शनिवार, ११ जानेवारी, २०१४

संजय म्हणाला …! ( भाग - ३ )

                                     
                                                                                                         
                    काल संध्याकाळी ४ पासून रात्री ८ वाजेपर्यंत सलग चार तास सोनीवर CID नावाची मालिका पाहण्यात खर्ची पडले. या ४ तासांत दुसरे काही टाईमपास नव्हते. टीव्हीवर देखील दुसरे काही लागले नाही. मग करणार काय ? मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे ' आप ' चा ' बाप ' बनल्याचे व त्यांनी मोदींवर टीका केल्याने न्यूजवाल्यांना तोंडी लावायला एक विषय मिळाला. पण या फालतू चर्चेत आपल्याला काही रस नाही. नाहीतरी सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण राष्ट्रवादी सर्वेसर्वा श्री. शरद पवार चालवत आहेत हे महायुतीच्या बातम्यांवरून आणि जितेंद्र आव्हाडांच्या मुलाखतींवरून स्पष्ट होत आहेच. बाकी, देशाचे राजकारण इशाऱ्यावर चालते याचा अजून उलगडा झाला नाही. तर काय विषय होता बरं, हां … CID नावाची मालिका ! जवळपास १६ वर्षे शिवाजी साटम व त्यांची टीम टेलिव्हिजन मधील गुन्हेगारांचा सफाया यशस्वीपणे करत आली आहे. या १६ वर्षांत त्यांचे  ऑफिसर्स मारले गेले तर कित्येक फोरेन्सिक लॅब डॉक्टर्सच्या बदल्या झाल्या. ( मोना आंबेगावकर आणि तिच्यानंतरची श्वेता कवात्रा बरी होती !) गेली १६ वर्षे एसीपी प्रद्युमन  यशस्वीपणे सोडवतोय आणि बव्हंशी केसेस मी नित्यनेमाने पाहतोय व पाहिल्यावर '  हि मालिका मी का पाहतो ? ' हा प्रश्न स्वतःला विचारतोय. सुरवातीला या सिरियलमध्ये नक्कीच काहीतरी दम होता. पण जसंजसं ती सोनीवर स्थिरावली तसतशी यात बरीच ढिलाई आली. अलीकडच्या काही वर्षांत तर यांच्या कथा इतक्या फालतू असतात कि, अशा कथेवर १ किंवा २  तासांची मालिका बनवणाऱ्या व त्यात भाग घेणाऱ्या सर्व टीमचा जाहीर सत्कार करण्याची इच्छा वारंवार मनात येते. 

                       CID चा विषय निघाला आहे तर त्यातील ललनांचा ( का ? ललना हा शब्द फक्त बॉन्डच्यासाठीच राखीव आहे का ? याबाबतीत  स्वदेशी बाणा टिळक - गांधींपेक्षाही अधिक जाज्वल्य आहे !) CID ला जेव्हा चांगल्या कथांचा बेस होता तेव्हा अश्विनी कळसेकरकडे लक्ष जात नव्हते हे मान्य करावेच लागेल.
  
सीआयडी मधून अश्विनीची एक्झिट झाली आणि त्यांच्या कथांच्या दर्जालाही उतरती कळा लागली. अश्विनी नंतर स्मिता बन्सल आली. 

काही काळ तिच्यामुळे CID सुसह्य झाली खरी पण लवकरचं तिची गच्छंती होऊन मग एकापाठोपाठ ' युवतीसम ' चेहरे सीआयडीत दिसू लागले.  त्या गर्दीत अलका वर्मा थोडा भाव खाऊन गेली. अलका वर्मानंतर कविता कौशिकच आगमन झालं. 
             

 
    दरम्यान, सीआयडीच्या फोरेन्सिक लॅबमध्येही चेंज होत गेले. मोना आंबेगावकर बराच काळ डॉक्टरकी करून थकली व श्वेता कवात्रा उगवली. दरम्यान किती आले आणि किती गेले गणती नाही ! 

   

परंतु श्वेता फार काळ राहिली नाही. तिच्यानंतर डॉक्टर साळुंखे आणि तारिका हे दोन स्टार्स उदयाला आले, ते आजतागायत तळ ठोकून राहिले.  इकडे श्वेता सोबत कविता पण गेली आणि वैष्णवी धनराजने काही काळ सीआयडीची लेडीज ऑफिसर अशी भूमिका निभावली. अश्विनी ते वैष्णवी या दीर्घ प्रवासात सीआयडीमधील अभिनय देखील उतरणीला 
 लागला. 

           एसीपी प्रद्युमन संवादांपेक्षा डोळे व हात निरर्थक हलवू लागला. फ्रेडी एकाहून एक बालिश जोक्स व ओव्हर रिएक्शन करून  निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. आरंभीचा फ्रेडी असा नव्हता. अभिजित हा मध्येच विस्मरणात गेलेल्या आठवणी, एसीपीशी प्रसंगी विरोध पत्करणे आणि ठराविक साचेबद्ध शैलीत संवाद बोलणे यात गुरफटू लागला. दरवाजे तोडण्याचे कार्य दया आजही नित्यनेमाने करत आहे. हल्ली दरवाजांची जाडी देखील पातळ होत आहे हि बाब वेगळी ! तसेच दाराला कुलूप असले तरी कुलपासकट दार मोडणारा पैलवान अशी त्याची इमेज आता बनली आहे. यांच्या जोडीला विवेकच अस्तित्व काहीसं सुसह्य होत होतं. कमीत कमी त्याच्या एक्शन आणि एक्टिंगमध्ये साचेबद्धपणा नव्हता. सीआयडीची हि मुख्य टीम बनत असताना त्यांच्यातील लेडीज ऑफिसर्सच्या भूमिका करणाऱ्यांची सिरीयल मधील उपस्थिती फक्त ' शो पीस ' म्हणून बनून राहिली. अश्विनी व स्मिताचा अपवाद केला तर !  

वैष्णवी धनराज याच मालिकेतून खरी पुढे आली आणि इतर चॅनेल्सच्या मालिकांच्या ऑफर आल्यावर तिची रितसर ' पाठवणी ' झाली. वैष्णवीची एक्झिट होण्याआधी जसवीर कौर या चमूत दाखल झाली. 

   जसवीरच्या अभिनय क्षमतेची या ठिकाणी चर्चा करावी तर अभिनय दाखवण्याची संधी इथेच काय पण मला नाही वाटत इतर मालिकांमध्ये देखील तिला मिळाली असावी. वैष्णवी गेल्यावर एसीपी आणि कंपनीच्या पाठोपाठ फिरणे, घटनास्थळांचे फोटो काढणे आणि एखाद - दुसरा संवाद बोलणे या व्यतिरिक्त तिला काही स्थान राहिले नाही. जसवीर निघून गेल्यावर सध्या जान्हवी छेडा सध्या तिची जागा 
चालवत आहे. तिच्या जोडीला आणखी एक शो पीस आहेच. दोघीही आलटून पालटून आपली उपस्थिती दर्शवित असतात. बाकी यापलीकडे  त्या तरी काय करणार म्हणा ? कारण ; सीआयडी म्हटले की, प्रद्यूमन, दया व अभिजित हे तिघेच प्रथम आठवतात. या तिघांइतकी लोकप्रियता त्या मालिकेत इतर कोणत्याही व्यक्तीरेखेस क्वचितच लाभली असेल. 

        ब्योमकेश बक्षी, करमचंद, टायगर, राजा और रेन्चो, १०० , हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर यांची परंपरा सीआयडीने पुढे चालवली आणि सलग १५ - १६ वर्षे त्यांनी सोनीवर ठाण मांडले. कथेच्या दर्जेला लागलेली उतरती कळा, अभिनेत्यांचा साचेबद्ध व बराचसा भडक अभिनय हे प्रमुख ठळक दोष असूनही इतका प्रदीर्घ काळ मालिका सुरु ठेवणे हे खायचं काम नाही ! 

{ ता. क. :- प्रस्तुत लेख सीआयडी मालिकेपेक्षा  अभिनेत्रींवर सचित्र असा बनवल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलंच ! }

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

संजय म्हणाला …. ( भाग - २ )


              दुपारची वेळ. घड्याळात ४.२० झाले आहेत. लेखनासाठी हाती वही व पेन घेऊन मी बसलोय पण लक्ष गॅलरीकडे आहे. बिल्डींगच्या भोवती झाडं लावलेली असल्याने हिरवळीखेरीज काही दिसत नाही आणि काही बघायचं म्हटलं तर ( नसत्या कल्पना मनात आणू नका !) बेडवरून उठायची आपल्याला इच्छा नाही. ( मुलखाचा आळशी आहेस ! - इति आमच्या सौ. ) सहज चाळा म्हणून टी.व्ही. लावला तर त्याच नीरस बातम्या, बातम्या देणाऱ्यांचे सुतकी चेहरे. गाण्यांचे चॅनेल्स पाहिलं तर अंगावर कपडे न टिकू देण्याची साथ हिंदीपासून मराठी पर्यंत पसरल्याचे दिसून येतंय. बघवत नाही हो हे ! ( असं म्हणायचं असतं. त्यामुळे समाज आपल्याला सभ्य समजतो.) कुठला तरी सिनेमा पहावा म्हटलं तर हल्ली ३ प्रकारचे पिक्चर बघावे लागतात. एक पूर्णतः कौटुंबिक, ज्यांची निर्मिती  बडजात्या कुटुंबाने थांबवली आहे. दुसरे, पूर्णतः प्रौढ. ज्यावर एकेकाळी रामसे ब्रदर्स व भट कॅम्पची एकाधिकारशाही होती. आता हि सर्वत्र पोहोचलेली साथ आहे. तिसरे, दाक्षिणात्य.  जे हिंदीमध्ये डब झाले आहेत. 

                  ' हम साथ - साथ है ' पाहिल्यापासून कौटुंबिक सिनेमा बघायचं आपण तर सोडून दिलं आहे. फार डोक्यात जातात हे असले पिक्चर ! सगळं कसं गोडगोड, छानछान असतं. वास्तवतेपासून कोसो दूर. ' असं कुठं असतं का ?' हा प्रश्न असे पिक्चर बघताना मनात वारंवार येत राहतो. पूर्णतः प्रौढ मुव्ही बघावा तर त्यात बिनडोकपणा अधिक असतो. आता इथे इमरान हाशमी आणि कंपनीची चर्चा होईल अशी अपेक्षा असेल तर ती साफ चुकीची आहे. यामध्ये पार रणवीर कपूरपासून ते शाहरुख खान आणि दीपिका पासून ते सोनाक्षी पर्यंतची नामावली आहे. मारहाण, रडारड आणि सेक्स इ. गोष्टी ठासून भरल्या की असला सिनेमा तयार होतो. बाकी, स्टोरीची गरज यांना तशी फारशी पडतच नाही. अर्थात, याला काही अपवाद आहेत. नाही असे नाही, पण ते म्हणजे दर्या में खसखस ! राहता राहिले दाक्षिणात्य. तर ते वरील दोन्ही सिनेमातील मसाले एकत्र करून त्याला आपला खास ' साऊथ टच ' देत अशी काही सिनेमाची भट्टी बसवतात कि बोलायची बात नाय ! त्यात स्टोरी नावाचा प्रकार बऱ्याचदा नसतो किंवा असला तरी डबिंगमध्ये तो वगळला जात असावा. बाकी, या दाक्षिणात्य सिनेमांचे एक वैशिष्ट्य म्हणजे हिरो वा व्हिलन कितीही हाय - फाय असले तरी लुंगी, कोयते, चॉपर याशिवाय यांची मारामारी कंप्लीट होत नाही ! 

                        आता सिनेमाचा विषय निघालाच आहे तर सध्याच्या चालू ट्रेंड विषयी बोललेचं पाहिजे. जुन्या जमान्यातील सिनेमांचे चाहते व आत्ताचे बरेचसे फिल्म समीक्षक दरवेळी नव्या - जुन्या सिनेमांची तुलना करत सध्याचा सिनेमा कसा रसातळाला जात आहे ( कलात्मक, अभिरुची संपन्न वगैरे दृष्ट्या ! ) ते ठासून सांगतात. पण तसली काही चर्चा इथे होणार नाही. कारण ; इतकाही मी काही जुना नाही. सध्या सिनेमात कमी कपड्यांचा जो ट्रेंड चालू आहे तो सर्वांच्या आवडीचा विषय बनला आहे. तोंडातून लाळ पडेपर्यंत असले सीन्स बघायचे आणि मग चारचौघात बोलताना किंवा लिहिताना यावर नाकं मुरडायची / टीका करायची हा देखील एक ट्रेंड चालू आहे. आता फिल्म मध्ये स्त्री - पुरुषांनी कमी कपडे घालण्याची परंपरा फार जुनी आहे. याला अपवाद असे फार कमी आहेत. पुलंच्या ' विरळा ' शब्दाइतकेचं ! 

                       आपला देशभक्त भारतकुमार उर्फ मनोजकुमारंच घ्या ! त्याचा कलर्स पिक्चरचा जमाना चालू झाल्यावर नट्यांचं अंगप्रत्यांग दाखवण्यात त्याने कधी कुचराई केली का ? मग सिनेमाचा विषय कोणताही असो ! अर्धनग्नता हि श्लील वा अश्लील आहे हा मुख्य प्रश्न नसून तिचे प्रदर्शन कसे केले जाते हा खरा प्रश्न आहे. ज्याला कलात्मक आणि समांतर सिनेमा असे म्हटले जाते -- असे मराठी व हिंदी पिक्चर्स बघा. त्यामध्ये खरोखर गरज म्हणून असे प्रसंग येतात. पण व्यावसायिक सिनेमात तसं नसतं. तिथे गरज असो वा नसो, बोल्ड सीन असलाच पाहिजे ! या बोल्डसीन स्पर्धेत मोठमोठ्या नायक - नायिका व दिग्दर्शकांनी सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने नावं घ्यायची झाली तर कोणाची घ्यावी अन कोणाची नाही हा मोठा प्रश्न आहे. डिंपलने आपली सिनेकारकीर्द गाजवली ती जवळपास याच बळावर. ' रुदाली ' सारखे किंवा ' अंगार ' प्रमाणे चित्रपटही तिने केले. पण ' सागर ' ची इमेज काही विस्मरणात गेली नाही. त्यात भर म्हणून ' जांबाज ' मध्ये फिरोझ खानने ' तबेला नाच ' घालायला भाग पाडले ! ' जांबाज ' च्या आधी मुमताजला घेऊन फिरोझ खानने याआधी असे प्रयोग केले होतेच म्हणा. पुढील काळात त्याला माधुरीची साथ मिळाली. ' दयावान ' हा तसाही आयात केलेल्या कथेवर आधारित सिनेमा होता. त्यात विनोद खन्नाचे भयंकर ' पॉज ' घेत ठोकलेले संवाद ! सिनेमा वाचवायला एक आयटम साँग आणि माधुरी - विनोद खन्नाची त्याला गरज होतीच. ' दयावान ' बहुतेक त्यामुळेच काही प्रमाणात चालला असावा. दीक्षितांच्या माधुरीला ' दयावान तो झांकि है, परिंदा बाकी है ' म्हणायचे होते. तिथेही नाना - जॅकी राहिले बाजूला आणि चर्चा झाली अखेरच्या अनिल - माधुरी दृश्याची ! परिंदा दोन गोष्टींसाठी आठवला जातो. नानाचा विक्षिप्त डॉन आणि अनिल - माधुरीचे अखेरचे दृश्य ! या मळलेल्या वाटेवरून अनेकजण पुढे गेले तर कित्येक मार्ग चुकले तर काही मोजक्यांनाच पुढे ' खरा अभिनय ' दाखवण्याची संधी लाभली.  

                                  ' सेक्स ' किंवा ' शृंगार ' हा तसा नाजूक व कलात्मक विषय. पण हा विषय समर्थपणे मांडणे आधुनिक देशी लेखकांना जमले नाही तर सिनेमावाल्यांना काय जमणार ? याबाबतीत तद्दन फालतुगिरी बघायची तर त्यातल्या त्यात बऱ्या अशा ' रामसे ब्रदर्स ' च्या सो कॉल्ड हॉरर सिनेमात दिसून येते. त्यांचे बव्हंशी चित्रपट भूतांपेक्षा नायिकांवर जास्त चालले. ' वीराना ' मधील जास्मिन कोणाला आठवत नाही ? पण त्याआधीही ती विनोद खन्ना, गिरीश कर्नाड यांच्यासोबत चित्रपटांत झळकल्याचे बऱ्याच जणांना माहिती नाही व ' वीराना ' नंतर कुठे गेली त्याचा पत्ता नाही. रामसेंचे चित्रपट उतरणीला लागेपर्यंत हा ट्रेंड सर्वत्र पोहोचला आणि तीन तासांच्या सिनेमात पहिल्या दीड तासाने ' खरा सिनेमा ' असल्याचा अभिनव शोध लागला ! हा खरा सिनेमा म्हणजे एखादे हॉट आयटम साँग किंवा बोल्ड सीन ! अशा सिनेमांची एक प्रचंड लाट येऊन नुकतीच अस्तास गेली. या मार्गाने चित्रपट चालतो असा तेव्हाच्या सिनेनिर्मात्यांचा ठाम विश्वास होता. पण तो फारच अवास्तव निघाला. कारण, तेव्हाचे नायक - नायिका आता पार विस्मरणात गेले. मराठीमध्ये अभिनय करून कंटाळलेल्या वर्षा, अश्विनी प्रभूतींनी देखील याच वाटेने जायचा प्रयत्न करून परत घरचा रस्ता धरला. नाही म्हणायला कुलकर्ण्यांची ममता या स्पर्धेत काही काळ टिकून राहिली पण अभिनयाचे अंग नसल्याने ' चायना गेट ' झाल्यावर तिने फिल्म लाइन सोडली. ' नरसिंहा ', ' द्रोही ' पासून उर्मिलाने अभिनय दाखवायला  पण त्या जोडीला थोडे देहप्रदर्शन लाभताच ' रंगीला ' नंतर तिने झेप घेतली. पिंजर, कौन, मैने गांधी को नही मारा, तहजीब इ. चित्रपटांमधून तिचा अभिनय प्रकर्षाने उठून दिसला. पण कुठेतरी ' रंगीला ' ची इमेज कायम राहिली ती राहिलीच ! अशी आणखी कित्येक उदाहरणे  देता येतील. यापुढचा टप्पा म्हणजे मल्लिका शेरावत, राखी सावंत यांचा ! एक सिनेमामुळे तर दुसरी सिनेमासोडून इतर कारणांमुळे चर्चेत आलेली तारका !! मल्लिका प्रथम चर्चेत आली ती ' ख्वाहिश ' मुळे. परंतु प्रसिद्धीचे वलय तिला ' मर्डर ' पासून लाभले. आता ' मर्डर ' हि एका इंग्लिश सिनेमाची नक्कल आहे हा भाग वेगळा, पण ओरीजनल सिनेमात जसा अभिनयाला वाव आहे तसा या डूप्लिकेट मध्ये केवळ ' सेक्स ' ला चान्स आहे. जिथे शक्य आहे तिथे तो दिग्दर्शकाने कोंबून भरला आहे. याच मार्गाचे व परंपरेचे पाईक पुढे आले व आजही येत आहेत पण मर्डरची क्रेझ कोणाला लाभली नाही. 

                        याच काळात समलिंगी संबंधांविषयी पण पिक्चर्स आले. त्यापैकी गाजले ते ' फायर ' आणि ' गर्लफ्रेंड '. एक अभिनय व वाद तर दुसरा निव्वळ वादावर ! दोन्ही चित्रपटांना विरोध करण्यास आमचे संस्कृतीरक्षक पुढे सरसावले खरे, पण त्याने फारसा काही फरक पडला नाही. मुळात, अशा प्रकारच्या विषयांवर आधारित सिनेमांची गरज असताना त्यांना विरोध करायचा व ज्यांची खरोखर गरज नाही अशा पिक्चर्सचा मिटक्या मारत आस्वाद घ्यायचा हि आमच्या संस्कृतीरक्षकांची व एकूणच समाजाची वाईट खोड आहे !

                         सिनेमात शृंगार हा भडक वा बीभित्स स्वरूपात दाखवायचा की सौम्य अथवा प्रतीकात्मक स्वरूपात, हा त्या क्षेत्रातील लोकांचा प्रश्न आहे. समाजाचा संबंध येथे केव्हा येतो तर सिनेमा जेव्हा असा सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा ! तत्पूर्वी, हे चित्रपट बनवणारे देखील याच समाजाचे घटक असतात. समाजाला -- लोकांना नेमकं काय हवं आणि काय नको याची गणितं त्यांनी मनाशी बांधलेली असतात. चारचौघात बोलता न येणारा विषय म्हणजे ' सेक्स ' ! एकवेळ तुम्ही कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा, लोकप्रिय पक्षनेत्याचा चारचौघात उद्धार करू शकता, पण या विषयावर खुलेआम बोलायची चोरी. बरे, हि स्थिती सर्वत्र असल्याने वयात येणाऱ्यांची ज्ञानाअभावी वा अपुऱ्या माहितीमुळे होणारी कुचंबणा आणि त्यातून विकसित होणारी त्यांची मानसिकता याचे प्रतिक म्हणजे आजचा सिनेमा. कोणत्याही बोल्ड सीनचा निर्माणकर्ता हा त्या कुचंबलेल्या मानसिकतेतूनच गेलेला असतो आणि त्याचेच प्रत्यंतर अशा दृश्यांमध्ये अनेकदा दिसून येते. साधं उदाहरण आहे. सिनेमातील नायिका वा तत्सम आयटम पात्राच्या एन्ट्रीला तिच्या देहावरून कॅमेऱ्याची नजर जितकी फिरते तितकी, प्रत्यक्षातील वासूनाक्यांची देखील फिरत नाही ! 

                  ' काम ' विषयावर वात्स्यायन लिहून गेला असं आम्ही जगाला मोठ्या अभिमानाने ओरडून सांगतो, मग तो वात्स्यायन घराघरांमध्ये योग्यवेळी मुलांच्या हाती का दिला जात नाही ? योग्य वेळी, योग्य वयात मुलांच्या हाती अनुरूप असे साहित्य देण्याची मुळात पालकांची जबाबदारी आहे. पण पालकांची वाढच जर कुचंबलेल्या परिस्थितीत झाली असेल तर ते तरी काय करणार ?  अशा वेळी चोरून - मारून मिळवलेल्या ज्ञानावर आणि ' पिवळ्या पुस्तकांवर ' मुलं ज्ञान मिळवून नको त्या मार्गाकडे वळतात. बरं, हि अश्लील म्हणवली जाणारी पुस्तके किंवा कथांचे संग्रह तरी काय दर्जाचे असतात ? ज्या नातेसंबंधांना आज निषिद्ध मानले गेले आहे त्याच नातेसंबंधांवर आधारित कथांचा यात मारा असतो. बापाचा मुलीवर किंवा भावाचा बहिणीवर बलात्कार अशा बातम्या ८ - १५ दिवसांतून क्वचित वाचनात येतात. पण यावर आधारित साहित्य रस्त्या रस्त्यांवर पडलेलं आहे त्याचं काय ? या साहित्याचा एक फार मोठा वाचकवर्गही आहे. अगदी इंटरनेट देखील याला आता अपवाद राहिलं नाही. सुदैवाने, या विषयांवर अजून सिनेमा काढायची कोणाला ' सुबुद्धी ' झाली नाही. पण याचा अर्थ असा नाही की, असे पिक्चर्स येणारचं नाहीत. इतर देशांमध्ये या कथासूत्रांवर आधारित चित्रपट येऊन गेले आहेत. अजून आपल्याकडे त्याची लागण झाली नाही इतकेचं समाधान ! 

                       पोर्नोमूव्ही किंवा ब्लू फिल्म हा एक आपला अत्यंत आवडीचा पण चारचौघात न बोलण्यासारखा विषय ! आज या महाराष्ट्रात देवदर्शन न घेणारा व अजिबात ब्लू फिल्म न पाहिलेला मनुष्य सापडणे दुर्मिळ आहे. पूर्वी लोकं दुसऱ्यांच्या चोरून बघायचे, कारण आपल्याकडे बनायच्या नाहीत. आता स्वतःच्याच बनवून किंवा चोरून तयार करून इंटरनेटच्या माध्यमातून जगभर प्रसारित केल्या जात आहेत. आपल्याकडे हा व्यवसाय करण्यास कायद्याने बंदी आहे पण, परदेशात बहुतेक यास राजमान्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे विदेशी मालाची आयात जोरात चालू आहे. विदेशातील आधीच्या पोर्नोमूव्ही पाहिल्या तर त्या अतिशय भयंकर, बीभित्स आणि ओबडधोबड अशाच होत्या पण आता त्या कमालीच्या सौम्य व यांत्रिक बनल्या आहेत. देश - विदेशांतील कामशास्त्रांतील आसनांचे प्रात्याक्षिक करून दाखवणे एवढेच आता त्यांचे कार्य राहिले आहे. आपल्याकडे सनी लिओन आली तेव्हा ब्लू फिल्मची चर्चा जोरजोरात सुरु झाली आणि थंडावली देखील. बरं, या चर्चेत सहभाग घेण्याची आतुरता का तर ती भारतीय वंशाची आहे म्हणून ! ती भारतात येण्याआधी ' भक्त प्रल्हाद ' ( ब्लू फिल्मचा देशी फुल फॉर्म ! ) च्या प्रेक्षकांनाच तिची माहिती होती. आणि तिच्या सिनेमांचा खपही मर्यादित होता. पण ती जेव्हा भारतात आली तेव्हा मात्र तिची प्रसिद्धी आणि तिच्या सिनेमांचा खप या दोन्हीत वाढ झाली. हे कशाचे प्रतीक आहे ? 

                   काळ बदलतो. तशी संस्कृती व तिची मूल्येही बदलली जातात. किंबहुना, बदल हि काळाची गरजच आहे. त्यामुळे हा बदल आपल्याला पचेल व जमेल इतपत घडवून आणणं गरजेचं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा प्रगत देश आपल्यापुढे कमीत कमी पन्नास वर्ष होते. जोवर संपर्कमाध्यमं मर्यादित होती तोवर जग मोठं होतं. पण आता मुंबईत बसून अमेरिकेतील नातलगाशी व्हिडीओ चॅट करावे इतकं छोटं झालं आहे. त्यामुळे हा ५० वर्षांचा गॅप भरून काढताना आपली बरीच दमछाक होत आहे. आर्थिक सुरक्षितता मिळवण्याच्या नादात सांस्कृतिक संवर्धनाला आपण विसरत चाललो आहोत. काळाच्या सोबत धावण्याच्या फंदात आता सर्व नीतीमूल्यं पायदळी तुडवायचे चालले आहेत. जुनं ओल्ड फॅशन असल्याने चारचौघात मिरवता येत नाही आणि नवं पचायला जड असल्याने स्वीकारता येत नाही अशी आपली गत आहे. अर्थात, यातून मार्ग काढला पाहिजे वगैरे फालतू विधानं मी करणार नाही. कारण ; गरज हि शोधाची जननी असते, पण नेमकी गरज कशाची हा प्रश्न पडण्याची देखील तितकीच आवश्यकता असते !    

                      

मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

संजय म्हणाला … ( भाग - १ )

  
           गेल्या दोन रात्री झोप नसल्याने डोळे तारवाटले आहेत. बाजूला बोकिलांच्या मिलिंदची ' शाळा ' पडली आहे. वाचायला आधी मजा वाटली पण ज्याने भाऊ पाध्यांची ' वासूनाका ' वाचली आहे त्याला ' शाळा '  काय आवडणार ? तसंही शाळेचं लेखन दोघांनी केलं आहे असं वाचताना सारखं वाटतंय. संवाद लिहिणारा मिलिंद वेगळा -- जो खरोखर ८ वी, ९ वी चे प्रतिनिधित्व करतोय तर प्रसंगांची वर्णने लिहिणारे बोकील वेगळे ! सुरवातीला मौज वाटली खरी, पण पुढेपुढे काही मजा येईनाशी झाली. बहुतेक जड अभ्यासाचा आणि इतिहासातील सवयीचा गड़े मुर्दे उखडण्याच्या सवयीचा हा परिणाम असावा. टाईमपास म्हणून फेसबुक ओपन केलं तर तिथंही शांतता ! जिवंतपणा काहीच नाही. तेच तेच फालतू वाद आणि चर्चा. बाकी, मी लिहितो त्यात तरी वेगळं काय असतं म्हणा ! शाळा - कॉलेज सुटल्यानंतर इतकं कंटाळवाणं कधी वाटलं नव्हतं. सकाळपासून काहीतरी लिहावं असं वाटतंय पण काय लिहायचं ? इतिहासावर काथ्याकुट करायचा मूड नाही. हलकं - फुलकं लिहिणं काय असतं ते आपल्याला माहिती नाही. बरं, दुसऱ्यांनी लिहिलेलं वाचावं तर, ' हा कोण आपल्यापेक्षा मोठा शहाणा आहे ' हा विचार लगेच मनात येतो.  हे झालं हयात लेखकांविषयी. हयात नसणाऱ्यांसाठी आपल्या मनात मात्र आदराची भावना आहे खरी, पण बव्हंशी अत्रे - देशपांडे आणि मिरासदार यांचे साहित्य गेली  १० - १५ वर्षे वाचून पचवत आहे त्यामुळे तसंही विनोदी असे वाचायचे काही बाकी राहिलंय असे वाटत नाही. 

                  भुताटकीच्या कथा वाचायच्या तर नारायण धारपांशिवाय पर्याय नाही आणि त्याही मी अधाशासारख्या बव्हंशी वाचून काढल्या आहेत. दुसरे आपले रत्नाकर मतकरी, त्यांचेही काही कथासंग्रह वाचलेत पण त्यांच्या कथांचा जो एक ठरलेला साचा आहे तो लक्षात आल्याने त्यांच्या कथा वाचण्यात काही मजा वाटत नाही. राहता राहिल्या थरार कादंबऱ्या, तर त्यासाठी बाबा कदम आहेतच, पण त्यांचीही एक ठराविक शैली ! दुसरे आपले संजय सोनवणी साहेब आहेत खरे, पण त्यांच्या कादंबऱ्या सुरु कधी होतात आणि कधी संपतात तेच समजत नाही. या माणसाला विलक्षण घाई ! बरं, साहेबांनी व्यावसायिक लेखनाला आरंभ केला तो वृत्तपत्रकार म्हणून. त्यामुळे जे काही लिहायचं ते नेमक्या आणि मोजक्या शब्दांत. त्यामुळं होतं काय, जी कथा चारशे पानांत रंगवून सांगता येईल ती डोक्यावरून पाणी म्हणजे ( हा त्यांचा आवडता शब्द की वाक्यप्रयोग, काय असेल ते ! ) दीड - दोनशे पानांत संपवून गडी मोकळा !

            बाकी, प्रणयकथा ( रोमान्स वगैरे फालतू शब्द वापरायचा नाय ! ) वाचण्यासाठी चंद्रकांत काकोडकर दोन पिढ्यांना पुरून उरलेत. त्यांच्या आधी ना. सी. फडके होते म्हणतात. तेव्हा आंबटशौकीन वृत्तीने त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या.  त्या वाचल्यावर सत्यनारायणाची कथा वाचल्याप्रमाणे वाटले. कसलं प्रेम आणि कसला प्रणय ! बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, अशी बोलाची पण मोलाची म्हण फडक्यांच्या बाबतीत चपखल बसते. 

                            म. गांधी, आचार्य अत्रे, शंकरराव खरात इ. थोर पुरुषांची आत्मचरित्रे तर आंबेडकर, सावरकर, स्वामी विवेकानंद, हिटलर पासून ते थेट शहाजी - शिवाजी - संभाजी, बापू गोखले, नेपोलियन बोनापार्ट पर्यंतच्या ऐतिहासिक पुरुषांची चरित्रे वाचून झाली. एवढी पुस्तकांची पाने खाऊन आणि चरित्रे - आत्मचरित्रे वाचून झाल्यावर देखील ना मला स्वतःमध्ये थोर महापुरुषांचे गुण असल्याचा साक्षात्कार झाला ना मला त्यांच्याकडून काही शिकता आले. व्यर्थ गेले जीवन ……. त्यांचे,  माझे नव्हे ! 

                वर ज्यांची नावं दिली ती झाली शहरी संस्कृतीची पुस्तकं. आता थोडं ग्रामीण …. सॉरी, गावरान भाषेतील कथा - कादंबऱ्यांचा पन उल्लेख झाला पायजे. त्या आंगानं बघायचं म्हंजी आपल्या शंकर पाटलांना तोड न्हाय. त्येंची बरीच पुस्तकं वाचली पन ' धिंड ' आणि ' ताजमहालात सरपंच ' अरारा … ! बोलायचं काम न्हाय !! यकदम जबराट. तुम्हांला म्हनून सांगतो, त्येंची ' ताजमहालात सरपंच ' वाचली आनि कवाच्या काळातील आशा पारेख लय दिखनी दिसाया लागली. त्याशिवाय त्येंची ' टारफुला ' म्हंजी टाप … ! इत्की भारी आन फाष्ट कादंबरी आपन दुसरी नाय वाचली. शंकर पाटलांच्या जोडीला आणखी एक पाटील गडी तयार आहेच, व तो म्हणजे विश्वास पाटील ! या पाटलांची ' झाडाझडती ' एक जबरदस्त कादंबरी. त्याबद्दल काहीही बोलायचं आपल्याला शक्य नाही. त्यांच्या सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या एका बाजूला आणि ' झाडाझडती ' दुसऱ्या बाजूला असे माझे स्पष्ट मत आहे. आनंद यादवांची ' झोंबी ' तर शालेय जीवनापासून खुणावत होती. लायब्ररी लावल्यावर प्रथम तिचा फडशा पाडला. त्यानंतर त्यांची इतरही पुस्तकं वाचली पण झोंबीची मजा त्यात नाही ! तसं पाहिलं तर माझ्या जन्मगावचे --- म्हणजे आजोळचे दोन लेखक जगप्रसिद्ध आहेत. त्यांपैकी एक म्हणजे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार आणि दुसरे ग्रामीण कथाकार व दलित साहित्यिक वामन होवाळ ! गाववाला असूनही पवारांनी लिहिलेली एक ओळ देखील अजून मी वाचली नाही तर होवाळांचे दोन - तीन कथासंग्रह वाचून झाले आहेत. पवारांचा संभाजी आणि संताजी वाचायची जाम इच्छा होती पण ते काही मला वाचायला मिळालेचं नाही. होवाळांचे कथासंग्रह मिळाले, पण कथांमधील काळ माझ्या जन्माआधीचा असल्याने त्या कथांमधील ग्रामीण परिस्थिती आणि  स्थिती यांत जमीन - अस्मानचा फरक असल्याचे लक्षात आले. त्यानंतरही दलित साहित्य वाचले. नाही असे नाही. परंतु ; एकाच वळणाच्या आणि धाटणीच्या कथा व वास्तवातील वेगळी परिस्थिती यांचा मेळ न बसल्याने त्यातला आपला इंटरेस्ट उडाला. 
           
                  हा सर्व साहित्यप्रकार वाचताना आध्यात्म कसे बरे बाजूला राहील ? तेथेही चारी वेद, भागवत पुराण पासून थेट मनुस्मृती ! भरीस भर म्हणून कुराण व बायबल. त्यानेही पोट भरलं नाही म्हणून शरियत आणि हदीस. त्याशिवाय बुद्ध व त्याचा धम्म आहेचं ! आता एवढं सर्व खाऊन झाल्यावर अजीर्ण ते व्हायचंच. मग त्यावर उतारा म्हणून तत्वज्ञानाचा मार्ग स्वीकारला. 

             तिकडे दोन वस्ताद भेटले. एक व. पु. काळे व दुसरे संजय सोनवणी. वपुंचे ' वपुर्झा ' वाचा. इतका भारी आधुनिक काळातील तत्ववेत्ता दुसरा कोणी नसेल. पुस्तकातील कोणतंही पान केव्हाही उघडून वाचू शकता. अशी सोय दुसऱ्या कोणत्याही लेखकाच्या पुस्तकात नसावी. दुसरे तत्वज्ञ म्हणजे संजय सोनवणी. यांचे ' ब्रम्ह्सुत्र रहस्य ' वाचल्यावर अर्धी भगवद्गीता वाचल्यासारखे वाटते आणि आपण सोडून बाकी सर्व जग मिथ्या असल्याचा साक्षात्कार होतो. अगदी शब्दसुद्धा ! बाकी काही का असेना, एका बाबतीत माझे आणि सोनवणींचे विचार जुळतात व ते म्हणजे आपण सोडून सर्व जग भ्रम आहे, मिथ्या आहे. त्यामुळेचं मी जे काही लिहितो, ते मिथ्या असल्याने लोकांचा काहीही समज होवो, तो भ्रमचं आहे असे मी मानतो. तर सोनवणींच्या लेखांवर जेव्हा टीका होते तेव्हा हा सर्व भ्रम आहे, माया आहे, मिथ्या आहे असे समजून ते आपले कार्य पुढे चालू ठेवतात. आता लोकं म्हणतील, हे गुरु - शिष्य मोठे चालू आहेत, तर म्हणू द्या. कारण ते मिथ्या आहे !