राहता काहीसा विकृत बनला. 

    वैदिकांच्या उदयापर्यंत येथील धर्मप्रसार प्रामुख्याने मिशनरी पद्धतीने चालला असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण, टोळी नियंत्रणासाठी नियंत्रकाची --- अर्थात टोळीप्रमुख, राजा, शासनाची जशी गरज होती त्याचप्रमाणे धर्मांना आपापल्या प्रसारार्थ अशा सत्तेच्या सक्रीय मदतीची गरज होती व शासनसंस्थांनीही लोकप्रिय धर्मांची आपापल्या आपापल्या राजवटीच्या बळकटी करता गरज होती. एकूण, अमुक राजाने तमुक धर्मास राजाश्रय दिला असे विधान जेव्हा इतिहासात वापरले जाते तेव्हा तो धर्म त्याकाळी भलताच लोकप्रिय असल्याने त्या शासकाने त्या धर्मास आश्रय, पाठिंबा दिला हा त्यामागील अर्थ असतो. जैन, बौद्ध वा वैदिकांचा धर्मप्रचार इतिहास पाहता वरील ठशाच्या विधानांची रेलचेल आपणांस पानोपानी त्यामुळेच आढळते.

    जैन, बौद्ध धर्मियांच्या उदयास्तानंतर वैदिकांचा कालखंड सुरु झाला खरा परंतु याच सुमारास त्यांना इस्लाम व पाठोपाठ ख्रिस्ती आक्रमणास तोंड द्यावे लागले. ख्रिस्ती आक्रमण अतिशय सौम्य कि इस्लामी आक्रमण अधिक उग्र हा वादाचा मुद्दा होऊ शकतो परंतु या आक्रमकांच्या दृष्टीने येथील लोकांत अंतर्गतभेद असले तरी ते एकच होते व ते म्हणजे आक्रमकांच्या धर्माबाहेरचे !

    या कालखंडात तत्कालीन सत्ताधीश व धर्मप्रमुखांवर काही ऐच्छिक तसेच अनैच्छिक जबाबदाऱ्या आल्या व त्यांची योग्य ती वर्गवारी न करता अथवा त्या समजून न घेता जे काही त्यांनी केले त्यामुळे पुढील काळात अधिकच गोंधळ वाढत गेला.

    परधर्मियांच्या आक्रमक झुंडी येऊ लागल्या त्यावेळी सपाट्यासरशी त्यांनी देशभर आक्रमण केले असे नाही. बराच काळ हि आक्रमणे सरहद्दीवर थोपवण्यात तेथील स्थानिक सत्ताधीश यशस्वी राहिले. परंतु सर्वांवरील समान संकट जाणून त्यांनी एकत्रितपणे आक्रमकांवर प्रतिहल्ला चढवण्यासारखे कृत्य केल्याचे सहसा आढळून येत नाही व अशी अपेक्षाही करणे गैर आहे. कारण आपले व परके हा जो भेद आपण आज मानतो, तो त्याकाळी वेगळ्याच अर्थाने रूढ होता. याच भूमीतील दोन शेजारी राज्ये परस्परांविषयी मनात वरील भावना बाळगून असल्याने ज्यांना आपण परकीय / परधर्मीय आक्रमक म्हणतो त्यांच्या विषयी एतद्देशियांच्या मनात याहून वेगळी भावना काय असणार ? त्यामुळे इथल्या लोकांशी ते ज्या तऱ्हेने वागत तद्वत ते परधर्मियांशी वर्तत होते.

    याच काळात देशांतर्गत --- जिथे परधर्मियांच्या आक्रमणाची वार्ता देखील पोहोचली नव्हती, तिथे काय चालले असावे ?  

    जैन, बौद्धांनंतर वैदिकांना राजाश्रय मिळाल्यावर त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार, प्रचार चालवला. काळाच्या ओघात वैदिकांनी आपला धर्म जगवण्यासाठी त्यात अनेक बदल केल्याने तो शुद्ध स्वरूपात न राहता विकृत बनला होता. त्याचप्रमाणे आरंभी, फक्त एका मर्यादेत असलेल्या वैदिक अनुयायांकरता असलेली सामाजिक नियमावली, अर्थात धर्माज्ञा – पुढे धर्माला राजाश्रय मिळताच व त्याला व्यापक प्रतिसाद मिळू लागल्यावर नवीन अनुयायांवर लादण्याचा / राबवण्याचा प्रसंग आला. यावेळी काही गोष्टी वैदिकांनी व वैदिकेतरांनी हेतुपूर्वक केल्या.

    वैदिकांमध्ये चातुवर्ण्य संस्था पूर्वी होती. त्यांचे सामाजिक नियमन देखील त्याच संस्थेच्या अवती - भवती फिरत होते. परंतु कालौघात त्या चार वर्णांपैकी फक्त दोनच त्यांनी कायम ठेवले. ब्राह्मण व शुद्र ! राजन्य व वैश्य लोप पावले. असे का व्हावे ?
याविषयीचे समाधानकारक उत्तर वैदिक ग्रंथांमधून मिळत नाही. याचे उत्तर तत्कालीन राजवटींच्या इतिहासात आपणांस शोधावे लागेल.

    जिथे जिथे वैदिक समाज होता, जिथे तो शासक होता, तेथील सशक हे निःसंशय राजन्य होते. वैश्य हा घटक देखील अस्तित्वात होता. परंतु जैन, बौद्ध धर्मांचा उदय तसेच येथील पुरातन जातीसंस्थेपुढे या वैदिकांचे अस्तित्व तुलनेने मर्यादित होते.
त्यामुळे त्यांची स्वतःपुरती त्रिवर्ण पद्धती ते व्यवस्थित चालवू शकले. पुढे त्यांची जैन, बौद्धांपुढे तसेच तसेच येथील जातीसंस्थांच्या राज्यांमुळे कोंडी होऊन ते अल्पसंख्य बनून राहिले. परंतु यामुळे त्यांची वर्णव्यवस्था लोप पावली असे होत नाही. उलट जैन, बौद्धांच्या अस्तानंतर जेव्हा त्यांना राजाश्रय लाभला त्यावेळी आपले अल्पसंख्यत्व झाकण्याकरता वा दुर्बलता प्रबलतेत परिवर्तीत करण्यास्तव त्यांनी ब्राह्मण, राजन्य, वैश्य या त्रिवर्णांचा एक वर्ण केला व चौथा जो वर्ण निर्माण केला तो शुद्र असून ते शुद्र म्हणजे वैदिकेतर !

    वस्तुतः हि विभागणी वैदिक – अवैदिक अशी सरळसोट होऊ शकत होती परंतु तशी ती करण्यात आली नाही. कलियुगी राजन्य / क्षत्रिय वर्ण नाही व चातुवर्ण्य व्यवस्था हि एकेकाळी लवचिक होती असं जे सांगितलं जातं त्याचं खरं स्वरूप हे असं असल्याचं माझं मत आहे.

    ज्यावेळी वैदिक अल्पसंख्य होते, मर्यादित होते व त्यांना फक्त स्वधार्मियांचेच नियमन करायचे होते तेव्हा वर्णव्यवस्था त्यांनी लवचिक ठेवली. परंतु ज्यावेळी त्यांचा बहुसंख्याकांशी --- वैदिकेतरांशी संबंध आला तेव्हा मात्र त्यांनी वर्णव्यवस्था ताठर बनवली. यातही आणखी एक भेद असा, निव्वळ वैदिकांतील वर्णव्यवस्था नंतरही लवचिक राहिली. त्यांनी समस्त स्वधर्मियांचा ‘ ब्राह्मण ‘ या एकमेव वर्णात अंतर्भाव करून जगण्याकरता, अर्थात आपद्धर्म म्हणून सर्व प्रकारचे व्यवसाय करण्याची स्वरचित शास्त्रांद्वारे मुभा ठेवली. हे त्यांचे विशेषाधिकार होते व यात चुकीचे असे काहीच नाही. त्यांच्या जागी इतर धर्मीय असते तर त्यांनीही तेच केले असते.

    वैदिकांनी आपली वर्णव्यवस्था ताठर बनवताना वैदिकेतर जे होते --- ज्यांना शुद्र हि संकल्पना देण्यात आली --- त्या शूद्रांना त्यांनी कधीही आपलं मानलं नाही. त्यांच्या दृष्टीने ब्राहाम्न – शुद्र हा वर्णभेद हिंदू – मुस्लीम या प्रचलित धर्मभेदासारखाच स्पष्ट होता व व्यापक दृष्टीने पाहिले असता ब्राह्मण – शुद्र हा निव्वळ वर्णभेद नसून खरोखर धर्मभेदच होता !

    वैदिकेतरांनी आधीच्या जैन – बौद्ध धर्माप्रमाणेच याही धर्माकडे पाहिले. आपल्याला पचेल असा त्यांनी त्याचा स्वीकार केला. त्यावर संस्कार केले. परंतु अशा संस्कारीतांना मुळच्या वैदिकांनी कधी स्वधर्मीय म्हणून फारशी मान्यता दिली नाही. आपुलकी दर्शवली नाही. याबाबतीत इस्लाम ज्या भूमीत जन्माला आला तेथील इस्लाम धर्मीयांची इतर देशांतल्या धर्मांतरित मुस्लिमांविषयी जी भावना आहे तीच वैदिकांची इतरांविषयी होती व आहे !

    वैदिकांचे जीवन / सामाजिक जीवन नियमन करण्यासाठी ज्या स्मृत्यांची रचना केली त्या काळजीपूर्वक वा वरवर वाचल्या असताही एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे ब्राह्मण वर्णापासून अवनत होणं सोपं आहे परंतु ब्राह्मण वर्णात जाणं अवघड. नव्हे अशक्यप्राय !

    वैदिकेतरांनी वैदिक कर्मकांडास मान्यता दिली. त्याचे अनुकरण केले. मात्र वैदिकांनी त्यांस नेहमीच आपल्यापासून वेगळं मानलं. वैदिक धर्माचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा प्रचारकी थाटाचा धर्म असला तरी प्रत्यक्षात धर्मप्रचार, प्रसार हे त्याचे मुळातच ध्येय, उद्दिष्ट नाही. ज्याप्रमाणे जैन, बौद्ध अथवा ख्रिस्ती, इस्लाम धर्माचे अनुयायी आपापल्या धर्माच्या प्रसारार्थ, प्रचारार्थ जीवाचे रान करताना दिसतात, तसे वैदिकांनी केल्याचे वा करत असल्याचे दिसून येत नाही. असे का ?

    इतर धर्मांप्रमाणेच वैदिक हि जीवनशैली आहे. संस्कृती आहे. त्याला रचित नियमांच्या आधारे धर्माचे स्वरूप दिले गेले तरी वैदिकांची मूळ मानसिकता त्याने बदलली नाही. तुम्हांला या धर्माचे सदस्यत्व जन्माने मिळते. परंतु त्याने तुम्ही वैदिक धर्मीय बनत नाही. तर त्या समुहाचे सदस्य बनता. त्यानंतरचे संस्कारविधी केल्यानंतरच तुमचा वैदिक धर्मात रीतसर प्रवेश होतो. साधारणतः जातीसंस्थेचे जे स्वरूप आहे तेच या वैदिक धर्माचेही आहे. परंतु यात कमालीची साम्यता आहे असं म्हणता येत नाही.   

    जन्माधिष्ठित समूहाचे सदस्यत्व हा वैदिक व जातीसंस्थेतील समान दुवा असला व जन्मानंतर विशिष्ट संस्कारानंतर धर्म – जातीत प्रवेश हा भाग देखील सारखाच असला तरी जाती संस्था व वैदिक धर्माच्या दृष्टीकोनात बराच फरक आहे. उभयतांची निर्मिती जवळपास टोळीजीवनातून झाली. या टोळी जीवनातूनच त्यांची सांस्कृतिक – धर्म कल्पना उदयास आली. विकसित झाली. मात्र जातीसंस्थेत कालानुरूप ज्याप्रमाणे जैन – बौद्धादी वैचारिक संप्रदाय निर्माण होऊन त्यांचा बरा – वाईट प्रभाव जातीसंस्थेवर पडला तसा काही प्रकार वैदिकांत झाला का ? वैदिक धर्मात बदल घडून आले. नाही असे नाही. परंतु ते प्रतिक्षिप्त क्रियानियमानुसार घडून आले. आपला धर्म जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी, आपली वेगळी संस्कृती जपण्यासाठी त्यांनी काही प्रमाणात तडजोडी केल्या. परंतु स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व मात्र कायम राखले.

    जातीसंस्थेत ज्याप्रमाणे नवनवीन विचार संप्रदाय उदयास आले तद्वत वैदिकांत का जन्मले नाहीत हा प्रश्न जरी महत्त्वाचा असला तरी त्यासोबत आणखी एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे व ती म्हणजे विविध संप्रदायांच्या जन्माने जातीसंस्था जशी समृद्ध, प्रवाही बनली तसे वैदिक धर्माचे घडून आले का ? याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागते. याकरता उभय धर्मांतील स्त्रीजीवन तुलनात्मक अभ्यासासाठी पाहणे अयोग्य ठरणार नाही.

    वैदिक धर्माने स्वधर्मीय स्त्री जीवन अक्षरशः बंदिस्त गुलामासारखे केले. कधी काळी स्त्री – पुरुष समानतेचा टेंभा मिरवणारी हि संस्कृती एवढी खालावत का गेली ? कि विविध विचारिक, धार्मिक आक्रमणांना तोंड देण्यासाठी व स्वतःच्या टोळीचे अस्तित्व राखण्यासाठी स्त्री संरक्षण महत्त्वाचे बनून नंतर त्यावर मालकी हक्क प्रस्थापित केले ? दुसरीच शक्यता अधिक आहे.

    या स्थळी आणखी एक मुद्दा चर्चेत घेणे अगदीच अनावश्यक ठरणार नाही व तो म्हणजे मूळ जातीसंस्थेत जन्मलेल्या जैन – बौद्धादी संप्रदायांचे नंतर धर्म बनणे ! ज्यावेळी हे विचारसंप्रदाय जन्मास आले तेव्हा त्यांस धर्माचे स्वरूप बिलकुल नव्हते. नेहमीपेक्षा जीवन जगण्याची थोडी वेगळी पद्धती, असेच याचे स्वरूप. त्यातही संन्यस्त वृत्तीला प्राधान्य. पुढे कालांतराने या संप्रदायांचे महत्व वाढून त्यालाच पुढे ‘ धर्म ‘ हि संज्ञा प्राप्त झाली. मूळ जाती संस्थेतील काही वैशिष्ट्ये व नव्याने मांडलेली काही तत्वे असे या धर्मांचे संमिश्र स्वरूप होते. यामुळे लोकांचा या धर्मांकडे अधिक कल वाढला. कोणी या धर्माचा स्वीकार केला तर कोणी काही तत्वांचे अनुकरण करीत मूळ आपल्या जातीधर्माशी एकनिष्ठ राहिले. पुढे कालांतराने त्यातील नाविन्य ओसरल्यावर काही लोकं आपापल्या मूळ जातिधर्मात परतली नसतील हे संभवत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे हे स्वगृही परत येणे नेमकं कसे घडले व त्याचे परिणाम काय झाले याविषयी जरी मनात उत्सुकता असली तरी इतिहास याबाबतीत मूक असल्याने याविषयी अधिक लिहिणे शक्य नाही.

    या संदर्भात भारतीय सामाजिक शास्त्रज्ञांच्या एका आवडत्या विधानाची येथे आठवण होणे अपरिहार्य आहे व त्याचा आशय असा कि, ‘ भारतीय जातीसंस्था विविध धार्मिक, सांस्कृतिक आक्रमणे पचवूनही अभंग राहिली. ‘ याबाबतीत इथेच जन्माला आलेल्या धर्मांचे उदाहरण पाहिले असता त्यांनी भारतीय जातीसंस्था समृद्धच केली असे म्हणावे लागेल. कारण त्यांची निर्मितीच मुळी जातीधर्मातून झाली होती. परंतु हेच विधान वैदिक धर्मास लागू पडत नाही. 

    येथील जातीसंस्थेने वैदिकांनाही आत्मसात करून पचवले असते परंतु त्याकरता वैदिक धर्मीयांची अनुकुलता व सक्रीय सहकार्यता आवश्यक होती. याबाबतीत जैन – बौद्धादी व वैदिक धर्मातील मुलभूत फरक लक्षात येतो. उपरोक्त त्रयीतील पहिले दोन जनसामान्यांशी सहज मिसळू शकले कारण ते इथल्याच जनसामान्यांच्या विचारतून जन्मले होते. परंतु वैदिक धर्म तसा नसल्याने त्याची अलग वृत्ती हि स्वाभाविक होती.

या स्थळी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा आवश्यक आहे व ती म्हणजे धार्मिक कृत्यं करणारा उपाध्याय वर्ग !
जातिसंस्था, जैन, बौद्ध तसेच वैदिक धर्मात प्रत्येकाचा स्वतंत्र उपाध्याय वर्ग आहे व हे उपाध्याय इतर धर्मियांचे धार्मिक कृत्य सहसा करत नाहीत. अपवाद जाती व वैदिक धर्मियांचा !
जातीसंस्थेत पाहिले तर प्रत्येक जातीचा एक उपाध्याय असतो. जर वैदिक व जातिधर्म एकच तर एकाच वेळी दोन – दोन उपाध्याय वर्ग कसे काय अस्तित्वात असू शकतात ? स्वतःचा उपाध्याय वर्ग असताना अवैदिकांना वैदिक उपाध्यायाची गरज का पडावी ? तसेच वैदिकांनी अवैदिकांचे उपाध्यायपण का स्वीकारले ? दोन विधर्मियांचा हा अभूतपूर्व गोंधळ म्हणजे जगातील एकमेव उदाहरण असावे.