आणखी एक अवतार कथा !


     पृथ्वीवरील यवनांचे प्राबल्य वाढले. देशातील जनतेवर अत्याचारांत वाढ झाली. धुणी धुवायला गेलेल्या बाया शिखानष्ट पळवून नेऊ लागले. दावणीची उभी जनावरं बलात्कारे हिरावून घेतली जाऊ लागली. शिवारातील उभी पिकं मन मानेल तशी कापून नेण्यात येऊ लागली. देवाब्राह्मणांचा अगदीच उच्छेद होऊ लागला. मूर्ती व मूर्तीपूजकांच्या विटंबनेस मर्यादा राहिली नाही. अशा समयी काही धर्मवीर तपस्वी ब्राह्मणांनी धर्मरक्षणार्थ परमेश्वरास साकडं घातलं. यवनांच्या उपद्रवाच्या आशंकेने यज्ञविधी सह्याद्रीच्या कुशीत, निबिड अरण्यात, अंधाऱ्या गुहेत आरंभिला. कित्येक ब्राह्मण केवळ गाईचे दुध प्राशन करून यज्ञकर्म करीत होते तर काही निव्वळ गोमुत्र !

    तपस्वी ब्राह्मणांची तपश्चर्या, रयतेच्या आसवांनी – आर्जवांनी स्वर्गातील देवराज इंद्राचे सिंहासन डळमळू लागले. भयभीत इंद्राने ३२,९९,९९,९९९ देवतांची सभा बोलावली. बैठकीत अग्रभागी महादेव स्थानापन्न झाले होते तर त्यांच्या शेजारी विष्णू विराजमान होते. इंद्राच्या आसना शेजारीच काही अंतर राखून ब्रह्मदेव आपल्या त्रिमुखांनी व षट्नयनांनी सभेचे समतोल अवलोकन करीत होते. आज अचानक देवेंद्राने सर्व स्वर्गीय देवतांना बैठकीत बोलावल्याने समस्त देवमंडळ बुचकळ्यात पडले होते. प्रत्येकजण आपल्या शेजारी बसलेल्या देवाशी यासंदर्भात चर्चा करीत होते तोच साक्षात सहस्त्राक्ष इंद्राचे दरबारी आगमन झाले व सर्वजण आपापली तोंडं मिटून देवेंद्राकडे पाहू लागले. 


    हजार डोळ्यांच्या इंद्राकडे अंगी दैवी सामर्थ्य असूनही कोणत्याही इंद्रास बघवत नव्हते. त्याचे रूप नजरेत सामावत नव्हते. सिंहासनावर विराजमान होत इंद्राने सर्व देवतांवर आपल्या सहस्त्र नयनांनी दृष्टीक्षेप टाकला व त्याचे त्रिनेत्र अनुक्रमे ब्रह्मा –विष्णू – महेशावर स्थिरावले. सृष्टीचा निर्माता, पालक व संहारक असलेले ते त्रिवर्ग यापूर्वी कसे तेजःपुंज दिसायचे पण आता .....  

    महादेवाच्या जटांमधून धो – धो वाहणारी गंगा थेंबाथेंबाने पडत होती. जटाधारी महेशाचे शरीर जटांच्या आकाराहून बारीक झाले होते. शेजारचा दशावतारी विष्णू भलताच पांढरा फटफटीत पडला होता. नेहमी हातांत पद्मशंखगदाचक्र बाळगणाऱ्या विष्णूने मोठ्या प्रयासाने हाती कमलपुष्प धरिले होते. तर सृष्टीनिर्माते ब्रम्हदेव ..... हनुवटीखालील व डोईवरील केस अस्ताव्यस्त झाले होते. स्कंधावर तीन मुखे असूनही एकाही मुखावर तेजाचा लवलेश नव्हता. दरबारच्या त्रिरत्नांची हि अवस्था पाहून इंद्र चरकला.

    फार वेळ न दवडता त्याने या परिस्थितीबाबत ब्रह्मदेवास विचारणा केली असता ब्रह्मर्षी म्हणाले, “ देवेंद्रा ! काय वर्णु तुज आमुची व्यथा ? नव्यानेच स्थापित झालेल्या जन्नतच्या खुदाचे हल्ली भयंकर प्रस्थ माजले आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी व जन्नतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्याचे भक्त जीव तोडून प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्हां सर्वांवर हि अवकळा पसरली आहे.”

    “ जीव तोडून ? पण आमचेही भक्त जीव तोडूनच आपली भक्ती करतात ना ? “ ब्रह्माला मध्येच रोखत देवेंद्राने विचारणा केली.

    “ महाराज आपलं म्हणणं बरोबर आहे. “ इंद्राच्या प्रश्नाने भाषणात मध्येच व्यत्यय आणल्याने आलेला क्रोध मनातच गिळत ब्रह्मदेव पुढे बोलू लागले, “ परंतु आपल्या व त्याच्या भक्तांत फरक आहे. आपले भक्त आपल्याला प्रसन्न करण्याकरता स्वतःचा वा चतुष्पादांचा जीव घालवतात. परंतु त्याचे भक्त त्याला राजी राखण्यासाठी आपल्याच भक्तांचे जीव घेतात. इतकेच नाही तर त्याचे भक्तगण आता खुद्द आमच्याही जीवावर उठले आहेत. इंद्रदेवा या सभेतील उपस्थित असणाऱ्या प्रत्येक देवाकडे पहा. कोणाच्याच चर्येवर तुम्हांला रया दिसणार नाही. दिसणार तरी कशी ? दुधा – तुपांनी आम्हांला न्हाऊ घातलं जायचं पण आता आमच्या भक्तांकडे दुधाची निर्माती गायचं राहिली नाहीतर कुठले तूप अन कुठले दही ? खुदाशिवाय कोणाला मानायचे नाही म्हणून त्याचे भक्त आम्हां देवी – देवतांच्या मुर्त्या फोडत आहेत. त्यामुळे कमीत कमी जलधारांनी अभिषिक्त होऊन तेजस्वी राहणारी आमची कांती आता काळवंडू लागली आहे. खुदाच्या भक्तांची अशीच चलती राहिली तर लवकरच ते सर्व मुर्त्या फोडून टाकतील. जेणेकरून आम्हां देवी – देवतांना मिळणारा दुध – दही – तुप – जलाचा खुराक बंद होईल. एकदा का हा महाप्रसाद बंद झाला तर निव्वळ अमृत पिऊन आम्ही दिवस कसे काढणार व तेहतीस कोटी देवतांना अन ९९ कोटींहून अधिक मुखांना ते किती दिवस पुरणार ? देवेंद्रा आता सर्वनाशाची वेळ आली आहे. सर्वनाशाची .....”  आवेशाने बोलत असतानाच अशक्तपणामुळे ब्रह्मदेवास मूर्च्छा येऊन ते आसनावरून कोसळले. त्यांना शुद्धीवर आणण्याकरता पाच – सहा देवतांनी शंकरास आसनावरून उचलले व बैठकीच्या स्थितीतच त्यांना तिरके केले. जेणेकरून त्यांच्या जटांतून ठिबकणाऱ्या गंगेच्या जलथेंबांनी ते शुद्धीवर यावेत.

    सृष्टीनिर्माता ब्रह्माची अवस्था अन सभेतील देवी – देवतांची सुकलेली मुखकमलं व रोडावलेली शरीरं पाहून देवेंद्राने जन्नतमधील खुदाच्या बंदोबस्ताचे कार्य मनावर घेतले. त्याने त्याच सभेत एका विशाल पात्रात प्रत्येक देवी – देवताचे एकेक आशिर्वचन गोळा करून त्याचे जलांत रूपांतरण केले व सह्याद्र्याची कुशीत चाललेल्या यज्ञस्थळी तो जलकुंभ नेऊन देण्याची जबाबदारी त्याने वायू व पर्जन्यदेवतेवर सोपवली.

    गेले कित्येक दिवस चाललेल्या होमाची सांगता होण्याची काही चिन्हं दिसेनात. मुत्र व दुध देऊन गाई रोडावून गेल्या. समिधांच्या अतिरिक्त व अखंडित वापराने सह्याद्रीचे निबिड अरण्य उजाड होऊ लागले. गोमुत्र – दुग्ध प्राशनाने यज्ञकर्त्यांची जिव्हा रुचीहीन झाली. आरंभीचा उत्साह बाजूला पडून आता मंत्रोच्चार यंत्रवत झाले होते. सतत अग्नी व धुराचा सामना करून यज्ञकर्त्यांचे डोळे इंगळाहून अधिक लाल झाले होते तर नेत्र व नासिकांतून गंगा – यमुना घळाघळा वाहत होत्या.

    सर्व रोजचंच झालं होतं. उगवणाऱ्या – मावळणाऱ्या दिवसाचे भान कोणालाही नव्हते. प्रत्येकजण दैवी चमत्काराची, अवताराची आतुरतेने वाट पाहत होते अन एके दिवशी तो क्षण उगवला. सह्य पर्वतरांगेतील त्या अंधाऱ्या गुहेत साक्षात वायू – पर्जन्यदेव प्रगटले. उभ्या आयुष्यात दगडाखेरीज देव न पाहिलेल्या त्या ब्रह्मवृंदाचा प्रथम आपल्या डोळ्यांवर अन नंतर उभय देवतांवर विश्वासच बसत नव्हता. परंतु त्यांचे ते दिव्य तेज, कमरेखालील अदृश्य शरीर पाहून त्यांचा भरवसा बसू लागला. या समयी देवतांनी त्या ब्रह्मवृंदास आज्ञापिले कि, “ तुमच्या घोर गंभीर तपश्चर्येने साक्षात देवेंद्र प्रसन्न झाले असून त्यांनी तुमच्या संकटनिवारणार्थ हा आशीर्वादयुक्त जलकुंभ पाठविला आहे. तुमच्यात ज्या कोणा विवाहित, पतिव्रता स्त्रीस पुत्रप्राप्ती होत नसेल व ती परमेश्वराची नित्य आराधना करीत असेल तिला या जलकुंभातील जळ प्राशन करण्यास सांगा. तिच्या पोटी जन्माला येणारे बालक तुमच्या सर्व संकटांना दूर करेल. दृष्टांचा संहार करेल.” इतकं बोलून देव अंतर्धान पावले अन कुंभ जमिनीवर स्थिरावले.

तपश्चर्या फळास आल्याने ब्रह्मवृंद आनंदित झाले. त्यांनी लगबगीने तो जलकुंभ उचलून एका विवाहित, पतिव्रता, धर्मनिष्ठ, पुत्रहीन राणीला भेट देण्याचे ठरवले व यज्ञाची सांगता करून ते गुहेतून बाहेर पडले.


ता. क. :- विवाहित, पतिव्रता, धर्मनिष्ठ अशा स्त्रीच्या उदरी जन्म घेणाऱ्या अवतारी पुरुषाचे नाव काय होते हे जाणून घेण्याची आपणांस अधिक उत्सुकता असल्यास आपापल्या पसंतीच्या ऐतिहासिक पुरुषाची अवतारी व्यक्ती म्हणून योजना करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा