प्रत्येकाला
आपल्या घराण्याच्या पूर्वेतिहासाविषयी कमी
अधिक उत्सुकता ही
असतेच. मी देखील
त्यांस अपवाद नाही. साधारणतः
५ - ७ वर्षे
मी आमच्या घराण्याचा
इतिहास शोधण्याचा शक्य तितका
प्रयत्न केला. परंतु दो
ते तीन पिढ्यांच्यावर
फारशी माहिती हाती
लागली नाही. तेव्हा
जितकी माहिती मिळाली
तितकी या लेखाद्वारे
येथे प्रसिद्ध करत
आहे. सर्वप्रथम मी
येथे माझ्या आजोळविषयी
माहिती देत आहे.
सांगली जिल्ह्यातील सध्याच्या कडेगाव
तालुक्यातील तडसर हे
माझं आजोळ. आईचं
माहेरचं आडनाव लादे. तिच्या
घराण्याची पूर्वपीठिका जाणून घेत
असताना जास्तीत जास्त माझ्या
पणजोबापर्यंतचीच माहिती मिळू शकली.
माझे पणजोबा बाळासाहेब लादे.
तत्कालीन ब्रिटीश राजवटीत बाळू
लादे हा सारा
वसुली अधिकाऱ्याच्या हाताखाली
काम करत होता.
हे काम करत
असतानाच कधीतरी तत्कालीन जिल्हा
लोकल बोर्डाचा तो
सदस्य बनला. ब्रिटीश
राजवट असल्याने सदस्याला
पर्यायी शब्द ' मेंबर ' हा
अतिशय साधा, सरळ
सोपा असल्याने बाळू
हा ' बाळू मेंबर
' म्हणून प्रसिद्ध. या काळात
अस्पृश्यता असल्याने बाळूला गळ्यात
मडकं अडकवांव लागलं
होतं. तो मेंबर
बनल्यावर यातून सुटका झाली
वा नाही याविषयी
निश्चित माहिती मिळाली नाही.
जिल्हा लोकल बोर्डाच्या
या मेंबरला लिहिता
- वाचता येत होतं
कि नव्हतं याविषयीही
याच्या मुलांनी कसलीच नोंद
ठेवलेली नाही.
बाळू मेंबरला दोन मुलं
व ७ मुली.
दोन मुलांपैकी मोठा
मुलगा राजाराम --- म्हणजे
माझे आजोबा.
राजारामचं शिक्षण १० वी
अर्थात तेव्हाच्या जुन्या मॅट्रीक
पर्यंत झालं. बाप राजकारणात
असल्याने म्हणा वा इतर
कारणांनी. राजारामचाही ओढा राजकारणाकडे
राहून त्याने गावचं
सरपंचपदही भूषवलं. तेव्हा तडसर
गावचा हा पहिला
महार सरपंच होता.
त्यानंतर पोलिस पाटीलकीही प्राप्त
झाली. सरपंच व
पोलिस पाटीलपद तसेच
रेशनिंग दुकान यांमुळे राजारामला
इतर महारांपेक्षा गावकऱ्यांकडून
वेगळी वागणूक मिळणं
स्वाभाविक होतं. त्यांच्या पंक्तीला
राजारामला कसलाही पंक्तीप्रपंच न
करता एकत्रित स्थान
होतं.
राजारामची बायको --- सुशीला --- अर्थात
माझी आज्जी --- तत्कालीन
७ वी पास.
नंतर ट्रेनिंग कॉलेज
करून शिक्षिका बनली.
ती पुढे शाळेची
हेडमास्तरीण म्हणून रिटायर झाली.
बाळू मेंबरच्या पिढीतील मडक्याची
प्रथा या पिढीत
चालू नव्हती. अर्थात
देशाच्या स्वातंत्र्याची, डॉ. आंबेडकरांचे
धर्मांतर तसेच अस्पृश्यता
पाळणं कायदेशीररित्या गुन्हा
असल्याची भर पडल्याने
आधीच्या पिढीच्या मानाने अस्पृश्यतेचा
चटका राजाराम लादेच्या
घराण्याला तरी तितकासा
बसला नाही. पोलिस
पाटीलकी नंतर राजारामने
तालुका पंचायत समितीचे सदस्यत्वही
प्राप्त केले. त्याच्या आयुष्यातील
हि सर्वोच्च मनाची
तसेच अखेरची राजकीय
घडामोड. यानंतर त्याचे निधन
झाले.
आईच्या माहेरची हि कथा.
आता आपण वडिलांच्या
माहेरची पूर्वपीठिका पाहू.
सांगली जिल्ह्यातील पलूस
तालुक्यातील तुपारी हे माझ्या
वडिलांचे गाव. अर्थात,
हे मूळ गाव
नसून आम्ही मूळचे
सांगोले वा कराड
- पाटण भागचे असल्याचेही काही
जणांचे मत आहे.
पण सबळ पुरावा
नाही. तूर्तास तुपारीवर
समाधान मानणे भाग आहे.
वडिलांच्या घराण्याचा ज्ञात इतिहास
त्यांच्या आजोबा पर्यंत --- दशरथपर्यंत
जातो. दशरथ तत्कालीन
ब्रिटीश राजवटीत रेल्वे खात्यात
कामाला होता. त्याचा मृत्यू
झाल्यावर त्याचा मुलगा बाबूराव
वयाच्या १४ का
१७ व्या वर्षी
रेल्वेत कामाला लागला. काम
तसं फार मोठं.
जोखमीचं. रेल्वे रुळांना चाव्या
मारण्याचं. बाबूरावचं शिक्षण कुठवर
झालं माहिती नाही
पण त्याला मोडी
व नागरी लिहिता - वाचता
येत होतं. शिवाय
तत्कालीन प्रथेनुसार वर्गात त्याची
स्वतंत्र बैठक व्यवस्थाही
होती. परंतु गळ्यात
मडकं बांधण्याची प्रथा
नव्हती.
बाबूरावला कुस्तीचा फार नाद.
तालमीत त्याचा गुरु ज्ञानदेव
जाधव वस्ताद ( चौकीवाला
) हा होता. कुस्ती
वा तालमीत बाबूराव
सर्वांशी मिळून मिसळून वागत
होता. राहत होता.
अगदी खाण्या - पिण्यातही
भेदाभेद वा पंक्तीप्रपंच
नव्हता !
विशेष म्हणजे तत्कालीन महार
समाजात मोठ्याचं मटण खाण्याची
बऱ्यापैकी पद्धत असली तरी
बाबूराव यांस अपवाद
होता. याबाबतीत बाबूरावच्या
मुलाकडे अधिक विचारणा
केली असता, बाबूरावचं
सर्वांशी मिळून - मिसळून राहणं
कारणीभूत असावं असं मत
व्यक्त केलं.
बाबूरावच्या
चुलत्याकडे --- गोविंदकडे तुपारी गावच्या
लक्ष्मी व मरीआईच्या
पूजेचा मान होता.
लक्ष्मी हि तशी
ग्रामदेवता पण मुख्य
पुजारी गुरव वा
इतर जातीय / धर्मीय
नसून महार असावा
व त्याची पूजा
गावकऱ्यांना मान्य असावी याचं
आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
विशेषतः स्पर्शा - अस्पर्शाच्या, विटाळाच्या
चित्रविचित्र संकल्पना प्रचलित असलेल्या
काळाचा हा विरोधाभास
विस्मयजनक असला तरी
विचार करण्यासारखा आहे.
मूळ तुपारी गावच्या
बाहेर व महारवाड्यावत
( उच्चारी म्हारवडा ) कृष्णा नदीजवळ
आजही हे मंदिर
उभं आहे. काही
वर्षांमागे या मंदिराचा
जीर्णोद्धार गावकरी व इतरांच्या
सहाय्याने बाबूरावच्या मुलाने --- विजयने
केला. याच मंदिराच्या
आसपास कुठेतरी नदी
किनाऱ्याजवळ माझ्या पणजोबाचं घर
होतं. परंतु दरसाल
येणाऱ्या कृष्णा नदीच्या पुरामुळे
वैतागून बाबूरावने तुपारी गाव
सोडून सागरेश्वर अभयारण्या
पायथ्यालगत असलेल्या रेल्वे लाईनजवळ
आपलं बिऱ्हाड हलवलं.
बाबूरावच्या बरोबरीने बरेचजण या
ठिकाणी येऊन राहिल्याने
तुपारी गावची नवी वसाहत
निर्माण झाली. असो. हि
घटना स्वातंत्र्यानंतरची आहे.
तत्पूर्वी --- म्हणजे स्वातंतत्र्याआधी --- क्रांतीसिंह
नाना पाटलाच्या प्रतिसरकार
( उच्चारी पत्रीसरकार ) संबंधीची एक घटना
येथे नमूद करण्यासारखी
आहे.
या नाना पाटलाने
शेणोली रेल्वे स्टेशनजवळ त्यावेळी
रेल्वे लुटली होती. या
कृत्यात नाना पाटलासोबत
ज्ञानदेव जाधव वस्ताद,
मारुती पाटील, नागनाथ नायकवडी,
रामभाऊ पवार इ.
मंडळी असल्याचे समजते.
रेल्वेची लुट झाल्यानंतर
हि सर्व मंडळी
भूमिगत झाली. त्यांपैकी ज्ञानदेव
जाधवाला लपवण्याची कामगिरी बाबूरावने
पार पाडली. परंतु
नाना पाटलाचा यावेळी
काही गैरसमज झाल्याने
त्याने बाबूरावला उचलले. मात्र
ज्ञानदेव जाधवाच्या भावाने नाना
पाटलाला सर्व काही
व्यवस्थित समजावून सांगितल्याने बाबूरावची
सुटका झाली.
स्वातंत्र्यलढ्यात
क्रांतिकारकांच्या अनामिक मदतनिसांपैकी एक
म्हणजे बाबूराव क्षिरसागर ! असे
कितीतरी असतील. परंतु त्यांच्याच
वंशजांच्या अनास्थेमुळे इतिहासाकरता ते
अज्ञातच राहिले. असो.
क्षिरसागर व लादे
या दोन महार
परिवारांची एकूण माहिती
/ पूर्वेतिहास लक्षात घेत असता
एकाच जिल्ह्यातील जवळपास
२० किमी अंतरावरील
या गावांमधली सामाजिक
स्थिती विचारात घेण्यासारखी आहे.
तडसरचा बाळू लादे
गळ्यात मडकं अडकवतो.
दशरथ क्षिरसागरची माहिती
नाही. राजाराम लादे
मॅट्रीक पर्यंत शिकून सरपंच,
पोलिस पाटील बनलेला.
बाबूराव क्षिरसागर मोडी व
नागरी लेखन - वाचनापुढे
फारसं शिकलाच नाही.
राजाराम मॅट्रीक तसेच त्याची
बायको शिक्षिका असल्याने
मुलगी सुरेखा १२
वी पर्यंत शिकणं
तितकंस विशेष मानता येत
नसलं तरी काळाच्या
मानाने हे शिक्षण
देखील अधिक आहे.
विशेषतः मुलींना शाळेत पाठवण्याचं
ग्रामीण भागात प्रमाण कमी
असण्याच्या काळात. बाबूरावचा मुलगा
विजय ११ वी
पर्यंत ( जुनी मॅट्रीक
) शिकला.
अधिकार पदांमुळे राजाराम लादेला
सवर्ण मिसळून घेत
होते तर बाबूराव
कुस्ती आणि मैत्रीमुळे.
राजारामच्या घरात, त्याच्या पिढीपर्यंत
मोठ्याचं मटण खाल्लं
जात होतं. पण
त्याची बायको खात नव्हती.
त्यामुळे ती पद्धत
बंदच झाली. तर
इकडे बाबूराव मोठ्याचं
मटण अजिबात खात
नव्हता. राजारामच्या घरी गावातली
माणसं चहापानाला येत.
अर्थात, हा त्याच्या
अधिकार पदांचा प्रभाव होता.
बाबूरावच्या मुलाचे इतर जातीय
मित्र खुशाल त्याच्या
घरी येत असत.
जेवत असत. राजारामच्या
मोठ्या मुलीच्या लग्नात गावातील
मंडळींनी भोजन समारंभाला
हजेरी लावली. यानंतर
या गोष्टीचा प्रघात
पडत गेला. बाबूरावच्या
मुलाने मेहनतीने आर्थिक परिस्थिती
सुधारून नवीन घर
बांधल्यावर गावातली मंडळी बिनदिक्कतपणे
त्याच्या घरी येऊ
लागली.
क्षिरसागर
- लादे घराण्याचा हा इतिहास
लक्षात घेता एक
गोष्ट सहज ध्यानी
येते व ती
म्हणजे अधिकारपद वा आर्थिक
बळाखेरीज इतर जातीय
लोक तुम्हांला मिळून
- मिसळून घेत नाहीत.
परंतु हे विधान
एका विशिष्ट भूतकाळाला
उद्देशून आहे व
ते त्यालाच लागू
पडते. सध्याच्या स्थितीत
बौद्धिक संपदा, अविरत कष्टाची
प्रवृत्ती इ. गुणांच्या
बळावर तुम्हांला हवं
ते स्थान प्राप्त
करू शकता.
ता. क. :- लादे
घराण्याची माहिती माझी आई
--- सौ. सुरेखा विजय क्षिरसागर
यांच्याकडून तर क्षिरसागर
घराण्याचा पूर्वेतिहास माझे वडील
--- श्री. विजय बाबूराव
क्षिरसागर यांच्याकडून मिळवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा