गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

निवडणूक प्रक्रीयेतील सुधारणे संबंधी


     सध्याची निवडणूक प्रणाली मुख्यतः पक्षीय आहे. उमेदवार व्यक्ती एका मान्यताप्राप्त पक्षामार्फत वा अपक्ष म्हणून निवडणुकीस उभा राहते. त्यानुसार सभागृहातील सदस्यत्वासाठी थेट मतदान घेतले जाते. जसे -- नगरपालिका, विधानसभा, लोकसभा वगैरे. यानंतर पक्षीय बहुमताच्या आकड्यांचा खेळ होऊन आपापल्या स्वार्थानुसार पदांची देवाणघेवाण होते. जिथे जनतेच्या हिताला अजिबात प्राधान्य दिलं जात नाही. शिवाय मनं राखण्यासाठी पदांची खैरात केल्याने जबाबदारीचं भानही राहत नाही. या प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे व्यक्तीचे मत नेमकं कुणाला दिलं जातं ? उमेदवार व्यक्तीला कि उमेदवार व्यक्तीस उमेदवारी देणाऱ्या पक्षाला ?

    जर पक्षाला जात असेल असेल तर निवडून आलेल्या उमेदवाराच्या बेजबाबदार वर्तनाचा जाब लोकांनी पक्षाला विचारल्यास अंतर्गत बाब, व्यक्तिगत प्रश्न, वैयक्तिक मत म्हणत हात का झटकले जातात ? आणि जर व्यक्तीला मत दिलं जात असेल तर मग त्याने पक्षाचा अजेंडा राबवण्यापेक्षा आपणांस निवडून देणाऱ्या मतदारांच्या हितास प्राधान्य का देऊ नये ?

    अलीकडच्या काळात विशिष्ट पदासाठी आगाऊ उमेदवार निश्चित करून त्याद्वारे निवडणुका खेळण्याची चाल भाजपाने आखली आहे. त्या धर्तीवर माझे असे मत बनले आहे कि, पक्षांतर्फे उमेदवार उभे करण्याची पद्धती अजिबात बंद करून थेट त्या त्या पदासाठीचे उमेदवार उभे केले जावेत. ज्यामुळे योग्य व्यक्ती त्या त्या पदास लाभून अंती जनतेचं हित साधलं जाईल.

    किंवा पक्षीय पद्धतीत देखील हीच संकल्पना राबवताना मंत्रिमंडळ वा अधिकार पदावरील इच्छुक व्यक्ती आगाऊ निश्चित करुन तसे जाहीर करावेत. जर त्यांचे काम चांगले असेल तर जनादेश त्यांना लाभेल. त्याचप्रमाणे केवळ खोगीरभरती होऊन मंत्रिमंडळ वा अधिकार मंडळाचा पसारा वाढणार नाही. त्याचप्रमाणे निवडून आल्यानंतर अंतर्गत गटबाजी, हितसंबंध राखण्याचाही जनतेला फटका बसणार नाही. परंतु या पद्धतीत पक्षाची विचारसरणी महत्त्वाची असल्याने पक्षाला अंती महत्त्व मिळून उपरोक्त दोष याही स्थितीत कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

    त्यापेक्षा पक्षपद्धती टाळून थेट उमेदवारच जाहीर करावे वा तशी पद्धती अंमलात आणणे श्रेयस्कर ठरेल. यात एक दोष राहील व तो म्हणजे उमेदवार व्यक्ती स्वतंत्र असल्याने तिच्यावर अंकुश राहणार नाही. परंतु व्यक्तीच्या निवडीमागे थेट जनाधार असल्याने तिला मन मानेल तसं अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगण्याची वा स्वैर वर्तनाची मोकळीक फारशी राहणार नाही असा माझा प्राथमिक अंदाज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा