रविवार, २५ जुलै, २०२१

आयटी युगाच्या निमित्ताने...!

गेल्यावर्षी Vishal, Arjun आणि Sanantha अभिनित Irumbu Thirai पाहिला होता. काल परवा Agent Sai Srinivasa Athreya पाहण्यात आला. दोन्ही चित्रपटांतील महत्वाचं साम्य म्हणजे Information Technology युगाचे बरे वाईट परिणाम विशद करणं. 


तसं पाहिलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्यासाठी नवीन नाही. अचूक माहितीच्या आधारे अनपेक्षित ठिकाणी नद्या पार करून प्रतिपक्षाला चकित करणारे अलेक्झांडर, अब्दाली आपल्या परिचयाचे आहेत. 

गेल्या शतकात माहिती तंत्रज्ञानाला लष्करी सामर्थ्याची जोड मिळाल्यास काय होतं याचं प्रात्यक्षिक जर्मनीने दोन महायुद्ध घडवून सर्व जगाला दाखवून दिलं. 

दंगलींच्या काळात जनगणना, मतदार याद्या वापरून विशिष्ट गल्ल्या, घरे कशी टार्गेट करायची हे तर आपल्याला माहिती आहेच. ज्यावेळी रक्तरंजीत क्रांती नको असते तेव्हा शांततामय मार्गाने सत्ताबदल करण्यासाठी माहितीचा गैरवापर कसा करायचा हे स. २०१३-१४ पासून वैदिक संघ आपल्याला शिकवत आहे.

सारांश, आयटी क्षेत्राची उपद्रव क्षमता आपल्याला अगदीच माहिती नाही अशातला भाग नाही. परंतु त्याचे महत्व आपल्या लक्षात यावे तसे अद्याप आलेलं नाही. त्यामुळेच आपण आपला डेटा कोणी मागितल्यास अगदी सहजगत्या देऊन टाकतो. कसलाही मागचा पुढचा विचार न करता.


याचं अलीकडचं सर्वांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे आधार कार्ड. या आधाराला विरोध करणारेच याची अप्रत्यक्ष सक्तीने अंमलबजावणी करू लागले, हे थोडं बाजूला ठेवलं तरी मुळात याचे प्रयोजन काय ? हा प्रश्न इथल्या सुजाण नागरिकांना कधी पडला का ? आणि पडल्यास त्यावर काय झालं ? इथे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचा कोणी दाखला देईल परंतु ते निर्देश आणि वास्तविकता यात महादंतर आहे. 


आयटी युगाचं आणखी एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की, जी सर्वाधिक मौल्यवान गोष्ट.. तुमची माहिती.. तिला खरेतर सोन्याचा भाव आहे व त्याची तुम्हांला अजिबात जाणीव नाही. साधी गोष्ट. वधू वर सूचक मंडळात तुम्ही नाव नोंदवा आणि आठ पंधरा दिवसांत.. कधी कधी नाव नोंदवल्यावर एक दोन दिवसांतच तुम्हांला अनोळखी नंबर्सवरून कॉल, मेसेज यायला सुरुवात होते. अर्थात अपेक्षा असते स्थळांची, पण प्रत्यक्षात ते देखील वधू वर सुचकवाले किंवा घरबसल्या पैसे कमवावालेच असतात. आता हा डेटा लिक कोण करतं वा खरेदी करून त्यात फायदा कसं कमवतं हा तुम्हांला प्रश्न पडत असेल तर यातून होणाऱ्या फ्रॉड्सची थोडी माहिती घ्या.  


आता या माहिती तंत्रज्ञान युगाचे आणखी एक उदाहरण देऊन हा लेखनप्रपंच संपवतो. सोशल मीडियावरील ट्रोल्स हे सर्वांच्या परिचयाचे. विरोधी मताला दाबून टाकण्यासाठी त्यावर या पेड/अनपेड ट्रोल्सच्या झुंडी सोडल्या जातात. याचं खरं कारण माहित्येय ?

एकांगी बाजूवर मत बनवणं सोपं असतं परन्तु नाण्याची दुसरी बाजू समोर आल्यावर व्यक्ती विचार करू लागते व त्या मंथनातून तिला सत्याची जाणीव होते. आणि हेच नेमकं सत्ताधारी, वर्चस्ववादी गटाला नको असतं. चिकित्सक वृत्ती मुळातच खुडून टाकावी यासाठी अगदी शाळा - कॉलेजांतून प्रयत्न होतात व त्यातूनही जर एखाद्यात ती शिल्लक राहिली तर सोशल मीडियाच्या माध्यमाने ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. 

तात्पर्य, सोनं चांदी हे भलेही मूल्यवान असेल परंतु तुमची माहिती, ज्ञान हे त्याहून बहुमूल्य आहे. आपल्या भांडवलाचा आपल्या फायद्यासाठी वापर करायचा की दुसऱ्याचा फायदा करून देण्यासाठी, याचा किमान विचार प्रत्येकाने आता केलाच पाहिजे.

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

चाळीशी

चाळीशी.. एक अपरिहार्य वास्तव… वयाचा टप्पा.. सहजासहजी न ओलांडता येणारा… तसं पाहिलं तर आपण वयाच्या कोणत्याच टप्प्यावर एवढं विचाराक्रांत होत नाही. ज्या उत्साहाने पंचविशी स्वीकारली त्याच तिशी - पस्तिशी.. परंतु चाळीशीच्या बाबतीत तसं बोलायची सोय नाही.

इथं तुम्ही धड तरुण नसता की प्रौढ वयस्क. काहीशी मधली अवस्था असते. तारुण्याची उर्मी सरलेली नसते न् प्रौढत्वाची जाणीव आपल्या मनातून जात नसते. 

पस्तिशीपर्यंत मनात जपलेलं बालपण कुठेतरी हरवू लागतं.. जबाबदारीच्या जाणिवा तुमच्यातील मूल मारून टाकतात. तसं पाहिलं तर बालपण, तारुण्य या अवस्था कधी मला उपभोगता आल्या नाहीत, परंतु त्यांची खंत कधीच वाटली नाही. पण ही प्रौढत्वाकडे नेणारी.. सॉरी, त्यावर शिक्कामोर्तब करणारी चाळीशी मात्र अस्वस्थ करणारी नक्कीच आहे.

 देव आनंदने कधी पस्तिशी स्वीकारली होती का ? नाही म्हणजे कणेकरी लेखांवर मोठे झालेले आम्ही. त्यामुळे देव आनंद नेहमी पंचविशीतच मनाने राहिला असावा, अशी एक भाबडी समजूत आहे, म्हणून म्हटलं. पण मनाने चिरतरुण राहण्याची किमया मला वाटतं एखादा देवच करू शकतो. जसं मरेपर्यंत आशिक मिजाज राहणारा हसरत जयपुरी. पन्नाशी नंतरही तितक्याच उत्कट आतुरतेने ' कांटे नहीं कटते यह दिन यह रात.. ' म्हणणारा किशोर तरी कुठे वेगळा होता म्हणा.. खऱ्या आयुष्यात कधीही न भेटलेले पण नेहमी आपलेच वाटणारे हे खरे सहप्रवासी, आधारस्तंभ म्हणता येतील. असो. मनातील सर्वच भावना कधी कधी शब्दबद्ध करता येत नाहीत व करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रेमपत्राचं जाहीर वाचन केल्यासारखं हास्यास्पद होतात. तेव्हा इथंच आवरतं घेतलेलं बरं !