काल संध्याकाळी ४ पासून रात्री ८ वाजेपर्यंत सलग चार तास सोनीवर CID नावाची मालिका पाहण्यात खर्ची पडले. या ४ तासांत दुसरे काही टाईमपास नव्हते. टीव्हीवर देखील दुसरे काही लागले नाही. मग करणार काय ? मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे ' आप ' चा ' बाप ' बनल्याचे व त्यांनी मोदींवर टीका केल्याने न्यूजवाल्यांना तोंडी लावायला एक विषय मिळाला. पण या फालतू चर्चेत आपल्याला काही रस नाही. नाहीतरी सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण राष्ट्रवादी सर्वेसर्वा श्री. शरद पवार चालवत आहेत हे महायुतीच्या बातम्यांवरून आणि जितेंद्र आव्हाडांच्या मुलाखतींवरून स्पष्ट होत आहेच. बाकी, देशाचे राजकारण इशाऱ्यावर चालते याचा अजून उलगडा झाला नाही. तर काय विषय होता बरं, हां … CID नावाची मालिका ! जवळपास १६ वर्षे शिवाजी साटम व त्यांची टीम टेलिव्हिजन मधील गुन्हेगारांचा सफाया यशस्वीपणे करत आली आहे. या १६ वर्षांत त्यांचे ऑफिसर्स मारले गेले तर कित्येक फोरेन्सिक लॅब डॉक्टर्सच्या बदल्या झाल्या. ( मोना आंबेगावकर आणि तिच्यानंतरची श्वेता कवात्रा बरी होती !) गेली १६ वर्षे एसीपी प्रद्युमन यशस्वीपणे सोडवतोय आणि बव्हंशी केसेस मी नित्यनेमाने पाहतोय व पाहिल्यावर ' हि मालिका मी का पाहतो ? ' हा प्रश्न स्वतःला विचारतोय. सुरवातीला या सिरियलमध्ये नक्कीच काहीतरी दम होता. पण जसंजसं ती सोनीवर स्थिरावली तसतशी यात बरीच ढिलाई आली. अलीकडच्या काही वर्षांत तर यांच्या कथा इतक्या फालतू असतात कि, अशा कथेवर १ किंवा २ तासांची मालिका बनवणाऱ्या व त्यात भाग घेणाऱ्या सर्व टीमचा जाहीर सत्कार करण्याची इच्छा वारंवार मनात येते.
CID चा विषय निघाला आहे तर त्यातील ललनांचा ( का ? ललना हा शब्द फक्त बॉन्डच्यासाठीच राखीव आहे का ? याबाबतीत स्वदेशी बाणा टिळक - गांधींपेक्षाही अधिक जाज्वल्य आहे !) CID ला जेव्हा चांगल्या कथांचा बेस होता तेव्हा अश्विनी कळसेकरकडे लक्ष जात नव्हते हे मान्य करावेच लागेल.
सीआयडी मधून अश्विनीची एक्झिट झाली आणि त्यांच्या कथांच्या दर्जालाही उतरती कळा लागली. अश्विनी नंतर स्मिता बन्सल आली.
काही काळ तिच्यामुळे CID सुसह्य झाली खरी पण लवकरचं तिची गच्छंती होऊन मग एकापाठोपाठ ' युवतीसम ' चेहरे सीआयडीत दिसू लागले. त्या गर्दीत अलका वर्मा थोडा भाव खाऊन गेली. अलका वर्मानंतर कविता कौशिकच आगमन झालं.
दरम्यान, सीआयडीच्या फोरेन्सिक लॅबमध्येही चेंज होत गेले. मोना आंबेगावकर बराच काळ डॉक्टरकी करून थकली व श्वेता कवात्रा उगवली. दरम्यान किती आले आणि किती गेले गणती नाही !
परंतु श्वेता फार काळ राहिली नाही. तिच्यानंतर डॉक्टर साळुंखे आणि तारिका हे दोन स्टार्स उदयाला आले, ते आजतागायत तळ ठोकून राहिले. इकडे श्वेता सोबत कविता पण गेली आणि वैष्णवी धनराजने काही काळ सीआयडीची लेडीज ऑफिसर अशी भूमिका निभावली. अश्विनी ते वैष्णवी या दीर्घ प्रवासात सीआयडीमधील अभिनय देखील उतरणीला
लागला.
एसीपी प्रद्युमन संवादांपेक्षा डोळे व हात निरर्थक हलवू लागला. फ्रेडी एकाहून एक बालिश जोक्स व ओव्हर रिएक्शन करून निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. आरंभीचा फ्रेडी असा नव्हता. अभिजित हा मध्येच विस्मरणात गेलेल्या आठवणी, एसीपीशी प्रसंगी विरोध पत्करणे आणि ठराविक साचेबद्ध शैलीत संवाद बोलणे यात गुरफटू लागला. दरवाजे तोडण्याचे कार्य दया आजही नित्यनेमाने करत आहे. हल्ली दरवाजांची जाडी देखील पातळ होत आहे हि बाब वेगळी ! तसेच दाराला कुलूप असले तरी कुलपासकट दार मोडणारा पैलवान अशी त्याची इमेज आता बनली आहे. यांच्या जोडीला विवेकच अस्तित्व काहीसं सुसह्य होत होतं. कमीत कमी त्याच्या एक्शन आणि एक्टिंगमध्ये साचेबद्धपणा नव्हता. सीआयडीची हि मुख्य टीम बनत असताना त्यांच्यातील लेडीज ऑफिसर्सच्या भूमिका करणाऱ्यांची सिरीयल मधील उपस्थिती फक्त ' शो पीस ' म्हणून बनून राहिली. अश्विनी व स्मिताचा अपवाद केला तर !
वैष्णवी धनराज याच मालिकेतून खरी पुढे आली आणि इतर चॅनेल्सच्या मालिकांच्या ऑफर आल्यावर तिची रितसर ' पाठवणी ' झाली. वैष्णवीची एक्झिट होण्याआधी जसवीर कौर या चमूत दाखल झाली.
जसवीरच्या अभिनय क्षमतेची या ठिकाणी चर्चा करावी तर अभिनय दाखवण्याची संधी इथेच काय पण मला नाही वाटत इतर मालिकांमध्ये देखील तिला मिळाली असावी. वैष्णवी गेल्यावर एसीपी आणि कंपनीच्या पाठोपाठ फिरणे, घटनास्थळांचे फोटो काढणे आणि एखाद - दुसरा संवाद बोलणे या व्यतिरिक्त तिला काही स्थान राहिले नाही. जसवीर निघून गेल्यावर सध्या जान्हवी छेडा सध्या तिची जागा
चालवत आहे. तिच्या जोडीला आणखी एक शो पीस आहेच. दोघीही आलटून पालटून आपली उपस्थिती दर्शवित असतात. बाकी यापलीकडे त्या तरी काय करणार म्हणा ? कारण ; सीआयडी म्हटले की, प्रद्यूमन, दया व अभिजित हे तिघेच प्रथम आठवतात. या तिघांइतकी लोकप्रियता त्या मालिकेत इतर कोणत्याही व्यक्तीरेखेस क्वचितच लाभली असेल.
ब्योमकेश बक्षी, करमचंद, टायगर, राजा और रेन्चो, १०० , हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर यांची परंपरा सीआयडीने पुढे चालवली आणि सलग १५ - १६ वर्षे त्यांनी सोनीवर ठाण मांडले. कथेच्या दर्जेला लागलेली उतरती कळा, अभिनेत्यांचा साचेबद्ध व बराचसा भडक अभिनय हे प्रमुख ठळक दोष असूनही इतका प्रदीर्घ काळ मालिका सुरु ठेवणे हे खायचं काम नाही !
{ ता. क. :- प्रस्तुत लेख सीआयडी मालिकेपेक्षा अभिनेत्रींवर सचित्र असा बनवल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलंच ! }
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा