स्मरण - विस्मरण – मरण



    संध्याकाळची वेळ. हवेत गारठा जरी असला तरी गेल्या मासाच्या तुलनेने बराच कमी होता. बहुतेक उन्हाळा तोंडावर आला असावा. आज तळावर बरीच गडबड उडालेली दिसते. चार - दोन ओळखीच्या बारगीरांशी बोलणी केली असता उद्या पहाटे निजामाच्या फौजेवर चाल करून जाण्याचा दादा - भाऊचा बेत असल्याचे कळले. अखेर गेले कित्येक दिवस रेंगाळलेली हि मोहीम संपुष्टात येणार तर !

    उद्याच्या झुंजाची बातमी मिळताच फार वेळ तिथे न दवडता थेट मुक्कामाच्या जागेवर मी आलो. घोड्याचा लगाम पोऱ्याच्या हातात देऊन त्यांस उद्याच्या संग्रमाकरता तयार करण्याची ताकीद दिली. राहुटीत ठेवलेली खास लढाईत वापरली जाणारी शस्त्रं तपासून पाहिली आणि मग जेवणाच्या तयारीला लागलो. शेवटी निजामापेक्षा पोटाची लढाई महत्त्वाची !

    उन्हाच्या तीव्र चटक्यांनी अंग भाजू लागलं तशी माझी झोप चळवळी. डोळे किलकिले करून मी पाहण्याचा प्रयत्न करू लागलो पण प्रखर सूर्यप्रकाशाने मला डोळेच उघडता येईनात. आळस झटकण्याकरता मी दोन्ही हात पडल्या जागी फैलावण्याचा प्रयत्न केला अन …. सर्वांगातून वेदनांचा कल्लोळ उठला. डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. असह्य वेदनांनी मी गुरागत ओरडलो. काय घडतंय नि काय घडलंय हे समजायच्या आत परत एकदा माझ्या डोळ्यांवर अंधारी आली.

    नाकाशी दरवळणाऱ्या कसल्याशा वासाने जाग आली. वेदनांनी अंग ठणकत असलं तरी अगदीच असह्य असं वाटत नव्हतं. अंगात अशक्तपणा वाटत असला तरी होता नव्हता तेवढा जोर लावत, दात - ओठ खात मी उठून बसलो व आसपास पाहू लागलो. एखाद्या धर्मशाळेसारख्या दिसणाऱ्या त्या वास्तूत बैराग्यांचा तळ पडला होता. कोणी आपल्या ध्यानात मग्न होते ; तर कोणी नित्यकर्मांत, तर कोणी पोटापाण्याची सोय करण्यात. प्रत्येकजण आपापल्या विश्वात गर्क होता. काही क्षण मी त्यांच्याकडेच बघत बसलो.

    काही वेळाने त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं व आपल्या अगम्य भाषेत काहीतरी मोठमोठ्याने बडबडत तो माझ्याकडे धावतच आला. त्याचे शब्द जरी मला समजत नसले तरी त्याची आनंदित मुद्रा सारं काही सांगत होती. पाठोपाठ इतर बैरागीही माझ्याभोवती घोळका करून बसले व माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. मला तर त्यांतील एकाही शब्दाचा अर्थ लागत नव्हता कि समजत नव्हता. तेव्हा पुढाकार घेण्याच्या इच्छेने मी तोंड उघडून बोलण्याचा प्रयत्न केला पण मनाशी योजलेले शब्द काही मला धडपणे उच्चारताच येत नव्हते. माझ्या घशातून निघणाऱ्या त्या अगम्य शब्दांनी बैराग्यांची निराशा झाली असली तरी माझ्या अंगा - खांद्यावर आपले हात हलकेच थोपटत आपली अर्धवट कामं पूर्ण करण्यास निघून गेले. मी मात्र माझ्याच विश्वात हरवून बसलो.

    हळूहळू दिवस उलटून जाऊ लागले. अंगात शक्ती येऊन मी हिंडू - फिरू लागलो. बैराग्यांकडून नेहमीच्या व्यवहारात उपयोगी पडणारे काही शब्द मोठ्या मुश्किलीने शिकून घेतले खरे, पण त्यांचा वापर करण्याचा प्रसंग माझ्यावर क्वचितच येई. गावोगावी फिरणाऱ्या आमच्या टोळीला उदरनिर्वाहाची कधीच अडचण पडली नाही. अन्नछत्रे वा भिक्षेच्या जोरावर आम्ही सर्वजण जगत होतो. माझे सहकारी --- सहकारीच म्हटलं पाहिजे त्यांना --- अज्ञात अशा परमेश्वराच्या भजनांत, भक्तीत बुडालेले होते. या मोहमयी संसारापासून त्यांनी आपले सर्व पाश तोडले होते. प्रत्येकाला गाव - घर - परिवार असूनही त्यांना त्यांची याद कधी यायची नाही. आणि मी …. ?

    न आठवणाऱ्या आठवणींना आठवण्याच्या प्रयत्नांत येणारा प्रत्येक क्षण ढकलत होतो. जगत होतो. रात्रंदिवस स्वतःच्याच विश्वात रममाण होत. कधी पेटवलेल्या धुनीकडे तर कधी शून्यात बघत. ज्या भाषेत मी विचार करायचो तिचे उच्चार अजूनही मला येत नव्हते आणि आता तर त्यांची मी आशाच सोडलीय. माझ्या विचारांची भाषा कळणाऱ्या, जाणणाऱ्या व्यक्ती अनेक गावं पालथी घालूनही भेटत नव्हत्या. भेटल्या नाहीत. आणि आता भेटण्याची आसही मावळली होती. या विश्वात दूर कुठेतरी माझंही गाव - घर - परिवार असेल. नव्हे असणारच ! पण कुठे ?

    अलीकडे आता मला हा प्रश्नही अजिबात छळत नव्हता. फार पूर्वी घरादाराचा विचार मनात आला कि अनामिक ओढ, हुरहूर दाटून यायची. पण आता …. !
मला माझा कसलाच भूतकाळ आता आठवत नाही. मनात कसलीच इच्छा वा ओढ दाटून येत नाही. अगदी निरिच्छ ! रात्रंदिवस, वर्षानुवर्षं बराचसा काळ मौन बाळगण्यात गेल्याने बोलण्याची सवयच राहिली नाही. इतकेच काय ती इच्छाही होत नाही. पण यामुळे काही अडतही नाही. जिथे मुक्काम असेल त्या गावचे लोक साधुपुरुष म्हणून पाया पडतात. न मागता - बोलता खाण्यापिण्याची सोय करून देतात. फक्त आशीर्वादासाठी ! माझ्या आशीर्वादाने त्यांचं भलं होईल अशी त्यांची आशा असते. अपेक्षा असते. पण त्यांना कुठं माहितीय कि मी, माझं स्वतःचं स्वत्वचं हरवून बसलोय. गमावून बसलोय. जिथं मीच माझी मदत करू शकत नाही तिथे त्यांना काय देणार ? तरीही लोकांचं मन राखण्यासाठी हात वर करावाच लागतो.

    ऋतू आले, ऋतू गेले. झाड आता थकलंय. गात्रं शिथिल झालीत. कधी एखादी वाऱ्याची झुळूक आली तर पान गळून पडेल. ना कसली खंत ना क्षिती. आता वेध फक्त मुक्तीचे. या देहाच्या बंधनातून बाहेर पडण्याचे. कदाचित माझा आत्मा तरी आपल्या जन्मभूमीचे दर्शन घेईल एवढीच सुप्त इच्छा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा