शुक्रवार, १० जुलै, २०१५

संजय म्हणाला .... ! ( भाग – ५ )




    बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले प्रमाणेच त्या व्यक्तीच्या नक्शेकदम पर चालण्याचा कोणत्याही धर्म – समाजाच्या मनुष्यांचा स्वभावच आहे. उदा :- मुस्लीम धर्मीय शक्य तितके महंमद पैगंबरच्या जीवनक्रमास आदर्श मानून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे आपले मराठी बांधवही पूर्वसुरींच्या चरित्रांतून स्फूर्ती घेताना दिसतो.


    उदाहरणार्थ, मराठी माणसाला व्यापार – धंदा जमत नाही असं म्हणतात. व ते बरोबरच आहे. अहो आमच्या तुकारामाला, नामदेवाला तरी कुठे धंदा करणे जमले ? व्यवसाय दिवाळखोरीत निघाल्यावर तुकाराम देव – देवस्की करत बसला तर नामदेव धंदा कसा करू नये या विषयावर मोफत भाषणे देत, शिबिरं भरवत देशभर फिरला.


    मराठी माणसं भांडकुदळ असतात असे म्हणतात. त्यात चूक ते काय ? आमचा इतिहास बघा. कोणा ना कोणाशी तरी भांडण्यातच आमच्या इतिहास पुरुषांचा जन्म गेला आहे. राजेशाह्या संपून इंग्रजांची एकतर्फी लोकशाही आली. तेव्हा आम्ही प्रथम आपसांत व सवड मिळताच इंग्रजांशी भांडतच होतो. शेवटी आमच्या भांडखोरपणामुळे इंग्रजांनी हा देश सोडला. कोण म्हणतं कि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला तेव्हा देश स्वतंत्र झाला ? देशातला शेवटचा गोरा जेव्हा मुंबईतून बाहेर पडला तेव्हाच हा देश स्वतंत्र झाला अन ती मुंबई काय दिल्लीत आहे ?


    मराठी माणसं स्वार्थी आहेत असं म्हणतात. यात चुकीचं काहीच नाही. आमचा इतिहासच स्वार्थाचा आहे. उदाहरणार्थ, आमचा इतिहास बघितला तर आमच्या मराठी राज्यकर्त्यांना व्यापार – उद्योग, विज्ञान क्षेत्रांत कधीच प्रगती करता आली नाही. त्यामुळे आमची राज्यं नेहमीच आर्थिक अडचणीत सापडलेली असायची. मग आमचे राज्यकर्ते शेजारच्या राज्यांतील व्यापरी पेठा मारून आपल्या राज्याची आर्थिक घडी बसवायचे. विज्ञानाच्या बाबतीतही तेच !


    जर सर्व काही भव्य - दिव्य शोध आमच्या पूर्वजांनी लावले असतील तर मग आम्ही नव्याने का डोकी खपवायची ? हे दीडदमडीचे युरोपियन अनेक साधनांच्या आधारे शोध लावायचे. पण आमचे प्राचीन पूर्वज बसल्या जागी निद्रिस्त होऊन दिव्य चक्षुंनी सर्व विश्व, अंतराळ, आकाशगंगा फिरून यायचे व लिहून ठेवायचे असे म्हणतात. ‘ असं म्हणतात ‘ लिहिण्याचं कारण असे कि, हि माहिती आमच्या वडिलांनी दिली असून त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली होती. सदर माहितीने भरलेले ग्रंथ आमच्या आजोबांच्या खापरपणाजाने वाचले होते. त्यानंतर कोणी ते वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत. फक्त मौखिक आणि कर्णोपकर्णी परंपरेवरच आमचे ज्ञानार्जन चालू आहे. पण मुद्दा तो नाही तर आमच्या पूर्वजांनी सर्व आधुनिक शोध प्राचीन काळीच लावले हा आहे. पण या युरोपियन चांडाळांना सर्व श्रेय स्वतःकडेच घेण्याची भारी हौस. ठीक आहे. आम्हीही मग अज्ञानाचे सोंग घेत त्यांची चुकीची विद्या आत्मसात करून आमच्या पूर्वजांचे खरे शोध पडद्याआडचं ठेवतो. जेव्हा या युरोपियनांना आपल्या चुकांची जाणीव होईल व ते आमचे पाय धरतील तेव्हाच आम्ही खरे ज्ञान प्रकट करू. तोवर चलता है तो चलने दो !


    दुसऱ्याचं चांगलं होताना न बघवणे हा मराठी माणसाचा स्थायीभाव ( कि स्थायीस्वभाव ? जे काय ते ..) आहे असे म्हणतात व ते बरोबरच आहे. आमचा इतिहास बघा. यांत तुम्हांला भरपूर दाखले मिळतील. जे वरील विधानास पुष्टी देतील. उदाहरणार्थ, मोगलांनी एवढी मेहनत करून निजामशाही बुडवली पण शहाजीला मोगलांचे सुख बघवले नाही. त्याने फिरून निजामशाही उभारली. हे करताना याच निजामशाहीने आपल्या सासऱ्याचा बळी घेतल्याचेही तो विसरून गेला. शहाजीचे उदाहरण जुने आहे तर उत्तर पेशवाई बघा. एक पेशवा इंग्रजांकडे गेला तर पाठोपाठ इतरांनीही इंग्रजांकडे जाऊन पेशव्याहून अधिक चांगली वा त्याच्या बरोबरीने आपली व्यवस्था लावून घेण्याचाच प्रयत्न केला कि नाही ? या प्रयत्नात राज्य बुडालं पण बरोबरच्याला वरचढ होऊ द्यायचं नाही हे महत्त्वाचं ! लय लांब कशाला ? आमचे बारामती विद्यापीठाचे कुलगुरू शरद पवार यांनीही हाच आदर्श समोर ठेवलाय. सोनिया गांधींच्या काँग्रेसमध्ये पवार सोडून इतर मराठी माणसांचा उत्कर्ष होतोय पाहून त्यांनी स्वतःचीच काँग्रेस स्थापन करून दाखवली का न्हाय ! आता यामध्ये त्यांचे बळ घटले पण सोनिया काँग्रेसमधील मराठी नेत्यांच्या तुलनेने वरचे स्थान मिळवण्यात पठ्ठ्या यशस्वी झालाच ना ! मग बास.  तीच तऱ्हा आमच्या मनसे प्रमुख राज ठाकरेंची !


    मराठी माणूस हा इमानी, स्वामिनिष्ठ असल्याचा दाखला इतिहास देतो. उदाहरणार्थ, रामायणातील भरत हा तसा मराठीच ! दशरथाच्या महाराष्ट्रीयन बायकोचा मुलगा. हिचा तकिया कलाम ‘ काय, काय ‘ असल्यामुळे युपीच्या लोकांनी या शब्दाचा अपभ्रंश करत तिला ‘ कैकयी ‘ हेच नाव दिले. एकूण तेव्हाही उत्तर भारतीय मराठी माणसाचा द्वेषच करायची तर ! हि टीप ठाकरे बंधूंना दिलीच पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा कि, भरत हा अतिशय निष्ठावंत. त्यामुळेच भैया रामच्या पश्चात त्याच्या चपला सिंहासनावर ठेवून त्याने राज्याचा सांभाळ केला. तो देखील विश्वस्त म्हणून ! पण राजा नाही बनला. इतकेच काय पण बुडालेली निजामशाही पुन्हा उभी करण्याऐवजी शहाजी स्वतंत्र राज्य निर्माण करू शकला असता पण त्याने तसे केले नाही. बाजीप्रभू शिवाजी विशाळगडी पोहोचून तोफांचे आवाज करीपर्यंत जीव धरून बसला. शहाजी – बाजीची हि परंपरा आम्ही वेगवेगळ्या रूपांत – स्वरूपांत आजपर्यंत पाळत आलोय. राज्य बुडायची वेळ आली. छत्रपतीला हाताशी घेऊन राज्याचं बचाव करण्याची नाना फडणीसला उत्तम संधी असूनही धन्याच्या --- पेशव्याच्या विरोधात कसं जायचं म्हणून तो गप बसला. नानाचाच धडा इतरांनी गिरवला व राज्यनाश स्वस्थचित्ताने पाहिला. परंतु बेईमानी केली नाही. पुढे इंग्रजांचे राज्य आले. त्यांच्याही सेवेत आम्ही रक्ताचं पाणी केलं. ( रक्तभात लिहिणार होतो पण विश्वास पाटलांची हि रेसेपी काही आपल्याला जमत नाही बुवा ! ) इंग्रजी राजवटी विरोधात केल्या जाणाऱ्या कारवाया उलथून पाडण्यात, कट – कारस्थानं उकरून काढण्यात आम्ही रात्रंदिवस एक केला.


    शौर्य, चातुर्य यांत मराठी माणूस कुठेही कमी नसला तरी त्याच्या लाजाळू, अल्पसंतुष्ट, अतिविचारी वृत्ती / स्वभावामुळे तो जगाच्या स्पर्धेत नेहमीच मागे राहिला. आता हेच बघा कि, वाऱ्याच्या वेगाने बाजीराव दिल्लीला गेला. पण हिंदुस्थानच्या सार्वभौम बादशाहाचे शहर, ते लुटलं तर त्याला काय वाटेल इ. अतिविचारांनी शहराबाहेरचे चार दोन पुरे लुटून तो मागे आला. पुढे नादिर व अब्दालीच्या दिल्ली लुटींची  वर्णने वाचून पेशव्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली पण वेळ निघून गेली होती. पुढे सदाशिवराव दिल्लीला गेला पण रुप्याच्या पत्र्याखेरीज त्याच्या हाती काहीच लागले नाही. तेव्हा भाऊने दिल्लीच्या बादशाहचे तख्त फोडल्याचे लिहून आम्ही आमच्याच मनाचे सांत्वन केले.

इंग्लिश राजवटीत इंग्रजांना फक्त पक्षी उडतात हे माहिती असताना आमच्या मराठी माणसाने विमानं बनवून उडवून दाखवले. यापूर्वी हणमंत नावाचा शेवटचा मराठी माणूस रामायणात उडाला होता. त्यानंतर दहा हजार वर्षांनी हा चमत्कार घडवून आणला गेला. परंतु येथेही आमचे स्वभावगुण आड आले. विमान बनवून उडवण्याचा शोध लावूनही ती विद्या विकसित करणे आम्हांला जमलेच नाही. आम्ही आपले एक नेक कार्य करून दर्या में घालून गप्प बसून राहिलो.


    आम्हां मराठी माणसांना दुसऱ्याच्या क्षेत्रात लुडबुड करायची एक चांगली सवय आहे. आता हेच बघा, युपीच्या रामाची बायको लंकेच्या रावणाने नेली तर मराठी मारुतीचे काय गेले ? पण गप्प बसला नाही. त्या भांडणात पडून स्वतःची शेपटी मात्र त्याने जाळून घेतली. आमचा रामदास जन्मभर ब्रम्हचारी राहिला पण विवाहितांना प्रपंच कसा नेटका करावा याची शिकवण देत राहिला. आम्ही त्यांचेच वंशज. अमेरिका, चीन, ग्रीस, रशिया यांच्या आर्थिक प्रश्नांवर आम्ही चर्चा करतो व त्यावरील उपायही सुचवतो. प्रत्यक्षात आम्हांला आमच्या देशातीलच काय पण घरातील आर्थिक प्रश्नांची समज नसते. पण म्हणून काय झालं ? न्यूनगंड आम्ही मनाशी कधीच बाळगत नसतो. आता हेच बघा कि, दोन ठिकाणी लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या सेल्फी मोदींना आम्ही राज्यकारभार कसा करायचा असतो याचे मोफत, विनामुल्य, न मागता सल्ले देत असतो. प्रत्यक्षात आम्ही साधी वर्गातील प्रतिनिधीची देखील निवडणूक लढवली नाही. पण म्हणून काय झाले ? मोदी असेल देशाचा पंतप्रधान, निवडून तर आम्हीच दिले ना ?
 
    एकूण आम्ही तसे परोपकारी. तरीही लोकं उगाचच मराठी माणसाला नावं ठेवतात. अरे तुम्ही नुसता आमच्या दासरामाच्या दासबोधातील मुर्खांची लक्षणे वाचून बघा. म्हणजे मग कळेल मराठी माणूस काय चीज आहे ते !