गफलत

                                             







क्षणकथा किंवा टाईममशिनच्या सहाय्याने अथवा इतर मार्गांनी वर्तमानातून भूत – भविष्यकाळात नेणाऱ्या कथा तुमच्या परिचयाच्या आहेतच. अशाच कथा लेखनाचा एक प्रयोग !




    सांयकाळचा समय. चार ते पाचच्या दरम्यानची वेळ. हातातील पुस्तकाच्या वाचनावर आता लक्ष बिलकुल केंद्रित होत नाही. अक्षरांवरून नजर फिरतेय पण अर्थ लक्षात येत नाही. उलट डोळे मात्र विलक्षण थकल्यासारखे वाटतायत. पुस्तक मिटवून मी बेडवर झोपलो.
    
    घंटेचा बारीक पण गोडसर आवाज कानी पडतोय. हळूहळू एका लयीत वाजणाऱ्या व आवाजाची तीव्रता वाढत जाणाऱ्या त्या घंटानादाने मला जाग येते. मी उठून बसलोय तर रुममध्ये अंधार. बहुतेक उठायला उशीर झाला असे मनाशी म्हणत मी शेजारच्या टेबलावरील नाईट लॅम्प लावण्याचा प्रयत्न करतोय पण शेजारी टेबलच नाही. एकतर डोळ्यांत रेंगाळणारी झोप व अंधारी खोली आणि त्यात बेडशेजारचा नाईट लॅम्पचा टेबल जाग्यावर नसणे. यांमुळे मी अगदीच चिडलोय. ज्या मोबाईलच्या अलार्मने मी उठलो तो हाती घेऊन त्याच्या उजेडात लाईटचे बटन शोधण्याचा प्रयत्न करतोय. नेहमीचा मोबाईल आज आकाराने लहान वाटतोय पण कदाचित अर्धवट जागृतावस्थेत असल्याने होणारा भास म्हणून त्याकडे माझं दुर्लक्ष. मोबाईलच्या मंद प्रकाशात लाईटचा स्वीच बोर्ड काही सापडेना. नेहमीच्या भिंतीही अपरिचित झाल्या कि काय ? पण आता काही शोधण्याचा मला मुळीच उत्साह नाही. मी परत बेडवर जाऊन उरलेली झोप पुरी करण्याचा प्रयत्न करतो. 

    ‘ ट्रिंग ... ट्रिंग ! ट्रिंग .... ट्रिंग !! ‘ फोनच्या बेलने परत माझी झोप चाळवली. डोळे चोळत मी उठलो. पाहतो तर चक्क दुपार ! थोडं आश्चर्य जरूर आहे पण विचार करायला सवड नाही. फोनची घंटा वाजतच आहे. फोन घेण्यासाठी मी बेडवरून उठु लागलो. हालचालीत बराच थकवा जाणवतोय. बाहेरच्या हॉलमधील फोन उचलेपर्यंत कट होण्याची भीती असल्याने शक्य तितक्या गडबडीत मी उठून उभा राहतो व वेगाने बाहेरच्या हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो अन् कशालातरी ठेचकाळून खाली पडतो. वेदनांचा कल्लोळ दुखऱ्या भागात जाणवत असला तरी फोनची घंटा त्याकडे लक्ष पुरवू देत नाही. धडपडत उठण्याच्या प्रयत्नात सहज माझी नजर समोरच्या भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे जाते. भिंतीवर वयस्कर स्त्रीचा फोटो. का कोणास ठाऊक चेहरा बघितल्यासारखा. फोनची घंटा खुणवत असूनही मी तिथेच रेंगाळतो. आणि निरखून चेहरा पाहू लागतो. क्षण – दोन क्षणांतच ओळख पटते. बायकोच ती ! पण तिचा उतरत्या वयातील फोटो ? आश्चर्याचा धक्का ओसरेपर्यंत खालील ओळींवर माझी नजर स्थिरावते. तिथे जन्मतारखे सोबत मृत्यूदिनाचीही नोंद केलेली असते. फोनची घंटा वाजतच राहते ..... !      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा