सोमवार, २७ एप्रिल, २०१५

अस्वस्थ मन



    स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं उलटायच्या आतच आपण जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहू लागलो हि खरोखरच अभिमानाची, गर्वाची गोष्ट आहे. जागतिक महासत्तेचे स्थान मिळवण्यास अमेरिका सारख्या राष्ट्रालाही अनेक पिढ्या खर्ची घालाव्या लागल्या ; पण आपल्या थोर, उदात्त व उच्च भारतीय संस्कृतीच्या बळावर आपण ते स्थान प्राप्त करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत

    दळभद्री काँग्रेसने गेली साठ वर्षं या देशाचे शक्य तितके वाटोळं करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आमच्या बोलघेवड्या मोदींनी अवघ्या काही महिन्यांत या देशाच्या शक्तीसामर्थ्याचा डंका जगाच्या कानाकोपऱ्यात घुमवला. आजवरच्या भ्रष्ट व अकार्यक्षम केंद्र सरकारमुळे परकीय कंपन्या आपल्या देशांत गुंतवणुकीस तयार होत नव्हत्या. त्याच कंपन्या आता दोन्ही हातांनी आपल्या देशाचे दरवाजे ठोठावत उभ्या आहेत. हीच स्थिती कायम राहिली तर या देशातून परत एकदा सोन्याचा धूर निघेल यात आमच्या मनी शंकाच नाही !

    परंतु, आम्हांला वाईट एका गोष्टीचे वाटते व ते म्हणजे आमचा मीडिया आहे --- वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे --- त्याच्या दृष्टीस चांगल्या गोष्टी काही पडतच नाहीत. जेव्हा टीव्ही सुरु करावा अथवा पेपर चाळावा तेव्हा लाचखोरी, खून, दरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, भ्रष्ट न्याय - प्रशासन - पोलिस व्यवस्था, मुजोर लोकप्रतिनिधी, ओला - कोरडा दुष्काळ यांच्याच बातम्या दृष्टीस पडत असतात. काय म्हणावे या कपाळ करंट्यांना ? यांना कोणी गुलाबाचे फुल दिले तर लेकाचे त्याचे काटे मोजून त्यांचे दुष्परिणाम सांगत बसतील. इतके दळभद्री !

    आता हेच बघा ना, आमच्या महाराष्ट्रात सेना - भाजपा - राष्ट्रवादी मिळून किती कार्यक्षमतेने व समर्थपणे राज्याचा कारभार व विकास करत आहेत हे त्यांच्या नजरेसच पडत नाही. जरा कुठे चार - दोन वर्षांची मुलगी पकडून एखाद्या तरुणाने वा वृद्धाने आपली वासना शमवली कि झाली ब्रेकिंग न्यूज ! लगेच दिल्लीची निर्भया वा मुंबईच्या शक्ती मिलच्या उजळणीला आरंभ ! वर्षानुवर्षे गुंड व राजकारण्यांच्या लाथा खाणाऱ्या पोलिसांनी जरा चेंज म्हणून एखाद्या गावा - घरात घुसून कोणाला मारहाण केली तर राज्याच्या पोलिस खात्याची लक्तरे वेशीला टांगली जातात ! रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी एखाद्या तरुणीला जबरदस्तीने पोलिस चौकीत अंगाखाली घेतले कि, पोलिसांच्या अब्रूचा पंचनामा ! एखाद्या गावी चाराठ दिवसांनी पाणी पुरवठा होत असेल तर लागलीच महाराष्ट्र दुष्काळग्रस्त झाल्याची हाकाटी उठवायची ! अरे, कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या राज्यात हजार पाचशे माणसं तहानेने व्याकूळली म्हणून काय सबंध राज्यात कोरडा दुष्काळ पडल्याची बोंब ठोकायची असते ?

    मूर्ख लेकाचे शेतकरी कवडीमोल दराचे धान्य पिकवण्यासाठी हजारो - लाखोंनी कर्ज घेताना सरकारला विचारतात का ? नाही ना ? मग अवकाळी पावसाने पिकं झोपली वा पाण्याविना जळाली तर ते सरकारला जबाबदार का धरतात ? हलकट मीडियाही शेतकऱ्यांनाच साथ देत असतो. तरी बरे, आमच्या कार्यक्षम मंत्र्यांनी सुमारे ७० ते ९०% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याचे जाहीर केलंय. तरीही काही बावळट माणसं घरगुती भांडणातून गळ्याला फास लावून घेतात व मीडिया त्यांस शेतकऱ्याची आत्महत्या म्हणतो !

    अरे, आमचे व्यापारी बांधव स्वतःच्या हिंमतीवर कर्जं काढून व्यवसायाची उभारणी करतात. व्यवसायात अपयश आलं तर प्रसंगी कर्ज देणाऱ्याला गळफास लावून घ्यायला भाग पाडतील पण, शासनाकडे तोंड वेंगाडत जात नाहीत आणि हे दळभद्री शेतकरी --- जरा कुठे ऊन जास्त पडलं, पाऊस कोसळला थंडीचा कडाखा वाढला कि आले सरकारच्या दारात भीक मागायला ! आणि हे पत्रकारही त्यांचाच कैवार घेतात. काय तर म्हणे, व्यापारी संघटीत आहेत अन शेतकरी असंघटीत ! मग आम्ही काय शेतकऱ्यांना संघटीत होण्यापासून रोखलंय ? पण या मूर्ख, अडाण्यांना संघटीत होणं, नेतृत्व निर्माण करणं व त्यावर दबाव कधी जमलेलंच नाही. त्याउलट या देशात - राज्यात सरकार कोणाचे का असेना --- नियंत्रण व्यापाऱ्यांचेच असतं हे काय कोणाला माहिती नाही ? आणि हि तर या देशाचीच नव्हे तर जगभरची परंपरा आहे ! पण आमच्या मीडियाचा एवढा अभ्यास कुठाय ?

    लाचखोरीच्या बातम्या तर अशा दाखवतात कि, जणू काही लाखांची लाच घेऊन त्या व्यक्तीने या देशाचे मोठेच नुकसान केलंय. शेदोनशे वा हजारपाचशेच्या लाचेची बातमी, काय बातमी आहे ? हजारो कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार होणाऱ्या या देशात - राज्यात शेदोनशे वा हजारपाचशेच्या लाच खाणे म्हणजे श्रीखंड सोडून शेण खाण्यासारखे आहे. या राज्याला काळिमा आहे. पण मीडियाला एवढी लाज कुठाय ?

    या राज्यातलाच नव्हे तर देशाचा --- जगभरातील मीडिया हा असा समाजावरून ओवाळून टाकलेला आहे.

    पण आम्ही मीडियाला का दोष द्यावा ? मीडियातील माणसं शेवटी या समाजातच वाढलेली आहेत ना ? आमचे राज्यकर्ते, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, न्यायव्यवस्था - यंत्रणेतील कर्मचारी इ. सर्वजण या समाजाचेच घटक आहेत. त्यांच्यावरील संस्कारही या समाजानेच केले आहेत. मग हा जमीन - आस्मानाचा फरक का व कसा ?

    मोठे मासे लहान माश्यांना गिळतात असे म्हटले जाते व सृष्टीचाही तोच नियम आहे. या मत्स्यनीतीपासून माणसांना का वगळावे ? कारण, मनुष्य हा देखील प्राणीच आहे ना ? मग तो तरी का वेगळा वागेल ?

    कोणत्याही सरकारी - गैर सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना ' वरकमाई ' किती होईल याचा अंदाज आम्ही प्रथम बांधतो. आपल्याहून बलवानाच्या विरोधात आवाज न उठवण्याचे बाळकडू आम्हांला पाजले जाते. ज्यांना चारचौघे आदर्श मानतात, त्यांच्याच मागे निमुटपणे जाण्याची आमची पद्धत आहे. प्रत्येक गोष्टी - समस्येचा विचार केल्यास मेंदवाला सुरकुत्या पडतील व अशा वळ्या पडणं शरीर, परिवार नि समाजाला हानिकारक असल्यानं आपली अक्कल न चालवण्याचा धडा आम्हांला शाळेतच शिकवला जातो. घराबाहेर पडताच दिसेल ती तरुणी - स्त्री हि फक्त भोगण्याची चीज आहे याची शिकवण आम्हांला कुठेही मिळत असते. कधी - कधी तर आम्हांला घरच्या बायकाही निषिद्ध नसल्याचे उपदेश प्राप्त होत असतात. पुरुषार्थ हा फक्त बायकांवर गाजवायचा असतो. तोही जेमतेम १ - २ मिनिटं ! त्या दोनेक मिनिटांसाठी जीवाचा किती आटापिटा होतो, माहित्येय ? त्या क्षणिक सुखाने कोणाचे भावविश्व उध्वस्त होते तर कोणाला नशेची धुंदी चढते ! पण समाज उध्वस्त भावविश्वाला परत उभं राहण्यास मदत करत नाही. कारण, काचेचं भांडं एकदा फुटलं कि झालं, अशी त्याची धारणा आहे ना !

    लाळघोटेपणा, पाय चाटू वृत्ती तर आम्हां सर्वांच्या नसानसांतून खेळत असते. त्यामुळेच कि काय, कुठे काही वेडंवाकडं चाललं कि तिकडे काणाडोळा केला जातो. अगदी सवयीने. उलट अशा कृत्यांची कोणी चर्चा आरंभली कि, घडल्या प्रकारावर पांघरूण घालायला आम्ही हिरीरीने पुढे येतो. बेईमानी आमच्या रक्तातच आहे. न्याय - नीती - देश - कायदा वगैरे थोतांड आहे. त्यामुळे जिकडे बघाल तिकडे तुम्हांला एकचं चित्र दिसणार आहे. फक्त त्यातील तपशीलांत थोडाफार फरक असेल इतकेचं !

    भरकटलेल्या समाजाला वठणीवर आणण्याचं कार्य विचारवंतांचं असतं असे म्हणतात पण अलीकडच्या काळात ' विचारवंत ' हि उपाधी ज्यांस शोभून दिसेल असे किती मनुष्य या राज्यांत आहेत ? त्याउलट विचारवंताचा बुरखा परिधान केलेल्या विकाऊ इसमांचीच इथे चलती आहे. पण त्यांना तरी दोष का द्यावा ? समाजाचे हित साधले तर समाज काही त्यांचे घर चालवत नाही. शेवटी पोटासाठी माणसं जिथं आपले बुद्धी, शील, नातलग, अवयव विकतात तिथे स्वाभिमान आता काय चीज आहे ?