रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

संवाद





    सर्वत्र अस्वस्थता, अशांतता धुमसतेय. सगळीकडे एकप्रकारची खदखद दाटून राहिलीय. वातावरण तसं बनलंय कि लोकं ? सगळीकडे बुभूक्षितांचे तांडे फिरताहेत. स्वतःच अस्तित्व जपण्याच्या प्रयत्नात  प्रत्येकजण अधिकाधिक हिंस्त्र होत चाललाय. इथं धोका प्रत्येकाला आहे. पण कोणाला कोणापासून ?
    प्रत्येकावर शिक्क्याची छाप आहे. वेगवेगळ्या छापांचे शिक्के मिरवणारी माणसं. दुसऱ्या गटाचा शिक्केधारी दिसला कि तुटून पडायला तयार. पण हे सारं कशासाठी ?
    सुखकर जीवनासाठी समाजाने निर्माण केलेल्या संस्था आज समाजाचेच नियमन, नियंत्रण करताहेत.
    साधी बाब. प्रशासनासाठी उमेदवार निवडून देण्याची. पण त्यासाठी कोण यातायात ? आधी सामाजिक मुद्दे. नंतर मंदिरवाले आले. परत फिरून अर्थकारण दिसले. नंतर मग ट्रेंड बदलत गेला. विकास विकास म्हणत आम्ही बलात्कार, खून या मुद्द्यांना प्रचाराचे साधन मानले. निवडणुका जवळ आल्या कि, पद्धतशीरपणे वखवखलेली खरी - खोटी बोकडं बायका धरून त्यांच्यावर चढायला मोकळी होऊ लागलीत. मग यातून आख्ख्या समाजाची होरपळ. पण पाच वर्षांच्या सत्तेची निश्चिती ! पुढचा मुद्दा काय असेल ?
    अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा अद्यापही भागवता येत नाहीत. पुढच्या गोष्टींची तर बातच नाही. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात आभाळ पाठीवर पडलेला ससा आहे. हा धास्तावलेला ससा....
    दररोज किड्यामुंग्यागत जन्माला येणारी व मरणारी माणसं. प्राणीसृष्टीतील सर्वात विकसित जमात. जी इतर जमातींसह आपल्यातच उरबसणीला केव्हाही तयार. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींसाठी मरा - मारायलाही हीच व मेलेल्यांसाठी मोठमोठ्याने गळे काढायलाही हीच ! कदाचित याच गोष्टीमुळे हि सर्वात विकसित जमात बनली असावी.
     पण मग यांच्यात आणि मनोरुग्णांत फरक तो काय ? कि, इथेही संख्याबळ ? ते अल्पमतात म्हणून हॉस्पिटलात व हे बहुमतात म्हणून .....