सन्मानानीय पंतप्रधान महोदय,
तुम्हांला कधी पत्र पाठवेन असं माझ्या ध्यानी मनी काय स्वप्नातही आलं नव्हतं. पण आज हे प्रत्यक्षात घडत आहे. यावरून तुम्ही सत्तेत आल्यापासून आजवर कधीच न घडलेल्या घटना / चमत्कार घडण्याचा जो धडाका सुरु झाला आहे, तो आपला केवळ प्रसिद्धीचा फार्स आहे असं आजवर मी जे समजत होतो त्या समजाला चांगलाच छेद ( कि तडा ? जे असेल ते ! ) गेला आहे. ( वाक्य खूप लांबलचक झालं ना ? हि खरी भारदास्त आणि ५० - ६० वर्षांपूर्वीची विद्वानांची मराठी आहे. फक्त अनुस्वारांची कमी ! )
प्रस्तुत पत्र मी मराठीत लिहितोय आणि तुम्हांला ( माझ्या माहिती प्रमाणे ) गुजराथी, हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त भाषा येत नाहीत. पण हरकत नाही. तुमचे सोशल मिडीयावरील नेत्र या मराठी पत्राचा तुम्हांला हव्या त्या भाषेत तर्जुमा करून देतील. असो, पत्रास कारण म्हटलं तर आहे आणि नाहीही ! तुमची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल जवळपास सर्वांनी तुमचे अभिनंदन केले पण मी नाही ! अर्थात, त्याने फरक काय पडतो म्हणा ? पण यावरून मी तुमचा भक्त, कार्यकर्ता तर सोडा साधा मित्रही नाही, याची तुम्हांला कल्पना यावी.
तुम्ही या देशाचे पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगली, बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारी अधिकारी - मंत्र्यांचा संगनमतीय भ्रष्टाचार इ.चे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनेल्स मधील प्रमाण तरी कमी झालं आहे. यावरून ' अच्छे दिन ' येऊ लागल्याचा मला अनुभव येत आहे.
सध्या देशात व देशाच्या सीमेवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. परंतु , मला तुमचे लक्ष एका वेगळ्या मुद्द्याकडे वळवायचे आहे व तो म्हणजे भारताला कार्यक्षम पंतप्रधानांची जशी दीर्घ परंपरा लाभली आहे त्याचप्रमाणे ' शो ऑफ ' करणाऱ्यांचीही आहे. अगदी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचाही त्याला अपवाद नाही !
तुम्ही त्यांस अपवाद ठराल असे उगाच वाटून राहिले होते पण नाही. तुम्हीही त्याच वाटेचे वाटसरु निघालात ! परंतु , एकवेळ तुम्ही परवडले पण तुमचे अनुयायी नकोत अशी आता वेळ आली आहे. उदाहरणार्थ :- भारतातील मूर्ख, अडाणी, गांवढळ ( सुशिक्षित - अशिक्षित दोघेही ) लोकांना आजवर १०० वर्षांहून अधिक कित्येक समाजसेवकांनी, राजकीय नेत्यांनी स्वच्छतेचे धडे दिले. पण या मुर्खांनी त्यावर अस्वच्छतेचे बोळे फिरवले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातील प्रत्येक सभेच्या अखेरीस लोकांना तुम्ही कळकळीने विनंती करायचा कि, ' सभास्थानावर कचरा फेकू नका. कचरा दिसला तर स्वतः साफ करा ! ' पण हे अडाणी लेकाचे थोडी ऐकणार ? त्यांनी दामदुपटीने कचरा करून टाकला.
तुम्ही स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. परंतु, तुमच्या इतके घाणीमध्ये स्वतः उतरून स्वच्छता करण्याचं धाडस तुमच्या अनुयायांत कुठे हो ? त्यांनी स्वच्छ ठिकाणी झाडांच्या पाला - पाचोळ्याचा कचरा पसरवून अंगरक्षकांच्या गराड्यात तो झाडूने दूर करायचा नाटकीपणा आरंभला तो अजूनही चालूच आहे ! यामुळे जगात हसं कोणाचं झालं आणि होतंय हे न समजण्याइतके तुम्ही अडाणी नाही !
भ्रष्टाचाऱ्यांनी गोळा केलेल्या काळ्या पैशाला पाय फुटून तो परदेशात गेला. त्याला पकडून या देशात परत आणण्याचा विडा तुम्ही उचलला. पण तो काळा पैसा ज्या देशात ठेवला गेला असं आजवर सर्वजण समजत होते तो त्या देशातून कधीच गायब करण्यात आलेला हे आता सर्वांनाच कळून चुकलेलं आहे. फक्त उघड कोणी बोलत नाही इतकेचं !
तुम्ही पंतप्रधान बनल्यापासून धार्मिक दंगे तर आता पूर्णपणे थंडावले आहेत. लोकं उगीचच बडोदा, दिल्ली विषयी अफवा उठवतात. त्यांची सवयच आहे ती ! असो, देशातील धार्मिक दंगे थंडावले पण आज महाराष्ट्रात काय चित्र दिसत आहे ? महाराष्ट्रच काय संपूर्ण देशातील मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांवरील अत्याचारात कुठे कमतरता आली आहे का ? त्यात खंड पडला आहे का ? बिलकुल नाही. तुमच्या समर्थ हातांत देशाची शासन व्यवस्था असताना हे असे का व्हावे ?
तुमच्या पक्षाचा जन्मदाता रा. स्व. संघ हा हिंदुत्वाच्या निव्वळ पोकळ गप्पा मारतो. म्हणे, ख्रिस्ती लोकं आदिवासींचं धर्मांतर करतात. अरे, जी गोष्ट ते हजार मैलांवरून येऊन सहजपणे करतात ती तुम्हांला इथल्या इथे करता येऊ नये ? पण हि गोष्ट त्यांना सांगणार कोण ? जिथे आदिवासींच्या व धर्मांतराच्या बाबतीत संघाची हि उदासीनता तिथे ते मागास समजल्या जाणाऱ्या जाती - घटकांविषयी काय करणार हे दिसत आहेच ! कधी तरी वेडाचे झटके आल्याप्रमाणे संस्कृतीरक्षणासाठी ते आजकालच्या मुला - मुलींवर दादागिरी करतात. करणारच म्हणा ते ! कारण, ज्या गोष्टी त्यांना उघड करता येत नाही त्या करण्याचा इतरांनी तरी आनंद का घ्यावा अशी स्वार्थी भावनाही त्यांच्या मनी असते.
काँग्रेसपेक्षा भाजपा बरी, अशा भावनेने समाजातील सर्व जाती घटकांनी तुम्हांला निवडून दिले आहे. तेव्हा सर्व जाती घटकांचा विचार करून तुम्ही शासकीय निर्णय घ्याल अशी आशा आहे. परंतु , अशीही वेळ आणण्याची कृपा करू नये कि, मराठीत नव्या म्हणीची भर पडावी - ' काँग्रेसपेक्षा मोदी भयंकर ! '
असो, पत्र खूप दीर्घ व कंटाळवाणे झाले. तुम्हांला वाचण्यासाठी तेवढा वेळाही मिळायला हवा. आम्ही काय ? रिकामटेकडे ! शाळा - कॉलेजांत थोडं फार विचार करायला व लिहायला शिकलो म्हणून पांढऱ्यावर काळं करत बसलो. इतकेचं ! कळावे.
आपला प्रकट विरोधक,
संजय क्षिरसागर
सही
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाSahyadri,
अभिप्रायाबद्दल आभारी आहे !