रविवार, २३ जुलै, २०२३

कथा - २

                                   ( १ )

' शी बाई ! किती वेळ झाला आपण भेंडी चिरतोय पण एक भेंडी कापून झाली असेल तर शपथ ! ' सीमा स्वतःशीच म्हणाली व क्षणात तिला आठवण झाली. 

' दुपारी बघितलेल्या पिक्चरमध्ये ती बाई कशी धारदार मोठ्या सुऱ्याने नवऱ्याच्या प्रेताचे तुकडे करत होती.. अगदी तसलाच आपल्याकडे असायला हवा होता. यांना किती वेळा सांगितलं तरी लक्षचं देत नाहीत. किती दिवस ही धार गेलेली लहानशी सुरी आपण वापरायची ? त्यापेक्षा असं करूया का ? आज आपणच बाहेर जाऊन हवी तशी सुरी घेऊन येऊ. आणि मग नव्या सुरीने चिरलेल्या भाज्यांची मस्त मेजवानी यांना देऊ. '

 विचार मनात येताच  सीमा उठली. आरशासमोर जाऊन उभी राहिली. ' छे ! हा आपला असा अवतार. सगळं अंग घामानं आंबलेलं चिंबलेलं. प्रथम अंघोळ केली पाहिजे न् मग चांगली साडी नेसून जाऊ. ' असे स्वतःशीच म्हणत ती बाथरुमात गेली. 

दिवस उन्हाळ्याचे असल्याने अगदीच गार नसलं तरी त्यातल्यात्यात थंड पाण्याच्या चांगल्या दोन बादल्या तिने अंगावर ओतून घेतल्या तेव्हा कुठं बरं वाटलं. 
कपाट उघडून तिने एक चांगली साडी काढून नेसली. केस नीट केले. हलकीशी पावडर तोंडाला लावली व पर्समध्ये पैसे टाकून ती घरातून बाहेर पडली.

सीमा राहत होती त्या बिल्डिंगपासून अवघ्या पाच मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर मार्केट होतं. तिथल्या एका भांड्याच्या दुकानात जाऊन तिने वेगवेगळ्या साईजच्या तीन धारदार सुऱ्या पसंत केल्या व थोडी घासाघीस करून विकत घेतल्या. 

सुऱ्या विकत घेतल्यावर थोडं बाजारात इकडं तिकडं फिरून, फास्ट फूडचा आस्वाद घेऊन संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास सीमा घरी परतली. 
जिन्यात मिसेस परबनी तिला थोडा वेळ अडवली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत हळूच ' आजकाल सीमाचा पती दारू पिऊन जास्तच दंगा करतो ' याविषयी टोमणाही मारून घेतला. प्रत्युत्तरादाखल एक स्मितहास्य करून सीमा तिथून निघाली.

घरी परतल्यावर सीमाने कपडे बदलले. घड्याळात पाहिलं तर आठ वाजले होते. ' आता हे कधीही येतील न् येताच अजून जेवण कसं झालं नाही म्हणून ओरडतील. सीमा बाई.. आज तुमची काही खैर नाही. ' असं स्वतःशी पुटपुटत ती स्वयंपाकाला लागली.

                                    ( २ )

सकाळी आठ नऊच्या सुमारास दोन अँब्युलन्स, एक पोलिस जीप सायरन वाजवतच बिल्डिंगच्या कंपाउंडमध्ये शिरल्या. इमारतीच्या प्रवेशद्वारी बघ्यांची ही मोठी गर्दी जमलेली. त्यातून वाट काढत दोन स्ट्रेचर घेऊन चार सहा जण वर गेले. पाठोपाठ पोलिस पार्टीही गेली. साधारण तासा दोन तासानं एक स्ट्रेचर खाली आलं. ते पूर्णतः झाकलेलं होतं. अँब्युलन्समध्ये टाकून ते पुढं पाठवण्यात आलं. जो तो, त्या अँब्युलन्सकडे बघून आपापले तर्क कुतर्क लढवत होता. एकमेकांच्या कानांत कुजबुजत होता. थोड्या वेळाने आणखी एक स्ट्रेचर खाली आणण्यात आलं. त्यावर झोपलेल्या सीमाला पाहून प्रत्येकाच्या मनात दया, कणव, करुणा, हळहळ याच भावना उमटल्या. सीमाला घेऊन अँब्युलन्स निघून गेली. 
त्यानंतर मग गर्दीला कसलंही स्वारस्य उरलं नाही. प्रत्येकजण आपापल्या घराकडे परतू लागला. ' हो ! पोलिसांनी साक्षी - जबानीसाठी पकडलं तर काय घ्या !! '
शेजाऱ्यांचे रीतसर जबाब घेऊन, सर्व सोपस्कार उरकून पोलिसही आल्यामार्गे निघून गेले.

                                  ( ३ )

स्टेशन डायरीत आजच्या तारखेला नोंद करण्यात आली.
व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून, पत्नीकडून पतीची निर्घृण हत्या. शरीराचे तुकडे केले. घरातून दुर्गंधी येत असल्याची शेजाऱ्यांनी तक्रार केल्याने प्रकरण उघडकीस. पत्नीचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडल्याने तिची मनोरुग्णालयात रवानगी. अधिक तपास सुरू आहे.

                                                              ( समाप्त )

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

कथा

                                  ( १ )

" जलालाबादेहून संदेश आला आहे. "

".. .. "

" त्यांना आपली योजना मंजूर आहे. "

" … .. "

" .. पण एक शंका आहे. "

" .. .. "

" तो जायला तयार होईल का ? "

" त्याच्यासमोर दुसरा पर्याय आहे ! "

" मग कधीचा मुहूर्त धरायचा ? "

" आज सोमवारी.. येत्या शुक्रवारी तो तिथं गेला पाहिजे. सरप्राईज व्हिजिटि यापलीकडे त्याला या भेटीबाबत कसलाही तपशील देऊ नका. "

" परंतु तिथे गेल्यावर.. "

" मग तुम्ही कशाला आहात ? "

" .. .. "

" घाबरलात ? "

" तसं नाही गुरुजी.. पण एकदम अचानक असं.. "

" इतिहास घडवण्याची जबाबदारी सांगून सवरून नाही, तर अनपेक्षितपणेच खांद्यावर पडते दामले. तेव्हा जास्तीची चिंता सोडा. आपला धर्म, समाज यांच्याकरता या महत्कृत्यास तयार व्हा. .. या आता ! "


                               ( २ )

" रसूल.. "

" जी मौलवी साब.. "

" तो मुहाजिर तयार आहे का ? "

" कौन, जनरल साब.. "

" हां, तोच तो कंबख्त.. "

" जी, त्यांची पूर्ण तयारी झाली आहे. "

" कारगिलला पण झाली होती ना ! "

" जनाब … "

" तू काही पण म्हण.. पण आमचा या मुहाजिरांवर बिलकुल भरोसा नाही. शेवटी कितीही झाले तरी हिंदुस्थानी ते हिंदुस्थानीच ! आमच्या सारख्या खानदानी मुसलमिनांची सर त्यांना थोडीच येणार !! "

" .. .. "

" खैर, वो जाने दो. त्या मुहाजिरला सांग. जुम्म्याच्या दिवशी तयार रहा. आमचा निरोप मिळताच थेट इस्लामाबादेत त्याने जायचं व आमच्या पुढील संदेशाची वाट बघायची. समजलं ? "

" जी, मौलवी साब. "

" आणी एक.. यावेळी त्याच्यासोबत सईद मिर्झाला राहायला सांग. त्या काफरवर आमचा बिलकुल भरवसा नाही. "

" जनाब… मुहाजिर ठीक आहे, पण जनरल साहेबांना काफर.. .. "

" काफिर नाही तर काय ! कधी त्याने नमाज पढल्याचं, कुराणची तिलावत केल्याचं ऐकलं.. पाहिलं आहेस ? "

" .. .. "

" नाही ना ! केवळ इस्लाम स्वीकारल्याने कोणी मुसलमान होत नसतं. इस्लाम रक्तातही भिनवावा लागतो ! " 


                               ( ३ )

इस्लामाबादेतील वातावरण तंग होतं. खुद्द पंतप्रधान लागोपाठ येणाऱ्या बातम्यांनी कमालीचे अस्वस्थ झाले होते. कसल्याही पूर्वसूचनेशिवाय भारतीय पंतप्रधानांचा हवाई काफ़िला पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाला होता. इतकेच नव्हे तर इस्लामाबाद एअरपोर्टवर उतरण्यासाठी ते परवानगी मागत होते. त्याचवेळेस पाकिस्तान सैन्यातील बव्हंशी वरिष्ठ सैन्याधिकारी राजधानीत दाखल होत असल्याचा वार्ता येत होत्या. 

पाकिस्तानात तख्ताबदल किंवा लष्करी अधिकाऱ्यांचा बंडावा नवीन नव्हता. परंतु एकाचवेळी अचानक घडून आलेल्या या दोन घटनांमध्ये कसलाही परस्पर संबंध नसून निव्वळ योगायोग असावा यावर पाकिस्तानी पंतप्रधानांचे सावध मन अजिबात विश्वास ठेवायला तयार नव्हते. 


" याकूब.. "

" जनाब.. "

" इस्लामाबाद एअरपोर्ट रिकामं करून तिथे भारतीय प्राईम मिनिस्टरच्या विमानाला उतरण्याची परमिशन द्या. त्यांच्या स्वागताला परराष्ट्रमंत्री जातील व त्यांची आमची भेट आमच्या निवासस्थानी घडून येईल. "

" जनाब.. "

" रियाजला सांगून राजधानीत गोळा होणाऱ्या मिलिटरी ऑफिसर्सना ताबडतोब राजधानीतून बाहेर पाठवण्याची व्यवस्था करा. "

" पण ते स्वेच्छेने जाण्यास तयार झाले नाहीत तर… "

" तर अरेस्ट करा. याक्षणी आम्हांला राजधानीत कसलाही गोंधळ नकोय. इंडियन प्राईम मिनिस्टरच्या सरप्राईज व्हिजिटने जगाचे लक्ष इस्लामाबादेकडे लागून राहिले असताना या बेवकुफांच्या हरकतीने आम्हांला जगासमोर खाली मान घालण्याची वेळ येऊ देऊ नका. "

" जनाब… "

" आणखी एक.. "

" … .. "

".. .. इंडियन प्राईम मिनिस्टर ज्यावेळी परत जाण्यासाठी एअरपोर्टसाठी निघतील तेव्हाच आमचा परिवार देखील त्यांच्या पाठोपाठ जाईल. त्यांच्यासाठी इंग्लंडला जाणाऱ्या फ्लाईटची अरेंजमेंट करून ठेवा. "

" याची आवश्यकता पडेल ? "

" याकूब.. यह पाकिस्तान है.. इथं रक्त सांडल्याशिवाय तख्त बदलत नसतं. गाफील राहून चालणार नाही. "

" जनाब.. "


                              ( ४ )


" मि. प्राईम मिनिस्टर आप के हिम्मत की दाद देनी होगी. हिंदुस्थान का कोई पोलिटिकल लीडर इस तरह आज तक कभी पाकिस्तान में नहीं आया. "

" देखिए मियाँ.. पहले तो यह औपचारिकता.. प्राइम मिनिस्टर वगैरह कहना छोड़ दीजिए.. आपली ही भेट राजकीय स्वरूपाची नसून केवळ सदिच्छा भेट आहे. गेल्या सहा सात दशकांत तुम्ही आम्ही खूप भोगलं आहे. आणि आपल्या कलहात इतर देश आपला स्वार्थ साधून मोठे झालेत. "

" बात तो सही है.. मगर.. "

" अजी छोड़ दीजिए यह अगर मगर.. क्या रखा है इसमें ? आपके कायदे आजम और हमारे गांधी.. दोनों महान हस्तियां.. अगर साथ मिल जाते तो.. "

" तो अखंड हिंदुस्तान दुनिया पर राज करता. "

" आप ने तो मेरे मुँह की बात छीन ली. "

" तो बताइए.. आप चाहते क्या है ? इस मुलाकात का मकसद क्या है ? "

" जी, कुछ नहीं. बस एक भाई अपने भाई से.. परिवार से मिलने आया है. "

" मि. प्राइम मिनिस्टर.. शायद आपको यह याद होगा.. हमारे मरहूम जनरल जिया उल हक. एक बार हिन्दुस्थान आए थे.. "

" … "

" बिल्कुल आप की तरह.. बिना बताए.. उन दिनों राजीव गांधी की सरकार थी.. और दोनों मुल्कों के बीच कुछ अच्छे ताल्लुकात नहीं थे.. "

" .. .. "

" तब आपके मुल्क में भारत - पाकिस्तान क्रिकेट मैच चल रहा था और जनरल साब वो देखने वहाँ चले आए थे.. .. "

" .. . "

" हमारे कहने का मतलब है के.. दोनों मुल्कों में अमन रहे. यही हमारी दिली ख्वाहिश है पण.. .हे काय ? गोळ्यांचे आवाज कुठून येत आहेत ? मि. प्राईम मिनिस्टर.. प्लिज आपण या टेबलाखाली लपा.. याकूब.. याकूब.. हा काय गोंधळ आहे.... आह.. या अल्लाह.. कौन हो तुम ? क्या चाहिए तुम्हें ? नहीं.. नहीं.. उन्हें छोड़ो.. वो हमारे मेहमान है.. यह क्या कर रहे हो.. कहाँ ले जा रहे हो हमें.. छोड़ो.. छोड़ो.."


                             ( ५ ) 


" मि. प्रेसिडेंट.. भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढतच चालला आहे. "

" नवीन काही अपडेट्स ? "

" मि. प्रेसिडेंट, याक्षणी दहशतवादी संघटनांनी उभय देशांच्या पंतप्रधानांना बंदी बनवले असून त्यांनी भारताच्या पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत. "

" कोणत्या ? "

" एक. सध्याचं पाकिस्तानातील सरकार उलथून जी राजवट येईल तिला मान्यता देणे. आणि उर्वरित कश्मिर पाकिस्तानकडे सोपवणे. "

" इट्स इम्पॉसिबल.. भारत या अटी कधीच मान्य करणार नाही. "

" ते त्यांनाही माहिती आहे. कदाचित वाटाघाटींमधून यात मार्गही निघेल. परंतु दहशतवाद्यांच्या या मागणीला बीजिंगने उचलून धरलं असून कश्मिरवर ताबा मिळवणे पाकिस्तानी सैन्याला सोयीस्कर जावं यासाठी चिनी फौजा सरहद्दीकडे दाखल होत आहेत. "

" हम्म.. आणि मॉस्को ? "

" मि. प्रेसिडेंट, मॉस्कोने यावेळी वेट अँड वॉच धोरण स्वीकारलं आहे. "

" का ? ते तर भारताचे पाठीराखे आहेत ना ? "

" मि. प्रेसिडेंट.. याक्षणी मॉस्कोने ठरवलं तरी प्रत्यक्ष मदत करणे त्यांना शक्य नाही. पाकिस्तानवर दबाव टाकायचा झाल्यास त्यांना अफगाणिस्तानात उतरावं लागेल आणि सध्याच्या परिस्थितीत रशिया हे साहस अंगावर घेईल असं वाटत नाही. "

" परंतु चायनाचं मिडल ईस्ट एशियात वाढणारं वजन आपल्या इतकंच मॉस्कोलाही खपण्यासारखं नाही, हे तुम्ही विसरत आहात मि. वॉटसन. "

" मि. प्रेसिडेंट, आपल्या म्हणण्यात तथ्य असलं तरी रशियाला या प्रकरणात थेट हस्तक्षेप करणं सध्या तरी शक्य नाही, असंच आमचं मत आहे. "

" ओके. मि. ऑर्थर.. तुम्हांला काय वाटतं ? आपण कोणती भूमिका घ्यायला पाहिजे ? "

" मि. प्रेसिडेंट.. याक्षणी आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात युद्ध खेळण्यासाठी सक्षम असलो तरी दीर्घकालीन युद्धकरता आपली अद्यापि पुरेशी तयारी झालेली नाही. "

" म्हणजे ? "

" मि. प्रेसिडेंट, असा काही पेच उपस्थित होईल याची कल्पनाच नसल्याने यासंबंधी आपली कसलीही रणनीती आखली गेलेली नाही. "

" हम्म.. म्हणजे पहिल्या दोन वर्ल्ड वॉर पेक्षा वेगळी परंतु त्याच दिशेने जाणारी ही परिस्थिती आहे तर.. "

" होय.. आणि मि. प्रेसिडेंट.. मला व्यक्तिशः वाटतं की अमेरिकन राष्ट्राने पहिल्या दोन महायुद्धांप्रमाणे यातही तटस्थ राहावं. "

" वेल.. मि. ऑर्थर.. तुमचा सल्ला योग्य आहे परंतु याक्षणी आम्हांला तटस्थतेची भूमिका स्वीकारता येत नाही. वॉटसन.. भारताला संदेश पाठवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. बीजिंगला सांगा.. परिस्थिती चिघळेल असे निर्णय घेऊ नये. जगाची शांतता अबाधित राखणं आपलं कर्तव्य आहे आणि… जलालाबादेतील त्या धूर्त कोल्ह्याला सांगा.. याक्षणी बाजी त्याने जिंकली असली तरी गाठ आमच्याशी आहे ! "


                                  ( ६ )


" जोगळेकर.. जलालाबादहून काही संदेश ? "

" अजून नाही आला.. परंतु आपल्या गृहमंत्र्यांनी कामगिरी फत्ते केली आहे. "

" हम्म.. विरोधी पक्षांची काही वार्ता ? "

" त्यांनी विरोध दर्शवला खरा परंतु त्यांचं संख्याबळ ते काय ! शिवाय खुद्द राष्ट्रपतींनी आपली बाजू उचलून धरल्याने आणीबाणी स्वीकारण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच राहिला नाही. "

" अजून काही.. "

" गुरुजी एक शंका आहे. "

" बोला.. "

" आणीबाणी जाहीर केली असली तरी राष्ट्रपतींच्या सल्लागार मंडळाचे प्रमुखपद पंतप्रधानांकडे असते. या परिस्थितीत ते कोणाकडे द्यायचे ? "

" हम्म.. प्रश्न अवघड आहे खरा ! कर्वे, आपल्या पुरस्कर्त्यांचं याबाबतीत काय मत आहे ? "

" गुरुजी, पंतप्रधान शत्रूच्या ताब्यात गेल्याने ते गडबडले आहेत. याक्षणी त्यांना मुख्य आधार व भरवसा फक्त तुमचा आणि गृहमंत्र्यांचाच वाटतोय. "

" हं.. व्यापारी आदमी. त्यांना फायद्याखेरीज दुसरं काय दिसणार म्हणा ! "

" गुरुजी, राग येणार नसेल तर एक विचारू ? "

" अवश्य विचारा.. शेवटी तुम्ही तर आमचे आत्मीय आहात. "

" जर पंतप्रधान परत आले नाहीत किंवा उभय देशांदरम्यान एक छोटंसं युद्ध घडून आलं तर… "

" जोगळेकर, तुम्हांला काय वाटतं ? "

" गुरुजी, माझंही कर्व्यांप्रमाणेच थोडंफार मत आहे. परंतु फक्त पंतप्रधानांच्या बाबतीत. युद्धाच्या बाबतीत म्हणाल तर ती शक्यता दिसत नाही. "

" का बरं ? "

" तुम्ही सर्वज्ञ आहात गुरुजी. तरीही मर्यादा उल्लंघनेचा प्रमाद करून बोलतो की, अमेरिकेने आपल्याला दर्शवलेला पाठींबा चीनला पाकिस्तानची मदत करण्यापासून निश्चित परावृत्त करेल आणि असा जबरदस्त बाह्य पाठिंबा असल्याखेरीज पाकिस्तानची आपल्या सोबत युद्ध करण्याची हिंमत होणार नाही. याचे इतिहासात भरपूर दाखले आहेत. "

" कर्वे, जोगळेकर.. आपापल्या जागी तुम्ही दोघे बरोबर आहात. असो. आता आपल्या गृहमंत्र्यांना निरोप पाठवा. भारतीय सेना मोठ्या संख्येने पाकिस्तानच्या हद्दीवर उभी राहिली पाहिजे. तसेच राष्ट्रपती पदावर आपल्याला बर्व्यांच्या जावयाची, हुसेनची नियुक्ती करायची आहे. त्यादृष्टीने रणनीती आखण्यास सांगा. आणि हो.. हिंदू-मुस्लिम सलोखा कायम राहील, त्याला तडा जाणार नाही याकडे विशेष लक्ष पुरवा. याबाबतीत जरा जरी चूक झाली तरी ती अक्षम्य मानण्यात येईल. समजलं ? "


                                ( ७ )


" कौन..?  रसूल..? इस समय ?? "

" गुस्ताखीची मुआफ़ी असावी मौलवी साब.. पण खबरच अशी आहे की.. "

" बेफिजूल बातें छोड़ो और मतलब की बात करो.. "

" जी, इस्लामाबादेत जनरल साहेबांची हुकूमत कायम झाली असून भारताने तिला मान्यता दिली आहे. "

" बहोत खूब ! मग यात एवढी तातडी करण्याची गरज काय ? थोड़ी देर बाद भी यह खबर सुना सकते थे ! खामखाह हमारी नींद में खलल डाल दी ! "

" गुस्ताखी मुआफ़ हुजूर, परंतु भारताने कश्मिर देण्यास इन्कार केला आहे आणि.. "

" जो भी है, खुलकर बताओ.. "

" चीनी लष्कर आपल्या मदतीसाठी सरहद्दीवर येऊन दाखल झालं आहे. आपल्या इशाऱ्याची देर आहे. आपल्या सैन्यासोबत ते हिंदुस्थानी फौजांवर तुटून पडण्यास आतुर आहेत. "

" और.. "

" जनाब.. अमरिकाने चायनाला तटस्थ राहण्याचा इशारा दिला आहे. या घडीला त्यांना आपल्यापेक्षा काफरांची जास्त पर्वा वाटते. "

" हम्म .. यह बात है. तो मुहाजिर काय म्हणतो ? "

" जी, जनरल साहेबांचं म्हणणं आहे की, चिनी फौजेची सहाय्यता घेऊन कश्मिर ताब्यात घ्यावं. असा योग पुन्हा कधी येईल न येईल. "

" फौजी आदमी. सियासी चाल कधीच समजणार नाही.. .. रसूल.. त्या काफिरला सांगा.. हिंदुस्थानच्या पंतप्रधानाला सन्मानाने वापस पाठवा. आपल्या चिनी मित्रांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार माना. परंतु लगेचच हिंदुस्थानसोबत युद्ध करण्यासाठी आम्ही असमर्थ असल्याचे त्यांना कळवून त्यांची समजूत घाला.. "

" मगर जनाब.. "

" रसूल.. हमारी बात काटो मत.. "

" तकसीरची माफी असावी, हुजूर.. "

" हमें मालूम है, तुम क्या सोच रहे हो.. मगर यह जान लो.. अगर कश्मिर हमें चायना की मदद से मिला तो हाथसे पाकिस्तान भी जाएगा. कश्मीर तो हम लेंगे.. मगर अपने दम से.. और रही बात हिंदुस्तान की… तो हमारे रत्नांग्रीवाले दोस्तों से कहो.. हमने अपना वादा निभाया, अब तुम्हारी बारी ! " 

( समाप्त )

सोमवार, २८ मार्च, २०२२

गांधी, सावरकर, आंबेडकर आणि अस्पृशोद्धार : एक चिंतन

जातिभेद आणि अस्पृश्यता. एकाच नाण्याच्या दोन बाजू. पैकी, अस्पृश्यता स्वातंत्र्योत्तर काळात कायद्यानेच समाजाजीवनातून हद्दपार करण्यात आली असली तरी अद्यापि ती अवशिष्ट स्वरूपात शिल्लक असल्याचे विविध घटना - व्यक्तींच्या भूमिकांमधून आपल्या निदर्शनास येते.

अस्पृश्यता निवारणार्थ या देशात व्यक्तिगत तसेच संघटीत पातळीवर कित्येकांनी अनेक प्रयत्न केले. 

जसे म. फुल्यांनी अस्पृश्यांकरता शाळा सुरू केल्या, अस्पृश्यांची कैफियत लिहून या समाजाची स्थिती सर्वांसमोर मांडली. 

कोल्हापूरकर संस्थानाधिपती शाहूंनी तर आपल्या संस्थानात अस्पृश्यता पालन बंदी केली. अस्पृश्यांकरता शिक्षणसंस्था निर्माण केल्या. त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध व्हावी याकरता सक्रिय मदत केली. परंतु हे व्यक्तिगत पातळीवरील कार्य, विशिष्ट प्रभावक्षेत्रापुरते मर्यादित राहीले. जरी यापासून इतरांनी प्रेरणा घेतली असली तरीही !

अस्पृश्यता निर्मूलनाचे व्यापक प्रमाणावर कार्य करण्याचं श्रेय मुख्यतः गांधी - आंबडेकर, त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अधिक आहे. परंतु त्या जोडीला आपणांस वि. दा. सावरकरांचे प्रयत्नही विचारात घेणे आवश्यक आहे.

गांधी, आंबेडकर आणि सावरकर. या तिघांमध्ये साम्यस्थळं तशी खूप आहेत. तिघेही उच्चशिक्षित, कायदेतज्ञ. परदेश वारीचा तिघांनाही अनुभव होता. तसेच तिघेही समाज व राजकारणी. त्याव्यतिरिक्त सावरकर हे काव्यप्रतिभेचे धनी. त्यांचा कल्पनासृष्टीतील विहार त्यांच्या ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या लेखनातही बऱ्याचदा डोकावतो. आंबेडकरांकडे सावरकरांइतकी काव्यप्रतिभा व लेखनाची प्रासादिक शैली नसली तरी ते व्यासंगी असल्याने कठोर तर्कचिकित्सा हा त्यांचा लेखनगुणधर्म होता. या दोघांच्या मानाने गांधींचे ग्रांथिक लेखन अगदीच कमी, नगण्य स्वरूपात मानता येईल.

स्वभावविशेष पाहता तिघेही तितकेच चिवट, आक्रमक. परंतु राजकारणात आक्रमकतेला सात्त्विकतेचा चेहरा देऊन गांधीने या दोघांवर मात केली. 

राजकारणातील यशापयशाचा विचार करता गांधी सर्वसामान्य गरिबांचा चेहरा बनले, आंबेडकर प्रामुख्याने अस्पृश्य वर्गाचा तर सावरकर… ?

भारतीय स्वातंत्रलढ्याचे वरवर जरी अवलोकन केले तरी हे लक्षात येते की, स. १९२० नंतर या लढ्याने जोर पकडला. पाठोपाठ अस्पृश्यतेचा मुद्दा ऐरणीवर आला. उपलब्ध माहितीनुसार स. १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारण ठराव मंजूर करण्यात आला. खेरीज धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्रातील गांधी - आंबेडकर प्रथम भेटीचा वृत्तांत गृहीत धरला तर अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमास काँग्रेसची मंजुरी मिळवण्याकरता गांधींना बरेच प्रयास पडले होते. कारण काँग्रेस व तत्कालीन सर्व स्पृश्य नेतेमंडळी अस्पृश्यांचा प्रश्न हा सामाजिक - धार्मिक संस्थांच्या कार्यक्षेत्रतील मानत होते. 

स्वतः गांधी स्पृश्यास्पृश्य भेद मानत नव्हते. तसेच हिंदूंची जातिसंस्था ही व्यवसायाधिष्ठित असल्याने त्यांनी स्वतःहून मैला साफ करण्याचे कार्य पत्करत याबाबत आपल्या वर्तनाने एक धडा घालून दिला. आजही जातिसंस्था ही जन्माधिष्ठित मानण्याचा प्रघात आहे, हे लक्षात घेता गांधींचे हे कार्य त्या काळाचा विचार करता निश्चितच क्रांतिकारी स्वरूपाचे होते. विशेषतः ज्या काळात मैला साफ करण्याचे कार्य विशिष्ट जातीसमूहाचे मानले जात होते.जातीसंस्थेची रचना उतरंडीची मानली तर त्या उतरंडीवर वरिष्ठ स्थानी असलेला समूह कनिष्ठ स्थानावरील व्यक्तीचे कार्य करण्यास प्रवृत्त झाला.

अस्पृश्यता व जातीभेद या दोन ज्वलंत प्रश्नांकडे गांधींनी विशेष लक्ष पुरवले. पुढे तर त्यांनी केवळ आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहण्याचा निश्चय अंमलात आणला.

अस्पृश्यांची अवहेलना, मानखंडना करणारा ' अस्पृश्य ' शब्द न वापरता त्या जागी योग्य असा पर्यायी शब्द -- ज्याद्वारे स्पृश्यास्पृश्य दरी कमी होईल असा -- योजण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी पत्रकाद्वारे लोकांनाच योग्य प्रतिशब्द सुचवण्याचे आवाहन केले असता एका वाचकाने त्यांना ' हरिजन ' हा शब्द सुचवला. स्वतः गांधी वैष्णव असल्याने त्यांनी ' ईश्वराचे भक्त ' याअर्थी त्या शब्दाचे स्वागत केले. 

परंतु गांधींच्या या व अशा अनेक उपक्रमांना म्हणावे तितके यश प्राप्त झाले नाही. याचे कारण, अस्पृश्यता निवारण्याचे महत्वच मुळी काँग्रेसींना समजले नव्हते. त्यांची सगळी तळमळ फक्त देश स्वातंत्र्यलढ्यापुरती मर्यादित होती. 

खेरीज अस्पृश्य शब्दाला हरिजन प्रतिशब्द दिल्याने लोकभावना कशी बदलणार ? परिस्थिती अशी आहे की, आज ' हरिजन ' हा शब्द एका समुदायाचा अवमानदर्शक मानण्यात येऊन कायद्यानेच व्यवहारातून बाद ठरवला आहे.

रत्नागिरी येथे स्थानबद्धतेच्या काळात वि. दा. सावरकरांनी अस्पृशोद्धाराचे कार्य हाती घेत सहभोजन, मंदिरप्रवेश इ. उपक्रम आरंभले. सावरकरांचे यामागे हिंदू संघटन हे मुख्य उद्दिष्ट होते. जातीभेद - स्पृश्यास्पृश्य भेद मिटल्याखेरीज हिंदू एक होणार नाहीत अशी त्यांची धारणा होती. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंदी असल्याने त्यांनी अस्पृश्यांसहित सर्व स्पृश्यांकरता पतितपावन मंदिराची उभारणी केली.

 यास्थळी सावरकरांच्या पतितपावन मंदिराची थोडी चर्चा आवश्यक आहे. मुळात अस्पृश्य प्रवेशार्थ वेगळ्या मंदिराची निर्मिती का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. सावरकर चरित्रकार सांगतात त्याप्रमाणे खरोखर सावरकरांचा तत्कालीन समाजावर, तरुणांवर विशेष प्रभाव होता तर त्यांनी अस्पृश्य प्रवेशार्थ हिंदू मंदिर प्रवेशद्वारं उघडण्याचा प्रयत्न का केला नाही ? यासंदर्भात साने गुरुजींचे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा याकरता केलेले उपोषण लक्षात घेतले पाहिजे. जे स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी अवघे दोन तीन महिने आधी झाले होते व ते यशस्वीही ठरले. ( दि. १ ते १० मे, १९४७ ) 

दुसरे असे की, मंदिराचे नाव पतितपावनच का ? पतित शब्दाचा अर्थ भाषाप्रभु सावरकरांना माहिती नव्हता काय ? जर होता तर मग अस्पृश्य हे पतित ठरतात व मंदिरात जाऊन त्यांचा उद्धार होतो. थोडक्यात अस्पृश्य प्रश्नाकडे बघण्याचा सावरकरांचा दृष्टिकोनच मुळी निकोप नाही. त्यामुळे हिंदू संघटनार्थ त्यांनी अस्पृश्यता निवारण कार्यक्रम हाती घेतला असला तरी मूळ हेतूच शुद्ध नसल्याने त्याचे अपयश स्वाभाविक होते. खेरीज स्थानबद्धतेचा कालखंड संपुष्टात येताच त्यांचे लक्ष प्रामुख्याने हिंदू - मुस्लिम प्रश्नावर केंद्रित झाले.

आंबेडकरांचे अस्पृशोद्धार कार्य आता जगद्विख्यात आहे. त्यामुळे समग्र कार्याची उजळणी न करता निवडक बाबींची चर्चा करतो.

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन असो किंवा नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. या तीन घटना एकाच मुख्य बाबीकडे निर्देश करतात व त्या म्हणजे अस्पृश्य हे हिंदू असून त्यांना हिंदू धर्मात, समाजजीवनात समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे. नव्हे तो त्यांचा हक्क आहे.

अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंबेडकरांनी आरंभलेल्या वृत्तपत्रांची येथे संक्षिप्त चर्चा आवश्यक आहे.

स. १९२० - २३ या कालावधीत आंबेडकरांनी ' मूकनायक ' हे पाक्षिक चालवले. त्यानंतर दि. ३ एप्रिल १९२७ रोजी ' बहिष्कृत भारत ' पाक्षिक सुरू केलं, जे १५ नोव्हेंबर १९२९ मध्ये बंद पडलं. विशेष म्हणजे महाड सत्याग्रह आरंभल्यावर लगेचच बहिष्कृत भारतचे प्रकाशन सुरू झाले.

या ठिकाणी पुन्हा एकदा हरिजन, पतितपावन, बहिष्कृत या शब्द योजनांमागील भाव लक्षात घेणे आवश्यक आहे. गांधीजींच्या हरिजन शब्दाचा अर्थ ईश्वराचे भक्त, लाडके असा उघड आहे. सावरकरांच्या पतितपावन शब्दाची चर्चा आधीच आपण केलीय. आता आंबेडकरांचा बहिष्कृत शब्द.

जो समुदाय इतरांसोबत बरोबरीच्या नात्याने वागू शकत नाही, ज्याचा विटाळ मानला जातो, अगदी पिण्याच्या पाण्याबाबतही त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो, त्यांना बहिष्कृत का मानू नये ? इथे आंबेडकरांनी अस्पृश्य शब्द टाळून बहिष्कृत शब्दाची योजना केल्याचे आपल्या लक्षात येते व याचा आरंभ बहिष्कृत हितकारणी सभेच्या निर्मितीवेळेस झाल्याचे आपणांस दिसून येते. ( दि. २० जुलै १९२४ ) 

अस्पृशोद्धार कार्यात आंबेडकर अत्यंत आक्रमक होते. आणि त्याचे कारण असे की, ब्रिटिश सत्ता भारतावर फार काळ राहणार नाही हे इतरांप्रमाणे त्यांनाही कळून चुकले होते. अशात, जे काही न्याय्य हक्क पदरी पडणार ते याच काळात, परत नाही, हे त्यांना पूर्णतः उमगले होते. त्यामुळे सहभोजन, मंदिराची द्वारे अस्पृश्यांना खुली करणे अशा गोष्टींनी त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते व का व्हावे ?

जर स. १८०२ मध्ये दिल्लीकर तुर्की बादशहा इंग्रजी सत्तेच्या पंखाखाली गेला ही पारतंत्र्याची खूण मानली तर अवघ्या पंचावन्न वर्षांत जनता त्या सत्तेविरुद्ध बंड करून उठते. किंवा स. १८५८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती येथील सत्तासुत्रे गेली असे गृहीत धरले तरी अवघ्या अर्ध - पाऊण शतकांत  येथील जनता राजकीय हक्कांविषयी जागृत होऊन हळूहळू आक्रमक होत प्रथम वसाहती अंतर्गत स्वराज्य ते पूर्ण स्वातंत्र्याप्रति पोहोचते तर मग काही शतकांचा अस्पृश्यतेचा इतिहास असणाऱ्या समुदायाने चार दोन सहभोजन व मंदिर प्रवेशाच्या घटनांवर का समाधानी व्हावे ?

डॉ. आंबेडकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय ? असा कुत्सित प्रश्न विचारणाऱ्यांना राजकीय व सामाजिक लढ्यातील एकत्व, अभिन्नत्व कितपत माहिती असतं !

अस्पृश्य स्मानतेचा, सन्मानाने जगण्याचा हक्क मागत असता तो मिळत नाही हे पाहून स. १९३५ मध्ये आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. तेव्हापासून ते स. १९५६ पर्यंत.. वीस वर्षे हिंदूंना व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या वैदिकांना बदलाची संधी होती. आंबेडकर एकीकडे प्रतिपक्षाला अशी संधी देत असता दुसरीकडे धर्मांतराकरता उपलब्ध पर्यायी धर्मांची चाचपणी करत होते. 

मधल्या काळात देशाला स्वातंत्र्य लाभले. राज्यघटनेच्या लेखनकार्यात सहभाग घेण्याकरता मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत आंबेडकरांनी घटनेतच अस्पृश्यता हद्दपार करत इतिहास घडवला. अस्पृश्यता पालन कायद्याने दंडनीय अपराध ठरवण्यात आले. परंतु या बदलास हिंदू समाजाची अनुकूल मानसिक तयारी करणारा नेता मात्र कोणी नव्हता. गांधींची उणीव प्रकर्षाने आपणांस याच कालखंडात जाणवते. जेव्हा स्वातंत्र्योत्तर भारतासमोर दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक विषमता, फाळणीने उद्भवलेला धार्मिक संघर्ष इ. प्रश्न उपस्थित झाले होते. नथुराम गोडसेने केवळ गांधींची हत्याच नाही केली तर नवस्वतंत्रित भारताच्या एक होऊ पाहणाऱ्या जनतेच्या एकात्मिक भावनेवरच घाला घातला.

फाळणी होईपर्यंत स्पृश्यांच्या लेखी आंबेडकर व अस्पृश्यांना महत्व होतं. फाळणी होताच आंबेडकरांचेही महत्त्व स्वाभाविक घटलं. परिणामी धर्मांतर हे अटळ ठरलं !

अस्पृश्यता पालनास कायद्याने बंदी व अस्पृश्यता टाळण्यासाठी धर्मांतर. दोन पर्याय उपलब्ध असले तरी सध्या देशातून अस्पृश्यता समूळ नष्ट झाली आहे का ? त्यांना आपल्या वस्तीत जागा नको इथपासून आपण त्यांच्या वस्तीत राहायला जायचं नाही, इथवर आपली मजल गेली आहे. जन्माधिष्ठित जातींवर आधारित अस्पृश्यता आता खानपान, पोशाख इ. बाबींवर ठरवली जातेय. प्रामाण्यवाद तर वेडगळपणाची हद्द सोडून गेलाय. सध्या जो आपला नाही त्याचा द्वेष करणं हाच एक धर्म झालाय. 

एक नवीन द्वेषसंस्कृती आपण जन्माला घातलीय. गावकुसाबाहेरील आपला समाज -- ज्यामध्ये पूर्वास्पृश्य तसेच ब्रिटिश राजवटीत गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का मारलेले, वन्य आदिवासी इ. -- आजही तीच अस्पृश्यता भोगतोय. भाकरी फिरवली नाही तर करपते असं राजकारणात म्हटलं जातं पण ते समाजकारणालाही लागू पडतं. 

औद्योगिक क्रांतीनंतर समाजव्यवस्था -- विशेषतः जातीयता व अस्पृश्यता संपुष्टात येईल असा आशावाद असावा. आजचं चित्र हे भ्रमनिरास करणारं आहे. न्याय्य हक्क, मागण्यांसाठी एकत्र येण्याऐवजी द्वेषाकरत एकत्र येण्याची प्रवृत्ती निश्चितच देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेला धोक्यात आणणारी आहे. आपली सद्यस्थिती, दुरावस्था, प्रगती याबाबत कठोर आत्मपरीक्षणाऐवजी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याची आपली प्रवृत्ती निश्चितच अनर्थकारी आहे. 

डॉ. आंबेडकरांनी दि. ४ एप्रिल १९३८ रोजी तत्कालीन मुंबई विधिमंडळातील कर्नाटक विभक्तीकरण ठराव प्रसंगीच्या भाषणात पुढील उद्गार काढले होते,  ".. … मी कोणत्याही प्रकारचा प्रांतभेद, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रीय म्हणूनही घेण्यास भूषण मानीत नाही. तसेच भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम हिंदी नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीय पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी. "  आज या उद्गारांच्या, भूमिकेच्या वारसदारांची गरज आहे. 

जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न चांगलं आहे. परंतु त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की, देशातील प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य - शिक्षण इ. गरजा पूर्ण होऊन त्यांस इतरांप्रमाणेच सन्मानाने जगण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. अन्यथा देश महासत्ता आहे न् लोकसंख्येचा काही टक्के भाग त्याच दारिद्र्य, रूढी - परंपरांच्या दुष्टचक्रात अडकून पडलाय असं चित्र दिसणार असेल तर अशी महासत्ता, ती काय कामाची !

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

हायवे कॅनिबल्स ( भाग १ )



                              ( १ ) 


विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटलं जातं. याचं प्रत्यंतर प्रशांतच्या बाबतीत दिसून आलं. 

त्या दिवशी मनाजोगतं गिर्यारोहण करून तो परत शहराकडे आपल्या घरी जायला निघाला होता. आजच्या ट्रेकिंगमधील हेरलेल्या निवडक स्पॉट्सची छायाचित्रं काढून त्याने आपल्या मित्रमंडळींना पाठवली होती. त्यांच्या पसंतीस आल्यास पंधरवड्यात तो पुन्हा त्यांच्यासोबत तिथे येणार होता.


ट्रेकिंगचं सामान तसेच मुक्कामासाठी घेतलेला छोटासा टेंट वगैरे साहित्य आवरून निघायलाच त्याला सात वाजले. आता येथून न थांबता निघाल्यास पाच सहा तासांचा रस्ता. सहा पदरी हायवे असल्याने ट्रॅफिकचे काही टेन्शन नव्हतं. लगेचच निघाला असता तर दुर्घटना टळली असती. परंतु…


.. रस्त्यात एक छोटंस गाव लागलं. तिथेच हायवेला येऊन मिळणाऱ्या, गावांतून येणाऱ्या रस्त्यांनी एक चौक बनला होता व सोयीस्कर जागा पाहून चहा - भजी, चायनीजच्या टपऱ्या तिथे स्थानिकांनी उभारल्या होत्या. अशाच एका टपरीवर थांबून प्रशांतने एक प्लेट भजी व कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेतला. आता रस्त्यात कुठेही न थांबता प्रवास करण्यास तो सिद्ध झाला.


साधारणतः निम्म्याहून अधिक रस्ता कटला होता. अजून दीड एक तासाने प्रशांत घरी पोहोचणार होता. अर्ध्या तासाने शहरात प्रवेश करण्यापूर्वीचा हायवेचा शेवटचा टोल नाका त्याने क्रॉस केला. 

टोल प्लाझा क्रॉस केल्यावर नेहमी भरधाव निघणारा प्रशांत आज थोडा रमतगमत चालला होता. आणि इथेच त्याचा घात झाला.

टोलनाका पार केल्यावर काही अंतरापर्यंत रस्त्यावर दिव्यांच्या खांबांची मालिका होती व ती जिथे संपते, त्याच ठिकाणी एक तरुणी उभी होती.


प्रशांतने संथ गतीने तिच्या दिशेने गाडी घेतली व सहजगत्या बघावं तसं मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते. या अशा वेळी एक तरुणी… ती देखील टोलनाक्यापासून इतक्या लांब… प्रशांतच अंतर्मन धोक्याची सूचना देत होतं परन्तु कारच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात दिसणारी तरुणीची आकृती, तिचं सौष्ठव प्रशांतला भुरळ पाडत होतं.

तिच्याजवळ जाताच प्रशांतने गाडीला ब्रेक मारला व काच खाली घेतली. समोर गाडी उभी राहिल्याचे पाहताच ती तरुणी संथगतीने जवळ आली व बाहेरूनच, कारमध्ये डोकावत तिनं विचारलं, " मला शहरापर्यंत लिफ्ट द्याल का ? प्लिज.. "

काही न बोलता प्रशांतने दरवाजा अनलॉक केला.


खांद्याला अडकवलेली एक छोटी बॅग हातात घेत ती तरुणी आत येऊन बसली. तेवढ्या अल्पावधीतही प्रशांतने तिचं शक्य तितकं बारकाईने निरीक्षण केलं. 

चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळल्याने तिचा चेहरा जरी त्याला दिसला नसला तरी जवळपास पाच सव्वा पाच फूट उंचीचा तिचा मध्यम बांधा व कमरेखालचा तिचा समोरून दिसणारा भाग त्याला मोहवून गेला. नाही म्हणलं तरी तिलाही त्याची आपल्या कमरेखाली गुंतलेली नजर जाणवली होती. त्यामुळे तिची चलबिचल झाली असली तरी ती अगदी क्षणभर !

ती तरुणी आत बसताच कार पुढील प्रवासासाठी निघाली.


" इथे एवढ्या रात्री कसे काय ? " थोडं अंतर कापल्यावर प्रशांतने तिची माहिती काढण्यास आरंभ केला. 

" एकच्युली काय झालं.. मी इथं शहरात जॉबला आहे. काल संध्याकाळी आई आजारी असल्याचा मेसेज आला म्हणून तिला भेटायला मी गावी आले होते.. तिची भेट घेऊन घरातून निघायला उशीर झाला.. त्यात उद्या सोमवार असल्याने कामावर हजर होणं भाग होतं.. त्यामुळे उशीर झाला तरी निघण्याचा मी निर्णय घेतला. पण गाडी चुकली. तेव्हा अशीच लिफ्ट घेत घेत इथवर आले. "


' एका अनोळखी व्यक्तिला कोणी आपली अशी माहिती देत नाही. एकतर कमालीची मूर्ख, बडबडी असावी किंवा.. ' पुढची शंका मनात येण्यापूर्वीच त्या तरुणीने आपली बॅग उघडून त्यातील पार्सल खोलले आणि सँडविचचा वास गाडीत पसरला.

त्या वासाने न राहवून प्रशांतने तिच्याकडे पाहिले. तिने नाक आणि ओठ झाकणारा स्कार्फचा भाग खाली घेत सँडविच खाण्यास आरंभ केला होता. एक दोन बाईट्स ती घेते न् घेते तोच प्रशांत आपल्याकडे बघतोय पाहून ओशाळत्या स्वरात ती म्हणाली, " सॉरी हं ! काय झालं.. गडबडीत मी जेवणाचा डबा विसरले.. आणि आता इथे मी ही सँडविच पार्सल घेतली. तुम्ही घेणार का एक ? " 

प्रशांतने हो, ना करण्यापूर्वीच तिने बॅगेतून दुसरे पार्सल काढून उघडले. खरंतर काही खाण्याइतपत प्रशांतला भूक लागली नव्हती. परंतु त्यानिमित्ताने का होईना, या अनोळखी तरुणीसोबत संवाद वाढवून ओळख करून घेण्यासाठी त्याने तिच्या हातातील सँडविचचा एक पीस घेतला. 

" अजून एक.. " प्रशांतच्या तोंडातील घास संपण्यापूर्वी तिने दुसरा तुकडा त्याच्यासमोर धरला. तिला हातानेच थांबण्याची खूण करत त्याने कार थोडी साइडला घेतली.

साइडचा लिवर खेचत त्याने ड्रायव्हिंग सीट मागे घेतली. मागच्या सीटवर पडलेल्या दोन पाण्याच्या बाटल्या त्याने घेतल्या व त्यातली एक त्याने शेजारी बसलेल्या तरुणीच्या हाती देत दुसरी उघडून तोंडाला लावली. चार दोन घुटके घशाआड जाताच प्रशांतने तिच्या हातातील सँडविचचा पीस घेत तोंडात कोंबला व गाडी चालवण्यास आरंभ केला.

काहीशा शंकीत नजरेनं त्याच्याकडे बघत तिने हातातील पाण्याच्या बॉटलकडे एक नजर टाकत हाताने टोपण चापचले. बॉटल सीलपॅक होती. तेव्हा निःशंक होत तिने बाटली उघडून पाण्याचे एक दोन घोट घेतले खरे आणि… ..

.. प्रशांतला आपले डोळे जड वाटू लागले.. डोकं अगदीच सुन्न, बधिर वाटू लागलं.. हातपाय कमालीचे जडावले.. जबड्यावरीलही त्याचं नियंत्रण सुटू लागलं.. त्याही स्थितीत त्याने प्रयत्नपूर्वक गाडी बाजूला घेतली व शेजारच्या तरुणीकडे नजर टाकली तर… तिची मान खिडकीवर केव्हाच गळून पडली होती… ते पाहून प्रशांतने स्टेअरिंग व्हीलवर डोकं टेकवलं.


                                ( २ )


पहाटे पाचच्या सुमारास हायवे पेट्रोलिंगला गेलेली पोलिस जीप हायवेवरून परतत होती. नाईट शिफ्टच्या ड्युटीवर असलेल्या फौजदाराला झोप आवरत नव्हती. न राहवून त्याची नजर घड्याळाकडे जात होती. जे दाखवत होतं.. अजून दीड दोन तास अवकाश आहे, ड्युटी संपायला. 


गेल्या काही दिवसांत आसपासच्या जिल्ह्यांत हायवेवर लुटालुटीच्या घटना घडल्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सर्व पोलिस स्टेशन्सला अलर्ट राहण्याचा हुकूम देत रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रत्येक पोलिस स्टेशनची एक टीम आपापल्या हद्दीत रात्री किमान दोनदा तरी हायवेवर पेट्रोलिंगसाठी बाहेर पडत होती. 


पीएसआय कांबळे अशाच एका टीमचा प्रमुख होता. त्याच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हायवे संपण्यास थोडसंच अंतर उरलं असता ड्रायव्हरला रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार दिसली. त्याने गाडीचा वेग कमी करत कांबळेला ती गाडी दाखवत म्हटले, " सर, मघाशी आपण राउंडला गेलो तेव्हाही, ही गाडी इथेच उभी होती. " कांबळेंनी नुसतीच मान हलवली. इशारा समजून ड्रायव्हरने गाडी साइडला घेतली.


" भोसले, जरा जाऊन बघून या.. काय भानगड आहे ती..! " पाठीमागे बसलेल्या कॉन्स्टेबलला कांबळेनी ऑर्डर दिली. नव्यानेच सेवेत दाखल झालेला भोसले टुणकन उडी मारत गाडीतून खाली उतरला व कार जवळ गेला.


काचेतून आत डोकावून पाहिलं तर ड्रायव्हर स्टेअरिंग व्हीलवर डोकं ठेऊन झोपला होता. भोसलेनी काचेवर हाताच्या बोटांनी ' टकटक ' केली. ड्रायव्हरला हाका मारल्या, तरी प्रतिसाद मिळेना म्हणून त्याने दरवाजा उघडण्यासाठी हँडलला हात घातला. अपेक्षा तर नव्हती परंतु दरवाजा अनलॉक होता. 

दार उघडताच एक उग्र दर्प आला. शंकीत भोसल्याने ड्रायव्हरच्या खांद्याला हात लावताच स्टेअरिंग व्हीलवर ठेवलेली मान बाजूला कलंडली… ते अर्धवट तुटकं शीर बघून भोसल्याची जवळपास बोबडीच वळायची बाकी राहिली होती. कसाबसा स्वतःला व प्रेताला सावरून तो परत पोलिस जीपकडे आला व त्याने आपल्या सिनियरला पाहिल्या प्रकारची कल्पना दिली.


" भोसडीच्याला इथेच मरायचं होतं, ते पण माझ्याच ड्युटीला.." म्हणत कांबळे खाली उतरला.

कार व बॉडीची पाहणी करून त्याने पोलिस स्टेशन व वरिष्ठांना बातमी देत पुढील सोपस्काराची तयारी चालवली.


                              ( ३ )


रात्रीचे दोन वाजून गेले होते.निर्जन रस्त्यावर एक सुमो वेगाने चालली होती. आतमध्ये बसलेल्या चारही तरुणांच्या चेहऱ्यावरील चिंता, भीती साफ दिसत होती.


" परव्या.. अजून ही शुद्धीवर आलेली नाही.. औषध तरी किती टाकलं होतंस ? " मधल्या सीटवर झोपलेल्या तरुणीच्या शेजारी बसलेल्या अश्विनने काळजीच्या सुरात ड्रायव्हिंग करणाऱ्या प्रवीणला विचारलं. 

" किती म्हणजे.. ! भडव्या, गोळ्या तर तूच दिल्या होत्यास.. त्या सगळ्या टाकल्या.. पण या छिनालने.. कशाला खायच्या.. " चिडक्या स्वरात प्रवीण उद्गारला.

" परव्या.. तोंड सांभाळून बोल.. ती माझी.. " 

" हां, भोसडीच्या.. तुझी लव्हर आहे.. पण हिनं ते खायचं कशाला ? तिला माहिती नव्हतं का ! "

" अरे झाली चूक… हिला अशीच घेऊन आपण कुठे कुठे फिरणार ! त्यापेक्षा दवाखान्यात नेऊया.. "

" आणि डॉक्टरला काय सांगायचं ? आम्ही हिला झोपेच्या गोळ्या दिल्या म्हणून ! भोसडीच्या.. लवड्याने विचार करतोस का रे ? आपण चौघे, भर रात्र, आणि ही एकटी.. तिथल्या तिथे अटक होईल.. थोडा वेळ जाऊ दे.. "

" अश्विन.. तिच्या तोंडावर पाणी मार.. " पाठीमागे बसलेला रवी म्हणाला. 

" अरे अर्धी बाटली पाणी मारलं.. तरी डोळे उघडत नाहीए ही.. " रडवेल्या आवाजात अश्विन म्हणाला.


या तिघांचा संवाद ऐकत ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी अगदीच शांत बसलेला दिनेश अखेर उद्गारला, " उगाचच दंगा करू नका. प्रवीण, गाडी आपल्या जिल्ह्यातून बाहेर गेल्यावर जे प्रायव्हेट क्लिनिक दिसेल तिथे थांब. आपली जबाबदारी आहे, आपणच पार पाडली पाहिजे. आणि अश्विन… तू काळजी करू नकोस.. तिच्या तोंडावर पाणी शिंपाडतच राहा. प्रयत्नात कसूर नको. फक्त धीर धर. "


बोलता बोलता दिनेशने एक मेसेज टाईप केला व काही सेकंदात तो रवीच्या मोबाईलवर सेंड झाला. 

मेसेज टोनचा आवाज येताच रवीने मेसेज ओपन करून पाहिला व रीड करताच त्याचा चेहरा पडला.

थरथरत्या हातांनी त्याने मेसेज टाईप केला, ' काय.. गरज.. '

' सांगितलं तेवढं कर.. ' दिनेशचा रिप्लाय येताच रवीसमोर पर्याय उरला नाही. 


तसाही त्या चौघांमध्ये अत्यंत खतरनाक, डेअरिंगबाज म्हणून दिनेशचा लौकिक होता. त्याचा शब्द ओलांडण्याची प्रवीण सारख्या बलदंड व्यक्तीची देखील हिंमत नव्हती, मग फाटक्या शरीरयष्टीच्या रवीची काय कथा !

त्याने तोंडावर मास्क लावत सीटखाली ठेवलेल्या पिशवीतून एक छोटी पेटी उघडली. आत द्रावणात बुडवलेला ओलसर रुमाल हातात घेऊन त्याने एकवार समोर पाहिलं.. चिंतेनं काळवंडलेला अश्विन पाहून त्याच्या मनाची चलबिचल झाली खरी पण क्षणभरचं ! 

मन घट्ट करून त्याने झपाट्याने तो रुमाल अश्विनच्या नाकावर दाबला व त्याची धडपड बंद होईपर्यंत तसाच दाबून धरला.


                             ( ४ )


वरिष्ठ पोलिस अधिकारी बर्डेच्या देखरेखीखाली घटनास्थळाची कसून पाहणी चालली होती. कारमध्ये पाण्याच्या बाटल्या, एक कपड्यांची छोटी बॅग, जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य, टेंट, रिकामा आइस बॉक्स, दोन किचनमध्ये वापरात येणारे तर एक संरक्षणार्थ वापरला जाणारा चार इंची पात्याचा चाकू, सँडविचचे काही तुकडे, एक ओढणी, ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर काही लांबसडक केस आढळून आले. खेरीज कारच्या मागेपुढे गाड्यांच्या टायरच्या काही खुणा आढळून आल्या, त्यांचेही प्रिंट्स गोळा करण्यात आले.


आसपास झालेल्या हायवेवरील लुटालुटीचा डेटा व प्रत्यक्ष घटनास्थळी सापडलेल्या वस्तू यांमुळे तपास अधिकारी नाही म्हटले तरी थोडे गोंधळात पडले होते. 

मृताची ओळख पटवण्यासारखे कागदपत्र गाडीत उपलब्ध नव्हते. पैशाचं पाकीट, मोबाईल जवळ आढळले नाहीत. कदाचित अंगावरील सोनंही गायब असेल. हायवेवरील इतर घटनांत लुटालुट करून, क्वचित मारहाण करून व्यक्तींना सोडण्यात आलं होतं. परंतु इथे तर प्रत्यक्ष खून करण्यात आला होता. खेरीज एक स्त्री देखील गायब होती. यावरून सदर प्रकरण अपहरण किंवा प्रेमप्रकरणातून केलेली हत्या व त्याला दिलेलं चोरीचं स्वरूप, या प्राथमिक निष्कर्षास बर्डे व सहकारी आले.


पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यास तसेच गाडीत सापडलेल्या केस, पाणी, सँडविच इ. चे फॉरेन्सिक रिपोर्ट्स येण्यास बराच वेळ जाणार होता. तेवढ्या अवधीत नंबर प्लेटवरून मृताची ओळख पटवण्याचे निर्देश बर्डेंनी कांबळेला दिले. तसेच टोलनाक्यावरून ही गाडी केव्हा पास झाली याचीही माहिती घेण्याची सूचना केली. 


                                ( ५ )


मध्यरात्री तीनच्या सुमारास सुमो एका ठिकाणी थांबली. दिनेश व प्रवीणने आसपास नजर टाकली. मानवी वस्ती, हालचालीचे कसलेच लक्षण नव्हते. गाडी बंद करून दोघे खाली उतरले. पाठोपाठ मागील दरवाजा उघडून रवीही खाली आला. रस्त्यावरून थोडं खाली उतरून गेल्यावर एक विस्तीर्ण तळं त्यांना चांदण्यांच्या प्रकाशात दृष्टीस पडलं. काहीतरी मनाशी बेत ठरवून दिनेश त्या दोघांसह परत गाडीजवळ आला व त्याने अश्विनला बाहेर काढण्याची प्रवीणला सूचना केली. नंतर त्याने व रवीने मिळून प्रियाला बाहेर काढले. त्या दोघांना घेऊन ते तिघे तळ्याकाठी आले.


पुढे काय घडणार याची रवीला अंधुकशी कल्पना येऊ लागली होती. त्याचे अंतर्मन ढवळून निघाले… भीतीचा संचार झाल्याने त्याचे शरीर कंप पावत होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत दिनेशने प्रवीणला, अश्विनच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगितले.

" दि..दि..दिनेश.." कसंबसं बळ एकवटून रवी म्हणाला.

" हुं.." दिनेश उत्तरादाखल हुंकारला.

" खरंच याची गरज आहे का ? " 

" कशाची ? "

" यांना म..म्मारण्याची.." कसेबसे रवीच्या तोंडातून शब्द बाहेर फुटले.

ते ऐकताच दिनेश व प्रवीण मोठमोठ्याने हसू लागले.

" अरे.. यांना मारणार म्हणून तुला कोणी सांगितलं..! "

" मग अश्विनचे कपडे.. " शंकीत स्वरात रवीने विचारलं.

" अरे बाबा.. काही तासांनी दोघे येतील शुद्धीवर. फक्त यांची पीडा सोबत नको म्हणून यांना इथे फेकून जायचं आहे. … तू बघत काय उभा आहेस !  त्या प्रियाचे पण कपडे उतरव.. "

" पण कपडे कशाला.. " 

" अरे उतरव तरी.. माहित्येय आम्हांला.. तिला कसं चोरून चोरून बघतोस ते.. लाजू नकोस.. अश्विनला आम्ही नाही सांगत.. अरे त्याने तिला केली असेलच की.. आज तू कर.. फक्त कपडेच तर काढायचे आहेत.. हवं तर लग्नाची बायको समज न् हळुवार काढ.. काय ! " दिनेशच्या बोलण्याने रवी लाजला तर प्रवीण गालातल्या गालात हसला.


प्रिया हा तसा रवीचा वीक पॉईंट. ती त्याला आवडायची. पण अश्विनचे तिचे प्रेमसंबंध जुळल्याने रवीचा पत्ता कट झालेला. तरीही तिच्याविषयीची आसक्ती मात्र त्याच्या मनातून कमी झाली नव्हती. 

अनेकदा तो तिच्यासोबतच्या प्रणयाची स्वप्नं रंगवायचा… आणि आज दिनेशने तिला विवस्त्र करण्याचा हुकूम सोडून एकप्रकारे त्याच्या सुप्त वासनेला चेतवले होते. 


बघता बघता रवीने प्रियाला विवस्त्र केलं. अश्विन व प्रियाच्या अंगावरील कपड्यांची बोचकी घेऊन प्रवीण एका बाजूला उभा राहिला. 

प्रियाच्या विवस्त्र देहाकडे रवी आसुसलेल्या नजरेनं बघत होता. काही वेळापूर्वी त्याच्या मनात, शरीरात संचारलेली भीती दूर होऊन त्याची जागा आता वासनेनं घेतली होती. 

दिनेशने रवीच्या मनातील भाव अचूक ओळखला. 

" काय रव्या.. मग करणार का ? "

" काय ? " न समजून, गोंधळून रवी उद्गारला.

" भोसडीच्या.. बायल्यासारखं काय म्हणून विचारतोयस.. किती वेळा तिला कल्पनेत न् नजरेनं झवणार.. मौका आहे.. चढ इथेच.. अश्विनच्या बापालाच काय पण प्रियालाही कळणार नाही. "

" पण.. "

" अरे, पण बिन सोड.. तुला जमत असेल तर कर, नाहीतर मग उद्घाटन आम्हीच करू.. बोल.. "

तरीही रवी पुढे पाऊल टाकण्यास धजवेना. तेव्हा आपल्या पॅन्टच्या चेनला हात घालत दिनेश म्हणाला, " परव्या.. प्रियाने या हांडग्याची अचूक पारख केली बघ.. तिला माहिती होतं याच्यात काही जोर नाही. म्हणून तिने अश्विनचा हात धरला. " ही मात्रा बरोबर लागू पडली. डिवचलेला रवी एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे विवस्त्र प्रियाच्या देहावर झेपावला. बेशुध्दवस्थेतील प्रियाचे शरीर, स्वतःच्या तनमनाची आग शांत होईपर्यंत भोगत राहिला. अधूनमधून मोबाईल टॉर्चच्या उजेडात दिनेश, प्रवीण त्याला प्रियाच्या चेहऱ्याचे.. देहाचे दर्शन घडवत, त्यावर कॉमेंट पास करत होते. जेणेकरून रवीची उत्तेजना आणखी वाढत होती.

रवीचा कार्यक्रम होताच लागलीच दिनेश व नंतर प्रवीणने आपला कार्यभाग उरकून घेतला. त्यानंतर थोडावेळ ते तिथेच बसले.


दिनेशने मोबाईलमध्ये टाइम पाहिलं तर चार साडेचार वाजत आलेले. आता फार वेळ थांबण्यात अर्थ नव्हता. त्याने प्रियाचा देह ओढत ओढत तळ्याच्या काठावर नेला. प्रवीणनेही अश्विनला तिथे फरफटत आणले. व दोघांनी एकेक मोठा दगड उचलत त्या दोघांच्या चेहऱ्यावर जोरात आपटले. दोन तीन प्रहरातच दोघांच्या कवट्या फुटून गेल्या.


या भीषण दृश्याला पाहून रवीची तर दातखिळीच बसली. अंगातील सर्व बळ खचल्यागत तो जागीच मटकन बसला. तोवर प्रवीण आणि दिनेशने त्या दोघांची प्रेतं सोबत ओढत तळ्यात नेली व जितकी आत नेऊन सोडता येतील तेवढी सोडली. नंतर पाण्याबरोबर येऊन त्यांनी गुन्ह्यात वापरलेले दगडही पाण्यात फेकले व अंगावर कपडे चढवले.


" रव्या उठ..पट्कन गाडीत बस.. " शर्टाची बटणं लावता लावता दिनेश म्हणाला. रवीच्या कानांवर त्याचे शब्दच जणू गेले नाहीत. मख्खासारखा तो बसून राहिला. 

" रव्या.. फोद्रीच्या उठ न् गाडीत जाऊन बस. इथेच बसलास तर भोसडीच्या, तुझ्यासह आमच्याही गळ्याला फास लागेल.."जड अंतःकरण व पावलांनी रवी गाडीत जाऊन बसला. पाठोपाठ प्रवीण आणि दिनेशही गाडीत आले व सुमो भरधाव वेगाने अंधारात रस्ता कापत निघून गेली.

                                                    ( क्रमशः ) 

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

' जय भीम ' चित्रपटाच्या निमित्ताने


वंचित घटकांवरील अन्याय, अत्याचार, शोषण आपणास नवीन नाही. या एका बाबतीत देशातील सर्व राज्यं आघाडीवर आहेत  म्हटलं तरी चालेल. ' जय भीम ' ही अशाच एका वंचितावरील अन्यायाची कहाणी.

 तामीळनाडूत स. १९९३ पासून स. २००६ पर्यंत घडलेली एक सत्य घटना. ज्यामध्ये चोरीच्या आरोपावरून राजकन्नू या निरपराध व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. लॉकअपमध्ये गुन्हा कबुलीकरता त्याचा छळ केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कस्टडीत झालेल्या मृत्यू लपवण्याची पोलिसांनी केलेली धडपड व मृत राजकन्नूची पत्नी -- सेंगईचा न्यायासाठी चाललेला अविरत संघर्ष पडद्यावर मांडताना काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेण्यात आला आहे. उदा. उपलब्ध माहितीनुसार घटना स. १९९३ मध्ये घडते तर चित्रपटाचा आरंभच मुळी स. १९९५ मध्ये होतो. खेरीज हेबियस कॉर्पस द्वारे दाखल केलेल्या पिटिशन मध्येच केस निकाली निघाल्याचे इथे दाखलं असलं तरी प्रत्यक्षात असं नसतं.
 हेबियस कॉर्पस हा अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर  करण्यासाठीच्या प्रोसिजरचा एक पर्याय आहे. असो.

 चित्रपटाची कथा उघड असल्याने यासंबंधी लिहिण्यासारखे काही नाही. मात्र या अनुषंगाने ऐरणीवर येणारा प्रश्न म्हणजे पोलिसांकडून होणारा अधिकारांचा गैरवापर, समाजातील वंचितांचे स्थान व वाढत जाणारी सामाजिक विषमता. याबाबतीत देशातील कोणतेही राज्य दुसऱ्यापासून कमी नाही.

 माझ्या पिढीने खैरलांजीपासून आता अलीकडे घडलेल्या ( खरं म्हणजे उजेडात आलेल्या ) सांगलीच्या अनिकेत, भायखळ्याची मंजुळा शेट्ये प्रकरणांची चर्चा पाहिलीय. त्यात दोष सिद्धी झाली न् झाली या बाबी कधीच पुढे आल्या नाहीत.नगरच्या नितीन आगे प्रकरणात तर अन्यायाची परिसीमा झाली.
 ही तशी दखलपात्र उदाहरणं. अप्रसिद्ध अशी कितीतरी. पोलीस न्याय संस्थेत जर तुमचे आप्त स्नेही असतील तर असे कित्येक राजकन्नू, सेंगई तुम्हाला माहिती पडतील. एफआयआर नाही, केस नाही पण व्यक्ती तुरुंगात आहे. जामीनपात्र असुनही जामीन दिला जात नाही.

 सदोष पोलीस - न्याय यंत्रणेबाबत लिहावं तेवढं थोडंच. बदल सर्वांनाच हवाय पण मानसिकता नाही. मुळात आपल्यात सामाजिक ऐक्य, एकोपाच नाही.

 स्वतःवरील अन्यायाविरुद्ध कोणीही पेटून उठेल.  धर्म - वांशिकतेचा मुद्दा मांडला तर सामूहिक अन्यायाविरुद्ध समुदाय उभा राहतो. परंतु परिचित - अपरिचित, निर्दोष व्यक्तीवरील अन्यायाविरुद्ध लढण्यास कोण उभा राहतो ? हा प्रश्न प्रत्येक विचारी व्यक्तीने स्वतःला विचारलं पाहिजे.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

अहिंसक सत्याग्रहाने देशाला स्वातंत्र्य मिळाले काय ?



मनुष्य हा इतर प्राण्यांप्रमाणेच निसर्गतः हिंस्त्र स्वभावाचा आहे. ही गोष्ट लक्षात घेता शांततामय नागरी जीवनाकरता मर्यादित अहिंसा आवश्यक ठरते, हे प्रथमतः लक्षात घेतले पाहिजे.

अहिंसक मार्गापेक्षा हिंसक मार्गाने या देशाला स्वातंत्र्य अल्पावधीत मिळाले असते हे खरंय. परंतु त्यानंतर काय ? सत्ता कोणाची व कशाप्रकारची ? या मूलभूत प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. उदा :- स. १८५७ चा उठाव या मुख्य प्रश्नांमुळेच फसला होता व द्विराष्ट्रवाद तेव्हाच जन्मला होता, हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि या द्विराष्ट्रावादाच्या उभारणीचे पुण्य वैदिक पेशवाईकडे जाते, हे देखील आपणांस नाकबूल करता येत नाही. असो.

स. १८५७ चा अनुभव डोळ्यांसमोर असल्याने निःशस्त्र लढा स्वीकारण्यात आला, तो दुहेरी उद्देशांनी. प्रथम, स्वातंत्र्यप्राप्तीस अनुकूल समाजमन बनवणे व द्वितीय, प्रत्यक्ष स्वातंत्र्य प्राप्ती ! 
लोकांना स्वातंत्र्य, ऐक्य, एकता, एकात्मता यांची जाणीव करून देणे. जी स. १८५७ किंवा त्यानंतरही सामान्य जणांस व्यापक प्रमाणात करून देण्यास सशस्त्र मार्गाचे नेतृत्व कमी पडलं. 
टिळकांना जहाल राजकारणी मानतात, परंतु त्यांचे जहाल राजकारण तरी निःशस्त्र लढ्यापुढे जात होतं का ?

अहिंसक लढा उभारून गांधींनी भारतीय जनतेला शिस्तबद्ध आंदोलनाची दीक्षा दिली. आजही स्वतंत्र भारतात आंदोलनं होतात ती याच मार्गाने. हा परिणाम निव्वळ सशस्त्र क्रांतीने घडून आला असता का ? 

नेपोलियन फ्रांस तर स्टॅलिन रशियन राज्यक्रांतीचे अपत्य होते. मात्र हिटलर कोणत्या क्रांतीतून जन्माला आला ? त्याने सत्ता कोणत्या मार्गाने काबीज केली, हे आपणांस विसरता येईल का ? सशस्त्र लढ्यातून जन्माला आलेला झिम्बाब्वे आज कुठे आहे ? 

क्रांतिकारकांची भूमिका, त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा आमचा हेतू नाही. आम्हांला सशस्त्र व निःशस्त्र, या दोन्ही मार्गांनी देशस्वातंत्र्याकरता हौतात्म्य पत्करलेल्या व्यक्तींविषयी नितांत आदर, अभिमान व कृतज्ञता आहे. परंतु एका पक्षाची कड घेऊन दुसऱ्या पक्षीयांचा जाणीवपूर्वक उपमर्द करणं.. पर्यायाने या दोन्ही गटांतील देशभक्तांची, त्यांच्या त्याग - बलिदानाची टर उडवणाऱ्या स्वातंत्र्यद्वेष्ट्या विचारसरणीचा समाचार घेण्याचा, त्यांचं पितळ उघडं पाडण्याचा आमचा हेतू आहे.


बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

प्रासंगिक ( १० )



' वर्गविहीन समाज ' संकल्पना कितीही आरदर्शवत् असली तरी प्रत्यक्षात येणे शक्य नाही. निदान जोवर समाजाला शासन यंत्रणेची आवश्यकता आहे, तोवर तरी !

वर्गव्यवस्थेची अनेक रुपं असली तरी त्यातील ' जात ' ही वर्ग पद्धती अत्यंत विघातक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जाती अपरिवर्तनीय मानल्या जातात व जातीचे सदस्यत्व जन्मतः प्राप्त होते. थोडक्यात धर्म ऐच्छिक आहे तर जात अनैच्छिक.

तटस्थपणे जातीसंस्थेचा इतिहास पाहिला तर तिचा उगम श्रेणी संस्थेत आढळून येतो. ही श्रेणीसंस्था व्यावसायिकांची असून तिचे सदस्यत्व जन्मावर आधारित नव्हते.

कालौघात श्रेणीसंस्थेचे जातीसंस्थेत रूपांतर झाले व ती अपरिवर्तनीय मानण्यात येऊ लागली.

' जात ' ही वर्गरचना असल्याने यात उतरंड असणे स्वाभाविक आहे. जर हे सामाजिक स्थितीवर असते तर तिची दाहकता, विखार कोणाला जाणवला नसता. परंतु त्यांस अनुवंशिकत्व चिकटल्याने हा प्रकार अत्यंत जटिल बनला व प्रामुख्याने हिंदू समाजाची अपरिमित हानी झाली.

जातिसंस्था निर्मूलनाचे अनेक सामाजिक - कायदेशीर प्रयत्न झाले. परंतु ती खिळखिळी करण्यापलीकडे फारसे यश लाभलेलं नाही. 

' जात ' या संज्ञेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळातच निकोप नाही. स्पष्ट सांगायचं झाल्यास जाती निर्मूलन झाले पाहिजे म्हणणारेच जातिसंस्था बळकटीकरता प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. 
उदा :- गेल्या दहा पंधरा वर्षांत प्रत्येक जातीसमूहाने आपापल्या समाजातील दैवताच्या, होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या नावाने अभिवादनाचा प्रघात स्वीकारला आहे. यातून नेमकं काय साध्य होते ? 

आपापल्या जातीत होऊन गेलेल्या व्यक्ती विषयी कृतज्ञता दर्शवणे, देवतेचे नामसमरण करणे वगैरे भ्रामक युक्तिवाद या समर्थनार्थ केले जातात. परंतु अप्रत्यक्षरीत्या यातून प्रत्येक जात आपली स्वतंत्र ओळख जपण्यास आत्यंतिक प्रयत्नशील तथा आग्रही बनत जाते त्याचं काय ?
यातून जातीसंस्थेच्या बळकटीकरणास अप्रत्यक्षरीत्या हातभार लागून, ही जातिसंस्था समूळ नष्ट करण्यासाठी आपली उभी हयात वेचलेल्यांची एकप्रकारे विटंबना ठरत नाही का ? हा त्यांच्या कार्याचा अवमानच आहे. 

अज्ञ जणांना या गोष्टी समजायच्या तेव्हा समजतील परंतु स्वतःस सुज्ञ म्हणवणाऱ्यांनी तरी याबाबतीत विचार करणे आवश्यक आहे.