शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

कथा

                                  ( १ )

" जलालाबादेहून संदेश आला आहे. "

".. .. "

" त्यांना आपली योजना मंजूर आहे. "

" … .. "

" .. पण एक शंका आहे. "

" .. .. "

" तो जायला तयार होईल का ? "

" त्याच्यासमोर दुसरा पर्याय आहे ! "

" मग कधीचा मुहूर्त धरायचा ? "

" आज सोमवारी.. येत्या शुक्रवारी तो तिथं गेला पाहिजे. सरप्राईज व्हिजिटि यापलीकडे त्याला या भेटीबाबत कसलाही तपशील देऊ नका. "

" परंतु तिथे गेल्यावर.. "

" मग तुम्ही कशाला आहात ? "

" .. .. "

" घाबरलात ? "

" तसं नाही गुरुजी.. पण एकदम अचानक असं.. "

" इतिहास घडवण्याची जबाबदारी सांगून सवरून नाही, तर अनपेक्षितपणेच खांद्यावर पडते दामले. तेव्हा जास्तीची चिंता सोडा. आपला धर्म, समाज यांच्याकरता या महत्कृत्यास तयार व्हा. .. या आता ! "


                               ( २ )

" रसूल.. "

" जी मौलवी साब.. "

" तो मुहाजिर तयार आहे का ? "

" कौन, जनरल साब.. "

" हां, तोच तो कंबख्त.. "

" जी, त्यांची पूर्ण तयारी झाली आहे. "

" कारगिलला पण झाली होती ना ! "

" जनाब … "

" तू काही पण म्हण.. पण आमचा या मुहाजिरांवर बिलकुल भरोसा नाही. शेवटी कितीही झाले तरी हिंदुस्थानी ते हिंदुस्थानीच ! आमच्या सारख्या खानदानी मुसलमिनांची सर त्यांना थोडीच येणार !! "

" .. .. "

" खैर, वो जाने दो. त्या मुहाजिरला सांग. जुम्म्याच्या दिवशी तयार रहा. आमचा निरोप मिळताच थेट इस्लामाबादेत त्याने जायचं व आमच्या पुढील संदेशाची वाट बघायची. समजलं ? "

" जी, मौलवी साब. "

" आणी एक.. यावेळी त्याच्यासोबत सईद मिर्झाला राहायला सांग. त्या काफरवर आमचा बिलकुल भरवसा नाही. "

" जनाब… मुहाजिर ठीक आहे, पण जनरल साहेबांना काफर.. .. "

" काफिर नाही तर काय ! कधी त्याने नमाज पढल्याचं, कुराणची तिलावत केल्याचं ऐकलं.. पाहिलं आहेस ? "

" .. .. "

" नाही ना ! केवळ इस्लाम स्वीकारल्याने कोणी मुसलमान होत नसतं. इस्लाम रक्तातही भिनवावा लागतो ! " 


                               ( ३ )

इस्लामाबादेतील वातावरण तंग होतं. खुद्द पंतप्रधान लागोपाठ येणाऱ्या बातम्यांनी कमालीचे अस्वस्थ झाले होते. कसल्याही पूर्वसूचनेशिवाय भारतीय पंतप्रधानांचा हवाई काफ़िला पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाला होता. इतकेच नव्हे तर इस्लामाबाद एअरपोर्टवर उतरण्यासाठी ते परवानगी मागत होते. त्याचवेळेस पाकिस्तान सैन्यातील बव्हंशी वरिष्ठ सैन्याधिकारी राजधानीत दाखल होत असल्याचा वार्ता येत होत्या. 

पाकिस्तानात तख्ताबदल किंवा लष्करी अधिकाऱ्यांचा बंडावा नवीन नव्हता. परंतु एकाचवेळी अचानक घडून आलेल्या या दोन घटनांमध्ये कसलाही परस्पर संबंध नसून निव्वळ योगायोग असावा यावर पाकिस्तानी पंतप्रधानांचे सावध मन अजिबात विश्वास ठेवायला तयार नव्हते. 


" याकूब.. "

" जनाब.. "

" इस्लामाबाद एअरपोर्ट रिकामं करून तिथे भारतीय प्राईम मिनिस्टरच्या विमानाला उतरण्याची परमिशन द्या. त्यांच्या स्वागताला परराष्ट्रमंत्री जातील व त्यांची आमची भेट आमच्या निवासस्थानी घडून येईल. "

" जनाब.. "

" रियाजला सांगून राजधानीत गोळा होणाऱ्या मिलिटरी ऑफिसर्सना ताबडतोब राजधानीतून बाहेर पाठवण्याची व्यवस्था करा. "

" पण ते स्वेच्छेने जाण्यास तयार झाले नाहीत तर… "

" तर अरेस्ट करा. याक्षणी आम्हांला राजधानीत कसलाही गोंधळ नकोय. इंडियन प्राईम मिनिस्टरच्या सरप्राईज व्हिजिटने जगाचे लक्ष इस्लामाबादेकडे लागून राहिले असताना या बेवकुफांच्या हरकतीने आम्हांला जगासमोर खाली मान घालण्याची वेळ येऊ देऊ नका. "

" जनाब… "

" आणखी एक.. "

" … .. "

".. .. इंडियन प्राईम मिनिस्टर ज्यावेळी परत जाण्यासाठी एअरपोर्टसाठी निघतील तेव्हाच आमचा परिवार देखील त्यांच्या पाठोपाठ जाईल. त्यांच्यासाठी इंग्लंडला जाणाऱ्या फ्लाईटची अरेंजमेंट करून ठेवा. "

" याची आवश्यकता पडेल ? "

" याकूब.. यह पाकिस्तान है.. इथं रक्त सांडल्याशिवाय तख्त बदलत नसतं. गाफील राहून चालणार नाही. "

" जनाब.. "


                              ( ४ )


" मि. प्राईम मिनिस्टर आप के हिम्मत की दाद देनी होगी. हिंदुस्थान का कोई पोलिटिकल लीडर इस तरह आज तक कभी पाकिस्तान में नहीं आया. "

" देखिए मियाँ.. पहले तो यह औपचारिकता.. प्राइम मिनिस्टर वगैरह कहना छोड़ दीजिए.. आपली ही भेट राजकीय स्वरूपाची नसून केवळ सदिच्छा भेट आहे. गेल्या सहा सात दशकांत तुम्ही आम्ही खूप भोगलं आहे. आणि आपल्या कलहात इतर देश आपला स्वार्थ साधून मोठे झालेत. "

" बात तो सही है.. मगर.. "

" अजी छोड़ दीजिए यह अगर मगर.. क्या रखा है इसमें ? आपके कायदे आजम और हमारे गांधी.. दोनों महान हस्तियां.. अगर साथ मिल जाते तो.. "

" तो अखंड हिंदुस्तान दुनिया पर राज करता. "

" आप ने तो मेरे मुँह की बात छीन ली. "

" तो बताइए.. आप चाहते क्या है ? इस मुलाकात का मकसद क्या है ? "

" जी, कुछ नहीं. बस एक भाई अपने भाई से.. परिवार से मिलने आया है. "

" मि. प्राइम मिनिस्टर.. शायद आपको यह याद होगा.. हमारे मरहूम जनरल जिया उल हक. एक बार हिन्दुस्थान आए थे.. "

" … "

" बिल्कुल आप की तरह.. बिना बताए.. उन दिनों राजीव गांधी की सरकार थी.. और दोनों मुल्कों के बीच कुछ अच्छे ताल्लुकात नहीं थे.. "

" .. .. "

" तब आपके मुल्क में भारत - पाकिस्तान क्रिकेट मैच चल रहा था और जनरल साब वो देखने वहाँ चले आए थे.. .. "

" .. . "

" हमारे कहने का मतलब है के.. दोनों मुल्कों में अमन रहे. यही हमारी दिली ख्वाहिश है पण.. .हे काय ? गोळ्यांचे आवाज कुठून येत आहेत ? मि. प्राईम मिनिस्टर.. प्लिज आपण या टेबलाखाली लपा.. याकूब.. याकूब.. हा काय गोंधळ आहे.... आह.. या अल्लाह.. कौन हो तुम ? क्या चाहिए तुम्हें ? नहीं.. नहीं.. उन्हें छोड़ो.. वो हमारे मेहमान है.. यह क्या कर रहे हो.. कहाँ ले जा रहे हो हमें.. छोड़ो.. छोड़ो.."


                             ( ५ ) 


" मि. प्रेसिडेंट.. भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढतच चालला आहे. "

" नवीन काही अपडेट्स ? "

" मि. प्रेसिडेंट, याक्षणी दहशतवादी संघटनांनी उभय देशांच्या पंतप्रधानांना बंदी बनवले असून त्यांनी भारताच्या पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत. "

" कोणत्या ? "

" एक. सध्याचं पाकिस्तानातील सरकार उलथून जी राजवट येईल तिला मान्यता देणे. आणि उर्वरित कश्मिर पाकिस्तानकडे सोपवणे. "

" इट्स इम्पॉसिबल.. भारत या अटी कधीच मान्य करणार नाही. "

" ते त्यांनाही माहिती आहे. कदाचित वाटाघाटींमधून यात मार्गही निघेल. परंतु दहशतवाद्यांच्या या मागणीला बीजिंगने उचलून धरलं असून कश्मिरवर ताबा मिळवणे पाकिस्तानी सैन्याला सोयीस्कर जावं यासाठी चिनी फौजा सरहद्दीकडे दाखल होत आहेत. "

" हम्म.. आणि मॉस्को ? "

" मि. प्रेसिडेंट, मॉस्कोने यावेळी वेट अँड वॉच धोरण स्वीकारलं आहे. "

" का ? ते तर भारताचे पाठीराखे आहेत ना ? "

" मि. प्रेसिडेंट.. याक्षणी मॉस्कोने ठरवलं तरी प्रत्यक्ष मदत करणे त्यांना शक्य नाही. पाकिस्तानवर दबाव टाकायचा झाल्यास त्यांना अफगाणिस्तानात उतरावं लागेल आणि सध्याच्या परिस्थितीत रशिया हे साहस अंगावर घेईल असं वाटत नाही. "

" परंतु चायनाचं मिडल ईस्ट एशियात वाढणारं वजन आपल्या इतकंच मॉस्कोलाही खपण्यासारखं नाही, हे तुम्ही विसरत आहात मि. वॉटसन. "

" मि. प्रेसिडेंट, आपल्या म्हणण्यात तथ्य असलं तरी रशियाला या प्रकरणात थेट हस्तक्षेप करणं सध्या तरी शक्य नाही, असंच आमचं मत आहे. "

" ओके. मि. ऑर्थर.. तुम्हांला काय वाटतं ? आपण कोणती भूमिका घ्यायला पाहिजे ? "

" मि. प्रेसिडेंट.. याक्षणी आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात युद्ध खेळण्यासाठी सक्षम असलो तरी दीर्घकालीन युद्धकरता आपली अद्यापि पुरेशी तयारी झालेली नाही. "

" म्हणजे ? "

" मि. प्रेसिडेंट, असा काही पेच उपस्थित होईल याची कल्पनाच नसल्याने यासंबंधी आपली कसलीही रणनीती आखली गेलेली नाही. "

" हम्म.. म्हणजे पहिल्या दोन वर्ल्ड वॉर पेक्षा वेगळी परंतु त्याच दिशेने जाणारी ही परिस्थिती आहे तर.. "

" होय.. आणि मि. प्रेसिडेंट.. मला व्यक्तिशः वाटतं की अमेरिकन राष्ट्राने पहिल्या दोन महायुद्धांप्रमाणे यातही तटस्थ राहावं. "

" वेल.. मि. ऑर्थर.. तुमचा सल्ला योग्य आहे परंतु याक्षणी आम्हांला तटस्थतेची भूमिका स्वीकारता येत नाही. वॉटसन.. भारताला संदेश पाठवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. बीजिंगला सांगा.. परिस्थिती चिघळेल असे निर्णय घेऊ नये. जगाची शांतता अबाधित राखणं आपलं कर्तव्य आहे आणि… जलालाबादेतील त्या धूर्त कोल्ह्याला सांगा.. याक्षणी बाजी त्याने जिंकली असली तरी गाठ आमच्याशी आहे ! "


                                  ( ६ )


" जोगळेकर.. जलालाबादहून काही संदेश ? "

" अजून नाही आला.. परंतु आपल्या गृहमंत्र्यांनी कामगिरी फत्ते केली आहे. "

" हम्म.. विरोधी पक्षांची काही वार्ता ? "

" त्यांनी विरोध दर्शवला खरा परंतु त्यांचं संख्याबळ ते काय ! शिवाय खुद्द राष्ट्रपतींनी आपली बाजू उचलून धरल्याने आणीबाणी स्वीकारण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच राहिला नाही. "

" अजून काही.. "

" गुरुजी एक शंका आहे. "

" बोला.. "

" आणीबाणी जाहीर केली असली तरी राष्ट्रपतींच्या सल्लागार मंडळाचे प्रमुखपद पंतप्रधानांकडे असते. या परिस्थितीत ते कोणाकडे द्यायचे ? "

" हम्म.. प्रश्न अवघड आहे खरा ! कर्वे, आपल्या पुरस्कर्त्यांचं याबाबतीत काय मत आहे ? "

" गुरुजी, पंतप्रधान शत्रूच्या ताब्यात गेल्याने ते गडबडले आहेत. याक्षणी त्यांना मुख्य आधार व भरवसा फक्त तुमचा आणि गृहमंत्र्यांचाच वाटतोय. "

" हं.. व्यापारी आदमी. त्यांना फायद्याखेरीज दुसरं काय दिसणार म्हणा ! "

" गुरुजी, राग येणार नसेल तर एक विचारू ? "

" अवश्य विचारा.. शेवटी तुम्ही तर आमचे आत्मीय आहात. "

" जर पंतप्रधान परत आले नाहीत किंवा उभय देशांदरम्यान एक छोटंसं युद्ध घडून आलं तर… "

" जोगळेकर, तुम्हांला काय वाटतं ? "

" गुरुजी, माझंही कर्व्यांप्रमाणेच थोडंफार मत आहे. परंतु फक्त पंतप्रधानांच्या बाबतीत. युद्धाच्या बाबतीत म्हणाल तर ती शक्यता दिसत नाही. "

" का बरं ? "

" तुम्ही सर्वज्ञ आहात गुरुजी. तरीही मर्यादा उल्लंघनेचा प्रमाद करून बोलतो की, अमेरिकेने आपल्याला दर्शवलेला पाठींबा चीनला पाकिस्तानची मदत करण्यापासून निश्चित परावृत्त करेल आणि असा जबरदस्त बाह्य पाठिंबा असल्याखेरीज पाकिस्तानची आपल्या सोबत युद्ध करण्याची हिंमत होणार नाही. याचे इतिहासात भरपूर दाखले आहेत. "

" कर्वे, जोगळेकर.. आपापल्या जागी तुम्ही दोघे बरोबर आहात. असो. आता आपल्या गृहमंत्र्यांना निरोप पाठवा. भारतीय सेना मोठ्या संख्येने पाकिस्तानच्या हद्दीवर उभी राहिली पाहिजे. तसेच राष्ट्रपती पदावर आपल्याला बर्व्यांच्या जावयाची, हुसेनची नियुक्ती करायची आहे. त्यादृष्टीने रणनीती आखण्यास सांगा. आणि हो.. हिंदू-मुस्लिम सलोखा कायम राहील, त्याला तडा जाणार नाही याकडे विशेष लक्ष पुरवा. याबाबतीत जरा जरी चूक झाली तरी ती अक्षम्य मानण्यात येईल. समजलं ? "


                                ( ७ )


" कौन..?  रसूल..? इस समय ?? "

" गुस्ताखीची मुआफ़ी असावी मौलवी साब.. पण खबरच अशी आहे की.. "

" बेफिजूल बातें छोड़ो और मतलब की बात करो.. "

" जी, इस्लामाबादेत जनरल साहेबांची हुकूमत कायम झाली असून भारताने तिला मान्यता दिली आहे. "

" बहोत खूब ! मग यात एवढी तातडी करण्याची गरज काय ? थोड़ी देर बाद भी यह खबर सुना सकते थे ! खामखाह हमारी नींद में खलल डाल दी ! "

" गुस्ताखी मुआफ़ हुजूर, परंतु भारताने कश्मिर देण्यास इन्कार केला आहे आणि.. "

" जो भी है, खुलकर बताओ.. "

" चीनी लष्कर आपल्या मदतीसाठी सरहद्दीवर येऊन दाखल झालं आहे. आपल्या इशाऱ्याची देर आहे. आपल्या सैन्यासोबत ते हिंदुस्थानी फौजांवर तुटून पडण्यास आतुर आहेत. "

" और.. "

" जनाब.. अमरिकाने चायनाला तटस्थ राहण्याचा इशारा दिला आहे. या घडीला त्यांना आपल्यापेक्षा काफरांची जास्त पर्वा वाटते. "

" हम्म .. यह बात है. तो मुहाजिर काय म्हणतो ? "

" जी, जनरल साहेबांचं म्हणणं आहे की, चिनी फौजेची सहाय्यता घेऊन कश्मिर ताब्यात घ्यावं. असा योग पुन्हा कधी येईल न येईल. "

" फौजी आदमी. सियासी चाल कधीच समजणार नाही.. .. रसूल.. त्या काफिरला सांगा.. हिंदुस्थानच्या पंतप्रधानाला सन्मानाने वापस पाठवा. आपल्या चिनी मित्रांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार माना. परंतु लगेचच हिंदुस्थानसोबत युद्ध करण्यासाठी आम्ही असमर्थ असल्याचे त्यांना कळवून त्यांची समजूत घाला.. "

" मगर जनाब.. "

" रसूल.. हमारी बात काटो मत.. "

" तकसीरची माफी असावी, हुजूर.. "

" हमें मालूम है, तुम क्या सोच रहे हो.. मगर यह जान लो.. अगर कश्मिर हमें चायना की मदद से मिला तो हाथसे पाकिस्तान भी जाएगा. कश्मीर तो हम लेंगे.. मगर अपने दम से.. और रही बात हिंदुस्तान की… तो हमारे रत्नांग्रीवाले दोस्तों से कहो.. हमने अपना वादा निभाया, अब तुम्हारी बारी ! " 

( समाप्त )

सोमवार, २८ मार्च, २०२२

गांधी, सावरकर, आंबेडकर आणि अस्पृशोद्धार : एक चिंतन

जातिभेद आणि अस्पृश्यता. एकाच नाण्याच्या दोन बाजू. पैकी, अस्पृश्यता स्वातंत्र्योत्तर काळात कायद्यानेच समाजाजीवनातून हद्दपार करण्यात आली असली तरी अद्यापि ती अवशिष्ट स्वरूपात शिल्लक असल्याचे विविध घटना - व्यक्तींच्या भूमिकांमधून आपल्या निदर्शनास येते.

अस्पृश्यता निवारणार्थ या देशात व्यक्तिगत तसेच संघटीत पातळीवर कित्येकांनी अनेक प्रयत्न केले. 

जसे म. फुल्यांनी अस्पृश्यांकरता शाळा सुरू केल्या, अस्पृश्यांची कैफियत लिहून या समाजाची स्थिती सर्वांसमोर मांडली. 

कोल्हापूरकर संस्थानाधिपती शाहूंनी तर आपल्या संस्थानात अस्पृश्यता पालन बंदी केली. अस्पृश्यांकरता शिक्षणसंस्था निर्माण केल्या. त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध व्हावी याकरता सक्रिय मदत केली. परंतु हे व्यक्तिगत पातळीवरील कार्य, विशिष्ट प्रभावक्षेत्रापुरते मर्यादित राहीले. जरी यापासून इतरांनी प्रेरणा घेतली असली तरीही !

अस्पृश्यता निर्मूलनाचे व्यापक प्रमाणावर कार्य करण्याचं श्रेय मुख्यतः गांधी - आंबडेकर, त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अधिक आहे. परंतु त्या जोडीला आपणांस वि. दा. सावरकरांचे प्रयत्नही विचारात घेणे आवश्यक आहे.

गांधी, आंबेडकर आणि सावरकर. या तिघांमध्ये साम्यस्थळं तशी खूप आहेत. तिघेही उच्चशिक्षित, कायदेतज्ञ. परदेश वारीचा तिघांनाही अनुभव होता. तसेच तिघेही समाज व राजकारणी. त्याव्यतिरिक्त सावरकर हे काव्यप्रतिभेचे धनी. त्यांचा कल्पनासृष्टीतील विहार त्यांच्या ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या लेखनातही बऱ्याचदा डोकावतो. आंबेडकरांकडे सावरकरांइतकी काव्यप्रतिभा व लेखनाची प्रासादिक शैली नसली तरी ते व्यासंगी असल्याने कठोर तर्कचिकित्सा हा त्यांचा लेखनगुणधर्म होता. या दोघांच्या मानाने गांधींचे ग्रांथिक लेखन अगदीच कमी, नगण्य स्वरूपात मानता येईल.

स्वभावविशेष पाहता तिघेही तितकेच चिवट, आक्रमक. परंतु राजकारणात आक्रमकतेला सात्त्विकतेचा चेहरा देऊन गांधीने या दोघांवर मात केली. 

राजकारणातील यशापयशाचा विचार करता गांधी सर्वसामान्य गरिबांचा चेहरा बनले, आंबेडकर प्रामुख्याने अस्पृश्य वर्गाचा तर सावरकर… ?

भारतीय स्वातंत्रलढ्याचे वरवर जरी अवलोकन केले तरी हे लक्षात येते की, स. १९२० नंतर या लढ्याने जोर पकडला. पाठोपाठ अस्पृश्यतेचा मुद्दा ऐरणीवर आला. उपलब्ध माहितीनुसार स. १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारण ठराव मंजूर करण्यात आला. खेरीज धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्रातील गांधी - आंबेडकर प्रथम भेटीचा वृत्तांत गृहीत धरला तर अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमास काँग्रेसची मंजुरी मिळवण्याकरता गांधींना बरेच प्रयास पडले होते. कारण काँग्रेस व तत्कालीन सर्व स्पृश्य नेतेमंडळी अस्पृश्यांचा प्रश्न हा सामाजिक - धार्मिक संस्थांच्या कार्यक्षेत्रतील मानत होते. 

स्वतः गांधी स्पृश्यास्पृश्य भेद मानत नव्हते. तसेच हिंदूंची जातिसंस्था ही व्यवसायाधिष्ठित असल्याने त्यांनी स्वतःहून मैला साफ करण्याचे कार्य पत्करत याबाबत आपल्या वर्तनाने एक धडा घालून दिला. आजही जातिसंस्था ही जन्माधिष्ठित मानण्याचा प्रघात आहे, हे लक्षात घेता गांधींचे हे कार्य त्या काळाचा विचार करता निश्चितच क्रांतिकारी स्वरूपाचे होते. विशेषतः ज्या काळात मैला साफ करण्याचे कार्य विशिष्ट जातीसमूहाचे मानले जात होते.जातीसंस्थेची रचना उतरंडीची मानली तर त्या उतरंडीवर वरिष्ठ स्थानी असलेला समूह कनिष्ठ स्थानावरील व्यक्तीचे कार्य करण्यास प्रवृत्त झाला.

अस्पृश्यता व जातीभेद या दोन ज्वलंत प्रश्नांकडे गांधींनी विशेष लक्ष पुरवले. पुढे तर त्यांनी केवळ आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहण्याचा निश्चय अंमलात आणला.

अस्पृश्यांची अवहेलना, मानखंडना करणारा ' अस्पृश्य ' शब्द न वापरता त्या जागी योग्य असा पर्यायी शब्द -- ज्याद्वारे स्पृश्यास्पृश्य दरी कमी होईल असा -- योजण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी पत्रकाद्वारे लोकांनाच योग्य प्रतिशब्द सुचवण्याचे आवाहन केले असता एका वाचकाने त्यांना ' हरिजन ' हा शब्द सुचवला. स्वतः गांधी वैष्णव असल्याने त्यांनी ' ईश्वराचे भक्त ' याअर्थी त्या शब्दाचे स्वागत केले. 

परंतु गांधींच्या या व अशा अनेक उपक्रमांना म्हणावे तितके यश प्राप्त झाले नाही. याचे कारण, अस्पृश्यता निवारण्याचे महत्वच मुळी काँग्रेसींना समजले नव्हते. त्यांची सगळी तळमळ फक्त देश स्वातंत्र्यलढ्यापुरती मर्यादित होती. 

खेरीज अस्पृश्य शब्दाला हरिजन प्रतिशब्द दिल्याने लोकभावना कशी बदलणार ? परिस्थिती अशी आहे की, आज ' हरिजन ' हा शब्द एका समुदायाचा अवमानदर्शक मानण्यात येऊन कायद्यानेच व्यवहारातून बाद ठरवला आहे.

रत्नागिरी येथे स्थानबद्धतेच्या काळात वि. दा. सावरकरांनी अस्पृशोद्धाराचे कार्य हाती घेत सहभोजन, मंदिरप्रवेश इ. उपक्रम आरंभले. सावरकरांचे यामागे हिंदू संघटन हे मुख्य उद्दिष्ट होते. जातीभेद - स्पृश्यास्पृश्य भेद मिटल्याखेरीज हिंदू एक होणार नाहीत अशी त्यांची धारणा होती. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंदी असल्याने त्यांनी अस्पृश्यांसहित सर्व स्पृश्यांकरता पतितपावन मंदिराची उभारणी केली.

 यास्थळी सावरकरांच्या पतितपावन मंदिराची थोडी चर्चा आवश्यक आहे. मुळात अस्पृश्य प्रवेशार्थ वेगळ्या मंदिराची निर्मिती का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. सावरकर चरित्रकार सांगतात त्याप्रमाणे खरोखर सावरकरांचा तत्कालीन समाजावर, तरुणांवर विशेष प्रभाव होता तर त्यांनी अस्पृश्य प्रवेशार्थ हिंदू मंदिर प्रवेशद्वारं उघडण्याचा प्रयत्न का केला नाही ? यासंदर्भात साने गुरुजींचे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा याकरता केलेले उपोषण लक्षात घेतले पाहिजे. जे स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी अवघे दोन तीन महिने आधी झाले होते व ते यशस्वीही ठरले. ( दि. १ ते १० मे, १९४७ ) 

दुसरे असे की, मंदिराचे नाव पतितपावनच का ? पतित शब्दाचा अर्थ भाषाप्रभु सावरकरांना माहिती नव्हता काय ? जर होता तर मग अस्पृश्य हे पतित ठरतात व मंदिरात जाऊन त्यांचा उद्धार होतो. थोडक्यात अस्पृश्य प्रश्नाकडे बघण्याचा सावरकरांचा दृष्टिकोनच मुळी निकोप नाही. त्यामुळे हिंदू संघटनार्थ त्यांनी अस्पृश्यता निवारण कार्यक्रम हाती घेतला असला तरी मूळ हेतूच शुद्ध नसल्याने त्याचे अपयश स्वाभाविक होते. खेरीज स्थानबद्धतेचा कालखंड संपुष्टात येताच त्यांचे लक्ष प्रामुख्याने हिंदू - मुस्लिम प्रश्नावर केंद्रित झाले.

आंबेडकरांचे अस्पृशोद्धार कार्य आता जगद्विख्यात आहे. त्यामुळे समग्र कार्याची उजळणी न करता निवडक बाबींची चर्चा करतो.

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन असो किंवा नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. या तीन घटना एकाच मुख्य बाबीकडे निर्देश करतात व त्या म्हणजे अस्पृश्य हे हिंदू असून त्यांना हिंदू धर्मात, समाजजीवनात समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे. नव्हे तो त्यांचा हक्क आहे.

अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंबेडकरांनी आरंभलेल्या वृत्तपत्रांची येथे संक्षिप्त चर्चा आवश्यक आहे.

स. १९२० - २३ या कालावधीत आंबेडकरांनी ' मूकनायक ' हे पाक्षिक चालवले. त्यानंतर दि. ३ एप्रिल १९२७ रोजी ' बहिष्कृत भारत ' पाक्षिक सुरू केलं, जे १५ नोव्हेंबर १९२९ मध्ये बंद पडलं. विशेष म्हणजे महाड सत्याग्रह आरंभल्यावर लगेचच बहिष्कृत भारतचे प्रकाशन सुरू झाले.

या ठिकाणी पुन्हा एकदा हरिजन, पतितपावन, बहिष्कृत या शब्द योजनांमागील भाव लक्षात घेणे आवश्यक आहे. गांधीजींच्या हरिजन शब्दाचा अर्थ ईश्वराचे भक्त, लाडके असा उघड आहे. सावरकरांच्या पतितपावन शब्दाची चर्चा आधीच आपण केलीय. आता आंबेडकरांचा बहिष्कृत शब्द.

जो समुदाय इतरांसोबत बरोबरीच्या नात्याने वागू शकत नाही, ज्याचा विटाळ मानला जातो, अगदी पिण्याच्या पाण्याबाबतही त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो, त्यांना बहिष्कृत का मानू नये ? इथे आंबेडकरांनी अस्पृश्य शब्द टाळून बहिष्कृत शब्दाची योजना केल्याचे आपल्या लक्षात येते व याचा आरंभ बहिष्कृत हितकारणी सभेच्या निर्मितीवेळेस झाल्याचे आपणांस दिसून येते. ( दि. २० जुलै १९२४ ) 

अस्पृशोद्धार कार्यात आंबेडकर अत्यंत आक्रमक होते. आणि त्याचे कारण असे की, ब्रिटिश सत्ता भारतावर फार काळ राहणार नाही हे इतरांप्रमाणे त्यांनाही कळून चुकले होते. अशात, जे काही न्याय्य हक्क पदरी पडणार ते याच काळात, परत नाही, हे त्यांना पूर्णतः उमगले होते. त्यामुळे सहभोजन, मंदिराची द्वारे अस्पृश्यांना खुली करणे अशा गोष्टींनी त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते व का व्हावे ?

जर स. १८०२ मध्ये दिल्लीकर तुर्की बादशहा इंग्रजी सत्तेच्या पंखाखाली गेला ही पारतंत्र्याची खूण मानली तर अवघ्या पंचावन्न वर्षांत जनता त्या सत्तेविरुद्ध बंड करून उठते. किंवा स. १८५८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती येथील सत्तासुत्रे गेली असे गृहीत धरले तरी अवघ्या अर्ध - पाऊण शतकांत  येथील जनता राजकीय हक्कांविषयी जागृत होऊन हळूहळू आक्रमक होत प्रथम वसाहती अंतर्गत स्वराज्य ते पूर्ण स्वातंत्र्याप्रति पोहोचते तर मग काही शतकांचा अस्पृश्यतेचा इतिहास असणाऱ्या समुदायाने चार दोन सहभोजन व मंदिर प्रवेशाच्या घटनांवर का समाधानी व्हावे ?

डॉ. आंबेडकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय ? असा कुत्सित प्रश्न विचारणाऱ्यांना राजकीय व सामाजिक लढ्यातील एकत्व, अभिन्नत्व कितपत माहिती असतं !

अस्पृश्य स्मानतेचा, सन्मानाने जगण्याचा हक्क मागत असता तो मिळत नाही हे पाहून स. १९३५ मध्ये आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. तेव्हापासून ते स. १९५६ पर्यंत.. वीस वर्षे हिंदूंना व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या वैदिकांना बदलाची संधी होती. आंबेडकर एकीकडे प्रतिपक्षाला अशी संधी देत असता दुसरीकडे धर्मांतराकरता उपलब्ध पर्यायी धर्मांची चाचपणी करत होते. 

मधल्या काळात देशाला स्वातंत्र्य लाभले. राज्यघटनेच्या लेखनकार्यात सहभाग घेण्याकरता मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत आंबेडकरांनी घटनेतच अस्पृश्यता हद्दपार करत इतिहास घडवला. अस्पृश्यता पालन कायद्याने दंडनीय अपराध ठरवण्यात आले. परंतु या बदलास हिंदू समाजाची अनुकूल मानसिक तयारी करणारा नेता मात्र कोणी नव्हता. गांधींची उणीव प्रकर्षाने आपणांस याच कालखंडात जाणवते. जेव्हा स्वातंत्र्योत्तर भारतासमोर दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक विषमता, फाळणीने उद्भवलेला धार्मिक संघर्ष इ. प्रश्न उपस्थित झाले होते. नथुराम गोडसेने केवळ गांधींची हत्याच नाही केली तर नवस्वतंत्रित भारताच्या एक होऊ पाहणाऱ्या जनतेच्या एकात्मिक भावनेवरच घाला घातला.

फाळणी होईपर्यंत स्पृश्यांच्या लेखी आंबेडकर व अस्पृश्यांना महत्व होतं. फाळणी होताच आंबेडकरांचेही महत्त्व स्वाभाविक घटलं. परिणामी धर्मांतर हे अटळ ठरलं !

अस्पृश्यता पालनास कायद्याने बंदी व अस्पृश्यता टाळण्यासाठी धर्मांतर. दोन पर्याय उपलब्ध असले तरी सध्या देशातून अस्पृश्यता समूळ नष्ट झाली आहे का ? त्यांना आपल्या वस्तीत जागा नको इथपासून आपण त्यांच्या वस्तीत राहायला जायचं नाही, इथवर आपली मजल गेली आहे. जन्माधिष्ठित जातींवर आधारित अस्पृश्यता आता खानपान, पोशाख इ. बाबींवर ठरवली जातेय. प्रामाण्यवाद तर वेडगळपणाची हद्द सोडून गेलाय. सध्या जो आपला नाही त्याचा द्वेष करणं हाच एक धर्म झालाय. 

एक नवीन द्वेषसंस्कृती आपण जन्माला घातलीय. गावकुसाबाहेरील आपला समाज -- ज्यामध्ये पूर्वास्पृश्य तसेच ब्रिटिश राजवटीत गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का मारलेले, वन्य आदिवासी इ. -- आजही तीच अस्पृश्यता भोगतोय. भाकरी फिरवली नाही तर करपते असं राजकारणात म्हटलं जातं पण ते समाजकारणालाही लागू पडतं. 

औद्योगिक क्रांतीनंतर समाजव्यवस्था -- विशेषतः जातीयता व अस्पृश्यता संपुष्टात येईल असा आशावाद असावा. आजचं चित्र हे भ्रमनिरास करणारं आहे. न्याय्य हक्क, मागण्यांसाठी एकत्र येण्याऐवजी द्वेषाकरत एकत्र येण्याची प्रवृत्ती निश्चितच देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेला धोक्यात आणणारी आहे. आपली सद्यस्थिती, दुरावस्था, प्रगती याबाबत कठोर आत्मपरीक्षणाऐवजी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याची आपली प्रवृत्ती निश्चितच अनर्थकारी आहे. 

डॉ. आंबेडकरांनी दि. ४ एप्रिल १९३८ रोजी तत्कालीन मुंबई विधिमंडळातील कर्नाटक विभक्तीकरण ठराव प्रसंगीच्या भाषणात पुढील उद्गार काढले होते,  ".. … मी कोणत्याही प्रकारचा प्रांतभेद, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रीय म्हणूनही घेण्यास भूषण मानीत नाही. तसेच भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम हिंदी नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीय पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी. "  आज या उद्गारांच्या, भूमिकेच्या वारसदारांची गरज आहे. 

जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न चांगलं आहे. परंतु त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की, देशातील प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य - शिक्षण इ. गरजा पूर्ण होऊन त्यांस इतरांप्रमाणेच सन्मानाने जगण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. अन्यथा देश महासत्ता आहे न् लोकसंख्येचा काही टक्के भाग त्याच दारिद्र्य, रूढी - परंपरांच्या दुष्टचक्रात अडकून पडलाय असं चित्र दिसणार असेल तर अशी महासत्ता, ती काय कामाची !