बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

अहिंसक सत्याग्रहाने देशाला स्वातंत्र्य मिळाले काय ?



मनुष्य हा इतर प्राण्यांप्रमाणेच निसर्गतः हिंस्त्र स्वभावाचा आहे. ही गोष्ट लक्षात घेता शांततामय नागरी जीवनाकरता मर्यादित अहिंसा आवश्यक ठरते, हे प्रथमतः लक्षात घेतले पाहिजे.

अहिंसक मार्गापेक्षा हिंसक मार्गाने या देशाला स्वातंत्र्य अल्पावधीत मिळाले असते हे खरंय. परंतु त्यानंतर काय ? सत्ता कोणाची व कशाप्रकारची ? या मूलभूत प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. उदा :- स. १८५७ चा उठाव या मुख्य प्रश्नांमुळेच फसला होता व द्विराष्ट्रवाद तेव्हाच जन्मला होता, हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि या द्विराष्ट्रावादाच्या उभारणीचे पुण्य वैदिक पेशवाईकडे जाते, हे देखील आपणांस नाकबूल करता येत नाही. असो.

स. १८५७ चा अनुभव डोळ्यांसमोर असल्याने निःशस्त्र लढा स्वीकारण्यात आला, तो दुहेरी उद्देशांनी. प्रथम, स्वातंत्र्यप्राप्तीस अनुकूल समाजमन बनवणे व द्वितीय, प्रत्यक्ष स्वातंत्र्य प्राप्ती ! 
लोकांना स्वातंत्र्य, ऐक्य, एकता, एकात्मता यांची जाणीव करून देणे. जी स. १८५७ किंवा त्यानंतरही सामान्य जणांस व्यापक प्रमाणात करून देण्यास सशस्त्र मार्गाचे नेतृत्व कमी पडलं. 
टिळकांना जहाल राजकारणी मानतात, परंतु त्यांचे जहाल राजकारण तरी निःशस्त्र लढ्यापुढे जात होतं का ?

अहिंसक लढा उभारून गांधींनी भारतीय जनतेला शिस्तबद्ध आंदोलनाची दीक्षा दिली. आजही स्वतंत्र भारतात आंदोलनं होतात ती याच मार्गाने. हा परिणाम निव्वळ सशस्त्र क्रांतीने घडून आला असता का ? 

नेपोलियन फ्रांस तर स्टॅलिन रशियन राज्यक्रांतीचे अपत्य होते. मात्र हिटलर कोणत्या क्रांतीतून जन्माला आला ? त्याने सत्ता कोणत्या मार्गाने काबीज केली, हे आपणांस विसरता येईल का ? सशस्त्र लढ्यातून जन्माला आलेला झिम्बाब्वे आज कुठे आहे ? 

क्रांतिकारकांची भूमिका, त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा आमचा हेतू नाही. आम्हांला सशस्त्र व निःशस्त्र, या दोन्ही मार्गांनी देशस्वातंत्र्याकरता हौतात्म्य पत्करलेल्या व्यक्तींविषयी नितांत आदर, अभिमान व कृतज्ञता आहे. परंतु एका पक्षाची कड घेऊन दुसऱ्या पक्षीयांचा जाणीवपूर्वक उपमर्द करणं.. पर्यायाने या दोन्ही गटांतील देशभक्तांची, त्यांच्या त्याग - बलिदानाची टर उडवणाऱ्या स्वातंत्र्यद्वेष्ट्या विचारसरणीचा समाचार घेण्याचा, त्यांचं पितळ उघडं पाडण्याचा आमचा हेतू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा