शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

वैदिकांचे हिंदू धर्मियांवर घाला घालण्याचे कारस्थान !



आम्ही हिंदू सोशिक आहोत का ?
आम्ही हिंदू निरक्षर, अडाणी आहोत का ?
आम्ही हिंदू अशक्त, दुर्बल आहोत का ?
नाही ना.. .. मग आम्ही नेहमी इतरांचे गुलाम का बनतो ? हा प्रश्न प्रत्येक हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीने स्वतःस विचारला पाहिजे. दरवेळी परधर्मियाने यावं न् आपल्याला तुडवून टाकावं. त्यानंतर आपल्यातील एक मसीहा बनावा. त्याने त्याने दास्यत्वातून आपली सुटका करावी तोच त्याचा अंत होऊन पुन्हा गुलामीच्या शृंखला पायी पडाव्यात. हे चक्र कुठवर चालायचं ? एखाद्या गर्भश्रीमंताच्या घरी नादान व्यक्ती जन्मून त्यास भिकेचे डोहाळे लागावे, तसे आमचे का व्हावे ? आमची संशोधने, आमचा इतिहास, संस्कृती यांचे आमच्याच डोळ्यांदेखत अपहरण होत असता आम्ही स्वस्थ का बसून राहावे ?
घडून गेलेल्या गोष्टींवर काथ्याकुट काय करायचा असा जर आमचा भ्रम असेल तर तो साफ चुकीचा असून या भ्रमातून वेळीच बाहेर न पडल्यास आणखी एका गुलामीच्या चक्रात आपण अडकून पडणार आहोत.
कित्येकांना हि इस्लाम वा ख्रिस्त्यांची धार्मिक गुलामी वाटेल. अथवा परराष्ट्राची आर्थिक. पण तसे नाही. या क्षणी हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी समस्त वैदिक धर्मीय आपले बाहू सरसावून पुढे येत आहेत. जरा उघड्या डोळ्यांनी, स्वतंत्र बुद्धीने विचार करून पहा..
राज्यघटना मान्य नाही म्हणत तिचे दहन करायचे व हे सर्व कृत्य राज्यघटनेनेच दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारात करून मोकळे व्हायचे.
न्यायदानाकरता असलेली निःपक्षपाती, निधर्मी न्यायसंस्था ठोकरून लावत हिंदू न्यायालयाच्या नावाखाली वैदिक न्यायालये उभारायची. जी वैदिक स्मृती शास्त्रांधारे न्यायदान करतील.
याच गोष्टी एखाद्या पर धर्मीय समुदायाने केल्या असत्या तर... ? हि वैदिक मंडळी नागडी नाचली असती. परंतु जेव्हा स्वतःच असे वागतात तेव्हा...
राष्ट्रप्रेम, देशभक्ती वगैरेच्या लंब्याचवड्या बाता माराव्यात तर यांनीच.. जणू काही आम्हांला राष्ट्रप्रेम वगैरे काही माहितीच नाही... परंतु त्यांचेही काही चुकत नाही. आम्हांला काही म्हणजे काहीच समजत नाही हाच तर खरा प्रॉब्लेम आहे.  
उदाहरणार्थ गांधी हत्या.
म्हाताऱ्याने फाळणीला मन्यता दिली, पंचावन्न कोटी देण्यासाठी उपोषणाला बसला म्हणून त्याला उडवला. मान्य. पण एकट्या गांधीच्या मान्यतेनेच देशाची फाळणी झाली का ? सावरकरांचा द्विराष्ट्रवाद सिद्धांत कुठे गेला ? आंबेडकरांनीही तो मांडला होता. जिना वगैरे मंडळी तर लचकेच तोडायला बसली होती. मग एकटा गांधीच का ? गांधी हत्या झाली त्यावेळी पंडित नथुरामांचे ते व्यक्तिगत प्रेरणेतून घडलेलं कृत्य होतं न् आता मात्र संघटीत, नियोजनपूर्व असल्याचे म्हटले जाते. मग इतकेच संघटन, नोयोज्न होते तर स्वतंत्र पाकिस्तान मागणारी नेतेमंडळीही उडवून टाकायची ना ?
गांधी हत्या ना फाळणीच्या कारणावरून घडली ना पंचावन्न कोटींच्या उपोषणामुळे. ती होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अखिल भरतोय हिंदूंचे एकमेव असलेलं राजकीय नेतृत्व संपुष्टात आणणे. आणि गांधी नंतरचा इतिहास डोळसपणे अभ्यासाल तर या हेतुत वैदिक मंडळी कमालीची यशस्वी झाल्याचे दिसून येते.
राज्यघटनेच्या जन्मापासून तर तिच्या वैदिकांचे वाकडेच आहे. त्यानंतर नंबर लागतो राष्ट्रगीताचा. मग ते कधी ते इंग्लंडच्या राजाच्या गौरवार्थ रचल्याचे किंवा त्यात उल्लेखलेला प्रदेश, नद्या आज भारताच्या ताब्यात नाहीत वगैरे बाबी उपस्थित करत जनसामान्यांच्या तोंडी बसलेलं जन गण मन वजा करून तिथे संस्कृतप्रचुर वंदेमातरम् वगैरेंची वर्णी लागावी याकरता धडपड करायची. म्हणजे पुन्हा तिथेही केवळ उच्चार चुकीचा होऊ नये म्हणून एकाधिकारशाही आलीच !
तिरंग्याचीही तीच तऱ्हा. त्यावर नंतर कधीतरी बोलू. आता न्यायसंस्था. मुस्लिमांची शरीयत वगैरे आहे हिंदूंची का नसावी ? लक्षात घ्या, यातली नेमकी खोच. मुस्लिमांची धार्मिक न्यायसंस्था असली तरी ती अगदीच कौटुंबिक वगैरे बाबत आहे. बाकी दिवाणी, फौजदारी तर आयपीसी नुसारच आहे ना ? आणि हिंदूंची स्वतंत्र न्यायालये नाहीत हा दिव्य शोध वैदिकांनी कधी लावला ?
पुरातन काळापासून चालत आलेल्या श्रेणीसंस्था -- ज्यांना आता आपण जात पंचायत, जाती संस्था म्हणतो, त्या मग काय आहेत ? ग्रामीण भागात आजही शेष स्वरूपात असलेली भावकी बसणे वगैरे स्वतंत्र न्यायसंस्थेचाच भाग नाही का ?
उलट हिंदू न्यायालयांच्या नावाखाली यांना आपली स्वतंत्र वैदिक न्यायालये काढायची आहेत जी पूर्णतः वैदिक स्मृती शास्त्रांवर आधारित असतील. त्यातील नियमांनुसार तुमचा न्याय होईल. त्यातील सामाजिक वर्तनाचे नियम तुमच्यावर लादले जातील. त्यातील वर्णव्यवस्था अंशतः, रचनात्मक वा रुपांतरीत पद्धतीने अंमलात आणली जाईल. आणि महत्त्वाचे म्हणजे जी मनुस्मृती आजवर भारतात गैर हिंदूंना कधीच लागू नव्हती... ती त्यांच्यावर लादण्यात येईल !