शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

प्रवास .... अनवट वाटेचा !

                                                     






    गेल्या कित्येक दिवसांची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत होती. पण नक्की काही दिवसांचीच का ? काळाची गणना करायचं तर मी खूप आधीच सोडून दिलं होतं. ज्याक्षणी काळाची परिमाणं हि मनुष्यनिर्मित व विशिष्ट अर्थाशी निगडीत असल्याचे उमगलं तेव्हाच. त्यामुळं दिवस, आठवडे, महिने हि परिमाणं आता माझ्या खिजगणतीतही नव्हती. परंतु, बराच काळ लोटला आहे एवढे मात्र निश्चित !



    तशी माझी अपेक्षा फार काही मोठी नाही. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या असंख्य मनुष्यप्राण्यांपैकी एक मी. माझी असून असून महत्त्वकांक्षा ती काय असणार ? तर मी राहतो या परिसरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तूमात्रावर माझी सत्ता. अगदी अनियंत्रित ! ज्याला स्थानिक कायद्याचेही बंधन नको अशी. अशी सत्ता मिळवण्यासाठीचे प्रचलित मार्ग सोडून मी अनवट वाट चोखळली. कारण, प्रचलित मार्गांची अखेर कोणापुढे तरी झुकण्यात होते याची मला कल्पना होती आणि कोणासमोर मानेतच काय पण कमरेत वाकणेही आपल्या रक्तात नव्हते !



    त्यामुळे वेगळ्या मार्गाची चाचपणी सुरु झाली. त्या, त्या क्षेत्रातील तज्ञांशी भेटून याविषयी आडून – आडून माहिती मिळवण्याचा मी प्रयत्नही केला. पण जे भेटले ते सर्वजण ‘ त्या मार्गाचे ‘ मार्गदर्शक तर नव्हतेच, पण माझ्यासारखेच ते अनभिज्ञ होते. सुरवातीलाच पदरी निराशा पडल्याने माझा उत्साह काहीसा मावळला. परंतु, इच्छित ध्येय गाठण्याची जिद्द अजून हरली नव्हती. मनाशी ठामपणे निर्णय घेत, आता इतरांचे मार्गदर्शन न घेता स्वतःहून वाट शोधण्याचं मी ठरवलं. पण हि वाट शोधायची तर कशी ?



    कथा – कादंबऱ्या किंवा चित्रपटांत अशा वेळी एखादा गरीब पण विद्वान असा वृद्ध वा तरुण ब्राम्हण किंवा साधू – महर्षी, तांत्रिक – मांत्रिक मदतीला आल्याचे आपल्या परिचयाचे आहे. पण प्रत्यक्ष जीवनात असे कोणी मदतीला येत नाही. कारण, मुळात अशी विद्वान आणि जाणकार माणसे अस्तित्वातच नसतात आणि असली तरी आपल्या उपयोगाची अजिबात नसतात ! म्हणून अशांना टाळून लिखित ग्रंथांकडे मी मोर्चा वळवला. या देशात कसरीने जेवढी पुस्तकांची पानं खाल्ली नसतील तेवढी मी वाचून काढली. अगदी डोळे लालीलाल होऊन डोळ्यांवर चाळशी चढून तिच्या चढत्या क्रमांकात वेळोवेळी वाढ होत गेली. परंतु हाती काय लागलं ?



    काहीच नाही. काळ मोठ्या झपाट्याने उलटून जात होता पण माझ्या इच्छित ध्येयाच्या प्राप्तीयज्ञात त्याने कसलाही खंड पडत नव्हता. आता आशे – निराशेचेही काही वाटत नव्हते. कारण, आशा काय आणि निराशा काय, दोन्ही केवळ शब्दच आहेत ! या शब्दांनी आपल्याला जो अपेक्षित अर्थ असतो, तो व्यक्त होतोच असे नाही. एवढं मी समजून चुकलो होतो. भाकरी – चपातीचे तुकडे मोडण्यापेक्षा पुस्तकांची पानं खाऊन शेवटी एकदाचा मला, माझं पूर्वनियोजित ध्येय गाठण्याचा मार्ग सापडला. तो मार्ग साधासुधा नव्हता. मनावर कसलेही नियंत्रण न ठेवता, कोणतेही तांत्रिक विधी वा उपचार न करता संधी मिळेल तेव्हा, ज्या अवस्थेत असू त्या अवस्थेत ध्यान लावण्याचा !




    अतिशय बिकट मार्ग ! उठता – बसता, खाता – पिता, झोपता मी या मार्गाचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागलो. खरोखर तुम्हांला सांगतो, काळवेळाचे भान तर मी आधीच हरपून बसलो होतो पण जगाचे काय देहाचेही अस्तित्व मी विसरत चाललो होतो. अशीच माझी साधना सुरु होती. शेवटचा माणसांत कधी मिसळलो होतो, शेवटचे शब्द कोणते उच्चारले होते याचेही मला स्मरण राहिले नव्हते. अशा प्रदीर्घ तपश्चर्येला इच्छित फळ मिळाले आणि मला साक्षात्कार झाला !



    या सृष्टीत वाईट आणि चांगली अशी कोणतीच अलौकिक, दैवी शक्ती अस्तित्वात नाही. या सृष्टीचा नियंता वाईट – चांगले, सत्य – असत्य असा कसलाच भेद मानत नाही आणि त्याला प्रसन्न करून घेण्याचा कोणताच मार्ग प्रचलित नाही. साक्षात्कार तर झालाच. पण जोडीला काहीतरी दिसलं होतं. कानावर काही शब्दही पडले होते. जे दिसलं, ऐकलं तो भ्रम होता का ? या शंकेला मनातून ताबडतोब नकारार्थी उत्तर आलं. ध्येय साधण्याचा मार्ग मला मिळाला होता. आता फक्त जे ऐकलं, पाहिलं त्यावर अंमल करायचं बाकी होतं !



    मनोइच्छित फलप्राप्तीच्या पूर्वतयारीसाठी प्रथम काही गोष्टी करणं गरजेचं होतं. कितीतरी काळाने मी आरश्यासमोर उभा राहून स्वतःला पाहत होतो. केसांच्या जंगलातून फक्त चष्मा व त्यातील दोन डोळेच दिसत होते. अंगावरील कपड्यांचा मुळचा रंग कधीच लोपून गेला होता. परंतु, त्या सर्वांची मला पर्वा नव्हती. मला माझे ध्येय गाठण्याची घाई होती. तेव्हा स्वतःविषयीच्या विचारांत वेळ न घालवता बाथरूमात जाऊन अंघोळीचा प्रयत्न केला. प्रयत्न यासाठी, कारण अंघोळ नेमकी कशी करायची हेच मी विसरून गेलो होतो. त्यानंतर अंगात बसतील असे कपडे चढवून आणि खिशात बसतील एवढे पैसे घेऊन बाहेर पडलो ते थेट सलूनमध्येच शिरलो !



    तिथे गेल्यावर बोलायचे काय हा प्रश्न मला पडला. कारण, आपल्याला जे करून हवं आहे ते नेमक्या शब्दांत मांडायचे कसे हेच मुळात मी विसरलो होतो. परंतु, तिथल्या खुर्चीवर बसल्यावर एक शब्दही बोलण्याची मला गरज पडली नाही. त्या ठिकाणी किती वेळ उलटून गेला माहिती नाही. मधल्या अवधीत मला अंमळ झोप लागली होती. जेव्हा जागा झालो तर पाहतो तो काय ....



    समोरच्या आरशांत एक अनोळखी प्रतिबिंब. चष्मा आणि अंगावरचे कपडे तेवढे परिचयाचे. बाकी सारं काही अपरिचित ! माझे मूळ रूप मीच विसरून गेलो होतो. प्रथमच मी स्वतःला निरखून पाहत होतो. त्यानंतर भानावर येत मी आसपास पहिले तर आजूबाजूला केसांचा, मोडक्या कात्र्या – कंगव्यांचा खच पडला होता. मी खुर्चीवरून उतरून मागे वळून पाहिले तर तीन – चार जण हाताला काहीतरी चोळत वाफळत्या तुकड्याने शेकत असल्याचे दिसले. मी जवळ गेलो. मला जवळ आल्याचे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेऐवजी भीतीच जास्त दिसली. मी त्यांच्या हातांकडे पाहिले तर हातांची बोटं चांगलीच सुजली होती. अनाहूतपणे माझा हात खिशाकडे गेला असता त्यांनी हातानेच नकार दर्शवत मला कोपरापासून हात जोडले. कदाचित हा माझ्या आजवरच्या साधनेचा परिणाम असावा !



    सलून मधून आल्यावर परत एकदा अंघोळीचा कार्यक्रम बऱ्यापैकी उरकून घेतला. यावेळी मागल्या खेपेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे अंघोळ करता आली. त्यानंतर कपडे घालून इच्छित ध्येयप्राप्तीच्या साधनेचे ठिकाण धुंडाळण्यास बाहेर पडलो. शहरवस्तीतून बराच दूरवर चालत आलो तरी ‘ जे पाहिलं ‘ होतं ते काही दृष्टीस पडेना. अखेर बरीच पायपीट केल्यावर रस्त्यापासून एका बाजूला जरा दूरवर अशा ठिकाणी ‘ दिसलेल्या ‘ स्थळासारखे ठिकाण दिसले. ते नजरेस पडताच वेगाने धावत मी तिकडे गेलो.



    आजूबाजूला उन्हाचा रख जाणवत असला तरी त्या स्थळी मात्र कमालीचा गारवा होता. एक दगडी बांधकामाची मोडकी वास्तू. त्या वास्तूच्या चिरांच्या आधाराने वाढलेल्या वेली आणि झुडपांचे जाळे. त्यामुळे कदाचित तिथे गारवा नांदत असावा. जे ठिकाण ‘ दिसलं ‘ होतं ते तर आता प्रत्यक्षात माझ्या समोर होते. नव्हे त्या वास्तूत मी होतो. आता फक्त ‘ ती प्रतिमा ‘ तिथे मूर्त स्वरुपात हवी होती. माझे आतुरतेने उत्सुकलेले डोळे ती मूर्ती शोधत होते. फार सायास त्यासाठी न पडता त्या वास्तूच्या थोडे आत गेल्यावर एका कोपऱ्यात ती मूर्ती मला आढळली. जशी ‘ दिसली ‘ अगदी तशीच !



    काळ्या दगडात खोदलेली. तीन तोंडं असलेली. त्या तिन्ही तोंडांना मिळून एक सोंडेसारखे काही. मधल्या तोंडाच्या कपाळावर एक उंचवटा. खाली गच्च भरलेलं पोट. सोंड आणि पोट परिचयाचं असल्याने मनात नकळत माझ्याच एक शंका अवतीर्ण झाली पण लगेच कानी पडलेले शब्द आठवले. त्या शब्दांची याद येताच मनातील शंका कुठच्या कुठे दूर पळाली. अखेर, मला जे हवं होतं ते मिळवण्याची संधी अशी माझ्या दृष्टीक्षेपात तरी आली होती. परत एकदा त्या मूर्तीला नीट पाहून मी तिथून बाहेर पडलो. आता अखेरच्या साधनेसाठी काही वस्तूंची गरज होती.



    सर्वप्रथम मी प्राणी संग्रहालयात गेलो. कारण, मुख्य विधीसाठी घुबडाची अतिशय गरज होती. आख्खे प्राणी संग्रहालय धुंडाळल्यावर मला एका पिंजऱ्यात घुबड आणि त्याचा रखवालदार दोन्ही एकदमच भेटले ! मी घुबडाकडे पाहून मग रखवालदाराकडे पाहिले आणि भलताच सजीव चुकून आत असल्याची मला जाणीव झाली. परंतु मनातलं चेहऱ्यावर न दाखवता मी त्याला, मला जे हवं होतं त्याची मागणी करत त्याच्या हाती काही पैसे टेकवले. तेव्हा झाकली मुठ खिशात नेत त्याने अजून चार – दोन तास वाट पाहण्यास सांगितले. ते चार न् दोन सहा असे मिळून सात – आठ तास घालवल्यावर अखेर घुबडाने प्रसन्न होऊन आपले पोट रिकामे केले. घुबडाचा तो ‘ प्रसाद ‘ रखवालदाराने मला एका प्लॅस्टीकच्या थैलीत गुंडाळून दिला. तो खिशात ठेवून आनंदाने मी अक्षरशः उड्या मारत मारत कत्तलखाना गाठला. पुढील ‘ यज्ञाकरता ‘ लागणारे काही पदार्थ मला येथूनच गोळा करायचे होते. त्या ठिकाणी बरीच शोधाशोध आणि घासाघीस केल्यावर जनावरांची मोठमोठी हाडे मला तासून मिळाली. ती एका पिशवीत घेऊन मी तडक स्मशानभूमी गाठली.



    पण त्या स्मशानात अगदीच स्मशानवत शांतता होती. तिथे हवं ते काही सापडलं नाही. तेव्हा ती सोडून दुसरी – तिसरी अशा कित्येक स्मशानभूम्या धुंडाळल्या. पण एकही ‘ जिवंत ‘स्मशानभूमी काही सापडायचं नाव नाही ! कमाल आहे. शहरात एवढी गर्दी असूनही स्मशान इतके रिकामे !! मनाशी आश्चर्य करत मी हार न मानता मानवी देहाचं सार्थक करणारी स्थळं शोधत राहिलो. पार पायाचं पीठ पडेपर्यंत पायपीट केली तेव्हा मला एक ‘ जिवंत ‘स्मशानभूमी सापडली. मी आनंदाने सर्व श्रम, वेदना विसरून त्या स्मशानात धावलो. माझा आवेग पाहून त्या जळत्या जीवाच्या भेटीकरता मी येत असल्याच्या गैरसमजातून तेथील चौकीदाराने मला कवळा घालून अडवले. तेव्हा कुठे मी भानावर आलो. उत्तेजनाचे आरंभीचे क्षण उलटून जाताच धीरगंभीर, संयत स्वरात त्या चौकीदारास माझी इच्छा सांगत त्यांस कोपऱ्यात नेले आणि त्याच्या खिशात मुठभर नोटा कोंबल्या. तेव्हा त्याने काही तास थांबा म्हणून मला सांगितले. ते ‘ तास ‘ भयंकर बेचैनीत मी कसेबसे घालवले. अखेर चिता शांत होताच चौकीदाराने मला हवी होती तशी ‘ राख आणि कोळसे ‘ एका थैलीत बांधून दिले.



    त्यानंतर उर्वरित सटरफटर वस्तू गोळा करून मी थेट त्या वास्तूकडे गेलो. आत जाताच विधी करण्याच्या जागेची थोडी साफ – सफाई करून त्यावर स्मशानातील राखेने काही आकृत्या बनवल्या. वर्तुळे निर्माण केली. जशी ‘ दिसली ‘ अगदी तशीच ! त्या वर्तुळांत मी बसलो व आकृत्या बनवल्या होत्या त्यावर होमकुंडाचे तयार भांडे ठेवले. काळ आणि माणसं खूपच बदलली होती. पूर्वी यज्ञाचे होमकुंड तयार करायला लागायचं आणि आता रेडीमेड ! होमकुंड व्यवस्थित ठेवल्यावर त्यांत प्राण्यांच्या अस्थी रचून त्यावर स्मशानातील कोळसे टाकले. जगातील निष्पाप प्राण्यांच्या मुत्राचे काही थेंब त्या विधीसाठी अत्यावश्यक असल्याने शहरात दिसेल त्या पशुला पकडून त्याचे मुत्र गोळा करून आणले होते. त्यात घुबडाची ‘ विष्ठा ‘ मिसळून तयार केलेले ते ‘ पवित्र तीर्थ ‘ मी त्या होमकुंडाभोवती, वर्तुळांभोवती शिंपडले. जागृत होणाऱ्या शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे ‘ कवच ‘ अत्यावश्यक होते. सर्व काही तयार झाल्यावर होमकुंडातील अस्थिसमिधा पेटवण्याकरता काही वाळक्या काटक्या व पालापाचोळा त्यात टाकून कुंड प्रज्वलित केले. कोळसा, अस्थि, पाला – पाचोळा, काटक्या आणि बरीचशी चरबी यांमुळे अग्नी चांगलाच पेटला. त्या आगीच्या उजेडात ती त्रिमुखी मूर्ती भयंकर सुंदर दिसत होती.



    हवनकुंड पेटताच मी त्या मूर्तीस्थित सृष्टी नियंत्याला आवाहन करण्यास आरंभ केला. उच्चारले जाणारे शब्द नव्हते. होता तो फक्त ध्वनी. जो मी ‘ त्यावेळी ‘ ऐकला होता. हळूहळू त्या ध्वनीची तीव्रता वाढू लागली. आसापासचे वातावरण बदलू लागले. वेगवेगळे गंध दरवळू लागले. हवाही विचित्र बनली. कधी थंडगार तर कधी अतिउष्ण ! काळाच्या साऱ्या मित्या उलगडू लागल्या. चित्रविचित्र आवाज, आकृत्या, चेहरे देह अवतीर्ण होऊ लागले. काय नव्हतं त्यात ?



    चेटकीण – हडळ सम विद्रूप, विचित्र चेहरे असलेल्या स्त्रिया मोठमोठ्याने खदाखदा रडत होत्या. पिशाच्चसम पुरुष ढसाढसा हसत होते. दूरवरून कुत्र्यांचा सुरात गाण्याचा आवाज येत होता. कोकिळेचे बेसुर विव्हळणे ऐकू येऊ लागले होते. एखाद्या नवख्या साधकास विचलित करण्यासाठी ते पुरेसं होतं. परंतु मला ‘ साक्षात्कार ‘ झालेला असल्याने सर्व सत्य मी जाणत होतो. अर्थात सत्य तर शेवटी शब्दचं ना !



    हि सर्व मंडळी मोठ्या आवेगाने माझ्यावर झडप घालण्यासाठी धा - धावून येत होती. परंतु त्या ‘ संरक्षित ‘ वर्तुळात मी असल्याने त्यांचा नाईलाज होत होता. पहिला हल्ला व्यवस्थित परतवला गेला होता. पण त्यांचे प्रयत्न थांबले नव्हते. अनेक मार्गांनी ते मला विचलित करु लागले होते. आत्यंतिक मनोनिग्रहाने मी त्यांची आक्रमणे परतवून लावत होतो. अखेर त्यांनी निर्वाणीचे शस्त्र उपसले !



    किळसवाण्या पदार्थांनी भरलेली ताटं, असह्य गंधयुक्त द्रावणाची भांडी तिथे प्रकट होऊ लागली. विविध दगड – धोंड्यांनी, मातीने भरलेल्या पेट्या अवतीर्ण होऊ लागल्या. या दृश्य वस्तूंनी माझे मन क्षणभर मोहित झाले खरे ! कारण नजरबंदीच्या या खेळातील ‘ प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्य भासमान रुपामागील सत्य स्वरूप ‘ मला स्पष्टपणे जाणवत होते. अर्थात, आजवरच्या साधनेतून एवढी शक्ती मी निश्चित कमवली होती. त्यामुळे क्षणभरातच मी मोहावर विजय मिळवत त्या पदार्थांकडे दुर्लक्ष करत ध्वनीचा उच्चार अधिक वेगाने व मोठ्याने करू लागलो.



    माझ्या कृतीत व  उच्चारांत खंड न पडल्याने रागाने चवताळून त्या भयंकर विद्रूप रूपातील स्त्रिया माझ्या दिशेने धावल्या. त्यांच्या त्या विद्रूप रूपातील सौंदर्याने, संतापाने जागृत झालेल्या मीलनोत्सुक भावाने माझे मन आणि शरीर काही क्षण मोहित झाले. उच्चाराचा वेग मंदावू लागला. आवाजाची तीव्रता कमी होऊ लागली. पाठोपाठ त्यांचे विद्रूप चेहरे रूप बदलू लागले. तशी वास्तवाची जाणीव मला झाली आणि मनातले विचार झटकून, बंड करून उठलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करून साधना जारी ठेवली आणि अक्षरशः मोठमोठ्याने मी ओरडू लागलो. अखेर ....




    .... त्या भयंकर सुंदर त्रिमुखी मूर्तीत चैतन्य अवतीर्ण होऊन ती ‘ साजिवंत ‘ झाली. आपल्या मूळ स्थानावरून उठून ती देवता माझ्याकडे चालत आली. तिच्या नजरेला नजर भिडवत माझे ध्वनी उच्चारणे सुरूच होते. रौद्रपणे गडगडाटी आरोळ्या ठोकत त्या देवतेने माझ्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि ....


     .... क्षणभरात माझ्या कंठातून बाहेर पडणारा ध्वनी बंद होऊन माझे शरीर हवेत विरघळू लागले. अगदी मी स्वतःलाच दिसेनासा झालो. काही क्षणांत मी त्या वातावरणात पुरता मिसळून गेलो आणि नंतर पाहतो तो काय ? सर्व कसं शांत झालं होतं. तिथे ती मूर्ती आपल्या मूळ जागी तशीच होती. वास्तूच्या आवारातल यज्ञविधीच्या कसल्याच खाणा – खुणा दिसत नव्हत्या. इतकेच काय पण मला माझ्याच शरीराचे कसलेच अस्तित्व जाणवत नव्हते. ‘ मी ‘ असल्याची मला जाणीव होती पण ‘ असण्याच्या ‘ कसल्याच संवेदना जाणवत नव्हत्या !