रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

प्रासंगिक ( ५ )



    भारतीयांना इतिहास लेखनाची प्रदीर्घ परंपरा आहे. आमच्या प्राचीन ऋषी - मुनींना इतिहास लेखन अवगत होते असं म्हणायचं असतं. बाकी हे ऋषी - मुनी तपश्चर्या सोडून इतिहास लेखन कधी करत होते हे मात्र विचारायचं नसतं. थोडक्यात आपली इतिहास लेखन परंपरा हि अर्धवट ज्ञान व अज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे इतिहास मांडणी, रचना सदोष असणे स्वभाविक आहे. उदा :- चोखोबाला बडव्यांनी मारले म्हणून त्याच्याच एका न रचलेल्या अभंगाचा आधार घेऊन उर बडवायचा व त्याचवेळी नंतरच्याच काळात झालेल्या नामदेवाकडून नैवद्य ग्रहण करत होता हे तुपकट चेहऱ्यानं सांगायचं असतं. मात्र मधल्या काळात विठ्ठल मंदिरातील चोखोबला मारणारे बडवे कुठे उलथले याचा सोयीस्कर विसर पाडायचा असतो.

    संत परंपरा जरी सोडली तरी इतरत्रही असाच गोंधळ असल्याचे दिसून येते. उदा :- बाबर स्थापित बादशाही तुर्कांची होती. पण इतिहासकारांनी तिला मोगल ठरवले. आता तैमुरी तुर्कांचा व चंगेजी मंगोलांचा इतिहासात नमूद असा एकच विवाहसंबंध घडून आला असला तरी तैमुरी वंशज स्वतःला तुर्कच मानत याकडे आमच्या इतिहासकारांनी सोयीस्कर डोळेझाक केली. काय करणार बिचारे ? प्रस्थापित मतांना धक्का लावण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. आणि ज्यांच्यात होते त्यांची तरी आम्ही काय वासलात लावली ?

    राजवाडेंना इतिहासाचार्य म्हणत  मराठेशाही, पेशवाईसंबंधी त्यांची मतं ब्रह्मवाक्य स्वरूप मानायची. पण तेच राजवाडे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास घेऊन आले कि, राजवाडे म्हणजे विक्षिप्त गृहस्थ.... खासगीमध्ये  ब्रह्मचारी म्हणजे तुंबलेला आणि प्रकट.. राजवाड्यांना संस्कृत शब्दांचा व्यवस्थित अर्थ लावता आला नाही. पण त्याचवेळी संस्कृत आधारे त्यांनी लावलेल्या शाब्दिक व्युत्पत्त्या मात्र उचलून धरायच्या. याचा अर्थ काय होतो ? हे सुज्ञांना सांगायची गरज नाही पण असे सुज्ञ तरी कितीसे आहेत ?

    भारतीय इतिहासलेखन परंपरेत हिंदू - मुस्लीम हा एक प्रवाह नेहमीच कायम राहिला असून यातही अनेक उपप्रवाह आहेत. परंतु त्यातील उभयतांच्या वैराचा विशेष !
    मुस्लिमांनी इथे किती अत्याचार केले, अनर्थ माजवले वगैरे आता नेहमीचं दळण झालंय. पण मुस्लिमांआधी येथे आलेल्या हुण, शक, कुशाण यांचं काय ? त्यांनी इथे येऊन काय दिवे लावले, विझवले याची चर्चा का केली जात नाही ? याबाबतीत आमच्या वैदिक मित्रांचा ' वेदात सर्व ज्ञान सामावले आहे ' हा दाखला विशेष उपयुक्त आहे.
    भारतावर ज्या इस्लामी टोळ्यांनी स्वाऱ्या करून नंगानाच घातला त्या तुर्की, पठाणी टोळ्यांची मुळे ऋग्वेद काळापर्यंत जातात. म्हणजेच एकेकाळचे हे वैदिकांचे भाषिक, धार्मिक, प्रादेशिक भाईबंद. वैदिकांचं सुदैव वा दुदैव म्हणा. त्यांना झरतुष्ट्रच्या पारशांनी लाथ घातली व ते अफगाणिस्तानातून उडून हिंदुस्थानात आले. पण पुढे इस्लाममध्ये कन्व्हर्ट झालेल्या तुर्क, पठाणांनी पारशांना हाकलून लावले. यामुळे हे दोन धर्म इतिहासजमा होता होता थोडक्यात बचावले. यावरून वैदिकांच्या मुस्लीम द्वेषाचे रहस्य लक्षात यावे. परंतु ज्ञानाचे आम्हांस इतके वावडे कि, स्वतन्त्र शोधक नजरेने आम्ही याकडे पाहिलेच नाही. जे काही पाहिले ते वैदिक नजरेने. त्यामुळेच ग्रीक, शक, हुण, कुशाणांपेक्षा मुस्लीम आम्हांला शत्रुवत वाटू लागले, जे मूळ हिंदू धर्माचाच भाग होते.

    भारतीय मुस्लीम समाज हा देखील एका अज्ञानी परंपरेतलाच आहे. आपण इथले एकेकाळचे राज्यकर्ते होतो, हि त्यांची भावना. पण वेड्यांना हे कधीच कळले नाही कि, इथे राज्य करणारा एक खुश्रूखान सोडला तर एकही भारतीय वंशाचा मुसलमान राज्यकर्ता बनला नाही. पगडी सारखे विद्वान तुर्की बादशहांनी हिंदू धर्मीय -- विशेषतः राजपूत स्त्रियांशी लग्नं केल्याने त्यांची संतती कशी भारतीय वा मिश्र रक्त / वंशाची बनली हे सांगण्याचा निरर्थक प्रयत्न करतात. मात्र खुद्द मिश्र रक्त / वंशाचे औरंग सारखे शहजादे - बादशहा आपणांस अस्सल तुर्की समजत याचा त्यांनाही विसर पडतो.

    वीरता, आत्मत्याग, पराक्रमाचे प्रतिक बनलेले राजपूतही काही फारसे वेगळे नाहीत. मूळ हि शक - सिथियन टोळी. जी मध्य आशियात वावरणारी. इथे आश्रित वा आक्रमक बनून आली याची स्पष्टता नाही. इथे राहून बव्हंशी हिंदू बनले तर चार दोन घराणी वैदिक धर्माचे आश्रयदाते. त्यामुळे वैदिकांनी आपल्या परंपरेनुसार त्यांना ' साहित्यिक क्षत्रियत्व ' दान देऊन टाकले. वर भर म्हणून अग्निकुलोत्पन्न !
    या अग्निकुळाचेही एक वैशिष्ट्य आहे. स्त्रीच्या योनिपेक्षा -- थेट अग्नीकुंडातून जन्म / उत्पन्न झाल्याचे म्हटल्याने कसे भारी वाटते. मग भलेही ते अनैसर्गिक का असेना. तसेही वैदिक संपर्कामुळे आम्हां भारतीयांना अक्षतयोनी, अयोनीसंभव वगैरे कल्पनांचा भारी सोस. त्यातलेच हे एक खूळ. मग या खुळापायी शिवाजी एकाच वेळी राजपूतही असतो व मराठाही बनतो याचे आम्हांला विशेष असे आश्चर्य वाटेनासे होते. एकीकडे मराठे या महाराष्ट्रभूमीतील प्राचीन रहिवासी, शासक म्हणायचे व दुसरीकडे आपले राजपुती -- पक्षी शक - सिथियन मूळ शोधायचे, हा दुटप्पीपणा यातूनच जन्मलेला.

    बरं हे झालं प्राचीन - मध्ययुगीन. आधुनिक पिढीचे काय ? ती आपल्या जुनाट, बुरसटलेल्या व विसंगतीने भरलेल्या तत्वज्ञानावर पोसली जातेय. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय ? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? असे बरेच प्रश्न या विसंगतीतून जन्माला आलेत पण त्याची उत्तरं शोधता आली नाहीत. व येणारही कशी ? ज्या तत्वज्ञानातून हे अपत्य जन्माला आलं त्याचीच चिकित्सा मुळात नाकरली जाते.
   
    व्यक्तिपूजा हा समाजाचा मोठा दोष व या दोषापासून जाती - धर्माचे लेबल असलेला एकही भारतीय समुदाय अलिप्त नाही. एकानं गांधी उचलला कि लगेच दुसरा टिळक, तिसरा आंबेडकर. चौथा आणखी कोण घेऊन आलाच.
   
    गांधी म्हणाला ' खेड्यांकडे चला ' आता यामध्ये किती गुढार्थ भरलाय हे आमचे विद्वान मोठ्या गांभीर्याचा आव आणून सांगतात. पण तो गांधी विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात बोलला. त्याचे आता काय ? चालू शतकात, दशकात गांधी असता तर काय बोलला असता.. याचा विचार कोणी केला ? केवळ गांधीच नव्हे तर थोर म्हणवले जाणारे महापुरुषही याच परंपरेतले. सगळ्यांना सरणावर जाऊन किमान चार दोन  पिढ्या उलटून गेल्या. पण त्यांचेच खरे म्हणत आम्ही नवी आधुनिक पोथी / मढीनिष्ठा जोपासतोय. प्रत्येक घरात बाप - मुलाच्या पिढीतील विसंवाद सर्वांच्या परिचयाचा. पण त्याचा या स्थळी मात्र सोयीस्कर विसर पडतो.

    सारांश, आमचं तात्त्विक - व्यावहारिक जीवन वेगवेगळं असून  या विसंगतीतून निर्माण होणाऱ्या अज्ञानाचे आम्हास विलक्षण आकर्षण आहे.