चाळीशी.. एक अपरिहार्य वास्तव… वयाचा टप्पा.. सहजासहजी न ओलांडता येणारा… तसं पाहिलं तर आपण वयाच्या कोणत्याच टप्प्यावर एवढं विचाराक्रांत होत नाही. ज्या उत्साहाने पंचविशी स्वीकारली त्याच तिशी - पस्तिशी.. परंतु चाळीशीच्या बाबतीत तसं बोलायची सोय नाही.
इथं तुम्ही धड तरुण नसता की प्रौढ वयस्क. काहीशी मधली अवस्था असते. तारुण्याची उर्मी सरलेली नसते न् प्रौढत्वाची जाणीव आपल्या मनातून जात नसते.
पस्तिशीपर्यंत मनात जपलेलं बालपण कुठेतरी हरवू लागतं.. जबाबदारीच्या जाणिवा तुमच्यातील मूल मारून टाकतात. तसं पाहिलं तर बालपण, तारुण्य या अवस्था कधी मला उपभोगता आल्या नाहीत, परंतु त्यांची खंत कधीच वाटली नाही. पण ही प्रौढत्वाकडे नेणारी.. सॉरी, त्यावर शिक्कामोर्तब करणारी चाळीशी मात्र अस्वस्थ करणारी नक्कीच आहे.
देव आनंदने कधी पस्तिशी स्वीकारली होती का ? नाही म्हणजे कणेकरी लेखांवर मोठे झालेले आम्ही. त्यामुळे देव आनंद नेहमी पंचविशीतच मनाने राहिला असावा, अशी एक भाबडी समजूत आहे, म्हणून म्हटलं. पण मनाने चिरतरुण राहण्याची किमया मला वाटतं एखादा देवच करू शकतो. जसं मरेपर्यंत आशिक मिजाज राहणारा हसरत जयपुरी. पन्नाशी नंतरही तितक्याच उत्कट आतुरतेने ' कांटे नहीं कटते यह दिन यह रात.. ' म्हणणारा किशोर तरी कुठे वेगळा होता म्हणा.. खऱ्या आयुष्यात कधीही न भेटलेले पण नेहमी आपलेच वाटणारे हे खरे सहप्रवासी, आधारस्तंभ म्हणता येतील. असो. मनातील सर्वच भावना कधी कधी शब्दबद्ध करता येत नाहीत व करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रेमपत्राचं जाहीर वाचन केल्यासारखं हास्यास्पद होतात. तेव्हा इथंच आवरतं घेतलेलं बरं !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा