बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

प्रासंगिक ( १० )



' वर्गविहीन समाज ' संकल्पना कितीही आरदर्शवत् असली तरी प्रत्यक्षात येणे शक्य नाही. निदान जोवर समाजाला शासन यंत्रणेची आवश्यकता आहे, तोवर तरी !

वर्गव्यवस्थेची अनेक रुपं असली तरी त्यातील ' जात ' ही वर्ग पद्धती अत्यंत विघातक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जाती अपरिवर्तनीय मानल्या जातात व जातीचे सदस्यत्व जन्मतः प्राप्त होते. थोडक्यात धर्म ऐच्छिक आहे तर जात अनैच्छिक.

तटस्थपणे जातीसंस्थेचा इतिहास पाहिला तर तिचा उगम श्रेणी संस्थेत आढळून येतो. ही श्रेणीसंस्था व्यावसायिकांची असून तिचे सदस्यत्व जन्मावर आधारित नव्हते.

कालौघात श्रेणीसंस्थेचे जातीसंस्थेत रूपांतर झाले व ती अपरिवर्तनीय मानण्यात येऊ लागली.

' जात ' ही वर्गरचना असल्याने यात उतरंड असणे स्वाभाविक आहे. जर हे सामाजिक स्थितीवर असते तर तिची दाहकता, विखार कोणाला जाणवला नसता. परंतु त्यांस अनुवंशिकत्व चिकटल्याने हा प्रकार अत्यंत जटिल बनला व प्रामुख्याने हिंदू समाजाची अपरिमित हानी झाली.

जातिसंस्था निर्मूलनाचे अनेक सामाजिक - कायदेशीर प्रयत्न झाले. परंतु ती खिळखिळी करण्यापलीकडे फारसे यश लाभलेलं नाही. 

' जात ' या संज्ञेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळातच निकोप नाही. स्पष्ट सांगायचं झाल्यास जाती निर्मूलन झाले पाहिजे म्हणणारेच जातिसंस्था बळकटीकरता प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. 
उदा :- गेल्या दहा पंधरा वर्षांत प्रत्येक जातीसमूहाने आपापल्या समाजातील दैवताच्या, होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या नावाने अभिवादनाचा प्रघात स्वीकारला आहे. यातून नेमकं काय साध्य होते ? 

आपापल्या जातीत होऊन गेलेल्या व्यक्ती विषयी कृतज्ञता दर्शवणे, देवतेचे नामसमरण करणे वगैरे भ्रामक युक्तिवाद या समर्थनार्थ केले जातात. परंतु अप्रत्यक्षरीत्या यातून प्रत्येक जात आपली स्वतंत्र ओळख जपण्यास आत्यंतिक प्रयत्नशील तथा आग्रही बनत जाते त्याचं काय ?
यातून जातीसंस्थेच्या बळकटीकरणास अप्रत्यक्षरीत्या हातभार लागून, ही जातिसंस्था समूळ नष्ट करण्यासाठी आपली उभी हयात वेचलेल्यांची एकप्रकारे विटंबना ठरत नाही का ? हा त्यांच्या कार्याचा अवमानच आहे. 

अज्ञ जणांना या गोष्टी समजायच्या तेव्हा समजतील परंतु स्वतःस सुज्ञ म्हणवणाऱ्यांनी तरी याबाबतीत विचार करणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा