गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

' जय भीम ' चित्रपटाच्या निमित्ताने


वंचित घटकांवरील अन्याय, अत्याचार, शोषण आपणास नवीन नाही. या एका बाबतीत देशातील सर्व राज्यं आघाडीवर आहेत  म्हटलं तरी चालेल. ' जय भीम ' ही अशाच एका वंचितावरील अन्यायाची कहाणी.

 तामीळनाडूत स. १९९३ पासून स. २००६ पर्यंत घडलेली एक सत्य घटना. ज्यामध्ये चोरीच्या आरोपावरून राजकन्नू या निरपराध व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. लॉकअपमध्ये गुन्हा कबुलीकरता त्याचा छळ केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कस्टडीत झालेल्या मृत्यू लपवण्याची पोलिसांनी केलेली धडपड व मृत राजकन्नूची पत्नी -- सेंगईचा न्यायासाठी चाललेला अविरत संघर्ष पडद्यावर मांडताना काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेण्यात आला आहे. उदा. उपलब्ध माहितीनुसार घटना स. १९९३ मध्ये घडते तर चित्रपटाचा आरंभच मुळी स. १९९५ मध्ये होतो. खेरीज हेबियस कॉर्पस द्वारे दाखल केलेल्या पिटिशन मध्येच केस निकाली निघाल्याचे इथे दाखलं असलं तरी प्रत्यक्षात असं नसतं.
 हेबियस कॉर्पस हा अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर  करण्यासाठीच्या प्रोसिजरचा एक पर्याय आहे. असो.

 चित्रपटाची कथा उघड असल्याने यासंबंधी लिहिण्यासारखे काही नाही. मात्र या अनुषंगाने ऐरणीवर येणारा प्रश्न म्हणजे पोलिसांकडून होणारा अधिकारांचा गैरवापर, समाजातील वंचितांचे स्थान व वाढत जाणारी सामाजिक विषमता. याबाबतीत देशातील कोणतेही राज्य दुसऱ्यापासून कमी नाही.

 माझ्या पिढीने खैरलांजीपासून आता अलीकडे घडलेल्या ( खरं म्हणजे उजेडात आलेल्या ) सांगलीच्या अनिकेत, भायखळ्याची मंजुळा शेट्ये प्रकरणांची चर्चा पाहिलीय. त्यात दोष सिद्धी झाली न् झाली या बाबी कधीच पुढे आल्या नाहीत.नगरच्या नितीन आगे प्रकरणात तर अन्यायाची परिसीमा झाली.
 ही तशी दखलपात्र उदाहरणं. अप्रसिद्ध अशी कितीतरी. पोलीस न्याय संस्थेत जर तुमचे आप्त स्नेही असतील तर असे कित्येक राजकन्नू, सेंगई तुम्हाला माहिती पडतील. एफआयआर नाही, केस नाही पण व्यक्ती तुरुंगात आहे. जामीनपात्र असुनही जामीन दिला जात नाही.

 सदोष पोलीस - न्याय यंत्रणेबाबत लिहावं तेवढं थोडंच. बदल सर्वांनाच हवाय पण मानसिकता नाही. मुळात आपल्यात सामाजिक ऐक्य, एकोपाच नाही.

 स्वतःवरील अन्यायाविरुद्ध कोणीही पेटून उठेल.  धर्म - वांशिकतेचा मुद्दा मांडला तर सामूहिक अन्यायाविरुद्ध समुदाय उभा राहतो. परंतु परिचित - अपरिचित, निर्दोष व्यक्तीवरील अन्यायाविरुद्ध लढण्यास कोण उभा राहतो ? हा प्रश्न प्रत्येक विचारी व्यक्तीने स्वतःला विचारलं पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा